संत मुक्ताबाई

Submitted by भारती.. on 7 October, 2021 - 07:34

संत मुक्ताबाई

(जन्म - आश्विन शुद्ध प्रतिपदा -घटस्थापना-शके ११९९ किंवा शके १२०१)

संघर्षमय अस्तित्वाचा एक भरमसाठ वेलविस्तार असतो.खूपसा निरर्थकतेचा पालापाचोळाही. तो हलक्या हाताने दूर करायचा. आयुष्याच्या प्रयोजनाचा पक्व कंद बाहेर काढायचा.त्याच्याही निबर टणक सालीतून नकोशा ओंगळवाण्या तपशीलांचे कुरूप तंतू डोकावत असतात.ते सगळं हलक्या हाताने सोलायचं. मग उरतो तो शुद्ध गर. शुद्ध मधुर सत्व . ते शतकानुशतकं टिकून राहातं, पुढच्या पिढ्यांचं पोषण करतं. असा रांधायचा असतो परमानंद.
संत मुक्ताबाई.

लखलखीत मध्यान्ह,त्यातच आसमंत झोडून काढणारं धुळीचं विवर्त .रखरखाट.गावशिवाराबाहेरच्या तापलेल्या मलूल रानातून आपण निघालोय लहानशा पाऊलखुणा शोधत ,तेव्हा दिसतं ते बहिष्कृत विपन्न खोपटं. आतून मनस्वी हसण्याबोलण्याचे बाल-किशोर पण व्युत्पन्न स्वर येताहेत.. ही सर्वात लहान गोजिरवाणी मोठ्या भावाला सांगते आहे -‘टाकिल्या उपाधी तेथे कैंची हे समाधी | गुह्य म्हणता वेदी मौन्य केले |फुटली बुदबुदे नाशाची विलासे | त्यात ब्रह्म कैसे मावळले |म्हणे मुक्ताबाई पाहाण्याच्या हातोट्या | प्रेमे दादा काट्या कवटाळील्या ||‘’ !!

शके ११९९ मध्ये जन्मलेली मुक्ताई मातापित्यांना देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागले तेव्हा अवघ्या चार वर्षांची होती. अघटिताची वीज तिच्या आयुष्याच्या सुरुवातीलाच तिच्या जगावेगळ्या घरकुलावर कोसळली तेव्हा सर्वात लहान आणि एकुलती एक बहीण असं तिचं त्या चार अलौकिक भावंडांमधलं अनन्य स्थान होतं.. या दुहेरी ताणातून मुक्ताई आपल्या भावांना तोडीस तोड अशी ब्रह्मज्ञानी आणि त्याचवेळी अवखळ स्पष्टवक्ती अशी घडत गेली . ज्या जगाने तिच्याकडे पाठ फिरवली त्या जगाच्या श्रेयस संकल्पनांनाच तुच्छ् करून ही सिद्धयोगिनी स्वत:मध्येच परिपूर्ण झाली.

निष्पाप आईवडीलांना गुन्हेगारासारखं क्रूर देहांतशासन फर्मावल्यावरही त्या अनाथ लेकरांना सामावून न घेणारा, चारीबाजूंनी वेढणारा सनातनी निर्दय समाज. या पार्श्वभूमीवर निरतिशय आणि निरर्थक अन्याय अपमान सोसत (त्यातही स्त्री म्हणून तिच्या वाट्याला वेगळे दंश आले असणारच) मानी मुक्ता कशी घडली असेल ते तिच्याच शब्दांच्या गूढगर्भात शोधत जावे लागेल.

ज्ञानेश्वरांनी सर्वच व्यक्तिगत उल्लेख अगदी काळजाच्या कुपीत सांभाळले. मुक्तेच्या शब्दात क्वचित आणि प्रभावीपणे ते दु:ख आले आहे.
’’तात आणि माता गेलीसे येथून| तेव्हा आम्ही लहान पांडुरंगा | निवृत्ती ज्ञानेश्वर कोरान्नाचे अन्न | सांभाळी सोपान मजलागी ..’’

