तुंदिलतनू तरि..

Submitted by साजिरा on 16 September, 2021 - 23:45

आमच्या शाळेला पंचवीस वर्षे पूर्ण झाली, तेव्हा मोठा कार्यक्रम करायचं ठरलं. सांस्कृतिक कार्यक्रम, खूप सार्‍या स्पर्धा, बक्षीससमारंभ, सत्कार समारंभ, जेवणावळ- असा एकंदर भरगच्च थाटमाटच उडवून द्यायचं ठरलं. शिक्षकांपासून मुलांपर्यंत एकच लगबग सुरू झाली. साफसफाई सुरू झाली. तुटक्या फरशा, टेबलं, बाकडी, कपाटं असं कितीतरी सामान रद्दीत जाऊन नवंकोरं आलं. शाळेची रंगरंगोटी सुरू झाली. जिकडे तिकडे चित्रं आणि सुभाषितं रंगवताना आमच्या ड्रॉईंग मास्तरांना, म्हणजे शिरापूरी सरांना वेळ कमी पडू लागला. फुलझाडांचे नवीन वाफे तयार झाले आणि बागकामाची माती वाहून वाहून आमच्या माळीकाकांची कंबर गेली. लेझीमपासून कबड्डीपर्यंत खेळांचे सराव सुरू झाले. कुलुपबंद करून ठेवलेली सारी वाद्यं बाहेर निघाली आणि गाण्यांच्या रंगीत तालमी सुरू झाल्या. नाचकामाच्या ठरलेल्या मुलींनी एकच धांदल उडवून दिली. मराठी आणि इंग्रजीचे विषयशिक्षक तावचे ताव भरून भाषणं लिहून देऊ लागले. आणि या सार्‍यावर आमचे हेडमास्तर सगळीकडे फिरून जातीने लक्ष ठेऊ लागले. कडक शिस्तीच्या आमच्या शाळेत एकदम पाऊस पडून गेल्यानंतरच्या संध्याकाळसारखं मऊमुलायम सुगंधी आणी हवंहवंसं वातावरण तयार झालं.
अशात एकदा साळवी सर म्हणाले, 'आपण 'रौप्यमहोत्सवी अंक' काढणार आहोत.'

मी कान टवकारले. 'काय काय असणार सर या अंकात?' मी त्यांना विचारलं, तर ते म्हणाले, 'अरे अशा समारंभासाठी तयार केलेल्या अंकात जे असतं, तेच असणार. म्हणजे शाळेचा आजवरचा इतिहास असणार. इथून शिकून पुढे मोठे झालेल्या लोकांचे संदेश वगैरे असणार. पंचवीस वर्षांतल्या गुणवान विद्यार्थ्यांची यादी असणार. संस्थाचालक, गावातले आमदारसाहेब, आपले हेडमास्तर- अशा काही महत्वाच्या लोकांची भाषणं असणार. जमाखर्च-हिशेब-ताळेबंद इत्यादी असणार. भविष्यात करायच्या गोष्टींबद्दल काहीतरी असणार. भरपूर फोटो वगैरे असणार..'

नाही म्हटलं तरी मी जरा खट्टू झालोच. शाळेचं मासिक निघणार, आणि त्यात आता शाळेत असलेल्या मुलांबद्दल आणि मुलांचं काहीच नाही?

माझा चेहरा बघून साळवी सरांना अंदाज आलाच. मी सतत काहीबाही लिहित असायचो आणि त्यातलं थोडंफार छापून आलेलं हे त्यांना माहिती होतं. आमचे काही मित्र ते वाचून टर उडवत- ते असो, पण त्याबद्दल कौतुक करणारे कुणी भेटले की मोरपीस अंगावर फिरल्यागत छान ऊबदार वाटे.

'अजून काय यायला हवं आपल्या मासिकात?' सरांनी विचारलं. तर मी छापायचे असल्यागत शब्द निवडून म्हणालो, 'सर, शाळेतल्या मुलाचं साहित्य त्यात छापून यावं, असं वाटतं. म्हणजे मुलांना तो 'आपला अंक' वाटेल. '

साळवी सर तोंडावर हात ठेऊन हसून म्हणाले, 'आणि हे 'साहित्य' कोण लिहिणार? तू आणि कापसे सरांची मुलगी- याव्यतिरिक्त?'

हे बरोबर होतं. मी गप्प राहून नावं आठवू लागलो. माझी गोष्ट एकदा छापून आल्यावर पंक्या, अज्या, मुन्ना, राक्या वगैरेंनी ठरवून लेख, कविता वगैरे लिहायचा प्रयत्न केलेला. राक्याची कविता वाचून कोणाला काय बोलावं ते सुचेना. अज्याची गोष्ट जमली आहे की नाही हे मलाच ठरवता येईना. पंक्याने कोणत्या देशात कोणकोणते शुभशकुन आणि अपशकुन पाळले जातात, त्याची (कुठेतरी वाचून) जंत्री एकापुढे एक लिहून लेख तयार केला होता. ते मला वाचताना तसं बरं वाटलेलं. पण त्याच्याच वडिलांनी ते कागद फेकून दिले.

'अरे सगळ्यांना नाचगाणी हवी असतात. कथा-लेख लिहिण्याचे कष्ट कोण घेईल?' सर म्हणाले, 'आणि असं बघ, या अंकाची पाने आपल्याला वाटलं म्हणून वाढवता येत नाहीत. किती प्रती, किती पानं यावर किंमत ठरते. बजेट दिलं आहे, त्यात ते व्हायला हवं. आता मी मघाशी सांगितलं, ते ते सारं बसवून जागा उरली पाहिजे. मग आपण लिहून घेऊ काही मुलांकडून.'

