माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - अमितव

Submitted by अमितव on 22 September, 2021 - 16:50

बकेट लिस्ट म्हटलं की काही तरी भव्य दिव्य, सहजी अप्राप्य किंवा खरंच साध्य केल्यावर फार समाधान वगैरे वाटेल अशा लिस्ट माझ्या डोळ्यासमोर येतात. मी आजवरचं आयुष्य 'वन थिंग अ‍ॅट अ टाईम'... किंवा 'लिव्हिंग बाय द डे', थोडक्यात अंथरुण पाहुन पाय पसरावे अशा म.म. पणे जगल्याने असेल, किंवा अजुन बकेट लिस्ट करुन एकेक टिक ऑफ करत जाऊया म्हणायचं 'संध्याछाया भिवविती हृदया' वय झालं नसेल म्हणून असेल अशी लिस्ट वगैरे काही बनवली नाहीये, आणि तसं काही करेन असं सध्या वाटत ही नाही. एखादा विचार मनात आला तर तो कल्पनेबाहेरचा असला तर फार वेळ मनात रहातच नाही, आणि शक्य असेल तर पूर्णच करतो.
बरं मग आता इथे काय लिहू? तर काय करावसं पूर्वी वाटलेलं ? काय जमलं? आणि पुढे अजुन काय करायला आवडेल याची जंत्री मांडतो. हे खरंतर फार पर्सनल होऊ शकेल. तसं होतंय वाटलं तर मग थांबेन. किंवा तुम्ही फार मनावर घेऊ नका.

  • इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट करायचा असतो. तुम्हाला एक गाईड असतो आणि त्याच्या बरोबर विषय ठरवुन गाईडच्या मार्गदर्शनाखाली त्या विषयात आत्ता पर्यंत कायकाय केलंलं आहे याचा लिटरेचर सर्वे करुन मग आपली फुल ना फुलाची पाकळी वर चढवायची असते. आमच्या ग्रूपचा गाईड तेव्हा आय.आय.टी. बाँबे मध्ये पीएचडी करत होता. तो आमच्या कॉलेजात दोन दिवस येई आणि उरलेले दिवस पवईला असे. त्याला भेटायला म्हणून काही वेळा इलेक्टिकल इंजि. बिल्डिंग मध्ये त्याच्या प्रयोगशाळेत जावं लागे. २००१ चा काळ असेल. त्यावेळी कम्प्युटर हाताळला होता, घरी डायलअप होतं, वयोपरत्त्वे अल्टाविस्टा, एओएल, गूगल ते पॉर्न क्लिप्स असा प्रवास चालू होता. हॉटमेल, याहू आणि व्हीएसएनएल.को.इन असे इमेल होते, जीमेल लाँच व्हायचं होतं. थोडक्यात अगदीच जुन्या काळची गोष्ट आहे. तिकडे लॅब मध्ये मास्तराला भेटायला गेलो असता बघितलं तर मुलं संगणकावर चॅटिंग करत होती, स्नॅक खात होती, काही गेम्स खेळत होती.. आणि आयआयटी मधली आहेत म्हणजे कामही करत असवीतच. ते दृष्य मला फारच आवडलं. आपण पण इकडे आलं पाहिजे असं त्याक्षणी वाटलेलं. नंतरही जेव्हा जेव्हा आयआयटी -बॉंबेत जायची वेळ यायची तेव्हा ही भली मोठी दोन मजली पूर्ण वातानुकुलीत लायब्ररी, त्यातील संगणकावरुन शोध करुन पुस्तक सापडायला सोपी सिस्टिम, जर्नल पेपरही सर्च करुन शोधायचे... हे सगळं विश्वच नवीन होतं. (आमच्या मास्तरनी त्यांचं लायब्ररी कार्ड आम्हाला दिलेलं, त्यामुळे तिकडून पुस्तके घ्यायची मुभा होती) कँपस वर फिरताना सायकलींवरुन मुलं जायची, डिपार्टमेटच्या बाहेर ही मोठी सायकलींची रांग. मास्तरही सायकलींवरुन यायचे. आजूबाजूला गर्द झाडी, पवई लेक. आणि परत लॅब मध्ये तुम्हाला हवं ते करू शकणारी मुलंमुली. ह्या सगळ्याच्या काहीसा प्रेमात पडलेलो. इथे आलं पाहिजे असं मनोमन वाटलेलं पण ते आपल्याला शक्य आहे का? हे ही मनात होतंच.
    इंजिनिअरिंग पूर्ण झालं, कँपस मध्ये मिळालेली नोकरी ९/११ नंतरचे स्लोडाऊन वगैरेत काही फळली नाही. त्याही आधी पासून 'गेट' (प्रवेश परिक्षा) चा फॉर्म भरलेला, पण नंतर थोडाफार अभ्यासही चालू केला. एका इलेक्टॉनिक्स/ एंबडेड कंपनीत इंटर्न म्हणून काही महिने जॉब मिळाला ती कंपनी ही योगायोगाने हिरानंदानी पवईतच होती. त्यामुळे आयआयटी वरुन बसने कांजुर किंवा अगदी ४९६ मिळालीच तर तीन हात नाक्याला जाणं होत राहिलं. गेट दिली, पर्सेंटाईल बरं आलेलं. दिल्ली, मद्रास, कानपूर आणि बॉम्बे अशा चार ठिकाणाहुन कुठल्या कुठल्या विभागांसाठी मुलाखतीचे कॉल आले. सगळीकडे जाऊन आलो, कानपूर, मद्रासचे कँपस ही छानच होते, पण मुंबईशी तुलना होत होती. कानपूर, मद्रास मध्ये सिलेक्शन झालं नाही. आता मुंबईत काय होतंय बघू म्हणून इंटरव्हू देऊन आलो. ज्या दिवशी लिस्ट लागणार त्या दिवशी पूर्ण वेळ जॉब झाल्यावर संध्याकाळी मार्केट गेटला उतरुन लिस्ट बघायला गेलो तर नाव होतं की! त्यावेळी झालेला आनंद आजही विसरू शकत नाही. हे बकेट लिस्ट केलेली म्हणून नाही, पण एक मनात होतं ते घडलं याचं फार छान वाटलेलं. त्या दोन वर्षांत एकटं तरी घरापासून अगदी जेवायला काही चमचमीत केलं आहे असा फोन आला की जाऊन रात्री लॅबला परत येता येईल इतकं जवळ बसच्या अंतरावरचं लाईफ म्हणजी फारच लक्झरी लाईफ होतं. तिकडे मात्र मनात येईल त्या सगळ्या गोष्टी भरपूर केल्या. तिकडेच मायबोलीची पहिली ओळख झाली पण आजुबाजूला इतकं सारं होतं की आभासी मायबोलीवर काही तेव्हा फार रमलो नाही.
