माझ्या बकेट लिस्टचा प्रवास - अमितव

Submitted by अमितव on 22 September, 2021 - 16:50

बकेट लिस्ट म्हटलं की काही तरी भव्य दिव्य, सहजी अप्राप्य किंवा खरंच साध्य केल्यावर फार समाधान वगैरे वाटेल अशा लिस्ट माझ्या डोळ्यासमोर येतात. मी आजवरचं आयुष्य 'वन थिंग अ‍ॅट अ टाईम'... किंवा 'लिव्हिंग बाय द डे', थोडक्यात अंथरुण पाहुन पाय पसरावे अशा म.म. पणे जगल्याने असेल, किंवा अजुन बकेट लिस्ट करुन एकेक टिक ऑफ करत जाऊया म्हणायचं 'संध्याछाया भिवविती हृदया' वय झालं नसेल म्हणून असेल अशी लिस्ट वगैरे काही बनवली नाहीये, आणि तसं काही करेन असं सध्या वाटत ही नाही. एखादा विचार मनात आला तर तो कल्पनेबाहेरचा असला तर फार वेळ मनात रहातच नाही, आणि शक्य असेल तर पूर्णच करतो.
बरं मग आता इथे काय लिहू? तर काय करावसं पूर्वी वाटलेलं ? काय जमलं? आणि पुढे अजुन काय करायला आवडेल याची जंत्री मांडतो. हे खरंतर फार पर्सनल होऊ शकेल. तसं होतंय वाटलं तर मग थांबेन. किंवा तुम्ही फार मनावर घेऊ नका.

