दिल का रिश्ता..! (पूर्ण)

Submitted by पाचपाटील on 9 February, 2022 - 13:53

दिल का रिश्ता.
इसवी सन- २००३
जय मेहता- अर्जुन रामपाल
टीया- ऐश्वर्या रॉय
जयचा बाप- परेश रावळ
अनिता- ईशा कोप्पीकर
टीयाची आई- राखी

सुरूवात.
जय आफ्रिकेतून आंघोळ वगैरे करून घाईगडबडीत त्याच्या मुंबईतल्या घरी येण्यासाठी निघतोय. आणि त्याचवेळी
रावळपापा लंडनहून घराकडे निघालेले असतात.
रावळपापा अत्यानंदाने घरात घुसून मीच आधी पोचलो अशी घोषणा करतात. परंतु जय त्यांच्याआधीच पोचलेला असतो.

दर वर्षी एका विशिष्ट दिवशी जयच बापाच्या आधी घरी पोचत असतो, हे आपल्याला त्यांच्या संवादातून कळतं.
दुर्दैवाने रावळपापांची फ्लाईट लंडनला वगैरे दोन तास लेट
झाल्यामुळे पापांचा चान्स याही वेळी हुकलाय..!
पण काय हरकत नाय बरं का पापा. पुढच्या वर्षी ट्राय करा. आम्हालाबी तसं काय काम नसतं. आम्ही अंपायर म्हणून बसतो इथं तुमच्यासाठी.

इकडे रावळपापा बेडरूममध्ये आपल्या मृत बायकोच्या
फोटोपुढे उभं राहून तिला बड्डे विश करतायत..!
तिकडे शेजारच्या रूममध्ये जय आईच्या पैंजणाशी पॅरानॉर्मल संवाद साधत तिला बड्डे विश करतोय..!
आईचा पूर्वीच कधीतरी विमान अपघातात वगैरे मृत्यू
झालाय..! परंतु जयला हे मान्य नाहीये..! त्याला वाटतंय की त्या पैंजणाच्या रूपात आई सदैव त्याच्याबरोबर आहे..!
असा निरागस भावनाशील जय..! तर जयचं काही होऊ शकत नाही..! आई बाकी फोटोतूनसुद्धा मंद मंद
मायाळू मायाळू हसत असते.

रावळपापा पोराला उद्देशून पूर्णवेळ 'अरे यार अरे यार' असेच म्हणतात.. पोराशी अत्यंत दाट मैत्रीचे संबंध आहेत त्यांचे..!
शिंगं मोडून वासरांमधी शिरण्याची बॉलिवूडच्या बापांची जी परंपरा असते; रावळपापा ती वाट मोडू इच्छित नाहीत..!

मैत्रिण अनिता थेट समाजसेविकाच आहे. समाजसेवेसाठी तिने एक विशिष्ट क्षेत्र निवडले आहे. त्यामुळे जयला घेऊन ती एका मूकबधिर मुलांच्या शाळेत जातेय.
आणि आश्चर्य म्हणजे टीया तिथेच शिक्षिका आहे.
तिथे ती शाळकरी मुलांबरोबर हसतहसत बास्केटबॉल खेळत असते. तर मग तिला बघून जय गार पडतो..!

ऐश्वर्याचं ते स्माईल पुढे १५-२० वेळा पहायला मिळतं..
म्हणजे कबूलाय की आहात तुम्ही अतिसुंदर..! आणि तुमचं ते
स्माईलही फारच जगप्रसिद्ध वगैरे..! परंतु म्हणून किती वेळा हसून दाखवणार ना..! म्हणजे त्यातून समजा नंतर जबड्याचे स्नायू आखडण्याचा वगैरेही त्रास होत असेल ना..! तर त्या त्रासाचं कसं काय करता? म्हणजे काळजीपोटी विचारलं.. सहजच.. बाकी तसं काय नाय.

बाकी त्या शाळेतल्या ओरिजनल शिक्षिकाही त्या सीनमध्ये दिसतात. ऐश्वर्याच्या उपस्थितीचा एक स्पष्ट दबाव त्यांच्या
पूर्ण व्यक्तिमत्त्वांवर दिसतो. त्यांनी हा दबाव घेण्याचं काहीच कारण नव्हतं खरं तर.. पण असो.