पण दु:खपूजनाला तसा अंत नाही. एकदा त्यातच गुंतले की परमसुखप्राप्तीला मग अवसर उरायचा नाही.
‘’बाप भाग्याचा योगींद्र | नभ गोसावी स्वये सार | सुनीळ गुह्याचे विवर उघडिले असे |.. तेथे अनंत विद्युल्लता नयनी | शुद्धत्व रूपे गोसाविणी | ब्रह्मांड भवानी देखणी प्रकटली ..’’ ते आईवडील जणू आता शिव-भवानी स्वरूपात पुन: प्राप्त झाले.हा मुक्ताईचा अनुभव सोप्या वाटेने चालणाऱ्याला यायचा नाही.

या नित्याच्या अग्निपरीक्षेत ऐहिकाला मुक्ता कधीच ओलांडून गेली.’’मन मारून उन्मन करा | ताटी उघडा ज्ञानेश्वरा ||-‘’ अशा सूत्रमय शब्दात अपमानांनी दुखावलेल्या ज्ञानेश्वरांनाही उपदेश ती करू शकली कारण ते शब्द ती प्रत्यक्ष जगली होती. कठोर दैनंदिनाच्या मुशीत घडत गेली ही ब्रह्मवादिनी. वडील भावांना दादा दादा म्हणत अभंगातून विश्वस्वरूपाची आणि आत्मस्वरूपाची चर्चा करणारी.नाथपंथीय साधनेची, योगिक क्रियांची दुर्बोध गूढ विवरणे सांगणारी,मागणारी.

’’आकाशी अवकाश नवते हे जाण | तेव्हा हा भगवान पाणी होता | आंधारीची नांदणूक कोण्ही वोळखीना | तेव्हा तारांगणा ठाव नव्हता ||’’ – थेट नासदीयसूक्तातील संकल्पना . स्वत:च्याच आरशात स्वत:ला पारखून पाहाणारे शब्द . ‘’नव्हे हा शब्द नव्हे हे वाणी | जाणा सकळ धणी कल्पतरूची | नव्हे हा बोल बोलाचा व्यापार | बोले सर्वेश्वर विस्तारिला | जेव्हा शब्द होते काय करावे कोण्ही | वासना ज्याची त्यांनी उठवीली ..’’ तिचे असे अनेक अभंग आहेत , जे सर्वसामान्यांच्या इयत्तेपलीकडील आहेत. मुक्ताबाईची प्रतिभा विशुद्ध तात्त्विक -पारमार्थिक पटलातून प्रकटल्याने दूरस्थ वाटते.

तरीही तिच्याबद्दल अपार आदरापोटी सर्वसामान्यांनी तिच्या अनेक गूढ रचनांपैकी काही उराशी कवटाळल्या आहेत – नकळता त्यांनाही काहीतरी जाणवते आहे. जशी -‘’मुंगी उडाली आकाशी तिणे गिळिले सूर्यासी ‘’ ! ही छोटीशी मुंगी आकाशव्यापी झाली, हिने तर सूर्यच गिळला . कदाचित स्वत:बद्दलच बोलतेय मुक्ता या जीवात्मा -परमात्म्याच्या रूपकातून. अनाकलनीय रूपकांची लगोरी रचून खेळणारी एक असामान्य मुलगी दिसते आहे या शब्दांतून –‘माशी व्याली घार झाली – देखोन मुक्ताई हासली ! ‘’ प्रपंचाच्या दलदलीवर घोटाळणारी माशी असे म्हटले आहे येथे बुद्धीला , पण त्याच बुद्धीच्या पोटी आकाशाचा ठाव घेत जाणारी घार – परमार्थसाधना – जन्माला येऊ शकते हे पाहिलं आहे मुक्तेने , यातला विरोधाभास पाहून ती खुदकन हसते आहे.. एक असं निरागस हसू फुटतं आहे या शब्दांच्या आतून की डोळेही सोबतीने भरून येतात ..

मुक्त या शब्दाची जणू मूळ व्याख्याच अशा या काही अभंग-ओळींमधून ती आपल्या गूढ मानसिकतेचे दार किलकिले करते.
मुक्तामुक्त दोन्ही नाईकतो कर्णी | हरिनामपर्वणी सदा काळ |
मुक्तपणे मुक्त मुक्ताई पैं रत | हरिनाम स्मरत सर्वकाळ |
मुक्ताईचे चित्त निरंतर मुक्त | हरि हेंचि संचित आम्हा घरी |
मुक्त आणि अमुक्त याची आम्ही चर्चाच करत नाही ! आम्ही मुक्तपणे मुक्त आहोत असं म्हणणारी मुक्ता. मुक्ती आणि बंधन यावर अधिक काही बोलायची सोयच ठेवत नाही .

