आठवण एका साथीदाराची...

Submitted by पराग१२२६३ on 27 November, 2021 - 02:15

27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो. मग तेव्हापासून मी या केंद्राचे कार्यक्रम नियमितपणे ऐकण्यास आणि त्याच्या विविध आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेण्याचा क्रमही सुरू झाला, अगदी 2014 मध्ये हे प्रसारण केंद्र बंद होईपर्यंत.

Voice of Russia या नभोवाणी केंद्राच्या माध्यमातून एक नवा साथीदार मला मिळाला होता. त्याचे माझ्या आयुष्यात अतिशय महत्वाचे स्थान राहिले. Voice of Russia हे रशियन सरकारचे आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र होते. Voice of Russia च्या हिंदी कार्यक्रमांचा दर्जाही उत्तम असायचा. भारत आणि रशिया यांच्यातील मैत्री संबंधांची छाप त्याच्या प्रसारणातून, उद्घोषकांच्या भाषेतून दिसून येत असे. 1 एप्रिल 2014 ला हे केंद्र बंद होत असताना ते जगातील तिसऱे सर्वात मोठे आंतरराष्ट्रीय नभोवाणी केंद्र ठरले होते.

सोव्हिएट संघाच्या विघटनानंतर बिकट आर्थिक परिस्थितीमुळे हिंदी, उर्दू आणि बंगाली या व्यतिरिक्त अन्य भारतीय भाषांमधील प्रसारण बंद झाले. भारत आणि रशिया यांच्यातील विस्तृत संबंधांना सामान्य जनतेच्या स्तरापर्यंत विकसित करून त्यांना एक भावनिक पैलू पाडण्यात Radio Moscow चे मोलाचे योगदान राहिले आहे. जगातील सर्वात विशाल आणि पोलादी पडद्यामुळे तितक्याच गूढ बनून राहिलेल्या आणि भारताचे घनिष्ठ मित्रराष्ट्र राहिलेल्या रशियाची ओळख करून घेण्याचे Radio Moscow/ Voice of Russia हे एक उत्तम साधन होते.

Voice of Russia च्या प्रसारणाचे एक महत्वाचे वैशिष्ट्य होते. त्याच्या हिंदी सेवेवरून प्रसारित होणाऱ्या बातम्या तसेच विश्लेषणांमध्ये रशियातील, दक्षिण आशिया आणि रशिया संबंधांमधील आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींमधील महत्वाच्या घटना, रशियन संस्कृती, इतिहास इत्यादींनाच स्थान मिळत असे. BBC किंवा Voice of America यांच्या हिंदी सेवांच्या अगदी उलट परिस्थिती होती, यांच्या प्रसारणाचा भर भारतातील घडामोडींवरच असे. भारताचा स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने मॉस्कोतील भारतीय राजदूताची मुलाखत प्रसारित करण्याची परंपरा Voice of Russia ने जपली होती.

Voice of Russia भारतातील आपल्या श्रोत्यांचे नियमितपणे संमेलन आयोजित करत असे. नवी दिल्लीतील Russian Centre of Science and Culture इथे ते संमेलन आयोजित केले जात असे. त्याचे उद्घाटन भारतातील रशियन राजदूतांच्या हस्ते होत असे. यातील 2010 मध्ये झालेल्या संमेलनाला मी हजेरी लावली होती. तिथे मराठी येत असलेल्या श्रीमती लेबेदेवा यांच्याशी थोडा मराठीतून, थोडा रशियनमधून आणि बाकी हिंदीतून माझा संवाद झाला. त्या संमेलनाच्या उद्घाटनाला ‘भारतमित्र’ म्हणून ओळखले जाणारे भारतातील तत्कालीन रशियन राजदूत अलिक्सांदर एम. कदाकिन आले होते. उद्घाटनानंतर त्यांनी म्हटले होते, “Voice of Russia हा ‘मैत्रीचा आवाज’ असून आमच्या देशाच्या प्रदीर्घ काळापासून असलेल्या सहकाऱ्याच्या आणि सर्वोत्तम मित्राच्या, The Great India बरोबरच्या स्नेहाचाही तो आवाज आहे. तसेच भारत आणि रशिया यांच्यातील संबंधांचे भविष्यही उज्वल आहे.”

https://avateebhavatee.blogspot.com/2021/11/blog-post_27.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