रावळपापा हुबेहूब अब्जाधीश बिझिनेसमन. जय प्रेमात
पडल्याचं समजल्यावर पापाच एक्साईट होतायत..! टणाटण उड्या वगैरे मारतायत..!

हाच तर फरक असतो त्यांच्यात आणि आमच्यात..!
एकेकाळी आमच्या प्रेमविषयक हालचाली माझ्या वडीलांच्या कानावर गेल्या होत्या. त्याप्रसंगी वडीलांच्या आवाजात एक हिंस्र धग होती की, "का रं ss.? लव झालंय गा तुला ?
आं ss?.. लय लव करू वाटतंय गा ? व्हय रं ?? लय
माजल्यावानी हुतंय गा ??"

तर त्यांच्या सवालांमधली ती दहशत बघूनच आमी कायमचा हबका खाल्ला..! जाग्यावर गोठून गेलो..! आनी आमच्या लवचा आख्खा इशय तिथंच सपला..!

पण इथे हे बापलेक जरा काही झालं की एकमेकांना मिठ्या मारतात.. माराव्यात मिठ्या त्यांनी.. काय प्रॉब्लेम नाही.! परंतु अगदी गैरसमज होईल इतक्या वेळा नको..!

तर मग जयकडून मूकबधिर मुलांसाठी चॅरिटी शोचे
नियोजन..! शिक्षिकेलाही त्या शोमध्ये एक आयटेमसॉंग करावे लागते.. कारण ती शिक्षिका अर्थातच ऐश्वर्या रॉय आहे..!
दय्या दय्या दय्या रे..! हेच ते गाणं..! जे आमच्या रसिक ट्रॅक्टर ड्रायव्हरांनी आम्हाला बेसुमार वेळा ऐकवलं होतं..!

बाकी मग जय टीयाला प्रपोज करतो परंतु तिथेच चिमुटभर ट्विस्ट आहे..! टीयाच्या बॉयफ्रेंडची एंट्री होते. म्हणजे प्रियांशू चॅटर्जी..! ऊर्फ राज..!

तिकडे जयची अवस्था मोडलेल्या फांदीसारखी..! दर्देदिल जय आईचे पैंजण काढून पुन्हा एकदा पॅरानॉर्मल संवाद
साधायला लागतो की मी हार मानणार नाही वगैरे.!
आता मुलगी सरळसरळ नाही म्हणालीय..! ऑलरेडी तिचं जमलंय एकाबरोबर..! तर उगाच त्या मॅटरमध्ये खेटत
बसण्यात काही अर्थ है का.! पण पैंजण हे असलं काही सांगू शकत नाही..!

राज आणि टीयामध्ये घट्ट बॉंडींग आहे, हे सरळसरळ दिसतंच मग आपल्याला..! आणि त्यांना राखीमाँचा आशिर्वादपण आहे.! बास की मग.! सपला इशय..!
मग लग्न, माप ओलांडणे आणि हुंड्याच्या स्वरूपात राखीमाँ राजच्या घरी..! कारण राज अनाथ असतो..! आणि त्याला
राखीमाँ मध्ये आई सापडते..! तसा एका गाण्याच्या
माध्यमातून दोघांचा रोमान्स दाखवलाय.. त्यामुळे गाणं
संपल्यावर लगेच टीयाला मुलगा होतो..!

इकडे जय दारू पिवू पिवून टाईट‌‌..!
जगभरातले सगळे टॉपचे सीईओ, बिझनेसमेन वगैरे माझ्या भेटीसाठी तरसतायत आणि मी टीयासाठी तरसतोय, असा काहीतरी एक डायलॉग आहे जय मनुष्याचा ..!

असाच एकदा जय फुलटू फकाट होऊन ॲक्सिडेंट करतो. जयची गाडी आणि राजची गाडी यांच्यात धडाम्मधूम् ठोकर..! दोन्ही गाड्या स्लो मोशनमध्ये उलट्यापालट्या..! घोडे वगैरे सगळे बंधमुक्त..!

तिकडच्यापैकी राज ऑन दी स्पॉट खलास..!
इकडच्यापैकी अनिता ऑन दी स्पॉट खलास..!
उरले दोघेच..!
जय आणि टीया..! ऐश्वर्या आणि रामपाल..!
जय होss!!

