हँगरच्या पिनेची गोष्ट

Submitted by Barcelona on 15 February, 2022 - 09:27

हँगरच्या पिनेची गोष्ट
सेरा विमानात आपल्या जागेवर बसली. आता तिचे जरा वय झाले होते तरी चेहऱ्यावरचा करारीपणा, आत्मविश्वास कमी झाला नव्हता. उलट प्रत्येक जबाबदारीबरोबर तो वाढतच गेला होता. वेलकम ड्रिंक द्यायला आलेली फ्लाईट अटेंडन्ट तिच्या कोटवरची पिन बघून थबकली. कोट हँगर वर लाल काट मारलेली पिन बघून ती पोरसवदा अटेन्डन्ट म्हणाली ‘मॅडम, हँगर वर नको तर तुमचा कोट आमच्या कॅबिनेट मध्ये हूकला अडकवून ठेऊ शकते.’ सेरा हसून ‘नको, इथेच असू दे’ म्हणाली. पिनेचे कारण त्या पोरसवदा अटेन्डन्टला माहितीही नाही - ह्या समाधानाने सेराच्या चेहऱ्यावर हसू पसरले.
त्या पिनेला निमित्त ठरली होती नॉर्मा.
coathanger.jpeg (साभारः Quora.com)

नॉर्माला भेटूनही आता बरीच वर्ष झाली. पहिल्यांदा भेटायला नॉर्मा त्या रेस्टॉरंट मध्ये आली तेव्हा सेरा नि लिंडा तिची वाटच बघत होत्या. बिअरचा घुटका घेत नॉर्मा म्हणाली, “दहाच दिवस वर झाले आहेत आणि मला नकोय हे. मी बार मध्ये वेट्रेस आहे. मी नको नको म्हणत असताना सारं घडलं. आता मला हे मूल नको. डॉक्टरने इथे टेक्सस मध्ये अबॉर्शन करत नाहीत म्हणून परत पाठवलं. कॅलिफोर्निया मध्ये करतात म्हणे पण तिथे जायला पैसे नाहीत माझ्याजवळ.” लिंडा म्हणाली, “कायदा नाही तुझ्या बाजूचा पण कायदाच रद्द करा म्हणून केस करता येईल. आहे तुझी तयारी?”

नॉर्माच्या डोळ्यापुढे तिचे आयुष्य आले. मनोमन तिला वाटलं “आई-बाबांचं जगणे अस्थिर. घरात ड्रग्ज, दारू, भांडणे नि मारामाऱ्या यांची रेलचेल. दहा वर्षाचीच होते तर पेट्रोल पंपावर चोरी करून घरातून पळाले. मात्र पोलिसानं पकडल आणि मग फॉस्टर होम्स, कॉन्व्हेंट अशा जागी जिथे आसरा मिळेल किंवा जिथे पोलिस रवानगी करतील तिथे तिथे रहावे लागले. वूडी भेटला नि सोनेरी दिवस आल्यागत वाटलं. वूडीच्या प्रेमापोटी लग्न केलं पण अगदी काळी-निळी पडेपर्यंत मला मारायचा. अगदी प्रेग्नन्ट झाल्यावरही. आईकडे परत जाण्याशिवाय काहीच पर्याय नव्हता.

बाळ झालं, मात्र जगण्यात रसच वाटेना. दारूच बरी वाटायची आणि त्या लेस्बियन बार मध्ये मैत्रिणीही चांगल्या झाल्या. पण मग पोलिसांनी बाळाची कस्टडी आईला दिली. मला विचारायचं तरी.. .पुन्हा दिवस राहिले तेव्हा मी नीट सोशल वर्करला बोलून एक छान घर शोधलं. आईच्या खातेऱ्यात हे बाळ नव्हतं द्यायचं. पण आपल्या हातानं आपलं बाळ देणं याचे क्लेश कुणाला नि कसे समजावू? आता तिसऱ्यांदा प्रेग्नंन्सी नशीबी आली पण आता दत्तक नको असा विचार आला.

