नव्वदच्या दशका पूर्वीचा आठवणीतील गणेश उत्सव आणि ल ब भोपटकर मार्गावरची अनंत चतुर्दशी ची गणपती मिरवणूक

Submitted by kvponkshe on 18 September, 2021 - 23:37

आज जिथे मंडईचा गणपती बसतो तिथून पेरूगेट चौकी पर्यंत जो रस्ता आहे त्यास ल. ब. भोपटकर मार्ग म्हणत.
आज हा रस्ता खूप अरुंद वाटतो ना ? पण एके काळी या रस्त्या वरून अनंत चतुर्दशीच्या दिवशी किमान ४०- ५० मंडळांची विसर्जन मिरवणूक जायची हे आज तुम्हास सांगून पण खोटे वाटेल. १९९१ साली शेवटची मिरवणूक या रस्त्यावरून गेली.
हे भोपटकर पुण्यातील प्रसिद्ध वकील होते. पेरूगेट चौकी जवळ त्यांचा वाडा होता. याच रस्त्यावर पूर्वी जिथे रतन सायकल मार्ट होते त्याच्या समोर धोंडूमामा साठे वाडा होता. या साठे वाड्यात माझ्या आईचे माहेर होते. आजी , मामा, मामी, माझे मामे भाऊ असा खूप मोठा परिवार गणपतीसाठी या वाड्यात जमे. वाड्यात ४-५ कुटुंबे होती, पण खरतर आम्हा जमलेल्या सगळ्यांचे एकच कुटुंब बनून जात असे. मी आणि आई गौरी विसर्जनानंतर आजी कडे या वाड्यात राहायला जात असू.
याच रस्त्यावर ध्रुव ग्रंथालय होते, हल्ली ते दिसत नाही. पण या ग्रंथालयानेच मला वाचनाची आवड लावली. या ग्रंथालयामुळेच मी नारायण धारप कथांचा फॅन बनलो. सकाळी आम्ही मामे भावंडे वाड्याच्या अंगणात क्रिकेट आदी खेळ खेळत असू. या वाड्यात मधल्या मजल्यावर जिथे साठे आजी राहत, तिथे खूप मोठा हॉल होता. त्या हॉल मध्ये आम्ही काही नाटुकली पण सादर केलेली मला आठवतात. या हॉलची मला जरा भीतीच वाटे. सहसा एकट्याने मी या हॉल मध्ये जात नसे. (धारप कथांचा परिणाम असेल कदाचित.) रात्री ७ नंतर मी आणि आई गणपती पाहायला निघत असू. वाडा अगदी मध्य वस्तीत असल्याने फार पायपीट करावी लागत नसे. आम्ही ३ दिवस वेगवेगळ्या भागातील गणपती पाहत असू. पूर्वी एक पाण्यात चालणारी होडी मिळे. त्यात मेणबत्ती लावून ती पाण्यात गोल गोल फिरे. ती बोट सहसा गणपतीतच मिळे. दरवर्षी ती बोट मी घेत असे. एकावर्षी ती मात्र आम्हाला कुठेच मिळाली नाही. बहुदा १९८८ साल असावे. (साल इतके पक्के लक्षात राहण्याचे कारण , मी त्या साली ६वी ला होतो. आणि आम्हास
"मोहीम फत्ते " असा एक धडा होता. त्यात लेखकाने बोटीने केलेल्या अंटार्क्टिका मोहिमेची माहिती होती.मी आणि आईने लक्ष्मी रोड दोनदा पालथा घातला, पण तो बोट त्यावर्षी नाहीच मिळाली.)
आई बरोबर फिरताना मी आणि आई विश्राम बाग वाड्यासमोर डोसा , वडा असे काही खात असू. फेरीवाल्यांकडून उत्सवाची आठवण म्हणून मी काही ना काही घेतच असे. याच विश्राम बाग वाड्यात एका वर्षी गणपतीत खांदेरीचा रणसंग्राम नावाचे प्रकाशनाट्य दाखवले होते. मराठा नौदलाच्या माझ्या वाचनाच्या आवडीची मुहूर्त वेढ येथेच रोवली गेली !

