खुनी डॉक्टर व तारणहार आडनावबंधू

Submitted by कुमार१ on 20 April, 2022 - 05:51

अमेरिकेच्या नॉर्थ करोलीना राज्यातील एका गावात घडलेली ही सत्य घटना.

डॉक्टर बेंजामिन गिल्मर यांनी वैद्यकीय अभ्यासक्रम संपवून नुकतीच पदवी प्राप्त केली होती. आता त्यांची ग्रामीण भागातील एका दवाखान्यात वैद्यकीय अधिकारी म्हणून नेमणूक झाली. डॉक्टरांनी त्यांचे शिक्षण कर्ज काढून घेतलेले होते. आताच्या नोकरीवर रुजू झाल्यानंतर त्या कर्जाची परतफेड करण्यास ते उत्सुक होते. मोठ्या उत्साहात ते संबंधित दवाखान्यात जाण्यास निघाले. तिथे पोचल्यानंतर त्यांना आश्चर्याचा धक्का बसला कारण दवाखाना गेली चार वर्षे बंद केलेला होता. अधिक चौकशी करता त्यांना मिळालेली माहिती अजूनच थरारक व धक्कादायक होती.

चार वर्षांपूर्वी तो दवाखाना कोणी एक विन्स गिल्मर नावाचे डॉक्टर चालवत होते. सन २००४मध्ये त्यांनी चक्क स्वतःच्या वडिलांचा खून केल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा सिद्ध झाला. त्यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आणि आता ते ती भोगत होते. या घटनेनंतर सदर दवाखाना बंद होता. हे सर्व ऐकल्यावर डॉक्टर बेंजामिन पुरते चक्रावून गेले. आपलाच एक आडनावबंधू इतके क्रूर कृत्य कसा काय करू शकला या विचाराने त्यांना अस्वस्थ केले.

ते नोकरीत रुजू झाले आणि त्यांचे दैनंदिन कामकाज सुरू झाले. दवाखाना सुरू झाल्याची बातमी पंचक्रोशीत पसरली आणि लवकरच तेथे रुग्णांची गर्दी होऊ लागली. चार वर्षांपूर्वीची ती घटनाच भीषण असल्याने त्याचा गावात बराच बोलबाला झाला होता. आता डॉ. बेंजामिनकडे येणारे रुग्णही त्यांना आपण होऊन जुन्या डॉक्टरांच्याबद्दल बरच काही सांगू लागले. त्यांचे ते किस्से ऐकल्यावर बेंजामिनना अजूनच आश्चर्याचे धक्के बसले. विन्स हे अगदी दयाळू, प्रेमळ व उदार मनाचे होते. दवाखान्यात मन लावून झटून काम करण्याचा त्यांचा स्वभाव. रात्री-अपरात्री ते तपासणीसाठी रुग्णांच्या घरीदेखील जात. काही गरीब शेतकरी रुग्णांकडे डॉक्टरांची फी द्यायला पैसे नसायचे. तरीसुद्धा डॉक्टर त्यांच्यावर उपचार करीत आणि अशा लोकांनी प्रेमाने दिलेला शेतावरचा वानवळा फी-स्वरूप स्वीकारत. मग असा दयाळू वृत्तीचा माणूस खुनी का झाला असावा, या प्रश्नाने बेंजामिन यांच्या डोक्यात थैमान घातले. ते त्यांना स्वस्थ बसू देईना. मग त्यांनी हे संपूर्ण प्रकरण खणून काढायचे ठरवले.
अधिक चौकशी करता त्यांना त्या गुन्ह्याची साद्यंत हकिकत समजली. त्याचा घटनाक्रम असा होता :

डॉक्टर विन्स यांनी त्यांच्या म्हाताऱ्या दुबळ्या झालेल्या वडिलांचा दोरीने गळा आवळून खून केला. एवढेच नाही तर त्यांनी त्या प्रेताची सर्व बोटे तोडली. नंतर ते प्रेत लांबवर नेऊन पुरून टाकले. या नीच कृत्यानंतर जसे काही घडलेच नाही अशा थाटात ते दवाखान्यात येऊन रोजचे काम करू लागले. पण अखेर खुनाला वाचा फुटली. परिणामी विन्सना पोलिसांनी अटक केली. त्यांचे वडील सिझोफ्रेनियाने ग्रस्त होते. नुकतेच त्यांना मानसोपचार निवासी केंद्रातून विन्सबरोबर घरी पाठवले होते. स्वतः डॉ. विन्स यांनाही नैराश्याने ग्रासलेले होते आणि त्यासाठी ते योग्य ती औषधे घेत होते. मात्र खुनाच्या घटनेच्या एक आठवड्यापूर्वी त्यांनी ती औषधे बंद केली होती. अशा कृतीचाही रुग्णावर दुष्परिणाम होतो. विन्स यांनाही आपल्या डोक्यात काहीतरी गडबड झाल्याचे जाणवू लागले आणि त्यांनी तसे त्यांच्या मित्रांना कळवले होते. तसेच या घटनेच्या सहा महिन्यांपूर्वी विन्सना एक कार अपघातही झाला होता. त्या अपघातात काही वेळापुरती
त्यांची शुद्ध हरपली होती.

