नर्गिसची दास्तान ...

Submitted by अजातशत्रू on 22 November, 2016 - 00:25

साठच्या दशकातल्या अभिनेत्रीपैकी नूतनमध्ये सादगी होती, मधुबालेकडे असीम सौंदर्याच्या जोडीने अल्लड अवखळपणा होता, वैजयंतीमालेत मादक अदा होती, मीनाकुमारीत कारुण्य शिगोशिग भरलेले होते, वहिदा रेहमान कडे कातिल अदा होती, साधना स्टाईल आयकॉन होती, माला सिन्हा फॅशन दिवा होती तर नर्गिसमध्ये ह्या सगळ्यांचे कॉम्बो होते ! नर्गिस करोडोतली देखणी' ह्या कॅटेगरीतली आरसपानी अप्सरा नव्हती मात्र तिच्या आवाजात मीनाकुमारी सारखा कंप होता. तिच्याकडे मधुबालेसारखं निखळ हास्य होतं. वैजयंतीमाले सारखं मादक सौंदर्य तिच्याकडे नसलं तरी नजरेने घायाळ करण्याचं सामर्थ्य तिच्याकडे होतं. नूतनइतका साधेपणा तिच्यातच काय आजवरच्या कुठल्याच अभिनेत्रीत दिसला नाही पण वेळप्रसंगी ती एकदम 'गांव की भोली भाली सिधीसी लडकी' वाटायची अन समयानुरूप 'सेठ किरोडीमल की ईकलौती लाडली बेटी' देखील वाटायची ! साधनेसारखी तिची स्वतंत्र आयकॉनिक स्टाईल नव्हती मात्र कुठलाही गेटअप तिला खुलून दिसे. बॉबकट असो वा सैल बांधलेला अंबाडा असो तिला खुलून दिसे. अंदाज, बरसात, श्री ४२०, जागते रहो, मदर इंडिया अशा क्रॉस शेडेड रोल्स मध्ये ती समरसून गेलीय, ती कुठेही ओव्हर वाटत नाही. नर्गिस काही मेनका - उर्वशी नव्हती पण उठून दिसावं असं उफाडयाचं अंग तिला लाभलं होतं. तिच्याकडे सुबक बांधा नव्हता पण एक आकर्षक कमनीय देहबोली तिला लाभली होती. काश्मिरी गौरवर्णाची, उभ्या चेहऱ्याची, किंचित मोठ्या ओठांची, निमुळती हनुवटीची अन मासोळी डोळ्याची नर्गिस बोलत राहिली की हास्याचं कारंजं कधीही फुटेल असं वाटत असतानाच तिच्या गोटीदार नाकावर रागाचा पारा चढलेला दिसे ! मुडी होती ती, पण मनाची मात्र एकदम मोकळी, दिलखुलास !

तिचं खरं नाव फातिमा रशीद ! पण बॉलीवूडमध्ये माणुसकीच्या खरया माणसांना जसे काहीच मूल्य नसतं, तसंच काहीसं नावांच्या बाबतीतही घडतं. अनेकांची मूळ नाव बदलणारया बॉलीवूडने फातिमाचे नाव बदलले तेंव्हा ती सहा वर्षांची बाल कलाकार होती. बॉलीवूडने तिला 'नर्गिस' हे नाव दिलं. 'नर्गिस' हे इराणमधले एका फूलाचे नाव आहे. हे फूल हजारो वर्षापासून रडते असं याच्याबद्दल सांगितले जाते. कारण त्याच्या सौंदर्याची दखल घेणारा एकही चाहता नाही, एकही रसिक ते फुल बघायला येत नाही. ही त्याची खंत. खरे सौंदर्यपारखी हजारो वर्षांनीच जन्माला येतात. पण फातिमाची कदर वयाच्या सहाव्या वर्षी झाली होती पण तिच्या वाटयास 'नर्गिस'चे जिणे आले हा एक योगायोगच. नर्गिसचे वडील मोहन बाबू लढवय्या मोहयाल त्यागी पंथाचे होते पण त्यांचा अतिआक्रमकपणा त्यांना नडला. एका बिकट प्रसंगी इस्लामधर्म स्वीकारून ते 'अब्दुल रशीद' झाले. ते रावळपिंडीहून थेट कोलकात्त्याला आले. नर्गिसची आई जद्दनबाई हिचे ह्याआधी दोन विवाह झाले होते. अब्दुल रशीद हे तिचे तिसरे पती. जद्दनबाई मोठी जहांबाज बाई होती, तिने मोहनबाबूला पार आपल्या कह्यात करून