अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.
डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.
चार वर्षांपूर्वी तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता ते ती भोगत होते. या घटनेनंतर सदर दवाखाना बंद होता. हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर बेंजामिन पुरते चक्रावून गेले. आपलाच एक आडनावबंधू इतके क्रूर कृत्य कसा काय करू शकला या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.
ते नोकरीत रुजू झाले आणि त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू झाले. दवाखाना सुरू झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि लवकरच तेथे रुग्णांची गर्दी होऊ लागली. चार वर्षांपूर्वीची ती घटनाच भीषण असल्याने त्याचा गावात बराच बोलबाला झाला होता. आता डॉ. बेंजामिनकडे येणारे रुग्णही त्यांना आपण होऊन जुन्या डॉक्टरांच्याबद्दल बरच काही सांगू लागले. त्यांचे ते किस्से ऐकल्यावर बेंजामिनना अजूनच आश्चर्याचे धक्के बसले. विन्स हे अगदी दयाळू, प्रेमळ व उदार मनाचे होते. दवाखान्यात मन लावून झटून काम करण्याचा त्यांचा स्वभाव. रात्री-अपरात्री ते तपासणीसाठी रुग्णांच्या घरीदेखील जात. काही गरीब शेतकरी रुग्णांकडे डॉक्टरांची फी द्यायला पैसे नसायचे. तरीसुद्धा डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आणि अशा लोकांनी प्रेमाने दिलेला शेतावरचा वानवळा फी-स्वरूप स्वीकारत. मग असा दयाळू वृत्तीचा माणूस खुनी का झाला असावा, या प्रश्नाने बेंजामिन यांच्या डोक्यात थैमान घातले. ते त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचे ठरवले.
अधिक चौकशी करता त्यांना त्या गुन्ह्याची साद्यंत हकिकत समजली. त्याचा घटनाक्रम असा होता :
डॉक्टर विन्स यांनी त्यांच्या म्हाताऱ्या दुबळ्या झालेल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्यांनी त्या प्रेताची सर्व बोटे तोडली. नंतर ते प्रेत लांबवर नेऊन पुरून टाकले. या नीच कृत्यानंतर जसे काही घडलेच नाही अशा थाटात ते दवाखान्यात येऊन रोजचे काम करू लागले. पण अखेर खुनाला वाचा फुटली. परिणामी विन्सना पोलिसांनी अटक केली. त्यांचे वडील सिझोफ्रेनियाने ग्रस्त होते. नुकतेच त्यांना मानसोपचार निवासी केंद्रातून विन्सबरोबर घरी पाठवले होते. स्वतः डॉ. विन्स यांनाही नैराश्याने ग्रासलेले होते आणि त्यासाठी ते योग्य ती औषधे घेत होते. मात्र खुनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी ती औषधे बंद केली होती. अशा कृतीचाही रुग्णावर दुष्परिणाम होतो. विन्स यांनाही आपल्या डोक्यात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांना कळवले होते. तसेच या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी विन्सना एक कार अपघातही झाला होता. त्या अपघातात काही वेळापुरती
त्यांची शुद्ध हरपली होती.
पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. परंतु त्याचबरोबर आपण नैराश्याचे रुग्ण आहोत हा दावा केला. त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते. पण त्यासाठी ते साक्षीपुरावे काही सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचे भरभक्कम पुरावे गोळा केले होतेच. आता न्यायालयापुढे हा प्रश्न होता, की त्यांनी ते कृत्य मानसिक रोगाच्या झटक्यात केले की काय ?
मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.
एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने विन्सना जाणूनबुजून केलेल्या खुनाच्या कृत्यासाठी दोषी ठरवले आणि मरेपर्यंत कारावासाचीची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षेदरम्यान पॅरोलचा पर्याय ठेवला नाही. या आदेशानुसार त्यांची रवानगी व्हर्जिनियातील तुरुंगात झाली.
