क्रिप्टो ( crypto ) भाग - २५

Submitted by मिलिंद महांगडे on 23 June, 2022 - 10:41

₿₿₿

वाघचौरे साहेब बराच वेळ लॅपटॉपच्या त्या स्क्रीनसमोर बसले होते. चार ओळीमध्ये अंक आणि अक्षर याचा वापर करून एक कोड लँग्वेज तयार केलेली होती. हा काय प्रकार आहे हे लक्षात येत नव्हतं , पण एक मात्र खरं की हे समोर जे काही आहे ते खूप महत्त्वाचं आहे याची जाणीव वाघचौरे साहेबांना झाली. त्यांनी ते अल्फा नूमेरिक कोडं जसं च्या तसं मोठ्या कागदावर लिहून काढलं . बाजूला असलेल्या मोठ्या बोर्डावर ते पिनांनी खोचून लावलं . आता त्या चार ओळी त्यांच्या समोर होत्या . त्यांनी आपल्या ड्रॉवरमधून सिगारेटचं पाकीट काढलं आणि त्यातली एक सिगारेट शिलगावली . एक मोठ्ठा कश घेऊन धूर वर हवेत सोडला … हे करत असताना त्यांचं लक्ष समोरच्या बोर्डावर लावलेल्या कागदावर खिळून राहिलं होतं . त्या चार ओळींचा काय अर्थ असावा ? याचाच विचार करण्यात त्यांचा मेंदू गुंतला होता . सौदामिनी मॅडम आणि त्यांचा असिस्टंट चिकटे निमूटपणे हा प्रकार पाहात होते . बराच वेळ झाला तरी साहेब काही बोलत नाहीत हे बघून सौदामिनी मॅडमने थोडासा घसा खाकरल्यासारखं केलं , पण तरीही वाघचौरे साहेबांची तंद्री तुटली नाही. ते तसेच त्या बोर्डाकडे बघत राहिले.
" सर , काय अर्थ असेल याचा ? " , शेवटी न राहवून सौदामिनी मॅडमनी विचारलंच .
" त्याचाच विचार करतोय मॅडम … तुम्हाला काही सुचतंय का बघा ! " , बोर्डावरची नजर न हटवता वाघचौरे साहेब म्हणाले.
" मला तर बाई काहीच अर्थ लागेना . नुसती अक्षरे आणि मध्ये मध्ये अंक लिहिलेले आहेत . " , नकारार्थी मान हलवत सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
" दोन प्रकार असू शकतात , एकतर हे जे काही आहे , त्याला काही अर्थ नाही , ही एखाद्या अकाऊंटची अल्फा न्युमरिक की असू शकते … आणि दुसरा प्रकार असा की यात काही पॅटर्न असू शकतो, म्हणजे या चार ओळींचा एकत्रित असा काहीतरी अर्थ असू शकतो . "
" मला तरी यात काही पॅटर्न दिसत नाहीत सर … " , सौदामिनी मॅडम हैराण चेहरा करीत म्हणाल्या. इतक्यात त्यांचा असिस्टंट चिकटे सौदामिनी मॅडमच्या कानाशी येऊन काहीतरी सांगू लागला.
" ही कुठल्या अकाऊंट ची की नसावी ! कारण त्यात मध्ये मध्ये स्पेस आहेत … की असती तर आकडे आणि अंक सलग लिहिले असते , असं आमचे चिकटे म्हणतायत … " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या.
" येस ! बरोबर … गुड जॉब चिकटे ! म्हणजे या चार ओळींचा काहीतरी अर्थ असणार . एकेक ओळ , एकेक अक्षर घेऊन पाहिलं पाहिजे , आता आपण पाहिली ओळ घेऊन बघू …
R1M1L1 L1GL9 TH1N
काय पॅटर्न दिसतोय का ? नीट निरखून बघा … " , वाघचौरे साहेब म्हणाले.
" आर वन एम वन एल वन …. परत एल वन जी एल नाईन .,.. टी एच वन एन … काहीच समजत नाही सर …. एक मिनिट एक मिनिट … तुम्ही काय म्हणालात सर , पॅटर्न ना? एक दिसतोय पॅटर्न … ! " , सौदामिनी मॅडम उत्साहात येऊन म्हणाली .
