व्हॅम्पायर गर्लफ्रेंड

Submitted by चैतन्य रासकर on 12 December, 2021 - 03:43

“माझी गर्लफ्रेंड व्हॅम्पायर ए.”
“काय?”
“व्हॅम्पायर गर्लफ्रेंड?”
गर्लफ्रेंड आगाऊ, मनमिळाऊ किंवा कामचलाऊ असू शकते, पण डायरेक्ट व्हॅम्पायर?

इरा चहाचा कप खाली ठेवत म्हणाली, “निऱ्या, काही काय बोलतोयस?”
तेव्हा नीरव खाली बघत म्हणाला, “तुमचा विश्वास बसणार नाही..”
“माझा विश्वास, बसला नाही, उडालाय”
माझा विश्वास तर भूमिगत झाला होता. व्हॅम्पायरच्या बाबतीत माझ्या डोक्यात फारच अंधार होता, म्हणून मी विचारले “व्हॅम्पायर म्हणजे तेच ना ते आपले.. ज्यांचा चंद्रप्रकाशात कोल्हा होतो..”

“नाही रे... ते आपले वेअरवूल्फ. व्हॅम्पायर टॉयलाइट मूव्हीमध्ये होते ना?”
“पण त्यात ते इच्छाधारी लांडगे होते ना?”
“इच्छाधारी लांडगे?? लांडगा इच्छाधारी कधीपासून झाला?” इरा तर इरेला पेटत म्हणाली.
नीरव प्रोफेसर मोडमध्ये सांगू लागला, “अरे कसं असतं, इच्छाधारी लांडगे वेगळे, चंद्रप्रकाशातला कोल्हा वेगळा आणि व्हॅम्पायर वेगळे.”

हे आगळंवेगळं ऐकून मला मळमळू लागलं. मी, नीरव आणि इरा आयुष्यातील सगळी कामं उद्यावर ढकलून, आज भेटलो होतो. या कुटिल वेळी लॉकडाउन शिथिल झालं होतं, लोकं कशात कुठे रमतीलं? असं काही राहिलं नव्हतं. त्यात ही कातरवेळ, म्हणजे संध्याकाळ. कसं ए, आमच्याकडे कातरवेळी अजून तरी सकाळच्या आलेल्या नाहीत.

नीरवने मला आणि इराला, त्याच्या रूमवर बोलावलं होतं. नीरव आणि त्याची व्हॅम्पायर गर्लफ्रेंड लॉकडाउनमध्ये एकत्र राहत होते. पण आता त्याची गर्लफ्रेंड भोपळा आणायला बाहेर गेली होती. ती भोपळ्याची बर्फी करणार होती. तो भोपळा नसून वांगी असावीत. ती वांग्याचं भरीत करणार असावी, अशी माझी तरी इच्छा होती.
भरीत इज माय फेव्हरेट!!
भरीत बघून मला भरून येतं.

नीरवचा फ्लॅट लै स्वच्छ होता. फरशी काय, आम्ही ज्या गादीवर बसलो होतो, ती सुद्धा चकाकत होती. यात नक्कीच पोरीचा हात असणार किंवा पाय असणार. नीरव काय घंटा स्वच्छ करतोय? नीरव आपला दोन चड्ड्या वापरणारा माणूस. दुसरी चड्डी पायपुसणं म्हणून वापरायचा.

‘आयुष्याबद्दल काय वाटतंय?’ हे बोलून झाल्यावर आम्ही ल्युडो खेळणार होतो, पण ऐन वेळी फासे मिळाले नाहीत. त्यात नीरवचं वजन वाढलं होतं, म्हणून तो सारखा आरशासमोर जाऊन, शर्ट वर करून त्याचं पोट आरशात बघत होता.
हाच तो!! हातावर पोट असलेला माणूस!!

त्याचं असं पोट बघणं आमच्या अंगावर आलं.
“काय झालं?” असं विचारल्यावर नीरव म्हणाला, “माझ्या पोटात धस्स होतंय.”
"आम्हाला नाही बघायचं तुझ्या पोटातलं धस्स” असं म्हणत इराने आग लावली. आग लागल्यावर त्याची शेकोटी कशी होईल? हेच मी बघत होतो, म्हणून मी नीरवला विचारलं, "काही झालंय का?"

