प्रवेशिका - २६ ( shyamali - थांबलो आहे खरा... )

Submitted by kaaryashaaLaa on 8 October, 2008 - 00:04

थांबलो आहे खरा पण घेतली माघार नाही
वाकलो आहे जरासा जाहलो लाचार नाही

काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही

काय प्रश्नाचीच येथे चालते बेबंद सत्ता?
उत्तरे मिरवील ऐसा एकही दरबार नाही?

बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही

टेकवूनी लाख डोकी, पाय झाले जीर्ण पुरते;
आणि म्हणती, "सावळ्याला भावनेचा भार नाही!"

नित्यनेमे रोज दारी पालखी ये आठवांची
प्रेमभावे वंदितो मी, सोडला व्यवहार नाही

वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

"काय सांगू, बोलताना तोल जातोही अताशा
आणि मौनाचा कधी मी घेतला आधार नाही"...
यामधील "आणि" संपुर्ण ओळीच्या अर्थाच्या दृष्टीने किंचीत खटकला.

"बास आता फार झाले, वाट बघणे जीवनाची
मांडली माझी कथा मी, नोंदली तक्रार नाही"
यातील "बास आता फार झाले" ही ओळ तक्रारीकडे झुकत आहे असे वाटते, जे पुढील ओळीशी विसंगत आहे.

पण वरील बाबी फारच लहान गोष्टी आहेत. त्यामुळे संपुर्ण गजलेला माझ्याकडून ८.
आणि "वादळाला सवय झाली सोबतीने चालण्याची
ते मुळी सोशीक आणिक; त्रास माझा फार नाही" या ओळीला १० द्यावेसे वाटताएत!

Pages