हा सर्व तपशील बेंजामीननी बारकाईने अभ्यासला. एकीकडे दवाखान्यातील जुने रुग्ण विन्स यांची भला माणूस म्हणून प्रशंसा करीत होते तर दुसरीकडे त्याच डॉक्टरनी केलेले हे भयानक कृत्य जगासमोर होते. यावर विचार करून बेंजामिन यांची मती गुंग झाली. परंतु एक प्रश्न राहून राहून त्यांचे डोके पोखरत होता. विन्स यांचे नैराश्य व त्यावरील उपचार आणि उपचार बंद केल्याचे परिणाम हे मुद्दे तर महत्त्वाचे होतेच. पण त्याच्या जोडीला विन्सना अन्य काही मेंदूविकार तर नसावा ना, अशी शंका त्यांना येऊ लागली.
दरम्यान अमेरिकी रेडिओवरील एका कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार या विन्स प्रकरणावर एक कार्यक्रम तयार करणार होते. त्यासाठी त्यांनी बेंजामिनना मुलाखतीसाठी विचारले. पण बेंजामिननी घाबरून नकार दिला. पण कालांतराने त्यांनी विचार बदलला आणि आपला होकार कळवला. त्यासाठीची पहिली पायरी होती ती म्हणजे विन्सची तुरुंगात प्रत्यक्ष भेट घेणे. मग बेंजामिननी विन्सना रीतसर पत्र लिहून परवानगी मागितली. ती मिळाली.
मग एके दिवशी ही डॉक्टर पत्रकार जोडी त्यांना भेटायला गेली. त्यांना पाहता क्षणी बेंजामिनना विलक्षण आश्चर्य वाटले. जेमतेम पन्नाशीचे असलेले विन्स आता अगदी जख्ख म्हातारे दिसत होते आणि पिंजऱ्यात बंद केलेल्या एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था होती. हे पाहता बेंजामिनना मनापासून वाटले की या माणसाला नक्की काहीतरी मोठा आजार झालेला आहे. मग त्यांनी दुसऱ्या भेटीची वेळ ठरवली. यावेळेस त्यांनी बरोबर एका मनोविकारतज्ञांना नेले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. विन्स चालताना आपले पाय जमिनीवर अक्षरशः फरफटत नेत होते (shuffling gait). या निरीक्षणावरून त्या डॉक्टरांनी Huntington disease (HD) या मेंदूविकाराची शक्यता व्यक्त केली. पण हे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक होते, जे तुरुंगात शक्य झाले नसते. अशा तऱ्हेने ही भेट निष्कर्षाविना संपली.
दरम्यान या प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. तुरुंगात असताना विन्सनी तिथल्या अधिकाऱ्यांना, "आपण आत्महत्या करू" अशी वारंवार धमकी दिली. परिणामी त्यांना एका मनोरुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या रीतसर तपासण्या झाल्या. त्यापैकी एक विशिष्ट जनुकीय चाचणी होती. या तपासण्यावरून HD चे निदान झाले. या जनुकीय आजारात मेंदूच्या काही महत्त्वाच्या पेशींचा वेगाने नाश होत राहतो. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूकार्यात बिघाड होतो. त्याच्या वागण्यात अजब बदल होऊ लागतात आणि त्याची चालही बिघडते. टप्प्याटप्प्याने आजाराची तीव्रता वाढतच राहते. त्यातून रुग्णाला पंगुत्व येते. आजाराची सुरवात झाल्यानंतर सरासरी वीस वर्षांनी अशा रुग्णांचा मृत्यू होतो.
विन्सच्या आजाराची बातमी त्यांना सांगण्यात आली. ती ऐकल्यावर त्यांना हायसे वाटले. " चला, आपल्याला काय झालय ते तरी समजले !" असे ते आनंदाने उद्गारले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पूर्वीचेच नैराश्यविरोधी उपचार सुरू केले. त्यातून ते थोडेफार सुधारले. अर्थातच पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात झाली. इथे त्यांना आपले उरलेसुरले आयुष्य काढायचे होते.
इथपर्यंतच्या या हकीकतीवर आधारित एक कार्यक्रम वर उल्लेखिलेल्या पत्रकारांनी तयार केला. 2013 मध्ये त्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तिकडे बेंजामीन मात्र आतून अस्वस्थ होते. विन्सना संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढायचे होते आणि तिथे त्यांना नीट औषधोपचार मिळतील की नाही याची बेंजामिनना काळजी वाटली. नीट उपचारांअभावी ते असेच सडून मरू नयेत ही त्यांची इच्छा होती. विन्सच्या आजाराचे कारण पुढे करून त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते का, यावर बेंजामीन गांभीर्याने विचार करू लागले.
