अष्टमीची चक्रपुजा

Submitted by मी_आर्या on 14 October, 2021 - 05:33

चक्रपुजा- नवरात्रातील एक विधी
होणार होणार म्हणत म्हणत १९वर्षांपासून पेंडिंग असणारी नवरात्रातील चक्रपुजा आमच्या माहेरी २०१४ मध्ये संपन्न झाली आणी सगळे भरुन पावलो. आमच्या माहेरी चक्रपुजेची परम्परा आहे.
कुलदेवता: बिजासनी देवी(सेन्धवा) मुळ स्थानः विन्ध्यवासिनी देवी (मिर्झापुर, उ.प्र.)

चक्रपुजा दर दोन/ तीन वर्षांनी करतात. यासाठी सगळे सख्खे चुलत भाऊबंद लागतात. अशाच काही आर्थिक अडचणीमुळे १९९५ मधे काकांकडे झालेल्या चक्रपुजेनंतर घरात ही पुजा झालीच नव्हती. २०१४ मधेही एकदा रद्द होउन आईच्या जबरदस्त इच्छेमुळे ही पुजा संपन्न झाली.
आमच्याकडे ही पुजा नवरात्रातील अष्टमीलाच होते. त्यासाठी आधी संपूर्ण घराची साफसफाई, रंगरंगोटी होते. ढीगाने कपडे धुतले जातात. ११ करंज्या , ११ सांजोऱ्या करतात.. या पुजेसाठी कुठल्याही प्रकारची ११ फळे लागतात. पुजेच्या दिवशी सर्व लहानथोर उपवास करतात.
गुळ बारीक चिरुन दुध, पाणी, मध टाकुन पातळ करण्यात येतो. त्यात थोडी थोडी गव्हाचे पीठ टाकत कणिक भिजवण्यात येते. या कणकेचे ११ मोठे दिवे आणी बाराव्वा 'मेढ्या' हा त्या सर्वांपेक्षा मोठा दिवा बनवण्यात येतो. हे दिवे वाफवले जातात.
IMG_20141002_150836.jpgIMG_20141002_172044.jpg
हे दिवे साजुक तुपाचे लावतात. एकीकडे देवकपाशीच्या काडीला कापुस गुंडाळून ती तुपात भिजण्यासाठी ठेवुन देतात.
दुपारी फराळ झाल्यानंतर एका कोहळ्याची आधी पुजा/आरती करुन त्याला 'दैत्य' समजुन कापण्यात येते. नंतर आख्खे तांदूळ घेउन ते पिवळे(हळद), लाल(खाण्याचा रंग ) असे रंगीत करतात. आख्खे मुग, उडीद हे ही कडधान्य वापरण्यात येते.
हे सगळ घेउन घरातले उत्साही स्त्रीपुरुष चक्र भरण्यास सुरुवात करतात. आधी खडुने आखुन घेतले तरी चालते. सर्वात मधल वर्तुळ ज्याच्या हातची पुजा असते त्याने मुठभर तांदूळ टाकुन सुरु करायची असत.
IMG_20141002_160935.jpg
नंतर त्याच्याभोवती पिवळा लाल असे वर्तुळ भरत येतात. काही कुटुंबातली चक्रपुजा चांदणीच्या आकाराची असते तर काहींची षट्कोनी, अष्टकोनी! त्या गोलात आणखी छोटे वर्तुळ करुन त्यात उडीद, मुग हे धान्य भरतात. अशी नउ मोठी वर्तुळ झाली की सर्वात बाहेरच्या वर्तुळाला चारही दिशांना दरवाजे करतात.
IMG_20141002_165206.jpg
पुर्ण भरलेले चक्र.
या चक्राच्या पुर्वेकडच्या दरवाजाजवळ अग्नेय कोपर्यात तान्दुळाने सुर्य आणि राखेने मारुती काढला जातो.तर ईशान्य कोपर्यात तांदुळाचा चंद्र आणि तांदुळाचाच मारुती. वायव्येला सात आसरा/अप्सरा आणि उडदाचा मारुती तर दक्षिणेला आख्ख्या मुगाचा मारुती काढण्यात येतात.
IMG_20141002_184629.jpg
संपूर्ण चक्र भरायला ४ ते ५ तास लागतात. नंतर चक्राच्या आजुबाजुने वर्तुळाकार, केळीच्या पानावर करंजी, सांजोरी , विविध प्रकारची फळे, लिंबू ठेवण्यात येतात. त्यांच्या मधोमध हे ११ दिवे एकेक पानावर ठेवण्यात येतात. मध्यभागी 'मेढा' ठेवला जातो.
IMG_20141002_194358.jpg
संध्याकाळी एकीकडे एका लहान कुमारीकेला 'भवानी' म्हणुन बसवले जाते. तिचे पाय धुवुन तिची पुजा करण्यात येते. चक्रपूजा मांडून झाल्यावर बाजूला होम पूजा केली जाते. या पूजेला एक नारळ, पाच वेगवेगळ्या झाडांच्या काटक्या, चंदनाचे लाकूड, उद, गुगुळ इत्यादी होमात टाकून होम कापूर ज्योतीने पेटवला जातो.७ वाजेनंतर ,चक्रावर ठेवलेले दिवे घरातला ज्येष्ठ पुत्र त्या तुपात भिजवलेल्या काडवातीने (एकाच पायावर वजन तोलत) पेटवतो. होम पेटताच "दुर्गे दुर्गट भारी तुजवीन संसारी" ही सर्वदूर प्रसिध्द असलेली देवीची आरती म्हटली जाते. (देवी अग्नीत विलीन होते.) घरातील लहानथोर देवीची पुजा करतात. काहीजण देवीची ओटी भरतात.
IMG_20141002_225532.jpg
सर्व नातेवाईक, भाऊबंद आणि घरोब्याच्या लोकांना चक्र पूजेच्या जेवणाचं निमंत्रण दिलं जातं. चक्र पूजा झाल्यावर आधी कुमारीका जेवायला बसते. नंतर निमंत्रित जेवायला बसतात. चक्रावर भरलेले पुरणपोळी, सांजोरी, करंजी वै ज्या त्या जागेवरच रात्रभर झाकून ठेवतात. दुसऱ्या दिवशी सगळे भाऊबंद सकाळी शुचिर्भूत होऊन प्रसादाला बसतात. तेव्हा तो चक्रावरचा प्रसाद काढण्यात येतो. भाऊबंदांपैकी सगळ्यांना तो प्रसाद देतात. जेवताना उष्ट टाकायचं नसतं. जेवण झाल्यावर बाहेर कुठंही इतरत्र हात न धुता जेवणाच्या ताटातच धुवायचे असतात. ताटातलं खरकटं पाणी एकत्र साचवून त्यात उष्टंमाष्टं, खरकटं आणि दिव्यांतल्या वाती टाकून ते सर्व अंगणात खड्‍डा खोदून त्यात ते बुजतात. ( त्याला समुद्र असे म्हणतात)