मग त्यापेक्षा पाळी उलटून काहीच दिवस तर उलटले आहेत तर अबॉर्शन करावे… डॉकटर नाही म्हणे. इतर मुली काय काय सांगतात - कुणी म्हणे अमुक खा, कुणी म्हणे तमुक पी. कुणी म्हणे पोटॅशियम परमॅंगनेट ठेव ‘तिथे’, तर कुणी म्हणे ‘आत’ हँगर घालून जमेल. नक्को … केस करणे बरे राहील.”

या दोघी म्हणतात तसं केस करावी हे बरं. या दोघी वकिलीणीना माझी मजबूरी कळेल तरी का?

सेराला नॉर्माची अडचण समजत होती. सेरा नुकतीच वकील झाली होती. लिंडाही. तेव्हा फार मुली वकील होत नसतं. सेराच्या वर्गात अवघ्या पाचजणी होत्या. लॉ फर्म्स मध्ये मुलींना लवकर नोकरी मिळत नसे. सेराला ही नोकरी नव्हती पण ती मिळवण्याची तिला घाई ही नव्हती. रॉन बरोबर नुकतेच लग्न झाले होते. पण कॉलेजात असताना रॉनपासून लग्नापूर्वीच तिला दिवस राहिले होते. दोघांची तेव्हा लग्नाला तयारी नाही आणि त्यामुळे ते प्रकरण निस्तरताना झालेली यातायात तिच्या चांगलीच लक्षात होती.

सेरा जेमतेम पंचविशीची.. वकील म्हणून अननुभवी पण हुशार होती, चतुर होती, आणि अभ्यासू होती. नॉर्माला स्वतःचे खरे नाव द्यायचे नव्हते म्हणून ‘जेन रो’ (Jane Roe) नावाने हेनरी वेड (Wade), डिस्ट्रिक्ट अटर्नी यांच्या विरुद्ध खटला दाखल झाला. डिस्ट्रिक्ट अटर्नी विरुद्ध कारण गर्भपाताबद्दलचे खटले ते दाखल करत.

… आणि इथे गोष्ट सेराची किंवा नॉर्माची न उरता सगळ्यांची झाली. नॉर्मा आणि अन्य समस्त मुली ज्यांना सुरक्षित गर्भपात हवा आहे त्यांच्यावतीने ‘क्लास एक्शन’ याचिका दाखल केली.या खटल्यात एक मेरी डो म्हणून जोडपे ही होते. हाच तो गाजलेला “रो वि वेड” खटला.

टेक्ससच्या जिल्हा न्यायालयात सेराने युक्तिवाद केला तेव्हा तिने पूर्वीच्या ग्रिस्वल्ड केसचा दाखला दिला. जुन्या कायद्याप्रमाणे गर्भनिरोधक औषधी इ दवाखान्यात किंवा औषधी दुकानात मिळत नसे. इकडून-तिकडून मिळवावी लागे. अशाने खाजगी गोष्ट चव्हाट्यावर येई. ग्रिस्वल्ड केसमध्ये जाचक नियमांमुळे जोडप्याची ‘प्रायव्हसी’ जपली जात नाही असा युक्तिवाद झाला होता आणि म्हणून कोर्टाने आदेश दिला की दवाखान्यात/फार्मसी मध्ये गर्भनिरोधक उपलब्ध व्हावी. सेराने या केसचा दाखला देत युक्तिवाद केला की ग्रिस्वल्ड केस प्रमाणेच कुटुंबाचा आकार किती मोठा असावा हे खाजगीत ठरवण्याचा अधिकार स्त्रीला गर्भपात करताना मिळायला हवा. दवाखान्यात डॉक्टरच्या देखरेखीखाली गर्भपात करता येऊ दे. गर्भपात करणे योग्य की अयोग्य याविषयी हा खटला नसून तो सुरक्षितपणे करण्याची सोय हवी इतकीच मागणी. राज्यातील कायदे जुने असून त्यात बदल आवश्यक आहेत. तिचा युक्तिवाद कोर्टाला पटला पण कोर्टाने निर्णय जरा विचारात पडणारा दिला - कोर्टाने कायदा जुना आहे मान्य केलं पण अबॉर्शनला परवानगी दिली नाही.