 • इंजिनिअरिंगला असताना शेवटच्या वर्षी प्रोजेक्ट करायचा असतो. तुम्हाला एक गाईड असतो आणि त्याच्या बरोबर विषय ठरवुन गाईडच्या मार्गदर्शनाखाली त्या विषयात आत्ता पर्यंत कायकाय केलंलं आहे याचा लिटरेचर सर्वे करुन मग आपली फुल ना फुलाची पाकळी वर चढवायची असते. आमच्या ग्रूपचा गाईड तेव्हा आय.आय.टी. बाँबे मध्ये पीएचडी करत होता. तो आमच्या कॉलेजात दोन दिवस येई आणि उरलेले दिवस पवईला असे. त्याला भेटायला म्हणून काही वेळा इलेक्टिकल इंजि. बिल्डिंग मध्ये त्याच्या प्रयोगशाळेत जावं लागे. २००१ चा काळ असेल. त्यावेळी कम्प्युटर हाताळला होता, घरी डायलअप होतं, वयोपरत्त्वे अल्टाविस्टा, एओएल, गूगल ते पॉर्न क्लिप्स असा प्रवास चालू होता. हॉटमेल, याहू आणि व्हीएसएनएल.को.इन असे इमेल होते, जीमेल लाँच व्हायचं होतं. थोडक्यात अगदीच जुन्या काळची गोष्ट आहे. तिकडे लॅब मध्ये मास्तराला भेटायला गेलो असता बघितलं तर मुलं संगणकावर चॅटिंग करत होती, स्नॅक खात होती, काही गेम्स खेळत होती.. आणि आयआयटी मधली आहेत म्हणजे कामही करत असवीतच. ते दृष्य मला फारच आवडलं. आपण पण इकडे आलं पाहिजे असं त्याक्षणी वाटलेलं. नंतरही जेव्हा जेव्हा आयआयटी -बॉंबेत जायची वेळ यायची तेव्हा ही भली मोठी दोन मजली पूर्ण वातानुकुलीत लायब्ररी, त्यातील संगणकावरुन शोध करुन पुस्तक सापडायला सोपी सिस्टिम, जर्नल पेपरही सर्च करुन शोधायचे... हे सगळं विश्वच नवीन होतं. (आमच्या मास्तरनी त्यांचं लायब्ररी कार्ड आम्हाला दिलेलं, त्यामुळे तिकडून पुस्तके घ्यायची मुभा होती) कँपस वर फिरताना सायकलींवरुन मुलं जायची, डिपार्टमेटच्या बाहेर ही मोठी सायकलींची रांग. मास्तरही सायकलींवरुन यायचे. आजूबाजूला गर्द झाडी, पवई लेक. आणि परत लॅब मध्ये तुम्हाला हवं ते करू शकणारी मुलंमुली. ह्या सगळ्याच्या काहीसा प्रेमात पडलेलो. इथे आलं पाहिजे असं मनोमन वाटलेलं पण ते आपल्याला शक्य आहे का? हे ही मनात होतंच.
  इंजिनिअरिंग पूर्ण झालं, कँपस मध्ये मिळालेली नोकरी ९/११ नंतरचे स्लोडाऊन वगैरेत काही फळली नाही. त्याही आधी पासून 'गेट' (प्रवेश परिक्षा) चा फॉर्म भरलेला, पण नंतर थोडाफार अभ्यासही चालू केला. एका इलेक्टॉनिक्स/ एंबडेड कंपनीत इंटर्न म्हणून काही महिने जॉब मिळाला ती कंपनी ही योगायोगाने हिरानंदानी पवईतच होती. त्यामुळे आयआयटी वरुन बसने कांजुर किंवा अगदी ४९६ मिळालीच तर तीन हात नाक्याला जाणं होत राहिलं. गेट दिली, पर्सेंटाईल बरं आलेलं. दिल्ली, मद्रास, कानपूर आणि बॉम्बे अशा चार ठिकाणाहुन कुठल्या कुठल्या विभागांसाठी मुलाखतीचे कॉल आले. सगळीकडे जाऊन आलो, कानपूर, मद्रासचे कँपस ही छानच होते, पण मुंबईशी तुलना होत होती. कानपूर, मद्रास मध्ये सिलेक्शन झालं नाही. आता मुंबईत काय होतंय बघू म्हणून इंटरव्हू देऊन आलो. ज्या दिवशी लिस्ट लागणार त्या दिवशी पूर्ण वेळ जॉब झाल्यावर संध्याकाळी मार्केट गेटला उतरुन लिस्ट बघायला गेलो तर नाव होतं की! त्यावेळी झालेला आनंद आजही विसरू शकत नाही. हे बकेट लिस्ट केलेली म्हणून नाही, पण एक मनात होतं ते घडलं याचं फार छान वाटलेलं. त्या दोन वर्षांत एकटं तरी घरापासून अगदी जेवायला काही चमचमीत केलं आहे असा फोन आला की जाऊन रात्री लॅबला परत येता येईल इतकं जवळ बसच्या अंतरावरचं लाईफ म्हणजी फारच लक्झरी लाईफ होतं. तिकडे मात्र मनात येईल त्या सगळ्या गोष्टी भरपूर केल्या. तिकडेच मायबोलीची पहिली ओळख झाली पण आजुबाजूला इतकं सारं होतं की आभासी मायबोलीवर काही तेव्हा फार रमलो नाही.
