गावची लॉटरी जत्रा (कथा परिचय: ७)

Submitted by कुमार१ on 3 August, 2021 - 08:00

विदेशी कथा परिचयमालेतील याआधीचे लेख:

१ कोसळणारा पाउस : १०० वर्षांपूर्वी !
२. एका आईचा सूडाग्नी
३. कुणास सांगू ?

४. ‘भेट’ तिची त्याची
५. नकोसा पांढरा हत्ती (https://www.maayboli.com/node/79527)
६. ती सुंदर? मीही सुंदर ! (https://www.maayboli.com/node/79585)
........................................................................................................................................

आतापर्यंत वाचकांच्या मनमोकळ्या व उत्साहवर्धक प्रतिसादांमुळे या लेखमालेचे ६ भाग सादर केले. ७वा भाग सादर करताना आनंद होत आहे.

या भागासाठी Shirley Hardie Jackson यांच्या कथेची निवड केली आहे. या विदुषी नामवंत अमेरिकी लेखिका होत्या. भयकथा व गूढकथा हा त्यांच्या लेखनाचा विशेष प्रांत. याव्यतिरिक्त त्यांनी कादंबऱ्या व आत्मचरित्रही लिहिलेले आहे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात बहुतांश स्त्रिया चूल व मूलमध्ये अडकलेल्या होत्या आणि त्यांना घराबाहेर काम करण्याची मोकळीक नव्हती. त्याकाळी शर्ली यांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका निभावली आणि त्यांच्या अपत्यांचे संगोपन केले. त्यांच्या कारकिर्दीच्या टप्प्यात त्यांनी ‘द लॉटरी’ ही कथा लिहिल्यानंतर त्या प्रकाशझोतात आल्या. प्रस्तुत लेखासाठी याच कथेची निवड केलेली आहे. प्रसन्न व्यक्तिमत्त्वाच्या या लेखिकेने स्त्रियांच्या प्रश्नांशी निगडीत सुरेख व्यंगचित्रेही रेखाटली होती. सुमारे वीस वर्षे त्यांनी लेखन केले. १९६५ मध्ये त्यांचा हृदयविकारामुळे वयाच्या ४८व्या वर्षी मृत्यू झाला. त्यांच्या सशक्त लेखनाचा प्रभाव पुढच्या पिढीतील अनेक लेखकांवर पडला, ज्यामध्ये स्टीफन किंग यांचा समावेश आहे.

द लॉटरी : कथानक
ही कथा 1948 मध्ये प्रकाशित झालेली असून एका अमेरिकी खेड्यात घडते.
जून महिन्यातील एका सकाळी तिथले ग्रामस्थ चावडीवर जमू लागले. निमित्त होते गावच्या वार्षिक ‘लॉटरी’ कार्यक्रमाचे. मुलांना शालेय सुट्ट्या लागलेल्या असल्याने ती आधी जमा झाली. त्यांनी विविध आकारांचे गुळगुळीत दगड व्यवस्थित रचून एका कोपऱ्यात जमा केले होते. जरा वेळाने पुरुष मंडळी जमा झाली. त्यांच्या शेतीविषयक गप्पा चालू झाल्या. त्यांच्या पाठोपाठ स्त्रीवर्गही तिथे जमला आणि गप्पाटप्पा व कुचाळ्यांत रमला. या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री. समर्स या गृहस्थांवर होती. त्यांची स्वतःची कोळशाची वखार होती आणि ते सार्वजनिक कामांमध्ये हिरीरीने भाग घेत.