मला जरा बरं वाटलं, आणि मी सरांच्या घरून बाहेर पडलो. ओटा उतरून खाली आल्यावर ओळखीचा 'फटाक फटाक' असा आवाज आला. सरांच्या घराशेजारची दोन घरं सोडून पलीकडल्या एका कोंदट घरात या पिंजारी काकांना आम्ही लहानपणापासून बघत आलेलो. कापूस पिंजताना त्यांची अजूनही तशीच तंद्री लागते, आणि आम्ही त्यांना पाहत राहतो. कापसाचे तंतू नाकातोंडात जाऊ नयेत म्हणून ते मोठा रूमाल बांधतात. कधीकधी पिंजायला आलेला, पिंजलेला कापूस आणि त्यांचं ते धनुष्यासारखं दिसणारं पिंजण्याचं यंत्र यात त्यांची लहानखुरी हडकुळी मूर्ती दिसेनाशी होते. गावात इतकं काय काय बदललं पण हे काका आणि त्यांचं घर हट्ट केल्यागत तसेच राहिले. आता त्यांच्याकडे बघितल्यावर गावाचा इतिहास लिहिणारा साक्षीदार त्यांना व्हायचं आहे असं वाटलं. त्यांचं लक्ष गेलं आणि ते हसले. 'कैसे हो बेटा?' त्यांनी विचारलं 'सर के घर होके आये क्या?' मी मान डोलावली. मग उत्साहाने म्हणालो, 'हमारा अंक निकलनेवाला है.' ते गोंधळून बघत राहिले. 'मासिक, मासिक. पुस्तक. किताब. वो हमारी स्कूल ने पच्चीस साल कंप्लीट किये ना, इसलिए.' मग ते काहीतरी कळल्यागत हसले. माझ्या हिंदीला हसले असतील असं वाटून मी सरळ मराठीत म्हणालो, 'आम्ही लिहिणार आहोत मुलं मुलं त्यात. आमचा अंक असणारे!' क्षणभर माझ्याक्डे बघून मग ते म्हणाले, 'लिखो बेटा, अच्छे से लिखो. दिल लगाके कुछ भी करो, अच्छाही होगा.'

त्यानंतर मी जरा तरंगत घरी आलो. रात्री स्वप्न पडलं. अंकात माझी कथा छापून आली. एक नाही, दोन नाही, तब्बल दहा कॉलमवाली गोष्ट. पाच पानं. सुबक गोल अक्षरांवाला टाईप. पहिल्या पानावर बरोब्बर मध्यभागी गोष्टीचं नाव- दणदणीत मोठ्या अक्षरांत सुलेखन केलेलं. त्याखाली माझं संपूर्ण नाव. त्याच्यावर अर्धं पानभर कथेतला महत्वाचा प्रसंग आणि नायक दाखवणारं चित्रं. हे पान सप्तरंगी. मग दुसरं तिसरं पान काळ्यापांढर्‍यात. तिसर्‍या पानावर पुन्हा म्ध्यभागी एक चित्र, पण पहिल्या पानावर आहे त्यापेक्षा लहान. पाचव्या पानावर दहाव्या अर्ध्या-पाऊण कॉलममध्ये कथा संपणार. उरलेल्या जागेत पुन्हा एक छोटं चित्र. पानांचा गुळगुळीत ऊबदार स्पर्श. नव्या शाईचा वास. पानांची आपापसातली फडफड. मिटल्यावर एखाद्या महत्वाच्या ऐवजासारखं भासणारं मासिक.
***

एकदाच निघणारं माझ्या शाळेचं मासिक. त्यात मी लिहिलेलं छापून येणार.

मी विचार करत राहिलो. खूप दिवस मनात असलेली एक गोष्ट लिहून काढायला सुरूवात केली. शिवाय माझ्या आज्जीवरचा एक लेख. आणि एक 'निर्झर' नावाची कविता.

एक दिवस अचानक लक्षात आलं म्हणून मी विचारलं, 'सर अंकाचं नाव काय असणारे?' तर ते म्हणाले, 'पूर्ती'.

पूर्ती? पंचवीस वर्षे म्हणजे काय 'पूर्ती' झाली? ते कापूसवाले काका कितीतरी वर्षे आहेत. आणि अजून आहेतच. 'पूर्ती' काय? आणि कितीही वर्षे झाली तरी पुढे काहीतरी असतंच ना? मला तर आवडलं नाहीच.

दुसरं काय नाव असायला हवं याचा मी विचार करू लागलो.
***

त्यानंतर एक दिवस साळवी सरांना लिहिलेलं दाखवायला गेलो तर ते म्हणाले, 'आपल्या अंकाचं रद्द झालंय.'

मला आधी कळलंच नाही. मग कळलं की ते रौप्यमहोत्सवी अंक काढायचं रद्द झालं. कारण म्हणे ते बजेट वगैरे संपलं. खूप खर्च झाला. आणि तरी अजून आवश्यक त्या गोष्टींना पैसे नाहीत. म्हणजे कार्यक्रमाचा भलामोठा मांडव. जेवणाचा कार्यक्रम. आणि अजून बरंच.

मला वाईट वाटलं. जेवण एकच वेळचं असतं, आणि त्याचा नंतर मागमूसही राहत नाही. काही तासांनी पुन्हा जेवाच मग. मांडव कितीही भारी घातला तरी शेवटी काढावाच लागतो. आणि हे महत्वाचं?

'पूर्ती' का असेना, पण अंक म्हणजे एक मोठी आठवण. जुना असो की नवा, पण कापूस कधी पिंजणार्‍यापेक्षा मोठा होतो का? ते पंचवीस वर्षांचा साक्षीदार वगैरे काय ते, म्हणजे फुकटच झालं की.

