माझ्या आठवणीतील मायबोली - जाई.

Submitted by जाई. on 16 September, 2021 - 12:36

भारतात तेव्हा नेट बाल्यावस्थेत होतं. १२० रुपयात एअरटेलच रिचार्ज करून डेटा मिळवायचा आणि त्यात नेटवर हुंदडून घ्यायच कॉल करायचे, sms ही पाठवायचे!!! हुश्श. नेटवर हुंदडायचे म्हणजे तरी काय , तर गुगल ओपन करून गुगल जे दाखवेल ते वाचत बसायचं.

त्यावेळी इंटर्नशिप करत होते. तेव्हाच साधारणपणे मायबोली सापडली. सापडली म्हणजे सापडवून दिली गेली. वाचनाची आवड माहीत असलेल्या मित्रवर्यापैकी एकाने इथे अकाऊंट ओपन करून दिलं. ते ही अगदी पासवर्ड वगैरे सेट करून देऊन. गंमत म्हणजे ते मित्रवर्यच सध्या गायब झालेत. Proud

सुरुवातीला काही कळायच नाही . माझ्याकडे तेव्हा नोकिया ३३१० होता , त्यावर पूर्ण पेज लोड तर व्हायचं पण चित्र छोटी दिसायची.मराठी टायपिंगची बोंबच होती. मराठी कथा हा सर्च ही Marathi katha असा द्यायचे. त्यामुळे सुरुवातीला रोमात राहणं हा पर्याय स्वीकारला.

वाचनमात्र असल्याने फक्त वाचनच व्हायचं. सर्वात पहिल्यांदा काय वाचलं असेल तर गुलमोहर हा विभाग. बरेच लोक कथा प्रतिसाद देऊन वर काढायचे . त्यामुळे मग कथा वाचायला मिळायच्या आपसूक. मायबोलीकरानी लिहिलेल्या अनेक उत्तमोत्तम कथा वाचून काढल्या. कथाकथी हा धागा त्यासाठी बेस्ट. चांगल्या कथेचं कलेक्शन एकाच ठिकाणी विनासायास मिळतं. हळूहळू मग इतर विभागाकडे वळले. अन्न वै प्राणा वै, ललितलेखन , पाककृती , प्रवासवर्णन , गुंतवणूक, निसर्गाच्या गप्पा असलं बरेच काही वाचायला मिळालं. मग आपणही प्रतिसाद देऊन बघू असा विचार केला.एकेदिवशी मग मायबोलीवर लेखन कसे करावे हा धागा वाचून टायपिंगचा सराव केला. सुरुवातीला छान , सुंदर असे तुटक प्रतिसाद द्यायचे. आत्मविश्वास नव्हता. हळूहळू जमू लागलं.

गप्पांच्या पानांचा शोधही अपघाताने लागला. नवीन लेखनात शहराची नाव बघून, तिथल्या गप्पा वाचून जरा कुतूहल वाटायचं. पण भिडस्तपणाने पोस्ट टाकायला संकोच आडवा यायचा. शेवटी एका दिवशी मग गजाली या कोकणवासीयांचा भरणा असलेल्या गप्पापानावर गंमत म्हणून मालवणी भाषेत दोन ओळी लिहिल्या. तर तिथल्या माणसांनी चक्क अनुल्लेखाने न मारता मला त्यांच्यांत सामावून घेतलं Lol ..नंतर गजालीच गटग अटेंड करण्यापर्यत मजल मारली. तीच गोष्ट कोल्हापूर बाफची . पुढे वेबमास्तर भारतात आले होते तेव्हा पार्ल्याच्या गजालीत झालेल्या गटगलाही हजेरी लावली. या गटग प्रकारची एक गंमत म्हणजे जो नवीन सदस्य असेल त्याने वृत्तांत लिहायचा . अश्याने त्याची भीड चेपायला मदत होते. एका वर्षाविहारालाही हजेरी लावून आले. अर्थातच धमाल आलेली.

शेवटी एके दिवशी धीर चेपून डायरीत लिहिलेल्या एक दोन कथा मायबोलीवर टाकल्या. नव्याची नव्हाळी असल्याने दर दोन मिनिटाने कोणी प्रतिसाद दिलाय ते चेक करायचे . आता ते आठवलं तरी हसू येतं Biggrin आता तेवढं वाटत नसलं तरीही पाकपूक होतेच लिखाण टाकलं की. प्रतिसादावरून आपण बरे लिहू शकतो हा आत्मविश्वास आणि रिक्षा फिरवली की प्रतिसाद वाढतात हा शोधही लागला Wink . इथून मिळालेला आत्मविश्वास मायबोलीच्याच एका लेखनस्पर्धेत बक्षीस मिळवून द्यायला कामी आला.

