श्रीशिव मानस पूजा (मालिनी वृत्त ), भावानुवाद

Submitted by पुरंदरे शशांक on 23 August, 2021 - 00:32

श्रीशिव मानस पूजा ( मालिनी वृत्त ) भावानुवाद

जडवुनि बहु रत्ने आसना कल्पुनीया
हिमजल तव स्नाना आणिले देवराया

वसन तलम तैसे दिव्यरत्नादिकांचे
मृगमद मिसळीले गंध ते चंदनाचे

विपुल सुमन जाई चंपके बिल्वपत्रे
उजळित वरी पाही दीप का धूपपात्रे

पशुपति शिव देवा कल्पुनी अर्पितो हे
ग्रहण तरि करावे प्रार्थितो नम्रभावे

कनक सहित रत्ने पात्र हे शोभियेले
घृत पय दधि युक्ते पायसे आणियेले

रुचकर जल तैसे नागवेली विशिष्टे
करपूर वरी खंडे तांबुला स्वाद देते

अतिव विनित भावे अर्पितो सर्व काही
हर हर शिवनाथा स्वीकृती सार्थ व्हावी

धरु शिरी तव छत्रा, स्वच्छ त्या दर्पणाते
चवर उभय बाही विंझणा त्वत्सुखार्थे

विपुल मधुर वाद्ये तोषवूया शिवाला
करीत सहज नृत्ये देत पख्वाजताला

नमन शिरसी तैसे गात का स्तोत्र पाही
सकल स्मरणमात्रे अर्पितो भाव पाही

मति तरी गिरीजा, तू आत्मया शंभूनाथ
सहचर तरी प्राणे देह देवालयात

विषय सकल जे जे भोगितो तीच पूजा
म्हणत निजसमाधी मी निजे त्यांच वोजा

भ्रमण सकल पायी थोर प्रादक्षिणेचे
वचन सकळ सारे स्तोत्र ते त्वत्स्तुतीचे

सकळ सहज कर्मे देह-वाङ् -मानसांची
हर हर हर शंभो होत आराधनाची

कर चरण तसेचि नेत्र कर्णादी पाहे
मन वरी वचनांनी गैर जे होत जाये

विहीत अविहितादी नाही ते येत ध्याना
शिर लवून क्षमस्वे प्रार्थितो त्वत्पदांना

जयजय शिवनाथा वर्षवी कृपादाना
नमन सकळभावे याचितो लेश जाणा

श्री महादेवांचरणी प्रेमभावे शिर साष्टांग दंडवत

..............................................
मृगमद....कस्तुरी
कनक.....सुवर्ण
पायस....खीर
नागवेल...विड्याचे पान
तांबूल....विडा
चवर...चामर. गाईच्या शेपटीच्या केसांची असतात. राजा...महाराजांच्या काळात वाईट शक्तींना दूर लोटण्यासाठी वापरत असत.
विंझणा....छोटे हातपंखे
....................................................................................

मूळ स्तोत्र

रत्नैः कल्पितमासनं हिमजलैः स्नानं च दिव्याम्बरं

नानारत्नविभूषितं मृगमदामोदाङ्कितं चन्दनम्।

जातीचम्पकबिल्वपत्ररचितं पुष्पं च धूपं तथा

दीपं देव दयानिधे पशुपते हृत्कल्पितं गृह्यताम्॥१॥

सौवर्णे नवरत्नखण्डरचिते पात्रे घृतं पायसं भक्ष्यं

पञ्चविधं पयोदधियुतं रम्भाफलं पानकम्।

शाकानामयुतं जलं रुचिकरं कर्पूरखण्डोज्ज्वलं ताम्बूलं

मनसा मया विरचितं भक्त्या प्रभो स्वीकुरु॥२॥

छत्रं चामरयोर्युगं व्यजनकं चादर्शकं निर्मलम्

वीणाभेरिमृदङ्गकाहलकला गीतं च नृत्यं तथा।

साष्टाङ्गं प्रणतिः स्तुतिर्बहुविधा ह्येतत्समस्तं मया

सङ्कल्पेन समर्पितं तवविभो पूजां गृहाण प्रभो॥३॥

आत्मा त्वं गिरिजा मतिः सहचराः प्राणाः शरीरं गृहं

पूजा ते विषयोपभोगरचना निद्रा समाधिस्थितिः।

सञ्चारः पदयोः प्रदक्षिणविधिः स्तोत्राणि सर्वागिरो

यद्यत्कर्म करोमि तत्तदखिलं शम्भो तवाराधनम्॥४॥

करचरण कृतं वाक्कायजं कर्मजं वा

श्रवणनयनजं वा मानसंवापराधम्।

विहितमविहितं वा सर्वमेतत्क्षमस्व

जय जय करुणाब्धे श्रीमहादेवशम्भो॥५॥

॥ इति श्रीमच्छङ्कराचार्यविरचिता शिवमानसपूजा संपूर्ण॥

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाह वाह!!! अतिशय प्रासादिक.
>>>कर चरण तसेचि नेत्र कर्णादी पाहे
मन वरी वचनांनी गैर जे होत जाये

विहीत अविहितादी नाही ते येत ध्याना
शिर लवून क्षमस्वे प्रार्थितो त्वत्पदांना

क्या बात है!! पाठ करावे असे स्तोत्र.

मूळ स्तोत्र तर आवडतेच, भावानुवाद ही आवडला. अतिशय गेय व लयबद्ध जमले आहे , खूप सुरेख !

श्री महादेवांचरणी प्रेमभावे शिर साष्टांग दंडवत >>>
_/\_