मला ते मागच्या आठवड्यातलं स्वप्न पुन्हापुन्हा आठवू लागलं. साळवी सर काय बोलत होते ते डोक्यात शिरेना झालं. मी तसाच बाहेर पडलो. पुढे आल्यावर पिंजारी काकांचा कुणाशी तरी तावातावाने बोलत असल्याचा आवाज आला- 'रुई मेरा भगवान है. मेरे भगवान के साथ काम करते हुए मै कैसे फसा सकता किसीको? इतने सालोसें हू यहां, देखते नही? मुझे पैसे नही चाहिये. जाओ यहां से..'

कोण कुणाला कधी कसा फसवत असतो? आता मग आमच्या शाळावाल्यांनी साळवी सरांना फसवलं असं म्हणायचं की नाही? आणि सरांनी मला? मी इतके दिवस डोक्यात मशागत करत होतो, त्याचं काय करायचं? की मीच हसण्यासारख्या गोष्टी लिहून मला स्वतःलाच फसवतो?

मी क्षणभर तिथे थांबलो. मग घरी आलो. पुन्हा स्वप्न पडलं नाही तर बरं होईल असं वाटलं. पण ते पडणारच, हे मला
माहिती होतं.
***

आमच्या शाळेचा रौप्यमहोत्सव पार पडला. मी भाषण वगैरेही केलं राष्ट्रीय एकात्मतेवर. मुंबईहून खास आलेल्या संचालकांच्या हस्ते बक्षीसवाटपं झाली. जेवणावळी झाल्या. शाळेच्या नवीन इमारतीची पायाभरणी झाली. म्हणजे आमच्या नंतर अनेक वर्षांनी येणार्‍या मुलांची छानच सोय होणार. ते अंक वगैरे काढतील का, ते मात्र माहिती नाही.

माझी आणखी एका कुठच्या साप्ताहिक पुरवणीत गोष्ट छापून आली, म्हणून मी ती साळवी सरांना दाखवायला गेलो. त्यांनी कौतुक केलं तसं मी न राहवून, आगाऊपणा करून पण दबल्या आवाजात म्हणालो, 'सर आपलं मासिक निघायला पाहिजे होतं. आपल्या विद्यामंदिराचा आदर त्यामुळे झाला असता.'

मी असं काहीतरी बोललो की सर नेहेमी आपला पंजा गालाच्या दोन्ही हाडांवर ठेऊन नाक आणि ओठ झाकायचे. हसायचं असल्यामुळे ते असं करतात, असं मला नेहेमी वाटायचं. आताही त्यांनी अगदी तसंच केलं. मग तोंडावरचा हात काढून ते माझ्याकडे बघत राहिले. मग म्हणाले, 'काढूया की अंक. त्यासाठी रौप्यमहोत्सवच कशाला पाहिजे?'

मी सरांकडे पाहत राहिलो. अंक काढूया? म्हणजे? कोण काढणार?

'तुझी इच्छा आहे ना? तू काढ.' माझा प्रश्न माहितीच असल्यागत सर म्हणाले. 'आपण हस्तलिखित अंक काढू. तशी आधी जोरदार घोषणा करू. मग लिखाण गोळा करून, निवडून, तपासून, आपल्या ड्रॉईंगच्या शिरापूरी सरांकडून सुलेखन आणि स्केचेस करवून घेऊ. मग जोरदार जहिरात करू. सगळ्यांची नीट व्यवस्थित उत्सुकता तयार झाली, की मग शाळेच्या मुख्य नोटिस बोर्डावर रोज दोन पाने लावायला सुरुवात करू. सगळी पाने दाखवून झाली की सगळ्यांना लॅमिनेशन करवून आणू. मग छान हार्डबोर्ड बाईंडिंग करू, आणि तो अख्खा अंक आपल्या लायब्ररीत ठेऊ. परवानगीशिवाय कुणीही तो हाताळणार नाही याची व्यवस्था करू. पुढचा हस्तलिखित अंक येईस्तोवर दरवर्षी त्याचं सामुहिक वाचन होईल, अशी काहीतरी व्यवस्था करू. इतर वेळी हा अंक शाळेच्या महत्वाच्या कागदपत्रांच्या कपाटात राहील अशी व्यवस्था करू. काय म्हणतोस ?'

मी आ वासून बघत राहिलो. सरांनी इतका विचार केलेला?

मी अवाक होऊन बघत असतानाच सरांनी मला खास हस्तलिखिताचे रंगीत कागद दाखवले. प्रत्येक कागद वेगळ्या रंगाचा. गुळगुळीत, सुगंधी. पेन घेऊन काहीही लिहित सुटावं असा.

'सगळ्यात महत्वाचं म्हणजे,' सर म्हणाले, 'या अंकात फक्त आणि फक्त तुमचं लिहिलेलं असणार. यात भाषणं, अहवाल, संस्थेचा नि शाळेचा इतिहास, ताळेबंद, संचालकांचे फोटो आणि संदेश- असं काहीही नसणार. सगळी जागा तुमची. अख्खा अंकच फक्त तुम्ही तयार केलेला. तुमच्या मालकीचा!'

मी मंत्रवल्यागत बाहेर पडलो. कापूसकाकांना दुरूनच ओरडून सांगितलं- काका अंक निघतोय आमचा. त्यांना कळलं की नाही, ते कळलंच नाही. कापसाच्या कुठच्या तरी अगम्य आकाराच्या ढगात ते लपले होते. कापसाचे निरनिराळ्या आकारांचे ढीग आणि हवेत उडणारी असंख्य तुसं यांच्याशी अव्याहत प्रेमाची लढाई केल्यागत ते तिथं एकजीव झाले होते.
***

त्यानंतर सरांनी रीतसर अंकाची घोषण केली, सगळ्या वर्गांत नोटिस फिरवली, आणि आम्हाला 'आता कामाला लागा' असं सांगितलं.