ठेवले होते. जद्दनबाईला आधीच्या पतीपासून अन्वर आणि अख्तर ही दोन मुले होती. मोहनबाबू उर्फ अब्दुल रशीदपासून जून एकोणीसशे एकोणतीसमध्ये नर्गिस झाली. यामुळेच की काय पंजाबी लोकांसारखी देहयष्टी असणाऱ्या नर्गिसला टिपिकल मुस्लिम स्त्री सौंदर्य लाभले. भारतीय मूकपट जेंव्हा बोलका झाला त्या काळात जद्दनबाईने हिंदुस्थानी क्लासिकल सिंगर म्हणून भारतीय चित्रपटसृष्टीत चांगलाच जम बसवला होता. तिच्या डोक्यात सिनेमा फिट बसला होता. आपल्या डोक्यातला सिनेमा तिने अन्वर आणि नर्गिसच्या नसानसात भिनवला. अख्तर नेहमी साईड हिरो वा सहायक अभिनेत्यांची कामे करत राहिला. पण नर्गिस नशीबवान ठरली. हिंदी सिनेमाच्या इतिहासात तिनं स्वतःचे स्थान निर्माण केलं. 'हजारो साल नर्गिस अपनी बेनूरी पे रोती है, बडी मुश्किल से होता है चमनमें दीदावर पैदा ! - अल्लामा इक्बाल यांचा हा शेर नर्गिस या शब्दाचा नेमका अर्थ सांगतो. समग्र नर्गिसवर लिहायचे म्हटले तर अवघड आहे कारण तिच्या आयुष्याला अनेक पैलू होते. बालपण, राजकपूर आणि सुनीलदत्त हे तिचे तीन मुख्य अध्याय होत. यावरही बारकाव्याने लिहायचे झाले तरी कठीण आहे कारण, तिच्या मनाची हळुवारता अन त्याला असणारे अनेक कंगोरे. नर्गिसच्या आयुष्यात कायमच 'थोडा है, थोडे की जरुरत है' अशी अवस्था राहिली. लहानपणापासून ती सातत्याने कुणा ना कुणाच्या हातचे बाहुले बनून राहिली. कधी आई जद्दन बाईच्या तालावर नाचणारी तर पुढे प्रदीर्घ काळ राज कपूरची केवळ कठपुतळी बनून नर्गिसचे आयुष्य गेले. नर्गिसची अफाट लोकप्रियताही त्याला सहन व्हायची नाही. त्यातच मोठा भाऊ अख्तर हुसेन याच्याकडून होणारी मारझोड आणि त्याच्या मुलाबाळांचे लेंढार पोसण्यात स्वत:ची कमाई तिला खर्च करावी लागे. नर्गिसचं बालपण असं कोमेजून गेलं होतं.

नर्गिस ऐन वयात आली तेंव्हा वयाच्या १४ व्या वर्षी तिला हिरोईनचा रोल मिळाला पण तिच्या समोर तिच्या पेक्षा वीसेक वर्षांनी मोठ्या असणारे मोतीलाल तिचे हिरो होते. ( मेहबूबखान दिग्दर्शित तकदीर - १९४३). दोन वेण्या घातलेली परकर पोलक्यातली नर्गिस या सिनेमापासून दिग्दर्शक मेहबूबच्या डोक्यात रुतून बसली असावी. १९४५ च्या 'हुमायून'मध्ये तर तिचे नायक दादामुनी होते. ते ही तिच्यापेक्षा वीस वर्षांनी मोठे होते. तिच्या फिल्मी लाईफमधले तिचे हिरो थोराड वयाचे होते म्हणून की काय रिअल लाईफ मधला तिचा लाईफ पार्टनर तिच्यापेक्षा वयाने लहान निघाला ! हुमायूनसारखे पाचेक चित्रपट केल्यानंतर दिलीपकुमार बरोबरच्या 'मेला' (१९४८) मध्ये बॉबकटवाली नर्गिस चमकून उठली आणि तिने पुन्हा कधी मागे वळून पहिले नाही. याच वर्षी 'आरके'च्या बॅनरखाली आलेल्या 'आग'ने तिकीटबारीवर कमाल केली नाही पण राजकपूरच्या काळजात मात्र नर्गिसने वणवा पेटवला. पुढे तिने राजबरोबर 'आग'सह तब्बल सोळा चित्रपट केले. विशेष म्हणजे त्यातले सहा चित्रपट आरके प्रॉडक्शनचे होते. नर्गिसने राजच्या हृदयावर आपलं नाव कोरलं खरं पण त्याची मालकी ऑलरेडी कृष्णामल्होत्रा - नाथ कडे गेली होती. १९४६ मध्ये राजकपूर आणि कृष्णाचा विवाह झाला होता. हे ऍरेंज्ड मॅरेज होते. पृथ्वीराज कपूरचे मामा म्हणजे कृष्णाचे वडील. प्रेमनाथ, राजेंद्रनाथ ही तिची भावंडे. कृष्णाची बहिण उमा हिने पुढे जाऊन प्रेमचोप्रा बरोबर लग्न केले. त्यामुळे प्रेम चोप्रा आणि राजकपूर हे दोघे साडू झाले. कपूर खानदानला सगळं घरदार सांभाळणारी, घरेलू खानदानी बहु हवी होती जी कृष्णाच्या रूपाने मिळाली. त्यामुळे कृष्णाच्या बाजूने सगळे कपूर खानदान उभे होते त्यामुळे इच्छा असूनही राजच्या मनातली गोष्ट कधीच ओठावर आली नाही, विशेष म्हणजे पृथ्वीराजजींच्या तिच्यावर अतिव जीव होता. या सर्वाचं फ्रस्ट्रेशन राज नर्गिसवर काढत असे. नात्यांच्या गोतावळ्यात हरवलेल्या आणि भल्या मोठ्या एकत्र कुटुंबाचा कणा बनून राहिलेल्या राज कपूरला आपल्या डोळ्यादेखत नर्गिसला झुरताना बघावे लागले पण तिच्यासाठी काही करता आले नाही. यात त्याला खुनशी समाधान मिळत असावे. तितकेच क्लेशही होत असत. कदाचित यामुळेच राजने तिच्या सोबत जमतील तितके चित्रपट केले. रिअल लाईफ नाही तर रुपेरी पडद्यावर आपले सर्वात जास्त शेअरिंग राजने नर्गिससोबत केले. नर्गिसने जेंव्हा त्याला काय ते क्लिअर करण्याविषयी सुनावले तेंव्हा त्याने आपली असमर्थता व्यक्त केली होती. तेंव्हा नर्गिस आत्महत्येच्या निर्णयाप्रत गेली होती. नेमक्या याच काळात तिच्या आयुष्यात 'आगी'च्या निमित्ताने सुनीलदत्तची एन्ट्री झाली आणि तिने आपला आयुष्याचा जोडीदार त्याच्या रुपात शोधला. सुनीलदत्तमुळे नर्गिसची आत्महत्त्या टळली. सुनील दत्त व नर्गिस यांच्या प्रेमकहाणीवर किश्वर देसाई यांनी लिहिलेल्या 'डार्लिंगजी' ह्या पुस्तकात हा खुलासा आहे. नर्गिसने लिहिलेल्या रोजनिशीवर हे पुस्तक बेतलेले आहे. रुपेरी पडद्यांवर झळाळून गेलेल्या नर्गिसच्या ओठी आयुष्याचा वेदनामय आणि असहाय्यतेने काठोकाठ भरलेला प्यालाच आला होता ....

'बरसात'मध्ये एका प्रसंगात हाती व्हायोलीन राज रस्त्याच्या कडेला उभा असतो. त्याला पाहून नर्गिस त्याच्याकडे धावत येते. त्याला बिलगते. तो हलकेच तिला जवळ घेतो. मिठीतला आवेग ओसरताच ती त्याच्या हातावर वाकते, तिची मान खाली झुकते, पण तिचे डोळे त्याच्या डोळ्यात रोखलेले असतात. त्याचं चित्त तिच्यात गुंतलेलं. एका हातात ती अन एका हातात व्हायोलीन घेतलेला तो अन त्याच्या हातावर विसावलेली ती, हे दृश्य राजकपूरच्या मेंदूत फ्रीज्ज्ड झाले अन त्याच्या आरके प्रॉडक्शनला लोगो मिळाला ! आरकेची पुढची पिढी आजही हाच लोगो वापरत आहे. कपूर खानदानमधील तेंव्हाच्या सर्व सदस्यांना राज आणि नर्गिसमध्ये काय गुफ्तगू चालले आहे हे कळत होते पण राजबद्दल त्या सर्वाना खात्री होती त्यामुळे कपूर खानदानने त्यावर कधीच भाष्य केले नाही. अपवाद शम्मी कपूरचा. कारण शम्मी स्वतः नर्गिसचा मोठा फॅन होता. शम्मी आणि नर्गिसचा एक किस्सा आहे. एकोणीसशे सत्तेचाळीसचे साल होते ते. आरकेच्या 'आग'चे चित्रीकरण सुरु होते. उनाडक्या