विन्स घटनेवर आधारित रेडिओ कार्यक्रमामुळे संबंधित माहिती सर्वदूर पसरली. ती ऐकून अनेक स्वयंसेवक याप्रकरणी मोफत कायदेशीर सल्ला व मदत करण्यास तयार झाले. अशा लोकांनी एक समिती स्थापन केली. समितीच्या मते हा खटला विन्सच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने लढवण्याची गरज होती. तसे झाल्यास न्यायाधीश विन्सना तुरुंगातून मुक्त करून एखाद्या निवासी मनोशुश्रुषा केंद्रात स्थलांतराची परवानगी देण्याची शक्यता होती. परंतु यावर विचारविनिमय करता समितीला त्यातील अडचणी लक्षात आल्या. खटला पुन्हा नव्याने चालवायचा झाल्यास तो दीर्घकाळ चालेल. विन्सना त्याचा मानसिक ताण कितपत सहन होईल अशी शंका समितीला वाटली. म्हणून तो बेत रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित राज्यपालांकडे दयेचा अर्ज (clemency) करून पाहण्याचे ठरले.
तो अर्ज दाखल झाला. राज्यपालांनी त्यावर विचार करण्यास बराच वेळ घेतला आणि 2017 मध्ये त्यांची कारकीर्द संपताना अर्ज नामंजूर केला. पुढे नवे राज्यपाल पदावर रुजू झाले. ते स्वतः मेंदूविकार तज्ञ आहेत. समितीने अर्ज नव्याने त्यांच्यापुढे ठेवला. या महोदयांनी सुद्धा चार वर्षे वेळ घेऊन 2021 मध्ये अर्ज नामंजूर केला. आता समितीवर हताश होण्याची पाळी आली होती. त्यांच्या कष्टांबरोबरच त्यांनी आतापर्यंत केलेल्या काही लाख डॉलर्सचा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता !
दरम्यान बेंजामिन विन्सना तुरुंगात नियमित भेटत आणि धीर देत होते. एव्हाना त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. बेंजामिनना हा माणूस मुळात शांत व मवाळ प्रवृत्तीचा आहे असे अगदी आतून वाटू लागले. या प्रकरणामध्ये बेंजामिन भावनिकदृष्ट्या खूपच गुंतले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या त्या सर्व घटनांचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले. पुस्तकाच्या शेवटी मात्र त्यांनी आपण राज्यपालांच्या निर्णयामुळे खूप व्यथित झालो असल्याचे लिहिले. इथून पुढे तरी मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता त्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती संबंधित राज्यपालांच्या कार्यालयात देखील वाटण्यात आल्या. एवढे करून बेंजामिन स्वस्थ बसले.
दरम्यान 2022 उजाडले आणि 12 जानेवारी रोजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक आश्चर्य घडले. डॉक्टर असलेल्या राज्यपालांनी विचारांती त्यांचा पूर्वीचा निर्णय फिरवून विन्सना दयायाचना मंजूर केली ! त्यानुसार विन्सचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण अद्याप ते तुरुंगातच आहेत. समिती त्यांच्यासाठी योग्य त्या निवासी केंद्राच्या शोधात आहे. मध्यंतरीच्या कोविडपर्वामुळे अशा अनेक केंद्रांमध्ये पुरेशा रुग्णखाटा आणि काळजीवाहू लोकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.
डॉक्टर बेंजामिन कधीतरी मनाशी विचार करतात, की या सर्व प्रकरणात आपण काय गमावले आणि काय कमावले ? त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. त्यांनी आपले नियमित काम सांभाळून ही जी दगदग केली ती 'लष्कराच्या भाकरी' प्रकारात मोडणारी होती. त्यात गुंतवून घेतल्याने त्यांच्या व्यक्तिगत अर्थिक विकास आणि कुटुंबसौख्यावर दुष्परिणाम झाला. (किंबहुना त्यांच्या पत्नीने याबद्दल तक्रारही केली होती). हे झाले गमावलेले पारडे. पण ते जेव्हा कमावलेले पारडे बघतात तेव्हा त्यांना विलक्षण आत्मिक आनंद मिळतो. डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल.
…………
आता थोडा वैद्यकीय काथ्याकूट.