मुलांकडून 'लिहून घेण्याचं' नियोजन सरांनी आम्हाला समजावून सांगितलं. ज्याचं त्याचं लिखाण साध्या कागदांवर पुन्हा पुन्हा लिहून घेण्यात आणि खर्डे पक्के करण्यात त्यानंतरचे खूप दिवस गेले. अनेकांशी 'ते काय लिहू शकतात' यावर वेळ मिळेल तेव्हा चर्चा होऊ लागल्या. प्रतिभा कापसेला मी मुलींकडून लिहून घेण्याची जबाबदारी दिली. ही जबाबदारी तिला 'मी' दिली- हे तर भारीच होतं. (कधी नव्हे ते- ही मुलगी माझ्याकडे येऊन मासिकांचे आणि साप्ताहिक पुरवण्या आणि मासिकं प्रकाशित करणार्‍या वर्तमानपत्रांच्या आणि प्रकाशनसंस्थाचे पत्ते घेऊन गेली). मी स्वतःचं लिहिलेलं अनेक वेळा चाळून बघितलं. राक्याच्या कविता आहेत तशाच ठेवल्या, कारण असं स्वतः सरच म्हणाले. इतर काहींच्या कथांची भाषा मी जरूर तिथं बदलून खर्डे पक्के केले. अज्या आणि अरुणच्या कथांना मात्र साळवी सरांकडेच घेऊन गेलो, आणि त्यांनाच साकडं घातलं. पंक्या-आवल्या-उमेश यांना वर्तमानपत्रं चाळून थेट आंतरराष्ट्रीय राजकारण, संयुक्त राष्ट्रसंघ, मानवाची अंतराळातली कामगिरी असे भक्कम विषय देऊन लेख लिहायला सांगितले. मंग्याला 'शाळेचा इतिहास आणि वाटचाल' असा विषय देऊन लिहायला सांगितलं. त्याचे वडिल शाळेचे सुपरवायझर- त्यामुळे हे बरोबरच होतं. नूतन काश्मीरला आई-वडिलांसोबत जाऊन आली होती, म्हणून तिने प्रवासवर्णन आणि प्रेक्षणीय स्थळं वगैरेंवर लिहायचं कबूल केलं. प्रतिभाने काही कविता दिल्या, शिवाय 'विद्यार्थ्यांचं मुल्यमापन कसं व्हावं' असा एक लेखही. मुलींकडून आणखी काही लिखाण आणण्याचं तिनं आधीच वचन दिलं होतं. आवडते सिनेमे आणि कलाकार, आवडते साहित्यिक आणि त्यांची पुस्तकं, नाटकं, रसग्रहणे, नाट्यछटा, पाककृती, निसर्ग आणि पर्यावरण- असे असंख्य विषय सरांनी आम्हाला सुचवले; आणि या विषयांवर काय आणि कसं लिहिलं जाऊ शकतं याचे धडेही दिले. मी अनेकांकडून लिहून घेतलं आणि त्याला साळवी सरांची चाळणी लावली. लिखाण बघून सर सतत तोंडावर हात धरून सारं काही नीट करत होते, दुरुस्त करत होते.

आणि एक दिवस अचानक सरांनी जाहीर केलं- गणेश चतुर्थीला अंक आणायचा.

मग आमची धावपळ उडाली. कारण आम्ही अंकाच्या लिखाणाची जंत्री तर भलीमोठी बरंच जमवली होती, पण त्यातलं अजून बरंच लिखाण मुलांनी अर्धवटच लिहिलं होतं. सारी लिखाणं पूर्ण झाल्यावर मराठीच्या विषयशिक्षकांकडून शुद्धलेखन तपासून घ्यायचं होतं. मग आम्हाला दिलेल्या, लिहिण्यासाठी रेघा असलेल्या आणि खास हस्तलिखिताच्या विविध रंगांच्या कागदावर हे सारं साहित्य पुन्हा सुबक अक्षरांत लिहून काढायचं होतं. लिहून काढायची जबाबदारी पुन्हा माझ्यावर, प्रतिभावर आणि शिवाय हस्ताक्षरस्पर्धेत नेहेमी पहिला येणार्‍या पवनवर होती. त्यातही कुणी काय लिहायचं हेही ठरवायचं होतं. अनुक्रमणिका ठरवायची होती. या सार्‍या पूर्ण झालेल्या लिखाणांच्या शीर्षकांचं चित्रकलेच्या शिरापूरी सरांकडून अख्खं सुलेखन करवून घ्यायचं होतं. शिवाय ज्या पानांवर चित्रं असायची होती, तीही त्यांच्याकडूनच काढून घ्यायची होती. ही चित्रं काय असावीत- ते लिहिणार्‍यांशी आणि सरांशी चर्चा करून ठरवायचं होतं. (नंतर सरांनी 'ते तूच ठरव' असं सांगून टाकल्यावर छान वाटलं होतं).

माझ्या स्वप्नांत अंक आधीच तयार होत होता. शाई आणि कागदांचा गंध मिसळून तयार झालेल्या अनोख्या सुगंधाचं हे रंगीबेरंगी हस्तलिखित संपूर्णपणे आम्ही निर्माण केलेलं होतं. स्वप्नातही मी कुणाला अंकाला हात लावू देत नव्हतो. महत्वाच्या स्पर्धेत जिंकलेल्या एखाद्या चषकासारखा त्याला जपत होतो. जागा झालो की पुन्हा तेच स्वप्न पडायची वाट बघत पांघरुणात स्वतःला गुरफटून घेत होतो.

