मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … ) भाग -१

Submitted by Sujata Siddha on 8 January, 2022 - 05:23

मक्तू SSSSSSब !!...(The Destiny … )
भाग -१

“प्रिय मानस ,
घरातल्या घरात तुला मी पत्र लिहितेय याचं तुला नवल वाटेल , पण समोरासमोर बोलण्यासाठी तुला वेळच नसतो , निदान पत्र लिहिल्यावर उत्सुकता म्हणून तरी वाचशील केवळ या आशेने लिहितेय ,
...खरं तर आपलं लग्न परिचयातून झालं असं आपण म्हणतो पण , परीचय कितीसा होता असा आपला ? एका ठराविक देवळात आपण यायचो आणि आपल्या येण्याच्या वेळा सारख्या असायच्या , आपण एकमेकांना पहायचो एवढाच आपला परिचय , पुढे कोणीतरी पुढाकार घेऊन तुझं स्थळ माझ्यासमोर आणलं , जनरल सर्व गोष्टी ज्या बघतात मुलाच्या बाबतीत त्या म्हणजे नोकरी , घर हे सगळं ठीकठाक आहे असं बघून माझ्या बाबांनी हो म्हटलं ,आपलं लग्न ठरल्यानंतर मध्ये सहा महिन्यांचा अवधी होता , प्रत्येक जोडप्यासाठी हा काळ किती मखमली असतो तुला माहितीये ना ? प्रेमाचा इंद्रधनू या काळातच खुलतो ना ?, त्याचे निरनिराळे लोभस रंग याच काळात बघायला , अनुभवायला मिळतात ना? , या गुलाबी स्वप्नाची गोडी प्रत्येक जण चाखतो ना? , गरिबातला गरीब आणि श्रीमंतातला श्रीमंत देखील ? , मीही त्याच अनुभवाची प्रतीक्षा करत होते पण काय बिनसायचं प्रत्येक वेळी माहिती नाही , मी घरी यायचे ती रडतच , प्रत्येक वेळी अपेक्षाभंग हा ठरलेला ,(निदान माझा तरी ) खूप भेटी , महागाडी गिफ्ट्स घ्यावीत असं काही नाही , पण निदान माझे विचार , माझ्या आवडी निवडी काय आहेत याबद्दल तुला उत्सुकता असावी , त्याबद्दल जाणून घ्यायची तुझी ओढ मला दिसावी , तसे सगळे सर्वसामान्यच असतात रे तरीही प्रत्येकाला आपल्याला ‘विशेष’ समजणारी व्यक्ती आपल्या आयुष्यात यावी असं वाटत असतं ,मलाही तेच वाटत होतं आणि तुलाही तेच वाटत असणार , ते तसं तुला वाटावं याची मी खूप काळजी घेतली . पण तु घेतलीस , निदान एकदा तरी ?... आता आपलं लग्न झालंय अजून जेमतेम महिना पण नाही झालाय , मी अजूनही वाट बघतेय , शब्दातून नाही निदान कृतीतून तरी तू मला मी तुला किती आवडते हे दाखवून द्यावं . आठवतं का एकदा मी तुला विचारलं पण होतं , “की तुला माझ्याशी लग्न करण्यात नक्की इंटरेस्ट आहे ना ? “ तू तेव्हा मला उडवून लावलं आणि काहीतरी दुसरंच बोलत बसलास , तुला असं नाही का रे तेव्हा वाटलं की लग्न दोन महिन्यांवर आलं असताना एखादी मुलगी असं का विचारत असेल ? तु इतकं गृहीत धरलं होतंस मला की काहीही झालं तरी , तुझ्याकडून काहीही नाही मिळालं तरी मी तुला सोडून कुठेही जाणार नाही याची खात्री होती तुला ? की बेफिकीर होतास आणि अजूनही तसाच आहेस? खरं तर मी खूप कन्फयुज होते त्या