ईज्जत द्या

Submitted by ऋन्मेऽऽष on 14 January, 2022 - 12:41

मंगळवारी बायकोला लक्षणे दिसली.
बुधवारी तिची टेस्ट केली.
गुरुवारी तिचा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

बुधवारी मला लक्षणे दिसली.
गुरुवारी माझी टेस्ट केली.
शुक्रवारी माझा रिपोर्ट आला.
कोविड पोजिटीव्ह!

महेशच्या डॅम ईट स्टाईलमध्ये आपल्याच हातावर मूठ मारली आणि आनंदाने म्हणालो, येस्स!
त्याच उत्साहात बिग बॉसला फोन लावला. आता चार दिवस आराम करतोय, तू आणि तुझी कंपनी गेली तेल लावत हे सांगायला. अर्थात हे मनातल्या मनात. खरे तर कधी नव्हे ते त्याकडून थोडेसे आंजारून गोंजारून घ्यायचे होते. तर लावला फोन...

ट्रिंग ट्रिंग.. ट्रिंग ट्रिंग..
हॅलो सर.. आमच्याकडे कोरोना आलाय.. न्यूज कन्फर्म आहे.. हातात रिपोर्ट आहे.
बर्र.. मग आता पंधरा दिवस घरूनच काम कर.
अहो सर, ते तर गेले दोन वर्षे करतच आहे. आता जरा आराम करतो.
हम्मम ठिक आहे.. बरे वाटेल तसे ये ऑनलाईन. होम क्वारंटाईनमध्ये तसाही दोन दिवसांनी कंटाळाच येतो. तेवढेच काम होईल. काम खूप आहे आपल्याकडे..... (अजूनही पाचदहा मिनिटे बोलले काहीबाही. वर्कलोड, डेडलाईन, डेडीकेशन, सॅक्रीफाईज, वगैरे नेहमीचे हुकुमी शब्द तेवढे ऐकू आले.)

पुढे मग एक मेसेज सोसायटीच्या व्हॉटसपग्रूपवर सोडला. तिथे आधीच गेल्या महिन्याभरात चार कुटुंबात कोरोना शिरलेला. त्यात आमचे पाचवे जोडले.

हेल्लो ऑल.. वुई हॅव बीन टेस्टेड कोविड पॉजिटीव्ह.. आई हॅव क्वारंटाईन माय फॅमिली... वुई आर अ‍ॅण्ड वुई विल टेक ऑल नेसेसरी प्रीकॉशन्स.... वगैरे वगैरे ईन्फॉर्मेशन कम शपथग्रहणाचा कार्यक्रम झाला. माझे कुटुंब माझी जबाबदारी तसेच आपली सोसायटीही माझीच जबाबदारी हे सांगून झाले. तसे धडाधड मेसेज येऊ लागले.

- थॅन्क्स फॉर इन्फॉर्मिंग
- सात दिन बच्चों को नीचे खेलने मत भेजना.
- सात दिन के बाद आपका फ्लोअर सॅनिटाईज करवा के लेना.
- सोलर से गरम पाणी नही आता है. टाईम चेंज करो. (अरे याचे काय मध्येच)
- सॅनिटाईजेशन करवाने वालेका का नंबर सेक्रेटरीसे ले लेना
- भेज दिया भाय, बोलने के पहले ही भेज दिया. अपना काम ऐसेही रहता है - ईति सेक्रेटरी

वैतागून मोबाईल बाजूला ठेवला. पण ईतक्यात रिंग वाजली. नगरपालिकेचा फोन आला.
म्हटलं वाह. मायबाप सरकारलाच आपली काळजी.

नाव गाव फळ फूल विचारून झाले. काही विशेष होत नाही ना विचारले.
मी म्हणालो विशेष नाही. पण जरा थंडी, ताप, घश्याला खवखव, अंगदुखी, डोकेदुखी, नाही म्हणायला सकाळपासना थोडं......
बर्र बर्र.. (पाल्हाळ पुरे) घरीच होम क्वारंटाईन व्हाल ना. अ‍ॅडमिट नाही होणार ना..
नाही, तितके काही झाले नाही. पण तुम्ही औषधांच्या गोळ्या देता ना.. (कोणीतरी सांगितलेले मला हे)
ते फक्त अ‍ॅडमिट झालेल्यांना. अ‍ॅडमिट व्हायचे असेल तर तसे सांगा - फोन कट

पुढचे काही तास पुन्हा एकलकोंडेपणात गेले. ईंडिया मॅच सुद्धा हरली. निराशेत निराशा.