आमचा अंक प्रत्यक्षातही हळुहळु तयार होत होता, आणि मी त्याचा 'संपादक' होतो!
***

मागच्या वर्षी दादांनी मला 'बालकुंज'च्या संपादकांकडे नेलेलं. मी काय काय बोलायचं आणि विचारायचं ते ठरवून ठेवलेलं. पण त्या भल्यामोठ्या कचेरीतल्या एका खोलीतल्या प्रचंड शिसवी टेबलामागे झुलत्या खुर्चीत बसलेल्या त्या चष्मेवाल्या, धीरगंभीर संपादकांकडे पाहिल्यावर मला भयंकर दडपण आलं. आणि मी संपूर्ण वेळ त्यांच्याकडे फक्त चोरून बघत राहिलो. टेबलावर अनेक हस्तलिखितं त्यांच्या स्पर्शाची आणि त्यांच्याकडून ठरवल्या जाणार्‍या भविष्याची वाट बघत गठ्ठ्यांमध्ये पडून राहिली होती.

नंतर किती तरी दिवस मला ते धीरगंभीर संपादक आणि त्यांच्यावरच्या जबाबदारीचं ओझं आठवत राहिलं. संपादक होण्यासाठी काय करावं - हेही दादांना विचारून झालं. नंतर तोच विषय सरांकडे एकदा हळुच काढला तेव्हा ते म्हणाले, 'त्यासाठी काय डॉक्टर इंजिनियरसारखा कोर्स नसतो. म्हणजे पत्रकारिता वगैरेचा असतो खरा, पण संपादक शेवटी आपल्या अंगभूत गुणांनी आणि उत्तम ते निवडण्याच्या योग्यतेतूनच होता येतं. संपादक म्हणजे एक प्रकारचा रत्नपारखीच असतो बघ. फार व्यासंग, वाचन आणि बुद्धिमत्ता त्यासाठी लागते..'

मग मला वाटलं होतं, तसंच एक दिवस घडलं- मी एक मोठा संपादक झाल्याचं स्वप्न मला पडलं. बरंच मोठं स्वप्न, आणि खूप एकेकांत गुंतलेल्या घटना. पण त्या नीट आठवल्याच नाहीत जागा झाल्यावर. मात्र त्यांचा एकत्र अर्थ एकच होता- मी संपादक झालो होतो.
***

एक दिवस एका टेंपोने राममंदिरासमोर बांबूंच्या भरमसाठ मोळ्या आणि मंडपाच्या कापडांचे ढीग आणून टाकले आणि माझ्या पोटात गोळा आला. ही 'गावगणपती'ची तयारी होती. मी शिरापूरी सरांकडे कडे पळालो. आमची अजून अंदाजे निम्मीच चित्रं काढून झाली होती. त्यांच्याकडे पाहुणे आलेले, आणि वरून मुलगी आजारी. आमच्या हस्तलिखिताचे रंगीत कोरे कागद (त्यांवर कुठे चित्रं काढायची, त्याच्या खुणांसकट) घेऊन मी त्याच्या ओसरीत तासचे तास बसू लागलो. एकदा एका ठिकाणी अर्धं पानभर चित्राऐवजी एक कॉलमात मावेल असं चित्र घ्यावं असं मला वाटलं. कथेची नायिका एक बाई होती. मी शिरापूरी सरांना सांगितलं, 'सर, मोठी नाही, छोटी बाई काढा. कमी वेळ लागेल.' तसे सर उसळून म्हणाले, 'छोटी बाई काढा? तितकाच वेळ लागेल हे माहिती आहे का तुला? चित्रकला म्हणजे खेळ समजता काय लेको? आर्ट आहे आर्ट. तुम्ही आपले दातांत छापखान्याचे खिळे बसवून पोपटपंची करत राहा फक्त..!'

शिरापूरी सर पुढे बरंच बोलत राहिले, तसं मला सावकाश कळलं- हे आपल्याला नसून साळवी सरांना आणि हेडमास्तरांना टोमणे आहेत. हे एकदा कळल्यावर पुढचं जरा सोपं गेलं. मी त्यांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकत राहिलो. एकंदरच शिरापूरी सरांच्या दारात तासचेतास थांबलो, हे तसं एका परीने बरंच झालं. कारण आमच्या अंकाबद्दल बराच विचार मी इथं केला. आमच्या अंकाबद्दलची 'स्पष्टता' याबद्दल साळवी सर आम्हाला कळेल, न कळेलसं कायकाय बोलले होते खरं, पण त्यातलं बरचसं मला इथं कळलं.

गावात सगळीकडे गणपतीचे मांडव उभे राहू लागले,आणि आम्ही रात्री जागून अंकाची पानं डोळ्यांत तेल घालून लिहून काढू लागलो. लिहिताना चुकलात तर नवीन कागदावर नवीन चित्र अजिबात काढून देणार नाही असं शिरापूरी सरांनी दमच भरलेला. प्रतिभाच्या घरी मी हायस्कूलमध्ये आल्यापासून गेलो नसेन इतक्या वेळा मी या एकाच महिन्यात गेलो. तेवढ्यातल्या तेवढ्यात तिनेही भरपूर लहरीपणा करून घेतला. तिच्या कवितेतला एक स्वल्पविराम सुलेखन करताना राहिला म्हणून तिने एकदा भांडणच काढलं. ही स्वतःला बालकवी किंवा केशवसूत वगैरे समजते की काय- असा टोमणा एकदा हेम्याने वैतागून मारलाही. पण आता लक्ष देऊन चालणार नव्हतं. त्या भल्यामोठ्या शिसवी टेबलाच्या अलीकडे मी असा किती दिवस राहणार होतो? आणि टेबलाच्या त्या बाजूला कधी जाणार होतो?