या प्रकरणातून वैद्यकीय तज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहिलेत आणि त्या संदर्भात मतांतरे व्यक्त झाली आहेत.
१. एखाद्या रुग्णास निव्वळ HD आजार असेल तर तो इतका हिंसक होऊ शकतो का ? इथे दुमत आहे.
२. डॉ.विन्सच्या बाबतीत दोन शक्यता राहतात. विशिष्ट प्रकारची नैराश्यविरोधी औषधे चालू असताना देखील काही रुग्ण हिंसक होऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, ही औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.
मुळातच जर ते समाजविघातक प्रवृत्तीचे असतील तर मग इथे आगीत तेल असल्यासारखे झाले असावे. एखादा माणूस वरवर जरी कनवाळू वाटला तरी त्याच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. त्यांनी केलेल्या नीच कृत्याची तीव्रता पाहता आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.
३. HD हा त्यांचा आजार योगायोगाने लक्षात आलेला असू शकतो.
………
मनोरुग्णांनी केलेल्या खुनाबाबत कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे जाणून घेण्यास उत्सुक. जाणकारांनी जरूर मत द्यावे.
(चित्रे जालावरून साभार)
* मंदबुद्धी मुला. जन्माला
* मंदबुद्धी मुला. जन्माला येणे हा जन्मजात मानसिक विकार आहे का?>>>> नाही.
जन्मजात मतिमंदत्व अनेक चयापचयातील बिघाडाशी संबंधित असते. जसे की, जन्मताच पेशींमध्ये एखादे प्रथिन किंवा enzyme तयार झालेले नसणे.
त्यातले काही आजार अनुवंशिक असतात. असे आजार असलेली काही मुले जेमतेम एक-दोन वर्षे जगतात तर अन्य काही मुले बरीच वर्ष काही मर्यादेसह जगू शकतात.
* मंदबुद्धी मुला. जन्माला
.
चांगली माहिती देताय.
चांगली माहिती देताय.
बाळंतपणात काही बायकांना डिप्रेशन येते त्याचे कारण काय असते?
मानसिक आजार नी सर्व च ग्रस्त
मानसिक आजार नी सर्व च ग्रस्त असतात फक्त .
लक्षण,तीव्रता , काळ वेगळा असतो .
ह्या वर काय सांगाल.?
मनोरुग्ण कोण नाही?
ह्याची डिटेल व्याख्या केली तर सर्व च मनोरुग्ण आहेत ,
असे दिसून येईल.
तीव्र बुद्धिमत्ता ,म्हणजे जास्त fault.
हे सूत्र सत्य असावे.
बाळंतपणातले नैराश्य >>>
बाळंतपणातले नैराश्य >>>
बाळंतपणात नैराश्य येण्यामागे खालील प्रकारची कारणे असतात:
१. या आजाराचा कौटुंबिक इतिहास असणे
२. गरोदरपणाच्या शेवटच्या तिमाहीत इस्ट्रोजन या हार्मोनच्या संदर्भातील पेशीमधील काही सिग्नल यंत्रणा बिघडतात
३. वैवाहिक कटकटी आणि छळ, कौटुंबिक आधार नसणे, आर्थिक आपत्ती आणि या दरम्यान झालेला जवळच्या व्यक्तीचा मृत्यू हे सर्व घटक अतिसंवेदनक्षम बायकांमध्ये नैराश्याचा धोका वाढवतात.
बाळांतपणातील नैराश्य ही
बाळांतपणातील नैराश्य ही postnatal depression हे त्या काळात अचानक घडते , वर डॉ कुमार सरांनी कारणे दिली आहेत
मी 18,20 वर्षांपूर्वी याची एक भयानक केस बघितली होती , तिला नैराश्य आल्याने ती एकाच जागी ढिम्म बसून रहायची , काही समजतच नव्हते , तर एकदा अशीच चुलीजवळ बसली होती तर साडी पेटली आणि ती त्यातच भरपूर बर्न होऊन गेली. थोडे दिवस बर्न साठी एडमिट होती
कौटुंबिक प्रश्न काहीही नव्हते , सगळे व्यवस्थित होते , डिलिव्हरी झाल्यावर थोड्या दिवसांनी विचित्र वागते म्हणून त्याच गायनेककडे गेले , त्यांनी डायगणोस करून सायकीयाट्रीला दाखवून उपचार सुरू केले होते , मी फक्त घरी जाऊन बीपी चेक करणे , कधीतरी त्यांनी लिहून दिलेले इंजेक्शन देणे इतके करत होतो.