काळात पण लग्न पुढे ढकलावं याचं धाडस नव्हतं माझ्याजवळ , बाबांची भीती , आईची ,धाकट्या बहिणींची काळजी वाटायची शिवाय मला वाटायचं की लग्नानंतर सहवासातून आपलं नातं फुलेल , पण आता लग्न होऊन एक महिना होत आला , अजूनही तीच परिस्थिती आहे . रोज संध्याकाळी ऑफिस मधून येताना तु जिन्यावरून धाडधाड पळत वर येतोस , त्यावेळेला मी वहिनींबरोबर स्वयंपाक घरात काम करत असते असते पण माझे कान तुझ्या त्या आवाजाकडे लागलेले असतात , मला असं वाटत असतं कि तु माझ्यासाठीच असा धावत येतोस ,पण तसं नसतं , तू ऑफिसमधून येतोस आणि मोजून दहा मिनिटात कपडे बदलून परत धाडधाड जिना उतरून मित्रांमध्ये गप्पा ठोकायला निघून जातोस , ते थेट रात्री १० वाजताच घरी येतोस .असं का वागतोस ? आपल्या नववधूला असं कोण टाकून जातं ? कित्ती बोलायचं असतं मला . असं वाटतं की तुझ्या विश्वात मी नाहीच आहे .किंवा मग तू सगळं आधीच अनुभवून बसलायस आणि त्यामुळे नव्याने तोच खेळ खेळायला तू उत्सुक नाहीयेस , अशा वेळेला मी काय करावं ? विशेषतः माझ्या विश्वात तुझ्या शिवाय कोणीच नसताना ? ,कारण घरात तुझी आई आहे , वाहिनी आहे , भाऊ आहे हि पण सगळी लोकं आपापल्या कोषात वावरतायंत , त्यात आपलं प्रेमाचं कोणी नाही असं वाटतं , असं वाटतं की त्यांच्या मनाविरुद्ध मी या घरात आलेलं आहे , मला त्यांच्याबद्दल तक्रार नाही करायची कारण हि सगळी नाती तुझ्यामुळे जोडली गेली आहेत माझ्याशी. तुलाच जर माझ्याबद्दल प्रेम वाटत नसेल तर त्यांना कसं काही वाटेल माझ्याबद्दल ?अशा वेळी मी मग माझ्या आईची ,माझ्या बहिणीची ,माझ्या सगळ्या प्रेमाच्या माणसांची आठवण येऊन रडत बसते , कुठे येऊन पडले मी असं वाटतं ,मानस मला तू हवा आहेस , तुझं प्रेम हवं आहे ,खूप एकाकी पडले आहे रे मी या घरात , प्लिज मला समजून घे , …”
पत्र लिहिता लिहिता माझे डोळे भरून झरझर वहायला लागले , रडत रडतच मी त्याची घडी घातली आणि कपाटात ‘मानस’ चा शर्ट हँगरला अडकवला होता त्याच्या वरच्या खिशात ती चिट्ठी ठेवली . तितक्यात स्वयंपाक घरातून भांडं आदळल्याचा आवाज आला तसं मी दचकून घड्याळात बघितलं चार वाजले , चहाचं आधण गॅस वर ठेवलेलं दिसतंय , अरे देवा ,पत्र लिहिण्याच्या नादात लक्षात आलं नाही किती वेळ झाला , सासूबाईंना राग आलेला दिसतोय . मनाशी विचार करत मी किचन मध्ये आले , सासूबाई घुश्श्यात होत्याच , मी लगबगीने गॅस जवळ गेले , “ठेवलाय मी !.. “ ठसक्यात उत्तर आलं, , खूप टेन्शन आलं मला , आता त्या चिडतील आणि आदळआपट करत बसतील , असं वाटत होतं ,मग लागलीच माघारी वळून मी पुन्हा बेडरूममध्ये गेले , या मेल्या माझ्या रूम ला एकही खिडकी नाही कारण , ती पूर्वीची स्टोअर रूम होती त्यामुळे तिथे सदैव अंधार ,तोच अंधार