 • त्याच्या ही आधी दहावी/ बारावी नंतर पुढे काय करायचं याची अक्कल ना मला होती, ना आई बाबांनी कधी हे कर ते कर असा धोशा लावलेला. तुला हवं ते कर यापेक्षा जास्त काही त्यांनी सांगितलेलं आठवत नाही. पण माझा आत्तेभाऊ माझ्यापेक्षा ७ वर्षांनी मोठा आणि एकदम आदर्श असा होता. त्याकाळी व्हिजेटीआय आणि एस.पी. (अंधेरी) अशी दोनच सरकारी कॉलेजेस होती आणि तो एसपी मधुन इंजि होऊन सिमेन्स मध्ये भरपूर पगाराच्या (हे कोणी सांगितलं न्हवतं, पण असंच एक डोक्यात बसलेलं) नोकरीवर काम करायचा. तर आपण पण इंजिनिअर झालं पाहिजे हे उगाचच मनाने घेतलेलं. म्हणजे इंजिनिअर म्हणजे काय करतात, त्यातील वेगवेगळ्या शाखांचं काय काम असतं याची मला जवळपास शून्य माहिती होती आणि तरीही मार्क ठीक आहेत आणि प्रवेश मिळतोय म्हणून मी इलेक्टॉनिक्स अ‍ॅंड टेलिकॉमला प्रवेश घेतलेला. सगळं शिक्षण मराठी माध्यमातून त्यामुळे बारावीला इलेक्टॉनिक्स असा काही ऑप्शनल विषय असतो याची गंधवार्ताही न्हवती पण तरी कंप्युटर किंवा टेलिकॉम करायचं हे त्या काळी का वाटायचं कोण जाणे. तर ही कदाचित बकेट लिस्टच्या/ सूप्त इच्छेच्या बादलीतील पहिली इच्छा असेल.
 • शिक्षण झाल्यावर मला एकटं राहुनच नोकरी करायची होती. घरच्या लोकांना वाटायचं की मला घरची किंमत कळेल बाहेर राहिलं की. आणि मला वाटायचं की घरच्यांना माझी किंमत कळेल. आता विचारलं पाहिजे कळली का किंमत! अंडरग्रॅड झाल्यापासून कायम बाहेरच राहिलो.
 • माझ्या लहानपणापासूनच आजी-आजोबा पुण्याला रहात असत. आजोबा रिटायरमेंट घेऊन चेंबुरहुन पुण्यात डेक्कन मध्ये रहात आणि त्यांच्या रेकॉर्डिंग इ. छंदांत त्यांनी स्वतःला व्यग्र करुन घेतलं होतं. दरवर्षी दिवाळी आणि मे महिन्यात आम्ही पुण्याला जात असू. थोडं मोठं झाल्यावरही पुण्यात डेक्कनला फिरताना काही तरी एकदम भारी वाटायचं. जरा बुजल्यासारखं ही होत असावं. पण त्याकाळी पुण्यात रहावं असं मात्र नक्की वाटायचं. शिक्षणानंतर नोकरी खरंतर कुठेही चालली असती. मला तर बंगलोरच हवी होती. ते आजही अजुन शक्य झालेलं नाही. ते ही बादलीतील इच्छांत आहेच खरंतर. तर ती पुण्याला मिळाली. घरापासून दूर, पण परत पुण्यालाच. मनात आलं की इंद्रायणीत बसायचं रात्री जेवायला ठाण्याला. पाच वर्षे पुण्यात मात्र मजा केली.
 • पहिल्या नोकरीत कामानिमित्त परदेशात जावं लागलं, आणि ते ही बे-एरियात. परत आयआयटी प्रकार झाला. व्हॅली, तिकडच्या सगळ्या माहित असलेल्या कंपन्या अगदी येता जाता 'जय कानिफनाथ रसवंतीगृह' वाटेत लागाव्या अशा दिसायच्या. तिकडे ड्रायव्हिंग ट्युटर बरोबर एक-दोनदा फिरुन कार रेंट केली. आणि मग प्र-चं-ड फिरलो, आणि बे एरियाच्या प्रेमात पडलो. परत व्हॅलीत सहा आकडी पगार मिळतो (हल्ली चपराशी त्या पगारात व्हॅलीत जगू शकत नाही म्हणतात. तर ते एक सोडा) तो तर ठीकच आहे, पण युनिकॉर्न मध्ये काम करायचं आणि ती आयपीओ/ अक्वायर झाली पाहिजे, म्हणजे मग डायरेक्ट रिटायरमेंट असले अचाट विचार डोक्यात त्या काळी पार भिनले होते. तेव्हा पासून बे एरियात रहायचं हे मनात होतं. नंतर पुणे, कॅनडात माँट्रिआल, टोरांटो, आटोवात नोकरी करत असलो तरी बे एरिआ काही मनातुन पुसला न्हवता. काही काळाने एक संधी आली. तोवर एकटा जीव नसल्याने फॅमिली सकट चंबूगबाळं आवरुन गेलो. गेलो ती कंपनी स्टार्ट अप होती. ती युनिकॉर्न झाली, तिचा आयपीओ झाला. सगळं झालं. रिटायरमेंट फक्त हुकली. Wink Proud