संध्याकाळी पुन्हा मोबाईल खणखणला.. बचना ए हसीनोss लो मै आ गयाss (माझी रिंगटोन)
सोसायटीतील चौदाव्या मजल्यावरील मिस्टर देवरुखकर यांचा फोन. म्हटलं चला शेवटी देवांक काळजी..

ह्यँ ह्यँ ह्यँ ... कसं झालं? कसे आहात आता?
बरा आहे तसा. (मगासच्या अनुभवावरून पाल्हाळ लावू नये हे आता कळले होते)
काही नाही ओ कोरोना वगैरे. पहिल्यासारखे घाबरायचे त्यात काही राहिले नाही. दोन दिवसात व्हाल बरे. तुम्हाला कळलं कधी झालेल्याचे?
अं.., मला बुधवारी आणि हिला मंगळवारी..
सोमवारी काही नव्हते?
मला तरी नाही.. आणि हिलाही तसे नाहीच.. मंगळवारीच आम्ही डॉक्टरकडे गेलो. का काय झाले?
काही नाही हो. बरा होतोय चार दिवसात. काळजी घ्या. - फोन कट

देवरुखकरांचा फोन का? सोमवारी मी त्यांच्या बायकोशी पॅसेजमध्ये बोलत उभी होती बराच वेळ. म्हणून कन्फर्म केले असेल काळजीने - ईति माझी बायको

म्हणजे देवांक सुद्धा आपल्याच कुटुंबाची काळजी होती तर..

छ्या, शेवटी मित्र ते मित्रच म्हणत मी पुन्हा मोबाईल उचलला. पुन्हा व्हॉटसप ओपन केले. कॉलेजच्या खास मित्रांचा ग्रूप ओपन केला. आणि मेसेज टाकला...

या संडेचे गेटटूगेदर कॅन्सल रे.. आमच्या घरात कोरोना शिरलाय.. मी आणि बायको दोघे पॉजिटीव्ह

- तुझ्या नानाची टांग. तू दरवे़ळीसारखी टांग दे आम्हाला
- तू चु नको बनवूस ऋ
- रिपोर्ट टाक पहिला साल्या तू
- तू कसा येत नाही बघतो आम्ही

मरा साल्यांनो.. घाला आपली ईथेच.. क्वारंटाईन पिरीअड संपल्यावर बोलू.. - मी ग्रूपमधून लेफ्ट

--------------------------------------

नाही म्हणायला दुपारी नगरपालिकेचे कर्मचारी आले. घरभर सॅनिटायझर शिंपडून गेले. बोलले काहीच नाही. तरीही कृतीतून काळजी दर्शवून गेले. मला तर तेवढ्यानेही गहिवरून आले. असे वाटले त्यांना मुन्नाभाईसारखे जादूची झप्पी द्यावी. कोरोनाने ते ही शक्य नव्हते, जसे आले तसे ते गेले.

पण या सगळ्या अनुभवांनंतर मनाशी पक्के ठरवले,
आता कितीही वाटले तरी मायबोलीवर कुठल्याही धाग्यावर याची बिलकुल वाच्यता करायची नाही.

पण मी काय म्हणतो,
कोरोना झालेल्यांना सहानुभुती नको लोकहो..
पण निदान त्या कोरोनाला तरी ईज्जत द्या _/\_
- ईति ऋन्मेष Happy

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमच्याकडे दुसऱ्या लाटेत समोरचं अख्खं घर पॉझिटिव्ह होतं (६ पेशंट्स) तेव्हा तर आमचीही चौकशी करायला पालिकेतून फोन आला होता. Happy

गेल्यावर्षी आमच्या मजल्यावरच्या एका घरी पालिकेचा स्टिकर लावलेला होता की इथे कोविड पेशंट आहे म्हणून.तर पाचव्या आणि 6व्या मजल्यावरच्याने मस्त दडवले होते.त्यांच्याकडे पालिकेची माणसे आलीच नाहीत.
यावर्षीही एका सदनिकेतील त्याच व्यक्तींना कोविड झाला होता.स्वयंपाकाच्या बाईला शेवटी शेजाऱ्यांनी सांगितले की तू त्यांच्याकडे जाऊ नकोस म्हणून.असेही नमुने आहेत.

पण सध्या सर हुमायुन मोड मधे न राहता ह्युमन मोड मधे आले आहेत >> Lol तो बिचारा हुमायून रोज शंभर वेळा तरी कबरी मधे तळमळत होता इतके दिवस कि सर मला विसरले कि काय ? आता सर बरे झालेत तर पन्ने पन्ने पे जगेगा हुमायून का नाम. वर पाचा तले फक्त पहिले चार बाफ सरांचे असे हिणवणार्‍या पोस्ट चा सर लवकरच हुमायून नेचरने हसत खेळत कोथळा काढतील . येते काही दिवस पहिली तिन्ही पाने फक्त सरांची असतील ह्यात मला अजिबात शंकाच नाही.

