हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती

Submitted by मार्गी on 2 December, 2021 - 09:27

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

२६ ऑक्टोबरचा दिवस! अतिशय थकवणा-या प्रवासानंतर मस्त झोप झाली. अलार्म ऑफ केला असूनही लवकर जाग आली. पूर्ण उजाडलेलं नसताना खोलीच्या बाहेर आलो. अहा हा! समोर एका दृष्टीक्षेपामध्ये अक्षरश: हजारो झाडं आणि घनदाट हिरवा रंग! सत्गडवरून एका दृष्टीक्षेपामध्ये किमान तीन हजार देवदार झाडं सहज दिसत आहेत! आत्ता कुठे जाणीव होते आहे की आम्ही मध्यरात्री कुठे आलो आहोत. आणि ही जाणीवही होते आहे की, आम्ही किती नशीबवान आहोत. ह्या सगळ्या परिसराची व दृश्यांचा आनंद घेताना जाम हुडहुडी भरत होती. अक्षरश: तोंड धुणंही एक टास्क बनलं होतं. टास्क नव्हे, टॉर्चर! कधी एकदा सकाळचे अनिवार्य आन्हिक उरकतात असं झालं. थंड पाणी इतकं भयानक थंड की ते जणू भाजत आहे. दाहक वाटत आहे. दोन दिवसांचा प्रवास झाल्यामुळे आज तरी आंघोळ करणं भाग आहे. यथावकाश सूर्य उगवल्यावर बाहेरचं तपमान थोडं सुसह्य झाल्यावर आंघोळ केली. पण आंघोळीचं अतिशय उकळतं पाणीसुद्धा सौम्य नव्हे शीतल भासतंय! म्हणजे अतिशय थंड पाणी दाहक वाटतंय आणि उकळतं पाणी शीतल भासतंय!


.

तशीच गंमत चहा पिण्याची. इथे चहा हा केवळ प्यायचा नसतो. मुळात चहा इथे अतिशय महत्त्वाची गोष्ट ठरते! चहाचा कप आला की आधी दोन हातांनी त्याची उष्णता घ्यायची. थोडे हात पोळवून घ्यायचे. अहा हा! काय भारी वाटतं. नंतर चहाचा कप तोंडाजवळ आणून त्याची वाफ घ्यायची! अहा हा! आणि मग हळु हळु एक एक घोट घ्यायचा. आणि दिवसभरातले चहाचे राउंडस अजिबात मोजायचे नाहीत! इथे शक्यतो चहा बिनसाखरेचा बनवतात. बाहेरून गूळ किंवा खडीसाखर चहात बुडवून चहाचे घोट घ्यायचे असतात! सकाळी हळु हळु एक एक जण उठत गेले. आज मुख्यत: आराम करायचा आहे आणि एका अर्थाने इथे अक्लमटाईझ व्हायचं आहे. सत्गडची उंची १८५० मीटर आहे, अगदी विरळ हवेचा त्रास होईल अशी नाही. पण अतिशय थंड हवामान (पहाटेचं तपमान साधारण ५ अंश) आणि वेगळा प्रदेश. आणि इतक्या शुद्ध हवेची आपल्या शरीराला सवय कुठे असते! शिवाय दोन दिवसांचा थकवा, प्रवासात झालेले शरीराचे हाल. त्यामुळे आराम आवश्यकच आहे.


सत्गड!
.

पण तरीही आंघोळीचा मुख्य कार्यक्रम एकदाचा उरकल्यावर वाटलं की, चला, फिरून यावं. आणि मग सुरू झाला पहिला ट्रेक! सत्गड हे ध्वज मंदिराच्या पायथ्याशी वसलेलं एक पर्वतीय गांव! उतारावरची घरं व त्यातून पाय-या असलेली पायवाट. ही पायवाट अनेकांच्या अंगणातून- घरातून जाते! इथली घरी तशी शहरासारखी पक्की आहेत. घरामध्ये डिश टीव्हीच्या तबकड्याही दिसतात. भेटलेल्यावर एकमेकांना नमस्कार करण्याची इथे पद्धत. सकाळी सगळ्या घरातले लोक उठून आपल्या कामाला लागलेले आहेत. गायी- गुरांची- शेळ्या- मेंढ्या व कोंबड्यांची कामं. कोणी शेतात जात आहेत. कोणी गवताचे भारे नेत आहेत. हे लिहीतानाही वाटतं की, नको लिहायला! परत तो सगळा नजारा डोळ्यांपुढे उभा राहतो आणि विरहाची तीव्र कळ मनात येते! शब्द थिजतात.


.

