आफ्रिकेतील अतर्क्य - भाग ४

Submitted by रुद्रसेन on 5 August, 2022 - 01:36

( प्रस्तुत कथा हि सत्य कथा नसुन केवळ मनोरंजन म्हणून लिहिण्यात आलेली आहे . लेखनशैलीमुळे मायबोलीवरील नवीन लोकांना ती सत्य कथा असल्याप्रमाणे वाटू शकते. पण वाचकांचे निखळ मनोरंजन करणे हाच कथेचा उद्देश आहे. )

अॅलनन काल सांगितलेल्या त्या पिशाच्चाच्या भयानक अनुभवाचा विचार करतच माझा संपूर्ण दिवस गेला. खरंच पिशाच्च मागे लागल्यामुळे त्यांना पळता भुई थोडी झाली होती. तसं बघायला गेलं तर ते दोघे जवळपास मृत्युच्या जबड्यातून सहिसालामातच बाहेर आले होते. पण तरीही अगदी तंतोतंत
असंच झालं असेल का? माझा मनात उगाचच शंकेची पाल चुकचुकली खोटं म्हणावं तर अॅलन खोटं का सांगेल त्यात त्याचा काय फायदा, नाही नाही ते विचार माझा डोक्यात चालू झाले. इथ राहणं खरोखरंच सुरक्षित तर आहे ना असं वाटू लागलं.
संध्याकाळी जसा कंपनीमधून घरी आल्यावर घर खायला उठलं. बोमान ला विचारावं आणि उगाचच मनाची सांत्वना करावी म्हणून त्याला विचारलं कि इथे खरंच मांत्रिकांना पिशाच्च इत्यादी शक्ती अवगत असतात का? त्यावर त्याने होकार भरला. अॅलन च्या घरमालकाला बोमान ओळखत होता आणि त्याची मुलगी पण तशीच बरी झालीय असं तो मला सांगू लागला. अच्छा म्हणजे अॅलन च्या घरमालकाची मुलगी बरी झाली होती तर. का कुणास ठावूक मला या घटनेची संपूर्ण माहित त्या घटनेसंदर्भात निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीकडून जाणून घायची होती. तसं करण्यामागे माझे खरंतर माझे दोन हेतू होते एक असा कि अॅलन खरंच जे सांगत होता ते खरं होतं कि दारूच्या नशेत जंगलात रात्री अपरात्री भटकल्यामुळे आणि नंतर रात्री स्वप्न पडल्याने त्याचा डोक्यातून निघालेली हि कथोकाल्पित घटना होती कि दुसरंच म्हणजे हे जर खरं असेल तर आपण या जागी कितपत सुरक्षित आहोत हे कळणार होतं. जंगलाचा भाग मी राहतो होतो त्या जागेपासून इतका जवळ न्हवता तसा तो तितका लांबदेखील न्हवता. कोणत्या हिंस्र प्राण्याचा आणि नुकत्याच ऐकलेल्या अॅलन च्या भयानक पिशाच्ची अनुभवाचा धोका आपल्यापर्यंत पोचला तर?

विचारानेच मला घाम फुटला एकतर माझा स्वभाव तसा भित्राच होता. रात्रीच काय तर दिवसासुद्धा जंगलात जायची हिम्मत माझात न्हवती. जर इथे राहण्यात काही धोका असेल तर लवकरात लवकर आपलं बाडबिस्तर बांधून दुसरीकडे राहायला गेलेलं बरे कारण कंपनीचं आढावा घेण्याचं काम संपलेलं न्हवता. काय करावं कळेना, तसं मला एक कल्पना सुचली कि आपण जरा अॅलन च्या घरमालकाला स्वतः भेटून त्याचाशी बोलून खऱ्या गोष्टीचा उलगडा करावा आणि पुढचं पाउल उचलावे.