राज हा या पिच्चरमधला एकमेव सेन्सीबल माणूस..! त्याला डायरेक्टरनं हकनाक मारून टाकलं..! जयला काही झालं नाय. तो जसाच्या तसा फूल पीसमध्ये शिल्लक राह्यलाय. आपल्याला छळायला.

पुढचा सीन हॉस्पिटमधला.. बेडवर जखमी स्वरूपातली टीया.. शेजारी चिंताग्रस्त डॉक्टर्स...टीया हळूहळू
डोळे उघडतेय..! डॉक्टर्स एकमेकांकडे पाहून
आशादायकपणे बुगुबुगु मान हलवताय..!
परंतु हे काय होतंय.! टीयाबेटी राखीमाँलासुद्धा ओळखत
नाहीये..! ओह् शिट् ! अवघडच्चे हे तर.! आता डॉक्टर्स
एकमेकांच्या कानांत कुजबुजत मान हलवताय..! उगाचच कॉरीडॉरमधनं पळापळी वगैरे नेहमीसारखीच..!

राखीमाँ चिंताग्रस्त..! आता डॉक्टर म्हणतायत की अशा
क्रिटीकल केसेसमध्ये काहीही होऊ शकतं..! मी आता
ताबडतोब न्यूरोसर्जनला बोलावतो.. तुम्ही पैशाचा जुगाड करा..!
तिथेच रावळपापा दबा धरून उभे असतात.
ते म्हणतेत पैशांचा काईच विषय नाय. पयले टीयाला बरं करा.

बाकी मग डॉक्टरांचं म्हणणं असं पडतं की टीयाची याददाश्त मिटून गेलीय..कधी माघारी येईल काईच सांगता येत नाय..! आता तुम्ही तिला कसल्याच जुन्या आठवणी करून दिऊ नका.. नायतर तिच्या मेंदवावर दबाव येऊन ती पागलबिगल होईल..! आणि तिला जुनं काय सांगत बसू नका..! आता
निसर्गालाच स्वतःचा मार्ग निवडू द्या..!

मोठा बाका प्रसंग गुदरला आहे..! आता हितं भारतात राह्यले तर टियाला जुनं कायतरी आठवून तिच्या मेंदूच्या नाजूक नसा फाटणार..! मग ती येडी बिडी झाली तर कुठं बगत बसता.! म्हणून मग जय, रावळपापा, राखीमाँ, टीया आणि
टीयाचं बाळ, असा सगळा बारदाना आता विमान पकडून साऊथ आफ्रिकेला निघालाय..! आता तिकडं काय हुतंय ते बगाय पायजे.
-----------------------------------******---------------------------

तर रावळपापांनी राखीमाँला घोळात घेऊन पटवून
दिलंय की कार ॲक्सिडेंटमध्ये इतर लोक पैशे चारून
केस दाबून टाकतात.‌.. परंतु माझ्या निरागस पोरानं टियाची सगळी काळजी घेतली.. त्यामुळे आता तुमी त्येला माफ केलं
पायजेल.

राखीमाँ टियाला विमानातच ब्रीफींग देतायत की तुझ्या
बेस्टफ्रेंड अनिताचा कार अपघातात मृत्यू झालाय. अनिता ही जयची बायको होती.. आणि आता त्यांच्या मुलाला, अंशूला सांभाळणं हे तुझं कर्तव्यच आहे.. तर आता तू अंशूची मावशी हो...! बाय द वे, त्यासाठी आपण आता आफ्रिकेच्या दिशेने निघालोय.

जय-टिया केपटाऊन दर्शनास निघतात..! आणि त्यातून
समजा जाताजाता आफ्रिकन संस्कृतीच्या विविध पैलूंना
स्पर्श वगैरे..! बाकी आपल्याला तरी ते प्रत्यक्ष कधी
बघायला मिळणार ना..! त्यासाठी पैसा लागतो..!
आहे का तुमच्याकडे? पैसा वगैरे? नाही ना?
मग भागवा सध्या पिच्चरवरच..! कारण केपटाऊन तिकडं आहे..! आफ्रिकेत..! लय लांब है ते..!
मागे शाळेत असताना भूगोलाच्या पुस्तकातला
वास्को द गामा आला होता वळसा घालून..! आणि
त्यानंतर मग आपले जय-टिया तिथेच असतात सध्या..!