आता ते एक काळी लाकडी पेटी घेऊन समूहाच्या मध्यभागी आले. त्यांच्या मागोमाग गावचे पोस्टमास्तर त्या पेटीसाठी एक स्टूल घेऊन आले. पेटीमध्ये लॉटरीच्या चिठ्ठ्या होत्या. त्या एक दोघांनी मिळून एकत्र मिसळल्या.
पेटीतील चिठ्ठ्यांमध्ये एक सोडून सर्व कोऱ्या होत्या. फक्त त्या एकीवर काळा ठिपका काढलेला होता. त्यानंतर समर्सनी गावातील सर्व कुटुंबांच्या प्रमुखांची यादी केली. आता प्रत्येक प्रमुखाने पुढे येऊन पेटीतील एकेक चिठ्ठी उचलायची असे आवाहन त्यांनी केले. दरम्यान ग्रामस्थांत थोडी कुजबुज झाली. एक जण म्हणाला की ही लॉटरीची प्रथा आता आजूबाजूच्या गावांनी बंद केलीय. त्यावर एक म्हातारे गृहस्थ म्हणाले की ही आपली खूप जुनी परंपरा आहे आणि ती महत्त्वाची आहे. त्या गृहस्थांनी गेले ७७ वर्ष त्या लॉटरीत भाग घेतलेला होता. या लॉटरी कार्यक्रमाबद्दल गावकऱ्यांची अशी समजूत होती, की दरसाल जून मध्ये लॉटरी झाली की पुढे शेतामध्ये छानपैकी पीक येते (Lottery in June, corn be heavy soon). त्यामुळे अन्य गावांकडे किंवा इथल्या नवमतवाद्यांकडे दुर्लक्ष करून इथली प्रथा चालूच ठेवली पाहिजे, असे त्या म्हाताऱ्या गृहस्थांनी मत दिले.

दरम्यान सर्व कुटुंबप्रमुखांच्या चिठ्ठ्या उचलून झाल्या. आता त्या प्रत्येकाने उलगडून पाहिल्या. वातावरण कमालीचे तणावपूर्ण होते. अखेर काळ्या ठिपक्याची चिठ्ठी हचिन्सन यांच्याकडे आढळली. ते सुन्नपणे त्याकडे बघत राहिले. तेवढ्यात त्यांची बायको टेसीने तक्रार केली, की समर्सनी तिच्या नवऱ्याला गठ्ठ्यातून घुसळून चिठ्ठी उचलण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला नाही. म्हणून ही फसवणूक आहे. पण हचिन्सननी तिला गप्प बसवले.

लॉटरीची पुढची फेरी अशी होती. आता हचिन्सन यांच्या सर्व कुटुंबीयांनी पुन्हा एकदा नव्या चिठ्ठ्या उचलायच्या. ते एकूण पाच जण होते. नव्या चिठ्ठ्यांमध्ये चार कोऱ्या व एक काळा टिपक्याची ठेवली होती. अजूनही टेसी धुसफूसतच होत्या. आता समर्सनी दुसरी फेरी चालू केली. हचिन्सनच्या सर्व कुटुंबीयांनी पुन्हा चिठ्ठ्या उचलल्या व उलगडून पाहिल्या. प्रथम मुलांच्या चिठ्ठ्या कोऱ्या निघाल्या. सर्वांना हायसे वाटले. मग खुद्द हचिन्सनचीही कोरी निघाली. त्यामुळे टेसीकडेच काळा ठिपकावाली चिठ्ठी असल्याचे स्पष्ट झाले व त्याची खात्री करून घेतली गेली.

आता लॉटरी चा निकाल स्वच्छ आणि स्पष्ट होता – टेसी हचिन्सन बळीचा बकरा ठरली होती !

आता समर्सनी घोषणा केली, “चला, सर्वांनी हातात दगड घेऊन या. आपण पुढचा ‘कार्यक्रम’ लवकरात लवकर उरकून टाकू !” मग सर्व ग्रामस्थांनी ढीगातील दगड आपल्या हातात घेतले. टेसीला मैदानाच्या मध्यभागी उभे केले गेले. तिने दुःखाने अस्वस्थ हातवारे केले.

“ही फसवणूक आहे”, असे ती म्हणाली.
मग (तिच्या कुटुंबियांसह) लोकांनी तिच्यावर दगड मारायला सुरुवात केली. दगड अनेक आकारांचे होते. काही तर वजनदार होते. दरम्यान “हे सगळे काही न्याय्य नाही” असा कंठशोष ती करीत राहिली.

लोक वेगाने तिच्यावर दगड मारत होते आणि तिच्या किंकाळ्या आसमंतात घुमत राहिल्या.
...