करत फिरणारा शम्मी तेंव्हा सतरा वर्षांचा होता. त्याला स्वतःला सिनेमात काम करण्याची भारी हौस होती. पण त्याचे माकडचाळे आणि गुण बघून घरच्या लोकांनीच त्याला कानपिचक्या देऊन ठेवल्या होत्या. त्या दिवशी शम्मीच्या कानावर बातमी आली की चेंबूरमधील आरके स्टूडीओमध्ये नर्गिस आलीय. नर्गिसला पाहण्याची ही संधी अजिबात वाया जाऊ द्यायची नाही, असा विचार करून स्वारी चेंबूरच्या आर. के. स्टुडिओत पोचली. आपल्या मोठया भावाचा राजचा दरारा माहीत असूनही आणि त्याला कामात कोणीही अडथळा आणलेला खपत नाही हे ठाऊक असतानाही शम्मी काहीसा घाबरतच स्टुडिओत पोचला. त्याची नजर सेटवर केवळ नर्गिसचा शोध घेत होती. पण त्याला ती कुठेच दिसेना. एवढ्यात कुणी तरी सांगितलं नर्गिस तिच्या खोलीत आहे. शम्मी आनंदाने मोहरला. नर्गिसला खोलीत भेटणं केव्हाही सुरक्षित आहे, असा विचार करून त्याची पावलं नर्गिसच्या खोलीकडे सरकली. थोडंसं बिचकतच शम्मीने नर्गिसच्या खोलीचं दार ढकललं. तेव्हा आतील दृश्य पाहून शम्मीच्या काळजात चर्रर झालं. नर्गिस खोलीत बसून रडत होती. शम्मीला क्षणभर काय करावं काहीच सूचत नव्हतं. कशासाठी आलो होतो आणि काय समोर दिसतंय? याच तंद्रीत असताना नर्गिसची नजर शम्मीवर पडली. नर्गिसने त्याला ओळखलं. डोळे पुसतच विचारलं, 'काय काम आहे?' नर्गिसचे शब्द जणू मधाचा प्रत्येक थेंब वाटावा, अशा अविर्भावात त्याने ते कानात साठवून घेतले. आपण कशासाठी आलो आहोत, हे नर्गिसला सांगण्याऐवजी तिच्या रडण्याचं कारण त्यांनी विचारलं. यावर नर्गिस म्हणाली, 'मला तुझ्या भावाच्या सिनेमात काम करायचंय. पण तो नाही म्हणतोय.' राज कपूर आपला मोठा भाऊ असला तरी त्याला त्याच्या कामात कोणाचीच ढवळाढवळ खपत नाही हे शम्मीला पुरतं ठाऊक होतं. याही पेक्षा राजला वशिल्याची आणि वशिलेबाजांची नफरत आहे, हे तर शम्मीला पक्के माहिती होतं. काय करावं? काहीच कळत नव्हतं. तेव्हा शम्मी धीर एकवटून नर्गिसला म्हणाला, 'मी तुझ्यासाठी प्रार्थना करीन...' शम्मीचं हे उत्तर ऐकून नर्गिस अतिशय भावूक झाली. तिने लागलीच शम्मीला घट्ट मिठी मारली आणि म्हणाली, 'जर मला तुझ्या भावाने त्याच्या 'बरसात' या चित्रपटात घेतलं तर मी तुला एक किस देईन...' नर्गिसचे हे शब्द कानावर पडल्यानंतर शम्मी केवळ बेहोष होऊन खाली कोसळायचाच बाकी होता ; पण असं होणार नव्हतं. कारण तो चक्क नर्गिसच्या मिठीत होता. पुढे नर्गिसला 'बरसात' मिळाला. राज-नर्गिस ही जोडी रुपेरी पडद्यावर हिट झाली ! पण नर्गिसने शम्मीला दिलेलं वचन पाळलं की नाही याबाबत शम्मीने कधीच कुणाला उघडपणे सांगितलं नाही. ते केवळ एवढंच सांगत, 'नर्गिसने मला किस करण्याचं वचन दिलं होतं...'ही माहिती शम्मीनी लहरेच्या एका मुलाखतीत सांगितली तेंव्हा ते लाजत होते. विनोदाचा भाग बाजूला केला तरी ह्या किश्श्यावरून राजचा जरी नर्गिसवर जीव असला तरी नर्गिसला कुठली फिल्म त्यांनी सहज दिली नाही हे सिद्ध होते. तिने जे मागितले ते तिला कधीच मिळाले नाही हेच खरे.