पुढे विन्स यांच्याविरुद्ध खटला चालू झाला. त्यांनी वडिलांच्या खुनाची कबुली दिली. परंतु त्याचबरोबर आपण नैराश्याचे रुग्ण आहोत हा दावा केला. त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते. पण त्यासाठी ते साक्षीपुरावे काही सादर करू शकले नाहीत. पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध खुनाचे भरभक्कम पुरावे गोळा केले होतेच. आता न्यायालयापुढे हा प्रश्न होता, की त्यांनी ते कृत्य मानसिक रोगाच्या झटक्यात केले की काय ?
मग विन्सची मनोविकार तज्ञांकडून तपासणी झाली. तज्ञांच्या मते विन्स चक्क खोटारडेपणा करीत होते व त्यांची मनोवस्था ठीक होती.

एकंदरीत दोन्ही बाजूंचा विचार करून न्यायालयाने विन्सना जाणूनबुजून केलेल्या खुनाच्या कृत्यासाठी दोषी ठरवले आणि मरेपर्यंत कारावासाचीची शिक्षा सुनावली. तसेच या शिक्षेदरम्यान पॅरोलचा पर्याय ठेवला नाही. या आदेशानुसार त्यांची रवानगी व्हर्जिनियातील तुरुंगात झाली.

हा सर्व तपशील बेंजामीननी बारकाईने अभ्यासला. एकीकडे दवाखान्यातील जुने रुग्ण विन्स यांची भला माणूस म्हणून प्रशंसा करीत होते तर दुसरीकडे त्याच डॉक्टरनी केलेले हे भयानक कृत्य जगासमोर होते. यावर विचार करून बेंजामिन यांची मती गुंग झाली. परंतु एक प्रश्न राहून राहून त्यांचे डोके पोखरत होता. विन्स यांचे नैराश्य व त्यावरील उपचार आणि उपचार बंद केल्याचे परिणाम हे मुद्दे तर महत्त्वाचे होतेच. पण त्याच्या जोडीला विन्सना अन्य काही मेंदूविकार तर नसावा ना, अशी शंका त्यांना येऊ लागली.

दरम्यान अमेरिकी रेडिओवरील एका कार्यक्रमाचे निर्माते आणि पत्रकार या विन्स प्रकरणावर एक कार्यक्रम तयार करणार होते. त्यासाठी त्यांनी बेंजामिनना मुलाखतीसाठी विचारले. पण बेंजामिननी घाबरून नकार दिला. पण कालांतराने त्यांनी विचार बदलला आणि आपला होकार कळवला. त्यासाठीची पहिली पायरी होती ती म्हणजे विन्सची तुरुंगात प्रत्यक्ष भेट घेणे. मग बेंजामिननी विन्सना रीतसर पत्र लिहून परवानगी मागितली. ती मिळाली.

मग एके दिवशी ही डॉक्टर पत्रकार जोडी त्यांना भेटायला गेली. त्यांना पाहता क्षणी बेंजामिनना विलक्षण आश्चर्य वाटले. जेमतेम पन्नाशीचे असलेले विन्स आता अगदी जख्ख म्हातारे दिसत होते आणि पिंजऱ्यात बंद केलेल्या एखाद्या जनावरासारखी त्यांची अवस्था होती. हे पाहता बेंजामिनना मनापासून वाटले की या माणसाला नक्की काहीतरी मोठा आजार झालेला आहे. मग त्यांनी दुसऱ्या भेटीची वेळ ठरवली. यावेळेस त्यांनी बरोबर एका मनोविकारतज्ञांना नेले. त्यांनी बारकाईने निरीक्षण केल्यावर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात आली. विन्स चालताना आपले पाय जमिनीवर अक्षरशः फरफटत नेत होते (shuffling gait). या निरीक्षणावरून त्या डॉक्टरांनी Huntington disease (HD) या मेंदूविकाराची शक्यता व्यक्त केली. पण हे निदान करण्यासाठी काही महत्त्वाच्या तपासण्या करणे आवश्यक होते, जे तुरुंगात शक्य झाले नसते. अशा तऱ्हेने ही भेट निष्कर्षाविना संपली.

