बखरीतून निसटलेलं पान

Submitted by पाचपाटील on 3 October, 2021 - 04:16

(परमस्नेही खासे अवरंगाबादकरियांनी सदर बैठकीचे
वर्तमान ल्हिवून काढणेसंबंधी विनंती केली ऐसीजे..
याप्रमाणे जाहली हकिकत लिहिली असें.)

ये समयी मौजे पुणे मुक्कामाचे दिवस मोठे मौजेचे.
रात्रीचा उद्योग रात्री करावा आणि दिवसाही रात्रीचाच उद्योग करावा, ऐसा सुवर्णकाळ प्राप्त जाहला असे.
ऐशाच येका दिवशी सूर्यास्त इत्यादी जालियानंतर दोन घटिका मौज करणें हेतूने आम्ही 'बैसलों'.
परंतु येकमेकांचे आणि आलम दुनियेचे गुणदोष काढितां
काढितां मोठीच मौज येऊ लागल्याने दोन घटिकांच्या चार-आठ घटिका कैशा होत गेल्या कळावयास मार्ग नाही..!

ऐसा माहौल ऐन रंगात आलां असतां मद्यसाठा खलास
झालियाचे अकस्मात कळोन येताच मेहफिल फिकी होवोंन समस्तांमधी नाखुशी जाहली..!
कितीयेंक श्रमी जाहले.. कितीयेंक कष्टी जाहलें.. कितीयेंक माफक गालिप्रदान करों लागलें... कितीयेकांस शोक आवरेंना..मनुष्य मयत जालियावरी जैसा शोक करतात तैसा शोक करू लागले.. येकच कलकलाट होवो लागलां...!

ह्यावरी अवरंगाबादकरियांनी सर्वांस बळ बांधोन हिंमत
दिल्ही की "ये समयी मद्यसाठा काही आकाश फाडोन आपोआप पुढ्यांत येऊन पडणार नाही..! तुरंत जावोन कुमक करावी लागते...! जो जावोन ऐवज घेऊन येईल तयाचि मोठी कीर्त होईल."

ऐसे भाषण ऐकोंन कलकलाट पळभर शांत जाला.
ते समयी कोलापूरकर बोलिले की "तूवाच जावोंन घेवोंन
यावें.. ये प्रसंगी तूच आता आमची आबरू राखसील..पैका दुपट द्यावा लागला तरी चिंता करों नयें, परंतु ऐवज घेवोनच माघारी यावें. रिकाम्या हातीं माघारी येवोन नामोष्की घेवों नये, हे याद राखावे.. समागमें ह्या सोलापूरकरियांसही घेवोन जावे. हा आज बहुतच बोलतो..!"

ह्यावर अवरंगाबादकरियांस स्फुरण चढिले आणि शिरस्त्राण बख्तर आदी परिधान करोन आम्हांस समागमें घेवोन चढे
दुचाकियानिसी कूच केले...!
रात्रीचा वखतही फार जाहलेला. तें कारणें चार कोसांवरील समस्त मद्याच्या दुकांनांस टाळे लागलेंले.

अवरंगाबादकर बोलिले की "आधी चखनियाचा जुगाड करावा नाहीं तो सगळेच हातचे गेले ऐशी गत होईल..!"

ह्यावर आम्ही मसलत दिल्ही की " चखना कोठे पळोंन जातो की काय..! आधी मद्याचा बंदोबस्त करावा मग पुढे काय करणे ते एकविचारें करावे..!"

तत्समयी ऐसेच धुंडाळीत असतां येके जागीं आम्हांस
लांबूनच दिसले की येका दुकानाचें द्वार बंद होत आहे.
आम्हीं त्वरा करून त्यांस गाठिले आणि विनंती केलीं की,
''शेठजी, पळभर थांबावे. आम्हांस आनंददायी रसायनाचे दोन
बुधले हवे आहेंत.''

ह्यावर शेठजी यांनी मना केले. ते पाहोन आम्हास वीज मस्तकी पडावे ऐसे जाहले. मोठाच निर्वाणीचा प्रसंग आला आम्हावरी.
परंतु ऐशा प्रसंगीच आमच्या वाणींस स्फुरण चढतें.
आम्ही बोललो, " शेठजी,ऐसे निर्दय होवो नये. गि-हाईकांस संतोस करावा हा तो तुमचा धर्म. आम्ही वरकड पैकाही दुपट देणेंस राजी आहों आणि तरीही तुम्ही मना करता ही कवणे उफराटी रीत जाहली.?''

ऐसे बोललियावरी शेठजींनी जाबसाल केला की ''आम्हास आता धर्मसंकटात टाकों नये. कारण वखत संपला
असलेंमुळे कोतवालाचे मज भारी भय वाटते. तर तुम्ही उगा पिरपिर न करता येथून निघावे, हे उत्तम.''