विवेचन
कथांत झाल्यावर बराच वेळ आपण सुन्न होतो. अगदी डोके गच्च धरून बसावेसे वाटते आणि अतीव दुःख होते. ‘बळीचा बकरा’ म्हणजे काय, ते लेखिकेने थेट स्वच्छपणे चितारले आहे. वार्षिक नरबळी दिला की गाव सर्व वाईटांपासून मुक्त होते व पुढे इतरांचे भले होते, अशी ही भीषण अंधश्रद्धा. वर्षानुवर्षे तिथे चालत आलेली. कथेच्या पूर्वार्धात सर्व गावकरी एकत्र जमलेले असून खेळीमेळीने वागताना दाखवले आहेत. परंतु जेव्हा लॉटरीचा निकाल लागून टेसीची बळीसाठी निवड होते, त्या क्षणी ती व्यक्ती सर्व गावकऱ्यांच्या दृष्टीने पूर्णपणे परकी ठरते. मानवी समूहाचे हे बदलते रंग कथेत प्रभावीपणे चितारले आहेत.

या कथेतून समूह मानसिकता व झुंडशाही याचे विदारक चित्रण आपल्यासमोर येते. अशा वेळेस लोकांची सारासार विचार किंवा विवेकबुद्धी कुठे जाते कुणास ठाऊक ? शेतीत उत्तम पीक येणे हे पूर्णतः निसर्गावर अवलंबून आहे हे जाणण्याचीही त्यांची कुवत नसावी? की नरबळी हा त्यांच्या वार्षिक मनोरंजनाचा कार्यक्रम होता? त्या गावच्या आसपासच्या गावात ही दुष्ट प्रथा बंद केल्याचे समजूनही तिथले बुजुर्ग तिचे आंधळे समर्थन करीत राहतात. अशी खोलवर मुरलेली अंधश्रद्धा पाहून कोणीही सुजाण व्यक्ती अस्वस्थ होईल व पेटून उठेल.

अमेरिकेच्या इतिहासात अ‍ॅन हचिन्सन या नावाची धर्मसुधारक स्त्री होऊन गेलेली आहे. तिचे सुधारणावादी विचार न पटल्याने तिला तत्कालीन समाजाने बहिष्कृत केले होते. या व्यक्तीवरून लेखिकेने कथाप्रेरणा घेतलेली असावी. आजही आपण समाजात अधून-मधून एखाद्या व्यक्तीस झुंडीने जमलेले काही लोक निव्वळ संशयावरून क्रूरपणे मारताना पाहतो. त्यात काही प्रसंगी संबंधित व्यक्तीचा मृत्यूही होतो. यावरून मानवी मनात हिंसा किती खोलवर मुरलेली आहे हे दिसून येते. ही आदिम प्रेरणा या कल्पित कथेचा गाभा आहे.

कथाप्रवास आणि माध्यम रुपांतरे
ही कथा १९४८ मध्ये ‘द न्यूयॉर्कर’मध्ये प्रसिद्ध झाली होती. तेव्हा तिच्यावर प्रतिसाद देणाऱ्या वाचकांच्या पत्रांचा अक्षरशः पाऊस पडला होता. काही मोजके वाचक वगळता बहुसंख्यांनी आपला तीव्र रोष पत्रांतून व्यक्त केला होता. कित्येकांनी, लेखिकेने असल्या भयानक कथेचे स्पष्टीकरण द्यावे अशीही मागणी केली होती. खुद्द लेखिकेच्या आईवडिलांनी देखील या कथेवर आपली तीव्र नापसंती दर्शवली होती. यथावकाश लेखिकेने तिचे स्पष्टीकरण जाहीर केले. मानवी मनातील क्रूरता व हिंसा अगदी आपल्या आसपास सतत वावरत असते, हे कथेद्वारे दाखवण्याचा हेतू तिने स्पष्ट केला.

ही कथा बरीच गाजल्याने पुढे ती अनेक नियतकालिकांत तसेच पाठ्यपुस्तकातही प्रकाशित झाली. याखेरीज तिची अनेक माध्यम रूपांतरे झालेली आहेत. त्यामध्ये रेडिओ कार्यक्रम, टीव्हीवरील चित्रपट, एक अंकी प्रयोग, संगीत व नृत्य नाटिका आणि लघुपट यांचा समावेश आहे. संबंधित चित्रपट ‘द लॉटरी’ या नावानेच निघालेले आहेत.