नंतर संयोजनात हातपाय मारून बघितले. २०१४ चा गणेशोत्सव आणि २०१५ चा मराठी भाषा दिनाच्या संयोजनाचा, दिवाळी अंक संपादनाचा, मुलाखत घेण्याचा अनुभव घेतला.
सुरुवातीला अनोळखी लोकांबरोबर काम करायचं टेन्शन होत. पण तीच लोकं आता चांगले मित्र आहेत. संयोजनाच्या निमित्ताने बरच काही कळलं. साधा सदस्य संयोजकाची कापडं चढवतो तेव्हा वेगळंच फिलिंग येत. टीम बिल्डिंग या संकल्पनेची ओळख झाली..मानवी स्वभावाची नव्याने ओळख देखील झाली. काहींनी मोकळेपणाने मदतीचा हात दिला तर अमुक एक सदस्य मंडळात असल्याने आम्ही लिखाण करणार नाही अस बाणेदारपणे संगणारेही भेटले Lol तर ते असो .

यावर्षी माझ्या मायबोली सदस्यत्वाला १० वर्ष पूर्ण झाली आणि मायबोलीला २५ वर्षे.. पुलाखालून बरच पाणी वाहून गेलं. नोकिया 3310 पासून सुरू झालेला मायबोली प्रवास आता आयफोनपर्यत आला..काही जुने आयडी सोडून गेले तर काही नवीन भरती झाले. त्यातले काही मैत्र झाले.काही उपक्रम बंद पडले तर काही नवीन सुरू झाले. संयुक्ता हा अश्या बंद पडलेल्या उपक्रमांपैकी एक. लेखनस्पर्धाही पुन्हा सुरू व्हायला हव्यात..

काही बदलेलं नाही तर ते म्हणजे इथली माणसं. हाताची पाचही बोटं सारखी नसतात मग मायबोली कशी अपवाद असणार? दहा वर्षाच्या प्रवासात काही गोड , कटू आठवणी सोबतीला मिळल्यात. कडाडून वाद घालणारे मित्र झालेत तर संभावितपणा करून कळ लावणारेही कळले. असो. मानवी स्वभाव म्हणून सोडून द्यायचं..तर इथल्या चर्चानी , युक्तिवादानी दृष्टिकोन बदलायला, ठामपणे मत बनवायला बरीच मदत केली. नवं नवीन माहिती , चर्चा होणे हा मायबोलीचा यूएसपी. एखाद्या रिकामंटेकड्या धाग्यावरील अतिशय मुद्देसूद प्रतिसाद धाग्याचा नूरच बदलून टाकतो आणि धागा उघडल्याच सार्थक होतं. वेगवेगळ्या विषयांवर मुशाफिरी करणारे मायबोलीकर बघून थक्क व्हायला होतं. आणि घेशील किती कराने असेही फिलिंग येते. इथलं वाचून काही उपक्रम स्वतःहून सुरू केलेत. उदाहरणार्थ : बाल्कनीत केलेली छोटीशी बाग .

सुरुवातीला लिहिलं तस मायबोली कळली तेव्हा इंटर्नशिप करत होते. तेव्हा तिथल्या ऑफिसमधलं पब्लिक कुतूहलाने हे काय ऑनलाइन मराठी म्हणून मायबोलीकडे पाहत असायचे. इथल्या काही रेसिपी ते लोकही वाचत बसायचे. कधी गंमत म्हणून काय म्हणतेय तुझं मायबोली म्हणून चौकशी पण करायचे. आजही मायबोली वाचतेस का म्हणून विचारतात.
मायबोली किती अजस्त्र पसरली आहे ह्याचा अनुभव मी IFRS परीक्षेच्या वेळेस घेतला. पेपर संपल्यावर बसची वाट बघत असताना स्मार्टफोनवर मायबोली चाळत असताना माझ्याबरोबर असणारी मैत्रीण फोनकडे बघून "अय्या! तू पण मायबोलीकर का ? मी सुद्धा आहे मायबोलीकर "! म्हणून चित्कारली. जेमतेम 6 महिन्याची क्लासची ओळख , ती ही तात्पुरती परीक्षेपुरती . त्यातही मायबोली आलीच आणि ती ओळख कायमस्वरूपात बदलली. Happy

बरेच पाल्हाळ लावून झालेय तर आता संयोजकाच्या प्रश्नांकडे वळते

तुम्ही मायबोलीवर यायला लागल्यापासून तुम्हाला काय बदल जाणवले
मराठी सुधारलं, आपण बोलतो त्या मराठी भाषेचे अनेक प्रकार आहेते कळलं. वैदर्भीय , खान्देशी , कोल्हापूरी पुणेरी अश्या अनेक भाषा कळू लागल्या. आधी लिहिलं तस विचारात फरक पडला. आपला नेमका कल कुठे आहे ते कळलं. कितीएक नवीन विषय कळले. परदेशी जीवन कसे असते, तिथलं लोकप्रिय काय हे ही कळू लागले. लिहिण्याचा आत्मविश्वास आला.

