क्रिप्टो ( crypto ) भाग - १०

Submitted by मिलिंद महांगडे on 27 May, 2022 - 01:24

₿₿₿

आठवडाभर जयसिंगला काही करता येणार नव्हते. तो आपल्या बेडरूम मध्ये नुसता बसून राही किंवा खिडकीतून बाहेर बघत बसे. असं नुसतं बसून त्याला आणखीनच अस्वस्थ वाटू लागलं. खरं तर अशी घरात बसून राहण्याची त्याची पहिलीच वेळ ! पण आता तब्येतीच्या कारणापुढे आणि मुख्य म्हणजे त्याच्या बायकोपुढे त्याचं काही चालत नव्हतं . यमुनेची एक प्रकारची नजरकैदच होती . बसल्या बसल्या त्याला मागच्या काही घटना आठवू लागल्या . त्यात टोनी नावाच्या इसमाची आठवण येणं तर अपरिहार्य होतं . त्याला तो दिवस आठवला ज्या दिवशी तो टोनीला पहिल्यांदा भेटला होता .
सुहासिनीताईच्या मदतीने त्याची पैशांची व्यवस्था झाली होती . खासदार साहेबांनी एका माणसाचं नाव आणि पत्ता दिला. जयसिंग फक्त त्याच्याकडे गेला आणि त्याचं काम झालं. इतकी मोठी रक्कम इतक्या लवकर आणि इतक्या सहजतेने मिळेल ह्याची त्याला कल्पना नव्हती. तो त्याच्यासाठी एक सुखद धक्का होता… त्याच आनंदात तो आणि झिपऱ्या बारमध्ये बसलेले होते.
“ झिपऱ्या , आज मी लय भारी मूड मधी हाय … तुला काय पायजे ते ऑर्डर कर … आज तुला पार्टी ! ”
“ कसली पार्टी मालक ? ”
“ आज मी लय खुश हाय … काय कारन आसंल वळख ?"
" मालक मला हो काय म्हाईत ? "
" आरं लेका , आपल्या रेस्टोरंटसाठी भांडवल मिळालं. ” , असं म्हणत त्याने टाळीसाठी हात पुढे केला. झिपऱ्यानेही त्याला आनंदात टाळी दिली.
“ काय सांगताय मालक … लय भारी बघा . पन इतक्या लवकर ? ” झिपऱ्याने आश्चर्याने विचारलं .
" लेका खासदार बोडकेपाटलांना कोण नाय म्हनल ? खरंच राव , पावर पायजे माणसाजवळ , तर जगन्याला मजा हाय बग ! " जयसिंग असं म्हणत असतानाच वेटर त्यांच्या टेबलवर आला आणि त्याने व्हिस्कीचे दोन ग्लास त्या दोघांसमोर ठेवले.
“ आरं ? आम्हाला आधी विचार तरी , काय ऑर्डर हाय ते ? असंच आणून द्यायलास ? ” , जयसिंग वेटरवर चिडला.
“ साहेब ही तुमची ऑर्डर नाही . हे त्या साहेबांनी दिलंय , सगळ्या लोकांना … ”, वेटरने कोपऱ्यातल्या टेबलकडे बोट दाखवलं. तिथे एक तुळतुळीत टक्कल पडलेला जाडा माणूस बसला होता. बोकडदाढी , आणि कानात बाळी घातली होती. तो एकटाच बसला होता. त्याच्या समोर चखण्याच्या पाच सहा डिशेश होत्या. त्यात चिकन लॉलीपॉप , तंदुरी चिकन , कबाब , बोंबील फ्राय , प्रॉन्ज असे भरपूर चकण्याचे पदार्थ होते. समोर व्हिस्कीचा लार्ज पेग होता आणि तो त्याचा आस्वाद घेत मजेत समोरच्या डिशेश संपवत होता. त्या घडीला तो जगातील सर्वात आनंदी माणूस वाटत होता. आजुबाजुंच्या टेबलवरच्या माणसांनी त्याला लांबूनच चिअर्स केले, त्यानेही त्यांना तसाच प्रतिसाद दिला.
“ आयला , ह्यो टकल्या कोने ? सगळ्यांना का दारू पाजायलाय ? ते बी फुकाट ! ”, जयसिंग त्या माणसाकडे बघत म्हणाला .
