अमेरिकन किचन

Submitted by नीलिमा क्षत्रिय on 21 August, 2021 - 13:20

'दिवस अमेरिकेचे' ह्या माझ्या पुस्तकातला काही भाग...
लेखिका:नीलिमा क्षत्रिय
इथल्या किचनमधे स्वयंपाक करणं म्हणजे एक दिव्यच असतं..आपल्याला ऐसपैस दगडी ओट्याची सवय असते..कितीही पसारा करा, कितीही पाणी सांडा, गरम भांडे कुठेही बिनधास्त ठेवा..भारतीय नारी सारखा प्रचंड सहनशील असतो आपला ओटा...पण अमेरिकन ओट्याचं म्हणजे श्रीमंताची पोरगी नांदायला आल्यासारखं... काहीच सहन होत नाही, अन् काहीच जमत नाही .. ह्या ओट्याचं एक वैशिष्ट्य म्हणा किंवा वैताग म्हणा...हा धुता येत नाही..
दुसरी गोष्ट, इथलं किचन म्हणजे एका छोट्याशा तुकड्या सारखं असतं...बाथरूम सारखं...म्हणजे माझ्या मुलीकडे तरी असंच होतं. घरं चांगली प्रशस्त असतात, पण किचनच्या बाबतीत का इतका आकस ते अमेरिकनच जाणो....एक बाई ( किंवा बाबा) एकटीच वावरू शकेल इतपतच किचन चा आवाका असतो...
बहुतेक एकमेकाच्या समोरासमोर असे दोन किचन टॉप्स असतात..एका टॉपखाली ओटीजी, एका टॉपखाली डिशवॉशर असतो. डिशवॉशरच्या वर, बाजूला सिंक असतं..सिंकमधे गार गरम पाण्याची सोय असते. नळ उजवीकडे फिरवला की गार पाणी डावीकडे फिरवला की गरम...सिंकमधलं ग्राइंडर हे भारतातून गेलेल्या आई.. सासू ... ह्या जिवांसाठी नवलाईची गोष्ट...सगळं उष्टं खरकटं त्याच्यात बारीक होऊन वाहून नेण्याची ही उत्तम सोय.. ..टॉपच्या वर-खाली कपाटंच कपाटं असतात...एका कोप-यात भल्ला मोठा फ्रीज असतो.. त्याच्या आकारा प्रमाणेच त्याचा आवाजही मोठा असतो.. आणि हॉलमधे झोपणा-या पाहुण्यांना तो दोन तीन महिन्यात जेरीस आणतो..सगळीकडे बहुतांशवेळा पांढरा रंगच वापरलेला असतो. विशेष म्हणजे असं असूनही ते किचन ब-यापैकी स्वच्छ रहातं. म्हणजे ठेवावंच लागतं
आता हे जे टॉप्स असतात ते साधारणपणे दहा फुटांचे असतात..आणि मुख्य म्हणजे लाकडी असतात..त्यावर अॅक्रॅलिकचं आवरण असतं..त्यामुळे त्यावर गरम वस्तू ठेवता येत नाही.त्या दहा फुटांपैकी एका बाजूला तीन फूट जागा फ्रिज व्यापतो. म्हणजे राहिले सात फूट..पैकी तीन फूट जागा कुकींग रेंज खातो..राहिले चार फूट ..त्या चार फुटात बसवा पोळपाट लाटणं, पिठाचा डबा, पोळ्यांचा डबा...आणि करा स्वयंपाक...त्यात कॉईलचं कुकींग रेंज असेल तर त्या आईचं - सासूचं भारतातून निघतानाच अभिनंदन करावं...पंधरा दिवस तर सगळा आनंदच स्वयंपाकाचा...आपण कसं...भांडं ठेवतो, गॅस पेटवतो की दुस-या मिनिटाला भांडं तापलेलं असतं. लगेच तेल, लगेच..मोहरी..मीठ मसाला..भाजी भांड्यात भिरकावली की टाकलं झाकन पालथं, गॅस बारीक केला की तोपर्यंत घरात गरका मारून दोन कामं हातावेगळी...पण इथे...भांडं ठेवून आपण कुकींग रेंजचं बटण दाबलं की ती कॉईल दमादमानं गरम होऊ लागते..आपण बघsssत बसा.. कॉईल तापून भांडं गरम होईपर्यंत दोन तीन मिनिटं जातात, दोन मिनिटात भाजी फोडणीला टाकून मोकळं होणा-या गृहिणीला हे दोन मिनिटं दोन युगांसारखे भासतात...