" काय कसला , पॅटर्न ? " , साहेबांनी घाईने विचारलं .
" पहिला शब्द - सहा अंक आणि अक्षरं आहेत , दुसरा शब्द पाच आणि तिसरा शब्द चार अंक , अक्षरं आहेत … नीट बघा … "
" Hmmm बरोबर ! येस … वा ! मॅडम …. असेच पॅटर्न शोधावे लागतील … " वाघचौरे साहेब खुशीत येऊन म्हणाले. , " पण पुढे तसाच काही पॅटर्न आहे का बघा ,
दुसऱ्या ओळीत पहिल्या शब्दात नऊ अंक अक्षरं आहेत , दुसऱ्या शब्दात पाच आणि तिसऱ्या शब्दात तीन !
असे आकडे लिहायचे म्हटले तर ६५४ ९५३ ७७४ ७६६ असे अंक येतायत … यातून काय लक्षात येतंय का ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" नाही … तसे एकूण १२ शब्द येतात , दहा असते तर एखादा मोबाईल नंबर वगैरे असला असता … छे बाई ! अवघड आहे हे सगळं . " , सौदामिनी मॅडम निराश झाल्या.
" मलाही काही सुचत नाही . अमर असता तर त्याने काहीतरी शोध लागला असता . " , वाघचौरे साहेब म्हणाले. इतक्यात सौदामिनी मॅडमचे असिस्टंट चिकटे पुन्हा त्याच्या कानाशी येऊन बारीक आवाजात काहीतरी सांगू लागले.
" अरे हो ! हे तर माझ्या लक्षातच आलं नाही … " , बॉर्डाकडे बघत त्या आश्चर्याने म्हणाल्या .
" काय लक्षात आलं नाही मॅडम ? "
" अहो सर , त्या दुसऱ्या ओळीत बघा ना , LKSHMN1N5 असं लिहिलंय … ते ' लक्ष्मण ' असं काहीतरी वाटतंय … " , सौदामिनी मॅडमने हिंट दिली . वाघचौरे साहेब निरखून ते पाहू लागले.
" अरे होय ! हो बरोबर आहे , लक्ष्मणच आहे ते … मला कसं दिसलं नाही आधी ? आता लक्ष्मण आहे , म्हणजे राम असणारच ! हे काय पहिल्याच ओळीतला पहिला शब्द …R1M1L1 हा एक आकडा म्हणजे काना असावा , रामाला असा शब्द आहे बहुतेक ! " , वाघचौरे साहेब तर्क करत म्हणाले .
" वॉव … बरोबर आहे सर … हेच जर लॉजिक लावलं तर पाहिली ओळ येते , रामाला लागली तहान … कारण अंक हे काना , मात्रा सारखे काम करतायत , आणि हे अंक म्हणजे इंग्रजी वर्णमालेतल्या अक्षरांचा क्रमांक ! " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या आणि वाघचौरे साहेब आश्चर्याने त्यांच्याकडे पाहू लागले .
" येस ! परफेक्ट !!! " ते ओरडले .
" आता बाकीच्या ओळी तर सोप्प्या आहेत …
रामाला लागली तहान
लक्ष्मणाने मारला बाण
तिथून निघाली गंगा
तिथेच सापडेल खजिना " , बसल्या बसल्या सौदामिनी मॅडमनी कोडं सोडवलं . वाघचौरे साहेब तर अविश्र्वासाने त्यांच्याकडे बघू लागले.
" वेल डन मॅडम … ब्रिलियंट ! " , वाघचौरे साहेब खुश झाले होते.
" हे तर झालं या कोड्याचं उत्तर …पण पुढे काय ? " , सौदामिनी मॅडमने विचारलं .
" पुढचं मला माहित आहे …. लगेच अमरला फोन लावा , त्याला म्हणावं असशील तसा निघू ये …. ! " , वाघचौरे साहेबांनी आदेश सोडला . त्यांच्या चेहऱ्यावर निराळीच चमक दिसत होती . सौदामिनी मॅडम फोन लावणार , इतक्यात अमर स्वतःच त्यांच्या केबिन मध्ये आला.