दुसरे दिवशी चक्रावरचे तांदूळ, धान्य उचलताना पुरुष शेंडीने तर स्त्रिया वेणीच्या केसांनी आधी ते गोळा करतात. चक्राचा तांदुळ, उडीद व मूग यांची नंतर केव्हातरी खिचडी शिजवली जाते. गुलालाचा तांदुळ स्वच्छ धुतला जातो. गुलालाचे पाणी, राख, मिठ, दिव्यातल्या वाती यांचंही विसर्जन केलं जातं.
कुटुंबात सलोख्याचे संबंध राहावे म्हणून ही पूजा केली जाते. या निमित्ताने गावोगावी असलेले कुटुंबसदस्य एकत्र येतात. भेटीगाठी होतात. चक्रपुजेचं आमंत्रण आलं तर सहसा कोणी चुकवत नाहीत.
***

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान चक्रपूजा वर्णन. छायाचित्रे समर्पक. पारंपारिक रूढी, परंपरा जतन झाल्याच पाहिजेत. माहितीसाठी धन्यवाद.

या पुजेविषयी पहिल्यांदाच वाचलं. फारच छान माहिती! ते पूर्ण झालेलं चक्र किती सुंदर दिसतंय. सगळेच फोटो छान आले आहेत.

या पुजेविषयी पहिल्यांदाच वाचलं. फारच छान माहिती! ते पूर्ण झालेलं चक्र किती सुंदर दिसतंय. >>>> +१.