"माझी गर्लफ्रेंड व्हॅम्पायर ए" असं सांगून नीरवने वणवा लावला.
"व्हॅम्पयार म्हणजे ते दुसऱ्याच्या गळ्यातून रक्त पितात ते ना?" माझं गूगल सर्च करून झालं होतं.
“हो, बरोबर, म्हणूनच ती माझ्या प्रेमात पडली.”
“का?”
नीरव स्वतःच्या गळ्यावरून हात फिरवत म्हणाला, “कारण लहानपणापासूनच माझा गळा गोड ए..”
इन शॉर्ट गळा बघून गळ्यात पडली!!
“निऱ्या.. अरे गायकांचा गळा गोड असतो.”
“हो मला माहितेय, पण ती सारखी माझ्या गळ्याकडे बघत असते, तेही चोरून.”
बाप रे.. मान बघून टर्न ऑन होते!! ही तर लै फेटिश निघाली.

पण हे व्हॅम्पायर प्रकरण माझ्या गळी उतरत नव्हतं.
हे प्रकरण गळ्याशी आलंय का नाही? हे बघण्यासाठी मी विचारलं, “एवढ्यावरून ती व्हॅम्पायर कशी होईल?”
“एकतर तिची नजर नेहमी माझ्या गळ्यावर असते,” नीरव गळ्यात आवंढा आल्यासारखा म्हणाला “दुसरं म्हणजे ती खूप थंड ए.”
“थंड? कशाने? स्वभावाने का डोक्याने?”
“अंगाने, अंगाने ती खूप थंड ए.”
बाप रे, थंड गर्लफ्रेंड? हॉट, कोमट, नरम, मऊ, मसालेदार गर्लफ्रेंडबद्दल ऐकलं होतं. ही तर थंड निघाली!!
नीरव चिवडा खात म्हणाला, “म्हणजे कसं आपण असे, उष्ण कटिबंधात राहतो ना,”
बाप रे अवघड शब्द, याला कसा काय माहीत?

“पण त्या दिवशी मी तिला हात लावला,” नीरव स्वतःच्या उजव्या तळहाताकडे बघत म्हणाला, “तर ती खूप थंड वाटली.”
“तुम्ही हात लावता?” असं इराने विचारताच, नीरव रिक्षात बसतात तसा अंग चोरून बसला.
“गर्लफ्रेंड म्हटल्यावर कधीतरी हात लावावा लागत असेल ना,” मी हातचं राखून म्हणालो. ‘कसा होता रे पहिला स्पर्श?’ असं मी विचारणार होतो, तेवढ्यात इराने विचारलं, “तू हात लावल्यावर ती पाय लावते का?”

“हो, त्या दिवशी मी तिला फूट मसाज देत होतो.”
हा चेंगट साला, कधी सुट्टे पैसे देत नाही, पोरगी म्हटल्यावर आता फूट मसाज देतो.
“तेव्हाच मला डाउट आला, हिचं अंग थंड ए.”
मी स्वतःला हात लावत म्हणालो, “व्हॅम्पयार थंड असतात का?”
“हो, त्यांचं रक्त असं गोठलेलं असतं, त्यामुळे इतरांपेक्षा ते थंड असतात” असं म्हणत नीरव किचनमधल्या फ्रिजकडे गेला. “मला माहितेय, तुम्हाला हे सगळं पचत नसेल.”

“हो, कारण मला पांचट काहीच पचत नाही” असं इराने म्हटल्यावर नीरव म्हणाला, “एकदा आम्ही अंघोळ करत होतो.”
हे ऐकून मला घाम फुटला!!
"का?" असं इरा वैतागून म्हणाली. या "का"मध्ये, ‘आम्ही का तुझी अंघोळ ऐकू??’ असं मोठं वाक्य दडलं होतं. हीच का ती प्रेम उधळून पाणी बचत? हा प्रश्न टाळून मी दुसरा नॉर्मल प्रश्न नीरवला विचारला.

“तुम्ही दोघे एकत्र अंघोळीसुद्धा करता?”
“हो, आधी करायचो, पण मागच्या वेळी बाथरूम मध्ये पडलो.”
“का? पाण्यात खेळात होतात का?” असे इराने विचारले.

यावर नीरवने ते तीन मिनिटं ते कसे अंघोळ करत होते? बाथरूम निसरडं झालं होतं, त्यात पायाखाली साबण आला, मग पायात पाय आला आणि मग ते कसे पडले? असं इरॉटिक वर्णन करून, फारच बारीक तपशील दिले आणि शेवटी म्हणाला, “त्यामुळे तिची कंबर लचकली, आता ती बसून अंघोळ करते.”

“आणि तू काय तिला पाणी घालतोस?”
“नाही, मी आता पहाटेच अंघोळ करतो. त्या दिवशी ती जोरात अंघोळ करत होती, म्हणून मी हा फ्रीज हळूच उघडला” असं म्हणत नीरवने तो फ्रिज आमच्या समोर उघडला. हा पोऱ्या लै ड्रॅमॅटिक झालाय.

