परीक्षित

Submitted by निखिल मोडक on 24 September, 2021 - 22:33

शहराच्या सांदी कोपऱ्यातून
प्रकाश आता हळू हळू निरोप घेतो आहे
त्यालाही जाववत नाही
निरोप घेताना लाल झालेले डोळे लपत नाहीत

अंधार आता सगळे व्यापून टाकताना
ह्या प्रकाशाने मागे ठेवलेल्या चांदणखुणा
स्पष्ट होत जातील

ह्या अंधाराचे भूत मानगुटीवर बसण्याची
माणसालाही विलक्षण भीती
म्हणून अनेक प्रकाशप्रेतांची भुते
त्याने अनेक बाटल्यात बंदिस्त करून ठेवली आहेत

माणसांच्या समाधानासाठी तीही जीन होतील
त्याची प्रकाशाची इच्छा पूर्ण करतील

पण हा अंधार असाच व्यापत राहील
प्रकाशाने रिक्त केलेले सांदीकोपरे

डोळे मिटत जातील तसे
अंधाराच्या विजयाची खात्री बळकट होत जाईल

हजार वेळा उगाळलेल्या चंदनासारखा
दिवसभराचा कोलाहल घोटून तयार झालेला शांतीचा दरवळ
अंधाराचा विजय अधिक दृढ करील
प्रकाशाच्या चांदणखुणाही हळू हळू पुसट होत जातील
पण घाबरू नका, अंधार सारे सारे व्यापू शकतो
पण काल प्रकाशाने उजवलेली आशेची कूस
तो कोमेजून टाकू शकत नाही
कारण परीक्षितासारखा तिलाही उ:शाप आहे
उद्याच्या निळ्या पहाटेचा
©निखिल मोडक

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हजार वेळा उगाळलेल्या चंदनासारखा
दिवसभराचा कोलाहल घोटून तयार झालेला शांतीचा दरवळ
अंधाराचा विजय अधिक दृढ करील ----- व्वा! खूप सुंदर!