इथली कुठली सोय तुम्हाला एकदम आवडली वेगवेगळ्या विषयांचे कप्पे आहेत ते बरे पडते. जे आपल्याला कळत नाही उदाहरण म्हणजे कविता ते unsubscribe करता येतं

कुठली सोय तुम्हाला कित्येक दिवस माहितच नव्हती बुकमार्क करणे. मी आपलं ब्राउझरमध्ये बुकमार्क करून ठेवायचे :p

गेल्या २५ वर्षात मायबोलींनं तुम्हाला काय दिलं, वरच्या पाल्हाळमध्ये हे लिहून झालेय. पण एक खास गोष्ट म्हणजे अनुल्लेखाने मारणे आणि नवीन मराठी शॉर्टफोर्म शिकवले. Biggrin जोक्स अपार्ट, मित्रमंडळी मिळाली, शिकायला मिळालं, लोकांचं बघून आपण तस करावं हा हुरूप दिला. नवीन पुस्तक, मालिका, चित्रपट, खेळ वगैरे विषय कळले.

तुम्ही मायबोलीला काय दिलं सदस्यसंख्येत एकाने भर टाकली Proud स्वतःच्या लेखनाच्या रिक्षा फिरवल्याने बाहेरही फिरवल्याने मायबोलीचे हिट्स वाढवले Wink

तुमचं कुठलं लेखन गाजलं, ऑनलाइन वस्तू खरेदी. खरेदी हा नुसता स्त्रियांच्या जिव्हाळ्याच्या विषय नसून पुरुष लोकं पण त्यात आघाडीवर आहेत हे त्या धाग्याने सिद्ध केलं.

कूठल्या लेखांनी तुम्ही मायबोलीकरांना गांजलं Not Applicable

तर २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने मायबोलीला खूप शुभेच्छा. परदेशी गेल्यावर मराठी वाचायला बोलायला मिळावं या निमित्ताने सुरू झालेला हा प्लॅटफॉर्म देशी लोकांतही तितकाच बहरला, लोकप्रिय झाला, माणसांना जोडता झाला. अशीच भरभराट होवो या शुभेच्छासहित आता थांबते.

||गणपती बाप्पा मोरया||

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिलंय. अगदी मनमोकळेपणाने..
एखादा/दी वाचनमात्र सदस्य असेल आणि लिहावं इथे काहीतरी असं वाटत असूनही भिडेपोटी लिहित नसेल तर त्याची भिड चेपायला, त्याला लिहायला प्रवृत्त करायला हे मनोगत नक्कीच मदत करेल.

अय्या! तू पण मायबोलीकर का ? मी सुद्धा आहे मायबोलीकर "! म्हणून चित्कारली. >>>> किती मस्त. मी अशा प्रसंगाची वाट बघायचे, ट्रेन मध्ये. पण मला कधीच कोणी माबोकर भेटला /भेटली नाही. एक धागा पण आला होता मायबोलीकर कसा ओळखावा म्हणून. Proud तसा एक मायबोलीकर माझ्या शेजारी राहायचा. पण तो मिपाकर जास्त होता. एकदाच भ्रमर भेटला होता ( गोरेगावात) असला आनंद झाला होता मला.
मला खुप आवडलं तू लिहीलयस ते.

छान लिहिलं आहेस जाई.
तिकडे वाचुन हे खोडलंय. म्हणजे तू गोंधळात पडशील हे कॉपे आहे की नाही? Proud

छान लिहिले आहे

लेखनस्पर्धाही पुन्हा सुरू व्हायला हव्यात.. >>> +७८६ ईथे अजूनही बरेच चांगले लिहिणारे आहेत जे गणेशोत्सवानिमित्त समजते. स्पर्धा होत राहतील तर लोकांमधील लिखाणाचा किडा वळवळत राहील.

तुम्ही मायबोलीला काय दिलं सदस्यसंख्येत एकाने भर टाकली Proud >>> आणि मी एकापेक्षा जास्त Lol

जाई खूप सुंदर लिहिलेस.. बऱ्याच गोष्टी रिलेट होतात.. मी इथे आल्यानंतर माझी भाषा सुधारली.. बऱ्याच गोष्टी नव्याने कळल्या.

एकदाच भ्रमर भेटला होता ( गोरेगावात) असला आनंद झाला होता मला. >> अरे पुन्हा भेटायलाही आवडेल की. तू दिसतेस अधनं-मधनं Happy

अरे पुन्हा भेटायलाही आवडेल की. तू दिसतेस अधनं-मधनं Happy>> मग हाक मारायची. मी त्याच भागात राहायला आलेय. ( जूनी दूधपापेश्वर बिल्डिंग) २०१८ पासून.
अवांतरासाठी सॉरी हं जाई