'इच का दाना बीच का दाना' अशी कोडी घालणारी नर्गिस 'घर आय मेरा परदेसी' ह्याच धूनमध्ये मग्न राहिली. तिच्या प्रेमाचे कोडे तिला सोडवता आले नाही. 'राजा की आयेगी बारात रंगीली होगी रात, मगन मै नाचूंगी' ही अवस्थादेखील तिला प्राप्त झाली नाही. तिचेही हात हळदीने माखले पण राजच्या नव्हे तर सुनील दत्तच्या ! 'दम भर जो इधर मुंह फेरे ओ चंदा मै उनसे प्यार कर लुंगी, बाते हजार कर लुंगी..' तिचे हे स्वप्न मात्र स्वप्नच राहिले. 'मेरा अंग अंग मुस्काया' असं आनंदाने गाणारया नर्गिसला 'काहे कोयल शोरे मचाये रे, मोहे अपना कोई याद आये रे. उसने काहे को नैन फिराये रे, जा के उसे कोई समझाये' हीच विराणी गावी लागली. 'मेरी आंखो में बस गया कोई रे' हे शब्द तिला काळजाच्या कुपीत बंद करून ठेवावे लागले. 'जागो, मोहन प्यारे ..' असं आर्त आळवूनही तिचा मोहन काही जागा झालाच नाही. 'उठा ये जा उनके सितम' हे मात्र तिला अंती नक्की उमगले असेल. पंछी बनू उडके फिरू

असं असूनही तिचं जीवन रसिलं होतं. अप्रतिम अभिनयाने सहज भूमिका साकारणारी नर्गिस स्वतःला आनंदी ठेवायचा प्रयत्न करे. अंतर्मन दुःखी असलं तरी वरवर हसतमुख राहायची. खळाळून हसायची. हसता हसता डोळ्यात पाणी येईल इतकं दिलखुलास बोलायची. तिची लाईफस्टाईल लॅव्हिश नव्हती. बहुतांश करून ती सगळीकडे साडीवरच असायची. फिल्मी पार्ट्या, भपकेबाज सोहळे असो की कुठल्या कोस्टारचा खाजगी कार्यक्रम असो ती 'सेम ऍज लाईक नूतन'प्रमाणे नटून थटून जात नसे. तरीही तिची दखल आपोआप घेतली जाई. तिच्या आवडीनिवडी अनोख्या होत्या. तिचा सेन्स ऑफ ह्युमर जबरदस्त होता. त्याचबरोबर ती जिज्ञासूही होती. याचा एक किस्सा आहे. गुरुदत्त च्या चित्रपटांसाठी त्याच्याबरोबर लेखनसहाय्य करणारा, सुप्रसिद्ध आणि नावाजलेल्या 'साहेब बीबी और गुलाम' या चित्रपटाचा दिग्दर्शक अबरार अल्वी आणि गुरुदत्त लंडनला जाणा-या विमानात बसले होते. ह्याच विमानात नुकत्याच गाजलेल्या 'मदर इंडिया'च्या यशानं झळाळणारी नर्गिसही होती. प्रवासात त्या तिघांमधे सिनेमाजगतातल्या विविध विषयांवर मस्त, दिलखुलास हसतखेळत गप्पागोष्टी झाल्या. या गप्पांवर प्रत्येकाच्या खास व्यक्तीमत्वाची, उत्तम वाचनाची आणि प्रत्येक गोष्ट विचारपूर्वक करण्याच्या वृत्तीची खास छाप होती. पुढे पॅरिसला दोन तासांचा स्टॉप-ओव्हर आला. अल्वीची ही पहिलीच परदेशवारी होती. आधीच अल्वी उंची अत्तरांचा शौकीन आणि त्यात पॅरीस उत्तमोत्तम उंची अत्तरांसाठी विशेष प्रसिद्ध होता. एखाद्या लहान मुलासारख्या उत्साहात अत्तराच्या विविध बाटल्यांचे आकर्षक आकार पाहून अल्वीने एअरपोर्टवर अनेक प्रकारच्या अत्तरांची खरेदी केली. नर्गिस थोडा वेळ हे सगळं दुरुन शांतपणे पाहात होती. अल्वीने कोणताही विचार न करता, अतिउत्साहाच्या भरात केलेल्या ह्या अत्तरांच्या खरेदीनं अस्वस्थ होऊन शेवटी न राहवून नर्गिसने ह्या सगळ्या खरेदीचा ताबा घ्यायचं ठरवला.