काही दिवसांनी त्या गल्लीत दुसर्या घरी गेलो होतो तेंव्हा समजले
BC
BC
बापरे !पण खरंय, काही रुग्णांची तीव्रता टोकाची असते. मी सुद्धा एक स्त्री अशी जवळून पाहिली.
दुसऱ्या बाळंतपणानंतर वारंवार तिच्या मनात आत्महत्येचे विचार यायचे. घरच्यांना तिला त्यापासून परावृत्त करण्यात अखेर यश आले.
बरे वाटले मला.
दोन्ही डॉक्टरांना धन्यवाद .
दोन्ही डॉक्टरांना धन्यवाद .
चांगली माहिती दिलीत.
चांगला परिचय. पुस्तक
चांगला परिचय. पुस्तक वाचण्याचा योग नाही आला अजून पण इथे निदान निदान झाले. ज्या आजारांचे 'बायोमार्कर्स' नाहीत त्यात जास्त पंचाईत होते. (बायोमार्कर संज्ञेशी अपरिचित असणार्यांसाठी - बायोमार्कर म्हणजे अशी एखादी वा अनेक टेस्टस ज्याद्वारे निदान नक्की होते). बर्याच मानसिक विकारात बायोमार्कर्स नसतात. रूग्ण (किंवा नातेवाईक) प्रश्नावल्या भरतो व त्या स्कोर वरून आजाराचे निदान करतात. तिथे हे सगळे प्रश्न अधिकच क्लिष्ट होत असतील.
<< बर्याच मानसिक विकारात
<< बर्याच मानसिक विकारात बायोमार्कर्स नसतात. >>
Makes me wonder whether psychology/psychiatry is pseudo-science. गूगलवर शोध घेतला तर बरीच माहिती (नकारात्मक) मिळाली. याबाबतीत अजून वाचावे लागेल, असे दिसतेय.
चांगला परिचय. यावर एक उत्तम
चांगला परिचय. यावर एक उत्तम सिनेमा होऊ शकतो (डॉ.बेंजामिन=परेश रावल, डॉ.विन्स=नसिरुद्दीन किंवा मनोज वाजपेयी
), वरच्या केसमधे बालपणीच्या गंभीर घटनांच्या जखमा आहेत, नुसताच मनोविकार नाही, जर लहानपणी थेरपी, योग्य उपचार, प्रेम आणि सुरक्षित बालपण मिळाले असते तरीही हा जनुकीय मनोविकार ट्रीगर झाला असता का? हा विकार वडिलांकडून आलेला असेल तर शोषणासाठी त्यांनाही क्षमा करावे का? मगं तर सगळ्याच गुन्हेगारांना क्षमा करावे लागेल, तो एक्स्क्यूझ सगळेच गुन्हेगार वापरतील आणि समाज अधिक असुरक्षित होईल, जे अजिबात न्याय्य नाही. मला गंभीर गुन्ह्यांखाली पकडल्या गेलेल्या गुन्हेगारांविषयी अजिबात सहानुभूती वाटत नाही. यांना सोडून दिले तर उपचार , औषधे व थेरपी यांबाबत सुपरवाईझ कोण करणार? यात थोडीही दिरंगाई झाली तरी नवीन गुन्हा होणार नाही ह्याची शक्यता किती, या सगळ्याचा सिस्टीम वर किती ताण येईल, शिवाय यातल्या पळवाटा व संभाव्य धोके भयंकर आहेत. ही काळजी आधी घ्यायला हवी, नंतर योग्य ती शिक्षा हवीच.
सर्वांना धन्यवाद चांगली चर्चा
सर्वांना धन्यवाद चांगली चर्चा व नवे मुद्दे आलेले आहेत.
१. HD हा मुळात चेतातंतूंचा आजार आहे. मनोवस्थेवर परिणाम हा त्याचा एक भाग आहे. या आजाराच्या निदानासाठी चांगली जनुकीय चाचणी उपलब्ध आहे. ती सुद्धा सर्वांच्या बाबतीत करावी लागते असे नाही. जर डॉक्टरांना तपासणी वरूनच खणखणीत लक्षणे दिसली तर निदान झाल्यातच जमा असते.