समुद्राच्या दिशेने कुठेतरी बोट दाखवत जय सांगतो की
तिथे अटलांटिक आणि हिंदी महासागर मैलोनमैल प्रवास करून एकत्र आलेत..!
यावर टिया विचारते की तुला पण या समुद्रांप्रमाणे मागचा सगळा भूतकाळ विसरून एक नवीन प्रवास सुरू
करण्याची इच्छा आहे का रे?

बाकी इथे कन्सेप्ट थोडासा चुकला आहे, असं वाटतं..!
कारण प्रवास तर नद्या करतात ना..! समुद्र तर फक्त जागच्या जागीच वरखाली डुचमळत उभा असतो ना..!! पण असो..! मायनर मिस्टेक आहे ही..! त्यामागची भावना महत्त्वाची.!
नवनवीन प्रवासाची ओढ तर त्याहून महत्वाची..!

बाकी मग टणाटण रावळपापांच्या अंगात आता लव्हगुरूचा संचार झाला आहे.. त्यामुळे ते जयला पटवण्यासंबंधी
टियाला दयनीय टिप्स वगैरे देतायत..!
परंतु आपला जय टियाला बिलकुल प्रतिसाद देत नाहीये..! त्याची मजबूरी आपण समजून घेतली पाहिजे..!
कारण जयच्या मनात एक प्रकारचा गिल्ट आहे की
आपण राजला अपघाती मारले..!

आता हे असं होतंच ना म्हणजे..! म्हणजे समजा तुम्ही फुल्टू फकाट होऊन गाड्या उडवता..! त्यात समजा चुकून माणसं वगैरे मारली जातात..! आणि त्याचा नंतर त्रास होतो
तुम्हाला..! तुमचं मन तुम्हाला खातं वगैरे..!
आणि मग तुम्ही समजा आजून तीन-चार वेळा पैंजण
घेऊन बडबडत बसता..! ते बघून तुम्ही पार सटकलाय
म्हणत प्रेक्षक जबडातोड जांभया द्यायला लागतेत समजा..! पण तरीही शेवटी तुम्ही एक भावनाशील सज्जन माणूस
असताच ना..! कारण तुम्ही या पिच्चरचे हिरोच
आहात ना..!

"बीता हुआ कल.. गुजरा हुआ कल..जिंदगी फिर से शुरू
करना..हादसें तो होतेईच रह्यते हय..झालं गेलं गंगेला
मिळालं. आनी जे गेलं ते कायमचंच गेलं..आता काय ते
म्हागारी येनार नाय..आणि शिवाय अपघात म्हणल्यावर त्यात माणसं मरणारच की..! त्येचं काय एवढं..! नवी सुरुवात
महत्वाची..!"
या प्रकारची वाक्यं मग उरलेला एक तास सगळेजण
एकमेकांना सांगत राहतात..!
कोणत्या क्षणी नेमकं कोण कुणाची समजूत घालतंय, हे समजून घेण्यात आपलाच गोंधळ उडायला लागतो..!
कारण सगळेच आळीपाळीने एकमेकांचे दणादण
काऊन्सेलिंग करत सुटतात..!
करारी बाणेदार राखीमाँचेसुद्धा मूड्स प्रचंड स्विंग व्हायला लागतात..! कारण शेवटी असं आहे की आसपास सदैव
सगळे मेंटल लोक वावरत असताना तुम्ही तरी किती काळ अलिप्त राहणार ना..!

ह्या डायरेक्टरची क्षमता बाकी असाधारण आहे..
तो काहीही करू शकतो.. म्हणजे जयच्या हातातून पैंजण खाली पाडून टियाला पटाकदिशी पाय पुढे करायला लावतो की घाल ना आता ते माझ्या पायात वगैरे..!

किंवा समजा केपटाऊनच्या मार्केटमध्ये एखाद्या तंतोतंत
भारतीय ज्योतिषाला स्टॉल लावून बसवू शकतो..!
किंवा समजा जयला परराष्ट्रमंत्र्यांची अपॉइंटमेंट धुडकावून लावायला सांगू शकतो..!
किंवा समजा टणाटण रावळपापांना बेंटेक्स हर्ट ॲटॅक
आणून त्यात पंधरा मिनिटं शुद्ध टाईमपास करू शकतो..!