मनात घेऊन मी घरभर वावरत असे . तेवढ्यात सासूबाई माझ्या रूम च्या दाराशी आल्या , “ए SSSSS आज सकाळी फर्निचर पुसायचं राहिलंय तेवढं पुसून घ्यावं , ‘माऊ’ चं दूध गरम करून ठेवावं , ती उठेल आत्ता , तेवढं झालं की सकाळचे घासलेले डबे कपड्याने पुसून ,कोरडे करून पालथे घालून ठेवावेत , चार वाजले तरी तस्सेच आहेत , ” मी निमूट पणे सांगितलेली काम करायला घेतली. खूप डोकं फिरलेलं होतं माझं , मला काही नाव नाही का ?ए काय ए ? पण काही उलटून बोलायची सोय नव्हती , एकतर मी नवीन ,त्यात जर काही उलटं बोलले तर ‘मानस’ ला राग येईल आणि आपल्या आई वडिलांचा उद्धार होईल , किंवा मी वाईट सून आहे असा शिक्का माझ्यावर बसेल अशी भीती सतत माझ्या मनात रेंगाळत राहते . मग मी स्वतःवरच चरफडते . असा सगळा पचका झालेला आहे माझा , सुमती क्षेत्रमांडयांच्या कादंबऱ्या वाचत त्यातल्या गुलाबी स्वप्नांमध्ये रमत माझं तारूण्य उमललं ,घरी , कॉलेज मध्ये , बाहेर सगळीकडे मी सर्वांची खूप लाडकी होते , सतत माझ्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव व्हायचा , तुमची ‘उल्का ‘ किती गोड आहे , एवढी सुंदर आहे तरी आपल्या रूपाचा तिला गर्व नाही , अगदी लाखात एक देखणी आहे , अभ्यासात हुशार आहे , वैगेरे वैगेरे , त्या स्तुती सुमनांच्या ढगांवरच तर तरंगत मी , गोखल्यांच्या घरात आले , आणि मग इथल्या तिरस्कारच्या सुयांनी माझे नाजूक ढग फुटले . इथे यांच्या वेगळ्याच अपेक्षा , घुमीच आहे , बोलतच नाही हे तोंडावर आणि ( माहेरहून काही आणलंच नाही , हा मनातला सूर ), त्यात ‘मानस’ चं असं उपेक्षित वागणं , खूप त्रासले आहे मी या सगळ्याला म्हणून मग शेवटी मानस ला चिट्ठी लिहिली.
संध्याकळी मानस आला , मी नेहेमीसारखी स्वयंपाक घरात , त्याचा जिन्यावरून पळत येतानाचा आवाज ऐकला तशी माझ्या छातीत धडधड सुरू झाली , आता हा आत गेला की शर्ट बदलताना चिट्ठी वाचेल , सापडेल का त्याला ? मी निमूट पणे काम करता करता वाट बघत होते , आणि काय आश्चर्य , दहाव्या मिनिटाला मानसची हाक ऐकू आली , ‘उल्का SSS ‘.., मी पळतच रूम मध्ये गेले, “चल आज बाहेर जाऊ जेवायला “ “ आलेच वहिनींना सांगून ,” माझा आनंद गगनात मावेना , मनात म्हटलं साहेबांनी चिट्ठी वाचलेली दिसतेय , आणि आता प्रयत्न करत असतील सुधारण्याचा , चला ‘देर आए दुरूस्त आए !.. ‘ चिट्ठी लिहिण्याचा हा शहाणपणा मला आधी का नाही सुचला , इतके दिवस उगाच रडत घालवले , मनातल्या मनात मी ‘मानस’ ने न उच्चरलेल्या कबुलीजबाबाची स्वप्न बघत होते , तेवढ्यात बाहेरून सासूबाईंचा , मोठ्याने बोलल्याचा आवाज आला , ‘’पाणी आलं नाहीये संध्याकाळचं नळाला , आता खालून पाणी भरावं लागणार , ‘सुनीता ‘तर आत्ताच आली ऑफिस मधून , “ आवाज ऐकला मात्र निमूट बादल्या घेऊन खाली गेले .