त्या संध्याकाळी मी जेवणाच्या आधी अॅलन च्या घरमालकाला जाऊन भेटायचे ठरवले. तसं तो कुठे राहतो हे मला माहित होतेच, लगबगीने मी त्या घरमालकाच्या घराजवळ गेलो. घराच्या आजूबाजूला ४-५ शेळ्या खुंटीला बांधलेल्या होत्या, त्यांचा आजूबाजूला पडलेल्या मलमूत्राचा तीव्र वास दरवळत होता, बाजूलाच कोंबड्यांचे खुराडे कपड्याने झाकून ठेवलेलं होते. मुख्य दरवाजा काहीसा उघडा होता. मी हातानेच त्यावर टकटक केली. तेव्हा आतून घरमालक बाहेर आला. मुलीच्या तब्बेतीची चौकशी करायला आल्याचं मी खोटच सांगितलं. तो मला अॅलन चा मित्र म्हणून ओळखत असल्यामुळे त्याने मला आत घेतलं. आतमध्ये मंद असा दिव्याचा प्रकाश पसरला होता. आणि आतल्या खोलीच्या दाराजवळ घरमालकाची बायको आणि त्याची नुकतीच बरी झालेली मुलगी शांतपणे बसलेले होते. थोडं आत आल्यावर पाहतो तर की अॅलन देखील भिंतीला टेकून आढ्याकडे बसलेला होता. हे पाहून मी काहीसा चपापलोच, खरंतर अॅलन इथे असणार हे मला अपेक्षित न्हवते कारण अॅलन हा भाडेकरू असल्यामुळे तो त्याचा रूम मध्ये असेल असा माझा अंदाज होता. आणि तसंही अॅलन समोर मला घरमालकाला जास्त विचारपूस करावी असं वाटत न्हवत. पण आता माघारी जाता येणार न्हवते म्हणून मी अॅलन च्या बाजूला जाऊन बसलो.

‘’अरे तू इथे’ अॅलन ने आढ्याकडे लावलेली नजर माझाकडे करत म्हटलं.

‘’हो, मुलीची तब्बेत बघावी कशी आहे म्हणून आलो पाहायला.’’ मी उतरादाखल म्हणालो.

‘’ देवाची कृपाच म्हणायची म्हणून ती बरी झाली म्हणायची आणि आमचं जीव देखील वाचला. घरमालक मधेच बोलला. आणी घरमालक वर पाहून आफ्रिकन भाषेत देवाचे आभार वगेरे मनात असल्यासारखे हातवारे करत होता.

‘’ अहो तुम्हाला काय होणार आहे, तुम्ही कोणाचे काही वाईट केलंय काय ’’ घरमालकाने अजून काहीतरी बोलावे म्हणून मी उगाचच विषय वाढवायचा म्हणून बोललो.

‘’ यादिवशी हे साहेब होते म्हणूनच मला माझा आणि माझा मुलीला सहीसलामत परत आणता आले. घरमालक अॅलन बोट दाखवून म्हणला.

घरमालक एवढे अॅलन चे गोडवे गात असल्याचे ऐकून खरंतर ती पिशाच्चाची घटना खरीच असावी कि काय असा मला वाटून भीतीने पोटात गोळा आला. कारण हे जर खरं असेल तर मला मी एका धोक्याचा ठिकाणी राहतोय अशी शंका रास्त ठरली असती.

नंतर घरमालकाने मला परत एकदा अॅलन नेच सांगितलेली तीच घटना, ते दोघे कसे मांत्रिकाकडे गेले, पिशाच्च कसे मागे लागले हे परत एकदा विस्तारित रित्या सांगितलं.

घरमालकाची पत्नीनेदेखील आफ्रिकन मध्ये काहीतरी बडबडली. त्यावर घरमालक देखील तिला काहीतरी उत्तरला ते साहजिकच मला आणि अॅलन ला न कळल्यामुळे घरमालकाने ते मोडक्या तोडक्या इंग्रजीत भाषांतर करून सांगितलं.

