विज्ञानाची ऐशीतैशी

Submitted by जिज्ञासा on 28 February, 2022 - 09:46

आज विज्ञान दिन. जेव्हापासून जॉर्ज मॉनबियोंचे The Invisible Ideology हे भाषण ऐकले आहे तेव्हापासून भांडवलवाद, नवउदारमतवाद, आणि उपभोक्तावाद यांचा आणि विज्ञानाचा कसा परस्पर संबंध आहे हे उलगडून बघण्याचा छंद लागला आहे. यामधून काही नव्या जाणिवा झाल्या त्यातील दोन ठळक जाणिवा या लेखात मांडणार आहे. शीर्षक “विज्ञानाची ऐशीतैशी” असे देण्याचे कारण या दोन्ही जाणिवांनी मला विज्ञानाच्या आकलनात घडणाऱ्या वा घडविल्या जाणाऱ्या चुका किती महाग पडू शकतात हे लक्षात आलं.
खरंतर विज्ञान दिनाचे औचित्य साधण्याचा इरादा नव्हता. त्यामुळे लेख थोडा कच्चा पक्का असेल. पण त्यामुळेच केवळ मुद्द्याच्या दोन गोष्टी मांडून एक आटोपशीर छोटेखानी लेख होईल. बाकी मग या दोन जाणिवांच्या आधारे तुम्ही देखील आजचे आपले आयुष्य हे “वैज्ञानिक” विचारांवर आधारित आहे का? याचा विचार करू शकता. यावर काही प्रतिवाद असतील तर वाचायला नक्की आवडतील!

