क्रिप्टो ( Crypto ) भाग - २८

Submitted by मिलिंद महांगडे on 29 June, 2022 - 05:54

₿₿₿

" खूप मोठा गेम झालाय सर ! " , अमर वाघचौरे साहेबांच्या जवळ जाऊन हळूच कानात म्हणाला .
" माझ्या लक्षात आलंय ते … पण आता काही करता येणार नाही. तो विषय सोडून दे . आधी आपल्याला जो लीड मिळालाय त्यावर लक्ष केंद्रित कर . " , वाघचौरे साहेब त्याच आवाजात म्हणाले .
" ठीक आहे सर , मग आपल्याला लगेच निघावं लागेल. आता या दोघांचं काय करायचं ? "
" यांना इथंच बसू दे … आता हे प्रकरण आता आपण आपल्या पद्धतीने हँडल करू . " म्हणत वाघचौरे साहेब त्यांच्या खुर्चीतून उठले. ते पाहून समोरचे दोन ऑफिसरही उठले .
" तुम्ही बसा , आम्हाला जरा दुसरं काम लागलंय . मी तुम्हाला कळवतो नंतर. चहा वगैरे घ्या . ठीक आहे ? " , असं म्हणून वाघचौरे साहेबांनी त्या दोन ऑफिसर्सना कटवलं आणि अमरसोबत बाहेर पडले. ड्रायव्हरला गाडी काढायला सांगितली. आता ते दोघेच जुहूच्या दिशेनी निघाले होते. दोघेही काहीच बोलत नव्हते . काय बोलणार? दोघेही आपापल्या विचारात गढून गेले होते. एस एफ आय ओ ची ऑफिसर म्हणवणाऱ्या एका सौदामिनी नावाच्या बाईने पोलिसांनाच फसवलं होतं. बरं, तसं फसवलं म्हणायलाही जागा नाही. पोलिसांच्या तपासात तिची खूप मोठी मदत झाली होती. मिसेस रागिणीची चौकशी करण्यापासून ते ओमी मिरचंदानीचा पासवर्ड प्रोटेक्टेड लॅपटॉप ओपन करून त्यातल्या कोड्याचा अर्थ लावून बिटकॉईन साठवलेलं कोल्ड वॉलेट शोधून काढण्यापर्यंत अशा सर्वच कामात तिने मदत केली होती. मग ही सौदामिनी नक्की होती कोण ? तिने एसएफआयओ ची ऑफिसर असल्याचा बनाव का केला ? आणि आता ती अन तिचा असिस्टंट कुठं गायब झाले ? अचानक वाजणाऱ्या फोनमुळे दोघांचीही तंद्री भंग पावली .
" हॅलो , ओके … ओके … ठीक आहे. मी बोलतो साहेबांशी. " , असं म्हणत अमरने फोन बंद केला .
" सर, पाटीलचा फोन होता. मी त्या सौदामिनी आणि तिच्या असिस्टंट चिकटे दोघांच्याही फोनचा सिडीआर आणि लास्ट लोकेशन काढायला सांगितलं होतं . सौदामिनीच्या फोनचं लास्ट लोकेशन पोंडीचेरी दाखवतंय आणि चिकटेच्या फोनचं लास्ट लोकेशन हिमाचल प्रदेश दाखवतंय . " , अमरने माहिती दिली .
" अमर , सोड त्या दोघांना. आता त्या दोघांच्या मागे लागून काहीही फायदा नाही. तुझ्या अजूनही लक्षात आलं नाही का ? कोणीतरी आधीच प्लॅन करून या दोघांना आपल्याकडे पाठवलं होतं . आपल्या तपासात चालणाऱ्या प्रत्येक गोष्टीची खबर त्या माणसाला या दोघांकडून मिळत होती. आणि त्या माणसाला जसा तपास व्हायला हवा होता , तसाच तपास त्याने करवून घेतला. ", वाघचौरे साहेब नकारार्थी मान हलवत म्हणाले.
" ओह शीट ! म्हणजे आपण त्या समोरच्या माणसाला हवं तसं वागत गेलो . कोण असेल सर तो माणूस ? " , अमरने विचारलं .
" ते आता कसं समजणार ? तो कोणीही असू शकतो , कदाचित ओमी मिरचंदानीही असू शकेल . माझं तर डोकं काम करणं बंद झालंय . "
" पण हे सगळं कशासाठी ? काय मिळणार हे सगळं करून ? " , अमर वैतागून म्हणाला .