तरीही आम्ही पदर पसरोंन आर्जव करित राहिलों की,
"रातीचा बहुत वखत जाहला. ये समयी आम्ही कोठें
पिशाचासारखें फिरावें? आणि येक बुधला दिल्याने तुम्हांस काय कटकट होतें? तुम्हांस गि-हायीकांची परवा नाही,
हे येकवेळ ठीक आहे, परंतु तुमीं थोडी माणुसकी दावावी हे उचित होईल. तुम्हांस समस्तांच्या दुवा लागतील..!"

परंतु हे ऐकोनही आम्हांकडे द्रिष्टीही न टाकिता थुलथुलीत
शेठजी ओठांच्या अर्वाच्च हालचाली करत रातीच्या अंधारात गायब जहाले.

तोंवर कोल्हापूरकर आम्हांस वारंवार संदेस धाडून
गालिप्रदान करत होते की "तुम्ही कोठें गायब जाहला ? आणि इथे आम्ही कोठवर दम धरावा?"
इत्यादी इत्यादी वाचोंन आमचे मन बहुत कष्टी जाहलें.

आम्ही अवरंगाबादकरियांस मनसूबा दिला की काम होत
नाहीं. आता माघारें निघावे, हे उत्तम.
परंतु अवरंगाबादकर बहुत क्रियावान मनुष्य आणि तयांचे मनही बहुत टणक.
ते बोलिले की, "आपेश आले तर सर्वांस तोंड कैसे दावावे? आधीच आमची आपकिर्ती जगात तुम्हीं बहुत करोन
ठेविलीं आहे..!"
हा वार आम्ही हसत हसत वरचिया वर झेलिला. आसो.

रात्रीचा एक प्रहर समय असलेंकारणें रस्तियांवरी कुठें
तुरळक इसम द्रिष्टीस पडताती. कुठे येखाद दुसरं वाहन आणि बहुतांशी मोकाट कुत्री इत्यादी दिसताती.
तैशा समयीं आम्ही ऐसे नामुष्क होवोंन फिरत असतां, आम्हास दिसोंन आले की येका अंधाऱ्या बोळातून येक
फाटका इसम बहुत आनंदी आणि तल्लीन अवस्थेत
झुकांड्या देत आमच्यारोखें येत आसें.
त्यांस पाहोनी अवरंगाबादकरियांचे मनी कुतूहल जागृत
झालियामुळे नजीक जावोन त्यांस पुसलें की, "श्रीमान आपण नुकतेच जे देशी किंवा तत्सम आंग्रेजी मद्य प्राशन केलेले आहे, तयाचं उगमस्थान आम्हां गरजूंस सांगू शकाल काय?''

यावर सदर इसम मायाळू होवोंन म्हणाला की ''जरूर.. जरूर.. गरजूंची काळजी घेणं, हे तर आमचं परमकर्तव्यच आहे.. ते कार्य साक्षात ईश्वरें आम्हावरीं सोपविलें आहे.
आमच्या पाठोपाठ यावें''

सदर इसम मद्याच्या प्रतापें पुरा कामातून गेला आहे ही गोस्ट आम्ही समजोन घेतली.

अवरंगाबादकर बोलिले की आता समय दवडण्यास फुरसत नाही. त्वरे निघावे.
ऐसी मसलत करोंन सदर झुकांड्या इसमामगे ठांव घेत घेत आम्ही एका दरवाजियापासी पोहोंचलों तो तिथें
आमच्यासारिख्या गरजूंची बरीच दाटी दिसोन आली.

परंतु सेवटी ईश्वरें आनुकूल दान दिल्हे आणि आम्हांस
मनासारिखा ऐवज प्राप्त जाहला...!
ते समयी आनंद अति थोर जाहला.
आम्ही मोहीम फते पावून तुरंत माघारी कूच केले.
मुकामी आमचे स्नेही चातक पक्षियाप्रमाणे तृष्णेंने व्याकुळ होत्साते इंतजार करित होते, ऐशी गत दिसोन आली.
समस्तांनी आम्हास बहु आसीरवाद दिल्हे.
ते समयीचा आनंद ल्हिवून कैसा वर्णावा हे आम्हांस कळत नाही. आसो.
बहुत काय लिहिणे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

भन्नाट!!

आजच्या काळातला अंताजीच Happy

समस्तांची पोच पावलीं असें.. केला प्रयास कारणीं लागला, समस्तांच्या पसंदीस उतरला, ही मोटी गोमटी गोस्ट जाली.
तेकारणें समस्तांसी कृतानेक नमस्कार..! Happy Happy

ग्रंथांचिये जाणकार श्रीमान टवणियांनी ये स्थळीं खासें येवोंन कवतुकाचे बोल काढिल्यानें पंचपाटलांस खुसी जाली..!
ये समयी राजमान्य राजेश्री अंताजीराव खरेंसारिख्या कीर्तवान बहारदार मनुष्याची याद यावीं याउपरें आमचा दुसरा बहुमान तो कैसा होवो शकेल..!! Happy Wink

ग्रन्थ विस्तारे समस्त वाचकांसी बहुत खुशी प्राप्त होईल हे राजमान्य राजेश्री पाचपाटलांनी ध्यानात घ्यावे.

खल्लासच जमलय !

Pages