दरम्यान या प्रकरणाला एक कलाटणी मिळाली. तुरुंगात असताना विन्सनी तिथल्या अधिकाऱ्यांना, "आपण आत्महत्या करू" अशी वारंवार धमकी दिली. परिणामी त्यांना एका मनोरुग्णालयात हलवण्यात आले. तिथे त्यांच्या रीतसर तपासण्या झाल्या. त्यापैकी एक विशिष्ट जनुकीय चाचणी होती. या तपासण्यावरून HD चे निदान झाले. या जनुकीय आजारात मेंदूच्या काही महत्त्वाच्या पेशींचा वेगाने नाश होत राहतो. त्यामुळे रुग्णाच्या मेंदूकार्यात बिघाड होतो. त्याच्या वागण्यात अजब बदल होऊ लागतात आणि त्याची चालही बिघडते. टप्प्याटप्प्याने आजाराची तीव्रता वाढतच राहते. त्यातून रुग्णाला पंगुत्व येते. आजाराची सुरवात झाल्यानंतर सरासरी वीस वर्षांनी अशा रुग्णांचा मृत्यू होतो.

download.jpeg

विन्सच्या आजाराची बातमी त्यांना सांगण्यात आली. ती ऐकल्यावर त्यांना हायसे वाटले. " चला, आपल्याला काय झालय ते तरी समजले !" असे ते आनंदाने उद्गारले. रुग्णालयाच्या डॉक्टरांनी त्यांच्यावर पूर्वीचेच नैराश्यविरोधी उपचार सुरू केले. त्यातून ते थोडेफार सुधारले. अर्थातच पुन्हा त्यांची रवानगी तुरुंगात झाली. इथे त्यांना आपले उरलेसुरले आयुष्य काढायचे होते.

इथपर्यंतच्या या हकीकतीवर आधारित एक कार्यक्रम वर उल्लेखिलेल्या पत्रकारांनी तयार केला. 2013 मध्ये त्या कार्यक्रमाचे प्रसारण झाले. तिकडे बेंजामीन मात्र आतून अस्वस्थ होते. विन्सना संपूर्ण आयुष्य तुरुंगात काढायचे होते आणि तिथे त्यांना नीट औषधोपचार मिळतील की नाही याची बेंजामिनना काळजी वाटली. नीट उपचारांअभावी ते असेच सडून मरू नयेत ही त्यांची इच्छा होती. विन्सच्या आजाराचे कारण पुढे करून त्यांची तुरुंगातून सुटका होऊ शकते का, यावर बेंजामीन गांभीर्याने विचार करू लागले.

विन्स घटनेवर आधारित रेडिओ कार्यक्रमामुळे संबंधित माहिती सर्वदूर पसरली. ती ऐकून अनेक स्वयंसेवक याप्रकरणी मोफत कायदेशीर सल्ला व मदत करण्यास तयार झाले. अशा लोकांनी एक समिती स्थापन केली. समितीच्या मते हा खटला विन्सच्या आजाराच्या पार्श्वभूमीवर नव्याने लढवण्याची गरज होती. तसे झाल्यास न्यायाधीश विन्सना तुरुंगातून मुक्त करून एखाद्या निवासी मनोशुश्रुषा केंद्रात स्थलांतराची परवानगी देण्याची शक्यता होती. परंतु यावर विचारविनिमय करता समितीला त्यातील अडचणी लक्षात आल्या. खटला पुन्हा नव्याने चालवायचा झाल्यास तो दीर्घकाळ चालेल. विन्सना त्याचा मानसिक ताण कितपत सहन होईल अशी शंका समितीला वाटली. म्हणून तो बेत रद्द करण्यात आला. त्याऐवजी संबंधित राज्यपालांकडे दयेचा अर्ज (clemency) करून पाहण्याचे ठरले.
तो अर्ज दाखल झाला. राज्यपालांनी त्यावर विचार करण्यास बराच वेळ घेतला आणि 2017 मध्ये त्यांची कारकीर्द संपताना अर्ज नामंजूर केला. पुढे नवे राज्यपाल पदावर रुजू झाले. ते स्वतः मेंदूविकार तज्ञ आहेत. समितीने अर्ज नव्याने त्यांच्यापुढे ठेवला. या महोदयांनी सुद्धा चार वर्षे वेळ घेऊन 2021 मध्ये अर्ज नामंजूर केला. आता समितीवर हताश होण्याची पाळी आली होती. त्यांच्या कष्टांबरोबरच त्यांनी आतापर्यंत केलेल्या काही लाख डॉलर्सचा खर्च पाण्यात गेल्यासारखा होता !

