क्रिप्टो ( Crypto ) भाग - ४

Submitted by मिलिंद महांगडे on 22 May, 2022 - 06:04

₿₿₿

“ तुला काय अक्कल - बिक्कल हाय का रे ? ” , जयसिंग एकदम झिपऱ्यावर चिडला.
“ काय झालं मालक ? मी काय केलं आता ? ”
“ ताईला कशाला सांगितलंस मी ऍडमिट झालोया ते ? ”, जयसिंग खेकसला.
“ अहो मालक , तुमचा फोन लागत नव्हता , म्हणून मग त्यांनी माझ्या मोबाईलवर फोन केला. मला म्हणाल्या कुठं हायेस ? तर मी चुकून बोलून गेलो कि हॉस्पिटलात हाय म्हणून … मी जास्त काहीच बोललो नाय बगा . त्यांना लगीच संशेय आलाच ! मला डायरेक्ट म्हणाल्या जयसिंगला काय झालं ? , मग … मला सांगावं लागलं . ” , झिपऱ्या तोंडावरचा मास्क काढत कसनुसं तोंड करीत म्हणाला.
“ हम्म… ताई तशी हुशार हायेच ! त वरून ताकभात , लगीच वळखती ती … तू तिला आपलं बाकी काही बोलला नाही ना ? ”
“ नाय हो , मला काय पिसाळलेलं कुत्रं लावलंय व्हय ? ” , झिपऱ्या उसळून म्हणाला. त्याचं ते असं बोलणं ऐकून जयसिंगला ह्या अवस्थेत सुद्धा गंमत वाटली . झिपऱ्या , हा जयसिंगचा पर्सनल असिस्टंट कम चेला होता. ते दोघे एकमेकांना शाळेत असल्यापासून ओळखत होते. शाळेत असतानाही झिपऱ्या त्याचा पर्सनल असिस्टंट होता, जो सावलीसारखा जयसिंगच्या सोबत असे. झिपऱ्याला झिपऱ्या हे नाव कसं पडलं हे त्याला बघितल्यावरच लक्षात येऊ शकतं. त्याचे केस नेहमी पिंजारलेले असत. तेल लावणे , कंगव्याच्या वापर करणे , भांग पाडणे वगैरे गोष्टी त्याच्या लेखी ही नव्हत्या. पण तो जयसिंगशी एकनिष्ठ होता . त्याचं कोणतंही काम असो , तो नेहमी जयसिंग बरोबर असणारच ! हे सगळ्यांना माहित होतं . म्हणूनच सुहासिनी ताईसाहेबांना जेव्हा जयसिंगचा फोन लागला नाही तेव्हा त्यांनी झिपऱ्याच्या फोनवर कॉल लावला होता.
" पण मालक , आता कसं व्हायचं ? पुढं काय करायचं ? " त्याने विचारलं .
" काय करणार आता , लफडंच झालं बग मोठं . असं काय व्हईल असं वाटलं नव्हतं . " जयसिंग नकारार्थी मान हलवत म्हणाला.
" ताई साहेबांना समजलं नसंल ना ? "
" नाही , तिला काही माहीत नाही . पण आता तिला कसं सांगायचं हेच कळना … "
" सध्या काहीच बोलू नका. "
" असं कसं म्हनतोस बाबा , सांगावं तर लागनारच … "
" तसं नाय ओ , योग्य वेळ आणि मूड बघून सांगा … "
“ ताईचं तसं काही टेंशन नाय रे … मला आमच्या दाजी, प्रतापरावांची भीती वाटतीय . त्यांना कसं सांगायचं हा माझ्यापुढं मोठा प्रश्न आहे . ” जयसिंग चिंतेत दिसत होता .
“ मला काय वाटतंय सांगू का ? आपण त्यांना कायबी सांगायचं नाय … ”
“ त्यांनी विचारल्यावर मग ? ”
“ सध्या त्यांच्या समोर जायचंच नाय … म्हंजी मग विचारायचा प्रश्नच नाय … द्या टाळी ! ”
“ काय टाळी मागतोयस … त्यानं मुख्य प्रश्न सुटणारे का ? ” जयसिंग वैतागला.
“ अहो, माझं म्हणणं आहे कि तोपर्यंत आपण काहीतरी मार्ग काढू. थोडा वेळ जाऊ द्या. सगळं ठीक होईल. ”
“ तसंही आपल्या हातात आता काय आहे ? थोडं थांबायलाच लागणार . ” जयसिंग सलाईनच्या बॉटल कडे बघत म्हणाला. त्यातून थेंब थेंब सलाईन पडत होतं .

