नकार गर्भरेशमी!

Submitted by मिल्या on 23 November, 2009 - 02:09

जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी

कबूल कर अता तरी तुझ्या नसानसात मी
फितूर श्वास सांगती उभ्या जगास बातमी

कळेल का तुला सखे, मिळे न प्रेम सारखे
घडेल का असे कधी, फुले वसंत नेहमी?

कशास वेचिशी खुळ्या तिला वहायला कळ्या
तिच्याकडे खळ्या हजार, काय रे तिला कमी?

नवेच शौक पाळतो फुलास भृंग टाळतो
अशी अनेक अत्तरे म्हणे खरीदलीत मी

अजून खेळ हा तुझा सुरूच खेळवायचा
तुझा... तुझाच डाव हा! तुझीच लागते रमी

रडेनही... हसेनही... जगेनही अता पुन्हा
झुरायचे... मरायचे... विचार फक्त मोसमी

मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी

अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू म्हणा दिलीस जीवना हमी?

गुलमोहर: 

मॅड म्हणजे मॅड झालीये गजल, मिल्या! जियो!
खळ्या, नकार आणि हमी तिन्ही आरपार आहेत...
त्यातही खळ्या... अगदीच आयहाय!

जिवंत राहिलो कसा रुतून दलदलीत मी?
उमेद एवढीच की फुलेल पद्म कर्दमी

मनाविरुद्ध मी असा तुझ्यात गुंतलो पुन्हा
इलाज काय जर तुझा नकार गर्भरेशमी>> मस्त रे...

ग्रेट, सुपर्ब, क्लास, जबरदस्त....संपली विशेषणं Happy

मस्त म्हणजे मस्तच!!!! शब्दच नाही...सगळे शेर एक से बढकर एक..

धन्यवाद परत एकदा

चालीत बांध आता आणि मृदु आवाजात रेकॉर्ड कर... >>> Lol
अमृते पुण्यात ये म्हणजे तुझ्या मृदु आवाजात रेकॉर्ड करू आपण Happy

प्रत्येक शेर आधीच्यापेक्षा सुंदर वाटावा आणि पूर्ण गझल पुन्हा पुन्हा वाचावी अशी.
कुठे कुठे दाद देणार.
गझलेची बांधणीही खूप नीटस. कुठेही शब्दांची ओढाताण नाही कि जागा भरायला व्यर्थ शब्द घतलेले नाहीत.

वाहवा वाहवा

सहजसुंदर, सत्यवाचक, ओघवती रचना. आवडली! खूपच आवडली!!

अखेर मोडलास ना करार आपल्यातला
तशी कुणास तू म्हणा दिलीस जीवना हमी? >> खरंय. पण, करार तरी कुठला म्हणायचा?

Pages