“ लय मोठ्ठा मानुस दिसतुया … ”, झिपऱ्या म्हणाला
"आरे, तो मोठा आसंल त्याच्या घरी , आपण काय कमी नाय ", जयसिंग तोऱ्यात म्हणत त्याच्या जागेवरून उठला आणि त्या माणसाच्या टेबलाच्या दिशेने गेला.
" ओ भाऊ, हॅलो , येक्सक्युज मी " जयसिंग असे म्हणाला तरी त्या माणसाचं जयसिंगकडे बिलकूल लक्ष गेलं नाही. तो त्याच्याच नादात खात पीत होता. जयसिंगने त्याच्या टेबलवर हात आपटला, त्यासरशी चमकून त्या माणसाने जयसिंगकडे पाहिलं आणि डोळ्यांनी काय आहे ? असं खुणावलं.
" जरा बसू का इथं ? ", जयसिंगने विचारलं. त्यावर त्याने जयसिंगला वरून खाली एकदा न्याहाळलं आणि स्वतःशीच छद्मीपणे हसला . मग खुणेनेच ' चालेल बसा ' सांगितलं. जयसिंग पाठोपाठ झिपऱ्याही त्याच्या टेबलपाशी येऊन पोहोचला . दोघेही त्याच्या समोर टेबलवर बसले. तो माणूस स्वतःच्याच नादात होता. त्याच्या चेहऱ्यावर एक समाधानी हास्य होते.
" बोलिये जी, क्या बात है ? " , त्या जाड्या माणसाने जयसिंगला विचारले.
" वो मेरेकु एक विचारने का था… " , जयसिंग तोडक्या-मोडक्या हिंदीत म्हणाला.
" तुम्ही मराठी हाय काय ? अहो मग मराठी बोला ना. मला कळतं मराठी. मी बी मराठीच हाय … "
“ अरे वा ! हे बरं झालं … नाव काय भाऊ आपलं ? ”
“ टोनी … टोनी नाव हाय आपलं . ”
“ मला सांगा तुम्ही दारू का वाटताय सगळ्यांस्नी ? ”
“ माझी मर्जी ! ” , तो व्हिस्कीचा पेग तोंडाला लावत म्हणाला.
" मला कळालं नाय … "
" आरे बाबा तुमी दारू प्या की … कशाला एवढा विचार करता ? असं समजा मला लय आनंद झालाय . " टोनी बेफिकिरीने म्हणाला .
" तेच माझं विचारायचं कारण की , एव्हढा कसला आनंद झालाय टोनी भाऊ ? " जयसिंगने परत त्याला विचारलं .
" ते आपलं शिक्रेट हाय … असं नाय सांगता येनार … "
" बास काय टोनी भाऊ … मला सांगा , तुम्ही एवढ्या सगळ्यांस्नि दारू पाजली पर कुनी तुम्हाला विचारलं का की बाबा कसला आनंद झालाय तुमाला एव्हढा ? आमाला तुमच्या आनंदात सामील व्हायचंय म्हनुन विचारतोय ओ …. आम्हाला तुमचे दोस्तच समजा . आम्ही तुमच्या आनंदात एवढं सहभागी झालो आणि तुम्ही आम्हाला सांगणार नाय ! " , जयसिंग त्याच्याशी जवळीक साधत म्हणाला. त्या माणसाला काय झालं कुणास ठाऊक , त्याचं खाणं एकदम थांबल. हातातला काटा चमचा तसाच हातात राहिला. तो खाली मान घालून बसून राहिला आणि एकदम भावुक झाला. आणि त्याच्या डोळ्यांतून अश्रू येऊ लागले. हे कदाचित त्याच्या समोरच्या ग्लासातल्या व्हिस्कीमुळे असावं.
" अरे , भाऊ काय झालं ? आमची काय चुकी झाली का ? " जयसिंगला कळेना . त्यावर तर टोनी आणखीन जोरजोरात रडायला लागला . बारमधले बाकीच्या टेबलवरची माणसे त्यांच्याकडे बघू लागली . जयसिंगाला थोडं ओशाळल्यासारखं झालं. कुठून ह्या येड्याच्या जवळ येऊन बसलो असं त्याला झालं.