₿₿₿

ब्रेकिंग न्यूज -
क्रिप्टो कॉईन एक्स ह्या बिटकॉईन ट्रेडिंग कंपनीचे मालक ओमी मिरचंदानी ह्यांच्या अकस्मात मृत्यूमुळे त्या कंपनीच्या ग्राहकांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे , सर्वत्र गोंधळ उडालेला आहे . ह्या ऑनलाईन ट्रेडिंग कंपनीने सध्या तात्पुरती त्यांची सेवा बंद केली आहे . त्यामुळे ह्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मचा वापर करणारे लोक संतप्त झाले आहेत . बिटकॉईनची किंमत ऐतिहासिक उंचीवर पोहीचली असताना हे बिटकॉईन एक्सचेंज तात्पुरते बंद झाल्यामुळे त्याच्या ग्राहकांना बिटकॉईन खरेदी विक्री करता येणे कठीण होऊन बसले आहे , तसेच बऱ्याच ग्राहकांच्या अकाउंटमधून बिटकॉईन चोरीला गेले असल्याचे त्यांचे म्हणणे आहे . त्यामुळे बराच मोठा आर्थिक घोटाळा झाला असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे .
क्रिप्टो कॉईन एक्सच्या मुंबई येथील ऑफिस बाहेर बरेच लोक जमले असल्याचे न्यूज चॅनलला दाखवत होते . काही संतप्त नागरिकांनी त्या कार्यालयाची तोडफोड केली असल्याचे दिसत होते . पोलिसांनी हस्तक्षेप करून ते ऑफिस सील केलं असल्याचं न्यूजमध्ये सांगण्यात येत होतं . वाघचौरे साहेब समोरच्या भिंतीवर लावलेल्या टीव्हीकडे बघत होते. इतक्यात अमर त्यांच्या केबिन मध्ये आला.
" अमर , मी सांगितलेली सगळी माहिती काढलीस का ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" होय सर , क्रिप्टो कॉईन एक्स ह्या कंपनीचे जवळपास साडे चार लाख ऍक्टिव्ह युजर्स आहेत . कंपनीचं ऑफिस सध्या सील केलं आहे . ह्या कंपनीचा एकमेव मालक ओमी मिरचंदानी होता . परंतु गमतीची गोष्ट अशी की , कंपनी बाबत बरेचसे निर्णय श्रीमती रागिणी स्वतःच घ्यायच्या . महिन्यांपूर्वी त्याचं रागिणीशी लग्न झालं होतं . पण लग्ना आधीपासून त्या ओमी मिरचंदानीच्या कंपनीत काम करत होत्या . इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की , लडाखला जायच्या एक आठवडा आधी त्याने बरीचशी मालमत्ता , म्हणजे त्याचा जुहूचा फ्लॅट , तीन गाड्या , लोणावळ्याची जमीन , महाबळेश्वरचा चार एकराचा प्लॉट आणि क्रिप्टो कॉईन एक्स कंपनी आपल्या बायकोच्या नावाने केली होती . "
" काय ? हे सगळं त्याने आपल्या बायकोच्या नावावर केलं ? लग्न झाल्या झाल्या लगेच ! स्ट्रेंज ! "
" हो सर , आणि लडाखला जाऊन त्याचा अचानक मृत्यू होतो ! कुठेतरी नक्की पाणी मुरतंय . "
" ती त्याची बायको आली का परत मुंबईत ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं .
" नाही सर , तिथे लॉकडाऊन मुळे ती लेह मधेच अडकली आहे , असं कंपनीचे मॅनेजर सांगत होते . " अमर म्हणाला .