१९९० च्या आसपास दररोज संध्याकाळी मला वाटतंय साडेपाचच्या सुमारास शोर्टवेव्ह वर "मॉस्को नभोवाणी, आणि आमचे मराठी भाषेतील कार्यक्रम आता सुरू होत आहेत" अशी उद्घोषणा होऊन मग त्यानंतर अर्धा तास मराठी कार्यक्रम असायचा. प्रचंड कुतूहल आणि रशियातून बोलले जाणारे मराठी म्हणून हा कार्यक्रम मी अनेकदा ऐकला आहे. रशियात स्थायिक झालेल्या मराठी लोकांसाठी तो असेल अशी माझी तेंव्हा समजून झाली होती. ह्या लेखामुळे बरेच तपशील कळले. याचा अर्थ २०१४ साली हे मराठी प्रक्षेपण सुद्धा बंद पडले असणार. माहित नाही. कारण नंतरच्या काळात रेडिओ ऐकणे मागे पडले. आणि आजकाल तर मोबाईल, संगणक आणि इतर अनेकविध साधनांमूळे इतक्या वेगवेगळ्या लहरी आसपास असतात की रेडिओ चा शॉर्टवेव्ह बँड फक्त चिरररफिरररटूरररर आवाजांनीच भरलेला असतो. उर्दू सर्विस, श्रीलंका ब्रॉडकास्टिंग (सिलोन), मुंबई ब केंद्र हि सगळी जुनी केंद्रं ऐकायला येणं महामुश्किल. (तसेही पूर्वी सुध्दा खरखर असायची. आताच्या एफएम आणि युट्युब जमान्यात ती कुणीही ऐकली नसतीच हा भाग वेगळा)

अतुल जी, रेडिओ मॉस्कोचे मराठी प्रसारण 1991-92 मध्येच बंद झालं होतं. शॉर्टवेव आणि अलिकडे मिडियम वेवलाही तसे आवाज येत असतात. आता मोबाईल ॲपवरून रेडिओ स्पष्ट ऐकू येत असले तरीही शॉर्ट वेववरच्या खरखर आवाजाबरोबर प्रसारण ऐकण्याची मजाही वेगळी असायची.

हा लेख वाचून जुन्या आठवणी जाग्या झाल्या. शाळेत असताना मी शॉर्ट वेव्ह रेडिओवर वेगवेगळी स्टेशन्स ऐकून मग त्यांना QSL card पाठवत असे आणि त्यांच्याकडून मग उत्तर येत असे, ती कार्ड जमा करत असे. QSL card म्हणजे एका पोस्टकार्डवर माहिती लिहायची कुठला कार्यक्रम कुठल्या frequency वर कधी ऐकला, हवामान कसे होते, रिसेप्शन कसे होते वगैरे. रेडिओ स्टेशनना त्यामुळे कळत असे की आपले श्रोते कुठे आहेत आणि रिसेप्शन कसे आहे. नेव्ही नगरमध्ये एक मित्र राहायचा जो मासिक छापायचा ज्यात वेगवेगळ्या रेडिओ स्टेशन्सच्या फ्रिक्वेंसी छापलेल्या असत, कफ परेड ला पारीख नावाचा मित्र होता त्याच्याकडे डिजिटल आकडे असलेला रेडिओ होता त्याच्यामुळे बरोबर ट्यूनिंग करता येत असे, पण प्रत्यक्ष ट्रान्समिशन कधी कधी जवळच्या फ्रिक्वेंसीवर मिळत असे, मग ते QSL card मध्ये लिहायचो. परदेशी पोस्टाचा खर्च परवडत नसे, त्यामुळे ते कार्ड भारतातच consulate मध्ये पाठवायचे, अशी मजा होती. त्यातूनच पुढे मग हॅम रेडिओची आवड निर्माण झाली.
असो, अवांतर झाले.

मी एके काळी अशाच प्रकारे रेडियो कुवैत, व्हॉइस ऑप अमेरिका वगैरे ऐकत असे... रात्री १२-३० वाजता रेदियो कुवैतवर इंग्रजी गाणि लावत असत आणि त्यातूनच मला इंग्रजी गाण्यांची गोडी निर्मा झाली..... आणिबाणीच्या काळात बीबीसी हा एक विश्वासपात्र स्त्रोत होता