  • त्याच्या ही आधी दहावी/ बारावी नंतर पुढे काय करायचं याची अक्कल ना मला होती, ना आई बाबांनी कधी हे कर ते कर असा धोशा लावलेला. तुला हवं ते कर यापेक्षा जास्त काही त्यांनी सांगितलेलं आठवत नाही. पण माझा आत्तेभाऊ माझ्यापेक्षा ७ वर्षांनी मोठा आणि एकदम आदर्श असा होता. त्याकाळी व्हिजेटीआय आणि एस.पी. (अंधेरी) अशी दोनच सरकारी कॉलेजेस होती आणि तो एसपी मधुन इंजि होऊन सिमेन्स मध्ये भरपूर पगाराच्या (हे कोणी सांगितलं न्हवतं, पण असंच एक डोक्यात बसलेलं) नोकरीवर काम करायचा. तर आपण पण इंजिनिअर झालं पाहिजे हे उगाचच मनाने घेतलेलं. म्हणजे इंजिनिअर म्हणजे काय करतात, त्यातील वेगवेगळ्या शाखांचं काय काम असतं याची मला जवळपास शून्य माहिती होती आणि तरीही मार्क ठीक आहेत आणि प्रवेश मिळतोय म्हणून मी इलेक्टॉनिक्स अ‍ॅंड टेलिकॉमला प्रवेश घेतलेला. सगळं शिक्षण मराठी माध्यमातून त्यामुळे बारावीला इलेक्टॉनिक्स असा काही ऑप्शनल विषय असतो याची गंधवार्ताही न्हवती पण तरी कंप्युटर किंवा टेलिकॉम करायचं हे त्या काळी का वाटायचं कोण जाणे. तर ही कदाचित बकेट लिस्टच्या/ सूप्त इच्छेच्या बादलीतील पहिली इच्छा असेल.
  • शिक्षण झाल्यावर मला एकटं राहुनच नोकरी करायची होती. घरच्या लोकांना वाटायचं की मला घरची किंमत कळेल बाहेर राहिलं की. आणि मला वाटायचं की घरच्यांना माझी किंमत कळेल. आता विचारलं पाहिजे कळली का किंमत! अंडरग्रॅड झाल्यापासून कायम बाहेरच राहिलो.
  • माझ्या लहानपणापासूनच आजी-आजोबा पुण्याला रहात असत. आजोबा रिटायरमेंट घेऊन चेंबुरहुन पुण्यात डेक्कन मध्ये रहात आणि त्यांच्या रेकॉर्डिंग इ. छंदांत त्यांनी स्वतःला व्यग्र करुन घेतलं होतं. दरवर्षी दिवाळी आणि मे महिन्यात आम्ही पुण्याला जात असू. थोडं मोठं झाल्यावरही पुण्यात डेक्कनला फिरताना काही तरी एकदम भारी वाटायचं. जरा बुजल्यासारखं ही होत असावं. पण त्याकाळी पुण्यात रहावं असं मात्र नक्की वाटायचं. शिक्षणानंतर नोकरी खरंतर कुठेही चालली असती. मला तर बंगलोरच हवी होती. ते आजही अजुन शक्य झालेलं नाही. ते ही बादलीतील इच्छांत आहेच खरंतर. तर ती पुण्याला मिळाली. घरापासून दूर, पण परत पुण्यालाच. मनात आलं की इंद्रायणीत बसायचं रात्री जेवायला ठाण्याला. पाच वर्षे पुण्यात मात्र मजा केली.
  • पहिल्या नोकरीत कामानिमित्त परदेशात जावं लागलं, आणि ते ही बे-एरियात. परत आयआयटी प्रकार झाला. व्हॅली, तिकडच्या सगळ्या माहित असलेल्या कंपन्या अगदी येता जाता 'जय कानिफनाथ रसवंतीगृह' वाटेत लागाव्या अशा दिसायच्या. तिकडे ड्रायव्हिंग ट्युटर बरोबर एक-दोनदा फिरुन कार रेंट केली. आणि मग प्र-चं-ड फिरलो, आणि बे एरियाच्या प्रेमात पडलो. परत व्हॅलीत सहा आकडी पगार मिळतो (हल्ली चपराशी त्या पगारात व्हॅलीत जगू शकत नाही म्हणतात. तर ते एक सोडा) तो तर ठीकच आहे, पण युनिकॉर्न मध्ये काम करायचं आणि ती आयपीओ/ अक्वायर झाली पाहिजे, म्हणजे मग डायरेक्ट रिटायरमेंट असले अचाट विचार डोक्यात त्या काळी पार भिनले होते. तेव्हा पासून बे एरियात रहायचं हे मनात होतं. नंतर पुणे, कॅनडात माँट्रिआल, टोरांटो, आटोवात नोकरी करत असलो तरी बे एरिआ काही मनातुन पुसला न्हवता. काही काळाने एक संधी आली. तोवर एकटा जीव नसल्याने फॅमिली सकट चंबूगबाळं आवरुन गेलो. गेलो ती कंपनी स्टार्ट अप होती. ती युनिकॉर्न झाली, तिचा आयपीओ झाला. सगळं झालं. रिटायरमेंट फक्त हुकली. Wink Proud