दोन मिनिटांच्या ह्या प्रतिक्षेत पुढचा सगळा स्वयंपाकाच्या स्पीडचा टेंपोच निघून जातो...आणि आपण एकदम थंड पडून जातो..आपल्या स्वयंपाकाच्या मूडची अशी ऐशी तैशी करून झाली की मग ते अमेरिकन कुकींग रेंज एकदाचं तापतं...तोपर्यंत आपण एकटक त्या तापायला ठेवलेल्या भांड्याकडे बघत असतो...आणि मग एखाद्या मिनिटात आपली तंद्री लागते...भांडं गरम होऊन जातं तरी आपल्या लक्षात येत नाही.. लक्षात आल्यावर आपण घाईघाईने त्याच्यात तेल टाकतो ..पण तो आगीत तेल ओतण्याचा प्रकार होतो..भांड्यावर दुस-याच क्षणाला धूराची वावटळ घोंगावताना दिसते. आपण पट्कन कॉईलचं बटन बंद करतो...पण कॉईल जशी तापायला वेळ घेते तशीच गार व्हायला पण वेळ घेते..आपल्या अंदाजाप्रमाणे परिस्थिती निवळण्यापेक्षा जास्तच चिघळते..आणि तो धूर मग फायर अलार्मच्या नाकाला चांगलाच झोंबतो आणि तो मग 'टीटीव टीटीव' करून निषेध नोंदवतो. तोपर्यंत आपली 'अमेरिकन मुलगी/ जावई..मुलगा/ सून' जे कोणी असतील ते धावत येतात...आपण जो काही राडा कॉइलवर करून ठेवलेला असेल तो निस्तरतात..आणि धूर पांगवून फायर अलार्मला आधी गप्प करतात...त्यानंतर मुलगी/ सून भाजीचं पुढचं क्रियाकर्म उरकते, आणि जावई/ मुलगा आपल्याला समोर बसवून आपलं बौद्धीक घेतात..कुकींग रेंजच्या निमित्ताने ईतरही अनेक नियम कायदे कानून आपल्याला जतवले जातात. आपण नुसतं गुबूगुबू...ह्यातून आपण एकच धडा शिकतो की भारतातला आपला स्वयंपाकाचा स्पीड विसरून जाणे, आणि गोगलगाय धोरण अंगिकारणे उत्तम..
इकडे कूकर लावलाय, तिकडे भाजी फोडणीला टाकलीये, कणिक मळणं चालू आहे, खांद्यात आणि कानाच्या सापटीत मोबाईल पकडलाय...मायक्रोवेव्ह मधे शेंगदाणे भाजायला टाकलेत...असं पाककौशल्य इथे दाखवू म्हणता शक्यच नाही...त्यात फायरअलार्मचा धाक, कॉईलचा धाक, पायात ते ‘बालभूईचक्र’ ...त्यात भर म्हणून घरातल्या अमेरिकन्सचा धाक...
पोळ्या करणं आणखीन वेगळंच दिव्य.. चार कॉईल्स पैकी दोन लहान आणि दोन मोठ्या असतात.. आपण पटपट पोळ्या उरकून टाकाव्यात म्हणून मोठी कॉईल निवडतो. तवा ठेवतो..चार कॉइल्सची चार बटणं असतात. कॉईलचं बटन सुरू करतो, जे कॉईलखाली नसतं तर रेंजच्या मागे असलेल्या पँनल वर असतं. बाकीच्या कॉईल्स पैकी एकावर कूकर असतो, एकावर भाजी, एकावर तवा आणि एक रिकामी असते...त्या रिकाम्या कॉईलवर आपण पोळ्यांचा कॅसेरोल मांडतो..म्हणजे आता त्या चार फुटाच्या तुकड्यात आपण पोळपाट आणि पोळीला लावायच्या पिठाचा डबा जरा मोकळा ढाकळा ठेवतो.. एखाद्या मिनिटात पोळी लाटून होते, तवा तापला की नाही त्याचा आपण सवयीनं . निसटता हात फिरवून अंदाज घेतो, पण तवा थंडगार...तापेल तापेल..आपण तंद्री लावून उभे रहातो आणि अचानक कॅसेरोल खालून धूर यायला लागतो..बरोबरच आपल्या कानातून, नाकातून, जमलंच तर तोंडातूनही धूर येतोय असं वाटायला लागतं. आपण चुकून भलत्याच कॉईलला बत्ती दिलेली असते....