जाणीव १: स्वास्थ्य (health) म्हणजे काय?
कोरोनामुळे प्रतिकारशक्ती (immunity) हा शब्द अधिक ओळखीचा झाला असला तरी त्याहून महत्त्वाचा शब्द हा स्वास्थ्य आहे. गेल्या दोन शतकांत वैद्यकीय क्षेत्रात कमालीची प्रगती झाली आहे आणि त्याने आपल्या सर्वांचे अनारोग्याचे प्रश्न सुटण्यास मोठी मदत झाली आहे यात शंकाच नाही. पण या साऱ्यात आपले मानवी स्वास्थ्याकडे मात्र दुर्लक्ष झाले आहे. हे विरोधाभासी विधान वाटेल पण हे खरे आहे. काही दिवसांपूर्वी एक असाच कुठलातरी व्हिडीओ पाहत असताना पुढील वाक्य ऐकलं आणि ती माझ्यासाठी युरेका मोमेन्ट ठरली. Today’s healthcare industry is actually a “disease”care industry. खरंच की! रुग्ण, स्पेशालिटी, सुपर स्पेशालिटी रुग्णालये यांची वाढती संख्या आणि डॉक्टर्स, औषधे यांची वाढती गरज हेच मुळात अनारोग्याचे लक्षण नव्हे का? डॉक्टर्स हे अनारोग्यासंबंधित सेवा पुरवतात. आपल्याला विज्ञान-संशोधनातून मानवी शरीर आणि मनाच्या आरोग्याविषयी इतके ज्ञान/माहिती उपलब्ध असताना आपले स्वास्थ्य हे दिवसेंदिवस ढासळत आहे कारण आपली स्वास्थ्य यंत्रणा ही प्रामुख्याने अनारोग्य व्यवस्थापन यंत्रणा आहे.
आज मला काहीही होत नाहीये आणि जर मला स्वास्थ्याविषयी काही माहिती हवी असेल तर मी कोणाकडे जायचे? एकूणच आपण आजारी पडू नये यासाठी काहीही वैज्ञानिक यंत्रणा अस्तित्वात नाही. शक्य असून अस्तित्वात नाही.
या सो कॉल्ड विज्ञानाच्या युगात आपण खरोखर विज्ञानाधिष्ठित आरोग्यपूर्ण जीवन जगतो का? असा प्रश्न मी जेव्हा विचारला तेव्हा मला नाही असे उत्तर मिळाले. अर्थात यात भांडवलशाही व्यवस्थेचा वाटा आहेच. त्यासाठी मी दोन उदाहरणे देईन. आजूबाजूला पाहिलंत तर अनेक उदाहरणे तुम्हाला देखील दिसायला लागतील.
उदाहरण १: साखरेचे मानवी शरीरावर होणारे दुष्परिणाम वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले असताना आणि साखरेचे व्यसन लागू शकते याची कल्पना असताना देखील ३२% साखर असणाऱ्या पावडरी या लहान मुलांसाठी “हेल्थ ड्रिंक” म्हणून जाहिरात करून विकल्या जातात आणि यात काही गैर आहे असे आपल्या स्वास्थ्य यंत्रणेला वाटत नाही.
उदाहरण २: माणसाच्या स्वास्थ्यासाठी चांगली झोप ही अत्यंत आवश्यक आहे हे सिद्ध झालेले असताना एका कंपनीचा सीईओ उघडपणे आमची स्पर्धा माणसांच्या झोपेशी आहे असे म्हणतो आणि यात काही गैर आहे असे कुणालाच वाटत नाही.