एकांत हे मुक्ताबाईचे बलस्थान आहे. एक जगावेगळी स्त्री म्हणून तिच्या वाट्याला जो बहिष्कृत अवकाश आला तो उलट मोठ्या अभिमानाने आनंदाने स्वीकारून त्या एकांतात तिने अमर्याद चिंतन,साधना केली आहे. ‘’प्रारब्ध संचित आचरण गोमटे | निवृत्ती तटाकें निघालो आम्ही | मुळींचा पदार्थ मुळींच पैं गेला | परतोनी अबोला संसारासी ||” जेथून तुम्ही आम्हाला उठवले त्या तुमच्या प्रपंचातून आम्ही निघालोच ! जगाशी अबोला. मौनाची मठी . येथेच राहून परमपद प्राप्त केले आहे तिने आत्मरतीतून.

बाकीच्या सुमार भावना आणि अपार वेदनाही तिने तिच्या मनातून कायमच्या हद्दपार केल्या आहेत. हे कसं जमलं तिला ? तर ‘’मने मन चोरी मनोमन धरी | कुंडली आधारी सहस्त्रदळी ‘’ मनानेच मनाला चोरायचं , मनाच्या मुठीत मनोमन धरून ठेवायचं .मूलाधारापासून सहस्त्रारापर्यंत खेळवायचं .ही एकांत-धारणा.

दिवस येतात आणि रात्री जातात. आयुष्य सरकत राहातं.चारी दिशा शून्य आहेत. निरखत राहिलं तर चौफेर अभाव- अन्यायाचा धुरळा .पण मुक्ताई तिथे रेंगाळत नाही. तिच्या दृष्टी/श्रुती एकाच वेळी सूक्ष्म आणि विशाल होत चालल्या आहेत चिंतनातून ,निदिध्यासातून. ध्यानातून.

’’दिवसा शीतळ निशियेसी बरळ | अधऊर्ध्व केवळ निजबीज | या आदि नाही अनादिही नाही |कैचा मोहप्रवाही दिसेचिना||’’ दिवसाच्या लाहीत शीतलता देतं आणि रात्री निजेतही पुसट जाणवत रहातं असं आहे ते निजबीज . ते खालीवर भरून राहातं .आदि अनादि या शब्दात मावत नाही . हे निजबीज म्हणजे काय ? तर साधं ‘’केशव-हरी‘’ ! श्रीकृष्णाचं नाम, नित्य अनुसंधान. पण हे रहस्य मोहप्रवाहात सापडलेल्यांना कधीच गवसत नाही. ’’ मुक्तपणे ब्रीद बांधोनिया द्विज |नेणती ते बीज केशव हरी ||’’ !

तर हा एकांत. मुक्ताबाईला वेढणारा . तशी तर ती घरातच आहे.पण किती फसवं आहे तिचं हे घरात अन त्यातूनही माजघरात असणं ! ब्रह्मांड व्यापणारं परतत्व चक्क तिच्याबरोबर सदैव आहे . मग कुठे जायची धावाधाव कशासाठी ? ‘’चित्तासी व्यापक व्यापुनिया दुरी | तेंचि माजिघरी नांदे सदा | दिसे मध्य सुख मुक्तलग हरी | शांती वसे घरी सदोदित ||’’ त्या तिच्या अंत:पुरातच जिवलग हरी आहे , तो अज्ञान हरण करतो मग मागे उरतं सुख ,अखंड शांती.

मग या एकांतात या निवळलेल्या अंतर्दृष्टीला आपसूक विराट दर्शन होतं सत्याचं.’’निर्गुणाची सेज सगुणाची बाज | तेथे केशीराज पहुडले ..’’ सगुणाच्या इंद्रियगोचर विश्व-खाटल्यावर निर्गुणाची शेज पसरून विसावला आहे अनादिअनंत परमपुरुष ! असं भव्य दर्शन मुक्ताबाईमुळे निदान शब्दाच्या स्तरावर आपण अनुभवू शकतो.

