शोषण-१

Submitted by मोहिनी१२३ on 20 May, 2022 - 11:14

शमा आणि अमित अगदीच प्रेमात आकंठ बुडालेले. कॅालेजच्या दिवसांपासून ओळख-मैत्री-घट्ट मैत्री-प्रेम-एकामेकांना आजमावून पहाणे-लुटूपुटीची भांडणे-मतभेद-दोन्ही घरातून या नात्यासाठी मनापासून पाठिंबा आणि आशिर्वाद हे सगळे टप्पे पार करून नुकतेच विवाहवेदीवर चढलेले एक आधुनिक आणि त्यामानाने वयाने लहान जोडपे.

मतभेदाचे मनभेदात रूपांतर होऊ नये म्हणून आवश्यक असणारी लवचिकता आणि तडजोड करण्याची वृत्ती दोघांमध्येही होती.

या काळात त्यांनी त्यांच्या ग्रुपबरोबर अथवा दोघंच अशी भरपूर धमाल केली. पुरूषोत्तम, फिरोदिया, संजीवनी असे अनेक करंडक कॅालेजला मिळवून दिले. सहली आयोजित केल्या, सिनेमे-नाटके बघितली, लिखाण केले, काही सामाजिक काम केले आणि कॅालेज जीवनात खपून जाईल असे काही असामाजिकही!

ते एकामेकांशी खूप बोलायचे. लग्न करण्याबाबत हळूहळू दोघेही गांभीर्यांने विचार करू लागले. आता ते एकामेकांशी आवर्जून लग्न कुठे करायचे, कसे करायचे, लग्नानंतर एकत्र राहायचे का वेगळे, परदेशी जायचे का?, नोकरी/व्यवसाय/करियर अशा वेगवगळ्या विषयांवर बोलायला लागले. काहीवेळा त्यांचे सहज एकमत व्हायचे तर काही वेळा नाही. पण ते सतत बोलायचे. सध्द्याच्या पध्दतीप्रमाणे त्यांनी विवाहपूर्व समुपदेशनही केलं होतं.

यात अमितला एक गोष्ट खटकायची. त्याने मुलाबाळांचा विषय काढला की ती हमखास तो विषय टाळून दुसर्या विषयाबद्दल बोलायची. त्याला पहिल्यांदा सहज तसं होत असेल असं वाटलं. नंतर शमा इतरवेळी आधुनिक असली तरी याबाबतीत स्त्रीसुलभ संकोचामुळे असं वागत असेल असंही वाटलं.

अमितची याबाबतीतली मतं सुस्पष्ट होती. त्याला एक का होईना मूल हवंच होतं. आणि अर्थातच बाबा म्हणून जे काही प्रेम, जिव्हाळा, काळजी, काम करायला लागंत त्यासाठी आवश्यक ती जबाबदारी मनापासून घ्यायला तो तयार नव्हे आतूर होता. तो त्यांच्या बिल्डींगमधला अनेक चिल्या-पिल्यांचा लाडका अमित दादा/अमित काका होता. त्याला लहान बाळं,मुलं खूप आवडायची. त्यांना खेळवण्यात, रमवण्यात त्याचा फावला वेळ मस्त जायचा.

याबाबतीत त्याने शमाशी अनेकदा बोलायचा प्रयत्न केला. दोघांपैकी कोणामधेही काही गंभीर वैद्यकिय समस्या असेल तर कोणताही शारिरिक/मानसिक त्रास सहन करण्यापेक्षा मूल दत्तक घ्यायला त्याचे प्राधान्य होते. हे सगळे त्याला शमाला सांगायचे होते, तिचे मत ऐकून घ्यायचे होते.

त्यांना खरतंर कॅालेजची ५ वर्ष आणि नंतर नोकरीची २ वर्ष सर्वप्रकारच्या चर्चेला मिळाली होती. पण लग्न होईस्तोवर तिने त्याची याविषयावर डाळ शिजू दिली नाही.

शेवटी शेवटी ती त्याच्यावर “तू लग्नाआधी मुलाचा एवढा काय विचार करतोस. तुझा काही दुसरा विचार नाही ना” असं म्हणून भडकली तेव्हा तो हतबुध्द झाला. शमा विवाहपूर्व समुपदेशनावेळीही या मुद्दयावर गप्प राहिली.

अमितने आपल्या मित्रांशी, आईशी या विषयावर बोलायचा प्रयत्न केला. तेव्हा त्यांनी “ शमासारख्या सुस्वभावी, सुसंस्कारी मुली या विषयावर बोलायला लाजतात रे लग्नाआधी “ असं म्हणून अमितलाच मोडीत काढलं. त्याच्या एका आयटीतल्या मित्राने तर अमितच्याच बॅासचे वाक्य त्याला ऐकवलं .
“अरे थोडा ग्रे एरिआ स्विकारायला शीक. सगळंच ब्लॅक ॲंड व्हाइट नसतं रे राजा”

यामुळे थोड्या निश्चीत पण जास्त साशंक मनानेच अमित शमाबरोबर विवाहवेदीवर चढला.

क्रमशः

Group content visibility: 
Public - accessible to all site users