आता काय करायचं आहे...

 • कॅनडात रहातो तर जुजबी तरी फ्रेंच बोलायला शिकायचं आहे. सध्या अ‍ॅप मधुन शिकतो, पण त्यात काही ध्येय नसल्याने तितकं नीट होत नाही. पँडेमिक नंतर कॉलेजं उघडली की कम्युनिटी कॉलेजात संध्याकाळी/ वीकेंडचा इन पर्सन फ्रेंच कोर्सला रजिस्टर करणार आहे. माँट्रिआल/ किंवा क्युबेक सिटीत रेस्टॉरंट मध्ये फ्रेंच मध्ये ऑर्डर करता आली पाहिजे, आणि एक दोन जोक करता आले पाहिजेत इतकीच सध्या इच्छा आहे. पॅरिसबिरिसला जाऊन रँडम माणसांबरोबर रुम शेअर करुन त्यांना सकाळी दात घासताना न्याहाळणे प्रकार करायचे नाहीत. याची कृ.नों.घ्या! Wink
 • आईस स्केटिंगचे शूज आणले आहेत, पण अजुन स्केटिंग जमत नाही. ते ही ट्युटर लावुन यावर्षी शिकणार आहे.
 • गेल्या विंटर मध्ये कितीही स्नो पडला/ किंवा कितीही तापमान खाली गेलं तरी रोज अर्धा-पाऊण तास चालायचंच ठरवलेलं आणि अगदी मायनस २५ -३० सेल्शिअस पर्यंत व्यवस्थित काळजी घेतली की बाहेर जाता येतं याचा कॉन्फिडन्स आला आहे. त्याहुन खाली वारा असला तर जरा त्रास होतो, पण असे दिवस तुरळक असतात. तर यावर्षी क्रॉसकंट्री स्की करायचं नक्की केलं आहे. बघुया.
 • न्यूयॉर्क सिटी मध्ये महिनाभर अपार्टमेंट/ एअर बिएनबी ट्रान्झिट जवळ भाड्याने घेऊन रहायचं आहे. तसंच लंडनला पण करायचं आहे.
 • रिटायरमेंट अजुन शक्य झाली नसली तरी ती लौकिकार्थाने लवकर घ्यायची आहे. ती घेतली तरी काम करेनच, पण पूर्ण वेळ न करता जगण्यापुरते पैसे कमावायला अध्येमध्ये असं करायचं आहे. यात अर्थात जगण्याच्या गरजा कमी न करता हे करायचं आहे.
 • कनेडिअन स्नोबर्डस सारखं जगायचं आहे. फक्त फ्लोरिडाला न जाता जानेवारी ते एप्रिल मुंबईत रहायचं. आता ख्रिसमसची पण सवय झाल्याने तो ही सोडवत नाही. Happy
 • २००७ ला पहिला आयफोन आला तेव्हा पासून मला आयफोन घ्यायचा आहे. तो नंतर वापरला पण स्वत:साठी कधी घेतला नाही. पुढेही घेईन असं वाटत नाही.
 • फँग मध्ये काम करायचं हे ही खूप पूर्वी होतं लिस्टीत. आता मात्र विरुन गेलेलं स्वप्न आहे ते. सगळ्यांबद्द्ल इतक्या सुरस आणि चमत्कारिक कहाण्या ऐकल्या आहेत की ठेविले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. आली आली चाळीशी आली. Happy
 • जमेल तशी जगभ्रमंती करायची आहे. अगदी दिसली एक्सायटिंग जागा की जावं वाटलं असा फार स्वभाव नाही. अगेन म.म. अं.पा. पा.प इ. इ. इ.. पण निसर्गापेक्षा मोठ्या शहरात फिरायचं आहे. निसर्ग तोंडीलावायला बघूच. पण सगळ्या मोठ्या शहरात ट्रांझिट मधुन हवं तसं हवं तिथे फिरत काही बाही खात काही दिवस रहायचं आहे.
 • कार्पेंट्री आणि पॉटरी या दोन गोष्टी शिकायच्या आहेत. घरात टिंबर आणून काही बाही करत असतो, पण कार्पेंट्री शिकावी वाटते. तसंच लेथ घेऊन त्यावर लाकडाच्या वस्तू करण्याचे व्हिडिओ बघुन ते ही करावंसं वाटतं. तेच पॉटरीचं. बघू कधी जमतंय.
 • भारतात असताना हार्मोनिअम ठीक ठाक वाजवेपर्यंत शिकलेलो. इथे पिआनो शिकायचाय. हे ही युट्युब वर बघुन कधी कधी करतो, पण नीट शिकायचा राहिलाय.
 • बस ड्रायव्हर म्हणून किंवा सबवे ट्रेन, टोरांटो स्ट्रीट कार ड्रायव्हर म्हणून काम करायचं आहे. यातलं काहीच नाही जमलं तर गेला बाजार उबर ड्रायव्हर किंवा स्किप द डिशेश ड्रायव्हर.
 • कंपनीने फायर करावं. एंप्लॉयमेंट इन्श्युरन्सला अप्लाय करावं, आणि काम धाम न शोधता शांतपणे पुस्तकं वाचत दिवस काढावे. संध्याकाळी कुणा मित्राबरोबर फुकटच्या गप्पा माराव्या. रात्री झोपल्यावर पहाटे कामाच्या कुठल्याही विचाराने जाग न यावी. Wink हे सहज शक्य आहे खरं तर. लिस्टीची गरज नाही. Proud