आता काय करायचं आहे...

  • कॅनडात रहातो तर जुजबी तरी फ्रेंच बोलायला शिकायचं आहे. सध्या अ‍ॅप मधुन शिकतो, पण त्यात काही ध्येय नसल्याने तितकं नीट होत नाही. पँडेमिक नंतर कॉलेजं उघडली की कम्युनिटी कॉलेजात संध्याकाळी/ वीकेंडचा इन पर्सन फ्रेंच कोर्सला रजिस्टर करणार आहे. माँट्रिआल/ किंवा क्युबेक सिटीत रेस्टॉरंट मध्ये फ्रेंच मध्ये ऑर्डर करता आली पाहिजे, आणि एक दोन जोक करता आले पाहिजेत इतकीच सध्या इच्छा आहे. पॅरिसबिरिसला जाऊन रँडम माणसांबरोबर रुम शेअर करुन त्यांना सकाळी दात घासताना न्याहाळणे प्रकार करायचे नाहीत. याची कृ.नों.घ्या! Wink
  • आईस स्केटिंगचे शूज आणले आहेत, पण अजुन स्केटिंग जमत नाही. ते ही ट्युटर लावुन यावर्षी शिकणार आहे.
  • गेल्या विंटर मध्ये कितीही स्नो पडला/ किंवा कितीही तापमान खाली गेलं तरी रोज अर्धा-पाऊण तास चालायचंच ठरवलेलं आणि अगदी मायनस २५ -३० सेल्शिअस पर्यंत व्यवस्थित काळजी घेतली की बाहेर जाता येतं याचा कॉन्फिडन्स आला आहे. त्याहुन खाली वारा असला तर जरा त्रास होतो, पण असे दिवस तुरळक असतात. तर यावर्षी क्रॉसकंट्री स्की करायचं नक्की केलं आहे. बघुया.
  • न्यूयॉर्क सिटी मध्ये महिनाभर अपार्टमेंट/ एअर बिएनबी ट्रान्झिट जवळ भाड्याने घेऊन रहायचं आहे. तसंच लंडनला पण करायचं आहे.
  • रिटायरमेंट अजुन शक्य झाली नसली तरी ती लौकिकार्थाने लवकर घ्यायची आहे. ती घेतली तरी काम करेनच, पण पूर्ण वेळ न करता जगण्यापुरते पैसे कमावायला अध्येमध्ये असं करायचं आहे. यात अर्थात जगण्याच्या गरजा कमी न करता हे करायचं आहे.
  • कनेडिअन स्नोबर्डस सारखं जगायचं आहे. फक्त फ्लोरिडाला न जाता जानेवारी ते एप्रिल मुंबईत रहायचं. आता ख्रिसमसची पण सवय झाल्याने तो ही सोडवत नाही. Happy
  • २००७ ला पहिला आयफोन आला तेव्हा पासून मला आयफोन घ्यायचा आहे. तो नंतर वापरला पण स्वत:साठी कधी घेतला नाही. पुढेही घेईन असं वाटत नाही.
  • फँग मध्ये काम करायचं हे ही खूप पूर्वी होतं लिस्टीत. आता मात्र विरुन गेलेलं स्वप्न आहे ते. सगळ्यांबद्द्ल इतक्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकल्या आहेत की ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आली आली चाळीशी आली. Happy
  • जमेल तशी जगभ्रमंती करायची आहे. अगदी दिसली एक्सायटिंग जागा की जावं वाटलं असा फार स्वभाव नाही. अगेन म.म. अं.पा. पा.प इ. इ. इ.. पण निसर्गापेक्षा मोठ्या शहरात फिरायचं आहे. निसर्ग तोंडीलावायला बघूच. पण सगळ्या मोठ्या शहरात ट्रांझिट मधुन हवं तसं हवं तिथे फिरत काही बाही खात काही दिवस रहायचं आहे.
  • कार्पेंट्री आणि पॉटरी या दोन गोष्टी शिकायच्या आहेत. घरात टिंबर आणून काही बाही करत असतो, पण कार्पेंट्री शिकावी वाटते. तसंच लेथ घेऊन त्यावर लाकडाच्या वस्तू करण्याचे व्हिडिओ बघुन ते ही करावंसं वाटतं. तेच पॉटरीचं. बघू कधी जमतंय.
  • भारतात असताना हार्मोनिअम ठीक ठाक वाजवेपर्यंत शिकलेलो. इथे पिआनो शिकायचाय. हे ही युट्युब वर बघुन कधी कधी करतो, पण नीट शिकायचा राहिलाय.
  • बस ड्रायव्हर म्हणून किंवा सबवे ट्रेन, टोरांटो स्ट्रीट कार ड्रायव्हर म्हणून काम करायचं आहे. यातलं काहीच नाही जमलं तर गेला बाजार उबर ड्रायव्हर किंवा स्किप द डिशेश ड्रायव्हर.
  • कंपनीने फायर करावं. एंप्लॉयमेंट इन्श्युरन्सला अप्लाय करावं, आणि काम धाम न शोधता शांतपणे पुस्तकं वाचत दिवस काढावे. संध्याकाळी कुणा मित्राबरोबर फुकटच्या गप्पा माराव्या. रात्री झोपल्यावर पहाटे कामाच्या कुठल्याही विचाराने जाग न यावी. Wink हे सहज शक्य आहे खरं तर. लिस्टीची गरज नाही. Proud

फार तयारी न करता लिहितोय, त्यामुळे आणखी डोक्यात येईल तसं वाढवेन.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

आवडल., छान लिहले आहे.