कारण शेवटी असाय की पिच्चरची लांबी वगैरे भानगडी
असतात.. त्येच्यासाठी मोकळ्या जागा जमेल तशा भराव्या
लागतात.. सगळ्या वयाच्या प्रेक्षकांचं मन सांभाळावं
लागतं..! काय एक ताप है का?

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भारीच परीक्षण,अगदी हहपुवा
जोश चंद्रचूडवाला हे ऐकून एक शाहरूख फॅन.......... उठाले रे बाबा>>मला पण जोश म्हणलं की चंद्रचूड च आठवतो,

मला चंद्रचूड म्हटले की फक्त तेरे मेरे सपने आठवतो
जोश म्हटले की फक्त अपुन बोला गाणारा झिपर्‍या शाहरूख आणि त्याचा बाप वास्को द गामा आठवतो.

मला परेश रावल म्हटले की बाबुराव गणपत आपटेच आठवतो.
आणि मामा म्हटले की माझे बालपण आठवते. माझे टोपणनाव होते ते.

जाऊ दे मी काही बोललो तर भक्त मलाच नावे ठेवतात आणि अडमीन माझ्या पोस्ट उडवतात
निळ्या डोळ्यांचे बालक काहीही बोललं तरी चालतं सगळ्यांना

सो सर, तुमचं चालू द्या, मी माघार घेतो

जोश म्हटले की फक्त अपुन बोला गाणारा झिपर्‍या शाहरूख आणि त्याचा बाप वास्को द गामा आठवतो. >>>>>> त्याच्या बापाच नाव वास्को द गामा असत?

कोणाला जोश म्हटल की शरद कपूर नाही आठवला का?

@ सुलू, मला जोश म्हटले की शरद कपूर नाही आठवत पण शरद कपूर म्हटले की दस्तक आठवतो. ज्यात तो सुश्मिताच्या मागे लागलेला. तेच सुश्मिता म्हटले की मै हू ना आठवतो. झायेद खान म्हटले तरीही मै हू नाच आठवतो. पण मै हू ना म्हटले की शाहरूख आठवतो.

अतीच अवांतर :निळ्या डोळ्यांचे म्हटलं की मला अमर विश्वास आठवतो>>अमर विश्वास म्हटलं की फिरोज आठवतो,तो आठवला की मंदार आणि मग प्रिन्स आठवतो,प्रिन्स आठवला की त्याच्या क्रूर शिक्षा आठवतात(मधेच कमिशनर केतकर पण आठवतात) Rofl

बराच काळ गेलाय मध्ये म्हणून सुहानीचा (की सलोनी??)बॉयफ्रेंड कोण ते नाही आठवत

वाचल पूर्ण परीक्षण. भारी आहे.

शेवटपर्यन्त टियाची याददाश्त परत येत नाही. हेच काय ते प्रॅक्टिकल दाखवलय चित्रपटात.

चित्रपटात आणखी एक अ आणि अ गोष्ट म्हणजे , टियाची मेमरी कधीच परत येत नाही तरीही ती शेवटी म्हणते, ' अब एक विधवा कहा जायेगी? अपने पती के यादो के सहारे तो जिएगी' असा काहीतरी अचाट डायलॉग मारलाय तिने. त्या डायलॉगनन्तर जय तिला प्रपोज करतो. टिया त्याला अन्शुसकट मिठी मारते. चित्रपटाचा दि एण्ड.

केपटाऊन सुन्दर होत.

' दिल चुराले' आवडत गाण आहे माझ. त्यात सीन्स छान घेतलेत विशेषत: अन्शुचे.

तो अन्शु कसला क्यूट आहे!

म्हणजे टिया नि यशचा दिलका रिश्ता आहे म्हणून यशच्या बायकोला नि टियाच्या नवर्‍याला चक्क ठार मारायचे! त्याबद्दल काही ना खेद ना खंत, कारण कुणाचा तरी दिलका रिश्ता आहे म्हणून!