दरम्यान बेंजामिन विन्सना तुरुंगात नियमित भेटत आणि धीर देत होते. एव्हाना त्या दोघांमध्ये मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाले. बेंजामिनना हा माणूस मुळात शांत व मवाळ प्रवृत्तीचा आहे असे अगदी आतून वाटू लागले. या प्रकरणामध्ये बेंजामिन भावनिकदृष्ट्या खूपच गुंतले होते. त्यांनी आतापर्यंत झालेल्या त्या सर्व घटनांचा आढावा घेणारे एक पुस्तक लिहिले. पुस्तकाच्या शेवटी मात्र त्यांनी आपण राज्यपालांच्या निर्णयामुळे खूप व्यथित झालो असल्याचे लिहिले. इथून पुढे तरी मनोरुग्णांच्या हातून घडणाऱ्या हिंसक कृत्यांबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार व्हावा अशी आशा त्यांनी व्यक्त केली. आता त्या पुस्तकाच्या प्रकाशनपूर्व प्रती संबंधित राज्यपालांच्या कार्यालयात देखील वाटण्यात आल्या. एवढे करून बेंजामिन स्वस्थ बसले.

9780593355169.jpeg

दरम्यान 2022 उजाडले आणि 12 जानेवारी रोजी कुणाच्या ध्यानीमनी नसताना अचानक एक आश्चर्य घडले. डॉक्टर असलेल्या राज्यपालांनी विचारांती त्यांचा पूर्वीचा निर्णय फिरवून विन्सना दयायाचना मंजूर केली ! त्यानुसार विन्सचा तुरुंगातून सुटकेचा मार्ग मोकळा झालेला आहे. पण अद्याप ते तुरुंगातच आहेत. समिती त्यांच्यासाठी योग्य त्या निवासी केंद्राच्या शोधात आहे. मध्यंतरीच्या कोविडपर्वामुळे अशा अनेक केंद्रांमध्ये पुरेशा रुग्णखाटा आणि काळजीवाहू लोकांचा तुटवडा निर्माण झालेला आहे.

डॉक्टर बेंजामिन कधीतरी मनाशी विचार करतात, की या सर्व प्रकरणात आपण काय गमावले आणि काय कमावले ? त्यांच्या वैयक्तिक कारकीर्दीची सुरुवात मोठ्या उत्साहात झाली होती. त्यांनी आपले नियमित काम सांभाळून ही जी दगदग केली ती 'लष्कराच्या भाकरी' प्रकारात मोडणारी होती. त्यात गुंतवून घेतल्याने त्यांच्या व्यक्तिगत अर्थिक विकास आणि कुटुंबसौख्यावर दुष्परिणाम झाला. (किंबहुना त्यांच्या पत्नीने याबद्दल तक्रारही केली होती). हे झाले गमावलेले पारडे. पण ते जेव्हा कमावलेले पारडे बघतात तेव्हा त्यांना विलक्षण आत्मिक आनंद मिळतो. डॉ.विन्स गिल्मर जेव्हा तुरुंगातून खरोखर बाहेर येऊन एखाद्या निवासी मानसोपचार केंद्रात स्थिरावतील तेव्हा बेंजामिनना होणारा आनंद कल्पनातीत असेल.
…………

आता थोडा वैद्यकीय काथ्याकूट.
या प्रकरणातून वैद्यकीय तज्ञांपुढे काही प्रश्न उभे राहिलेत आणि त्या संदर्भात मतांतरे व्यक्त झाली आहेत.
१. एखाद्या रुग्णास निव्वळ HD आजार असेल तर तो इतका हिंसक होऊ शकतो का ? इथे दुमत आहे.

२. डॉ.विन्सच्या बाबतीत दोन शक्यता राहतात. विशिष्ट प्रकारची नैराश्यविरोधी औषधे चालू असताना देखील काही रुग्ण हिंसक होऊ शकतात. पण त्याहीपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे, ही औषधे जर रुग्णाने अचानक बंद केली तर तो हिंसक होण्याचे प्रमाण बरेच वाढते.
मुळातच जर ते समाजविघातक प्रवृत्तीचे असतील तर मग इथे आगीत तेल असल्यासारखे झाले असावे. एखादा माणूस वरवर जरी कनवाळू वाटला तरी त्याच्या मनाचा थांग लागणे अवघड असते. त्यांनी केलेल्या नीच कृत्याची तीव्रता पाहता आपल्या मनात संभ्रम निर्माण होतो.