या निकालाचा नॉर्माला (जेन रो) काही फायदा होणार नव्हता कारण तिची डिलिव्हरी लवकरच होणार होती. पण ही नॉर्मा एकटी नव्हती… अशा इतर अनेक जणी होत्या. क्लास ऍक्शन म्हणून सेराने या कोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टात आव्हान दिलं. सुप्रीम कोर्टापर्यंत जाणारी सेराची ही पहिलीच केस होती. लिंडाही मदतीला होती पण लिंडा म्हणायची सेराचे डोळे निळे नि केस सोनेरी असल्याने तिचा प्रभाव अधिक पडतो म्हणून लिंडा कोर्टात बोलायची नाही. सुप्रीम कोर्टात सेरानेच जेन रो ची बाजू मांडली.

सेराने युक्तिवादाची कसून तयारी केली. तिने कोर्टासमोर सांगितले - अमेरिकन घटनेच्या नवव्या घटनादुरुस्तीने लोकांची प्रायव्हसी जपली आहे. सुरक्षित गर्भपाताची मागणी त्याला धरून आहे. तसेच अमेरिकन स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात जीवन (लाईफ), स्वातंत्र्य (लिबर्टी), आणि आनंदाची प्रयत्न (पार्स्यूट ऑफ हॅपिनेस) याचे महत्त्व आहे. नको असलेल्या प्रेग्नन्सीपासून ‘लिबर्टी’ स्त्रीला मिळावी आणि आपल्या जीवनाला आकार देण्याची संधी मिळावी म्हणून सुरक्षित गर्भपाताची सोय हवी. कोर्टाने तिचा युक्तिवाद ७-२ अशा बहुमताने मान्य केला. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असल्याने तो अमेरिकेच्या सर्व ५० राज्यात लागू झाला. राज्याराज्याचे गोंधळात टाकणारे नियम आता एका निर्णयाने सुसूत्र झाले.

या निकालामुळे आता गर्भपाताच्या क्लिनिक्सना पोलिसांच्या स्टिंग ऑपरेशन्सचा धसका बाळगावा लागणार नव्हता. मुख्य म्हणजे जोडप्याला किंवा एकट्या स्त्रियांनाही कमी खर्चात, सुरक्षितपणे, आणि वेळेवर गर्भपात करता येणार होता. अविचाराने किंवा हट्टाने गर्भपात करणाऱ्या मुली/जोडपी अपवादात्मक असतीलही. मात्र बहुतेकजणी किंवा बहुतेक जोडपी परिस्थितीच्या कचाट्यात सापडलेली आणि सुरक्षित मार्ग शोधणारी असतात. हँगरने किंवा इतर घातकी प्रकाराने केलेली अबॉर्शन्स इतिहासजमा झाली. आता इतक्या वर्षानंतर हॅंगरची पिन त्या फ्लाईट अटेन्डन्टला किंवा आपल्यापैकी अनेकांना माहितीही नाही यात काही नवल नाही.

मंडळी, कुणी म्हणाल जोडीदार समजूतदार आहे नि आपण कायदा व सुव्यवस्था असलेल्या देशात राहतो. त्यामुळे आपल्या स्वतःवर किंवा आपल्या लेकी-बाळींवर कध्धीच गर्भपाताची वेळ येणार नाही याची खात्री आहे, तर मग आज असल्या प्रश्नांची का उठाठेव करायची?