हा फ्रिज जुना असावा किंवा आधी हा फ्रिजही नसावा, काय माहीत? हा फ्रीज इतका जुना होता, की या फ्रीजच्या पहिल्या मालकाचा आता दुसरा पुनर्जन्म झाला असावा. मी फ्रिजकडे बघत विचार करू लागलो. या थंड मुलीचा फ्रिज गरम असेल का? इरा उठून त्या फ्रीजकडे गेली. मी उठणार होतो, पण एकदा बसलो की मी तीस मिनिटं उठतच नाही. हो हेच ते माझं सेल्फ लव्ह!!

“काय बघू?” असं इराने विचारल्यावर, नीरवने एक काचेची बाटली फ्रीजमधून काढून इराच्या हातात दिली. आपण किती ही पुरोगामी झालो तर, ‘बाटली’ म्हटल्यावर आपल्या डोक्यात एकच बाटली येते, ती म्हणजे औषधाची बाटली!! पण ही बाटली जरा वेगळी वाटत होती. त्या बाटलीत किरमिजी रंगाचं काहीतरी होतं. किरमिजी म्हणजे कोणता रंग? तर लाल रंगाची कोणतीही शेड इमॅजिन करू शकता.

“हे काय लाल रंगाचं ए??”
“रक्त”
हे ऐकताच इराच्या हातातून ती बाटली निसटली!!
ती बाटली खाली जमिनीवर पडणार, तेवढ्यात नीरवने अलगद हवेत झेलली. माझा हृदयचा ठोका ऑल्मोस्ट चुकला.

“ती यातून काहीतरी पिते.” नीरव ती बाटली दाखवत म्हणाला, “सारखं.”
‘बाई आणि बाटलीचा नाद करू नये’ असं म्हणतात, हा तर बाईच्या बाटलीचा नाद करत होता.
“अरे, रेड वाइन असेल.” इरा त्याच्या हातातून बाटली घेत म्हणाली.
“हो, तीसुद्धा हेच म्हणाली, फ्रेंच रेड वाइन आहे.”
इरा त्या बाटलीचा वास घेत म्हणाली, “तू टेस्ट नाही केली का?”

“नाही नाही, मला रिस्क नको.”
नीरवच्या हातात बाटली देत इरा म्हणाली, “ही वाइन बीइन नाहीये... हे कोकम ए”
हे कोकम कम कोक कसं असावं? मला लांबून तसं कळतं नव्हतं. म्हणून मी पायातल्या मुंग्या झटकत उभा राहिलो. या दोघांपाशी गेलो. नीरवच्या हातातून बाटली घेऊन मी त्या बाटलीचा वास घेतला “बहुतेक...”
“काय?”
“हे बहुतेक चिंचेचं पाणी ए.”

“हॉ…” असं म्हणत इराचा हात आपसूकच तिच्या तोंडावर गेला. एटीएममधून लगेच पैसे बाहेर आले नाही की आपण एटीएमकडे कसे बघतो, तसंच आम्ही दोघांनी इराकडे बघितलं. इन शॉर्ट चमकून वगैरे. इरा सावकाश चालत परत हॉलमध्ये आली, खाली गादीवर बसली. आम्हा दोघांना काही कळेना. आम्ही त्या बाटलीसकट हॉलमध्ये आलो, इराच्या समोर बसत म्हणालो "काय झालं?"

“डोन्ट यू गेट इट?”
"आय गेट इट, शी इज अ व्हॅम्पायर, मला ही असाच धक्का बसला होता." नीरव त्या बाटलीकडे बघत म्हणाला.
“आणि या व्हॅम्पायरला दिवस गेलेत?”
आता नीरवच्या हातातून बाटली निसटली!! बाटली गादीवर पडली, म्हणून फुटली नाही.

ओह, म्हणून ती हे सारखं आंबट-गोड पिते. पण व्हॅम्पायरला दिवस जातात का? कसे जातात? आपल्या नॉर्मल पद्धतीने का? का आणखी काही वेगळं होतं? गेले ते दिवस, राहिली ती मुलं, काय करणार आता? शेवटी ती देवाघरची फुलं!!

करा अजून एकत्र अंघोळी. एवढ्या अंघोळी एकत्र करून, पाणी बचत करायची काय गरज होती?
पावसात भिजून नाचून रील्स बनवले असते, तरी चाललं असतं.

जाड बुडाच्या पातेल्यातला रवा जेव्हा करपू लागतो, तेव्हा रव्याला दोष द्यावा का पातेल्याला? हेच कळतं नाही. नीरवची अशीच अवस्था झाली होती. नीरवचे अश्रू त्याच्या मस्तकावर जमा झाले होते. त्याच्या डोळ्यातले भाव तर पळून गेले होते. त्याला एवढे स्ट्राँग शहारे आले होते की, त्याच्या भुवयांचे केसही उभे राहिले होते. कुठेतरी शून्यात बघत तो म्हणाला, “माझं मुलं व्हॅम्पायर?”