२. मानसिक आजारांसाठी रक्त तपासणी इत्यादी करून विशिष्ट मार्कर्स आहेत का यावर अलीकडे बरेच संशोधन होत आहे. फक्त एक उदाहरण देतो.
बायपोलर प्रकारच्या आजारांसाठी खालील सहा प्रथिने मार्कर म्हणून विचाराधीन आहेत:
(GDF-15), (HPX), (HPN), (MMP-7), (RBP-4), (TTR).
अर्थातच यावर बरेच काही वाचावे लागेल आणि नुसते वाचण्यापेक्षा त्यातल्या एखाद्या तज्ञाचे मत महत्त्वाचे राहील.
* यावर एक उत्तम सिनेमा होऊ
* यावर एक उत्तम सिनेमा होऊ शकतो (डॉ.बेंजामिन=परेश रावल, डॉ.विन्स=नसिरुद्दीन किंवा मनोज वाजपेयी) >>> +1
इंग्लिश चित्रपट बनवण्याची तयारी अमेरिकेत 2020 झाली चालू झाल्याची बातमी आहे. अजून पूर्ण झाला की नाही याची कल्पना नाही :
https://www.google.com/amp/s/deadline.com/2020/06/jennifer-fox-the-other...
"मगं तर सगळ्याच गुन्हेगारांना
"मगं तर सगळ्याच गुन्हेगारांना क्षमा करावे लागेल, तो एक्स्क्यूझ सगळेच गुन्हेगार वापरतील आणि समाज अधिक असुरक्षित होईल
>>> चांगला व विचार करण्याजोगा मुद्दा. यावर खोलवर विचार करावा लागेल.
प्रस्तुत प्रकरणातही न्यायाधीश, राज्यपाल यांचे आपापले निर्णय पाहता हे लक्षात येईल.
यावर समतोल विचार करणे वाटते तितके सोपे नाही.
कुमार सर, तुमचे लेख मी
कुमार सर, तुमचे लेख मी निवांत वेळ असतो तेव्हाच वाचते, बराच वेळ डोक्यात रेंगाळत राहतात. हा लेखदेखील सविस्तर आहे, आवडला असे म्हणू शकत नाही पण अशा समाज प्रबोधनपर लेखांची गरज आहे.
प्रतिसादांना तुम्ही दिलेली उत्तरेही अभ्यासपूर्ण असतात, आवडतात.
*आवडला असे म्हणू शकत नाही पण
धन्यवाद.
*आवडला असे म्हणू शकत नाही पण अशा समाज प्रबोधनपर लेखांची गरज आहे.
>>>
टिपणी आवडली. खरं सांगायचं तर मलासुद्धा या घटनेवर लिहायला 'आवडलेले ' नाही ! पण काय झाले ते सांगतो.
आमच्या वैद्यकीय नियतकालिकाकडून मला या विषयाचा दुवा ई-मेलवर वारंवार पाठवला जात होता. त्यातला खुनी शब्द वाचल्यानंतर मी ते पाहणेसुद्धा टाळले होते. असे साधारण महिनाभर झाले. तरी त्यांचे मेल पाठवणे चालूच होते. शेवटी कंटाळून उघडलं.
संपूर्ण घटना वाचल्यानंतर यावर आपण लिहावे की नाही अशी चलबिचल मनात झाली. पण त्यातील HD या आजाराने मला अधिक वाचायला प्रवृत्त केले. या आजाराचा माझा संबंध एमबीबीएसच्या शेवटच्या वर्षाला असताना जे काही परीक्षेसाठी म्हणून वाचायचे तेवढाच होता. त्यानंतरच्या आयुष्यात असा एकही रुग्ण पाहिलेला नव्हता. यानिमित्ताने या आजाराचे वाचन केले.
मग या घटनेतील कायदेशीर गुंतागुंती आणि उलथापालथी बघितल्यावर हा विषय वाचकांना रोचक वाटेल अशा उद्देशाने लिहिला. त्यातील घटना अर्थातच निंद्य आहे.
खून करणे हा खूप गंभीर गुन्हा
खून करणे हा खूप गंभीर गुन्हा आहे.