" बाई मोठी हुशार दिसतेय . आधी त्या ओम्याची सगळी प्रॉपर्टी आपल्या नावावर केली नंतर आरामात त्याचा काटा काढला . आणि आता इतके दिवस अडकली आहे असं भासवतेय . " वाघचौरे साहेब म्हणाले.
" सर , तिकडे जायचे रस्ते बंद आहेत . कोरोनामुळे कडक लॉकडाऊन आहे तिकडे . "
" ह्म्म्म . बरं तिच्याशी काही कॉन्टॅक्ट झाला का ? किंवा तिच्या संपर्कात कोणी आहे का , इथला कंपनीचा मॅनेजर वगैरे ? " वाघचौरे साहेबांनी विचारलं.
" तिचा फोन बंद आहे . कंपनीच्या मॅनेजरशी बोललो काल . त्यालाही फक्त एकदाच तिचा मेसेज आला की एक्सचेंज तात्पुरतं बंद करा म्हणून . त्या नंतर त्यालाही काही कल्पना नाही सर . पण त्याला सांगून ठेवलंय की जसा तिच्याशी कॉन्टॅक्ट होईल , आपल्याला लगेच कळवायचं . " अमर म्हणाला .
" बरं आणखी काही ? "
" बाकी सर , ते एक्स्चेंज फार जुनं नाही , मागच्या वर्षीच सुरू झालं आहे , बरेच लोक वर्क फ्रॉम होम आहेत . त्या एक्सचेंज मध्ये काम करणारे सॉफ्टवेअर इंजिनिअर आहेत त्यांची चौकशी केलीय . पण काही खास हाती लागलं नाही . बरेच लोक शॉक मध्ये आहेत . एकतर ते एक्सचेंज बंद झालंय , त्यामुळे जॉब जाईल की काय ही चिंता त्यांना आहे आणि जे काही कमावलेले होते ते त्याच एक्सचेंजद्वारे बिटकॉईनमध्ये गुंतवले होते. क्रिप्टोकरन्सी मार्केट सध्या हाय आहे , पण गुंतवलेले पैसे परत कधी मिळतील , की मिळणार नाहीत ह्या टेन्शन मध्ये आहेत ते. "
“ आणि तू ? ” वाघचौरे साहेबांनी तिरकसपणे विचारलं.
“ माझं काय साहेब ? ” , न समजून अमरने विचारलं .
“ मला माहीत आहे , तू सुद्धा त्यात पैसे टाकले होतेस … खरं कि नाही ? ” वाघचौरे साहेबांनी अमरच्या डोळ्यांत बघत विचारलं. काही क्षण अमर गोंधळला. पण साहेब इतक्या आत्मविश्वासाने विचारतायत म्हणजे त्यांना काहीतरी माहिती असेल असा विचार त्याने केला.
“ हो सर , मी सुद्धा टाकले होते थोडेसे … गेले आता ते बहुतेक … पण तुम्हाला कसं कळलं ? ”
“ माहिती ठेवणं माझं काम आहे अमरबाबू … ” वाघचौरे साहेब हे बोलत असताना अचानक दारावर टकटक झाली . दोघांनी वळून पाहिलं तर एक तरुण स्त्री उभी होती . गव्हाळ वर्ण , नाकी डोळी नीटस , तिने फिकट रंगाची साडी नेसली होती , त्याला मॅचिंग ब्लाउज , केस व्यवस्थित मागे बांधलेले, डोळ्यांवर बारीक सोनेरी काड्यांचा चष्मा . गळ्यात निळ्या पट्ट्यात एक आयकार्ड अडकलेलं . तिच्या मागे एक टक्कल पडलेला माणूस उभा होता.
“ आत येऊ का सर ? ” , तिने अदबीत विचारलं.
“ प्लिज , पत्रकार , न्यूज चॅनलवाले कोणीही आता येऊ नका , आम्हाला आमचं काम करु द्या … ” , वाघचौरे साहेब काहीसे वैतागून म्हणाले.
“ मी पत्रकार नाही सर , ऑफिसर आहे . मी सिरीयस फ्रॉड इन्वेस्टीगेशन ऑफिस मधून आले आहे माझं नाव सौदामिनी आहे. आणि हे माझे असिस्टंट श्री चिकटे, मला क्रिप्टो कॉईन एक्स ह्या केसमध्ये इन्वेस्टीगेशन करण्याचे आदेश आहेत. हे बघा … ” , असं म्हणून त्यांनी एका कागद वाघचौरे साहेबांकडे दिला. त्यांनी साशंक मनानेच तो घेतला आणि ते निरखून वाचू लागले.
