क्रिप्टो (Crypto) भाग २९

Submitted by मिलिंद महांगडे on 1 July, 2022 - 03:48

₿₿₿

“ अभिनंदन मालक , बातम्या बघितल्या का ? ”, झिपऱ्याने जयसिंगला विचारलं. दोघे त्यांच्या नेहमीच्या बारमध्ये बसले होते.
" बघितल्या की रं… लय बरं वाटलं बग… म्हणून तर तुला इथं बोलावलं आज. " , जयसिंग दारूचा ग्लास तोंडाला लावत म्हणाला .
" मग आता तुमचे पैशे मिळणार म्हनता ? "
“ आता एवढी मोठी बातमी हाय आनी एवढ्या मोठमोठ्या चॅनलवर दाखवली म्हनल्यावर खरंच असल की… "
" आन खासदार साहेब? ",झिपऱ्याने बिचकत विचारलं.
" खासदार साहेबांचं निवळायला तसं थोडा वेळ लागंल . इतके दिवस मी टेन्शनमध्ये होतो , की प्रतापरावांनी दिलेले 20 करोड रुपये आपण बिटकॉईनमध्ये घालवले , पण आता काय काळजी नाय मला … ", जयसिंग हात उडवत म्हणाला .
" ते का ? आणि खासदार साहेबांचं नाव आता सगळ्या बातम्यांमधी आलं त्याचं काय ? "
" आरं माझ्या सोन्या , ते खासदार प्रतापराव बोडके पाटील हायेत , उगाच नाय मोठमोठ्या लोकांना डावलून त्यांना खासदारकीचं तिकीट दिलंय… ते सगळं मॅनेज करनार… मला खात्री हाय . "
" मग तुम्ही आधी इतकं टेन्शनमधी का व्हता ? " , झिपऱ्याने शेंगदाणा तोंडात टाकत विचारलं.
" आधी मला वाटलं की आपल्यामुळे त्यांना २० करोडचा फटका बसला , पण तू जवा मला सांगितलंस की , आपल्यापेक्षा दहा पट पैसे साहेबांनी आधीच त्यात टाकले आहेत , तवा कुटं माझ्या जीवात जीव आला. त्यांनी काहीतरी विचार केला असणारच का नाय ! त्यांना जिथं खात्री नाय तिथं ते कशाला पैशे टाकतील मला सांग ? " जयसिंग म्हणाला .
" म्हंजे तुम्हाला असं म्हणायचंय की आपले पैसे परत मिळतील ? " , झिपऱ्याने आश्चर्याने विचारलं.
" लगीच नाय , थोडा वेळ लागल , पण पैशे काय वाया जायचे नाहीत , असं मला आता वाटायला लागलंय… "
" पण तुमच्यावर लय चिडलेत ते , नाय का ! " , झिपऱ्या म्हणाला
" ते हाय खरं ! पण तुला सांगू का , जे होतं ते चांगल्यासाठीच ! मला आता एक चांगला धडा मिळाला बग … जे काय करायचं ते स्वतःच्या हिमतीवर ! फायदा झाला, आपला ! नुकसान झालं, ते बी आपलंच ! आपल्यामुळं उगाच दुसऱ्याला त्रास नको.