३. HD हा त्यांचा आजार योगायोगाने लक्षात आलेला असू शकतो.
………
मनोरुग्णांनी केलेल्या खुनाबाबत कायद्याचा बघण्याचा दृष्टिकोन कसा वेगळा असतो हे जाणून घेण्यास उत्सुक. जाणकारांनी जरूर मत द्यावे.
(चित्रे जालावरून साभार)

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

... त्यांनी वडिलांवर असा आरोप केला की ते अनेक वर्षे आपला लैंगिक छळ करीत होते...

ह्यात काही तथ्य असेल तर प्रकरण भयंकर आहे.

+१. खरंय

विन्सनी न्यायालयात असे सांगितले:
वडिलांनी अनेक वर्ष आपला लैंगिक छळ केला. वडिलांना नुकतेच मानसोपचार निवासी केंद्रातून घरी सोडले होते.विन्स त्यांना स्वतःच्या ट्रकने घेऊन जात होते त्या ट्रकमध्येही त्यांनी आपल्यावर "बलात्कार" केला.
बहुधा या ताज्या प्रसंगामुळे ते अति हिंसक झाले असावेत.
.

धन्यवाद Dr
>>>>तथ्य असेल तर प्रकरण भयंकर आहे.>>>+123

किती गहन, भयानक असतात मनोविकारात मनाचे खेळ. मनाचे आरोग्य कसे राखावे यावर उद्बोधन व्हायला हवे. आपल्याकडे तर मनोविकार हा खूप दुर्लक्षित आजार आहे. एखाद्याला काही मामुली लक्षणं दिसली आणि चल म्हटलं मनोविकार तज्ञाकडं तर तो म्हणतो मला काही झालं नाही . लोकही वेडात एखादे वाईट कृत्य झाले तर त्याला माफ करायला तयार नसतात. प्रसार माध्यमंही त्याला विकृत ठरवून मोकळी होतात. खरं अशा माणसाला औषधोपचार व्हायला हवेत.

*किती गहन, भयानक असतात मनोविकारात मनाचे खेळ. >>>+१११. समजून घेणे खूप महत्वाचे आहे.
.....
.*मानसोपचार केंद्रात राहिले काय आणि तुरुंगात राहिले काय, (तुरुंगात औषधे मिळत असतील असे समजून) तांत्रिकदृष्ट्या सारखेच आहे ना?
>>>>
यासंदर्भात मी एका मेंदूविकार तज्ञांशी ऑनलाइन संपर्क साधला. त्यांनी एका जवळच्या HDरुग्णाची दीर्घकाळ सेवा केली होती. शेवटच्या टप्प्यात हे रुग्ण कसे होतात याचे वर्णन त्यांनी असे केले,
" त्यांची चाल बघवत नाही. वळवळणाऱ्या सापासारखे शरीर हलत असते. अवस्था इतकी दयनीय असते की हा शब्द सुद्धा सौम्य वाटावा. आपण कल्पनाही करू शकत नाही अशी ती विकलांगता असते. अशा रुग्णांची देखभाल करण्यासाठी विशेष HDप्रशिक्षित व्यक्तीच लागतात; सामान्य परिचारिका चालत नाही. रुग्णाला मनापासून समजून घेणे हा यातला खूप कठीण भाग असतो".
….
अशा स्थितीत तुरुंगातल्या रुग्णाची काय अवस्था होईल याची कल्पनाच केलेली बरी.

लेख तर आवडलाच पण डॉ. कुमार तुमचा वरचा प्रतिसाद वाचून फारच वाईट वाटले. मेंदुतले हे जे वेगवेगळे प्रकार आहेत त्यावर जगात किती संशोधन चालु आहे?

धन्यवाद.
संशोधन>>>>

चांगला प्रश्न. प्रगत देशांमध्ये यावर बऱ्यापैकी संशोधन होत असते. सध्या संशोधनातला महत्त्वाचा भाग म्हणजे, त्या आजाराचा जनुकीय पातळीवरील बिघाड निश्चित करणे. त्यामुळे हे संशोधन अर्थातच खर्चिक असते. विकसनशील देशांना मर्यादा येतात.