ही दोन उदाहरणं अशासाठी दिली की ही तशी रोजच्या जीवनातली आहेत आणि यांच्यावर आपले नियंत्रण असू शकते. इतर अनेक अनारोग्याचे धोके हे संपूर्णपणे आपल्या हातात नसतात - उदाहरणार्थ हवेचे प्रदूषण.
थोडक्यात काय तर स्वास्थ्याच्या बाबतीत आपण विज्ञानाचा दुरुपयोग करतो आहोत. आजारी पडू नये यावर भर देण्याऐवजी आपला सर्व भर हा आजारी पडल्यावर होणाऱ्या उपचारांवर राहिलेला आहे. ते ही महत्त्वाचे आहेच पण प्राधान्य हे नेहमीच आजारी न पडण्याला असायला हवे आणि आपला प्राधान्यक्रम साफ चुकलेला आहे.
स्वास्थ्यपूर्ण जगायचे असेल तर विज्ञानाचा कसा उपयोग व्हायला हवा? या प्रश्नाचे उत्तर मी गेले काही महिने शोधते आहे. त्याविषयी सविस्तर लिहिनच पण त्यातला एक महत्त्वाचा विचार मांडते. श्री. दिलीप कुलकर्णी यांच्या “वेगळ्या विकासाचे वाटाडे” नावाच्या पुस्तकात गांधीजींवर एक प्रकरण आहे. गांधीजी हे कमालीचे द्रष्टे होते. त्यांनी हे सांगितले होते की जर अपचन झाल्यावर होणाऱ्या त्रासावर गोळी घेता आली तर लोक सतत अपचन होणारे पदार्थ खातील आणि वरून गोळ्या घेतील. त्यांचे हे विधान किती सत्य झाले आहे हे वेगळे सांगायला नको. माझ्या ऐकीव माहितीनुसार गांधीजींचा असा विचार होता की कृषी आणि स्वास्थ्य यांचे एकच सरकारी खाते असले पाहिजे कारण पोषक आहार आणि विहार ही स्वास्थ्याची गुरुकिल्ली आहे. आपण जर आहाराच्या आणि विहाराच्या चांगल्या सवयी अंगी बाणवू शकलो तर आपले आयुष्य अधिक स्वस्थ होईल. आता हे खरंतर शाळेतल्या पोराला सुद्धा माहिती असेल पण तरीही रोजचे चित्र याच्या बरोब्बर विपरीत आहे!
"Health is a state of complete physical, mental and social well-being and not merely the absence of disease or infirmity." ही WHO ने केलेली स्वास्थ्याची (Health) व्याख्या बऱ्यापैकी व्यापक आहे. पण मला इथे अजून एक व्याख्या मांडावीशी वाटते. चिनूक्सची “अन्नम् वै प्राणाः” ही लेखमालिका आपल्यापैकी अनेकांनी वाचली असेल. त्या संस्कृत वचनाचा अर्थच मुळी “अन्न आपले प्राण आहेत” असा होतो. वेदांमध्ये “अन्न” या शब्दाची व्यापक व्याख्या केली आहे. वेदांच्या अनुसार केवळ उदरभरणासाठी जे ग्रहण करतो तेवढेच “अन्न” न म्हणता ज्या सर्व गोष्टींनी शरीराचे व मनाचे पोषण घडते त्या सर्व गोष्टींना “अन्न” असे संबोधिले आहे. कारण आपण जे खातो, पितो त्याच्या जोडीला जे पाहतो, ऐकतो, वाचतो, अनुभवतो ते सारे अन्न आहे आणि त्याने आपले पोषण होत असते. आजच्या विज्ञानदिनी ही स्वास्थ्याची व्याख्या आपल्याला कशी आचरणात आणता येईल याचा विचार नक्की करूया.