. पारंपारिक रूढी, परंपरा जतन झाल्याच पाहिजेत. माहितीसाठी धन्यवाद.>>>> क्लिष्टता वगळून जरुर कराव्या.

<<मी मागे खानदेशी मान्डे लेख लिहिला।होता तेव्हा तु फोटो टाकलेला हे आठवले.<<येस साधना! अगदी बरोबर! Happy
धन्यवाद साधना, मंजुताई, ममो, अमुपरी, देवकी, जिज्ञासा, किशोर

माझ्या माहेरी होते चक्रपुजा .बागलाण , खानदेशात प्रथा आहे . एक वर्ष आड होते .सुतक असल्यास त्या वर्षी नाही करत.

बापरे, चिकाटीचे काम आहे! _/\_
काही संदर्भ नीट कळले नाही. कुमारीका देवी असते तर कुमारिकेची ओटी भरावी का वेगळी देवीची मूर्ती बसवतात?? ओटी सहसा फक्त सवाष्णीची भरतात. काडवातीने एक पाय तोलणे कळले नाही.

खूपच छान माहिती आणि फोटो .. माझ्या आइकडचे कुलदेवता पण बिजासनी देवी च आहे . लहानपणी कधीतरी चक्रपुजा झाली होती पण त्या नंतर काही ना काही कारणाने झालीच नाही. तुमच्यामुळे आज त्याच्या आठवणी ताज्या झाल्यात आणि दर्शन हि लाभले. थँक यु Happy

चक्रपूजेविषयी पहिल्यांदाच वाचलं. छान सविस्तर लिहिलंय, आर्या !
फोटोंमुळे पूजाविधी छान समजला. शेवटचा दिवे प्रज्वलित केलेला फोटू खासच ... एकदम प्रसन्न वाटलं.

ंमी जी पूजा पाहिलेली त्यात आपण जसे दुसर्या ज्योतिने दिवा प्रज्वलीत करतो तसे केले नव्ह्ते तर भरपुर तुप लावलेली वात पेटवुन ती पेटती वात मधल्या दिव्यान्वर उन्च धरली. त्या वातीतले गरम तुप ओघळुन ज्योतिसकट खाली दिव्याच्या वातीवर पडले व खालचा दिवा पेटला. मधला मोठा दिवा बहुतेक असा पेटवतात. ह्यालाच आर्याने काडवात म्हटलेय बहुतेक.

चक्रपुजेत ठेवलेले पदार्थ फक्त घरातले खातात, पाहुण्याना वगैरे देत नाहीत. दिले तर सुबत्ता तिकडे पाहुण्याकडे जाइल म्हणे Happy

<<मी जी पूजा पाहिलेली त्यात आपण जसे दुसर्या ज्योतिने दिवा प्रज्वलीत करतो तसे केले नव्ह्ते तर भरपुर तुप लावलेली वात पेटवुन ती पेटती वात मधल्या दिव्यान्वर उन्च धरली. त्या वातीतले गरम तुप ओघळुन ज्योतिसकट खाली दिव्याच्या वातीवर पडले व खालचा दिवा पेटला. मधला मोठा दिवा बहुतेक असा पेटवतात. << एक्झेकटली साधना! हेच म्हणायचं होतं!
देवकपाशीची काडीला कापूस गुंडाळून, तुपात भिजवलेली वात म्हणून काडवात म्हणतात. पेटवल्यावर तुपाचा एकेक थेंब पडतो त्याच्यासोबत ज्योत पण. ती बरोबर मधल्या दिव्यावर धरून तिच्या पहिल्या थेंबातच वात पेटली पाहिजे, अन हे सगळं एका पायावर उभे राहून... अवघड टास्क आहे. Lol
Screenshot_20211015-081740_WhatsApp.jpg

पुजा मांडली पण किती सुरेख. बघतच रहावी अशी. दिवे लावल्यानंतर अजूनच सुरेख दिसतय. नंतर आवरायला जिवावर येत असेल ना? इतकी छान रांगोळी मोडायची म्हणजे.

सुंदर!

या पूजेबद्दल सासरी ऐकलं होतं पण माहिती नव्हती ती आज मिळाली!