स्त्रीसुलभ जाणिवांचं एक बाजारपेठीय मिथ्यक आहे. मुक्ताईच्या शैलीत तसलं प्रकट आणि प्रचलित स्त्रीत्व सापडत नाही, पण ते सूक्ष्मपणे विद्यमान आहे. ती तिच्या मोठ्या भावांची छोटी आई तर आहेच, पण जिवाभावाची, तोलामोलाची एकमेव सखीही आहे. ’’ऐकावा हा अर्थ मुक्ताईच्या मुखी |आता ऐसी सखी नाही कोणी" -निवृत्तीनाथांनी ही भावना तिच्या इहलोक सोडून जाण्यानंतरच्या आकांतातून व्यक्त केली . अशी मैत्रीण मिळणार नव्हतीच कुठे बाहेर शोधूनही त्या भावांना. पण या छोट्या आईचा अत्यंत लाडका पुत्र फक्त चौदाशे वर्षांचा वृद्ध आहे ! वटेश्वर चांगा तिचा शिष्य. त्याच्यासाठी ती अंगाई गाते - ‘’ निजी नीज बाळा न करी पै आळी | अनुहात टाळी वाजविते !’’ -निजस्वरुपामध्ये विलीन हो रे बाळा,ऐहिक सिद्धी-प्रसिद्धीची गडबड करू नकोस, अनाहताने ताल धरलाय ना तुझ्यासाठी !

मुक्ताईच्या शैलीवर ज्ञानदेवांच्या शैलीचा संस्कार आहे पण अनुकरण नाही. भावनांचे कल्लोळ अभावाने म्हणून उत्कट जाणवणारे . मन तर मागेच मारून उन्मन झालेले आहे. कवित्वाचाही बडिवार नाही .

अडीचशे –तीनशे अभंगात सामावलेली ही कविता म्हणजे आता केवळ मागीलांच्या मार्गदर्शनासाठी ठेवलेला दस्तावेज. ज्या अद्भुत घटनांचा तिच्या चरित्रात ठायीठायी विलास आहे , त्यांचेही आत्मचरित्रात्मक थेट असे उल्लेख कमीच. घटनांशी गुंफलेले व्यक्तिगत आत्मिक विकासाचे आलेखही आडूनच आलेले ,शोधूनच कळणारे. उदाहरणार्थ , ‘चणे खावे लोखंडाचे तेव्हा ब्रह्मपदी नाचे ‘’ ताटीच्या एकोणीस अभंगातील या सपाट सुभाषितवजा ओळीत कष्ट, वेदना, उपासमार,अनुभवास आलेले क्रौर्य साराच दारूगोळा ठासून भरला आहे तोही नामानिराळ्या वृत्तीने. गूढगुंजन करणाऱ्या पुष्कळ रचना, पण त्यात अधिकतर प्रतिमा-रूपकांच्या पातळीवरून योगक्रियांची चर्चा करणे , त्यातून येणाऱ्या अनुभवाचे सूचन करणे, यावरच काय तो सारा भर.एका नाथपंथीय महायोगिनीच्या आध्यात्मिक जीवनाचा आलेख.आणि नंतर वारकरी पंथाच्या परिवेषात भक्तीने ओथंबलेले तरीही विद्वत्ता लपवू न शकलेले असे नाममाहात्म्य सांगणारे अभंग.मात्र व्यथेवर पोसली गेली आहे ती एक जगावेगळी विनोदबुद्धी. साऱ्या परिस्थितीवर मुक्तपणे हसण्याचीही हिंमत असलेली एक मुलगी..

