रेड लाईट डायरीज - शांतव्वा ....

Submitted by अजातशत्रू on 25 September, 2017 - 02:01

प्रत्येकाच्या पावसाच्या अनेक तऱ्हेच्या आठवणी असतात तशा माझ्याही आहेत. त्यातलीच एक आठवण आहे शांतव्वाची. तिची आठवण येताच डोळ्यातले अश्रू थिजून जातात. अंगावर शिरशिरी येते, नकळत मन विद्ध होते. एका पावसाळ्यात पहाटे कधीतरी ती रस्त्यावर मरून पडली होती, ओला होता तिचा देह पण काळजातली धग म्लान चेहऱ्यावर निखाऱ्यांच्या रेषा चितारून गेली होती. तिच्या मुठी खुल्याच होत्या, जबडा बंद होता अन चांदवलेले डोळे सताड उघडे होते. कदाचित ती मरताना अस्मानातून चंद्र तिच्या डोळ्यात उतरला असावा, मायेने विचारपूस करताना तिच्या डोळ्यातल्या वेदनांच्या खाऱ्या पाण्यात विरघळून गेला असावा....

दगडूशेठ हलवाई गणपतीच्या परिसरात एक फेरी मारून झाली की शांतव्वाची सकाळ पुरी होई. शांतव्वाचं मूळ गाव तिला अखेरच्या काळात आठवत नव्हतं. पण ती कर्नाटकच्या बिदर जिल्हयातली होती इतकं तिला माहिती होतं. डोक्यात जट आली म्हणून तिच्या बालपणीच तिला देवाला वाहिलेलं होतं. पण यल्लमाचा जग तिच्याकडे नव्हता. परडी, कोटंबा वागवत होती ती. घामटलेल्या कपाळावर हळदीचा मळवट भरून फिरायची. गळ्यात कवड्याची माळ अन चरबटून गेलेल्या केसांच्या तेलकट, मळकट जटा. वेडेवाकडे दात, फेंदारलेलं नाक, मोठाल्या नाकपुडया, ओठावर किंचित केसांची लव, वर आलेली गालफाडे, खोल गेलेले मिचमिचे डोळे, जाड भुवया, सदा हलत असणाऱ्या कानाच्या जाड पाळ्या, नाकातल्या छिद्रात कसल्या तरी काडीचा बारीक तुकडा टोचलेला, कवडयाच्या माळेचे गळयावर पडलेले वळ, रंग फिकट झालेल्या हिरवट बांगड्या, तेलकट डाग पडलेलं खांद्यावरून ओघळणारं सैलसर पोलकं, अंगाभोवती कशी तरी गुंडाळलेली जुनेर साडी, लोकांनी टाकलेल्या काहीबाही तेलकट गुळचट पदार्थांनी लडबडलेली परडी हातात घेतलेली शांतव्वा अजूनही डोळ्यापुढून हलत नाही.

शांतव्वा किती तरी वर्षे बिदरमध्येच होती. तारुण्य संपलं आणि देवाच्या भक्तांचा तिच्यातला रस गेला. तिचे खायचे प्यायचे वांदे होऊ लागले, भीकही मागता येईना आणि पोटाला मिळेना अशा अवस्थेत ती राहू लागली. ज्या देवळाजवळ ती चोवीस तास बसून असायची ते देऊळ रस्ता रुंदीकरणात पाडलं गेलं आणि ती अक्षरशः सडकेवर आली. इकडं तिकडं झोपावं म्हटलं तर त्या त्या भागातले भिकारी तिला झोपू देईनासे झाले, हिच्यामुळे त्यांच्या घासातला एक घास कमी होईल अशी त्यांना भीती होती. सगळीकडून तिला हाकललं जाऊ लागलं. डोक्यावर फाटक्या लुगडयात बांधलेले गाठोडे अन काखेत झोळी घेऊन फिरत फिरत सहाव्या सातव्या दिवशी ती रेल्वे स्टेशनजवळ आली. तिथल्या काही किन्नरांनी तिला सोबत घेतलं आणि त्यांच्याबरोबर पुण्यात आणलं. बुधवारात त्यांच्या गल्लीत आणून सोडलं.

