झुंड पाहताना

Submitted by -शर्वरी- on 17 June, 2022 - 14:41

1. मिरवणुक : आंबेडकर जयंती ची मिरवणुक.नागराज चा फोकस हलत नाही. मुद्दा सुटत नाही. पोरे वर्गणी काढतात. DJ लाऊन नाचतात. त्यापेक्षा वेगळं, सकारात्मक, अर्थपुर्ण काय करायचं हे त्यांना ठाऊक नाही. त्यांच्यासाठी महापुरुषांची जयंती हा एक सण आहे. हिटलर दादा सारख्यांना हेच पाहीजे आहे. पैसा आहे. या पोरांनी एवढच करावे, यात त्याच्यासारख्यांचे हित आहे. पोरं ambulance ला वाट करुन देतात. नाचण्याच्या धुंदीतही सामाजिक भान विसरत नाहीत.सरां च्या चेहऱ्यावरचं समाधान अव्यक्ताला भाव देते.सर पुढे होतात. बाबासाहेबांच्या तसबिरीपुढे हात जोडतात.
पुढे DJ वर नाचण्याकरिता वर्गणी न देणारा दुकानदार, न मागता पैसे घेऊन सरांकडे येतो. पोरांनी पुढे गेले पाहिजे. या भेदाभेदाच्या भिंती तुटल्या पाहिजेत. या भिंतीना बळकट करणारे हात दोन्ही बाजुंना आहेत. हिटलर दादाचे हात त्या बळकट करतात. दुकानदाराची (standing up for the right thing) हिम्मत ह्या भिंतींना भगदाड पाडण्याची ताकद देते. Bravo!
2. मोनिकाची गोष्ट. बाप-लेकीचा ओळख मिळवण्याचा झगडा बघुन जीव वरखाली होतोय. या देशात माणसाला किंमत नाही. कोणत्याच माणसाला नाही. गरीबाला तर माणूस म्हणुन ओळखही नाही. जाईल का मोनिका परदेशी फुटबॉल खेळायला? जाता यायला पाहिजे तिला. या काळ्या सावळ्या पोरीच्या डोळ्यांत आनंद दिसला पाहिजे. किती जणी/ण असतील. शिक्षकांच्या रुपाने एक माणूस भेटतो तिला. ओळख नसुनही परिस्थिती जाणणारा. बोराडे सरांसारखा. माणसाला महत्त्व देणारा माणूस. समाज फक्त कागदपत्रांवर छापलेल्या शाईवर जगत नाही. या अशा माणसांमुळे टिकतो. पुढे जातो. मोनिका ला ओळख मिळते. तिच्या काळ्याभोर डोळ्यात आनंद दिसतो. पहिल्यांदा. आमची माणूस म्हणवून घेण्याची सोय होते.
3. अंकुश ची गोष्ट. हा तर hero. हा बोलतो. रागावतो. भांडतो. जगण्याच्या संघर्षात मारतो आणि बुटाला नाक घासुन माफी पण मागतो. याच्या रस्त्यावर नुसता जीवघेणा चढंच का आहे? कटर घेऊन airport ला जातो. ४ वेळा मेटल डिटेक्टर याला परत पाठवतो. अंगावरचे कपडे उरतात फक्त. का वाजतोय हा डिटेक्टर? अंकुशला माहित आहे. पण कटर त्याची lifeline आहे. कटर शिवाय कसं जगायचं? कुत्र्या मांजरासारखं मारतात माणसांना. जगायचं असेल तर लढायला पाहिजे. पण आता नको आहे कटर तुला या दारापलिकडे. आता जगण्या-मरण्याच्या झगड्यातुन बाहेर पडणार आहेस तु. हमसून हमसून रड. सगळेच क्षण हसुन साजरे होत नसतात. काही रडुनही साजरे होतात. बोराडे सर म्हणतात, आलास ना आता. आता नको रडु. खरचं.पण आम्हीही रडतो. आम्ही रडतो कारण कोणीतरी आता खरं माणूस म्हणुन जगणार असतं. हा नवजन्माचा आनंद आहे. हे सगळं नागराज बोलतो. सिनेमाच्या भाषेत बोलतो.
4. सगळी पोरं सरांच्या घरी बसली आहेत. पहिली वहिली मॅच जिंकली आहे. यशाचा आनंद आहे. New found confidence आहे. सरांविषयी ममत्व, gratitude आहे. बोलायला,व्यक्त व्हायला जागा आहे आणि ऐकणारे,सहवेदना जाणणारे कान आहेत. पण शब्द नाहीत. पोरांना शब्द सापडत नाहीत. या भावना, वेदना कधी स्वतःपाशीही मांडल्या नाहीत. पोर अडखळतात. तुटक बोलतात. भावना अनावर होऊन रडतात. तरीही पोरं सारे जहॅा से अच्छा वाजवतात. आपण बघतो. खजिल होतो. या रापलेल्या चेहऱ्यामागे फक्त गुन्हेगारच का दिसले आपल्याला? माणूस कधीच नाही दिसला.

झुंड हा माणसाला माणूस दाखवण्याचा प्रयत्न आहे. ज्याला दिसला तो जिवंत आहे. ज्याला फक्त घाण, कचरा, आणि झोपडपट्टी दिसली त्यांनी स्वतःला माणूस म्हणवून घेऊ नये.

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वावे, धन्यवाद. तो कटरचा प्रसंग चित्रपटाला एका वेगळ्या उंचीवर घेऊन जातो.
मी ईथे फारसे लिहीत नाही. पण नियमित वाचते. तुम्ही सुंदर लिहीता. तुमचे दोन चंद्र ललित फार आवडले होते.

सोनाली ०४ आपल्या प्रतिक्रियेबद्दल मनापासून आभारी आहे.

छान लिहिलेय
सगळे पटले
अश्या अजूनही कैक गोष्टी चित्रपट बघताना जाणवल्या. सहज आल्या..
तो एकजण कोळसा की काय चोरताना ट्रेनवरून पडून मरतो त्यानंतरचा सीनही हेलावून टाकणारा घेतला आहे. जवळची व्यक्ती गेल्याचे दु:ख आणि असे आयुष्य जगताना मरण्याची रिस्क तर राहणारच हे त्या पोरांनी स्विकारलेले असणे दोन्ही ऊतरले आहे.. त्या जगापलीकडची व्यक्ती म्हणून बघताना आपल्याला जे जाणवते ते अमिताभच्या अभिनयातून नेमके दाखवले आहे त्या दृश्यात

मलाही आवडलेला झुंड
स्पेशली सेकंड हाफ चित्रपटाला वेगळ्या ऊंचीवर घेऊन जातो
मला अजून काही दिवसांनी पुन्हा बघायचा आहे.. काहीतरी नव्याने गवसेल असे वाटते.

खरं आहे ऋन्मेऽऽष. अजुन अनेक गोष्टी सापडत, जाणवत राहतील. तो मुलगा ट्रेन वरुन पडतो तेंव्हा वाटतं की जखमी होईल, कदाचित अपंग होईल. पण तो मरतो. हे इतके अचानक घडते की खरच वाटत नाही. अमिताभ ने ही भूमिका सुरेख केली आहे. त्याला शब्दबंबाळ संवाद नाहीत. त्याचा चेहरा बोलतो. आणि तरीसुद्धा, अमिताभ असुनही हा पिक्चर मात्र नागराज मंजुळेचाच आहे.

शिल्पा, नक्की पहा.