भारतातील संशोधनासंबंधी वीस वर्षांपूर्वी मी एक लेख इंग्लिश वृत्तपत्रात वाचला होता. त्यात त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला होता.
मेंदू विकारांच्या संशोधनासाठी (मृत्यूपश्चात) आजारी व्यक्तींच्या मेंदू बरोबरच निरोगी व्यक्तीचे मेंदू सुद्धा तुलनेसाठी आवश्यक असतात. त्यामुळे मृत्यूनंतर वैद्यकीय अभ्यासासाठी मेंदूदान या कल्पनेचा प्रसार होणे गरजेचे आहे.

त्या लेखातील माहितीनुसार भारतातील एकमेव मेंदूपेढी बंगलोरमध्ये होती. सध्याची कल्पना नाही.

छान लेख नेहमीप्रमाणे. गुंतागुंतीचे मनोव्यापार कळणे खरच अवघड.
प्रतिसाद ही छान .

कालच प्रसिध्द झालेला हा रिपोर्ट.
Antidepressants are not associated with improved quality of life in the long run, study finds.
Summary:
Over time, using antidepressants is not associated with significantly better health-related quality of life, compared to people with depression who do not take the drugs, according to a new study.

लेखात लिहिल्याप्रमाणे, वरील केसमध्ये मुळात तज्ञ डॉक्टरांचे पण एकमत नाही. एकंदरीत मनोविकार हा जितका गुंतागुंतीचा प्रकार आहे, तितकीच गुंतागुंत त्यावरील उपचारातपण आहे. पण तरीही स्वतःच्या मताने, डॉक्टरच्या सल्ल्याशिवाय औषधे घेणे बंद करू नये, असे सांगावेसे वाटते.

<< अवस्था इतकी दयनीय असते की हा शब्द सुद्धा सौम्य वाटावा. >>
असा अनुभव इतर बऱ्याच रोग्यांबाबत येत असणार, याबद्दल शंका नाही.
माझी खरी काळजी आहे की औषधांमुळे उलट विपरीत परिणाम होतो का? म्हणून विचारले होते की मनोरुग्ण व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात का? हा प्रश्न अनुत्तरित राहिला आहे.

धन्यवाद.
* गुंतागुंतीचे मनोव्यापार कळणे खरच अवघड.>>> +११
………
.*मनोरुग्ण व्यक्तीला आयुष्यभर औषधे घ्यावी लागतात का? >>>

मानसिक आजारांचे अनेक प्रकार आहेत. त्यांच्या उपचारांसाठी औषधे आणि औषधाविना केले जाणारे मानसोपचार असे पर्याय वापरले जातात. प्रत्येक रुग्णाच्या आजाराची तीव्रता वेगळी असते. काहींमध्ये आजार नियंत्रणात येतो आणि दीर्घकाळ तब्येत चांगली राहते. परंतु काहीमध्ये बरं वाटल्यानंतरही आजार ठराविक काळाने उलटत राहतो.

या सगळ्यांचा विचार करून उपचार किती काळ घ्यायचे हे संबंधित डॉक्टर ठरवतात.
या प्रश्नाचे एकच एक असे उत्तर असणार नाही.

दुसरा एक मुद्दा लेख वाचताना जाणवला होता. तो असा कि एका राज्यपालांनी दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर, नंतर आलेल्या राज्यपालांकडे पुन्हा एकवार अर्ज करण्यात आला. तो फेटाळल्यानंतर त्याच राज्यपालांनी काही वर्षांनी पुनर्विचार करून तोच अर्ज मंजूर केला. असे करता येते का अमेरिकेत? कारण माझ्या माहितीनुसार आपल्याकडे एकदा राष्ट्रपतींनी दयेचा अर्ज फेटाळला कि विषय संपला. (कि परत अर्ज करता येतो?)

>>>>एखाद्याला काही मामुली लक्षणं दिसली आणि चल म्हटलं मनोविकार तज्ञाकडं तर तो म्हणतो मला काही झालं नाही>>>
+1. त्यामुळे मानसिक आजार लक्षात यायला वेळ जातो. अशा १-२ केसेस पाहण्यात आहेत