" शंभर वर्षं आयुष्य आहे तुला ! हे बघ , आम्ही एक कोडं सोडवलं आहे , हे जे बोर्डावर लिहिलंय , ते ओमी मिरचंदानीच्या लॅपटॉप मध्ये सापडलं . ते सौदामिनी मॅडम आणि आम्ही मिळून सोडवलं … " , वाघचौरे साहेब अत्यानंदाने सांगू लागले . अमरने सौदामिनी मॅडमकडे पाहिलं त्याही आनंदात दिसत होत्या . अमरने समोरच्या बोर्डावर लिहिलेल्या चार ओळी वाचल्या , आणि त्या चार ओळींचा जो काही अर्थ काढला होता , तोही वाचला . बराच वेळ तो त्यावर विचार करत राहिला .
" काय रे ? काय झालं ? यात तुला काही चुकीचं वाटतंय का ? काही शंका आहे का ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" नाही , तुम्ही जे हे डीकोड केलंय ते बरोबर आहे , पण मला एक प्रश्न पडलाय. " , अमर म्हणाला .
" आता कसला प्रश्न ? ", सौदामिनी मॅडमनी विचारलं .
" ओमी मिरचंदानीच्या लॅपटॉपमध्ये हे मिळालं ना , पण याचं उत्तर तर मराठीत आहे , ओमी मिरचंदानीला इतकं चांगलं मराठी येत असेल ? " , अमर असं म्हणाला आणि पत्त्यांचा बंगला कोसळावा तसा त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा उत्साह मावळला . अमरने काढलेला मुद्दा बरोबर होता . मिरचंदानी आडनावाच्या माणसाला इतकं चांगलं मराठी कसं काय येत असेल ?
" मिरचंदानी महाराष्ट्रातच जन्मला आणि वाढला असेल , त्यामुळे त्याला मराठी येत असेल चांगलं … " , सौदामिनी मॅडम म्हणाल्या .
" बरोबर आहे पण पण का कुणास ठाऊक हे मला पटत नाही." , अमर म्हणाला .
" अमर , मला वाटतं आपल्याला जो लीड मिळालाय , त्याला धरून पुढे जाऊया , असंही तुला दुसरं काही सुचतंय का ? " , वाघचौरे साहेबांनी विचारलं .त्यावर अमर काही बोलू शकला नाही , काय बोलणार ? या केसमध्ये आधीच खूप कॉम्प्लिकेशन्स झाले होते , पुढचे सगळे मार्ग बंद असल्यासारखे दिसत असताना ओमीच्या लॅपटॉपमधून मिळालेल्या एका गुप्त संकेतानुसार काही धागेदोरे हाती आले होते , भलेही ते तर्कसंगत नव्हते , पण काळोखात एक बारीकसा प्रकाशाचा किरण दिसत होता. अमरने वाघचौरे साहेबांच्या प्रश्नावर नकारार्थी मान डोलावली .
" ठीक आहे , पण यातून काय अर्थबोध होतो ? " , सौदामिनी मॅडमने विचारलं .
" यातून एका ठिकाणाचा बोध होतो , जिथे कदाचित आपल्याला काहीतरी सापडेल ." , वाघचौरे साहेब म्हणाले .
" कोणतं ठिकाण ? " , अमरने विचारलं .
" सीतेच्या शोधत प्रभू राम आणि लक्ष्मण जात असताना प्रभू रामांना वाटेत तहान लागली , तेव्हा लक्ष्मणाने बाण मारून जमिनीतून पाणी काढले होते अशी आख्यायिका आहे , हे ठिकाण मुंबईतच आहे … "
" येस , बाणगंगा ! " , अमर एकदम म्हणाला . त्यावर वाघचौरे साहेबांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच ! बाणगंगा.
आत्ताच २४ आणि २५ दोन्ही भाग वाचून काढले.
असाच वेग ठेवा.
पुढच्या भागांची आतुरतेनं वाट पाहतोय.

मस्त चाललीये कथा एकदम वेगाने. ओमी मीरचंदानी जीवंत आहे, तो म्हातारा नोकर बहुदा त्यालाच फोन वरून रिपोर्टिंग करत होता असं मला वाटतंय. पुढील भागाच्या प्रतिक्षेत