'मेरा बेटा शैतान ए' असं त्याला लिटरली म्हणता येईल.
इरा त्याच्या भुवयांचे केस हाताने खाली बसवत म्हणाली, “अरे यार, ती व्हॅम्पायर नाहीये.”
तसा नीरव त्याचा मोबाइल वरचा एक फोटो दाखवत म्हणाला, "हिचे दात बघा."
आता काय दातखिळी बघायची? एखाद्या मुलीचे फक्त दात निरखून बघण्याची ही माझी पहिलीच वेळ होती.
"वा छान आहेत. दात कोरते वाटतं.." इराचा दातेरी टोमणा.
फोटोमधला दात मॅक्झिमाइज करत नीरव म्हणतो, “तिचा डावा दात बघा.”
”हो, दात छान वाटतोय. पांढरा पण ए.” मला जे वाटलं ते मी म्हणालो.
“नीट बघा, हा सुळा जास्त वाढलेला नाहीये का?”

मी स्वतःच्या सुळ्याला हात लावला. या व्हॅम्पायरचा फोटो बघू लागलो. त्यात ती दात दाखवत हसत होती, तिचा उजवा का डावा सुळा जरा जास्तच वाढला होता. मी म्हणालो "हा वाढीव दात टोकदार पण ए"
“येस्स!! म्हणजे बघा, व्हॅम्पायरला दात खाली-वर करायची पॉवर असते.”
“हो का? मग या सेल्फीत ती दात वर घ्यायची विसरली ना?”
“हो”
यावर इराने वैतागून मान हलवली. मलाही काय बोलावं कळेना. मला आपला रॅप सुचला, “दात तिचे टोकदार, शरीर नव्हते ऊबदार, एकट्या या मुलाला, व्हॅम्पायरचा आधार.”

इराने प्रचंड मोठा सुस्कारा सोडत नीरवला विचारलं, “ठीके, थोडा वेळ असं समजू की ती व्हॅम्पायर आहे, पण मग तुझ्याबरोबर का राहतेय?”
“कारण माझं रक्त गोड ए.”
“म्हणजे?
“म्हणजे, माझ्या रक्तात साखर जास्त ए.”
“अरे, मग ती डायबेटिक माणसाच्या मागे का नाही लागली?”
“तिला तरुण डायबेटिक हवा असेल..” हवेत अंदाज मांडत मी म्हणालो

इराने मला आपादमस्तक न्याहाळलं, तसं मी विचारलं, “काय झालं?"
“नऊवारी नेसून आलास का? एवढी पदरची वाक्य घेत आहेस, म्हणून नीट बघितलं.”
यावर माझा चेहरा नथ घातल्यासारखा झाला.

नीरव पुढे म्हणाला, "ती सगळं सोन्याचं घालते, चांदीचं काहीच वापरत नाही."
“का?”
“कारण चांदी उष्णता शोषून घेते, व्हॅम्पायरकडे आधीच उष्णता कमी असते.”
मी अजूनही तिच्या दातात अडकलो होतो. मी गूगल लेन्स अ‍ॅप वापरून तिचे दात सर्च केले, तर व्हॅम्पायरच्या दातांचे सर्च रिझल्ट मिळाले!!

"आणि आता शेवटचं" असं पहिल्यांदा सांगून नीरव म्हणाला, “तिची नाइट शिफ्ट ए, ती दिवसा बाहेरसुद्धा पडत नाही.”
एवढ्यात दारावरची बेल वाजली, तसा नीरव उठला, त्याने दरवाजा उघडला. तशा त्याच्या हातात दोन पिशव्या आल्या. नीरव त्या पिशव्या सांभाळत समोरच्या व्यक्तीला म्हणाला “अगं.. मी तुला सांगणारच होतो..”

तशी ती व्यक्ती आत आली. मला आणि इराला बघून दारातच थबकली. हम्म... हाच तो व्हॅम्पायर!!

मी पहिल्यांदाच व्हॅम्पायर बघत होतो. हा फिमेल व्हॅम्पयार तसा बराच उंच होता. साधारण पाच फूट दहा इंचाच्या वर असेल. तिचे डोळे बदामाच्या आकाराचे अन रंगाचे होते. तिने ओढणी मास्क तोंडावरून काढला. भाजी घेताना एखाद्या मोठ्या भोपळ्याला जसं निरखून बघतात, तसं तिने माझ्याकडे बघितलं. माझ्यात एवढं निरखून बघण्यासारखं काय असू शकतं? विचारून बघायला हवं.