त्यांची चाल बघवत नाही. वळवळणाऱ्या सापासारखे शरीर हलत असते. अवस्था इतकी दयनीय असते की हा शब्द सुद्धा सौम्य वाटावा. आपण कल्पनाही करू शकत नाही अशी ती विकलांगता असते. अशा रुग्णांची देखभाल करण्यासाठी विशेष HDप्रशिक्षित व्यक्तीच लागतात; सामान्य परिचारिका चालत नाही. रुग्णाला मनापासून समजून घेणे हा यातला खूप कठीण भाग असतो>> जवळच्या नात्यात दोन व्यक्तींना Huntigton Disease झालेला पहिला आहे. इतकी वाईट अवस्था त्यापैकी कोणाचीही झाली नव्हती. त्याआधीच देवाज्ञा झाली. दोघांचेही मरतेसमयी वय ६० च्या आत-बाहेर होते.
योग्य औषधांनी बर्‍यापैकी नियंत्रणात असलेला Huntigton Disease चा रुग्णही पाहिला आहे.
रुग्णाला मनापासून समजून घेणे हे सर्वच मोठ्या आजारातील रुग्णांच्या बाबतीत लागू होते. खरंतर वृद्ध आणि विकलांग व्यक्तीना समजून घेणे हे भल्या भल्यांना जमत नाही.

त्याआधीच देवाज्ञा झाली. दोघांचेही मरतेसमयी वय ६० च्या आत-बाहेर होते.>>>>
या अनुषंगाने HDबद्दलची काही माहिती :

१.लक्षणे सुरुवात होण्याचे सरासरी वय 35 ते 44 च्या दरम्यान असते. अशांमध्ये साधारण मृत्युसमयी त्यांचे वय 51 ते 57 च्या दरम्यान पोचते.
२. मात्र वयाच्या बाबतीत वांशिक भेद बऱ्यापैकी आहेत

३. आजाराच्या एकूण पाच अवस्था आहेत. पाचव्या अवस्थेला पोहोचण्याआधीच मृत्यू झाल्यास रुग्णासाठी बरे राहते

४. बऱ्याच जणांमध्ये न्यूमोनिया आणि हृदयविकार होतात आणि त्यातून मृत्यू होतो

५.जगभरात HDचे प्रमाण बरंच कमी आहे. परंतु व्हेनेझुएलातले प्रमाण लक्षणीय आहे. तिथे दर एक लाख लोकसंख्येमागे 700 जणांना हा आजार होतो. इथल्या दहा पिढ्यामधल्या बाधित सुमारे वीस हजार लोकांची रितसर नोंद झालेली आहे.

मनोरूग्ण .. त्यांना सांभाळणारे.. ह्यांचे नियमित भेटणारे सपोर्ट ग्रुप्स असावेत असं मला नेहमी वाटतं. (अमेरिकेत ते असावेत.. किमान सिनिमे, सिरियल बघून तसं वाटतं).
नियमित भेटण्या बोलण्या मुळे रुग्ण आणी त्यांचे काळजीवाहक.. ह्या सगळ्यांनाच खूप आधार मिळू शकतो.
अन्यथा प्रत्येक जण आपल्याच कोशात असतो आणी स्वत:ला एकटा समजतो.

*खात्रीशीर माहिती आंतरजालावर कुठे>>>
शोधून बघतो. मी दिलेली माहिती आमच्या वैद्यकीय नियतकालिकातून दिलेली आहे. तो संदर्भ इतरांसाठी नाही.
....
*अमेरिकेत ते असावेत >>>होय, काही फक्त HD च्या रुग्णांसाठीची केंद्रे आहेत

पत्नीला असलेल्या मानसिक आजारामुळे रुग्ण तसेच परिवारावर होणारे सामाजिक आणि कौटुंबिक परिणाम खूप जवळून पाहत आहे.
या अनुभवातून माझे काही ग्रह / अपग्रह झाले आहेत.
- जगातील प्रत्येक व्यक्ती हि काही ना काही मानसिक आजाराने ग्रस्त असते.
- व्यक्तीच्या आजाराकडे स्वभावदोष म्हणून दुर्लक्ष केले जाते.
- आजाराची तीव्रता व्यक्तिगणिक बदलते.
- कोणत्याही व्यक्तीची आपला स्वभावदोष हा मानसिक आजार आहे हे स्वीकारण्याची तयारी नसते.

आता लेखाला सुसंगत असे मत,
- प्रत्येक गुन्हेगार व्यक्ती ही त्याच्या आजाराच्या तीव्रतेनुसार गुन्हे करत असते. त्यामुळे सर्व तुरुंगात समुपदेशन आणि मानसिक उपचार सक्तीचे केले जावेत. गुन्ह्याच्या तीव्रतेनुसार समुपदेशन / उपचार सक्तीची तीव्रता वाढविली जावी.