पुण्यात आल्यावर शांतव्वाच्या पोटाचा प्रश्न मिटला. पण तिची अवहेलना सरली नाही. तिला कुणी काळजाशी धरलं नाही की कुणी तिच्या गालावरून मायेचा हात कधी फिरवला नाही. तिचे डोळे कुणी पुसले नाहीत की तिच्या पायाला पडलेल्या भेगा कुणाला दिसल्या नाहीत. बघता बघता तिला पुण्यात येऊन दोन दशकं लोटली. तिला आता आसरा होता, गल्लीच्या कोपरयावर असणाऱ्या मरीआईच्या छोट्याशा देवळाजवळचा रात्रीचा ठिय्याही पक्का झाला होता. भारतीच्या खोलीत एका ट्रंकेत तिच्या सामानाला जागा मिळाली होती. तिचे दिवस पाय खरडत खरडत जात होते अन अंधाररात्री वेदनांच्या गाळात सरपटत जायच्या. एका रात्री ती मरीआईच्या छोट्याशा देवळापाशी ती बसून असताना तिथली कुत्री भुंकू लागली, त्यांना काही तरी सुगावा लागला असावा. त्यांचं भुंकणं ऐकून त्याच रस्त्याने पळत जाणाऱ्या दोन पाच टारगटांनी रस्त्याच्या कडेला पडलेले दगड उचलून मारले. त्यातले दोन दगड शांतव्वाला लागले. एक डोक्यात कानामागे वर्मी बसला तर एक कपाळावर बसला. डोळा जाता जाता राहिला. तिच्या कपाळातून भळाभळा रक्त येऊ लागलं. कानामागं वर्मी लागलेल्या घावाने ती जीवाच्या आकांताने ओरडू लागली. त्या गल्लीत तिची कुणी दखल घ्यावी असं काही विशेष त्यात नव्हतं. जोरात फेकून मारलेला दगड लागल्याने एक कुत्रंही तिथंच केकाटत होतं. त्या अंधाररात्री एक जखमी कुत्रं आणि एक जखमी बेवारस वयस्क स्त्री निपचित पडून होते. अखेर मध्यरात्र झाल्यावर कचरा उचलणाऱ्या लोकांनी म्युनिसिपालटीच्या लोकांना कळवलं. शांतव्वाला ससूनमध्ये भरती केलं गेलं. घावाच्या निमित्ताने तिच्या जटा कापल्या गेल्या. एक मोठं ओझं अकस्मात उतरलं....

शांतव्वा शुद्धीवर आली आणि त्या दिवसापासून खेळणं हरवलेल्या लहान मुलासारखी ती भांबावून गेली. आपल्या जटा गेल्या याचा तिला आनंद झाला नाही, उलट आपलं काहीतरी हिरावून घेतलं असंच तिला वाटू लागलं. भारती आणि तिचे सहकारी दोन तीन वेळा दवाखान्यात तिला भेटायला आले तेंव्हा ती धाय मोकलून रडली होती. बरी होऊन परतल्यावर ती मूक राहू लागली. तिचं फिरणं कमी होऊ लागलं. काहींनी तिची सोय लावता येईल का याचे प्रयत्न करून पहिले. अनाथाश्रमात, वृद्धाश्रमात जायला ती नको म्हणायची. ‘इथंच गल्लीतल्या उकिरडयाजवळच्या मरीआईच्या देवळाजवळ मला मरायचंय’ असं म्हणायची. खरं तर तिची देवावर तीळमात्र श्रद्धा नव्हती. ‘मला देवाला अर्पण केलं त्याच दिवशी सगळे देव माझ्यासाठी मेले’ असं ती सांगायची. आपण असे कोल्हयाकुत्र्यागत मेल्यावर तरी जगाला काही कळेल असे तिला वाटायचे. देवाच्या नावानं जगलेल्या लोकांचे हालही देव कुत्र्यासारखेच करतो हे तिला जगाला दाखवून द्यायचे होते, त्यासाठीच हा आटापिटा होता. कुणी तिच्या पुढ्यात काही टाकलं तर तितकंच ती खायची. तिच्या ओळखीतले लोक एकेक करून गल्ल्या, शहर बदलून निघून गेले होते त्यामुळे तिची विचारपूस करणारं खास कुणी नंतर उरलं नव्हतं. कधीकधी भारतीच तिच्यासाठी काहीतरी खायला पाठवून द्यायची. शेवटच्या वर्षभरात तर तिच्या अंगावरच्या कपडयांच्या चिंध्या झाल्या. हातापायाची लांबसडक बोटे कसनुशी दिसत होती, दंडाचे मांसल कातडं लोंबू लागलं होतं. डोळ्याखालची वर्तुळे दाट काळी झालेली, हाडाचा सापळा उरलेला होता फक्त. त्या भेसूर चेहऱ्यावरही ती तेव्हढ्यात हळद लावायची, ‘आणखी अभद्र दिसायचं होतं का तिला’ या प्रश्नाचे उत्तर काही मिळाले नाही. शेवटच्या दिवसांत तिला श्वास घ्यायला त्रास होत होता. आभाळ भरून आलं की छातीतला भाता बंद होतो की काय असं वाटायचं. पाऊस पडू लागला की लाख गोष्टी आठवायच्या तिला. डोळ्यातून धारा वाहायच्या. फाटक्या पदराने डोळे पुसत शून्यात नजर लावून बसायची ती. ‘हा पाऊसच आपली सुटका करून जाणार आहे’ हे तिला पक्के ठाऊक होते.....