ही गोरीपान फुलासारखी छान नव्हती. एक मिनिट.. व्हॅम्पायर तर गोरे असतात ना? गव्हाळ वर्णाचा व्हॅम्पयार असतो का? काय माहीत? व्हॅम्पयार नोज. तिची नजर हळूच आमच्या समोर ठेवलेल्या त्या बाटलीकडे गेली. मग तिने नीरवकडे बघितलं. हे एवढे पॉज पॉज का खेळताय? मग नीरव म्हणाला, “अगं पाणीपुरी पार्टी करणार होतो, मला वाटलं हे चिंचेचं पाणी ए.”

“मी तुला सांगितलं होतं ना?” तिच्या या "ना"ला दोन काना जास्त भासले. “इट्स अ रेड वाइन, पण वाइन पाणीपुरीसुद्धा भारी लागेल ना?" व्हॅम्पयारने जोक केला आणि हा व्हॅम्पायर हसला. एक मिनिट, हा व्हॅम्पायर का ही व्हॅम्पायर? हे व्हॅम्पायर व्याकरणात गडबड करून राहिलंय.

“हाय, मी ज्यो.”
फक्त ज्यो? जोस्‍ना, ज्योती किंवा जोगिंदरचा शॉर्टफॉर्म असावा.
“सॉरी, आम्हाला वाटलं तुला माहितेय की आम्ही येणार आहे ते.” इरा आमच्यासाठी दुर्मीळ असलेल्या तिच्या सोज्ज्वळ आवाजात म्हणाली.
“अरे नो वरीज, कधीतरी भेटणार तर होतोच.”
“येस्स, थँक्स फॉर हॅविंग अस.”
“ऑल्वेज वेलकम. तुम्ही बसा, मी आलेच” असं म्हणून ज्यो आत गेली

नीरवने दबक्या आवाजात आम्हाला विचारले “कशी ए???”
“लोभस”
“लोभस?? सिरियसली?”
“ही एकदम कलेजा किलर यार” नीरव असं म्हणताच, आतून ज्योचा आवाज आला “निरू, अरे पाणी भरून ठेवलं नाहीस ना?”
ज्यो ने निऱ्याचा निरू केला होता. कसं ए.. प्रेमात पडल्यावर आधी फक्त निकनेम मिळतं, नंतर काय फक्त नावं ठेवली जातात.

निरू पटकन आत गेला. इराने माझ्याकडे बघून खांदे उडवले. हे खांदे उडवून तिने "ही तर नॉर्मल वाटते" असं म्हटलं. मी तर यावर फक्त मान डोलावली, कारण माझे खांदे जखडले होते.

नीरवने पिझ्झा ऑर्डर केला, अर्ध्या तासात तो पिझ्झा आला नाही, म्हणून आम्ही ज्योला भोपळा चिरून दिला. ज्योला खरंच भोपाळच्या बर्फी करायच्या होत्या. दुसरा प्रहार उलटल्यानंतर पिझ्झा आला. आम्ही सगळे पिझ्झा खात बसलो. मी विचारलं, “ज्यो, तू काय करतेस?”
“अरे, आयटीमध्ये आहे, सपोर्टमध्ये. क्लायंट यूएसला आहे, म्हणून नाइट शिफ्ट करतेय.”
“पण वर्क फ्रॉम होम जमतं?”
“हो, आता सवय झाली.”
ज्या गोष्टी जमत नव्हत्या त्यांची जेव्हा सवय होते, तेव्हा व्यक्ती म्हणून तुम्ही बदलले असता. 'सून जरा सून' मालिकेतील वाक्य मला आठवलं.

“तुम्ही कसे भेटलात?”
“वॅक्सीनच्या लाइनमध्ये” नीरव जवळजवळ ओरडलाच आणि ज्यो दचकलीच!!
"वॅक्सीन घेताना, तिच्याकडे बघताना, भरून आलं आभाळ, पाऊसही नसताना" असा स्टेटस नीरवने तेव्हा ठेवला होता. मला एकदम आठवलं तसं त्याला मी विचारलं.
"हो, हिच्यासाठीच ठेवला होता" असं नीरव लाडिकपणे म्हणाला. थँक गॉड, पण ज्यो लाडिकपणे हसली नाही, कारण एवढा लाडिकपणा मला तरी झेपत नाही.

नीरवच्या डोळ्यातून प्रेम असं ओथंबून वाहत होतं, हा पोऱ्या लै वाहवत गेलाय. नीरव ज्योकडे बघत म्हणाला, “वॅक्सीन घेल्यावर मला चक्कर आली होती, तेव्हा हिने आधार दिला.”
बाप रे.. ही तर आधारवड निघाली!!
“गार्लिक ब्रेड नाही मागवला का?” इराने विचारलं, तसा नीरव खायचा थांबला. एखादी मांजर दूध पिताना हळूच कशी बघते? तसं त्याने ज्योकडे बघितलं, पण यावर ज्यो थबकली का नाही? माहीत नाही. मला ‘बॉडी लँग्वेज’ अजिबातच कळत नाही.