" मग आता पुढं आनी काय करायचं ठरीवलंय ? "
" आता पह्यलं मी कायतरी छोटं मोट काम बघनार . स्वतःच्या पायावर उभा राहनार . मग ते बिटकॉईनचं एक्स्चेंज चालू झालं की सगळं पैसं काढून घेनार आन प्रतापरावांना देऊन टाकणार . जय हिंद , जय महाराष्ट्र! "
" हे बाकी लाखमोलाचं बोललात मालक तुम्ही ! मी हाय तुमच्या बरोबर ! आपण मस्त कायतरी धंदा टाकू , लय कष्ट करू… आपली कष्टाची चटणी भाकर खाऊ काय म्हनता …चिअर्स ! ", असं म्हणत झिपऱ्याने त्याचा ग्लास उचलला . ते बघून जयसिंगनेही त्याचं अनुकरण केलं . दोघांनीही आपापले ग्लास संपवले . आणि दोघे निघाले . काउंटरवरच्या शेट्टीने त्याला नमस्कार केला . जयसिंगने बिल द्यायला पाकीट काढलं .
" क्या साब ! मजाक कर रहे है क्या ? रखो पैसा … " , बारमालक कसंनुस तोंड करीत म्हणाला .
" शेठ ! इतके दिवस खासदार साहेबांचा मेहुणा तुमच्याकडं दारू प्यायला येत व्हता … आता आपण फक्त जयसिंग हाये … इथून पुढं आपण बिल देणार ! " , जयसिंग तारवाटलेल्या डोळ्यांनी म्हणाला.
" नाय … शेठ ! बिल आपन देनार … " , मागून आवाज आला. जयसिंगने वळून पाहिलं , मागे टोनी उभा होता , आणि हसत त्याच्याकडे पहात होता .
" अरे , टोनी भाऊ ! " असं म्हणत जयसिंगने त्याला मिठीच मारली . " टोनी भाऊ काय म्हनता ? कसे हायेत ? चला आपन एक एक पेग मारू … "
" नाय जयसिंग राव , आपण दारू सोडली ! या बिटकॉईननेच चांगला लेसन शिकवला. पैसे कमावता येतात , पण ते नीट वापरले पायजेल … टिकवता आले पायजेल … आपला पप्पा सांगायचा , तेव्हा लक्ष नाय दिला आपन … पन आता समजलंय आपल्याला … आता दारू बिरु सगला बंद ! "
" काय सांगताय टोनी भाऊ ! वा ! लय भारी! आज सगळं चांगलंच ऐकायला मिळतंय … आजचा दिवस चांगला हाय ! तुमच्या दोघांचं बी अभिनंदन ! " , झिपऱ्या म्हणाला .
" पन दारू सुटली तरी आपली दोस्ती नाय सुटायला पायजेल … " , टोनी गंमतीने म्हणाला .
" बास का टोनी भाऊ ! " म्हणत जयसिंगने त्याला मिठी मारली . दोघांचे मित्रप्रेम बघून झिपऱ्याच्या डोळ्यांत पाणी आलं .
" आरं लेका झिपऱ्या … तू का लांब उभा … ये भावा ! " , म्हणत जयसिंगने त्याला सोबत घेतला . तिघेही एकमेकांच्या मिठीत विसावले .

