एल्विस प्रिस्ले - द किंग ऑफ रॉक

Submitted by बाख on 15 August, 2021 - 23:23

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नरेंद्र मोदी यांना रॉक स्टार एल्विस प्रिस्ले या नावाने संबोधले. अभिनेते शम्मी कपूर याना हिंदी सिनेमा सृष्टीचे एल्विस प्रिस्ले म्हंटले जायचे.स्कॉट मूरहेड नावाच्या अमेरिकन संगीतकाराने "ही इज माय एल्विस (प्रिस्ले)" असा सुप्रसिद्ध सूफी गायक नुसरत फतेह अली खान यांचा गौरव केला.

एल्विस द पेल्विस या जगद्विख्यात नावाने ओळखला जाणारा किंग ऑफ द रॉक एल्विस अरोन प्रिस्ले अमेरिकेत जन्माला आला नसता तर हिंदी सिनेमातील अभिनेता शम्मी कपूर त्याचा पुतण्या राजीव कपूर प्रमाणे केंव्हाच विस्मृतीत गेला असता.

शम्मी कपूरचे सुरुवातीचे चित्रपट आपटले आणि त्याला कळून चुकलं की राज,देव आणि दिलीप या त्रिकुटीच्या राज्यात आपलं स्थान टिकवून ठेवायचं असेल तर आपल्याला काही तरी वेगळं केलं पाहिजे. इथेच एल्विस त्याचा स्फूर्तिदाता झाला. एल्विसच्या हालचाली, नृत्य करण्याची शैली, त्याची गाणे सादर करण्याची पद्धत शम्मी कपूरने सही सही उचलली आणि बॉलीवूडचा किंग ऑफ रॉक जन्माला आला. शम्मीची लोकप्रियता वाढू लागली आणि कालांतराने तो एक "सेलेबल स्टार" झाला. फरक एवढाच की एल्विस स्वतः गायचा तर शम्मी कपूर साठी रफी साहेब गायचे.

५ जून १९५६ रोजी एल्विस प्रिस्ले यानं स्टेज वर "हाऊंड डॉग" सादर करताना जो अंग विक्षेप केला त्यानं प्रेक्षकांना अक्षरशः वेड लावलं. त्याच वेळी त्याला एल्विस द पेल्विस ही उपाधी मिळाली. मायकेल अँजेलो किंवा रोदँने घडविलेलं एखाद्या देखण्या पुरुषाचं कोरीव शिल्प असावं असा दिसणारा सहा फुटी एल्विस तरूण तरुणींच्या गळ्यातला ताईत बनला. त्याचा स्टेज वरचा सहज वावर, मोठया कॉलरचे शर्टस्, पांढऱ्या रंगाचा जंप सूट, मोठया आकाराचा बेल्ट, हातात गिटार धरण्याची शैली, त्याचे कटाक्ष, मिठ्ठास बोलणं, हजरजबाबी व्यक्तीमत्व याची जादू अमेरिकन जनतेला एवढी भावली की पाहता पाहता एल्विस एक आयकोनिक गायक बनला. नुसता गायक नसून एक कुशल संगीतकार आणि उत्तम अभिनेता अशी त्याने ख्याती मिळवली.

आपल्या ४२ वर्षाच्या आयुष्यात जगातलं संगीत विश्व ढवळून टाकणाऱ्या एल्विसनं अनेक मान दंड प्रस्थापित केले आणि न भूतो न भविष्यती अशी कामगिरी केली. विसाव्या शतकातील संगीताला नवीन दिशा देणाऱ्या महान संगीत कारांची यादी एल्विस या नावाशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. रॉक अँड रोल जगभरात नेणारा एल्विस विसाव्या शतकातील एक लोकप्रिय गायक. त्याची जादू अजूनही संपली नाही. अमेरिकेतील नव्वद टक्के जनता एल्विस शब्द उच्चारला की अजूनही इमोशनल होते.

मिसिसिपी राज्यातल्या टपेलो इथे अत्यंत गरिब कुटुंबात जन्मलेल्या एल्विसला त्या वेळच्या ग्रेट डिप्रेशन (जागतिक मंदी) मुळे आर्थिक विवंचना भेडसावत असे. दर रविवारी त्याला घेऊन त्याचे आई वडील चर्च मध्ये जात असत. तिथे चर्च मध्ये गायले जाणाऱ्या गॉस्पेल संगीताशी त्याची ओळख झाली. आठ वर्षाच्या एल्विसला आईने गिटार आणून दिले. ती गिटार मग त्याच्या आयुष्याचा अविभाज्य भाग बनली.