तापी नदीचे तीर. ऐन वैशाखातील तळपत्या माध्यान्ही अचानक सृष्टीच्या मांडवात पंचतत्त्वांचे तांडव करणारा वादळी पाऊस.सगळी लक्षणे मुक्तेच्या अलौकिक आयुष्याशी सुसंगत.तो पराकोटीचा भवदाह आणि त्यावर अवतरलेली ईश्वरी कृपा. येथेच मुक्ता तिच्या प्रकाश-मूलतत्त्वात –विजेच्या लखलखाटात सामावून गेली. तिचा जन्म, आयुष्य, साधना सगळीच तेजाची आरास होती . प्रकाशमय अशा चिदाकाशात ती अंतर्धान पावली. ‘’कडाडली वीज निरंजनी जेव्हा | मुक्ताबाई तेव्हा गुप्त झाली ‘’ – या भावंडांच्या जीवनाची व महानिर्वाणाची वर्णने ग्रथित करणाऱ्या संत नामदेवांचे हे शब्द. सदेह समाधीचाही उपचार नाही .

’मुक्ताबाई म्हणे यावे जावे कोठे | अवघे निघोटे स्वरूप स्वामी | आमुच्या स्वस्थानी नाही पा अंधार |अवघे चराचर प्रकाशत्वे||‘ जीवनाच्या रंगमंचाचा नाट्यपूर्ण निरोप घेताघेता हे शब्दही तिने खरे करून दाखवले.

एकामागून एक जगाचा निरोप घेण्यातून या भावंडांनी विहितकार्य संपले म्हणून कथानक तर संपवलेच ,कदाचित अन्यायी जग-जनरीतींबद्दल आपला एकमात्र नि:शब्द निषेधही त्या कृतीतून नोंदवला असावा . या जगाचे सन्मान स्वीकारून नाकारण्याचा सोहळा.

मुक्ताबाईंचं उण्यापुऱ्या अठरा वर्षांचं अल्प चरित्र. भावंडांच्या चरित्रात मिसळून गेलेलं. निवृत्तीनाथ , सर्वात वडील बंधु आणि गुरु.त्यांनी तीनही भावांच्या वतीने ही प्रेमरसधारा अधिक विवरून दाखवली आहे– ‘’त्रिवेणीचा ओघ जैसा एकेठायी | तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ||’’(मात्र येथे प्रयागच्या त्रिवेणीसंगमातच त्यांच्या आई वडिलांनी देहत्याग केला होता त्याचा सुप्त संदर्भ येतो असं मला वाटतं , त्या दु;खाचं सगळ्यात निरागस रूप मुक्ता, तिच्याठायी आतून ती भावंडे एकवटली आहेत हे जाणवतं ) .

अशा लाडक्या मुक्तेने ज्ञानेश्वरांच्या पाठीत रसरसलेल्या योगाग्निवर रांधलेले मांडे , हे दृश्य पाहून शरण येऊन त्यांचे उष्टे अन्न खाणाऱ्या विसोबाला ‘’खेचर’’ ( उष्टे खाणारा पशू ) ही उपाधी देणे, चांगदेवाचे कोरे पत्र पाहून ‘’चौदाशे वर्षे जगून चांगोबा कोरा तो कोराच-‘’ असे भाष्य करणे, नामदेवांचं मडकं कच्चंच आहे असं जाहीर करून त्याला मनस्वी दुखावून मोकळं होणं –तिची ही प्रसंगपरत्वे साकारलेली रूपं काळजात साठवावीत अशीच आहेत कारण आईच्या मायेमध्ये लहान बहिणीचा नैसर्गिक खोडकरपणा सामावून तिचं व्यक्तिमत्व विशेष मधुर झालं आहे. खरं तर या फटकळपणामध्ये या सर्व महान संतांबद्दलचे तिच्या मनातले ममत्वच लपले आहे , त्यांना अहंकाराची बाधा होऊ नये अशी तिची इच्छा आहे.

कशी दिसत असेल मुक्ताई ? समकालीन संत जनाबाईंच्या एका अभंगात आपल्याला मुक्ताईच्या साज-या रूपाची
झलक दिसते.’’विठो माझा लेकुरवाळा | संगे लेकुरांचा मेळा | निवृत्ती हा खांद्यावरी | सोपानाचा हात धरी | पुढे चाले ज्ञानेश्वर | मागे मुक्ताई सुंदर | ... ‘’ – या अनन्यसुंदर अभंग-चित्रात एकट्या मुक्ताईला ‘सुंदर‘ हे विशेषण योजून तिच्या राजस रूपाचाही उल्लेख जनाबाई सहजतेने करत आहेत.या कल्पनाविलासातही सर्वात लहान तरीही कुणाचाही हात न धरता मुक्ताईचे मागे स्वतंत्रपणे चालणे हे तिच्या मानी स्वभावाचे निर्देशक आहेच.