“ बसा ना मॅडम . ” , अमरने त्यांना बाजूच्या खुर्चीत बसायला सांगितले. त्या आणि त्यांचे असिस्टंट दोघेही बसले .
“ ओके , मग आम्ही हि केस तुमच्याकडे सोपवायची का ? पण तसे आमच्या डिपार्टमेंटकडून काही आदेश नाहीत … ”, वाघचौरे साहेब म्हणाले.
“ तसं नाही सर , ह्या केसवर आपण दोघांनीही काम करायचं आहे , आम्ही आमचं इन्वेस्टीगेशन सेपरेट करू , ते फायनान्शिअल फ्रॉडबद्दल असेल , आणि आपल्याकडे संपूर्ण केसचं इन्वेस्टीगेशन आहे. आमच्या कायद्यात बसेल तेवढंच आमचं इन्वेस्टीगेशन असेल. म्हणजे आपण दोघांनी एकमेकांना मदत करायची आहे . केस खूप मोठी असल्याने कदाचित आमच्या डिपार्टमेंटलाही इन्वेस्टीगेशन करायला सांगितलं असेल . ”
“ तुम्ही काय इन्वेस्टीगेट करणार ? ”
“ ह्यात काही फ्रॉड झाला आहे का ? किंवा झाला असेल तर त्याची व्याप्ती किती असेल , रिकव्हरी करता येईल का ? वगैरे वगरे , ”
“ ठीक आहे , आम्हाला बरं झालं , कोणीतरी मदतीला आहे . चहा घेणार ना तुम्ही ? ”
“ कॉफी सांगा सर … ” चष्मा डोळ्यांवर नीट बसवत सौदामिनी मॅडम म्हणाल्या. वाघचौरे साहेब थोडेसे चमकले मग त्यांनी सगळ्यांसाठी कॉफी सांगितली. थोड्या वेळात कॉफी आली.
इतक्यात वाघचौरे साहेबांचा फोन वाजला . त्यांनी घाईत तो घेतला .
" बोल रे .... क्या ? खबर पक्की है ना ? .... ओके ओके ." म्हणत त्यांनी फोन कट केला . " अमर , चल आपल्याला निघायला पाहिजे ." वाघचौरे साहेब घाईघाईने उठत म्हणाले .
" काय झालं सर ? "
" आपल्याला जुहूला जायला किती वेळ लागेल ? "
" आता ट्रॅफिक असेल , तासभर तरी ... "
" शीट ... लेडी कॉन्स्टेबल कोण आहेत ड्युटीवर …? "
" पवार बाई आहेत . "
" नको , पवार नको , दुसरं कोण ? कवठेकर आहेत का ? "
" हो आहेत . पण झालं काय सर ? "
" कवठेकर मॅडम ना घे लगेच . रागिणी मुंबईत परत आलीय . ती आणखी कुठे गायब व्हायच्या आत तिला गाठलं पाहिजे ."
" ती कशाला कुठे जाईल सर ? "
" आपल्याला काय माहीत ? पण समजा गेलीच कुठे तर काय घ्या ! चल उरक लवकर "
“ मी पण येते सर … ”, म्हणत सौदामिनी आणि तिचा असिस्टंट चिकटे दोघेही उठले.
“ ठीक आहे , चला . ”

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users

<<कथेने चांगलाच वेग पकडला आहे. पुढे काय होईल ह्याची चांगलीच उत्सुकता लागली आहे.>>
सहमत..
भाग लवकर येत आहेत त्याबद्दल धन्यवाद

Group content visibility:
Use group defaults असे न ठेवता
Public - accessible to all site users हे ठेवले तर अधिक बरे होईल. पहिले २ भाग झाल्यावर ३ आणि ४ मध्येच हां बदल का केला अचानक ?