माझी बायको म्हणतेय कि ‘’ बिर्नाख पिशाच्च असल्याने खरंतर पोरीचा जीव वाचला, आणि मला पण तसच वाटतंय, नाहीतर ख्रास्तर किंवा बाडूम्बी पिशाच्च असत तर एव्हाना आम्ही कोणीच वाचलो नसतो’’ असं म्हणत घरमालक पुन्हा वर पाहत आभारप्रदर्शन करू लागला.
मी आणि अॅलन जरा बुचकळ्यातच पडलो कारण आता घरमालकाने उल्लेख केलेला बिर्नाख किंवा ख्रास्तर हा काय प्रकार आहे हे दोघांनाही कळाल न्हवत. आम्ही तसं घरमालकाला विचारलं कि हा काय प्रकार आहे. त्यावर घरमालक म्हणाला कि “प्रत्येक पिशाच्च हे विशिष्ट शक्तींच्या वर प्रभुत्व मिळून असते जसं कि आजारामधून मुक्तता, शत्रूचं खंडन, पिकाची आणि जनावरांची उत्तम पैदास अशा गोष्टी त्या पिशाच्च साधना केल्याने मांत्रिकाला मिळतात. त्यामुळे त्या त्या शक्तीं मिळवण्याकरिता मांत्रिक ठराविक पिशाच्चाची साधना करत असतात. जशा त्या पिशाच्चान्मध्ये शक्ती असतात. तसं त्यांच्यामध्ये एखादी कमजोरी सुद्धा असते, जसं कि बिर्नाख पिशाच्च हे आगीला मोठा लोळ असेल तर ओलांडून जाऊ शकत नाही. ख्रास्तर पिशाच्चाला पाण्याची भीती. बाडूम्बी ला कोणत्याही वाद्याचा आवाज सहन होत नाही असे अनेक पिशाच्चाचे प्रकार असतात, काही पिशाच्चे ठराविक प्राण्यांना घाबरतात. आणि त्यांचा जशा ठराविक शक्ती असतात तशा कमजोरी सुद्धा असतात. त्यामूळेच असे पिशाच्च आजूबाजूला येऊ नये किंवा त्रास देऊ नये म्हणून आमच्या इथे लोकं कधीमधी मोठी शेकोटी करून पारंपारिक गाणी आणि नृत्य करत लहानसहान वाद्ये वाजवत राहतात, प्राणी पाळतात किंवा अशा अनेक गोष्टी करतात ज्या बाहेरच्या देशातून इथे मुशाफिरी करायला येणाऱ्या परदेशी लोकांना विचित्र वाटतील पण असं करणे हे आमच्या संरक्षणासाठी गरजेचे असते किंवा तशी प्रथाच आहे इथली असं म्हणा हवं तर. प्रामुख्याने यामागे अशा पिशाचांचा उपद्रव होऊ नये हि धारणा असते ‘’

घरमालकाने दिलेली ती अभिनव माहिती ऐकून माझा तर पोटात गोळाच आला एकतर अॅलन ने सांगितलेली घटना सत्य असल्याचं कळल आणि दुसरं म्हणजे अशी बऱ्याच प्रकारची पिशाच्च असतात हे ऐकून धडकी भरलेली होती. आता काय करावे हा मोठा प्रश्नच माझापुढे होता, कारण आफ्रिकेत कुठे जरी गेले तरी आफ्रिकन भूमीतली पिशाच्च सगळीकडे असणार होती त्यामुळे घर बदलून फायदा न्हवता. आता करावे तरी काय विचार करतच मी आणि अॅलन घरमालकाचा निरोप घेऊन खानावळीकडे निघालो.

जेवण करत असताना मी शांत असल्याचं पाहून अॅलन म्हणाला ‘’ काय झालं खूप शांत वाटतोय आज, कामाचं काही टेन्शन आहे का?”

“ अं हो जरा जास्तच काम पाहावं लागतं म्हणून जरा त्याच विचारात होते” असं बोलून खरंतर मी घरमालकाने केलेल्या पिशाचांच्या त्या इत्यंभूत वर्णनाने गर्भगळीत झालो असल्याचं सांगायची लाज वाटून चक्क खोटं बोललो. होतो आणि मलाच माझा या खोट्याची कीव आली साला काय भित्रे आहोत आपण. ज्या व्यक्तीसोबत ती भयानक घटना घडली ज्याने ते पिशाच्च प्रत्यक्ष पहिले तो अॅलन किती स्थिर होता आणि माझा त्या घटनेमध्ये काहीही सहभाग नसून किंवा ते पिशाच्च पहिले देखील नसून माझी हि अवस्था. खरंच अॅलन च्या धाडसाच कौतुक करावं तेवढ थोडंच होतं. मोठ्या धाडसाने आणि प्रसंगावधान राखून त्याने घरमालकाच्या मुलीचा जीव वाचवलेला होता.

आमचं जेवण संपत आले तसं अॅलन मला म्हणला “ चल आज माझा रूमवर झोप, तेवढ्याच गप्पा होतील आणि एक दोन घोट घेऊयात. डोळे मिचकावत अंगठा तोंडाकडे नेत अॅलन म्हणला.

उद्या मला तसंही फारस काम न्हवत उशिरा गेलो असतो तरी चालल असत आणि बरेच दिवस मी सुद्धा दारू प्यायलेलो न्हवतो कधी मधी घ्यायचो मी, पण इथे आल्यापासून या धावपळीत काही जमलं नाही. शिवाय पिशाच्च प्रकरण कळल्यापासून मी जरा धास्तावलेलोच होतो. त्यामुळे अॅलन ची हि पिण्याची योजना मला पटली त्यामुळे माझावरच दडपण सुद्धा कमी झालं असत म्हणूनच अॅलन ची ती विनंती मी चटकन स्वीकारली आणि आम्ही दोघे त्याचा रूमकडे जाण्यासाठी वळलो.