१३ वर्षांचा असताना एल्विस आणि त्याचे आई वडील टपेलो सोडून मेम्फिसला स्थलांतरित झाले. तिथे शिक्षण पूर्ण झाल्यावर एल्विस ट्रक ड्रायव्हर म्हणून काम करू लागला. त्याच्या येण्याजाण्याच्या वाटेवरच 'मेम्फिस रेकॉर्डिंग कंपनी'चा स्टुडिओ होता. एके दिवशी एल्व्हिसनं आपला ट्रक या स्टुडिओ जवळ थांबवला. सोबत गिटार होतीच. त्याला आपल्या आईच्या वाढदिवसाला स्वत:च्या आवाजात दोन गाणी गाऊन, ती रेकॉर्ड करून तिला भेट द्यायची होती. तो स्टुडिओत शिरला. गाणी रेकॉर्ड झाल्यावर एल्विस घरी गेला. ज्या माणसाने गाणी रेकॉर्ड केली त्याने ती गाणी "सन् रेकॉर्डस कंपनी"चा मालक सॅम फिलिप्स याला ऐकवली. आठच दिवसात फिलिप्सने एल्विसला स्टुडिओत बोलावून " दॅट्स ऑल राईट ममा " हे त्याचे गाणे परत रेकॉर्ड केले. दोन दिवसा नंतर त्याचं हे गाणं तिथल्या रेडिओ वर प्रसारित झालं. या गाण्याला प्रचंड प्रतिसाद मिळाला. लोकांनी रेडिओ स्टेशन वर फोन करून हेच गाणे पुन्हा पुन्हा लावायला सांगीतले. काही जणांनी तर हा गायक कृष्ण वर्णीय आहे काय असा ही प्रश्न विचारला. त्या रात्री एल्विसची पहिली मुलाखत घेण्यात आली. गाण्याची रेकॉर्ड बाजारात येण्यापूर्वीच ५ हजार रेकॉर्डची आगाऊ मागणी नोंदवली गेली. रेकॉर्ड बाजारात आल्यावर २० हजार रेकॉर्ड्स् बघता बघता संपल्या. हा प्रचंड प्रतिसाद बघून 'सन् रेकॉर्डिंग कंपनी'नं त्याच्याबरोबर 3 वर्षांचा करार केला.

एल्विस आता नॅशनल फिगर झाला होता. लवकरच त्याला हॉलिवूडचे दरवाजे खुले झाले. १९५७ साली त्याचा जेलहाऊस रॉक नावाचा चित्रपट प्रसिद्ध झाला आणि त्यातलं शीर्षक गीत जेलहाऊस रॉक तुफान गाजलं. The 500 Greatest Songs of All Time यादीत या गाण्याचा समावेश करण्यात आला.

अमेरिकेत त्याकाळी २१ ते ३६ या वयोगटातील पुरुषांना लष्करी सेवा सक्तीची होती. एल्विसने १९५८ ते १९६० अशी लष्करी सेवा केली. लष्करातून आल्यावर १९६१ मध्ये त्याचा ब्लू हवाई हा चित्रपट प्रदर्शित झाला आणि त्यानंतर २७ चित्रपट, अनेक अल्बम, लाइव शो, म्युझिकल टुर्स, यात तो गुंतला. १९७३ या वर्षात त्याने जवळ जवळ दोन दिवसाला एक असे १६८ लाईव्ह शो केले.

१६ ऑगस्ट १९७७ पर्यन्त एल्विस ने ६०० गाणी म्हटली. त्यात रॉक, पॉप, कंट्री, ब्लूज, गॉस्पेल, रिदम अँड ब्लू अशी अनेक प्रकारची गाणी होती.त्याच्या सुवर्ण काळात त्याची गाणी,
चित्रपट आणि व्यक्तिमत्त्व यांची जादू जगभर पसरली. "मिस्टरी ट्रेन', 'कान्ट हेल्प फॉलिंग इन लव, 'आर यू लोनसम टु नाइट', 'आय नीड युवर लव टू नाइट', 'केंटकी रेन',
'अ लिट्ल लेस कॉन्व्हर्सेशन,'कान्ट हेल्प फॉलिंग इन लव', 'हार्टब्रेक हॉटेल', 'आय वॉन्ट यू, आय नीड यू, आय लव यू', 'से इट्स नॉट यू', 'डोंट बी क्रुएल', 'हाउंड डॉग', 'लव मी टेंडर,
'टू मच, 'ऑल शुक अप', 'टेडी बिअर',
जेलहाउस रॉक', 'हार्ड हेडेड वूमन', 'स्टक
ऑन यू', 'सस्पिशिअस माइंड्स', 'मूडी ब्ल्यू," ह्या त्याच्या गाण्याची लोकप्रियता अजूनही टिकून आहे.

एल्विसने संगीताच्या क्षेत्रात क्रांती केली.त्याने अमेरिकन संगीताचा बाजच बदलून टाकला. त्याचा प्रभाव नंतर आलेले मॅडोना, जॉर्ज मायकेल, एमिनेम, जस्टीन टिंबरलेक अशा अनेक गायकांवर पडला आहे. ब्लूज संगीत एल्विसच्या प्रभावातून बाहेर पडू शकत नाही. ब्लूज संगीत कृष्णवर्णीय लोकांचं पण या गोऱ्या व्यक्तीने ते आपलंसं केलं. म्हणून तो कृष्णवर्णीय लोकांनाही आपलासा वाटतो. काळया आणि गोऱ्या लोकांमधील दरी मिटवणारी व्यक्ती म्हणून एल्विस कडे पाहिले जाते. १९५० च्या दशकात रिदम अँड ब्लूज गाणारे सर्व कृष्ण वर्णीय अफ्रो- अमेरिकन होते. गोरा एकमेव फ्रँक सिनात्रा होता. पण एल्विसने या संगीताचा ताबा घेतला आणि संगीत विश्व ढवळून काढून त्यात आमूलाग्र परिवर्तन केले.