कारण आपण जे हक्क गृहित धरतो ते फार अलिकडे म्हणजे ७०च्या दशकात मध्ये मिळालेले आहेत. या केसपूर्वी जगात फक्त १५ देशात गर्भपातास कायदेशीर परवानगी होती. आता अनेक देशात कुटुंबनियोजनासाठी सुरक्षित गर्भपाताचे, अगदी ‘ऑन रिक्वेस्ट’ सुरक्षित गर्भपाताचे कायदे आले आहेत. लॅटिन अमेरिकन व काही युरोपिय देशात जिथे धार्मिक पगडा अधिक आहे तिथे पूर्वी गर्भनिरोधक साहित्य व सुरक्षित गर्भपातास विरोध होता पण अमेरिकेतील बदल लक्षात घेता हळू हळू इतरत्र ही विरोध मावळू लागला. भारतात सुरक्षित गर्भपाताचे कायदे १९७१ साली आले तरी ते फार थोड्या जोडप्यांसाठी होते. भारतात अजूनही ‘ऑन रिक्वेस्ट’ म्हणजे कुठलेही कारण न देता गर्भपातास परवानगी नसली तरी गेल्या वर्षी कारणानिमित्त (उदा: आर्थिक ताण, सामाजिक ताण) अविवाहीत महिलेस सुरक्षित गर्भपाताची सोय कायद्याच्या क्षेत्रात आली.

सुरक्षित गर्भपाताचा हक्क नसताना जग कसं होतं हे आपल्यापैकी अनेकांनी पाहिलं ही नाही. पण परत तिकडे वाटचालीचं भय वाटते. सुरक्षित गर्भपाताच्या गोळ्या इ उपलब्ध नसताना होणारी इंफेक्शन्स आणि महिला मृत्यूचे प्रमाण बघता अशा कायद्याची आवश्यकता जाणवते. अमेरिकेत गेल्या पन्नास वर्षात रो वि वेड या निकालाला अनेकवेळा विरोध झाला. कधी विपर्यास झाला. सहसा 'हक्क आहे, मिळवणारच' अशा विचारप्रणालीने स्त्री/जोडपी सुरक्षित गर्भपाताचा निर्णय घेत नाहीत. शिवाय बऱ्याच वेळा त्या विरोधाला नॉर्माची सातत्याने बदलती विधाने कारण ठरली (उदा: रेप झाला, रेप झाला नाही, अबॉर्शन हवे होते पण आता माझा विरोध आहे इ). याशिवाय गर्भाच्या हक्काचे काय? गर्भ स्वतंत्र जीव म्हणून कधी मानावा? धार्मिक हक्काचे काय? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले. स्त्रीचे हक्क-स्वातंत्र्य या बरोबरच या कायद्याचा गाभा स्त्रीचे आरोग्य व खाजगीपणा जपणे हा आहे. सेराने तेव्हा केलेले युक्तिवाद इतके अचूक होते की आज ५० वर्ष झाली तरी कायदा अजून शाबूत आहे.

येत्या काही वर्षात कदाचित अमेरिकेतील राजकीय समीकरणे बदलतील, सुप्रीम कोर्टाचे जज बदलतील तसा हा कायदा कदाचित बदलेलंही. अमेरिकेत महिलादिनानिमित्त पुन्हा एकदा हा प्रश्न चर्चेस येईल- प्रो-लाईफ की प्रो-चॉईस. पण हँगरच्या पिनेची आठवण आली की कदचित आपण प्रश्नाच्या कुठल्या बाजूस आहोत याचा निर्णय करायला मदत होईल. वयाच्या ७६ व्या वर्षी डिसेंबर २०२१ मध्ये सेरा वेडिंग्टन वारली. महिलांच्या आरोग्यासाठी तिचे योगदान मोलाचे. आज स्त्रीला सुरक्षितपणे कुटूंबाचा आकार ठरवता येतो यामागे सेराचे परिश्रम आहेत. येत्या महिला दिनानिमित्त सेराला आणि स्त्री आरोग्यासाठी लढणाऱ्या सार्वजणींना अभिवादन.