“ टोनी भाऊ , आमाला माफ करा . आमी जातो . ”, म्हणत तो उठला तर टॉनीने त्याचा हात पकडला.
“ बसा … ” टोनी डोळे पुसत म्हणाला. “ त्याचं काय हाय ना , कि मला कोणी फ्रेंड नाय हायेत. मी हा असा जाडा , काळा , दिसायला एकदम डेंजर ! म्हणून कोणी माझ्याशी दोस्ती करत नाय. तुम्ही आले आणि मला दोस्त बोलले, म्हणून मला थोडा फील झाला. आतून फील झाला . ” तो डोळे पुसत म्हणाला .
" म्हंजी तुम्ही रागावले नाय ना आमच्यावर ? " झिपऱ्याने अडखळत विचारलं .
" नाय ओ … मी कोण रागावणार तुमच्यावर ? साधा माणूस मी ! पण आज मला कळतंय की माणसाच्या आयुष्यात पैसा किती महत्वाचा असतो ते ! मनी है तो हनी है । पैसा असला तरच माणसं तुमच्या जवळ येतात. " तो सुरमईचा एक तुकडा तोंडात टाकत म्हणाला. त्याच्या ह्या बोलण्यावर दोघेही थोडेसे वरमले.
" पन टोनी भाऊ , आम्ही तसले नाय बरं का . आमाला आपली जरा उत्सुकता वाटली म्हणून आलो बघा .", जयसिंग त्याची बाजू सावरत म्हणाला .
" माझा बाप म्हणायचा , पैसा आला कि माणसं गुळाला मुंगळे चिकटतात तसे लोक तुमच्या जवळ येतात . आज त्याचा अनुभव घेतोय … कालपर्यंत मला एका शब्दानेही न विचारणारे लोक आज मला स्वतःहून भेटायला येतायत … पैसा बोलता है … पप्पा , तू खरा होता … ” टोनी वर छताकडे बघत म्हणाला.
“ तसं आपन बी काय कमी नाय ... खासदार प्रतापराव बोडकेपाटील , नाव तर ऐकलंच असंल तुमी ... "
" हो म्हाईत आहे की … मोठी असामी आहे … एकदम टॅलेंटेड माणूस ! " टोनी म्हणाला.
" ते माझे मेहुणे हायेत . ” जयसिंग थंडपणे म्हणाला.
“ ओह ! तुम्ही त्यांचे मेहुणे ? ”
“ त्यांच्या बायकोचा सक्का लहान भाऊ ! ”, जयसिंग प्रत्येक शब्दावर जोर देत म्हणाला. आपल्या समोर बसलेला माणूस खासदार बोडके-पाटलांचा सख्खा मेहुणा आहे हे कळल्यावर तर टोनीचा घास घशातच अडकला . त्याला जोराचा ठसका लागला . जयसिंगने थाटात पाण्याचा ग्लास त्याच्या हातात दिला . घाईघाईने टोनी त्याच्याकडे बघत पाणी पिऊ लागला .
“ अरे बाप रे ! माफ करा बरं का , मला वाटलं की काही लोक पैसा बघून उगाच ओळख वाढवायला येतात , मला वाटलं , तुम्ही पण तसलेच आहात की काय... सोरी बरं का ... ” , टोनी दिलगिरी व्यक्त करीत म्हणाला.
" ठीक हाय , ठीक हाय … "
“ साहेब मोठ्ठा रिसोर्ट काढनार हायेत , म्हाबळेश्वरात ” , झिपऱ्या म्हणाला. त्यावर टोनीने डोळे मोठे केले. जयसिंग मनातून सुखाऊन गेला.
“ मला माफ करा साहेब ... मी आपल्याला ओळखू शकलो नाय. ए वेटर ! ”, टोनीने अचानक वेटरला हाक मारली. वेटर आला. “ साहेब काय घेणार ? ”
“ आओ नाय , आमचा टेबल तिकडं हाये... आम्ही ऑर्डर बी दिलीय . ”, जयसिंग म्हणाला.