हे असले दिलके रिश्ते आपल्या जवळपास असतील तर जरा जपूनच रहायला पाहीजे.
न जाणॉ - कुठे कुणाचा दिलका रिश्ता नि नधल्या मधे फुकट दोन निष्पाप बळी!

विवाहेच्छू तरुण तरुणींना एक महत्वाचा सल्ला - तुमचा जसा विश्वास असेल त्यानुसार पत्रिका, मंगळ वगैरे काय बघायचे ते बघा. पण कुठे दिलका रिश्ता आहे का याची चौकशी कस्सून करा! फुकट जीव जायच!!

बेंटेक्स हार्ट अ‍ॅटॅक , प्रवास करणारे समुद्र , राखी त्यातल्या त्यात sane Biggrin

नायकाच्या हातून नायिकेच्या प्रेमिकाचा अपघाती मृत्यू ही थीम असलेला चित्रपट पाहिल्याचं आठवत होतं. पण कोणता ते आठवायला वेळ लागला.
किनारा - हेमा- जितेंद्र - धर्मेंद्र. जितेंद्र धर्मेंद्रला उडवतो. पण तो वर गेलाय हे जितेंद्रपासून लपवून ठेवलं जातं.
हाच आपल्या प्रेमाचा खुनी हे कळल्यावर हेमाबाई जिन्यावरून गडगडतात आणि त्यांचे डोळे जातात.

नाम गुम जाएगा .... मेरी आवाज ही पहचान है लताचं गाणं याच चित्रपटातलं. जितेंद्रच्या आवाजावरून हेमा त्याला ओळखते तरीही तो वेगळाच कोणी आहे असा बनाव रचतात आणि तिला पटतं.

कायच्या काय पिक्चर होता.
तो जय दारू पिऊन अपघात करून यश आणि अनिताला मारतो, पण त्याला साधी शिक्षाही होत नाही की तो आपणहून आपला गुन्हा कबूलही करत नाही Sad

शेवटी टियाला समजतं की जयमुळे आपला नवरा आणि आपली स्मृती गेली. तेव्हा ती एकदम casually म्हणते, त्यात काय, मेरे साथ ये सदमा कभी ना कभी तो हो ही जाता, अगर तुम्हारी वजहसे नही तो कोई और ये करता...म्हणजे हे एवढं सगळं झालं... पण what's the big deal?

जयचा बापही महानच आहे, राखी टिया-जयच्या लग्नाला खळखळ करते तेव्हा तो तिच्याकडे दोन साड्या पाठवतो आणि विचारतो की यातली टियासाठी तुम्ही कोणती पसंत कराल? एक असतो लाल शादीका जोडा तर दुसरी पांढरी साडी Sad आपल्या मुलीने पांढरी साडी उमरभर घालून जगू नये म्हणून मग राखी पाघळते आणि अनुमती देते.

बिचारा यश सर्वात गुणी होता त्याला मारून टाकलं आणि शेवटी त्याच्या जाण्याबद्दल खंत खेद न व्यक्त करता टिया आणि जय मिठी मारतात. जय मी अन्शूला माझं नाव लावणार असं जाहीर करतो म्हणजे यशचं नामोनिशानही उरलं नाही आणि हे टिया-अन्शू आणि राखी कौतुकाने ऐकतात Sad

बिचारा यश >>>>>>>> त्याच नाव राज असत.

जय मी अन्शूला माझं नाव लावणार असं जाहीर करतो म्हणजे यशचं नामोनिशानही उरलं नाही आणि हे टिया-अन्शू आणि राखी कौतुकाने ऐकतात >>>>>>>>>>> अगदी अगदी. राजच स्वप्न होत की त्याच नाव तो अन्शूला लावणार असतो. कारण तो अनाथ असतो.

शेवटी टियाला समजतं की जयमुळे आपला नवरा आणि आपली स्मृती गेली. तेव्हा ती एकदम casually म्हणते, त्यात काय, मेरे साथ ये सदमा कभी ना कभी तो हो ही जाता, अगर तुम्हारी वजहसे नही तो कोई और ये करता...म्हणजे हे एवढं सगळं झालं... पण what's the big deal? >>>>>>>>> तिची स्मृती शेवटपर्यन्त येत नाही. पिक्चर सम्पतो.

Pages