शहरात ट्रांझिट मधुन हवं तसं हवं तिथे फिरत.... हा प्रकार मात्र केला आहे. बजेट ट्रीप मध्ये लंडन, टोकोयो, पॅरिस, बॅकोक, कलकत्ता , दिल्ली, मेलबर्न , सिडनी, सेउल, सिंगापुर, ताईपै, शांघाई, हॉगकॉग, झुरिच सारख्या कितीतरी शहरात ट्रांझिट मध्ये हवे तसे फिरलो आहे. स्टेशन वरचे स्ट्रीट फुड खल्ले आहे. खुप enjoy केले. मुंबई लिहले नाही कारण तिकडे ट्रांझिट मधुन फिरण्यात बाल पण गेले. आजुन बर्याच शहरात फिरायचे आहे. दोन वर्ष झाले हा उपक्रम बंद आहे. आजुन एक वर्ष तरी चालु होईल असे वाटत नाही.

कंपनीने फायर करावं....... हे तर माझ्या पण बकेट लिस्ट मध्ये आहे. सहज शक्य आहे पण जमत नाही. मॅनेजरला पण सांगुन ठेवले आहे की माझा पहिला नंबर लाव. फायर केले तर ह्या वयात दुसर्या कंपनीत जायचे धाडस होणार नाही, रिटायरच होईन. ईतक्यात हे शक्य वाटत नाही.

छान लिहिले आहे.
पॅरिसबिरिसला जाऊन रँडम माणसांबरोबर रुम शेअर करुन त्यांना सकाळी दात घासताना न्याहाळणे प्रकार करायचे नाहीत. >> Lol

वा! मस्त. भारी आहे की लिस्ट Happy
पॅरिसबिरिसला जाऊन रँडम माणसांबरोबर रुम शेअर करुन त्यांना सकाळी दात घासताना न्याहाळणे प्रकार करायचे नाहीत. >> Lol

काय सुरेख लिहिलंय, अमितव !
आयआयटीच्या कॅम्पसचे वर्णन आणि रेस्टॉरंट मध्ये फ्रेंचमध्ये ऑर्डर हे विशेष आवडले.
>>>सगळ्या मोठ्या शहरात ट्रांझिट मधुन हवं तसं हवं तिथे फिरत काही बाही खात काही दिवस रहायचं आहे.>>> हे करायला मलाही आवडतं, खास करून न्यूयॉर्क सिटीत.
लेख अजून अपडेट करत राहणार आहेस तर खाली प्रतिक्रियेत पण त्याची नोंद कर, म्हणजे नवीन पानावर दिसेल आणि काही मिस होणार नाही. अजून वाचायला आवडेल. Happy

>>>>> तर यावर्षी क्रॉसकंट्री स्की करायचं नक्की केलं आहे. बघुया.
मस्त मस्त!!! आवडली ही बुलेट.

एकंदर लिस्ट रोचक आहे.

मस्त लिहीले आहेस! मोठ्या शहरांत फिरण्याबाबत एकदम सहमत.

पॅरिसबिरिसला जाऊन रँडम माणसांबरोबर रुम शेअर करुन त्यांना सकाळी दात घासताना न्याहाळणे प्रकार करायचे नाहीत >>> Lol

घरच्या लोकांना वाटायचं की मला घरची किंमत कळेल बाहेर राहिलं की. आणि मला वाटायचं की घरच्यांना माझी किंमत कळेल.>>हे रिलेटेबल आहे. Happy
आवडलं.

अतिशय आवडलं!

लहानपणी एकदाच कधीतरी आयआयटीचा परिसर बाहेरून पाहिला होता,तेव्हा भारी वाटलेले.

इंटरेस्टिंग होत सगळंच, जे केलय ते पण आणि जे करायचं ठरवलय ते पण .
एखादा विचार मनात आला तर तो कल्पनेबाहेरचा असला तर फार वेळ मनात रहातच नाही, आणि शक्य असेल तर पूर्णच करतो >> हे मला आवडलंय Happy

(((घरच्या लोकांना वाटायचं की मला घरची किंमत कळेल बाहेर राहिलं की. आणि मला वाटायचं की घरच्यांना माझी किंमत कळेल.))) Proud

छान लिहिलंय !