संदर्भ:
https://scholarworks.lib.csusb.edu/cgi/viewcontent.cgi?article=1006&cont...
https://www.vanityfair.com/news/2017/01/roe-v-wades-secret-heroine-tells...
https://youtu.be/zQxASj_vcxk?t=420
https://www.oyez.org/cases/1971/70-18
https://www.britannica.com/biography/Sarah-Weddington
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC7403257/
मुख्य चित्र साभारः विकीपिडिया

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे सी , माहिती होते तरीही कथा म्हणून वाचायला आवडले.
टेक्सस अतिशय कंझर्वेटीव्ह/धार्मिक आहे. माझ्या मते शरीराचा आणि धर्माचा काही संबंध नाही. अशी वेळ लेकी-बाळी-मैत्रीण- भाच्या-मी स्वतः यांपैकी कुणावरही येऊ शकते, म्हणून व एक स्त्री म्हणून मी गर्भपाताचा हक्काबाबत स्वातंत्र्य देणाऱ्या या कायद्याला पूर्ण सपोर्ट करते.

फोटो टाकताना "प्रतिसाद field is required." असा धेडगुजरी एरर मेसेज (चुकीबद्दलचा संदेश) आल्याने हा प्रतिसाद.

छान लेख!
रात्र वैर्‍याची आहे हेच खरं.

चांगला लेख. डॉ. शंतनु अभ्यंकरांचा 'गर्भस्य कथा रम्या' असा लेख वाचला होता त्याची परत एकदा आठवण झाली.

येत्या काही वर्षात कदाचित अमेरिकेतील राजकीय समीकरणे बदलतील, सुप्रीम कोर्टाचे जज बदलतील तसा हा कायदा कदाचित बदलेलंही. >> कदाचित सी ? बदलते वारे बघता ह्या वर्षीच बदलेल. वेळोवेळी इंडीव्युजल लिबर्टि च्या बाता मारणारे सुप्रिम कोर्ट फक्त श्रीमंत पुरुषांच्या इंडीव्युजल लिबर्टि बद्दल जागरुक आहे.

येत्या काही वर्षात कदाचित अमेरिकेतील राजकीय समीकरणे बदलतील, सुप्रीम कोर्टाचे जज बदलतील तसा हा कायदा कदाचित बदलेलंही. >> ते तर ऑलरेडी झालेलं आहे आता फक्त टिळा लावणे बाकी आहे.

खूप छान लिहिलं आहेस.

हँगर ची पिन, किती हार्टब्रेकिंग चिन्ह आहे ते Sad>> खरोखरच

एक स्त्री म्हणून मी गर्भपाताचा हक्काबाबत स्वातंत्र्य देणाऱ्या या कायद्याला पूर्ण सपोर्ट करते. >>> +1

ही स्टोरी अजिबात माहिती नव्हती. उत्तम लेख आहे. पण असामी आणि धनि म्हणताहेत तसं परिस्थिती एव्हानाच बदलायला लागली आहे असं दिसतंय Sad

कोर्टाने तिचा युक्तिवाद ७-२ अशा बहुमताने मान्य केला.>>>
या सातांपैकी पाच जण रिपब्लिकन होते.
असंच आपलं FYI.

Other side of midnight मध्ये ह्या हॅंगरचा हा असा वापर पहिल्यांदा वाचलेला, आत्ता पण वाचताना कससंच झालं. छान लिहिलंयस सी

चांगला लेख सी! या सत्य कथा अशाच वारंवार समोर येत राहील्या पाहिजेत. मानवी हक्क आणि मूल्यं ही फार fragile आहेत. कुठून कुठवर आलो आहोत आपण याची जाणीव राहिली तर काय जपायचे आहे हे लक्षात राहील. सध्याच्या काळात तर याची गरज जास्तच आहे.