आपल्या परम-प्रतिभावंत भावाला दु;खाची ताटी उघडून कोशातून बाहेर यायला, स्वत: तरून विश्व तारायला सांगणारी, एका परीने त्याला ज्ञानेश्वरीलेखनाची प्रेरणा देणारी ‘लडिवाळ मुक्ताबाई ‘ इतरही सर्व योगी-संत मंडळींचा समावेश आपल्या विस्तारित कुटुंबात करत आहे . त्या सर्वांनीच विकारांच्या तावडीत न सापडता विश्व तारावे ही तिची कळकळ आहे.
म्हणून तर संत कवयित्री जनाबाई अत्यंत आदराने म्हणतात, ’’आदिशक्ती मुक्ताबाई | दासी जनी लागे पायी ||'' !

भारती..

Group content visibility: 
Public - accessible to all site users

संत मुक्ताबाई....

निवृत्ती, ज्ञानोबा, सोपानाची मुक्ताई...
मुळातच ती एक लखलखीत अग्निरेखा - निःसंग, विरागी, एकली...
पण तिच्या भाऊरायांसाठी ती एकदम शीतळ झुळूकही होते...
ज्ञानोबांसारख्या महाज्ञानी पुरुषाला ताटीचे अभंग ऐकवून समजूतही काढते...
चांगदेवांसारख्या योग्याला श्रीगुरु निवृत्तीनाथ या मुक्ताईच्याच ओटीत घालतात....

ही सगळीच असामान्य मंडळी, दैवी गुणांनी युक्त... आपल्यासारख्यांच्या कल्पनेच्या कितीतरी पलिकडे असणारी....

पण काही काळ का होईना त्यांना शरीर, मन धारण करावे लागले...त्याची सुखदुःखे भोगावी लागली....जगाशी व्यवहार करावा लागला...

कशी रहात असतील ही सारी विदेही मंडळी ! जेव्हा कठोर वास्तव समोर ठाकलं असेल तेव्हा काय प्रतिक्रिया उमटल्या असतील त्यांच्या मनात !

आपण आपल्या परीने शोध घेत रहातो, व्यथितही होतो, चकितही होतो, नतमस्तकही होतो.

एक मात्र खरे आहे की या मंडळींनी कुठे दूर गिरीकंदरात, एकांतात जीवन व्यतीत केले नाही. हे सारे लोकांतातच होते. आपल्या परीने भक्ती, ज्ञान, योग सर्वसामान्यांकरता उलगडून दाखवत होते...कुठलाही अभिनिवेश न ठेवता, हातचे राखून न ठेवता...

भारतीताईंनी घेतलेला मुक्ताबाईंच्या संपूर्ण जीवनाचा वेधक आढावा वाचताना जे काही मनात उमटलं ते लिहिलं गेलं...

भारतीताईंचा एकंदर व्यासंग, मुक्ताईबद्दल मनात असलेले अनिवार प्रेम हे सारे त्यांच्या शब्दाशब्दातून ओथंबून वहाताना दिसते...
योगामधे अतिशय निपुण असणार्‍या मुक्ताबाई सगुण भक्तीप्रेमात कशा रंगलेल्या होत्या हे वाचतानाही अगदी सुख दाटून येत होते.
अतिशय स्पष्टवक्त्या व परखड स्वभावाच्या मुक्ताबाईंना विनोदाचे वावडे नव्हतेच पण वेळ प्रसंगी त्यांचे मातृत्वच जास्त उफाळून येणारे होते.

अशा या आगळ्यावेगळ्या व्यक्तीरेखेवर प्रकाश टाकणार्‍या या नितांतसुंदर लेखाकरता भारतीताईंचे हार्दिक आभार...

____/\_____

फारच सुंदर लेख. पुरंदरे ह्यांचा प्रतिसादही तेव्हढाच उत्कट.
व्यासंग आणि वर्ण्य विषयाशी एकरूपता.
हळुवारपणे अंतरंग उजळून दाखवणारी भाषा.
सारेच सुंदर.