मी शेवटचं चित्र घेऊन शिरापूरी सरांच्या घरून माझ्या घरी आलो तेव्हा रात्र झाली होती. ती रंगीत पानं छातीशी पुठ्ठ्याच्या कव्हरात घेऊन चालताना मी वर बघितलं तर लख्ख चंद्र डोक्यावर आलेला. मला चेव आला. बघ तुला कसा खेळवतो, असं मनाशी म्हणत मी अचानक पळायला सुरुवात केली, तर तोही माझ्यासोबत पाठलाग केल्यागत पळू लागला. नंतर तो अचानक ढगाआड गेला. ढगांचे पुंजके मग रथ झाले, हत्ती झाले, घोडे झाले, शिवाजी महाराज झाले, जगदंबा देवी झाले, जगाचा नकाशा झाले..

घरी आल्यावर मी झोपलो खरा, पण शिरस्त्याप्रमाणे स्वप्न पडणार हे मला आता शहाण्या संपादकाइतकंच छान माहिती झालेलं. मी चंद्र झाकण्यासाठी वर घेतलेले रंगीत कागद बाजूला केले तर काळ्याकरड्या ढगांतून मध्येच चक्क पांढर्या गव्हाळ रंगाची ढेरीच दिसली. तुंदिलतनु. हे असलं कसलं पोट, म्हणून मी हसणार तोवर पोटावर विसावलेली सोंड दिसली. मग सावकाश बदामी डोळे, विचित्र पण छान दिसणारे मोठे कान. फतकल मांडल्यागत घातलेली मांडी. माझी तंद्री लागली. या स्वप्नात इथं आता कथा नव्हती, त्यामुळे उठल्यावर गोष्ट आठवत बसायचा ताण नव्हता, आणि त्यामुळे लिहित बसायचे कष्टही नव्हतेच. होतं फक्त चित्र. आयुष्यभर लक्षात राहील असं.

शिरापूरी सरांना काय म्हणायचं होतं, ते मला साक्षात स्वप्नातच कळलं.
***

आम्ही धापा टाकत कसंबसं काम पूरं करत आणलं आणि चतुर्थीच्या दोन दिवस आधी सारी गोळाबेरीज करायची म्हणून संपादक मंडळ साळवी सरांच्या घरी जमलं. सरांनी सारा अंक नजरेखालून घातला. मग म्हणाले, 'झकास! आता सांगा, मुखपृष्ठाचं काय करायचं?'

मला वीज पडल्यागत झालं. मी सरांकडे बघत राहिलो, मग नंतर बावचळल्यागत इकडे तिकडे बघू लागलो.

अख्ख्या दोन महिन्यांत याचा विचारच केला नाही आपण! अंक आहे आणि मुखपृष्ठ नाही असं कसं होणार? आणि सरांनीही आजवर विषय कसा काढला नाही हा?

चतुर्थीला सार्‍या गावाच्या, लोकांच्या, मुलांच्या आणि पुढार्‍यांच्या समोर अंकाचं 'प्रकाशन' होणार. आणि याला मुखपृष्ठच नाही. आणि मी संपादक!

'संपादक आहेस तू.' साळवी सर कोरड्या करड्या आवाजात म्हणाले, 'उद्याच मुखपृष्ठ तयार झालं पाहिजे. नाहीतर आपला अंक आपण दिवाळीत काढू. म्हणजे तुम्हाला भरपूर वेळ मिळेल.'

मला थंडी वाजल्यागत झालं आणि मी सरांच्या घराबाहेर पडलो. दोन घरं ओलांडून आलो तर तेच पिंजारी काकांच्या घरातले ओळखीचे आवाज आले. मी तिथं थोडावेळ थांबून बघत राहिलो. पांढर्‍या आणि करड्या कापसाच्या ढीगात पिंजारीकाका गुप्त झाले होते. आवाज मात्र तेवढा आला- लगन चाहिये बेटे. सबकुछ होता है. अपने हाथ हिलते है तो मदद करने के लिए भगवान भी आयेगा देखो..

डोक्यात इतक्या विचारांची गर्दी झाली होती, की हा असा त्रास भोगण्यापेक्षा पटकन झोपून जाऊन स्वप्नाची वाट बघणं जास्त सोयीचं होतं. पण तरीही जे व्हायचं तेच झालं. रात्रभरच्या सिनेम्यात काळेकरडे कापसाचे ढीग, काळेपांढरे ढग, गावगणपतीचा भला मांडव, त्यावर छत म्हणून नक्षीची चांदणी, ढगांत दिसणारी सोंड, आणि स्वच्छ पांढरं ढेरपोट.

और सच पुछो तो रुई मे मुझे भगवान दिखता है..
***

सकाळी जागा झालो तेव्हा माझं ठरलं होतं. मी झटपट आवरून शिरापूरी सरांकडे आलो. मला बघून त्यांच्या कपाळाला आठ्या पडल्याच, पण तरीही मी रेटून म्हणालो, 'सर, मुखपृष्ठ आजच करावं लागणार. एक साधंच चित्र काढायचंय गणपतीचं. करड्या-पांढर्‍या ढगांतून दिसणारा गणपती. स्पष्ट असं काही नाही दाखवायचंय.'

'आणि?' शिरापूरी सरांनी कोरड्या आवाजात विचारलं.

खरं तर सर,' मी हिंमत करून आणि खाकरून म्हणालो, 'ते ढग नाहीच्चेत. तो सारा पिंजलेला जुना-नवा पांढरा-करडा असा एकत्र कापूस आहे. त्यातून कळेल न कळेल अशी गजाननाची मूर्ती दाखवायची आहे. सोंड, पोट, दुमडलेले पाय- असे आपसूक पुढे आलेले भाग फुगीर, आणि म्हणून पांढर्‍या स्वच्छ कापसाचे. आजूबाजूला सारा कापूसच आहे खरा, पण त्यातच आपल्या गणपती दाखवायचाय..'

