हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ८: ग्रामीण जीवनाची झलक

Submitted by मार्गी on 17 January, 2022 - 01:42

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ४: गूंजीच्या दिशेने...
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ५: है ये जमीं गूंजी गूंजी!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ६: गूंजीचा हँगओव्हर!
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ७: सत्गड- कनालीछीना ट्रेक

१ नोव्हेंबरचा दिवस. सत्गडमधली थंड सकाळ! परवाच्या प्रवासानंतर आता थोडा त्रास होतोय. पोटाला त्रास झाला. तीव्र थंडी, प्रवासाची दगदग आणि हॉटेलचं खाणं ह्यामुळे अखेर त्रास झालाच. त्यामुळे थोडा आराम करावासा वाटला. पण इतकाही त्रास नाहीय की, रोजचा इथलं फिरणं चुकवावं लागेल. त्यामुळे आवरून सत्गड हा गड- उतार होऊन खाली रोडवर आलो आणि फिरण्याचा आनंद घेतला. फास्ट वॉक करताना हळु हळु हुडहुडी कमी झाली आणि ताजं वाटलं. काही अंतर फिरल्यावर परत निघालो. वाटेमध्ये आमच्या एका नातेवाईकांचं हॉटेल आहे. त्यांच्याकडे गरम चहा घेतला. घरी नेण्यासाठी आलू पराठे पार्सल घेतले. तोपर्यंत त्यांच्यासोबत छान गप्पाही झाल्या.


.

ह्या भागातले अनेक जण शहरांमध्ये स्थायिक आहेत. दिल्ली, मुंबई- महाराष्ट्र अशा जागी ते मुख्यत: गेलेले आहेत. खूप जण हॉटेल लाईनमध्येही काम करतात. घरामधून एक जण तरी बाहेर शहरामध्ये असतो. पण कोरोनाच्या काळामध्ये आलेल्या विपरित परिस्थितीमुळे त्यातले बरेच जण गावी परतले. ह्या नातेवाईकांनी पुण्यातून इकडे परत येऊन आधीचं छोटं हॉटेल परत सुरू केलं. आता ते त्यांना वाढवायचं आहे. पण कोरोनाचा कहर सुरू असताना ते शक्य होत नाहीय. इतरही ठिकाणचे लोक असेच बाहेरगावी गेलेले कोरोनामुळे परत आले आणि आता ते गावातच नवीन उद्योग सुरू करत आहेत. इकडच्या गावांमध्ये उद्योग-धंदे तसे कमीच आहेत. मोठे धंदे तर मोजकेच- शेती, मिलिटरी, पर्यटन किंवा हॉटेल- ड्रायव्हिंग. त्याबरोबर आता जिथे शहर आहेत, थोडी दाट वस्ती आहे, तिथे इतरही व्यवसाय सुरू होत आहेत जसे- जिम, ब्युटी पार्लर, मोबाईल शॉप व इतर. शहरामध्ये काही वर्षं काम करून तरीही गावात स्थायिक होणा-या ह्या लोकांचं खूप कौतुक वाटतं. पहाड़ी भागात निसर्गाच्या सान्निध्याचे सर्व लाभ त्यांना मिळतात. पहाडी समज, शहाणपणा, नैसर्गिक साधेपणा हे गुण आहेत व त्याबरोबर शहरामध्ये अनेक वर्षं काम केल्यामुळे बाहेरच्या जगातल्या गोष्टी, नवीन कौशल्ये, बुद्धीमत्तेला पडलेले पैलू अशाही जमेच्या बाजू त्यांना मिळाल्या आहेत! आणि आता ते त्यांच्या गावालाही आणखी समृद्ध करत आहेत. असो.


.