छान लिहिलंय अगदी ओघवतं.

मी ही पहिली आयआयटी पाहिली ती पवईची. तिथे शिकण्याची इच्छा मात्र राहून गेली. तयारी निट झाली नाही, गेट पुढच्या वर्षी देऊ म्हणुन जी राहिली ती राहिलीच. नोकरीत कामानिमित्ताने मग सगळ्या आयआयटीज च्या वाऱ्या झाल्या तेव्हा का नीट तयारी करुन गेट दिली नाही असे वाटायचे सुरुवातीला पण नंतर काही वाटेनासे झाले.

छान लिहिलंय.
फ्रेंच भाषा आणि स्किइंग - हे दोन आवडलं. जिथे राहतो तिथल्या स्थानिक म्हणता येतील अशा काही ना काही गोष्टी शिकायच्या, हे फार छान आहे.

>>>कनेडिअन स्नोबर्डस सारखं जगायचं आहे. फक्त फ्लोरिडाला न जाता जानेवारी ते एप्रिल मुंबईत रहायचं. आता ख्रिसमसची पण सवय झाल्याने तो ही सोडवत नाही. Happy

येस्स्स मलाही आवडेल असे. उन्हाळी सहा महीने अमेरीकेत उर्वरीत मुंबई-पुण्यात. आणि अगदी अस्सेच की इथला ख्रिसमस सोडवत नाही. संपूर्ण बुलेटला मम.

मस्तच लिहिलं आहेस अमितव. iit B , pg म्हणजे फारच भारी...

पन्नास एक वर्षांपूर्वी माझा भाऊ होता iit B मध्ये तेव्हा त्याच्या हॉस्टेल वर गेलो होतो त्याला भेटायला. शांतिनिकेतन सारखं वाटलं होतं मला तेव्हा तिथे. आजूबाजूला झाडी आणि छोट्या छोट्या इमारती प्रत्येक dept faculty च्या. परिसर म्हणजे जंगलच होतं सगळं . हिरानंदानी ही नव्हतं , मला वाटतय तेव्हा कंजूर स्टेशन ही नव्हतं विक्रोळी च होत.

>>>>>iit B , pg म्हणजे फारच भारी...
अनेक वेळा अनुमोदन!!

बाकी 'फायर होण्याचे' डोहाळे काही पटले नाहीत Happy
बीन देअर डन दॅट!!! नॅह नॉट अ गुड आयडीया Happy

साहिल शहा, सोनाली, पराग, मै, राधिका, सामो, फा, मंजुताई, कविन, प्राची, मामी, देवकी, श्रद्धा, स्वासु, मानव, हर्पेन, ललिता, ममो, धनुडी... सगळ्यांना धन्यवाद. Happy
ललिता-प्रीति, जिथे रहातो तिथल्या गोष्टी हे तर आहेच. पण सहा महिने स्नो पडणार असेल तर सहा महिने क्रिब मारायचा फार कंटाळा येतो. Wink पोरांना समर पेक्षा विंटर आवडतो, मलाही आवडतोच पण नावं ठेवत आवडतो. स्नो आणि प्रचंड थंडीतही मजा करत होतोच पण ती काठावरुन पाय बुडवत, कधी मधी टोबॉगनिंग, स्नोमॅन इ. करुन. स्की करताना बघायला इतकं भारी वाटतं! त्यात घरातल्या लोकांनी नुसते गिअर आणुन ठेवलेस की ते ठेवायला बेसमेंट मध्ये जागा केली आहे इ. टोमणे मारणं चालू केलं आहे, सो मोटिव्हेशन चिक्कार! Proud खर्च तर करणारच.
तेच फ्रेंचचं. पोरांच्या शाळेत फ्रेंच असल्याने मला झक मारत शिकणं भाग आहे. बकेटलिस्ट आपलं शुगरकोट करुन सांगायला! अर्थात थोडं जमलं की मात्र 'गो लोकल!' हेच सांगयचं ठरवलं आहे तुझ्या कमेंटवरुन. Wink Proud
हर्पेन, FAANG म्हणजे फेसबुक, अ‍ॅमेझॉन, अ‍ॅपल, नेटफ्लिक्स, गूगल (अल्फाबेट). मॅड मनीवाला जिम क्रेमरने बेंबेच्या देठापासून बोंबलुन इथे हा शॉर्ट फॉर्म फार फेमस केलेला.