एक आयुष्य पूर्ण संपते.
खूण करणाऱ्या व्यक्ती ल फक्त आणि फक्त एकच स्थिती मध्ये शिक्षे पासून पूर्ण सवलत मिळाली पाहिजे,उलट बक्षीस पण मिळाले पाहिजे.
तो गोष्ट म्हणजे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी किंवा स्वतःची इज्जत वाचवण्यासाठी केलेल्या प्रती हल्ल्यात कोणी मृत झाले तरी शिक्षा होता कामा नये.
बाकी स्थिती मध्ये खून हा खून च असतो.
बिलकुल दयामाया नको.
तुरुंग की मेंटल हॉस्पिटल हा फक्त पर्याय असेल.
सुटका हा पर्याय नसेल.
रोचक विषय आणि त्याखालील चर्चा
रोचक विषय आणि त्याखालील चर्चा
आज निवांतपणे लेख वाचला.
आज निवांतपणे लेख वाचला.
राधिकाला अनुमोदन!
आपणा सर्वांचे अभिप्राय, पूरक
आपणा सर्वांचे अभिप्राय, पूरक माहिती व मनोविश्लेषण या सर्वांनी युक्त अशी ही चांगली चर्चा झाली. खुनासारख्या अत्यंत गंभीर गुन्ह्याशी संबंधित ही घटना. कायद्यातील तरतुदीनुसार गुन्हेगाराला कैदमुक्त केलेले आहे. त्याला झालेला HD आजार हा मृत्युपंथाकडे नेणारा आहे.
( डॉ. बेंजामिनच्या हातातील फोटोमधले विन्स आहेत).
यथावकाश बेंजामिन यांना त्यांचे पालकत्व मिळू शकेल. त्यानंतर विन्स कसे सुधारतात आणि किती जगतात हा उत्सुकतेचा भाग राहील.
आपणा सर्वांचे मनापासून आभार !
गिल्मोर डॉक्टर्स !
गिल्मोर डॉक्टर्स !
असा सारखे नाव असलेल्या लोकांचा फिलिया नसतो का?
डॉ कुमार छान पुस्तक परिचय!
धन्यवाद.फिलिया. >>> असू शकेल
धन्यवाद.
फिलिया. >>> असू शकेल
या मुद्याचा मानसशास्त्राच्या दृष्टीतून विचार करावा लागेल. तितका माझा अभ्यास नाही. कोणाचा असल्यास जरूर लिहा.
काल एका ठिकाणी बसुन राहायचे
काल एका ठिकाणी बसुन राहायचे काम होते तेव्हा हा लेख व प्रतिसाद वाचून काढले. उत्तम लेख व चर्चा. चाइल्ड अब्यु ज भयानक असतो. खुन्याची मानसिकता समजू शकते. त्या आजाराबद्दलही वाचले. आता अधिक जाणून घेइन.
Dr कुमार
Dr कुमार
Hd हा मानसिक आजार जगात किती लोकांना झाला आहे?
आणि त्या आजाराची कन्फर्म टेस्ट काय?
बाकी अनंत मानसिक आजार आणि hd हा मानसिक आजार..
ह्या मधील फरक कसा नाहीत पडतो?
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
खुन्याची मानसिकता समजू शकते. >>>+११
....
हा आजार जगात किती लोकांना झाला आहे?
>>>इथे उत्तर दिलंय ना :
Submitted by कुमार१ on 22 April, 2022 - 14.19
https://www.sumanasa.com/go
https://www.sumanasa.com/go/w59hh6
सिंगापूर मध्ये एका मती मंद व्यक्ती ल फाशी देण्यात आले.अमली पदार्थ ची वाहतूक करणे ह्या गुन्ह्यात तो आरोपी होता.त्याचा Iq फक्त ६९ होतं
अनेक संघटनांनी विरोध केला पण सरकारी नी तो मनाला नाही.
.
ह्या वरून एक प्रश्न उभा राहतोच.
मती मंद असतील किंवा मानसिक रोगी .
ह्यांनी गुन्हा करण्या अगोदर त्यांच्या संगोपनाची जबाबदारी ज्या संघटना ह्या लोकांच्या हक्कासाठी लढत असतात त्यांनी घेतली पाहिजे..गुन्हा होवून गेल्यावर .