पराठा पार्सल घेऊन सत्गडला परत आलो. मस्त फिरणं झालं. त्याशिवाय दुपारीही एकदा परत खाली येऊन गेलो. ट्रेकिंगची अशी मस्त चंगळ सुरू आहे. सत्गडसारखं गाव आणि हिमालयाच्या शब्दश: कुशीत राहणारे लोक जवळून बघायला मिळत आहेत. हिमालय, हिमालय म्हणून आपण बाहेरच्या लोकांना खूप कौतुक असतं. खूप ओढ असते. हिमालयात गेल्यावर सर्व शांती मिळेल असं वाटत असतं. पण जे लोक प्रत्यक्ष हिमालयातच राहतात, त्यांच्या बाबतीत कशी स्थिती‌ असेल? इथे त्याचं उत्तर मिळत आहे. इकडच्या लोकांना निसर्गाच्या सान्निध्याचे अनेक लाभ आहेतच. पण त्यामुळे त्यांच्या जीवनात सर्व आनंदी आनंद व शांती- समाधान आहे का? तर तसं नाही. इकडेही तणाव आहेत. अनेक समस्या आहेत. अंधश्रद्धा, मागासलेपण आहे. त्याबरोबर आरोग्याच्या सुविधांच्या समस्या आहेत. पुरुषप्रधान संस्कृती, स्त्रियांचं शोषण आहे. व्यसनाधीनता खूप मोठ्या प्रमाणात आहे. अक्षरश: उडता पंजाबसोबत कुठे कुठे तुलना करता येईल इतकी. त्यामुळे इथला सर्व युवा वर्ग तितका सक्रिय आणि चांगल्या कामांमध्ये गुंतलेला आहे, असं म्हणता येत नाही. शिवाय निसर्ग- मानव संघर्ष आहे. नैसर्गिक आपत्तीमधली अनिश्चितता आहे आणि वन्य श्वापदांच्या हल्ल्यांचं सावटही आहे. हे सगळं बघताना वाटतंय की, केवळ हिमालयामध्ये असून शांती- समाधान मिळू शकत नाही. त्यासाठी आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते. आपल्या आतला हिमालय शोधावा लागतो. आणि मग तशी शांती- समाधान कधी ढळू शकत नाही.


.

दुपारी थोडा आराम केला. सोबत आलेले मित्र आज परतीच्या प्रवासाला निघाले. आणि अदूचे मामा- मामी दिल्लीवरून पोहचले. आम्ही लवकरच बुंगाछीना गावामध्ये एका पूजेसाठी जाऊ. मामा- मामी दिल्लीवरून बसने थकवणारा प्रवास करून आले तरी थकले नव्हते. मामाने मुलांसोबत क्रिकेट खेळून त्यांना तुफान दमवलं. मुलांना त्याला आउटच करता येत नव्हतं. आणि मामी तर पहिल्यांदाच हिमालयात येत होत्या, प्रवासाचा त्यांना तसा त्रास झाला नाही आणि त्यांनी तर चक्क पिथौरागढ़ ते सत्गड ह्यामध्ये काही अंतर जीपसुद्धा चालवली. अशी गंमत. माझ्या तब्येतीचा मात्र थोडा खेळ झाला. दुपारचं जेवण जेवल्यावर घशाखाली उतरलंच नाही. दिवसभर पोट गच्च राहिलं आणि अखेरीस रात्री उलटी केल्यावर हलकं वाटलं. उद्या बुंगाछीनाला जाऊ आणि तिथे परत एकदा मस्त फिरायला मिळेल. इथे असतानाचा एक एक दिवस पुरेपूर फिरायचं आहे.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ९: अदूसोबत केलेला ट्रेक

माझे ध्यान, हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

वाचतोय.
करोनामुळे घरवापसी केलेल्यांचे प्रमाण आणि त्यामुळे गावावर झालेला बरा-वाईट परिणाम याबद्द्ल अजून वाचायला आवडेल.
आपल्या आतल्या हिमालयाची साथ मिळवावी लागते हे पटलं आणि आवडलं

छान झालाय हाही भाग!
आमच्या नवीन कामवाल्या बाई उत्तराखंड भागातल्या आहेत. हे कळल्यावर मी त्यांना म्हटलं, मी तिकडे फिरायला गेले होते. किती छान आहे ना तिकडे. तर म्हणाल्या, घूमने जाओ तो सब अच्छा ही लगता है! मी मनात म्हटलं बरोबर आहे. उगाच कुणी इतक्या दूरवर येऊन केर-फरशी करत नाही.