समुद्रावरची हवाई शक्ती

Submitted by पराग१२२६३ on 12 November, 2021 - 22:29

C__Data_Users_DefApps_AppData_INTERNETEXPLORER_Temp_Saved Images_30706914_546325429087406_3344033606493274112_o.jpg

भारतीय हवाईदलाने 2021 मध्ये अमेरिकन आणि ब्रिटिश नौदलांबरोबर हिंदी महासागरात पार पडलेल्या संयुक्त युद्धसरावांमध्ये सक्रीय सहभाग घेतला. जगातील चौथे सर्वांत मोठे आणि हिंदी महासागरातील सर्वांत प्रबळ हवाईदल असलेल्या भारतीय हवाईदलाने या सरावांच्या माध्यमातून सागरी हवाई सुरक्षेतील आपला अनुभव आणि क्षमता पुन्हा एकदा सिद्ध केली आहे.

भारतीय हवाईदलाच्या सुखोई-30 एमकेआय, जग्वार या सागरी हल्ला चढवणाऱ्या विमानांबरोबरच शत्रुच्या हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी आणि हवाई कारवायांचे नियोजन करणारी एवॅक्स विमाने, हवेत उडत असतानाच अन्य विमानांमध्ये इंधन भरू शकणारी आयएल-78 एमकेआय इंधनवाहू विमाने या दोन्ही सरावांमध्ये सहभागी झाली होती. या सर्व विमानांनी हवाईदलाच्या विविध परिचालन कमांडच्या अंतर्गत येणाऱ्या वेगवेगळ्या हवाईतळांवरून उड्डाणे केली होती. त्याचबरोबर या सागरी हवाई युद्धसरावांमध्ये भारतीय नौदलाची मिग-29के लढाऊ विमाने, पी-8आय दीर्घ पल्ल्याची सागरी टेहळणी विमाने, सीकिंग-42बी आणि शत्रुच्या हवाई हल्ल्याची आगाऊ सूचना देणारी कामोव्ह ही हेलिकॉप्टर्सही सहभागी झाली होती.

अमेरिकन नौदलातील रोनाल्ड रीगन विमानवाहू जहाजावर तैनात असलेली एफ-18 सुपर ऑर्नेट आणि ई-2 सी हॉक आय ही शत्रुच्या हालचालींवर आकाशातून लक्ष ठेवणारी विमाने, तर रॉयल नेव्हीच्या क्वीन एलिझाबेथ विमानवाहू जहाजावरील एफ-35 लायटनिंग-2 स्टेल्थ लढाऊ विमाने या सरावांमध्ये सहभागी झाली होती. या विमानांनी भारतीय हवाईदलाच्या विमानांबरोबर सामुहिक उड्डाणे आणि सागरी हवाई सुरक्षाविषयक सराव केले.

भारतीय नौदल दरवर्षी आयोजित करत असलेले ट्रोपेक्स युद्धसराव आणि 2018 मध्ये हवाईदलाने आयोजित केलेल्या गगनशक्ती युद्धसरावांमध्ये हवाईदलाच्या सागरी सुरक्षेतील क्षमतांचा अभ्यास केला होता. अशा युद्धसरावांमुळे सागरी हवाई विशेष परिस्थितीच्या (domain) बाबतीत मित्र देशांबरोबरही देवाणघेवाण वाढवण्याची महत्वपूर्ण संधी भारतीय हवाईदलाला उपलब्ध होत असते.

लिंक
https://avateebhavatee.blogspot.com/2021/11/blog-post_12.html?m=1

Group content visibility: 
Public - accessible to all site users