" त्याचं उत्तर कदाचित आपल्याला लवकरच मिळेल . " , असं म्हणत वाघचौरे साहेब गाडीच्या खिडकीतून बाहेर बघू लागले . थोड्याच वेळात गाडी मिसेस रागिणीच्या जुहूच्या बिल्डिंगसमोर येऊन थांबली. दोघेही रागिणीच्या फ्लॅटवर गेले . तिच्या आलिशान फ्लॅटवर ती एकटीच होती .
" या सर . " तिने हसऱ्या चेहऱ्याने स्वागत केलं . " काय घेणार ? चहा की कॉफी ? "
" नो थँक्स . रागिणीजी आम्हाला थोडं बोलायचं होतं . " , वाघचौरे साहेब म्हणाले .
" बसा ना सर , बोला "
" ओमी मिरचंदानी यांचा लॅपटॉप आम्ही ओपन केलाय . आणि त्यातुन आम्हाला एका ठिकाणी ठेवलेले बिटकॉईनचे कोल्ड वॉलेट सापडले आहे . " , वाघचौरे साहेब म्हणाले .
" ओह , यु मिन , ओमीने ते कोल्ड वॉलेट ठेवलेलं होतं का ? " तिने विचारलं .
" बहुतेक तरी तसंच वाटतंय . " , वाघचौरे साहेब असं म्हणाले आणि एकदम रागिणीचा हुंदका ऐकू आला . ही बाई पहिल्या दिवसापासून उगाच नाटक करतेय असं अमरला वाटून गेलं. पण आता बोलणार तरी काय ? ते दोघे शांत राहिले . थोडा वेळ रडून झाल्यावर तिने आवरतं घेतलं .
" सॉरी … मला एकदम त्याची आठवण आली . " ती म्हणाली . दोघांनी फार काही प्रतिक्रिया दिली नाही .
" मॅडम , आम्हाला एक माहिती हवी होती . लेजर नॅनो एस हे कोल्ड वॉलेट ओमी मिरचंदानी वापरत होते का ? हे बघा ! " , वाघचौरे साहेबांनी ते कोल्ड वॉलेट त्यांच्या समोर ठेवलं . तिने ते हातात घेऊन पाहिलं .
" येस ! हे त्याचंच बिटकॉईनचं कोल्ड वॉलेट आहे . हे बघा , इथे बारीकसं ओ आर असं कोरलेलं आहे . ओ स्टॅण्डस् फॉर ओमी अँड आर स्टॅण्डस् फॉर रागिणी ." ती भावुक होऊन म्हणाली .
" ओके , ठीक आहे . आपल्याला हे ओपन करण्यासाठी आठ आकडी पिन लागेल , तो आहे का तुमच्याकडे . " , अमरने मूळ विषयाला हात घातला .
" आठ आकडी पिन ? ते तर नाही माझ्याकडे … हो , पण ओमीने मला एक लॅमीनेटेड शीट दिली होती . रिकव्हरी की आहे असं काहीतरी तो म्हणाला होता . त्यावर इंग्लिशमध्ये काही वर्ड्स होते . ती शीट सांभाळून ठेव , किंवा लॉकर मध्ये ठेव असंही म्हणाला होता तो . " रागिणी म्हणाली .
" येस ! ती शीट आम्हाला हवी आहे . ती रिकव्हरी की वापरूनच आपल्याला हे लेजर नॅनो एस ओपन करता येईल . " , अमर उत्साहित होऊन म्हणाला .
" ओके लेट मी चेक . बहुतेक सेफमध्ये ठेवली असेल . " , असं म्हणून ती आत गेली . अमर वाघचौरे साहेबांकडे आश्चर्याने बघू लागला . फार काही आढेवेढे न घेता ती कोल्ड वॉलेटची की द्यायला कशी काय तयार झाली याचंच त्याला आश्चर्य वाटत होतं. वाघचौरे साहेबांनी शांत राहण्याचा इशारा केला . थोड्या वेळात रागिणी आतून बाहेर आली . तिच्या हातात पांढऱ्या रंगाची , पेपरची एक लॅमीनेटेड शीट होती .
