नरकातल्या गोष्टी - भाग २ - दिग्दर्शक!!

Submitted by अज्ञातवासी on 16 October, 2021 - 14:35

"मी राजीनामा देतोय, याक्षणी. मी चाललो."
"सॉरी ना चित्रू..."
"तू सॉरी म्हणू नकोस, सॉरी मला म्हणू दे, हे पाप पुण्याचं कॅलक्युलेशन करण्याचं काम मी स्वीकारलं."
"पण माझी काय चूक, माझं मन मानेल तसं मी लिहिते."
"मी लिहिते??? बाई, कृपा कर माझ्यावर... तू लिहीत नाहीस, तू अवघड कोडी घालतेस... सोडवावी मला लागतात."
"चित्रू..." एव्हाना शांत असलेली व्यक्ती धीरगंभीर आवाजात म्हणाली.
"जी धर्मराज!"
"कॉल मी राज!"
"येस, राज." चित्रू नम्रपणे म्हणाला.
'यांचं टीवी बघणं कमी केलं पाहिजे.' तो स्वतःशीच पुटपुटला.
"दहा हजार वर्षांचा नोटीस पिरेड, लक्षात आहे ना?"
"येस." चित्रूने रागाने मान खाली घातली.
"काय इशू झाला सांग."
"या सटूची एक केस ऐका."
"ऐकव..."
"एक माफिया पोलिसांच्या गोळ्या लागून मेला. आता त्याचा हिशेब करायचाय."
"माफियाचा काय हिशेब करायचा, बाय डिफॉल्ट हेल!"
"एक्झॅक्टली राज, पण हिने काय लिहिलं बघा."
'तो जन्माला आला, मुळातच लहानणापासूनच तो उनाड होता. अभ्यासात त्याची कधीही प्रगती झाली नाही. मग तो वाईट संगतीत राहायला लागला. अशाच संगतीमुळे तो ड्रग विकायला लागला. हळूहळू तो मोठा ड्रग माफिया झाला, आणि त्यानंतर एके दिवशी तो पोलिसांच्या चकमकीत मारला गेला...'
"बरोबर लिहिलंय ना." राजच्या कपाळावर आठ्या आल्या.
"पुढचं वाचा."
"आपल्या बालपणीच्या आठवणी त्याचा कायम छळ करायच्या. म्हणून त्याने अनाथ मुलांसाठी अनाथालय उभारलं, शाळा उभारल्या. कित्येक मुलांना बरबाद होण्यापासून वाचवलं, आणि त्यांना एक चांगलं नागरिक बनवलं. आता सांगा, हे लिहायची काय गरज होती? एका क्षणात सगळा हिशेब गुंतागुंतीचा झाला."
राजसुद्धा विचारात पडला.
"सटू, व्हाय डियर? तुला माहितीये ना, चीत्रुला किती त्रास होतो ते. आता सांग, का केलंस असं?"
"आय एम रियली सॉरी राज, पण मला नाही आवडत सगळं वाईट लिहायला. ते बाळ किती क्यूट दिसत होतं माहितीये? कसं लिहू सगळं वाईट? काहीतरी त्याच्या आयुष्यात व्हायला हवं ना चांगलं?"
"आर यू क्वेशनिंग धर्मराज?" चित्रूचा आवाज चढला.
"चित्रू." धर्मराज हात वर करत म्हणाले.
चित्रू गप्प झाला.
"सटू, यू मे गो नाऊ!"
सटू मान खाली घालून तिथून निघून गेली.
"चित्रू, डाटा आहे?"
"सगळा आहे, ऑलमोस्ट चाळीस हजार पाने."
"किती मुलांना त्याने आजपर्यंत आधार दिला असेल?"
"ऑलमोस्ट तीन हजार. डायरेक्ट!"
"आणि किती लोकांना बरबाद केलं असेल. डायरेक्ट?"
"हे प्रकरण गुंतागुतीचं आहे. कारण तो ड्रग खूप वरच्या स्तरावर हॅण्डल करायचा. खाली त्याचे डीलर होते, हॅण्डलर होते. अनेक स्तरावर हे प्रकरण गुंतलेलं आहे."
"जर त्याने या मुलांना मदत केली नसती, तर दुसरं कुणी होतं का मदत करणारं?
प्रोबब्लिटी जवळजवळ शून्य आहे राज."
"...आणि याने ड्रग पुरवले नसते, तर दुसरे कुणी पुरवले असते, याची शक्यता किती?"
"जवळजवळ नव्वद टक्के. कारण ज्या गँगमधून हा फुटून निघाला, तीच गँग याची प्रतिस्पर्धी होती."
धर्मराज हसले.
"याला स्वर्गात टाका, आणि पुढचा जन्म एका चांगल्या घरात, चांगल्या संगतीत आणि पोलिसाचा मिळेल असं करा."
चित्रू विचारात पडला.
"चित्रू, वाईट परिस्थितीत, वाईट संगतीत राहूनही त्याच्या मनात हा चांगुलपणा रुजला, वाढला, हेच याच्या पुण्याचं द्योतक आहे. नाहीतर सगळं चांगलं असून आपण पाप करणारे बघतोच की."
"जी राज."
"पुढच्या जन्मात याची परीक्षा घेऊयात. चांगल्या परिस्थितीत जर याच्यात वाईटपणा रुजला, तर नरक नक्की..."
चित्रू त्यांच्याकडे बघतच राहिला.
"चित्रू एक लक्षात ठेव. सटू अजून नादान आहे, पण तिचा निष्पापपणा आणि मनातला चांगुलपणा कायम आहे. तुला नाण्याची एक बाजू वाईट दिसत असेल, पण वाईटातही चांगलं करण्याची इच्छा तिच्यात आहे...
...म्हणून तिला हवं तसं करू दे. यामुळेच या विश्वाचं संतुलन कायम राहील...."
चित्रू पूर्णपणे भारावून गेला...
"तुझा राजीनामा नामंजूर चित्रू... पुन्हा महाभारत वाच. तुझ्या हिशेबाच्या कसोटीला याची मदतच होईल...
...आणि तुला दुर्योधनाला स्वर्गात ठेवण्याचं आणि युधिष्ठिर नरकात टाकण्याचंही कारण मिळू शकतं... हू नोज."
चित्रू हसला.
"थॅन्क्स धर्मराज!"
"राज, कॉल मी राज!"

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अफाट कथा !!
दोन्ही कथा आवडल्या.

मस्त, हि सुद्धा आवडली..

सीमंतिनी Proud तेव्हढं नट च्या जागी सुपर्रस्टार लिहायला सांगाल तर वाचायला आवडेल Wink

दोन्ही कथा वाचल्या
सुंदर आहेत...एकदम तात्विक मोड...
>>>अरे, गॉडफादर आहे तो!! त्याला कोण काय सांगणार>>>. Happy

दोन्ही भाग मस्त!
चीत्रू व सटू तर मिकी आणि मिनी इतके क्यूट वाटतेयं. >> +१