₿₿₿

कोल्ड वॉलेटमधून बिटकॉईन परत मिळाल्यानंतर मात्र घटना अगदी जलद घडत गेल्या . सर्वत्र ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. सगळ्या न्यूज चॅनल्स , न्यूजपेपर , रेडिओवर हीच बातमी होती . थोड्याच दिवसात क्रिप्टो कॉइन एक्स एक्स्चेंज सुरू होईल अशा अर्थांचं ट्विट जेव्हा आलं तेव्हा त्याचे गुंतवणूकदार तर जाम खुश झाले. आपले पैसे परत मिळतील अशी खात्री त्यांना वाटू लागली. लोक आता रागिणीच्या पाठीशी उभे राहिले होते. थोड्याच दिवसात ते क्रिप्टो कॉइन एक्स एक्सचेंजही सुरू झाले. लोकांना त्यांच्या अकाउंटमध्ये असलेले बिटकॉईन्स परत मिळाले. परंतु आता ते सध्याच्या मार्केटनुसार अर्ध्या किमतीचे होते . लोकांचे पोर्टफोलिओ अर्ध्या किमतीवर आले होते. तरीही आधी अकाउंट मध्ये जेवढे बिटकॉइन तेवढे आता पुन्हा दिसू लागल्याने सर्वांना आनंद झाला. जे लोक आपले पैसे बुडाल्यामुळे आधी रागिणीला शिव्या घालत होते , तेच लोक आता तिची स्तुती करू लागले. फेसबुकवर , ट्विटरवर, इंस्टाग्रामवर #वुईसपोर्टरागिणी , #रागिणीइजइनोसंट असे हॅशटॅग व्हायरल होऊ लागले. त्यानंतर एक्स्चेंजच्या वेबसाईटवर एक नोटीस झळकली .
" क्रिप्टो कॉइन एक्स एक्स्चेंज एक दुःखद निर्णय घेत आहे . या एक्स्चेंजचे सर्वेसर्वा ओमी मिरचंदानी यांच्या मृत्यू झाल्यामुळे हे एक्स्चेंज बंद करण्यात येणार आहे . गुंतवणूकदारांना सूचना आहे की , तीन महिन्यांच्या आत आपले बिटकॉईन्स किंवा इतर क्रिप्टोकरन्सी एक्स्चेंजमधून काढून घ्यावेत. तीन महिन्यांच्या कालावधीनंतर होणाऱ्या नुकसानाला क्रिप्टो कॉइन एक्स एक्स्चेंज जबाबदार राहणार नाही , याची नोंद घ्यावी . आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद ! ”
तीन महिन्यानंतर ते बिटकॉइन एक्स्चेंज बंद होणार होते, पण तरीही त्यात गुंतवणूकदारांचे हित कसे लक्षात घेतले आहे , याबाबत ट्विटर , फेसबुकवर रागिणीच्या प्रामाणिकपणाचे आणि उदारतेचे गोडवे गायले जात होते. काही दिवसांपूर्वीची व्हिलन रागिणी आता हिरोईन झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात रागिणीवर एफआयआर दाखल करून खटला भरला होता , त्याची सुनावणी आज होती .
मिसेस रागिणी मिरचंदानी हाजीर हो !
कोर्टात मिसेस रागिणीच्या नावाचा पुकारा झाला , तशी ती कोर्टाच्या समोर हजर झाली. कोर्टात जाण्याची तिची पहिलीच वेळ होती. त्यामुळे ती थोडीशी घाबरलीही होती , पण समोर तिचा वकील म्हणून मेघनाद स्वतः उभा होता. त्याला बघून तिला जरा हायसं वाटलं. ती नम्रपणे उभी राहिली. मेघनाद कोर्टासमोर उभा राहिला ,
“ साहेब , माझ्या अशील मिसेस रागिणी मिरचंदानी या कोर्टासमोर हजर झाल्या आहेत. त्यांचे मिस्टर ओमी मिरचंदानी यांच्या अकस्मात मृत्यूनंतर त्यांचं क्रिप्टो कॉईन एक्स हे बिटकॉइन ट्रेडिंग एक्सचेन्ज बंद झालं होतं. त्यामध्ये बऱ्याच लोकांचे पैसे अडकले होते . पोलिसांनी मिसेस रागिणी यांच्यावर गुन्हा दाखल केला होता. मिस्टर ओमी मिरचंदानी यांच्या मृत्यूपूर्वी त्यांनी तब्बल २७०० बिटकॉईन्स एका कोल्ड स्टोरेज वॉलेटमध्ये ठेवले होते. त्यांच्या मृत्यूनंतर ते वॉलेट सापडत नसल्यामुळे अनेक ग्राहकांना वाटलं कि त्यांचे पैसे बुडाले, परंतु मिसेस रागिणी यांनी पोलिसांच्या चौकशीस शक्य