एका पावसाळी पहाटे तिचे प्राणपाखरू उडून गेले. एकदाची सुटली बिचारी. तिनं किती भोगलं अन काय काय भोगलं याला न अंत ना पार. आयुष्यात तिनं काय कमावलं याच्या बेरजेसाठी एकही अंक काबील नव्हता अन तिनं काय गमावलं नाही हे सांगायला हरेक शब्द कमी पडत होता. दुःखात सुख शोधताना खरं सुख काय असतं हेच ती विसरून गेली होती म्हणूनच की काय मेल्यावरही तिच्या चेहऱ्यावर हास्याची एक छटा पहिल्यांदाच उमटली होती. तिची मयत झालेलं बुधवारातल्या गल्लीत कळलं, अनेक जीव तळमळले. तिच्या कलेवराला दहन देऊन झालं. त्या नंतर जग तिला विसरून गेलं. जो तो आपल्या दुनियेत गर्क झाला. सामन्यांच्या दुनियेत जिथं कमालीचा रुक्षपणा येत चाललाय तिथं या बाजाराची काय कथा ? तरीही काही लोकांनी तिला आपलं मानून तिच्या आयुष्यातले काही सुखदुःखाचे क्षण वाटून घेतले होते. आता तिच्या पश्चात तिची आठवण निघणे कठीण होते. पण म्हातारपणाकडे झुकलेल्या भारतीला एका दुपारी तिची तीव्रतेने आठवण झाली त्याचं कारण म्हणजे भारतीच्या खोलीतली सफाई करताना ट्रंकेच्या ढिगाऱ्यात ठेवलेली शांतव्वाची मोडकळीस आलेली ट्रंक !

भारतीने पुढे होत ती ट्रंक बाहेर खेचून काढली. त्यावर लागलेली जाळ्या जळमटे पुसून काढली. धूळ झटकली. कडी कोयंडे कधीच तुटून गेलेले होते. आत काही मौल्यवान ऐवज असण्याची कसलीही शक्यता नसल्याने तिला कधी कुणी हात लावलेला नव्हता. तरीही ट्रंक उघडताना भारतीला थोडीशी धाकधूक वाटत होती. पत्रा गंजून गेलेल्या त्या ट्रंकचं झाकण तिनं मागे लोटून दिले. काही क्षण भयाण शांततेत गेले आणि भारतीच्या डोळ्यांना धारा लागल्या. त्या ट्रंकेत लहान बाळाच्या हातात घालायचे गिलटाचे वाळे होते, चांदीचे पाणी दिलेलं एक काळपट पैंजण होतं जे बहुधा कधी पायात घातलेलं नव्हतं. बेन्टेक्सचे खोटे दागिने होते. छिद्रे पडलेल्या, झिरून गेलेल्या, फॉल निसटलेल्या पदरावरची नक्षी उडालेल्या दोन साड्याही होत्या. काळपट डागांचे ओघळ दाटून घट्ट झालेले, रंग विटून गेलेले नाडी तुटायच्या बेतात आलेले परकर होते. समोरील बाजूची काही बटनं तुटलेले, काजी फाटून गेलेले, वीण उसवलेले दोन ब्लाऊज होते. एका कॅरीबॅगमधली कधी न घातलेली नवी कोरी पण एकाच जागी ठेवून ठेवून घडीवर झिरून गेलेली अनवट साडीही होती. गंधाचे जुने डाग असलेला, टवके उडालेला पिवळट पडलेला यल्लम्माचा फोटो, कुठली तरी जुन्या जमान्यातली बहुधा कुण्या मायलेकींची फिक्कट झालेली धुरकट तसबीर होती. हातात बांधायचे काही लाल काळे दोरे, एक अंगारयाची पुडी, स्पंज निघालेली दोरे तुटलेली बेरंग झालेली राखी होती. ब्लाउजपीसच्या पुरचुंडीत बांधून ठेवलेल्या कचकडयाच्या हिरव्या बांगडया होत्या. मणीमंगळसूत्र आणि न वापरलेली घडीव जोडवी होती. काचेला तडा असलेली एक रिकामी फोटो फ्रेम होती. बोरमाळीच्या सरीला असणारया लेसचे घट्ट झालेले लाल गोंडे होते. कुठल्या तरी देवाची चेमटून गेलेली पितळेची मूर्ती होती. वरचे अस्तर खरवडून गेलेली, पैसे ठेवण्याची जुन्या पद्धतीची एक रिकामी छोटीशी पर्स. फाटलेल्या जुन्या नोटांचे दुमडून गेलेले घड्या पडलेले तुकडे, काही जुनी नाणी, मखमली कापडांचे काही वेडेवाकडे कापलेले तुकडे होते ज्यात तिची विस्कटलेले मन वसले होते. इतकं सारं सामावून घेणारी पत्र्यावरील फुलांचे चित्र धुरकट झालेली पत्र्याची ती ट्रंक पाहून भारतीचं मन गलबलून गेलं होतं. खरं तर शांतव्वाची शिल्लक तेव्हढीच नव्हती अजूनही काही होतं. देशी दारूच्या गुत्त्यातलं देणं बाकी होतं, टपरीमधल्या चहा कँटीनची किरकोळ उसनवारी होती. करपून गेलेल्या इच्छा होत्या, चक्काचूर झालेली स्वप्ने होती. मरून गेलेल्या वासना होत्या, घुसमटुन गेलेलं मन होतं, खंगलेलं कलेवर सडकेवर टाकून बुधवारातली शांतव्वा वार्धक्याने पहिल्या पावसाच्या दमट हवेत तडफडून मरून गेली तेंव्हा तिची शिल्लक इतकीच होती पण कोणा कोट्याधीशाच्या शिलकेपेक्षा अधिक नीती त्यात होती, सच्चेपणा होता. त्यात उदासताही होती पण काळीज चिरणारा टोकदार नियतीचा सलही होता...