फार तयारी न करता लिहितोय, त्यामुळे आणखी डोक्यात येईल तसं वाढवेन.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बकेट लिस्ट Without बकेट लिस्ट छान आहे.
लवकर रिटायर व्हायची इच्छा पुरेशा गंगाजळीसह लवकरच पूर्ण होवो.
म्हणजे आपण आपले पापलेट भाजत बसायला मोकळे.. Wink

भारी लिहिलंयस.
अंतरी नाना कळा आहेत की तुझ्या! Happy

आईस स्केटिंग शिकायला ऑक्टोबर मध्ये सुरुवात केली, आणि गेल्या आठवड्यात स्टेज-१ ची रिबीन मिळाली. Happy Proud
आता हॉकीच्या रिंकला साधारण मिनिट भरात एक प्रदक्षिणा घालायला जमते. अजुन उलटं मागे जायला तितकंसं जमत नाही, थांबायला सुरुवात केली की प्रत्यक्षात थांबेपर्यंत बराच वेळ जातो. Proud क्रॉसओव्हर कधीकधी थोडाफार जमतो, एका पायावरची तयारी अजिबात नाही. Wink उडी मात्र मारता येते.. जानेवारीत परत पुढच्या कोर्सला प्रवेश घेतला आहे.
आमचा रिड्यु कनाल जगातली सगळ्यात मोठ्ठी स्केटिंग रिंक (सुमारे ८ किमी) बनतो जानेवारी-फेब्रुवारी मध्ये. तेव्हा तिकडे गरम गरम अ‍ॅपल सायडर पित ( आणि 'जगप्रसिद्ध' बीव्हरटेल्स मध्ये भटुर्‍यावर नटेला/ केळ्याचे काप घालून खाऊन त्याची कंपलसरी तारिफ करत) स्केटिंग केलं की 'स्केटिंग जमलं' वर शिक्कामोर्तब होऊन स्केटिंग मधुन सुडोमी.
आता पुढचं लक्ष क्रॉसकंट्री स्की करणे. ते पण याच सीझनला जमलं तर विंटर सार्थकी लागेल.

मला आइसस्केटिंगची batch मिळालीच नाही आता जानेवारीत पुन्हा ट्राय करेन.

मोबाईलच्या की बोर्ड वर अर्धचंद्र कसा देतात कोणाला माहीत आहे का ?

<<मोबाईलच्या की बोर्ड वर अर्धचंद्र कसा देतात कोणाला माहीत आहे का ?>>

कीबोर्ड वरची सुरुवातीला दिसणारी अक्षरं (Primary Letters) ज्या बटणाने बदलतो, तेच बटण पुन्हा एकदा दाबल्यावर अर्धचंद्र येतो.

आता पुढचं लक्ष क्रॉसकंट्री स्की करणे. ते पण याच सीझनला जमलं तर विंटर सार्थकी लागेल. >>> जबरी रे!

मला वाटले ८ किमी हेच काय कमी क्रॉसकंट्री आहे! Happy

लेख पुन्हा वाचला. छान लिहिलाय.
आय आय टीचं एवढं काय, हे कधी कळलं नव्हतं. हा लेख वाचून स्पष्ट झालं. माझ्या भाचा सध्या आय आय टी त रिसर्च सायंटिस्ट आहे. आणि त्यांचा प्रोजेक्ट लीड कोणी पी एच डी करणारा आहे. त्याच्या बी ई, एम ई च्या प्रोफेसर्सनाही त्याला आय आय टीत काम करायला मिळतंय याचा आनंद झाला.
लेखात लिहिलेली एक इच्छा आता पूर्ण झाली हे भारी आहे. इतर इच्छा पूर्ण होण्यासाठी शुभेच्छा!

Pages