नर्गिसने त्याला विचारले की 'अबरार, आत्तापर्यंत तू खरेदी केलेली ही सगळी अत्तरं स्त्रियांसाठीची आहेत. त्यांचा तुझ्या वापरासाठी काहीच उपयोग नाही. तुला ती वापरता येणार नाहीत.'
अल्वीने उत्सुकतेने तिला प्रश्न केला की 'खरंच अत्तरांमधे स्त्री, पुरुष असा लिंगभेद असतो का ?'
नर्गिसच्या चेह-यावर एक प्रसन्न हास्य उमटलं आणि तिनं अबरारला अत्तरं बनवण्यामधलं शास्त्र, त्यातली कला, त्यातली अभिरूची, अत्तरांमुळे निर्माण होणारी वातावरणनिर्मिती, त्यांचा माणसाच्या मानसिक स्थितीवर होणारा प्रभाव अशी खूप सारी माहिती सांगितली. स्त्री आणि पुरुषांनी वापरायच्या अत्तराच्या गुणधर्मात असलेला फरक सांगून, वर्षानुवर्षांच्या अभ्यासानंतर आणि कलात्मक विचारसरणीनुसार, स्त्री आणि पुरुषांसाठी असलेली अत्तरं कशी वेगळी असतात ते समजावून सांगितलं. नर्गिस नुसतीच गंधवेडी नव्हती तर तिला त्यातले सखोल ज्ञान होते. असं असूनही ती तृप्त नव्हती, ती विस्कटलेली होती.

आयुष्यभर तृप्ततेच्या शोधात राहिलेल्या नर्गिसची मनोवस्था किती दारूण होती याचं नेमकं वर्णन राम औरंगाबादकर यांनी लिहिलेल्या 'नर्गिस' ह्या पुस्तकात आहे. नर्गिसची आई जद्दन बाई हिच्या घरात राम औरंगाबादकर नोकर होते. नंतर त्यांच्या वाटा वेगळ्या झाल्या. परंतु नर्गिसच्या घरी जाणे-येणे होते. त्यातून त्यांनी नर्गिसच्या आयुष्याचे जे धिंडवडे निघालेले पाहिले, तेच त्यांनी पुस्तकात लिहिले आहेत. नर्गिसच्या आयुष्यात खरोखरीच त्यांना निकटचे स्थान असल्याने त्यांनी सांगितलेल्या या गोष्टी खोट्यानाट्या आहेत, असे कुणीच म्हणू शकणार नाही. नर्गिस त्यांच्यासमोरच लहानाची मोठी झाली. तिच्या आयुष्याचे खरे धिंडवडे राज कपूर या बाहेर अत्यंत उज्ज्वल प्रतिमा मिरवणा-या माणसानेच काढले ह्या काटेरी सत्याची टोचणी हे पुस्तक देते. राजच्या चाहत्यांना हे पुस्तक आवडणार नाही पण नर्गिसच्या चाहत्यांनी वाचले तर त्यांचे डोळे नक्की पाणावतील. राजची पडद्यावरील आणि खरीही प्रतिमा म्हणजे निळ्या डोळ्यांचा भावविभोर प्रियकर अशीच आहे. नर्गिससाठी मात्र तो जितका वरदान ठरला त्याहून कैक पटींनी शाप ठरला. राजसाठी नर्गिस वेडी झाली होती. तिच्या या वेडाचा पुरेपूर फायदा राजने आपल्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी आणि आपल्याही करिअरसाठी करून घेतला. नर्गिसवर त्याने अनेक प्रकारचे मानसिक अत्याचार केले. नर्गिस कुणाशी हसून बोलली तरीही तिच्यावर फुकाचा अधिकार सांगणा-या राजला सहन व्हायचे नाही. मग तो रागारागाने सेटवरच तिला आपल्या पायातले बूट काढायला सांगायचा. ती बिचारीही ते करून त्याचा राग घालवायला पाहायची. अर्थात नर्गिसचे सर्व प्रकारचे शोषण करणारा राज एकटाच होता, असे नाही. नर्गिसची आई जद्दन बाई, नर्गिसच्या आयुष्यात आलेला पहिला प्रियकर कॅप्टन अन्सारी आणि भाऊ अख्तर हुसेन-अन्वर हुसेन यांनीही तिचा गैरफायदा घेतला होताच.