ज्योने बत्तीस वेळा घास चावून संपवला. दात एवढे दातेरी असताना एवढं चावायची काय गरज?
ती पाणी पीत पुढे म्हणाली, “अं, हे थोडं विचित्र वाटू शकतं, पण आय एम अ‍ॅलर्जिक टु गार्लिक.”
“इट्स ओके, मला पण साबुदाण्याची अ‍ॅलर्जी आहे, म्हणून मी उपवासच करत नाही.” माझ्या या गंभीर कंडिशनवर नीरव हसला. मला काही कळेना, म्हणून मी इराकडे बघितलं. तिने विषय बदलला. “एखादी चांगली सिरीज कोणी बघतय का?”
नीरव बुक्की मारून पिझ्झा फोडत म्हणाला, “सून जरा सून मालिका बघत होतो. भारी ए. त्यात सासू सीरिअल किलर असते आणि….” यापुढे मला ऐकवलं नाही.

इरा म्हणाली, “मी नेटफिक्सवर, व्हॅम्पायर डायरीज बघतेय.”
तसा मला ठसका लागला!! मी खोकू, शिंकू आणि गडबडू लागलो. ज्योने मला पाण्याचा ग्लास दिला, इराने माझ्या पाठीवर थोपटलं. नाटकवेड्या माणसालासुद्धा हे नाटकी वाटावं या तर्‍हेने इराने मला विचारलं, “गळ्यात काही अडकलं का?”
मी नाही म्हणत मान डोलवली.
ठसका हा टोमण्यासारखा असतो, कधीही लागतो.

माझा ठसका थांबल्यावर नीरवने इराला विचारलं, “कशी ए सिरीज?”
“मस्त आहे, बिंज वॉच करत होते, आपल्या इथे का नाहीयेत व्हॅम्पायर?”
त्यावर ज्यो हलकेच हसत म्हणाली, “तुला हे सगळं खरं वाटतं?”
“हो, म्हणजे, व्हॅम्पायर असू शकतात ना?”
“काही काय, काही खरं नसतं.”
मी एकदम गुगली टाकली. "हो, म्हणजे खरे व्हॅम्पायर असे नसतात ना?"
“काय माहीत? मला तर ते कॉमेडी वाटतं, ते असे दात बाहेर काढून बोलतात वगैरे.” ज्यो तिचा मोठा सुळा दाखवत म्हणाली.
‘विषय, सवय आणि सवयीचा विषय ताणू नये’ असं म्हणतात, म्हणून आम्ही दुसरा विषय ढिल्ला केला.

नीरव खूश होता की नाही माहीत नाही. पण प्रेमात मात्र नक्की होता.
प्रेम ना, हे शेतातल्या लव्हाळीसारखं असतं आणि आपण त्या शेतजमिनीसारखे. लव्हाळी शेत जमिनीचं बरंच नुकसान करतात. मुळावाटे विषारी द्रव घुसवतात. कालांतराने जमीनच नापीक करतात, पण शेवटी फक्त लव्हाळी टिकतात, कारण प्रेमही असंच असतं, लवचीक आणि चिवट!!

ज्यो ने तिची शिफ्ट सुरू होण्याआधी आमच्याशी गप्पा मारल्या. तिचा बॉसचा फोन आल्यावर ती तिच्या खोलीत काम करायला निघून गेली.
आम्ही पाणीपुरी खात टीव्ही लावला. 'सून जरा सून' मालिका बघू लागलो. यातील सीरिअल किलर सासू आठवड्यात एक खून करत असते. सुनेला आंबे खायची हौस असते, म्हणून सून एकदा आंब्याच्या झाडात चढते आणि सासूला खून करताना बघते!! त्यात सुनेला माहीत असतं की, आपल्या नवऱ्याचं लफडं आहे. नाऊ सून इज डिप्रेस्ड!! सून सासूला विनवणी करते की, त्या अफेअरवाल्या सटवीला मारून टाक!! आणि पुढे...

मला रात्री जाग येते. मी उठून बसतो. माझ्या एका बाजूला इरा, तर दुसऱ्या बाजूला नीरव झोपलेला असतो. मला पंधरा-वीस मिनिटे तसाच पडून राहतो, कारण माझी पाठ अवघडलेली असते. इरा मला झोपेतच लाथ मारते, तसा मी खडबडून जागा होतो. ही पोरगी झोपेत सुद्धा व्हॉयलंट होते!! मी नीट उठून बसतो. तीन तास पाणी न पिता ट्रेक केल्यावर आपण कसे चालतो? तसं चालत बाथरूमकडे जाऊ लागतो.