…………………………………..
मूळ कथा इथे : https://fullreads.com/literature/the-lottery/

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही कथा सुन्न करणारी आहे हे खरंच. पण लॉटरी म्हणजे काय आहे याचा थांगपत्ता अगदी शेवटपर्यंत लेखिका लागू देत नाही. अगदी शेवटच्या परिच्छेदात लॉटरी लागलेल्या व्यक्तीला दगडाने ठेचून मारणार आहेत याचा उलगडा होतो आणि मग कथा अजूनच सुन्न करून जाते.
टेसीची निवड झाल्यावर ती ही फसवणूक आहे म्हणून ती आरडाओरडा करते पण त्याआधी ती स्वतः अतिशय उत्साहाने त्या सगळ्यात सहभागी झाली होती त्यामुळे बळीचा बकरा कोणी दुसरी व्यक्ती निघाली असती तर तिने उत्साहाने त्या कार्यक्रमात सहभाग घेतला असता. त्यामुळे ही दांभिकताही लेखिका दाखवून जाते.
टेसीचा नवरा आणि मुलेही तिच्यावर दगड मारण्यात सहभागी होतात त्यामुळे नात्यांचं काही सोयरसुतक उरत नाही.

ओह ! टेसीबद्दल हळहळ वाटली. पण चीकू यांनी म्हटलं तस टेसीवर राज्य आलं नसतं तर ती ही या कृत्यात सहभागी झालीच असती.

कथेचा परिचय करून दिल्याबद्दल धन्यवाद

सर्व प्रतिसादकांचे अभिप्रायाबद्दल आभार !

लेखाच्या शीर्षकात बदल केला आहे.
आता ते मूळ शीर्षकाच्या समांतर आहे

सुन्न करणारी कथा!
>>>चीकू यांनी म्हटलं तस टेसीवर राज्य आलं नसतं तर ती ही या कृत्यात सहभागी झालीच असती.>>> + १११

अतिशय प्रातिनिधिक कथा. ही कथा जरी १९४८ साली प्रसिद्ध झाली असली तरी आजही या प्रकारच्या घटना वाचनात येतात. या अनुचित प्रथेस शब्दरूप देऊन समाजात विचारमंथन घडवून आणण्याचा लेखिकेचा प्रयत्न असावा.
जुन्या काळातील कथांचे अनुवाद तुमच्या रासग्रहणासह सादर करण्याचा हा प्रयास आणि प्रवास अतिशय स्तुत्य आहे.
पुलेशु
_/\_

>>> कथेवर आधारित लघुपट >>>
तो युट्यूब व्हिडिओ पाहिला.
त्यातली दगडफेक खरंच अंगावर येते . टेसी आणि समर्स यांच्या भूमिका छान वाटल्या.

वरील सर्व प्रतिसादकांचे आभार !

कथेतील घटना भयानकच आहे. त्यानुसार लघुपट अधिक अंगावर येतो हे स्वाभाविक आहे. लेखिकेने कथाप्रेरणा ज्या व्यक्तीवरून घेतलेली आहे, तिला समाजाने बहिष्कृत केले होते. या कथेत लेखिकेने पीडित स्त्रीला थेट मृत्यूस पाठवले आहे. 1948 मध्येसुद्धा यावर वाचकांनी तीव्र रोष व्यक्त केल्याचे लेखात दिलेच आहे.

आता जरा आजच्या काळाशी तुलना करू. नरबळी हे तसे प्राचीन प्रकरण आहे. परंतु काही दशकांपूर्वीच, आपले इच्छित साध्य करण्यासाठी अनेक लहान मुलींचे बळी दिल्याचे मोठे हत्याकांड (प्रगतीशील) महाराष्ट्रात घडले होते.

झुंडीने एखाद्याला मारण्याच्या घटना तर आजही थांबलेल्या नाहीत. गेल्या तीन वर्षात मी वाचलेली एक घटना अंगावर शहारा आणणारी होती.