नियतीच्या प्रखर उन्हात नर्गिसचे हे फुल सुकले असते, पण तिला नायिकेची पहिली संधी देणारया मेहबूबखान यांनी तिला एकोणीसशे सत्तावन्नमध्ये 'मदर इंडिया' ऑफर केला आणि तिचे आयुष्य पालटले. सुनीलदत्तबद्दल नर्गिस तिच्या डायरीत लिहिते की, ''केवळ त्याच्यासाठी मी जगण्याचा निर्णय घेतला. अन्यथा आठ मार्चपूर्वी मी माझे जीवन संपविण्याचे ठरविले होते. माझ्यात काय गोंधळ चालला आहे, हे केवळ मलाच माहित होते. पण त्याने सांगितले, की तू माझ्यासाठी जग, त्यानंतर मलाही त्याच्यासाठी जगावेसे वाटू लागले. आणि मग त्यानंतर सर्व काही पूर्वीसारखे सुरू झाले.'' यावरून नर्गिसच्या मनात चाललेल्या कोलाहलाची कल्पना यावी. सुनीलदत्त तिच्या आयुष्यातील शोषणाच्या वेदनादाहावर शीतल मेघासारखा बरसला ‘मदर इंडीया'त सुनील दत्तनी नर्गीसच्या लहान मुलाची भूमिका साकारली होती. या सिनेमातील आगीचा सीन शूट होत असताना अचानक नर्गिस या आगीत सापडली गेली. आग चांगलीच मोठी होती. पण कुणीही आगीत जाण्याचे धाडस करत नव्हते अशात सुनील दत्तनी आगीत उडी घेऊन नर्गीस यांचे प्राण वाचवले. आयुष्यभर कुणाकरिता तरी काही तरी देत राहणारया नर्गिसला कुणीच काही दिले नव्हते. मात्र सुनीलदत्तने तिला सदैव खूप काही दिले. पण पुढे तिचेच हात थिटे पडले. प्रेमाला आसुसलेल्या नर्गिसच्या मनात ह्या घटनेमुळे प्रेमांकुर फुलले. त्याचे रुपांतर पुढे लग्नाच्या बेडीत झाले. १९५८ मध्ये नर्गिसचा सुनीलदत्त सोबत विवाह झाला. त्यानंतर तिने फक्त दोनच चित्रपटात काम केले. ते देखील पूर्वी साईन केलेले असल्यामुळे. इतकी ती दत्तमय होऊन गेली, नव्हे इतकी ती प्रेमाला आसुसलेली होती. अंतर्बाह्य प्रामाणिक असणारी नर्गिस आपल्या संसारात रमली. आपले कुटुंब आणि पती सुनील दत्त यांना तिन आपल्या जीवनाचा सारा उत्तरार्ध वाहिला. या काळात तिने आई, समाजकार्यकर्ती, गृहकृत्यदक्ष पत्नी अशा अनेक भूमिका चोख पार पडल्या. नर्गिस- सुनीलदत्तच्या संसारवेलीवर संजय, नम्रता आणि प्रियाच्या रूपाने तीन फुले उमलली. ती मुलाबाळात इतकी रममाण झाली की तिने कॅज्युअल लाईफमधले आपले जीवन सार्वजनिक करताना खंत बाळगली नाही. रस्त्यावर पाणीपुरी खाणं असो, थियेटरवर जाऊन सिनेमा बघणे असो, खरेदीला बाहेर पडणं असो तिनं कधी स्टारडमची मिजास बाळगली नाही. तरुणवयापासूनच बुरखा घालणं पसंद नसणारी नर्गिस दत्त कुटुंबात जाऊन सर्वसामान्य माणसांचं जगणं आवडीने जगू लागली होती. तिने सुनीलसोबत अजंठा आर्ट्स क्रिएशन हे होम प्रॉडक्शन हाउस काढले. अशा प्रकारे ती मनसोक्त जीवन जगत असताना नियतीने पुन्हा तिच्या हातातोंडाशी आलेले सुख हिरावून घेतले. तिला व्याधीने आतून पोखरून काढले होते. तिला पॅनक्रीऍजचा कॅन्सर झाला होता. तिच्या ह्या दुखण्याने ती पुरती खचून गेली पण सुनील दत्त अक्षरशः सावलीसारखा तिच्यासोबत राहिला. स्पास्टीक्स सोसायटी ऑफ इंडियासाठी काम करणारया नर्गिसला शेवटचे काही महिने अंथरुणाला खिळून राहावे लागले. सदैव कॉटन ऑर्गान्झाच्या