शशांकजी, सुंदर प्रतिसाद. नेमकं भाष्य.
मुक्ताबाई पूर्णार्थी समजणं कठीण. आपली इयत्ताच कमी, पण आज त्यांच्या जन्मदिनी स्मरणसेवा केली.
आभार हीरा Happy

नितांत सुंदर...
शंशाकजींचा प्रतिसादही सुंदर...

सुरेख! पुनःपुन्हा वाचावे असे लेखन. धन्यवाद!
मुक्ताबाईंची जन्मतिथी अश्विन शुद्ध प्रतिपदा असावी हा किती विलक्षण योगायोग!

छान लिहिलं भारती..

या चौघा अलौकीक भावंडांनी असं काय पाप केलं असेल म्हणुन सर्वांची अशी परवड झाली...? इतक्या भयंकर खडतर परंतू तोकड्या वर्षांच्या जीवनप्रवासात त्यांनी समाजाला हजारो वर्षं मार्गदर्शनच मिळेल असं काम केलं. समाजाने कितीही अवहेलना केली, त्रास दिला, जीवन नकोसे केले, प्रसंगी जीवही घेतला तरी आपल्या कार्यापासून यत्किंचितही न ढळणार्‍या या चार भावंडांसारखेच जगतगुरु संत तुकाराम, संत चोखोबा, संत सावता, संत कान्होपात्रा, संत गाडगेबाबा यांच्या सारख्या विभुतिंना त्या त्या वेळच्या समाजातील निष्ठुर लोकांनी भरपूर छळले. प्रसंगी खूनही करवले.

हा कित्ता अशा प्रकारच्या नीच प्रवृतीच्या माणसांनी तिथून पुढेही चालुच ठेवला तो आजतागायत. अगदी छत्रपती शिवाजी महाराज यांनाही त्यावेळच्या काही अतृप्त माणसानी भरपूर त्रास दिला, जनतेच्या कल्याणाकरीता योजलेल्या कार्यात खोडा घातला, प्रसंगी त्यांच्यावर कटकारस्थाने करून विषप्रयोग केले, त्यांच्यावर तलवारीने वार केले, इतकेच काय त्यांच्या पश्चात स्वराज्य औरंगजेबाच्या पायावर घालण्याचे स्वप्न बघितले.

ही अशी समाजविघातक माणसे संत ज्ञानदेवांच्या काळापासून ते थेट आता आता पर्यंत दिसून येतात. महात्मा फुले यांच्या स्त्री शिक्षणाच्या कार्यात विखारी साप सोडणारे, सावित्रीबाई फुलेंवर कुत्सीत शेरेबाजी करून शेणगोळे अन चिखलगोळे फेकणारे, शाहु महाराजांना लोककल्याणाची कामे करू न आपल्या टुकार वर्तमान पत्रात फडतूस लेख लिहिणारे अन शाहू महाराजांनी यांच्या इनामी जमिनी सरकारजमा केल्या म्हणुन त्यांच्यावरच मुंबई कोर्टात केसेस करणारे स्वतःला अतिशहाणे समजणारे, राष्ट्रपिता महात्मा गांधींचा गोळ्या घालून खून करणारे, भारताचे उज्ज्वल भविष्य बघणार्‍या पंडित नेहरुंवर कुजबुज मोहिम चालवून चारित्र्यहनन करणारे, सर्वात हुषार पंतप्रधान ठरलेल्या डॉ. मनमोहन सिंगांना गुंगा म्हणुन हिणवणारे ठराविक विचारांचे पाईक असणारे लोक हजारो वर्षं समाजाचा घातच करत आलेले आहेत हे आपण विचार केला तर लगेच लक्षात येतं.

मनापासून धन्यवाद साळुंकेजी, उदय, सुमुकता, अमितव. डीजे, जिज्ञासा..
डीजे, तुमचं म्हणणं अंशत: बरोबर आहे.. संत, क्रांतीकारक आणि समाजसुधारक यांना वेगवेगळ्या परीने अग्निदिव्यातून जावं लागतं. ते तसे समाजपुरुषाशी एकाकी संघर्ष करत असतात. संत तर पूर्णपणे नि:शस्त्र असतात. प्रेम हे एकच उत्तर त्यांच्याकडे असतं. ईश्वरावर आणि त्याच्या निर्मितीवर केलेलं विशुद्ध प्रेम. पण या यादीत राजकारणी आणू नयेत कारण त्यांच्या मागे त्यांचे त्यांचे अनुयायी असतात. त्यांची नावं घेताना आपलेही पूर्वग्रह त्यात येतात. असो.