असंच आपलं FYI. >> तशाच ६ - ३ मेजॉरिटी वाल्या कोर्टाने टेक्सास च्या अ‍ॅबॉर्शन लॉ ला टेक्निकॅलिटी वर सूट दिली आहे. हेही असंच आपलं FYI.

सध्याच्या काळात तर याची गरज जास्तच आहे. >> खरय तुझे. वाळूत डोके खुपसून बसलेल्यांच्या डोक्यात ठासायची गरज आहे ह्याची.

छान लिहीलं आहेस सी,
पण अजूनही अमेरीकेत सगळ्या राज्यांमधे अबॅार्शनला परवानगी नाही असं मागे वाचलेलं..
माझ्या घरापासून १० मिनिटांवरच एका आतल्या रस्त्यावर रोज सकाळी ५-६ लोकं बोर्ड हातात घेऊन एका बिल्डींगच्या गेट बाहेर दिसायची.. हि लोकं गेटमधून आत जाणाऱ्या गाड्यांसमोर उभे राहून त्यांना तो बोर्ड दाखवून काही तरी मोठमोठयाने बोलताना मी बऱ्याचदा बघितलेलं.. एकदा त्यांच्या हातातल्या बोर्डावरचा मेसेज वाचला आणि मग समजलं की तीथे अबॅार्शन सेंटर आहे आणि बोर्ड हातात धरलेली लोकं अर्थातच अबॅार्शन करू नका, हवं तर मुल झाल्यावर चर्चला द्या, आम्ही सांभाळू टाईप्स मेसेजेस लिहीलेले असत. घरी जाऊन नेटवर माहिती वाचली तर कळालं की काही राज्यात अबॅार्शन लिगल नाहीए, पण नॅार्थ कॅरोलिनामधे आहे.

सगळ्यांना धन्यवाद. छान प्रतिक्रिया आहेत प्रत्येकाच्याच. एक एक नवा पैलू, नवी पुस्तके इ लक्षात येतात.
म्हाळसा, सध्या सगळीकडे लीगल आहे पण जेस्टेशन एज वेगवेगळी आहे. म्हणजे टेक्ससमध्ये फक्त ६ आठवडे पर्यंत लीगल आहे. बाकी सगळीकडे २०-२४ आठवडे दरम्यान आहे. ही पिन आहे खरी हृदयद्रावक पण ते पिकेटींगवाले प्रो-लाईफर्ससुद्धा बाटलीत "भ्रूण" वगैरे घेऊन येतात Sad अशाने बरेचवेळा मुलींना कायदा 'ओव्हरटर्न' झाला तर पुढे काय वाढलं आहे ते लक्षात येत नाही.

बापरे.वाचून बरीच नवी माहिती कळली.
हँगर चा तो उपयोग कोणत्या तरी चित्रपट कथेत वाचून माहीत होता.पण तरीही नव्याने आठवल्यावर चक्करलया सारखे झाले.
कोणावर ही असा निर्णय घेण्याची वेळ न येवो,पण आलीच तर तो त्या आईचा व्यक्तिगत निर्णय असावा.

ती पिन बघून पोटात तुटलं Sad

सी, लेख नेहमीप्रमाणेच चांगला आहे. मला अनेक गोष्टी नव्याने कळल्या..

चांगला लेख.

कुठून कुठवर आलो आहोत आपण याची जाणीव राहिली तर काय जपायचे आहे हे लक्षात राहील. >>+11

चांगला लेख.

सिनेमा चे नाव आठवत नाही, खूप पूर्वी बघितला होता. (त्यात तीन कथा होत्या).
त्यात असा हँगर सीन होता. अंगावर काटा आला बघतांना.

खूप छान लेख.
हँगर ची पिन, किती हार्टब्रेकिंग चिन्ह आहे ते Sad>> अगदी अगदी

Pages