रूमवर शिरताच जास्त वेळ न दवडता आम्ही लगेचच ग्लास भरायला सुरुवात केली. जमिनीवरच अंथरून पसरून त्यावर आम्ही बैठक ठोकली.

अॅलन ने एक त्याचसाठी आणि एक माझासाठी ग्लास भरला आणि चियर्स असं म्हणत आम्ही ग्लास तोंडाला लावला. अॅलन त्याचा सैन्यदलातील आयुष्याबाबत सांगत होता. जसजसं पिऊ लागलो तसं गप्पांना रंग येऊ लागला अर्थात बोलत तो होता मी आपलं ऐकत होतो मधेचच ओह्ह, रिअली असे आश्चर्य वजा कुतूहलमिश्रित उद्गार काढायचो. माझा त्या उद्गारांनी प्यायलेला अॅलन अजूनच चेकाळून बोलायला लागायचा. हळू हळू रात्र चढायला लागली आणि दारूचा अंमल पण चढू लागलेला होता. आता मी सुद्धा बडबड करू लागलो होतो, मला कसा इथल्या वातावरणाचा कंटाळा आला आहे घरचे वेध लागलेले आहेत वगेरे वगेरे.
बाहेर रात्र वाढल्यामुळे एक शांतता पसरली आणि रातकिड्यांचा आवाज जास्तच येऊ लागला. आम्ही जिथे पीत बसलो होतो तिथल्या बाजूच्या भिंतीवरच एक खिडकी होती ती अर्धी उघडी होती आणि तिथून थंड हवेचा झोत माझा अंगावर येत होता. दारू चढल्याने आणि थंड वाऱ्याचा झोताने मला झोप येऊ लागली, अॅलन काही थांबायचे नाव घेईना त्याचा गप्पा ओघ अविरत चालूच होत्या. मला गुंगी येऊ लागली आणि त्या ओघात मी कधी झोपी गेलो कळलंच नाही मला. अचानक मध्यरात्री कसल्यातरी आवाजाने मला जाग आली. मी जरासा दचकूनच उठलो. बाजूच्या भिंतीवरील खिडकी वाऱ्याचा आवाजाने करकरत होती, पिण्याचा नादात खिडकी लावायचं राहूनच गेलं होतं. मला उठायची अजिबातच इच्छा न्हवती.
पण खिडकीची करकर चालू असताना झोप लागणारच न्हवती. कसाबसा चरफडत मी उठलो. खिडकीची अवस्था खरंतर बिकटच होती, पूर्णपणे जुनाट झालेली दिसत होती. खिडकीपाशी येऊन मी कसाबसा उभं राहिलो कारण दारूचा काहीसा अंमल अजूनही माझावर होता तसचं दारूमुळे अंगही जरासं ठणकत होतं. खिडकीपाशी उभं राहून मी माझी दृष्टी बाहेर टाकली अंगावर थंड हवेचा झोत अलगद माझा अंगावर आला आणि खूपच. समोर पाहिलं तर दूरदूरवर फक्त मैदानच दिसत होतं आणि काहीशी मोठी आणि खुरटी झाडे, मी खिडकी ओढून बंद करणार एवढ्यात समोरच्या काही अंतरावर असणाऱ्या मोठ्या झाडामागे कसलीतरी खुसपूस मला जाणवली. कसलेतरी जंगली जनावर किंवा सरपटणारा प्राणी असेल असं समजून मी खिडकी ओढून घेणार इतक्यात ....