खूप आवडलं. बऱ्याच ठिकाणी स्वतःशीच बोलत वाचलं.
कॅनडात दोन दोन वर्षांची पोरं सुर् सुर् समोरून स्केट करताना जायची तेव्हा मीही हे ठरवलं होतं एक दोन प्रयत्न झाल्यावर घरी येऊन कढीभात खायची दरिद्री इच्छा झाली होती. Proud
माझीही फ्रेंच शिकण्याची इच्छा Spanish शिकण्यात रूपांतरित झाली आहे.
फँगचा PJ>>> मी वँम्पायरचा डेंटिस्ट आहे असे कामाबाबत सांगणे.
आय आय टी मुळे आता चारपाच दिवस आदर वाटणारे !!! Wink
खूप कूल आहेस. शुभेच्छा. Happy

अर्थात थोडं जमलं की मात्र 'गो लोकल!' हेच सांगायचं ठरवलं आहे तुझ्या कमेंटवरुन. >>> ज्जेब्बात! Biggrin

घरी येऊन कढीभात खायची दरिद्री इच्छा झाली होती. >>> Lol शेवटी आपली मुळं, ती आपली मुळं वगैरे म्हणायचं Wink

मस्तच आहे हे. त्या केबेकच नाव काढलंत एकदम 20 एक वर्षं मागे गेलो. अलियांस फ्रॉनसेझ द पूना च्या पहिल्या कोर्स मटेरियल मध्ये ह्या केबेक शहरावर एक लेख होता आणि भारी चित्रे होती एक फोटो टाकतो खाली त्यातला. एक डॉक्युमेंटरी पण पाहिल्याचे आठवत आहे. केबेक ने एकदम गारुड केलं होतं मनावर आणि कधीतरी ते शहर नक्की बघायचेच आहे Happy तेंव्हा क्यानडाला जाण्यासाठी फ्रेंच भाषा सर्टिफिकेट लागायचं का? कारण 20 टक्के पंजाबी आणि सिंधी पब्लिक फक्त ह्या सर्टिफिकेट साठी कोर्स करायचं. IMG_20210923_230855529~2.jpg

छान लिस्ट आहे.. कंपनीने फायर करावे हे भारी आहे.. असेच एक महिन्याभरासाठी हॉस्पिटलमध्ये अ‍ॅडमिट व्हावे आणि आराम करावा टाईप्स मलाही बरेचदा वाटते..
असो, माझं राहतेय यंदा हे लिहायचे बहुधा. पण तरीही हे वाचल्यावर वेळ काढून अशी छान सुटसुटीत छोटीशी लिस्ट काढावी असा मोह होऊ लागलाय

धन्यवाद झेलम, अस्मिता, लंपन आणि ऋन्मेऽऽष.
अस्मिता चार-पाच दिवस असेल तर मग ठीक आहे. त्याहुन जास्त नको Proud
क्युबेक सुंदर आहे, माँट्रिआलही फार छान आहे. आम्ही मॉट्रेआल तर खूप वेळा जात असतो. पण दोन - पाच दिवस फिरायला ठीक आहे. त्या ($#@#$) फ्रँकोफोन्स मध्ये जाऊन रहायची मला अजिबात इच्छा नाही. फ्रेंच भाषेचं सर्टिफिकेट तुम्ही क्युबेक मध्ये लँड होणार असाल तर लागते. कारण त्यांना वेगळा 'नेशन' करायचा आहे. मूर्ख आणि यडचाप पब्लिक आहे तिकडचं. जाऊद्या. दुसरीकडे जाऊन शिव्या घालू. Wink बाकी कॅनडात यायला फ्रेंच कुठल्यातरी लेव्हलच्या वर येत असेल तर पाँईंट बेस सिस्टिम मधले थोडे गुण वाढतात (आणि वाण लागतं). Wink
रुन्म्या, आराम करावा वाटतं, पण हॉस्पिटल मध्ये नाही रे वाटत. सध्या फक्त फायर होऊन बघू इतकंच आहे. बाकी फायर होण्याचे भिकेचे डोहाळे असतील कदाचित. पण ते ही एकदा करुन पाहू. समजेलच! Wink

अमितव,‌‌मस्त लिहिले आहे. तुझ्या लिस्टने मला प्रेरणा दिली लिहायची. पण तेवढं ते फायर मत कहो ना! ले ऑफ कहो.

Pages