* सर्व तुरुंगात समुपदेशन आणि गरजेनुसार मानसिक उपचार सक्तीचे केले जावेत >>> योग्य मुद्दा. ठळक केलेला शब्द माझा.
+११

>>>>>>जगातील प्रत्येक व्यक्ती हि काही ना काही मानसिक आजाराने ग्रस्त असते.
तसे नाही विविध स्वभाववैशिष्ट्ये असतात.
मेंदूचे मॉर्बिड बिहेव्हिअर हे आजूबाजूच्यांना, लक्षात येण्यासारखा त्रास देते. रोजच्या जीवनात ढवळाढवळ करते. त्याला मानसिक रोग म्हणता येइल.

मानसिक आजाराचे मुख्य दोन प्रकार असतात

न्यूरोटीक - सौम्य
सायकोटिक - तीव्र

आता यातील फरक

1. न्यूरोटीक लोक बोलत असतात की मला अमुक तमुक भीती , ताण , इ झाले आहे , इतर लोक बोलतात , तुला कुठे काय झाले आहे? ( ईसीजी वगैरे सगळे रिपोर्ट नॉर्मल आहेत!)

सायकोटिक लोकाना इतर लोक बोलत असतात , तुला काहीतरी झाले आहे. पण स्वतः रुग्ण बोलतो, मला कुठे काय झाले आहे ? ( तुम्हीच एबनॉर्मल आहात.)

2. मेंटल हॉस्पिटलात रहातात ते सायकोटिक असतात , आणि ते वगळता जगातील इतर सर्व लोक न्यूरोटीक असतात . Proud

3. न्यूरोटीक लोक हवेत महाल बांधतात
सायकोटिक लोक हवेत महाल बांधतात व त्यात रहायलासुद्धा जातात
आणि सायकीयाट्रिस्ट दोघांच्याकडून भाडे वसूल करतात.

Proud

सा मो +१
BC ,छान स्पष्टीकरण !
....
लेखात थोडी भर:

बेंजामिननी विन्स यांचे कायदेशीर पालकत्व मिळावे यासाठी अर्ज दाखल केलेला आहे.

जी लोक भयंकर ,अती प्रचंड हट्टी असतात.त्यांच्या मनाविरुद्ध घडले की त्यांच्या मनावरील ताण भयंकर वाढतो.
आणि ही लोक एक तर खूप आक्रमक होतात किंवा खूप भावना वीवेश होतात आणि विवेकी वागणं सोडून देतात .
ह्यांना कोणी मानसिक आजारी समजत नाही नाटकी समजतात.
ह्यांच्या मनासारखे जो पर्यंत घडतं असते तो पर्यंत ही लोक नॉर्मल असतात.
अशा लोकांना मानसिक रुग्णाच्या यादीत बसवून ह्यांनी केलेल्या गुन्ह्यात शिक्षा पण दिली नाही तर .
हा आजार जागतिक पातळीवर संसर्ग जन्य रोगासारखा पोचेल.
शास्त्रीय निदान ह्या लोकांबद्दल पण मानसिक रोगाचीच निघतील.
शेवटी माणूस विवेक सोडून वर्तन करतो तेव्हा मेंदूत एक ठराविक रासायनिक घडामोडी च घडतं असाव्यात .
अशी शंका

चांगली चर्चा सर्वांना धन्यवाद
*" ....वर्तन करतो तेव्हा मेंदूत एक ठराविक रासायनिक घडामोडी च घडतं असाव्यात अशी शंका
>>>>
रासायनिक घडामोडी हे एक कारण आहे. विविध मनोविकारांची अनेक प्रकारची कारणे आहेत. अगदी थोडक्यात सांगायचे झाल्यास ती या प्रकारची असतात :

*जनुकीय उत्परिवर्तन / बिघाड
* जडणघडण होत असताना सभोवतालच्या घटकांचा परिणाम

*मेंदूतील रचनात्मक फरक
चेतातंतूंशी संबंधित रसायनांचा असमतोल

*हॉर्मोन्सचा असमतोल
*ताण तणाव वाढवणाऱ्या जीवनातील घटना

*शरीरात जाणारी विविध रसायने

मंद बुद्धी मुला. जन्माला येणे हा जन्मजात मानसिक विकार आहे का?
माझ्या गावात जवळ जवळ एकच वयाची अशी तीन मुल होती
त्यांची शारीरिक वाढ बरोबर होत होती
सतत खाणे ही वृत्ती.
ह्या व्यतिरिक्त कोणत्याच चांगल्या,वाईट भावना दिसून आल्या नाहीत.
म्हणजे मेंदू फक्त शरीर कार्य चालावे इतकेच मर्यादित काम करत असावा
जास्त दिवस जगली नाहीत ती.
दहा , बारा वर्ष पर्यंत च जगली असतील.
हा पण मानसिक विकार च का? की दुसरे काही.

Pages