.
सूर्याने कृपा केल्यावर आणि शरीर जरा गरम झाल्यावर सत्गडच्या पायवाटेने खाली उतरायला निघालो. चार वर्षांपूर्वी इथे राहून गेल्यामुळे परिसर तसा ओळखीचा आहे. इथून रस्ता तसा दहा मिनिटांवर आहे, पण वाट तीव्र उताराची आहे. उतरताना खरं नीट कळालं की, मध्यरात्री अंधारात किती चढलो होतो. उतरताना भरभर उतरत होतो. पण नजारे इतके सुंदर की, फोटो किती काढू असं होत आहे. दहा मिनिटांमध्ये रस्त्यावर आलो. इथे राष्ट्रीय महामार्ग ०९ (टनकपूर- पिथौरागढ़- धारचुला) हा मुख्य रस्ता आहे. खाली उतरल्यावर चांगलं नेटवर्क मिळालं. ह्या रस्त्यावर थोडा वेळ पिथौरागढ़च्या दिशेला फिरलो. अहा हा! काय अद्भुत नजारे दिसत आहेत! वळत वळत जाणारा घाटाचा रस्ता आणि दूरवर दरीमधली गावं! काही अंतर गेल्यावर डोंगरामागून डोकावणारी बर्फाची शिखरंही दिसली! अंगावर रोमांच उठत आहेत! हिमालय! काही अंतर मस्त वॉक केला. ते वातावरण आणि तो अनुभव हृदयामध्ये साठवून घेतला आणि परत निघालो. फिरताना शरीरामध्ये चांगली ऊब आली. सत्गडची पायवाट चढताना किंचितसा दम लागला. फोटो घेत जात राहिलो. एक- दोनदा पायवाटेवरील वळण चुकलं. तितकंच तिथल्या लोकांशी बोलता आलं. नातेवाईकांच्या घरी पोहचेपर्यंत चांगला घाम आला होता. इतकं मस्त वाटलं घामामुळे! पण हा आनंद थोडा वेळच टिकला. अर्ध्या तासाच्या आत परत थंडी सुरू झाली!


.

.

नंतरचा दिवस नातेवाईकांसोबत आणि सोबत आलेल्या मित्रांसोबत गप्पा, ऊन खात गच्चीतून दिसणारी हजारो वृक्षांचं दृश्य बघत आणि हिमालयाचा सत्संग व ऊब देणारा चहा ह्यामध्ये गेला. सत्गड डोंगराच्या मधोमध आहे, त्यामुळे इथे सूर्य उगवल्यानंतर एक तासाने प्रकट होतो आणि मावळण्याच्या एक तास आधी डोंगरात गुडूप होतो! सूर्य असताना मात्र गरम वाटतंय. इथलं आकाश खूप निरभ्र असल्यामुळे सूर्याचं ऊन थोडं प्रखर वाटतंय. पण सूर्य ढगात गेला तर लगेचच थंडी वाजू लागते! कोई मिल गया मधल्या "जादूला" सूर्य जितका हवाहवासा होता, तसा सूर्य इथे सर्वांना हवाहवासा आहे! दुपारी खालचं सामान आणायला म्हणून आणखी एकदा रोडवर जाऊन आलो. जेमतेम पाऊण किलोमीटर अंतर आहे, पण त्यामध्ये ६० मीटरचा तुलनेने घाटासारखा चढ आहे. इथे असताना रोज ट्रेक्स होत राहणार!

उरलेली दुपार मुलांसोबत क्रिकेट खेळलो. तेवढीच थंडी कमी वाजत होती. संध्याकाळी अंधार पडायच्या आधी परत एक ट्रेक करावासा वाटला. इथून पायवाटेने अगदी दहा मिनिटांच्या अंतरावर डोंगरावर एक ग्राउंडसारखी जागा आहे. सगळे मिळून तिकडे फिरायला गेलो. सोप्या पायवाटेचा छोटा ट्रेक! तिथून खूप दूरवरचे डोंगर दिसत होते. ढगामध्ये लपलेली हिमशिखरंही दिसली. इतकं जबरदस्त वातावरण! अशा वातावरणामध्ये आपसूकच ध्यान लागतं. फक्त आपल्याला एक गोष्ट करावी लागते, ती म्हणजे आपल्या मनातले नेहमीचे उपद्व्याप बंद ठेवून जे समोर आहे, त्यासाठी मन आणि डोळे उघडे ठेवावे लागतात! आपली ओंजळ जर रिकामी असेल तर ती नक्की भरली जाते! काही क्षण इथे आनंदामध्ये डुबकी घेऊन अंधार पडण्याच्या आधी परत निघालो. उतरताना मुलांनी आणखी एका वेगळ्या वाटेने नेलं. अप्रतिम नजारे असलेला हा मस्त ट्रेक झाला. इथे रोज वेगवेगळ्या ठिकाणी असे ट्रेक्स होतच राहणार आहेत!


.

.