'आणि?' आता शिरापूरी सरांनी आश्चर्याने विचारलं- ते कळतच होतं.

'खरं तर सर,' मी आवंढा गिळून म्हणालो, 'हे एका घरातलं, खोलीतलं दृष्य आहे. हे घरच मुळात त्या कापूसवाल्या पिंजारीकाकांचं आहे. खालच्या डाव्या कोपर्‍याला ते काका तंद्री लावून कापूस पिंजतांना दिसत आहेत. त्यांचे डोळे मिटले आहेत आणि गणपतीचे उघडे. त्यांचे हात चालत आहेत, आणि गजाननाचे स्थिर. त्या काकांना जगाची पर्वा नाही, आणि गजानन सार्‍या विश्वाकडे डोळे लावून बसला आहे. ते काका कापसाच्या तुसांनी जवळजवळ झाकले गेले आहेत, आणि त्यांच्या नकळत बाजूला पिंजलेल्या कापसाचा डोंगर झाला आहे. या कापसात साक्षात गजानन दिसतो आहे..'

सर माझ्याकडे बघत राहिले. मग चटदिशी उठून त्यांनी ड्रॉईंग पेपर आणि पेन्सिल घेतली. त्यांची लांबसडक बोटं झरझर स्केच काढू लागली. काही मिनिटांतच त्यांनी स्केच पूर्ण केलं. मग त्यांनी मला विचारलं, 'असं?'

'यस सर!' मी उत्साहाने म्हणालो, 'अगदी असंच.'
शिरापूरी सर आता कापसाच्या गजाननासारखे गूढ पण प्रसन्न हसले आणि माझ्या पाठीवर थाप मारत ते म्हणाले, 'संध्याकाळी ये. आर्टपेपरवर स्केच आणि रंगवण्याचं काम तोवर पूर्ण होईल..'

मी मग हवेत अलगद तरंगणार्‍या कापसाच्या म्हातारीसारखा तरंगतच घरी आलो. संध्याकाळी सरांकडे पुन्हा गेलो तेव्हा कपाशीतला प्रसन्न गजानन माझ्याकडे बघून गालांत हसत होता. सर आळीपाळीने गणपतीकडे आणि माझ्याकडे बघत होते. आम्ही तिघे, आणि चौथे पिंजारीकाका- असं चौघांचंच एक खास असं स्वप्न चालू असल्यागत वाटत होतं.

आमच्या अंकाचं मुखपृष्ठ खरोखरच तयार झालं होतं. आमचा स्वप्नातला अंक आता प्रत्यक्षात आला होता.
***

मौल्यवान ऐवज असल्यागत आमचं मुखपृष्ठ जपून सरांकडे नेलं, तेव्हा पिंजारीकाका दिसलेच. तोच लयीतला पिंजण्याचा आवाज, तीच समाधी, तीच गूढ अंधारी खोली. मुखपृष्ठ त्यांना दाखवावं असं मला एकदा वाटून गेलं. मी थोडा वेळ त्यांच्याकडे पाहत राहिलो आणि तो विचार रद्द केला. त्यांचं लक्ष माझ्याकडे गेलं आणि त्यांनी जरासं हसत हात केला. 'लगन होनी चाहिए बेटा. फिर सब कुछ कर सकते हो तुम..' असं ते म्हणताहेत असं उगाच मला वाटून गेलं.

शिरापुरी सरांनी केलेलं सुंदर मुखपृष्ठ साळवी सर टक लावून बघत राहिलं. पिंजारीकाकांसारखीच त्यांचीही समाधी लागली- असं मला वाटून गेलं. मग समाधानाने मान डोलवत त्यांनी माझ्या पाठीवर हात फिरवला.

'ग्रेट वर्क. वेल डन संपादक महाशय.' ते मऊ आवाजात म्हणाले. 'आता सांगा. तुमच्या या अंकाचं नाव काय ठेऊया?'

मी सरांकडे बघत राहिलो. मग सावकाश म्हणालो, 'पूर्ती, सर, 'पूर्ती'च ठेऊया आपण नाव.'

साळवी सर आता आधी त्यांच्या नेहेमीच्या लकबीने गालांच्या हाडांवर हात ठेऊन नाक तोंड झाकून आधी खुदुखुदू आणि मग नंतर मोठ्याने हसले. माझ्या केसांतून त्यांनी हात फिरवला.

मी पुन्हा गजाननाकडे बघितलं तर तोही त्या कपाशीतून मंद स्मित करत कापसाच्या मऊसूत हातांनी माझ्या डोक्या-चेहर्‍या-खांद्या-पाठीवरून हात फिरवत होता. आमचे हेडमास्तर, शिरापुरी सर, साळवी सर, प्रतिभा आणि तिच्या मैत्रिणी, आमचे सारे लिहिणारे-न लिहिणारे टारगट मित्र हे सारे मिळून माझ्यासमोर एक भलंमोठं शिसवी टेबल हलवीत होते.

मी तर तसा लख्ख जागा होतो, पण आता हे नक्कीच स्वप्न असावं.
***
*****

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

अप्रतिम ! शाळकरी मुलाचं भावविश्व आणी पिंजारीकाकांबरोबर त्याच जुळलेलं नातं सुरेख चित्रीत केलयं
वेगळ्या विषयावरची एक सुंदर कथा

वाहव्वा, इथे तर मेजवानी सुरू आहे एकाहून एक सरस लेखांची.
फार्फार सुंदर लिहिले आहे, गुंगायला झालं वाचताना, स्वप्नात असल्यासारखे.

फारच सुंदर.
माझ्या शाळएचंही हस्तलिखित असायचं ते आठवलं. चांगलं अक्षर होतं त्यामुळए बरंच लिहिलं.