रात्री ९-९:३० पर्यंत वाड्यात आम्ही परत येत असू. किंबहुना तसा दंडक च होता म्हणा ना ! वाड्याच्या दिंडी दरवाज्यास १० नंतर सहसा कुलूप लावत असत. वाड्यात शिरले की मला एकदम सुरक्षित वाटत असे. १९९३ च्या गणपतीच्या अनंतचतुर्दशीच्या रात्री किल्लारी भूकंप झाला. आम्ही तेव्हा या वाड्यातच होतो. पहाटे ४ ला आईने मला उठवले. वाडा एवढा भक्कम पण तरी पण हादरत होता. काही वेळाने सगळे शांत झाले. मला नंतर झोप लागलीच नाही. मी उठलो आणि सरळ लक्ष्मी रस्त्यावर जाऊन मिरवणूक पाहू लागलो. तिथल्या लोकांना भूकंपाची काहीच कल्पना नव्हती आणि मिरवणूक नेहमीच्या जोशात सुरु होती. भूकंपाचे गांभीर्य आणि झालेली जीवित हानी बाबत सगळ्यांना ९ नंतर समजले.

पुढे पुढे मोठा झाल्यावर मी मित्रांबरोबर गणपती पहायाला (खरेतर "गौरी पाहायला") जाऊ लागलो.
आजीला फिरून गणपती पाहण्यात किंवा मिरवणुकीत फार रस नसे. तीचा बिचारीचा आनंद वाड्यात जमलेल्या सर्वांसाठी भेळ इतर पदार्थ करणे, ते सगळ्यांना देणे , चहा करणे यातच होता. अगदी एखाद दुसरी चक्कर ती वरच्या गॅलरीत मारून ५ मिनिटे मिरवणूक बघून ती परत खाली जात असे.

अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री दिवशी हा भोपटकर मार्ग जिथून सुरू होतो तिथं मला आठवतंय त्या प्रमाणे जुन्या जाईचा गणपती पहिले तिथं ट्रॅक्टर वर लागलेला असायचा त्याच्या मागे 2-3 मंडळ सोडून मग लोखंडे तालमीचा गणपती असायचा त्याच्या मागं श्रीकृष्ण हनुमान मंडळ त्याच्या विभाग विजय क्रिकेट क्लब आणि इतर मंडळ अशी ती रांग लागे. मी आणि माझा भाऊ अमोल, हे अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी संपूर्ण रांगेतल्या गणपतीची यादी बनवत असू. नातूबाग, खजिना विहीर, हत्ती गणपती हे सगळे लाईटचे गणपती असायचे तेही अनेक वेळा याच मार्गावरून जायचे. पण ते साधारण संध्याकाळी सात नंतर या मार्गावर यायचे. एका वर्षी मला आठवतंय, नातूबाग मंडळाने खूप सुंदर असा लायटिंगचा डोळा बनवला होता आणि त्याच्यात गणपती ठेवला होता आज जिथे श्री कृष्ण हनुमान मंडळाचा गणपती बसतो त्या चौकात आल्यावर त्या डोळ्याच्या लाइटिंग चे डेकोरेशन बाजूच्या इमारतींना अडकले. बराच वेळ तिथं गणपती अडकून पडला होता. नंतर मी झोपी गेलो. नातूबाग मंडळाला डेकोरेशन कापावे लागले आणि गणपती पुढे न्यावा लागला असे आईने मला दुसऱ्या दिवशी सांगितले. या श्रीकृष्ण हनुमान मंडळ गणपती वरून आठवले. या गणपतीचा मांडव अगदी मिरवणुकीचा रस्त्यात असायचा अनंत चतुर्दशीच्या आदल्या रात्री मंडळाचे कार्यकर्ते रातोरात तो मांडव हटवायचे. मी दरवर्षी ठरवायचो यावर्षी तरी हा मांडव हटवताना बघायचं पण तो योग कधीच आला नाही. मी फार फार तर बारा साडे बारा पर्यंत जागायचो आणि नंतर झोप अनावर होऊन झोपी जायचो. त्यानंतर कधीतरी श्रीकृष्ण हनुमान मंडळाचे कार्यकर्ते तो मांडव हटवायचे आणि विसर्जन मिरवणुकीचे रथ त्या रस्त्यावर लागायचे. त्याकाळी विसर्जन मिरवणूक बारा वाजता सुरू व्हायची. बारा वाजता मंडई येथे भोंगा व्हायचा. मंडईच्या टिळक पुतळ्याजवळ मानाच्या पाच गणपतींची पूजा व्हायची आणि मिरवणूक सुरू व्हायची . पुढे पुढे मिरवणूक सुरू व्हायची वेळ बारा वरून दहा वर आणि हल्ली नऊवर आणलेली आहे.
हल्ली जशी ढोल पथक असतात तशी पूर्वी नसायची. पुण्याजवळच्या गावांमधून ढोल लेझीम पथक मागवले जात. तशी त्यांना सुपारी देत असत. निंबाळकर तालीम बरोबर बोतरवाडी गावचा पथक असे. डीजे वगैरे प्रकार इतके लोकप्रिय नव्हते. रात्रीच्या वेळी डोक्यावर गॅस बत्ती घेऊन जाणाऱ्यांचे एक वेगळे पथक असे.
१९९० पर्यंत गणेश मंडळे ट्रक , उघडे टेम्पो आणि ट्रॅक्टर ट्रॉली वापरात असत. हल्ली फक्त ट्रॅक्टर ट्रॉली वापरतात आणि बाकी कामांसाठी ट्रक (बहुदा ४०७) वापरतात.
नव्वदच्या दशकात पुण्याच्या गणपती मंडळात गणपतीची उभी मूर्ती बहुदा लोखंडे तालीम आणि शिवाजी रोडवरच्या वनराज मित्र मंडळाची होती. बाकी सगळे बैठे गणपती. आताशा पुण्यातल्या मूर्तींचे रूप खूपच मोठे झाले आहे. पण पूर्वी पुण्यातल्या मंडळांच्या मूर्ती छोट्या असायच्या. पुण्या बाहेरची लोक यावरून पुण्याची अनेकदा खिल्ली उडवत. माझ्या माहितीप्रमाणे सगळ्यात आधी मूर्तीचा आकार वाढवला तो तुळशीबाग मंडळाने. त्यानंतर छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड मंडळाने वाढवला आणि मोठ्या आकाराच्या मूर्तींचे पुण्यात परंपराच सुरू झाली .
पुण्याच्या गणेश विसर्जनाचे अजून एक विशेष म्हणजे इथे मंडळाची मुख्य मूर्ती कधीच विसर्जन करत नाहीत. प्रत्येक मंडळ पूजेसाठी स्वतःचा एक छोटा गणपती आणते आणि त्याचीच प्राणप्रतिष्ठा आणि विसर्जन होते. गणेश विसर्जनासाठी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या , पाचव्या , सातव्या आणि शेवटच्या दिवशी धरणातून खास विसर्ग केला जातो.
1992 नंतर या रस्त्यावर ची मिरवणूक बाजीराव रोड ने शनिपार आवरून जिलब्या मारुती मंदिराच्या वरून टिळक पुतळ्याला वळसा घालून लक्ष्मी रोडला मिळवण्यात येउ लागली. यानंतर मिरवणूकीत अनेक बदल करण्यात आले. आणि आज आपण अनंत चतुर्दशी ची मिरवणूक बघतो या सर्व बदलांचे फलित आहे. मात्र माझ्या बालपणात या धोंडू मामा साठे वाड्यातल्या गॅलरीमधून 1991 पर्यंत दर वर्षी ही मिरवणूक मनसोक्त अनुभवली.
हल्ली पुण्यात गणपती मंडळांचे अमका राजा तमका राजा असे नामकरण सुरू आहे ते मला बिलकुल पसंत नाही पुण्याने पुण्याच्या वेगळेपण जपले पाहिजे असे माझे मत आहे. भोपटकर मार्गावरची मिरवणूक साधारणत पहाटे चारला संपत असे. आणि संपूर्ण मिरवणूक संपायला कधीकधी दुसऱ्या दिवशी चे बारा वाजत. मिरवणूक संपल्यानंतर रस्त्यावर गुलालाचा खच पडलेला असे. मिरवणूक संपल्या संपल्या सफाई कर्मचारी रस्त्यावर येऊन काही तासात रस्ता स्वछ करीत असत. मिरवुकीच्या दुसऱ्या दिवशी उत्सवाच चैतन्य संपून संपूर्ण पुण्यात एक प्रकारची उदासीनता दाटून येई. परगावाहून पुण्याचे गणपती बघायला आलेले लोक आपापल्या गावी परतत.
आणि पुणेकर नवरात्राच्या तयारीला लागत !

कौस्तुभ पोंक्षे

विषय: 
प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users