पुन्हा 'अमेरिकन मंडळी' परिस्थिती हातात घेतात..ह्या प्रसंगी आता एक कॅसेरोल धारातिर्थी पडलेला असतो..आपल्याला भयंकर कांडल्या कोंडल्यासारखं होऊन जातं..आपण धीर एकवटून पुन्हा पोळ्या प्रकरण हाताळायला घेतो. मघाची लाटलेली पोळी मोडून नवा गडी नवा राज म्हणत पुन्हा पोळी लाटतो...आता कुकींग रेंज वरची तव्या खालची कॉईल व्यवस्थित तापलेली आहे ह्याची खात्री करून पोळी तव्यावर पोहचवतो. कॉईल जास्त तापलेली असते.. पोळीला एका सेकंदात देवी याव्यात तसे व्रण येतात...घाईघाईत आपण उचटण्याने ती पोळी उचकून उलटावी, तोच आपल्या मागून अमेरिकन सूचना, "कोटींगच्या तव्याला लाकडी उचटणं घे ना, खराब होईल ना तो तवा, एकतर इथे मिळत नाही चांगले तवे".
"गुबूगुबू".. आपण.
मग लाकडी स्पॅचुला आपल्या हातात देऊन लेक अंतर्धान पावते. तोपर्यंत पोळीचा अवतार अत्यवस्थ देवीच्या रोग्यासारखा होतो.."पहिलं दान देवाला" असं म्हणून आपण परत दुस-या पोळीच्या मागे लागतो. दुसरी पोळी खूपच सावधानी बाळगून तव्यावर येते.... पोळीला पुन्हा देवी येऊ नयेत म्हणून कॉईल जरा सिम केलेली असते..दुसरी पोळी लाटून होते...पण आधीची पोळी आता कोमात गेल्यासारखी नुसतीच पडून, प्रकृतीत काहीच फरक नाही..मग लक्षात येतं की कॉईल सिम होण्याऐवजी ऑफच झाली आहे..पुन्हा कॉईल ऑन, पुन्हा दोन मिनिटांचं ध्यान..पुन्हा निकराचा लढा, असं करत करत कशातरी सात आठ पोळ्या डब्यात गोळा होतात...पण सगळ्या वेगवेगळ्या..सख्खं तर सोडा चुलतचुलत पण नातं नसल्यासारख्या....हे सगळं होत असताना लेकीने पलिकडे बेडरूममधे कपड्यांचं कपाट आवरायला काढलेलं असतं..बारकं भूईचक्र कपाटातलं सामान किचनमधे आणि किचनमधलं सामान कपाटात ठेवण्याच्या उद्योगात असतं..पोळी शेकेपर्यंत लाटणं गायब होऊन कपाटातल्या कपड्यांमधे जाऊन बसतं, कपाटाच्या किल्ल्या परातीत येऊन पडतात..एकीकडे ‘पोली कलायची’ म्हणून कणकेची मागणी करणारा बालहट्ट, आपल्या स्वेटरला लटकणं चालू असतं....आपल्याला आता अशा दहशतभ-या, भिरभि-या वातावरणाची सवय राहिलेली नसते..घरी ज्या शांततेला आपण 'घर खायला उठणं' म्हणतो..ती शांतता हवीहवीशी वाटू लागते. आपल्याला भारतातलं घर आठवायला लागतं. कामाला येणारी बाई आठवते, तिच्याशी आपण किती दुष्टपणे पेश येतो.

मो.8149559091
©® ✍नीलिमा क्षत्रिय

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

>>‘बालभूईचक्र’ मला अजूनही कळले नाही.<< +१
मला तर ते "गुबूगुबू" पण कळलं नाहि. नंदिबैलाशी संबंधित आहे काय?

मजेदार लेख.

गुबुगुबु आणि बालभुइचक्र मलाही कळलं नव्हतं. प्रतिसादातून कळलं.

लेखात परिच्छेद नीट दिले तर वाचण्यास सोपे होईल.

छान लिहिले आहे. जुने दिवस आठवले.
राहिले चार फूट ..त्या चार फुटात बसवा पोळपाट लाटणं..>>> हा हा…माझ्या कुकिंग रेंज जवळ २*२ फूटच जागा होती.
बरीच घरे बदलावी लागली त्यामुळे कॅाईल, इंडक्शन, गॅस सगळे वापरले. प्रत्येकवेळी अंदाज येईपर्यंत काहीतरी गडबड व्हायचीच.

Pages