सहा वाजताच अंधार पडल्यावर थंडी आणखी तीव्र झाली. पण नजारे अजून संपले नाहीत! हिमालयाचा नजारा अंधारामध्ये गुडूप झाल्यावर आकाशातला अविष्कार सुरू झाला! अक्षरश: ता-यांचा चमचमाट! दिवसा डोळ्यांपुढे अक्षरश: हजारो वृक्ष दिसत होते, तर रात्रीही कमीत कमी तीन हजार तारे आकाशात दिसत आहेत! बायनॅक्युलरशिवाय न दिसणारे किती तरी तारकागुच्छ, तेजोमेघ आणि मंद तारे सहज दिसत आहेत! सोबत मोनोक्युलर त्यामुळेच आणला आहे. आकाशातल्या ता-यांचं दृश्य अगदी ही आठवण करून देत होतं-

झगमगाती हुई जागती रात है
रात है या सितारों की बारात है

मोनोक्युलरमधून तर अक्षरश: ता-यांचा खच पडलेला दिसत होता! आकाशात चंद्र नसल्यामुळे खूप मंद तारे दिसत होते. इतके तारे आकाशात नुसत्या डोळ्यांनी दिसतात, ही आपण शहरामधून कल्पनाही करू शकत नाही. महाराष्ट्रापेक्षा उत्तर अक्षांश १२ अंश जास्त असल्यामुळे तारेही वेगळ्या ठिकाणी दिसत आहेत! हे सगळं जबरदस्त आहे, पण ह्या ता-यांच्या मेजवानीमध्ये थंडीचा जबरदस्त अडथळा आहे! थंडी अक्षरश: मोकळ्या हवेत थांबू देत नाहीय. तरीही काही वेळ थंडीला सहन करत ह्या ता-यांच्या मेजवानीचा आनंद घेतला. त्यानंतर लवकर जेवण करून अक्षरश: साडेसातपर्यंत झोपण्याची वेळ झाली. आणि इथे सगळी घरंही अंधार पडल्यावर काही वेळात गुडुप होतात. सगळे लोक खूप कष्ट करणारे आहेत आणि रात्री थंडी वाढते. शिवाय इथे घनदाट जंगल जवळ असल्यामुळे वाघ व अन्य प्राण्यांचा वावरही आहे... पण काय जबरदस्त दिवस होता!


.

पुढील भाग: हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) ३: अग्न्या व बुंगाछीना गावामधील ट्रेक

माझे हिमालय भ्रमंती, सायकलिंग, ट्रेकिंग, रनिंग व इतर विषयांवरचे लेख इथे उपलब्ध: www.niranjan-vichar.blogspot.com

Group content visibility: 
Use group defaults

आहाहा! नुसतं वाचूनसुद्धा किती छान वाटतंय!
मी फक्त एकदाच हिमालय पाहिलाय. चक्राता कँपमध्ये. पण खरंच, भुरळ पडते तिथली. तुम्ही जे लिहिलंय की हे लिहीतानाही वाटतं की, नको लिहायला! परत तो सगळा नजारा डोळ्यांपुढे उभा राहतो आणि विरहाची तीव्र कळ मनात येते! >> हे अगदी पटलं. वाचतानाही मला तसं झालं.
तिकडे तुमचे नातेवाईक आहेत हे किती छान!

खूपच छान. मला हिमालय पहायचाय. पण थंडीत जायची हिम्मत होणार नाही. तुम्ही खरच खूप नशीबवान आहात. लिहीत रहा. फोटो आवडले.

आहाहा! खाद्य पदार्थाचे फोटो पाहिले की तो पदार्थ खावासा वाटतो करुन खाताही येतो .... तसं हिमालय बघून तडक उठून जावसं वाटतं पपण जाता येत नाही ..... मिस्टरांचा आसकोटला प्रोजेक्ट (काॅपर, लेड झिंक) तेव्हा गेलो होतो . ... मुलं लहान होती त्यामुळे फिरलो नाही पण अक्षरश: तेव्हापासून हिमालयाने वेड लावलंय ...

सर्वांना खूप खूप धन्यवाद! Happy @ लंपन जी, माझ्याकडे रात्रीच्या ता-यांचे फोटो घेता येईल असा नीट कॅमेरा नव्हता... नंतर ते जाणवलं. पण तरीही मी म्हणेन हे दिवसाच्या दृश्यांचे इतके फोटो असूनही त्यामध्ये त्या अनुभुतीचा जेमतेम एक कण आला आहे.

बेहतरीन वर्णन......
मी त्या भागात ६ वर्षे काढलीत, हल्द्वानी, रुद्रपूर, अल्मोडा, पिथोडागड, राणी़ खेत मुक्तेश्वर , पाताळ भुवनेश्वर, शरयू ...... अहाहा
मेरे बीते हुए सुनहरे दिन आप ने वापस लाये... शुक्रिया
शहर मे बसा हू.... मजबूरी है
दिल तो पहाडोमे अभी तक घूम रहा है

@ रेव्यु जी, ओह, ग्रेटच! आम्ही नंतर पाताल भुवनेश्वरही बघितलं, येईलच वर्णन नंतर. Happy धन्यवाद.

तुम्हाला अनुभव लिहीताना शब्द तोकडे वाटत आहेत पण त्यातून देखील वाचताना तिथली जादू आमच्यापर्यंत पोहोचते आहे. आता मात्र हिमालयात जायलाच हवं असं वाटायला लागलंय! पुभाप्र..