खूप सुंदर कथा लिहिली आहे साजिरा तुम्ही.
वाचताना कधी लिखाणाशी एकरूप झाले आणि थोडे गलबलून आले ते कळलेच नाही.

खूप सुंदर लिहिले आहे तुम्ही.. एकदम गुंगवून ठेवलं.... पिंजारीकाका आणि कापसातला गणपती एकदम डोळ्यासमोर चित्र आले..

वा, खूप सुरेख! फार आवडलं ! गरवारेला असताना दर वर्षी प्रत्येक वर्गाचं एक हस्तलिखित असायचं त्याची आठवण झाली. सेम तेच रंगीत पानं, सुवाच्य अक्षर असलेल्या मुला मुलींकडून त्यावर लिहून घेणे वगैरे. एक वर्ष मलाही संपादक व्हायला मिळालं होतं Happy त्यामुळे जास्तच रिलेट झाला हा लेख.

वाह, साजिरा! काय सुरेख कथा.

डोंबिवलीत आमच्या बालवाचनालयातर्फे उन्हाळ्याच्या सुटीत हस्तलिखित निघत असे. त्याची धामधूम दोन वर्षं आमच्या घरी होती. ते दिवस आठवले. दुपारी ठिय्या देऊन रंगित कागदांवर कोरून कोरून लिहायचो. प्रत्येक पानाला नक्षीची चौकट करायची. आतली चित्रंही आम्ही काढत असू. कसलं भारी वाटायचं हे सर्व करताना.

Very nice.
Is there any photo of the cover page? Please share it with us.

सुंदर! मंत्रमुग्ध.

लिहिताना चुकलात तर नवीन कागदावर नवीन चित्र अजिबात काढून देणार नाही असं शिरापूरी सरांनी दमच भरलेला. <<<
तुम्ही हस्तलिखित अंक काढणार आहात, हे वाचल्यावर अगदी रंगभूमीवर सगळ्या गोष्टींचा अचूक मेळ साधून एकाच 'टेक' मध्ये यशस्वी प्रयोग सादर करण्यासारखे कठीण वाटले. Happy

जबरदस्त ! फारच सुंदर कथा.
आमच्याही शाळेत हस्तलिखित असायचं दरवर्षी. त्याचीच आठवण झाली.

जरा नियमीत लिहित जा रे!

सुंदर लिहिलंय.पिंजारी काकांना दाखवला की नाही अंक?मला नेहमी प्रमाणे फोटो हवासा वाटला, पण त्या काळ चा फोटो नसेल कदाचित.

सगळ्या मित्रांना थँक्स! तुमच्या प्रतिक्रिया फार महत्वाच्या आहेत लोकांनो Happy

पिंजारी काकांना दाखवला की नाही अंक?
>> अर्थातच नाही. त्यांची समाधी भंगली असती. आणि मग बॅक टू फ्युचर जाऊन गणपतीच मुखपृष्ठावर यायला नकार देता, तर संपलंच असतं सारं.

फोटो
>> अर्थातच नाही. हे सारं असंच घडलं असेल असं मी म्हणू शकत नाही. पण हे सारं असंच घडलं नसेल असं मी अजिबात नाही म्हणू शकत. Happy

जरा नियमीत लिहित जा रे!
>>>
वारंवार लिहित जा.
>>>
ते लिहितच असतो की रे. सारं तयार आहे बघ. इथं लिहून काढायचंय फक्त इतकंच. Proud थँक्यु भावांनो.

'हस्तलिखित अंक' एक सॉलिड गंमत होती. ती एक्स्पायर होऊन केवढा जमाना झाला. पण आता प्रिंट झालेल्या आपल्या लिखाणापेक्षाही कितीतरी जास्त व्हॅल्यू असलेली अशी ही गोष्ट होऊन बसली, त्याशी इतके लोक रिलेट करतील असं नव्हतं वाटलं.. Happy

पण त्याहीपेक्षा महत्वाचं एक रिलेशन असेल कदाचित. मायबोलीवर संयोजक, संपादक झालेल्यांची, आणि त्यानंतर झडझडून काम करणार्‍यांची अनेकांची आपापली 'कहाणी' आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. कितीही छोटं, भोळं आणी साधं असलं तरी प्रत्येक स्वप्न आपापल्या परीने त्या त्या वेळी अप्राप्य, आणि म्हणून महत्वाचं असतं- असं हे सारे संयोजक आणि संपादक नक्की सांगतील असंही वाटतं. Happy

एकाच 'टेक' मध्ये यशस्वी प्रयोग सादर करण्यासारखे कठीण वाटले.
>>
अगदी अगदी गजाभाऊ! Happy

सगळ्यांना थॅंक्स पुन्हा एकदा..

साजिरा , खूप छान लिहिलं आहेस. बर्‍याच दिवसांनी मायबोलीवर तुझं लेखन वाचायला मिळालं ! सुरुवातीचं शाळेचं वातावरण इतकं छान लिहिलं आहेस. मला माझीच शाळा आठवली.
>पण त्याहीपेक्षा महत्वाचं एक रिलेशन असेल कदाचित. मायबोलीवर संयोजक, संपादक झालेल्यांची, आणि त्यानंतर झडझडून काम करणार्‍यांची अनेकांची आपापली 'कहाणी' आहे, हे मी खात्रीने सांगू शकतो. कितीही छोटं, भोळं आणी साधं असलं तरी प्रत्येक स्वप्न आपापल्या परीने त्या त्या वेळी अप्राप्य, आणि म्हणून महत्वाचं असतं- असं हे सारे संयोजक आणि संपादक नक्की सांगतील असंही वाटतं
वा ! लाखाचं बोलला आहेस !

Pages