" हेच आहे का प्लिज चेक करा . " , तिने ती शीट अमरच्या हातात दिली . अमरने ती पाहिली . त्यावर चोवीस इंग्रजी शब्द ओळीने लिहिलेले होते. ते चोवीस शब्दच बिटकॉईनच्या खजिन्याची चावी होती . अमर उल्हसित झाला .
" बहुतेक हीच रिकव्हरी की आहे . आपण चेक करूया . " , असं म्हणत त्याने सोबत आणलेल्या लॅपटॉपला वायरच्या साहाय्याने कनेक्ट केलं . लगेच त्यातून वेलकम असा मेसेज आला . आणि पाठोपाठ आठ आकडी पिन टाकण्याचा मेसेज आला . अमरने पिन रिसेट करण्याची कमांड दिली . लगेच त्या डिव्हाईसने रिकव्हरी की बाबत विचारणा केली. अमरने ओळीने ते चोवीस शब्द त्यात टाकले . इंटर करण्यासाठी डिव्हाईसवरची दोन्ही बटणे एकदम दाबली. रिकव्हरी की ऍक्सेप्ट झाली . येस ! अमरचा उत्साह द्विगुणित झाला . पिन रिसेट करण्याबाबत सूचना आली . त्याने 1 ते 8 आकडे ओळीने टाईप केले . पिन बदलला गेला . अमरने ते डिव्हाईस डिस्कनेक्ट केलं आणि पुन्हा जॉईन केलं. त्यातून पुन्हा वेलकमचा मेसेज आला . पिन टाकण्याबाबत मेसेज आला . अमरने 1 ते 8 आकडे ओळीने टाईप केले . पिन ऍक्सेप्ट झाल्याचा मेसेज आला आणि समोर बारीकसं बिटकॉईनचा लोगो दिसू लागला .
" झालं का ओपन ? " , वाघचौरे साहेबांनी घाईघाईत विचारलं .
" येस सर ! " , हे सांगताना त्याच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दोन्हींचं मिश्रण झालं होतं . अमरने त्या डिव्हाईसची दोन्ही बटणे दाबली . थोडा वेळ स्क्रिनवर काहीच उमटलं नाही . दुसऱ्याच सेकंदाला जे दिसलं ते बघून हार्ट फेल होईल की काय असं अमरला वाटलं .
बिटकॉईनच्या त्या कॉल्ड वॉलेटमध्ये 2700 बिटकॉईन्स होते . ज्याची आजची मार्केट व्हॅल्यू होती जवळपास नऊशे करोड रुपये !

₿₿₿

करोडो रुपयांचा लुप्त झालेला खजिना शोधण्यात मुंबई पोलिसांना यश !
या घडीची सर्वात मोठी आणि सुखद बातमी ! ओमी मिरचंदानी मृत्यू प्रकरणाने आता एक विलक्षण वळण घेतलं आहे. या प्रकरणात ओमी मिरचंदानी यांच्या अकस्मात मृत्यूमुळे करोडो रुपयांचे लुप्त झालेले बिटकॉईन्स परत मिळवण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. आपलं मुंबई पोलीस जगात उगाचच अव्वल स्थानी नाही ! आणि त्याचाच प्रत्यय सध्या चर्चेत असलेल्या ओमी मिरचंदानी यांच्या क्रिप्टो कॉइनएक्स या बिटकॉईन एक्स्चेंजच्या प्रकरणात आलाय. ओमी मिरचंदानी अचानक मृत्यू पावल्यामुळे ते बिटकॉईन एक्स्चेंज बंद झाले आणि त्यांची पत्नी मिसेस रागिणी संशयाच्या भोवऱ्यात अडकल्या, परंतु मुंबई पोलिसांच्या अथक प्रयत्नामुळे आणि बुद्धीचातुर्यामुळे तसेच मिसेस रागिणी यांनी चौकशीस केलेल्या सहकार्यामुळे ही केस सोडवण्यात पोलिसांना यश येताना दिसत आहे. मिसेस रागिणी यांनी या केसमध्ये मदत करून त्यांच्या एक्स्चेंजमध्ये गुंतवणूक केलेल्या सर्व गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. बिटकॉईन एक्सचेंज पुन्हा सुरू होऊन ज्या गुंतवणूकदारांचे पैसे अडकले होते त्यांचे पैसे परत मिळण्याचे संकेत मिळत आहेत .