जाणीव २: स्मार्ट कशाला म्हणायचं?
तंत्रज्ञान (technology) हे विज्ञानाचे उपयोजन (application) आहे. पण शाश्वततेच्या दृष्टीने जेव्हा मी आपल्या गेल्या दोन शतकांमधल्या तंत्रज्ञानाच्या प्रगतीकडे बघायला लागले तेव्हा मला एका गोष्टीची प्रकर्षाने जाणीव झाली ती म्हणजे आपण तंत्रज्ञानात प्रगती निश्चितच केली आहे पण ती तितकीशी स्मार्ट आहे का? स्मार्ट हा आजकालचा परवलीचा शब्द आहे. पण healthcare या शब्दाप्रमाणे स्मार्ट या शब्दाचा देखील विपर्यास होतो आहे असे मला जाणवले.
बिरबलाच्या गोष्टीत भाकरी का करपली?, घोडा का अडला? अशा सर्व प्रश्नांचे एकच उत्तर असते की न फिरवल्यामुळे. तसे कोणतेही तंत्रज्ञान घ्या, त्यात प्रगती का झाली? याचे मुख्य उत्तर/कारण हे आहे की ऊर्जेची उपलब्धता! सर्व उपकरणे चालवण्यासाठी ऊर्जा लागते हा मूलभूत नियम आहे. माणसाला लागलेला खनिज तेलाच्या वापराचा शोध हा तंत्रज्ञानातील सर्व प्रगतीच्या मुळाशी आहे. पृथ्वीवरून खनिज तेल नाहीसे करा आणि मग माणसाची प्रगती कशी अडते ते बघा. खरंतर खनिज तेल मर्यादित प्रमाणात उपलब्ध आहे त्यामुळे त्याचा कमीत कमी वापर झाला तर ते अधिक शहाणपणाचं ठरेल. स्मार्ट ठरेल. पण आपली ऊर्जेची वाढती गरज काही वेगळंच दर्शवते. परवा मी बॅटरीवर चालणाऱ्या टूथब्रशची जाहिरात पाहीली. ऊर्जेच्या दृष्टीने पाहिलं तर साध्या लाकडी ब्रशपेक्षा याचा बनवण्याचा, वापरण्याचा, आणि विल्हेवाट लावण्याचा ऊर्जा खर्च कित्येक पटीने अधिक पण तरी तो ब्रश स्मार्ट! आता हे तंत्रज्ञान चांगलेच आहे -ज्यांना काही कारणाने ब्रश हातात नीट धरता येत नाही, बोटांच्या हालचालींवर मर्यादा आहेत अशांसाठी हा ब्रश फार उपयोगी आहे. पण असा ब्रश सर्वांसाठी मार्केट मध्ये विकायला आणणे वैज्ञानिक दृष्टिकोनातून खरंच स्मार्ट आहे का?
पु. लं. असामी असामी मध्ये म्हणतात की “कडक या शब्दाचा अर्थ बदलत जाऊन चांगला/मवाळ झालाय हे मला माहितीच नव्हतं” तसं स्मार्ट म्हणजे ऊर्जेच्या गणितात बावळट असा नवीन अर्थ रूढ होतोय का? पाणी गार करण्यासाठी माठ स्मार्ट की फ्रिज? घरात नैसर्गिकरित्या हवा आणि प्रकाश येणं स्मार्ट की एसी आणि ट्यूबच्या प्रकाशात काम करणं स्मार्ट?
खनिज तेल अमर्यादित नाही. त्याला काळं सोनं म्हणतात पण पृथ्वीवरचं सोनं हे रिन्यूएबल आहे, खनिज तेल एकदा वापरलं की संपलं! वैज्ञानिक दृष्टिकोनातून पाहिलं तर खनिज तेलाचा किंवा कोणत्याही ऊर्जा स्रोताचा एकूण वापर वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाला स्मार्ट म्हणण्याआधी त्याच्या ऊर्जेच्या वापराचा आणि फायद्यांचा जमाखर्च नीट मांडला पाहिजे. उदाहरणार्थ साध्या फोनपेक्षा स्मार्टफोन हा खरंच स्मार्ट आहे पण त्याच्या वापरातही ऊर्जावापराचा स्मार्टपणा दिसायला हवा. खनिज तेलाचं मोठं वैशिट्य हे की त्याची एंट्रॉपी कमी आहे. जर तंत्रज्ञान विकसित करताना ते केवळ खनिज तेलावर न चालता एका जास्ती एंट्रॉपी असलेल्या स्रोताशी सांगड घालता आली तर तसे तंत्रज्ञान अधिक स्मार्ट असेल. उदाहरणार्थ इलेकट्रीक सायकल ज्यात पेडल मारावे लागते पण बॅटरीमुळे कमी श्रमात जास्ती अंतर कापले जाते. आपल्याला शक्य तिथे खनिज तेलावरचे अवलंबित्व कमी केले पाहिजे.
याला जोडून एक अजून एक पटकन लक्षात न येणारी गोष्ट म्हणजे चलनी पैसा ही मानवी कल्पना आहे. तिचा प्रत्यक्ष, मर्यादित नैसर्गिक स्त्रोतांशी संबंध जोडताना फार काळजीपूर्वक जोडायला हवा. मध्यंतरी एअरपोर्टवरती भाड्याने घेतलेले गाळे ताब्यात राहावेत म्हणून लुफ्तान्झा कंपनी १८ हजार रिकाम्या विमान फेऱ्या करणार असल्याची बातमी वाचली. विमानतळावरची जमीन असा एक रिसोर्स जी नष्ट होणार नाहीये तो टिकावा म्हणून विमानाचे इंधन जे अत्यंत मर्यादित आणि बहुमूल्य आहे इतक्या मोठ्या प्रमाणावर वाया घालवावे आणि हा निर्णय सर्वांना मान्य असावा हा विज्ञानाचा पराभवच आहे! म्हणजे नुसते तंत्रज्ञान विकसित होऊन उपयोग नाही. ते वापरणारा स्मार्ट असला पाहिजे! या विज्ञानदिनी सुयोग्य (appropriate) तंत्रज्ञानाचा वापर करणे म्हणजे स्मार्ट अशी नवी व्याख्या आचरणात आणता येईल का ते बघूया!