मी ज्योच्या रूम जवळ येतो. तिच्या खोलीत पूर्ण अंधार असतो. खोलीचा दरवाजा अर्धवट उघडलेला असतो. परस्त्रीच्या खोलीत असं डोकावून बघणं माझ्यासारख्या असभ्य माणसाला सुद्धा सभ्य वाटत नाही, म्हणून मी त्या दाराच्या फटीतून रूमच्या आत बघू लागतो.

तेव्हा माझ्य लक्षात येतं!!
गाजरं खायला हवीत. माझ्यातलं व्हिटॅमिन ए संपलय. अंधारातलं काहीच दिसत नाहीये.

मी अनवधानाने दार हलकेच ढकलतो. किर्रर्र असा काहीसा आवाज करत दार उघडलं जातं. त्या खोलीत खिडकीतून चंद्रप्रकाशाचा एक झोत खाली गादीवर पडलेला असतो. मी त्या गादीकडे बघतो. त्या गादीवर एक छोटं लाकडी लॅपटॉप टेबल असतं. त्या टेबलवर लॅपटॉप ठेवलेला असतो. लॅपटॉपसमोर मला एक आकृती दिसते, पण मला काही अंदाज येतं नाही, म्हणून मी डोळे ताणून त्या आकृतीकडे नीट बघतो.

मला जे काही दिसतं, ते बघून मी जागेवरच गोठतो.
भीतीने थरथर कापू लागतो, माझे पाय लटपटू लागतात, म्हणून नकळत मी त्या खोलीचे दार घट्ट पकडतो.
आणि तो लॅपटॉपवर टाइप करणारा लांडगा बघू लागतो!!
हा लांडगा असा दोन पायांवर गादीवर बसलेला असतो. त्याच्या पुढ्यात लॅपटॉप असतो. पुढच्या दोन पायांनी तो लॅपटॉपवर टाइप करत असतो. चंद्रप्रकाशात त्या लांडग्याचे करड्या रंगाचे केस चकाकत असतात!!

तो लांडगा हळूच माझ्याकडे बघतो आणि हलकेच हसतो.
मला फक्त दिसतात ते त्याचे दोन सुळे!!

“गप रे, काहीच्या काय सांगतो?” इरा चहा करताना म्हणाली.
उकळत्या पाण्यात चहापत्ती टाकत मी म्हणालो, "ती व्हॅम्पायर नाहीये, तो इच्छाधारी लांडगा ए."
“लांडगा नाही, अरे ती इच्छाधारी लांडगीण असेल.”
“हो, बरोबर, फिमेल वूल्फ”

इरा गॅस वाढवत म्हणाली, “मग त्या लांडग्याने तुझ्यावर झडप नाही मारली?”
“आता टाईप करताना झडप कशी मारणार?”
तेवढ्यात नीरवने बाथरूम मधून बाहेर पडत विचारलं, “काय झालं, कोण काय टाइप करत होतं?”
“काही नाही रे, याला काहीतरी भयानक स्वप्न पडलं.”
“कसलं स्वप्न?”
मी जे सुचेल ते बोललो, “अरे ते सीरिअल किलर सासूचं स्वप्न पडलं.”
टॉवेलने डोकं पुसत नीरव म्हणाला, “हो ना, डेंजर आहे ती मालिका.”
इराने पटकन नीरवला विचारलं, “ज्यो चहा घेईल ना?”
“नाही गं, ती लॅक्टोज इंटॉलरन्ट आहे.”

लांडग्यांना दूध पचत नाही? कधीपासून? हम्म... दूध पिणारा लांडगा मी अ‍ॅनिमल प्लॅनेटवर सुद्धा बघितला नाहीये. नीरव पुढे म्हणाला, “ज्यो पहाटेच जॉगिंगला जाते, तिला यायला वेळ लागेल.”
हम्म… लांडगा पळायला गेला तर!!

चहा तयार झाला. आम्ही चहा घेऊन हॉलमध्ये येऊन बसलो. नीरवने चहाचा पहिला घोट घेत आम्हा दोघांना विचारलं, "काय करू यार?"
एखादं उत्तर ना, हे नदीतल्या छोट्या नावेसारखं असतं. कधी ही नाव डावीकडे, तर कधी उजवीकडे झुकते. बहुधा स्थिरपणे पाण्यावर तरंगत नाही. प्रश्न विचारणारा अन उत्तर देणारा सगळेच त्या नावेत असतात. सुखरूप असतात. पण नावेतले हे सगळे प्रवासी, एकाच बाजूला गेले की नाव उलटते.मग उत्तर न देणारेसुद्धा पाण्यात पडून गटांगळ्या खाऊ लागतात.