१६ ऑगस्ट १९७७ रोजी एल्विस ने जगाचा निरोप घेतला. त्याच्या पोस्ट मोर्टेम मध्ये ड्रग्स सापडले. त्याला निरोप देण्यासाठी हजारो चाहत्यांनी गर्दी केली.लोकांच्या ओठी आजही एल्विस हे नाव आहे. त्याच्या अल्बम्सची विक्री दर वर्षी वाढत जाते दीडशे कोटी पेक्षा जास्त
संख्येनं त्याच्या अल्बम्सची विक्री झालेली आहे. एल्विस प्रिस्ले या विषयावर दीड दोनशे पुस्तकं प्रकाशित झाली आहेत.

एल्विसच्या संगीताचा बॉलिवूडवर प्रभाव आहेच. 'झुक गया आसमान' हा हिंदी सिनेमा त्यातील कौन "है जो सपनोमे आया" हे राजेंद्र कुमार यांच्यावर चित्रीत केलेल्या आणि रफी साहेब यांनी म्हटलेल्या गाण्यासाठीच आठवतो. हे गाणे एल्विसच्या "फन इन अकापुल्को" या चित्रपटातील "मार्गारिटा" ह्या गाण्याची सही सही नक्कल आहे.

२०१८ साली अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी त्याला 'प्रेसिडेन्सीअल मेडल ऑफ फ्रीडम' हा खिताब देऊन गौरव केला.

एल्विसचं ग्रेसलँड इथले घर त्याच्या चाहत्यांसाठी एक पर्यटन स्थळ बनले आहे. दरवर्षी जगभरातून सात आठ लाख लोक हे स्थळ बघण्यासाठी येत असतात. तो केवळ किंग ऑफ रॉक नव्हता तर लाखो लोकांच्या हृदयावर राज्य करणारा सम्राट होता. असा सम्राट एकदाच जन्माला येतो, वारंवार नाही.

........

Group content visibility: 
Use group defaults

सुंदर लेख बाख…
तुम्ही सांगितलेली सगळी गाणी छान आहेत. पण मला सगळ्यात जास्त आवडतं ते “It’s now or never”

'कान्ट हेल्प फॉलिंग इन लव' हे गाणे फार आवडते. एल्विसचा आवाज फार सुंदर वाटतो.
एल्विस बद्दल छान माहीती दिलीत. अजून वाचायला आवडेल.
पुलेशु...

<<<खुप छान लेख. अजुन नवीन माहिती मिळाली.
तुम्ही या गाण्याबद्दल बोलत आहात नां?

https://www.youtube.com/watch?v=t6IGdiXw7qg
(इंटरनेट वरुन साभार)>>> होय. हेच ते गाणे.
Verse 1]
Who makes my heart beat like thunder?
Who makes my temperature rise?
Who makes me tremble with wonderful rapture
With one burning glance, from her eyes

[Break]
Marguerita

[Verse 2]
Once I was free as a gypsy
A creature too wild to tame
Then suddenly I saw, Marguerita
And I was caught, like a moth in the flame

[Bridge]
Marguerita is her name
Marguerita

[Verse 3]
Her lips have made me her prisoner
A slave to her every command
She captivates me, and intoxicates me
With one little touch of her hand

[Outro]
Marguerita
Sweet Marguerita sweet, sweet Marguerita
.....

आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी पावलेलं एल्विस चं अजून एक गाणं म्हणजे " इन द
घेट्टो ". पिढीजात गरीबीवर भाष्य करणाऱ्या या
गाण्यातून एक छोटीशी गोष्ट उलगडत
जाते. आपल्याला आधी झालेल्या मुलांची नीट काळजी घेण्याची आर्थिक परिस्थिती नसताना
झोपडपट्टीतली (घेट्टो) एक स्त्री दुसऱ्या मुलाला
जन्म देते. गरिबीत वाढलेला हा मुलगा
चोरी, हाणामारी, हिंसा हाच जगण्याचा एकमेव मार्ग आहे असे समजून बंदूक विकत घेतो, कार चोरतो. तो ही नंतर बाप होतो
आणि तो स्वत: मारला जातो. गाण्यातून
असं सांगितलंय की नव्याने जन्मलेल्या
मुलाचही तेच आयुष्य असणार आहे. मागच्या
पिढीतून पुढच्या पिढीपर्यंत दारिद्र्याचं
आणि हिंसेचं एक दुष्टचक्र अशा रीतीन पूर्ण
होतं. गाण्यात 'इन द घेट्टो' हा शब्द रिपीट होताना या शब्दांवर भर देऊन प्रीस्लेनं एक वेगळा परिणाम साधला आहे. हे गाणं एक आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्धी पावलेलं गीत म्हणून ओळखलं जातं.