सासूबाईंची सवयच होती ती , काही काम सांगायचं असलं की मी जिथे असें तिथे येऊन मोठ्यांदा बोलायचं , की मी रोबोट सारखं ते काम करून टाकते हे त्यांना माहिती असायचं ,पुढची अनेक वर्ष ती त्यांची सवय कायम राहिली आणि माझीही . .. सगळं पाणी भरेपर्यंत आठ वाजून गेले , नाही म्हटलं तरी थोडा उत्साह मावळलाच होता तरीही आवरायला घेतलं तोवर जाऊबाईंची कन्या रूम मध्ये हजर , तिला काकाचा खूप लळा असल्याने आणि फिरायची हौस काकाशिवाय पुरी करणारं कोणीच नसल्याकारणाने ती आमच्या बरोबरच येणार हे ओघानं आलंच . अरे हो ते सांगायचं राहिलंच , माझे मोठे दिर म्हणजे आमच्या ‘माऊ ‘चे बाबा (माऊ म्हणजे जाऊबाईंची तीन वर्षाची मुलगी , तिचं खरं नाव ‘आर्या ‘) , ते उच्चं शिक्षित होते पण लग्नाआधी १५ दिवस त्यांची नोकरी गेली आणि ते बेकार झाले , एक सुटली तरी दुसरी लागेल या आशेवर घरच्यांनी लग्न लावून दिलं पण मुलीकडच्यांना कळवलं नाही , लग्नानंतर महिना झाला तरी नवरा घरातच आहे हे बघितल्यावर सुनीता ताईंनी साहजिकच सासूबाईंना विचारलं की हे घरीच कसे ? त्यावर अगदी ठसक्यात त्यांना उत्तर मिळालं ,” हो गेलीये त्याची नोकरी , पण म्हणून काय झालं , करणारच आहे तो आज ना उद्या “ पण तो आजही कधी उगवला नाही नी उद्याही नाही . सुनीता ताईंनाच शेवटी नोकरी शोधून स्वतः:चा आणि मुलीचा खर्च बघावा लागला ,त्याच दरम्यान माझे सासरेही गेले त्यानंतर सहा वर्षांनी मी या घरात लग्न करून आले ,त्यावेळी मानस घरातला कर्ता होता कारण जाऊबाई नोकरी करत होत्या त्यात फक्त त्यांचा स्वतः:चा वरखर्च भागत असे ,त्यांना पगार फारसा मिळत नसे ,पण ना हे कधी त्या ‘मानस ‘ ला विश्वसात घेऊन बोलल्या ,ना सासूबाईंना, त्यामुळे सगळ्यांचं करावं लागतं, पैशाची मदत घरात कुणाचीच नाही या वैतागात ‘मानस’ , या सगळ्याचा काहीच संबंध आपल्याशी नसून आपण सासू आहोत आणि तो हक्क आपण गाजवलाच पाहिजे या रूबाबात सासूबाई , त्यांच्या या अटीट्युड मुळे सतत संतापलेल्या जाऊबाई आणि कुठल्याही गोष्टीचा परिणाम आपल्यावर होऊ न देता निर्लेप पणे वावरणारे त्यांचे मिस्टर म्हणजे माझे मोठे दिर , अशा दिव्य कुटुंबात माझी एंट्री झाली ,परिस्थितीची कोणतीही पुर्व कल्पना ‘मानस’ ने मला दिली नव्हती . या सगळ्यात माझी काय चूक ? सासूबाईंचा ठसका , जाऊबाईचा धुमसलेला राग ,आणि ‘मानस ‘ची बेफिकीर वृत्ती यात दिवसेंदिवस मी पिचून जाऊ लागले .

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

शीर्षक आवडलं (इंग्लिशमध्ये अर्थ लिहिल्याबद्दल धन्यवाद), मक्तूब हा शब्द मी प्रथमच ऐकला.
कथेची सुरुवात इन्टरेस्टिंग, कथेच्या शीर्षकामुळे उत्सुकता वाटतेय ... पु. भा. प्र.