“खरं सांगू? तू हे सोडून दे.” मी त्या नावेतून बाहेर उडी घेत म्हणालो.
नीरव यावर काही म्हणाला नाही. शांत बसून राहिला. पण त्याच्या मनातलं वादळ वाढत आहे याची जाणीव होताच इराने त्याला विचारलं, “तुला भीती वाटते का?”
"हो म्हणजे, मला कळतं नाहीये, इज देअर समथिंग ऑड अबाउट हर?"
प्रत्येक जण विचित्र असतो. समोरच्याने आपला विचित्रपणा जपला की मग काहीच विचित्र वाटत नाही.
आयला, काय होतं या चहात?

“नाही रे, असं काही वाटलं तर नाही, पण तू जर घाबरत असशील तर सरळ ब्रेकअप कर ”
इरा इतकी स्पष्टवक्ती आहे की, शाळेतल्या पेपरमधलं एखाद्या अवघड प्रश्नाचं उत्तर 'मला येतं नाही' असं लिहून यायची.
नीरव कपामध्ये राहिलेली साखर बोटाने चाटून खाताना म्हणाला, “बट आय लव्ह हर.”
“हो, ते तुमच्या अंघोळीवरून कळलं होतं.”
“थँक्स गाइज, बोलून बरं वाटलं” असं म्हणून नीरव उठला, चहाचे कप्स गोळा करत म्हणाला “शेवटी कसं असतं ना, मैत्री ही…”
“नाही, नको, प्लीज स्टेटसला हे टाक, मी नंतर वाचेन” असं म्हणत इरा उठली. मीसुद्धा जायला निघालो.

आम्ही दोघे नीरवचा निरोप घेऊन निघालो. बिल्डिंगच्या गेट बाहेर पडलो. मुख्य रस्त्याच्या दिशेने जाऊ लागलो. तेवढ्यात समोरून फुटपाथवरून ज्यो धावत आली, आमच्या समोर येऊन थांबली. ती बरीच घामाघूम झाली होती. तलावातल्या पाण्यातून न्हाऊन निघालेल्या लांडगिणीसारखी!! तिच्या हातातल्या पाण्याच्या बाटलीचं झाकण काढत ती म्हणाली, “असेच येत रहा.”

"येस्स, नक्की, थँक्स फॉर एव्हरीथिंग." हो, आहे मी फॉर्मल!!
इराने ज्योकडे रोखून बघत एकदम विचारलं, "आर यू सिरीयस अबाउट हिम?"
‘जास्त नाही बडबड, जे काय ते परखड’ असा इराच्या क्लब हाउसच्या प्रोफाइलचा बायो आहे.
“हो, आय लाइक हिम. म्हणूनच आम्ही लिव्ह इनमध्ये आहोत. पण…”
“पण काय?” मी अधीरपणे विचारलं.
“पण आय एम नॉट शुअर अबाउट फ्यूचर.”
“आय गेट इट, यू नीड मोअर टाइम. शेवटी प्रेम करणं सोपं असलं, तरी निभावणं अवघड असतं.”
तेव्हा माझ्या खांद्यावर हात ठेवत इरा म्हणाली, "चहा जास्त झाला का?"
तशी ज्यो खुद्कन हसली. आम्ही ज्योला बाय केलं, पुढे गेलो.

"एक मिनिट" ज्योने हाक मारली.
तसे आम्ही दोघे थांबलो. मागे वळून बघितलं. ज्यो भरभर चालत आमच्याजवळ आली आणि छान स्मित करत म्हणाली, "मी त्याला कधी.. हर्ट नाही करणार."
पण मला फक्त दिसत होता तो तिचा चमकणारा सुळा!!

*समाप्त*

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह!
चैतन्य is back.
काथ्याकुट पूर्ण आहे तर post करा ना

नेहमीप्रमाणे मस्त
नित्याचं आणि तिच्या बॉयफ्रेंड/नवऱ्याचं पुढे काय झाले ते ही लिहा

मस्त!
नीरवचं वर्णन वाचून 'प्यार के साईड इफेक्ट्स' मधला राहुल बोसचा रूमपार्टनर आठवला. "तुम नहाते क्यूं नहीं हो?" असं त्याची गर्लफ्रेंड विचारते तो Lol

Welcome back.
नेहमीप्रमाणे भारी पंचेस.
काथ्याकुट पूर्ण करा बरं

एकदम मस्त .
इच्छाधारी लांडगा , चंद्रप्रकाशताला कोल्हा आणि व्हॅप्मायर ...
सुन जरा सुन मालिका भारी दिसतेय राव , वाचायला आवडेल..

सहीच