बातम्या सांगणारी टीव्ही अँकर मोठमोठ्याने ओरडून बातम्या सांगत होती. जवळपास सर्वच न्यूज चॅनलला हि बातमी होती. मेघनाद त्याच्या ऑफिसमध्ये बसून समोरच्या बातम्या बघत होता. नाकावर घसरणारा चष्मा त्याने पुन्हा व्यवस्थित बसवला. समोरच्या बातमीने त्याचं समाधान झालेलं दिसलं . त्याने दुसरा न्यूज चॅनेल लावला . त्यावर एक रिपोर्टर याच विषयावर लोकांशी चर्चा करत होता.
" तुम्ही न्यूजला पाहिलं असेलच की क्रिप्टो कॉइन एक्स हे एक्स्चेंज पुन्हा सुरू होणार असल्याची बातमी आहे … तुम्ही यात पैसे गुंतवले होते . कसं वाटतंय आता ? " रिपोर्टरने घोळक्यातल्या एकाला विचारलं .
" माझा तर विश्वास बसत नाही, आपल्याकडे अशा घटना फार क्वचित घडतात . मला तर वाटलं होतं की गेले आता पैसे ! पण आता थोडी आशा वाटतेय . "
" तुमचं काय म्हणणं आहे ? " , रिपोर्टरने त्याच्या बाजूच्या एकाला विचारलं .
" मला काहीच वाटत नाही . मी नव्हतेच टाकले पैसे यांच्यात . माझ्या मित्राने टाकले होते . " तो बेफिकिरीने म्हणाला . रिपोर्टरने त्याच्या मित्रासमोर माईक धरला .
" खूप आनंद होतोय . आपली कष्टाची कमाई आहे . परत मिळाल्यावर जास्त आनंद होईल . "
" रागिणी मिरचंदानी यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ? " , रिपोर्टने एका विचारलं .
" मला वाटतं , आधी आम्हाला वाटलं तशा रागिणीजी नाहीत . त्यांना जर खरंच फ्रॉड करायचा असता ,तर त्या परत कशाला आल्या असत्या, किंवा कुठेतरी पळून गेल्या असत्या, पण त्यांनी तसं केलं नाही. त्यांनी पोलिसांना मदत केली. येणाऱ्या चौकशीला त्या ठामपणे सामोऱ्या गेल्या. आणि लुप्त झालेले बिटकॉईन सुद्धा त्यांच्याच मदतीने परत मिळाले . याचा अर्थ त्यांना तसा काही फ्रॉड करायचा नव्हता, ओमी मिरचंदानी यांचा अकस्मात मृत्यु झाला त्यामुळे ते सगळं घडलं. आम्हाला वाटतं, रागिणी मॅडम निर्दोष आहेत. त्यांच्यावरचे सगळे आरोप खारीज केले पाहिजेत … " गर्दीतला एकजण मोठ्याने असं म्हणाला आणि बाकीचे लगेच त्याला साथ द्यायला लागले .
" बरोबर आहे , त्या बाईने सगळं सहन केलं , आणि लोकांचे पैसे परत मिळतील अशी व्यवस्था केली ,आपल्याकडे आधी असं कधी झालंय का ? फ्रॉड करणारे फ्रॉड करून परदेशात पळून जातात … इथे त्या बाईचा नवरा गेला असतानाही तिने लोकांचा विचार केला . तिची निर्दोष मुक्तता व्हायलाच हवी . " दुसरा एकजण म्हणाला .
" रागिणी मॅडम , जिंदाबाद ! ओमी मिरचंदानी , अमर रहे " असे नारे ऐकायला यायला लागले . तेव्हा रिपोर्टरने आपले प्रश्न आवरते घेतले .
मेघनादला हे सगळं बघून मोठी गंमत वाटली. त्याने लगेच फोन लावला.
“ हॅलो , नमस्कार एडिटर साहेब ! धन्यवाद ! आत्ताच बातमी पाहिली. खूप छान बातमी दिलीत. बरं एक काम होतं तुमच्याकडे …. असं फोनवर नाही सांगता येणार …. प्रत्यक्ष भेटून सांगतो… तुम्हाला कधी वेळ आहे ? … ओके … ओके …. चालेल भेटू मग… ” , म्हणत त्याने फोन ठेवला. स्वतःशीच खुश होऊन त्याने आणखी एक नंबर डायल केला .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Wah mast chaluye, don diwas zale sarv bhag vachun kadle.
Cold wallet cha pin reset kela mhanje kahi tari gadbad ahe.. Yeu dya next part.