समोरच्या त्या झाडामागून झाडाच्या वाळलेल्या फांदिसारखा दिसणारा एक लांब हात मागून पुढे आला आणि झाडामागून कसलीतरी आकृती डोकावून पुढे पाहू लागली, ते दृष्य पाहताच भीतीने माझी बोबडीच वळाली. हा भ्रम आहे कि सत्य मला काहीच थांग लागेना. जागच्या जागी थीजल्यासारखा मी तिथेच खिडकीपाशी उभा होतो. त्या झाडामागून फांदिवजा हातापाठोपाठ एक गोलाकार रुंद डोके बाहेर आले. ज्याला डोळे असे न्ह्व्तेच त्या जागी फक्त खोबण्या होत्या. हे पाहून माझा तोंडच पाणीच पळाल, सर्वांगाला घाम फुटला आणि माझी उरलीसुरली नशा आणि झोप खाडकन उतरली. त्या आकृतीने घोड्यासारखा फुरफुरत कसलातरी आवाज केला. आणि तशी मी घाबरून जोरात बोंब ठोकली. माझा जोरदार बोम्बलण्याने झाडामागच्या आकृतीने हवेतच खिडकीपाशी असे काही उड्डाण केले कि मी घाबरूनच मागे जमिनीवर पाठीवर पडलो. जमिनीवर मगाशी पिताना तसाच ठेवलेला दारूच्या ग्लासाला धक्का लागून तो फुटला आणि नेमका माझा हात त्यावर पडला खसकन काच माझा हातात घुसली. आणि एक कळ माझा हातातून मस्तकात गेली. माझा ओरडण्याने अॅलन झोपेतून खाडकन जागा झाला होता.

जसा तो जागा झाला तसं त्याने खिडकीतील आकृतीकडे आणि जमिनीवर रक्ताळलेला हात पकडून कण्हत बसलेल्या माझाकडे पाहिलं. अॅलन कडे पाहून त्या आकृतीने जोरदार आवाज केला जणूकाही वाफेच्या इंजिनाची शिट्टी असावी तसा. तो आवाज ऐकताक्षणी आता मरण जवळ आलेलं आहे असं समजून मी जमिनीवर तसाच गलितगात्र होऊन पडून राहिलो.

पण याउलट एक प्रकार झाला अॅलन ने चित्त्याप्रमाणे झेप घेऊन बाजूला पडलेला त्याचा लायटर घेतला. आणि मगाशी दारू पितापिता आपला अर्धवट राहिलेला ग्लास हातात घेतला. अॅलन ची हालचाल खूपच चपळाईने झाली. खिडकीतून त्या आकृतीने आपले डोके आत घ्यायला सुरुवात केली तेवढ्यातच अॅलन ने लायटर पेटवला आणि ग्लासामधील अर्धी दारू चटकन तोंडामध्ये भरून घेतली आणि सर्कशीमध्ये मध्ये आगीचे खेळ करणाऱ्या लोकांप्रमाणे लायटर समोर तोंडातील दारू भसकन थुंकल्याप्रमाणे सोडली. तसं लायटर च्या आगीमुळे आणि दारूचा संपर्क येऊन मोठा आगीचा लोळ निर्माण झाला आणि खिडकीमध्ये तोंड घातलेल्या त्या झाडाप्रमाणे असणाऱ्या आकृती च्या सरळ तोंडावर गेला. मोठ्याने आवाज करत ती झाडसदृश आकृती खिडकीमधून झट्कन बाजूला झाली. मी मात्र हा सगळा प्रकार गलितगात्र होऊन जमिनीवर पडून एका प्रेक्षकाप्रमाणे बघत होतो.
हाताला काच लागल्याने रक्त वाहत होत आणि वेदना होत होत्या. ती आकृती आगीमुळे लांब गेल्यानंतर अॅलन ने मला क्षणाचाही विलंब न करता उचललं आणि आपल्या खांद्यावर घेतलं. माझा हाताला लागल्याने आणि भीतीने माझी बोबडी वळल्याने माझाशी बोलण्यात काही अर्थ आहे असं त्याला वाटलं नसावं. मला खांद्यावर घेऊन त्याने मुख्य दरवाजावर लाथ घातली तसा दरवाजा उघडला. आणि मला खांद्यावर घेऊन एका वीराप्रमाणे रस्त्यावरुन पळत सुटला.

“ ते पिशाच्च आगीला घाबरते आणी फक्त आगीमुळेच काही काळ लांब गेले आहे, ते परत आपल्या मागावर येण्याची शक्यता आहे, ते यायच्या आत आपल्याला शक्यतो लवकर इथून निघायला हवं “ पळत पळतच अॅलन मला म्हणाला.
पिशाच्च हे नाव ऐकून माझा तोंडच पाणी पळायला आता माझात काहीच उरलं न्हवता.

“ अं..आ.. कु..कुठे चाललोय आपण.. फक्त एवढंच म्हणत कण्हत भानावर आल्यासारखं मी अॅलन ला विचारलं.

“ तुझा घरी “ एवढंच अॅलन म्हणाला. त्याचे ते ऐकलेले मी त्या रात्रीचे शेवटचे शब्द त्यानंतर माझी शुद्ध हरपली.

क्रमश:

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users