एका दीर्घ पल्ल्याच्या रेल्वे प्रवासात गाडीतील बहुतेक डब्यांमधील स्वच्छतेचे पाणी संपलेले होते. रेल्वेकडून योग्य त्या स्थानकांवर कदाचित भरले गेले नसावे. गाडीतील प्रवाशांनी तिकीट तपासनीसाला यावरून फैलावर घेतले होते. या व्यक्तीकडे चौकशी करणे इतपत ठीक होते. परंतु गाडीतील पाणीपुरवठा आणि तपासनीस यांचा थेट संबंध नाही. परंतु डब्यातील लोकांनी त्या तपासनीसांना मध्यभागी घेऊन प्रचंड मारहाण केली आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला होता.

हे पाहता माणसातील खुनशी वृत्ती हा विषय कधीच कालबाह्य होणार नाही.

अतिशय लांच्छनास्पद :

कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?; हळद कुंकू लावून फेकून देण्यात आला मृतदेह

https://www.loksatta.com/maharashtra/a-dead-body-of-seven-year-old-found...

धिक्कार असो असे कृत्य करणाऱ्या नराधमांचा.

>>>>>>>कोल्हापुरात सात वर्षाच्या मुलाचा नरबळी?; हळद कुंकू लावून फेकून देण्यात आला मृतदेह

बाप रे शॉकिंग आहे. function at() { [native code] }यंत घृणास्पद आणि हीन कृत्य. संबंधित गुन्हेगारांना फाशी व्हायला हवी.

>>>मानवी मनातली हिंसा , क्रुरता आपल्या आजूबाजूला सतत वावरत असते>>>...खरं आहे.
कालची डोंबिवली येथील घटना... उत्तरप्रदेश येथील गावी निघालेल्या दोघांना रिक्षातून बाहेर खेचून एकाचा शिरच्छेद केला...दूसरा मेलाय असे समजून दोघांची रोकड लुटली...

पाप्याला सामूहिक मृत्यू दंड हाही हिंसक प्रकारच... झुंडीने केलेला न्याय अन्यायही असतो...ती व्यक्ती निरपराध असते पण त्या व्यक्तीचा शत्रू झुंडशाहीच्या माध्यमातून सूड उगवतो...
राजेश खन्नाचा सिनेमा...यार हमारी बात सुनो हे गाणे...
https://youtu.be/WtaHOfAR-uc

कायदा हातात घेऊन चोर समजून संन्याशाला फाशी
वस‌ईत झालेली साधूंची हत्या....

College मध्ये असताना अशीच एक कथा अभ्यासली....
बोझो नावाचा सर्कशीत काम करणारा हत्ती आजारतो....त्याला आजारामुळे होणा-या वेदनातून मुक्ती देण्यासाठी गोळी घालायचे ठरते...
तो हत्ती सर्कशीचा कणा असतो...कित्येक लोक त्यांच्यासाठी सर्कस पाहयला येतात. त्यामुळे व्यवस्थापकाला वाटते त्याच्या मरणाचा सोहळा करुन गल्ला भरावा...

आर्थिक स्वार्थापोटी लोक एखाद्याचा जीव घ्यायला ५-१० हजाराची सुपारी घेतात....

या कथे इतकंच अस्वस्थ करणारं हेही वास्तव... सुंदर नरदेहाला कोड फुटलेत असं वाटतं....

तुमचा हा उपक्रम वाचायचा राहिला...आता वाचतो... धन्यवाद

सामो व दसा,

समर्पक प्रतिसाद
भीषण वास्तव आहे.
धन्यवाद

भय इथले संपत नाही.. वास्तवातील भयकथाही संपत नाहीत. खरंच का मानवजात प्रगत झाली आहे?

Shirley Hardie Jackson या दिवंगत गूढकथा लेखिकेच्या दोन लघुकथा ९ जून २०२२ रोजी प्रथमच प्रकाशित झाल्यात.
या कथा फक्त पाचशे व चारशे शब्दांच्या आहेत.

https://www.theguardian.com/books/2022/jun/09/unseen-works-shirley-jacks...