स्त्री

Submitted by maheshkumar on 12 March, 2022 - 04:16

स्त्री
भावबंध रक्तबंध बंध रेशमातले
मूळरूप स्त्री स्वरूप या युगात पातले

तूच लेऊनी अनेक रूप भावदर्पणी
तू करांगुली जगास श्रेष्ठ तू समर्पणी
स्वामिनी तुझ्यामुळेच श्वास जीवनातले

माय कन्यका बहीण तीन भाव साजिरे
काळजात स्थान विश्र्वमोहिनीस गोजिरे
स्फूर्तिदायिनी प्रचंड गूढ तूच यातले

ब्रह्मदेव शोधतोय जे मनी तुझ्या वसे
आजही तयास हेच लागले पिसे असे
बापुडा मला न हे कळे तुझ्या मनातले

दोन पावलात चंद्रलोक पावलीस तू
अर्धपावली नभात झेप घेतलीस तू
वाटतेस, ते, जगास जे तुझ्या सुखातले

दुःख आत आतले सुहास्य आननावरी
जानकी धरेत लुप्त, तृप्त काननावरी
हूं करोनी मार दैत्य चंड मुंड मातले

पूर्ण तू अपूर्णता तुला न स्पर्शते कधी
संस्कृती सलज्जता सुशील तू विनम्र धी
दैन्य जाळण्यास घेई तेज तू स्वतःतले

© भरारी महेश नरहर कुलकर्णी
८ मार्च २०२२
जागतिक महिलादिन

Group content visibility: 
Public - accessible to all site users