रिपोर्ट निगेटिव्ह आला.
शुभेच्छांमुळेच बरं होण्यास मदत मिळाली. सर्व मायबोलीकरांचे मनापासून आभार.

सध्या जे आजारी आहेत त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा.

माझी लक्षणं ओमायक्रॉनची होती. सगळीकडे साथ आहे. इकडे टेस्ट न करताच लक्षणे पाहूनच ट्रीटमेण्ट केली जाते. ओमायक्रॉनच्या टेस्टचा रिझल्ट अचूक नाही असे डॉक्टर्स म्हणतात. ओमायक्रीन सस्पेक्ट म्हणून आधार कार्डच्या नंबरासहीत अधिकार्‍यांकडे कळवल्याने नंतर निगेटिव्ह सर्टिफिकेट अनेक ठिकाणी लागते. आता मुलीला लक्षणे आहेत.

घाई झाली इकडे लिहायची. आता रिपोर्टच मिळाला. एक सँपल निगेटिव्ह आहे. हेच मला कळवले होते.
पण दुसरे पॉझिटिव्ह आले आहे. सार्स कोवि २. पुन्हा करावी लागेल टेस्ट.

या दोन वेगळ्या टेस्ट आहेत?
मला वाटलं टेस्ट मध्ये त्याचा व्हेरियन्त कळत नाही फक्त सिव्हीरीती कळते त्या नंबर वरून

टेस्ट एकच आहे. सॅंपल दोन ठिकाणी दिले होते. संध्याकाळी डॉक्टरांशी बोलल्यावर समजेल.

ओके, कारण मलाही ते चेक करायचं होतं की ओमयक्रोन झालाय का डेल्टा का जुना कोरोना
पण रिपोर्ट मध्ये तसे काहीही लिहिलं नव्हतं
नुसतं डिटेक्टेड एवढं छापून दिलं

मला या टेस्ट बद्दल पण आता शंका येऊ लागली आहे
नुसती टेस्ट नाही एकंदर या व्यवस्थेबद्दलच

ओमायक्रॉनबद्दल सुरूवातीलाच वाचले होते की त्याचा संसर्ग खूप जोरात आहे, पण तो तितका जीवघेणा नाही. पॅरासिटॅमॉल, कफ सिरप गरज पडल्यास आणि प्रोटीन्स यावर तो बरा होतो. डॉ. दिलीप देवधरांनी तर खुले पत्र लिहीले आहे. मुलीची ट्रीटमेंट वेगळ्या डॉक्टरांकडे चालू आहे. ती मायनर असल्याने मुलांसाठीचे डोस जिथे झाले त्यांनी आता तिच्या टेस्ट्स घेतल्या आहेत. मी तर खूप गोंधळून गेलो आहे. दोन्हीकडे बोलल्यावर थोडा प्रकाश पडेल.

घाबरू नका शांत माणूस. पेशन्स ठेवा. औषधोपचार चालू ठेवा. आमच्याकडेही सर्वात छोट्या असलेल्या ४ वर्षाच्या मुलाची अवस्था सगळ्यात बिकट होती. तीन दिवस ताप होता जो उतरतच नव्हता. त्यातले पहिले दिवस सडकून होता. दर तासाने धुवा पुसा पट्ट्या ठेवा मारून मुटकून औषध पाजा हेच चालू होते दिवसरात्र. डॉक्टरलाही रात्री दिड दोन वाजता फोन केलेले. पण तो म्हणाला की ताप डोक्यात जाणार नाही याची काळजी घ्या अन्यथा अ‍ॅडमिट करावे लागेल. जे या सिच्युएशनमध्ये टाळायला बघा. घरात आहात तेवढे सेफ आहे. बाहेर संसर्ग टपला आहे. तीन दिवसांनी ताप उतरला. आता तो व्यवस्थित आहे. तुमचेही व्यवस्थित होईल.

आमच्याकडेही आम्ही ५ ही जण पॅाझिटिव्ह. ९.५ वर्षाच्या मुलाचा खोकला १ आठवड्यानंतर पण थांबत नाहीय. औषधं चालू आहेत पण काळजी वाटतेय.बाकीच्यांचं बरं आहे आता.
सर्वांनी काळजी घ्या.

Pages