गुन्हा करणारा ,आणि पीडित दोंघाच्या हक्क चे रक्षण करणे सरकार ची जबाबदारी असते.
मानसिक रोगी आहे,मती मंद आहे म्हणून पीडित व्यक्ती ल न्याय नाकारता येणारं नाही.
हेमंत सर,
हेमंत सर,
माझ्या माहितीनुसार मतिमंद आणि मानसिक रोगी हे विभिन्न प्रकार आहेत.
बातमीनुसार:
<< आपल्यावर ड्रग्ज नेण्याची बळजबरी करण्यात आल्याचं नागेंद्रननी सुनावणीदरम्यान सुरुवातीला सांगितलं. पण नंतर पैशाची गरज असल्याने आपण हा गुन्हा केल्याचं त्यांनी सांगितलं. >>
<< त्यांना दारूचंही व्यसन असल्याने या सगळ्याचा परिणाम त्यांच्या निर्णयक्षमतेवर झाला असण्याची शक्यता असल्याचं 2017मध्ये डॉ. केन उंग या मानसोपचारतज्ज्ञांनी म्हटलं होतं. पण नंतरच्या उलटतपासणीत मात्र डॉ. उंग यांनी आपलं मत बदललं.
नागेंद्रन मानसिकदृष्ट्या अपंग नसल्याचं इतर 3 मानसोपचारतज्ज्ञांनी कोर्टाला सांगितलं. तर बुद्धीमत्ता कमी असल्याने कदाचित ते हा गुन्हा करण्यासाठी तयार झाल्याची शक्यता असल्याचं एका मानसोपचारतज्ज्ञाने सांगितलं.
>> तज्ञ व्यक्तीलाच कळत नाही, खरं काय आहे ते?
पुराव्या निशी गुन्हा सिद्ध
पुराव्या निशी गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा होवू नये म्हणून मानसिक आजारी असल्याचं पवित्रा घेतला असावा.
Dr कुमार ह्यांनी पण जे उदाहरण दिले आहे.
त्या मध्ये पण हीच स्थिती असावी.
प्रथम गुन्हा घडला नाही असा बचाव आणि सिद्ध झाला की मानसिक रोगी असल्याचा बचाव.
Dr कुमार ह्यांनी सांगितलेल्या केस चा पूर्वार्ध खूप महत्वाचा असेल.
पण ती माहिती उपलब्ध नसणार.
पुराव्या निशी गुन्हा सिद्ध
पुराव्या निशी गुन्हा सिद्ध झाल्यावर शिक्षा होवू नये म्हणून मानसिक आजारी असल्याचं पवित्रा घेतला असावा. >>> +११
खरे आहे. गुंतागुंतीचे प्रकरण वाटते.
.........
Dr कुमार ह्यांनी सांगितलेल्या केस चा पूर्वार्ध
>> बातम्यांमध्ये आलेल्या माहितीनुसार असे आहे.
विन्स यांनी सरकारनी दिलेले वकील नाकारून स्वतः खटला लढवला. त्यात त्यांनी स्वतःचा बचाव लेखात दिल्याप्रमाणे केला. परंतु, “विन्स स्वतः डॉक्टर असल्यामुळे त्यांना मानसिक आजाराची (नैराश्य) सर्व लक्षणे माहित आहेत, त्यामुळे ते नैराश्याचा उत्तम अभिनय करीत आहेत”, असे मत डॉक्टर व ज्युरी या दोघांनी नोंदवले. ते ग्राह्य धरून कोर्टाने निर्णय दिलेला दिसतो.
बरेच गुन्हेगार शिक्षा सौम्य
बरेच गुन्हेगार शिक्षा सौम्य व्हावी म्हणून वेडेपणाचं सोंग करत असतात. इथे त्याबद्दल चांगली माहिती आहे.
https://www.bbc.com/future/article/20190521-malingering-when-criminals-f...'criminal%20malingering'%3F,-Share%20using%20Email&text=%E2%80%9CMalingering%E2%80%9D%20%E2%80%93%20faking%20a%20sickness,real%20illnesses%20from%20false%20ones.&text=They%20called%20him%20%E2%80%9CThe%20Oddfather%E2%80%9D.
खोटं वेड पांघरल्याची उदाहरणं बायबलमध्ये सुद्धा आहेत.
Pages