“ नाय नाय , ते काय चालणार नाय . आज तुम्ही माझे गेस्ट … तिकडची ऑर्डर कॅन्सल . ” टोनी एकदम इरेलाच पेटला. नाईलाजाने जयसिंगला तिथे बसावं लागलं. असंही त्याला ह्या समोरच्या माणसाने एवढी सगळ्यांना फुकट दारू का पाजली ह्याचं कारण त्याला जाणून घ्यायचं होतं . पण आता लगेचच तो विषय काढून फायदा नाही हे त्याने ओळखलं . खासदार प्रतापराव बोडके-पाटलांचा सख्खा मेहुणा इतका उतावीळ कसा असेल ? त्यामुळे त्याने जरा सबुरीने घ्यायचं ठरवलं. टोनीने लगेच दोघांसाठी त्यांच्या आवडीची दारु मागवली आणि मस्त पैकी चिकन लॉलीपॉप आणि बोंबील फ्राय . दोघांचे दोन दोन पेग झाले आणि मग जयसिंगने विषय काढला.
" मग टोनी भाऊ , आता तरी सांगाल का नाय तुमच्या आनंदाचं कारण ! "
" ओह ! ते होय …सांगतो की . आता तुम्ही आपले मित्रच आहेत , तर तुमच्यापासून काय लपवायचं ? जयसिंगराव तुम्ही बिटकॉईनचं नाव ऐकलंय कधी ? " पेगचा एक सिप घेत टोनीने विचारलं .
" बिटकॉईन ? हा कसला कॉइन हाय ? "
" हा कॉम्प्युटरवाला कॉइन आहे . तो कॉम्प्युटर मधीच असतो . "
" म्हंजे ? कॉम्प्युटरमधून बाहेर काढता येत नाय ? मग कसला ह्या कॉइन ! " जयसिंग थोडासा गोंधळला.
" नाही . म्हणजे आता मला तुम्हाला नीट समजावता येणार नाय , पण सांगायचा मुद्दा हा आहे की त्या बिटकॉईन मध्ये पैसे गुंतवून मला खूप प्रॉफिट झाला . म्हणजे तुम्ही इमॅजिन पण नाय करू शकणार . "
" अस्सं ? कितीसा प्रॉफिट झाला म्हनायचा ? "
" ४०० % ते पण फक्त दोन महिन्यात ! " टोनी म्हणाला.
" काय ? काय सांगताय काय टोनी भाऊ ? ४००% आन तेबी दोन महिन्यात ! मला नाय विश्वास बसत … "
" जयसिंग राव हीच तर खासियत आहे बिटकॉईनची ! कुणाला खरं वाटत नाही . पण माझ्याकडे तर पैसा आलाय तो बिटकॉईन मुळेच ! नाय तर मला काय पिसाळलेला कुत्रा चावलाय , उगाचच दारू फुकट वाटायला ? "
" खरंच एवढा पैसा मिळतो टोनी भाऊ ? " आश्चर्याचा भर ओसरल्यावर जयसिंगने पुन्हा विचारलं.
" होय हो साहेब … "
" टोनी भाऊ , एक विचारू का ? मला पण मिळतील का डबल ? " जयसिंगने अधिर होऊन विचारलं होतं आणि त्याला अपेक्षित असंच उत्तर समोरून आलं . अशी सगळी बोलणी झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जयसिंगने प्रयोग म्हणून एक लाख रुपये बिटकॉईन मध्ये टाकले . आणि काय आश्चर्य ! महिन्याभरातच त्याला एकाचे दोन लाख मिळाले . मग मात्र त्याची खात्री पटली आणि त्याच्याकडे असलेली सगळी रक्कम त्याने बिटकॉईन मध्ये गुंतवली. पण त्याचं दुर्दैव ! महिना होतो न होतो तोच त्या एक्सचेंजचा मालक ओमी मिरचंदानी अचानकपणे मेला आणि त्याच्याकडे असलेले करोडो रुपयांचे बिटकॉईन कोल्ड वॉलेटमध्ये अडकून पडले, ज्याचा पासवर्ड फक्त ओमी मिरचंदानीकडेच होता . बेडरूममध्ये बसल्या बसल्या जयसिंगला हे सगळं आठवत होतं . कुठून दुर्बुद्धी सुचली आणि त्या बिटकॉईनमध्ये पैसे टाकले असं त्याला वाटलं . त्याला आता स्वतःचाच राग येऊ लागला . त्याच रागात त्याने टेबलावर मूठ आपटली .

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users