तितकी मदत केल्यामुळे ते लुप्त झालेले २७०० बिटकॉईन्स पोलिसांना परत मिळाले आहेत, ज्यांची आजची किंमत जवळपास १००० करोड इतकी आहे. माझ्या अशिलाने कोणताही गुन्हा केलेला नाही , उलट त्यांच्यावर जो दुःखद प्रसंग ओढवला होता , त्यातून सावरून त्यांनी जनतेचे गुंतवलेले पैसे परत मिळवून देण्यात मोलाचं सहकार्य केलेलं आहे. यात कोणताही गैरव्यवहार झालेला नाही. माझी माननीय कोर्टाला अशी विनंती आहे , कि माझ्या अशिलावरचे सर्व आरोप खारीज करून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात यावी. ”
मेघनादने न्यायालयासमोर युक्तिवाद केला. न्यायाधीशांनी चष्म्याच्या वरून एकदा रागिणीकडे नजर टाकली. एक थंड शिरशिरी तिच्या शरीरातून दौडत गेली. नंतर न्यायाधीशांनी सरकारी वकिलांना विचारलं , “ आपलं काय म्हणणं आहे ? ”
“ साहेब , पोलिसांनी योग्य तपास केला आहे , त्यात जेवढे बिटकॉईन गायब झाले होते , जवळपास तेवढे बिटकॉईन रिकव्हर झाले आहेत . मिसेस रागिणी यांनी बिटकॉईन रिकव्हर करण्यात पोलिसांना मदत केली ही बाब नाकारून चालणार नाही. यापुढे सरकारपक्षाला आणखी काही सांगायचं नाही . ”, सरकारी वकिलांनी आपलं म्हणणं मांडलं .
" ठीक आहे ! कोर्ट आपला निकाल दोन दिवसांनी देईल , तोपर्यंत कोर्टाचं कामकाज तहकूब करण्यात येत आहे . " असं म्हणून न्यायाधीश महाराज आपल्या जागेवरून उठले . कोर्टातले सर्वजण त्यापाठोपाठ उभे राहिले . रागिणीही गडबडीत उभी राहिली . आता पुढे काय होणार ? तिला काहीच कळत नव्हते . ती मेघनादच्या जवळ गेली . त्याने डोळ्यांनी तिला दिलासा दिला. इतक्यात इन्स्पेक्टर अमर तिच्या जवळ आला अन म्हणाला , " अभिनंदन मॅडम ! बहुतेक कोर्टाचा निकाल तुमच्या बाजूने लागेल … "
" तुम्हाला खरंच वाटतं असं…?", तिचा चेहरा उजळला.
" हो , बहुतेक कोर्टाचा तोच व्ह्यू दिसतोय . "
" थँक्स. ", म्हणत तिने त्याचा हात हातात घेतला . अमरला पुन्हा अवघडल्यासारखं वाटलं. वाघचौरे साहेबही तिथे आले, त्यांनी रागिणीचं अभिनंदन केलं . त्यांच्याशी जुजबी बोलून ती मेघनाद सोबत तिच्या गाडीत बसून गेली .
" मेघ , मला खूप भीती वाटतेय ? " , कारमध्ये बसल्यानंतर रागिणी त्याला म्हणाली .
" का ? आता काय झालं ? असंही आता हे प्रकरण जवळपास संपल्यात जमा आहे. इतके दिवस तू खंबीरपणे लढलीस आणि आता आपला विजय समोर दिसत असताना तू घाबरतेस ? " , मेघनाद म्हणाला .
" तेच तर ! रेसमधली शेवटची काही सेकंदच महत्वाची असतात , त्यात काहीही होऊ शकतं . " , ती काळजीने म्हणाली .
" विसरतेस तू ! ही रेस वेगळी आहे आणि ती केव्हाच संपली आहे . आता फक्त विजयी कॅन्डीडेटची घोषणा होणं बाकी आहे . ते दोन दिवसात होईल . त्यामुळे काळजी करू नकोस … मी आहे ! "
" तू आहेस म्हणून तर काळजी आहे … " , रागिणी जीभ चावत गंमतीने म्हणाली . मेघनादने खोटे खोटे डोळे वटारले … ती दिलखुलास हसली .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आता संपत आली म्हणा.
म्हणजे रागिणी आणि मेघनाद नं निम्मे बिटकॉईन सरळ सरळ गायब केले म्हणा की.

म्हणजे रागिणी आणि मेघनाद नं निम्मे बिटकॉईन सरळ सरळ गायब केले म्हणा की.

>>>> बिटकोईन ची किंमत निम्मी झाली ना. Qty तेवढीच राहिली. नैतर bitcoin निम्मे झाले असते तर पब्लिकने बोंब मारली असती