नितांत सुंदर...!
शंशाकजींचा प्रतिसादही सुंदर...! +१

खूप दिवसांनी मायबोलीवर आलो त्याचं सार्थक झालं. हे असं काही वाचायला मिळणं हे भाग्यातच पाहिजे आणि ते ही मुक्ताबाईविषयी लिहिलेलं. थान्कु हा लेख लिहिल्याबद्दल. तुझ्यामुळे मुक्ताबाई थोड्या समजायला मदत झाली, अभंग ऐकताना शब्दांपेक्षाही मी नेहमीच चालीविषयी जास्त बायस्ड असतो, आता तो बायस कमी होईल.

‘’त्रिवेणीचा ओघ जैसा एकेठायी | तैसी मुक्ताबाई आम्हामध्ये ||’’(मात्र येथे प्रयागच्या त्रिवेणीसंगमातच त्यांच्या आई वडिलांनी देहत्याग केला होता त्याचा सुप्त संदर्भ येतो असं मला वाटतं , त्या दु;खाचं सगळ्यात निरागस रूप मुक्ता, तिच्याठायी आतून ती भावंडे एकवटली आहेत हे जाणवतं ) .>>>> खूपच भावलं.

पुरंदरे काकांचा प्रतिसाद पण खूपच छान.

ज्येष्ठ साहित्यिक जावेद अख्तर यांनी संत मुक्ताबाई यांच्याबद्दल मांडलेले विचार -मराठी साहित्य संमेलन डिसेंबर 2021

https://www.loksatta.com/nashik/writer-javed-akhtar-praise-marathi-drama...

“एका गोष्टीसाठी मराठी समाजाने कितीही अभिमान केला तरी कमी पडेल”
जावेद अख्तरांनी महिला साहित्यिकांवर बोलताना सांगितलं, “मराठी भाषा आणि मराठी समाजाने कितीही अभिमान बाळगला तरी तो कमी पडेल अशी एक गोष्ट आहे. ती म्हणजे संत ज्ञानेश्वरांची एक बहीण होती आणि ती देखील कविता लिहित होती. युरोपमध्ये तर कुणीच कविता लिहिणारी महिला नव्हती. ८०० वर्षांचं सोडा १८ व्या आणि १९ व्या शतकात फ्रान्समध्ये खूप मोठी महिला कादंबरीकार जॉर्ज सँड या पुरुषाच्या नावाने लिहायची. इंग्लंडमध्ये एक महिला जॉर्ज इलिएट नावाने लिहायची. मोठ्या लेखिका असूनही त्यांना पुरुषांच्या नावाने लिहावं लागलं. कारण बाई कसं लिहू शकते असा विचार २००-२५० वर्षांपूर्वी युरोपमध्ये होता.”

“भारतातच काय, युरोपातही ८०० वर्षांपूर्वी महिला साहित्यिक नव्हती, मराठीत होती”
“आमच्याकडे ८०० वर्षांपूर्वीची कवयित्री आहे. आपल्याला त्यावर अभिमान बाळगला पाहिजा. ही सामान्य गोष्ट नाही, खूप मोठी आहे. आपल्याकडे मुक्ताबाईच नाही तर त्यानंतर बहिणाबाई देखील झाल्या. मीरा तर यांच्या ४०० वर्षांपूर्वी झाली. मात्र, ८०० वर्षांपूर्वी भारतात मराठीशिवाय कोणत्या इतर भाषेत महिला साहित्यिक असल्याची माझी माहिती नाही. त्यामुळेच भारताची पहिली महिला डॉक्टर देखील महाराष्ट्रीय होती हे आश्चर्यकारक नाही. महाराष्ट्राच्या सभ्यतेत इतर ठिकाणांपेक्षा महिलांसाठी अधिक आदर होता,” असं निरिक्षण त्यांनी मांडलं.
----------------

कृपया यावर राजकारण आणू नका.