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

लेख चांगला आहे.
काय खावे नि काय नाही याबद्दल लेख सतत प्रसिद्ध होत असतात, पण त्यावर विश्वास किती ठेवायचा हा प्रश्न पडतो, कारण बहुधा हे लेख कुठल्यातरी कंपनीने त्यांचे पदार्थ विकण्यासाठी लिहून घेतले असतात.
दुसरी गोष्ट, प्रत्येकाची तब्येत वेगळी. जे एकाला चांगले ते दुसर्‍याला काही कारणाने नाही - अ‍ॅलर्जी वगैरे मुळे.
तुम्ही म्हणता त्याप्रमाणे फक्त आजारी पडले तरच डॉक्टर काहीतरी करतात, पण आजारी पडू नये यासाठी सांगणारी अधिकृत यंत्रणा नाही. ते सर्वस्वी आई वडिलांवर अवलंबून.

जि, लेख सुरेख आहे. सहसा तुझ्या लेखातल्या लिंक्स मी वाचते/ऐकते. त्या ऐकल्यावर पुन्हा विकेंडला प्रतिक्रिया लिहीन.

लेख चांगला आहे.
रीड हेस्टिंगच्या झोपेशी स्पर्धा आहे वाक्याचा थोडा विपर्यास आणि बाकी काही उदाहरणात चेरी पिकिंग वाटलं थोडं.

<< आपण तंत्रज्ञानात प्रगती निश्चितच केली आहे पण ती तितकीशी स्मार्ट आहे का? >>
तुमच्या मते 'स्मार्ट'ची व्याख्या काय?

स्मार्ट म्हणजे ऊर्जेच्या गणितात बावळट असा नवीन अर्थ रूढ होतोय का? पाणी गार करण्यासाठी माठ स्मार्ट की फ्रिज? घरात नैसर्गिकरित्या हवा आणि प्रकाश येणं स्मार्ट की एसी आणि ट्यूबच्या प्रकाशात काम करणं स्मार्ट?
>>
Bang on!
मला तुझ्या सातत्याच ( च वर टिंब समजून घ्या, नाहीतर त्यावर धावून येतील काहीजण Wink कीबोर्ड काही झालं तरी ते स्वीकारत नाहीये, कार्ट सारखं - हे मानव pruthveekar करता.) कौतुक वाटत! (पुन्हा टिंब)

तुमचे मत एकदम योग्य आहे.
पण लोकांना एका ठराविक दिशेला प्रवास करण्यास भाग पाडण्यासाठी अनेक क्षेत्र सहभागी असतात..
देशाच्या अर्थ व्यवस्था ज्या ताकातीच्या आहेत ..त्या पेशा जास्त उलाढाल करणाऱ्या कंपन्या आहेत .त्यांनी मिळून स्वीट posion लोकांना दिले आहे.
भारताचा विचार केला तर जाहिरात करून करून लोकांच्या आहार च्या सवयी पूर्ण बदलून टाकली.
लोकांचं जीवन पद्धती बदलून टाकली.
बकवास अन्न लोकांच्या आहारात सहभागी झालेच उलट बकवास जीवन पद्धती पण
कशी मॉडर्न आहे हे लोकांच्या मनावर बिंबवले.
त्याचा परिणाम म्हणून असंख्य रोगांनी ग्रस्त एक पिढी च निर्माण झाली.
मग आरोग्य सुविधा ह्या नावा खाली लोक अजून कसे गंभीर आजारी पडतील आणि कायम स्वरुपी girahyak कसे बनतील असे डावपेच लावले.

Shane वॉर्न ह्यांच्या निधनाने खूप प्रश्न उभे राहतात.
आरोग्य म्हणजे नक्की काय,तंदुरुस्त शरीर म्हणजे नक्की काय
ह्याच्या आपल्या आताच्या आधुनिक व्याख्या च चुकीच्या आहेत असे वाटायला लागले आहे.
अनेक व्यायाम pattu चा पण असा कमी वयात हार्ट अटॅक नी मृत्यू झाल्याची अनेक उदाहरणे आहेत.

सर्वांचे आभार!

रीड हेस्टिंगच्या झोपेशी स्पर्धा आहे वाक्याचा थोडा विपर्यास >> जर हेस्टिंगला त्याच्या वाक्याचा काय वैज्ञानिक अर्थ होऊ शकतो याची नीट कल्पना दिली तर तो असले विधान करणार नाही. अपुऱ्या झोपेचा संबंध अनेक शारीरिक आणि मानसिक आजारांशी जोडला आहे असे संशोधन सांगते. विज्ञानाच्या बाबतीत आपण इतके सिलेक्टिव्ह रीडिंग करायला शिकलो आहोत की आपल्याला आपण कशाचा स्वीकार करतोय हेच समजतंय का याची मला नेहमी शंका येते.
For example, he will never say that we want to make you less immune to diseases by robbing you of your daily sleep. But this is exactly what is implied when he says “Sleep is our competition”.
चेरी पिकिंग आहे कारण तंत्रज्ञान सरसकट वाईट असे म्हणायचेच नाहीये. कुठला वापर वैज्ञानिक आणि विवेकी हे मात्र नीट तपासून पाहायला हवे आहे.