अजूनही कधी मंद धारात कोसळणारा तसा पाऊस आला की शांतव्वा डोळ्यापुढे येते आणि काळजातून तिच्या वेदनांचा झंकार होत राहतो ...

- समीर गायकवाड.

माझा ब्लॉगपत्ता -
https://sameerbapu.blogspot.in/2017/09/blog-post_25.html

Group content visibility: 
Public - accessible to all site users

जगाच्या रहाटरगाड्यात अशी काही दुर्भागी माणसे असतात ते तुमच्या लेखामुळे समजतेच पण त्यांच्या आयुष्यातील न कळलेलं वास्तव किती भीषण आहे ते कळल्यावर मन सुन्न होते.

जगाच्या रहाटरगाड्यात अशी काही दुर्भागी माणसे असतात ते तुमच्या लेखामुळे समजतेच पण त्यांच्या आयुष्यातील न कळलेलं वास्तव किती भीषण आहे ते कळल्यावर मन सुन्न होते.>>>+११

सुन्न झालो वाचून आणि टचकन डोळ्यात पाणी आले. देव का आणि कशाला म्हणून असे भोग भोगायला लावतो, तोच जाणे. Sad Sad

अनेक लोकांच्या पाठी असे दुर्दैव हात धुवुन मागे लागलेले असते. अतिशय क्रूर थट्टा दैवाने मांडलेली असते, भोग येतात वाट्याला. शत्रूवरही येऊ नये अशी वेळ आलेली असते. आणि कळत नाही कोण का करवितो आहे हे सारं. पण एवढं कळतं 'पराधिन' आहोत आपण सारे. आपली चूक नसतानाही असा भोगवटा वाट्याला येणारच नाही याची कोणीच शाश्वती देउ शकत नाही.
त्यातून ....... होय माझ्यासारख्या काहींच्या बाबतीत, त्यातूनच देवाची पूजा-नामस्मरण हा आटापिटा सुरु होतो. अक्षरक्षः बुडू नये म्हणुन काडी शोधण्याइतकेच त्याचे महत्व. Sad

जगाच्या रहाटरगाड्यात अशी काही दुर्भागी माणसे असतात ते तुमच्या लेखामुळे समजतेच पण त्यांच्या आयुष्यातील न कळलेलं वास्तव किती भीषण आहे ते कळल्यावर मन सुन्न होते. -- +1234567 अगदी हेच आलं मनात.. खूपच ह्रदयद्रावक आहे हे Sad