तुमच्या मते 'स्मार्ट'ची व्याख्या काय? >> उपाशी बोका, माझ्या मते स्मार्ट म्हणजे उपयुक्तता आणि शाश्वतता यांचा मानवी गरजा पूर्ण करण्यासाठी सुयोग्य आणि विवेकी समतोल साधणे. त्यामुळे प्रत्येक तंत्रज्ञानाची स्मार्टची परिभाषा स्थलकालपरत्वे बदलती असेल. लेखात ब्रशचे उदाहरण आहे - बॅटरीवर चालणारा ब्रश धडधाकट व्यक्तीसाठी स्मार्ट नाही पण कंपवाताच्या रुग्णांसाठी स्मार्ट आहे.
जितकी कमी आणि शाश्वत ऊर्जा वापरून कामे होतील तितके स्मार्ट. सध्याच्या परिभाषेतील renewable energy sources खरोखरच शाश्वत (renewable) आहेत का याचा खूप खोलवर जाऊन विचार केला पाहिजे. असे केल्यावर लक्षात येते की अनेकदा renewable ऊर्जा म्हणजे shifting the goalposts आहे. प्रदूषण होतंच पण ते तिसरीकडे (डोळ्याआड).
इलेक्ट्रिक गाड्या आणण्याऐवजी खाजगी गाड्यांचा वापर कमी होणे, त्यासाठी पर्यायी सक्षम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था उभी राहणे (public luxury and private sufficiency) किंवा आवश्यक प्रवासाच्या अंतरात घट होऊन (revising zoning restrictions) वाहनांची गरजच न भासणे जास्त स्मार्ट आहे.
पृथ्वीसाठी खरा शाश्वत ऊर्जास्रोत एकच - आपला सूर्य. सध्याचे खनिज तेल, नैसर्गिक वायू ही देखील सौरऊर्जेचीच रूपे आहेत. सूर्यप्रकाशाचा थेट वापर (as is) आपण थोडाफार करतोच - कपडे वाळवणे, इतर काही खाद्य पदार्थ वाळवणे (ब्लॅककॅट यांचा धागा!) पण पृथ्वीवर दररोज मिळणारा सूर्यप्रकाश उपयुक्त ऊर्जेत बदलण्याचे एक शाश्वत तंत्रज्ञान खूप आधीच अस्तित्वात आहे - ते म्हणजे प्रकाशसंश्लेषण! यातून सौरऊर्जा ही कर्बोदकांच्या स्वरूपात उपलब्ध होते. या ऊर्जेचे इतर प्रकारच्या उपयुक्त ऊर्जेत रूपांतर करणे हे तंत्रज्ञान शाश्वत असेल. उदाहरणार्थ, माणसाने स्वतःची शक्ती वापरून चालणे, बैलाला चारा घालणे त्याने बैलगाडी चालवणे, किंवा बायोगॅस/बायोडिझेल इत्यादी इंधन वापरून वाहन चालवणे. Switching from hydrocarbon economy to carbohydrate economy will be a major step towards sustainability. So, developing technologies that utilize carbohydrates as an energy source will be a great way to innovate.

उपाशी बोका मी पण वाचायला उत्सुक आहे.
ह्या मोठ्या खडकावर सूर्यप्रकाश सोड्डन काहीच बाहेरून येत नाही , आहे तेच रिसायकल केलं जात हे कळलं तेव्हा सटपटायाला झालं होत.
त्यामुळे जिज्ञासाचे मुद्दे माझ्यादृष्टीने अगदी यथायोग्य आहेत.
दुसरी बाजू असेल तर समजून घ्यायला आवडेल.