एम्ब्रोयडरी केलेल्या साड्या घालणारी नर्गिस तिच्या अखेरपर्यत तशाच वेशात होती. तिच्या आजारावरील उपचारासाठी तिला न्युयॉर्कला स्लोन केटरिंग मेमोरियल हॉस्पिटल इथे नेले गेले. तिथे तिच्या प्रकृतीत सुधारणा झाली. भारतात परतल्यावर मात्र तिची तब्येत खूपच खालावली. तिला ब्रीच कँडीमध्ये दाखल केले गेले. तिथे दोन मे १९८१ ला कोमात गेली आणि दुसऱ्याच दिवशी ती देवाघरी गेली. नियतीने तिला इथेही चकवा दिला. तिच्या मृत्यूनंतर अवघ्या चार दिवसांनी तिच्या मुलाचा संजयदत्तचा पहिला सिनेमा 'रॉकी' ७ मे १९८१ ला प्रदर्शित झाला. नर्गिसच्या जाण्याचा मोठा धक्का दत्त कुटुंबियांना बसला. सुनील दत्त तर रात्री अपरात्री तिच्या कबरीजवळ जाऊन बसू लागले. संजय दत्तचे मानसिक संतुलन ढासळले. तो ड्रग्जच्या आहारी गेला. सुनीलदत्त डिप्रेशनमध्ये गेले. सुनील दत्तनी नर्गिसच्या आजारपणावर 'दर्द का रिश्ता' हा चित्रपट बनवला. नंतर नर्गिसच्या नावाने कॅन्सरग्रस्त लोकांच्या मदतीसाठी संस्था उभी केली जी आजही कार्यरत आहे. नर्गिस हयात असताना तिच्या कुठल्याच अपत्याचे लग्नही झाले नव्हते. तिच्या मृत्यूनंतर तीन वर्षांनी थोरली कन्या नम्रता हिचा विवाह राजेंद्रकुमारचा मुलगा कुमार गौरवशी झाला, हा विवाह जुळवण्यापासून ते आपल्या भावाला, पित्याला खंबीर आधार देण्यापर्यंतचे कठीण काम सर्वात लहान असणारया प्रियाने केले. कदाचित म्हणूनच जेंव्हा सुनील दत्तनी स्वतःला सावरले तेंव्हा आपल्या सार्वजनिक जीवनाचा राजकीय, सामाजिक वारसा प्रियाकडे दिला होता. पण खरया अर्थाने तिच्याकडे समाजसेवेचावारसा नर्गिसमुळेच आला होता.

सुख नर्गिसच्या जवळ आलं, थोडीशी तृप्ती तिला मिळाली पण अलगद पारा निसटावा तसं आयुष्य तिच्या हातून निसटून गेलं. तिला संपूर्ण तृप्ती कदाचित मिळाली नसेल पण एक पत्नी, एक गृहिणी, एक आई आणि एक टिपिकल भारतीय विवाहित महिला ह्याचे सुख तिला तिच्या स्टारडमपेक्षा हिमालयाहून मोठे वाटले हे निश्चित ! कदाचित ह्या सुखावरच तिचे नर्गिसी फुल जन्नतमधे अजूनही तजेलदार असेल ! तिच्या अढळ तारयासोबत चिरशांतीच्या तृप्त मुद्रेत 'आजा सनम मधुर चांदणी में हम तुम मिले तो वीराने में भी आयेगी बहार' हे गाणं गात असेल....
'जब जब उनकी याद आयेगी दिल पे लगेगी ठेस, नयनो में होंगी बरसात, अंधेरी होगी रात' असं नर्गिस 'आह'मध्ये गाते. मी मात्र हे गाणं तिच्या स्मृतीसाठी गातो. 'एका मनस्वी अभिनेत्रीच्या करिअरला एका मनस्वी स्त्रीने दिलेली मात' असं जिच्या जीवनाबद्दल म्हणता येईल त्या नर्गिसला ही शब्दसुमने अर्पित ....

- समीर गायकवाड.

संदर्भ - 'डार्लिंगजी, द ट्रु लव्ह स्टोरी ऑफ नर्गिस अँड सुनील दत्त' - लेखक : किश्वर देसाई, प्रकाशक - हार्परकॉलिन्स.
'नर्गिस' - लेखक : राम औरंगाबादकर, अनुवाद : रमेश उदारे, अनघा प्रकाशन.

माझा ब्लॉगपत्ता -
https://sameerbapu.blogspot.in

b47a627c56a2437d0eee271d20a14fa8.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान, सविस्तर लिहिले आहे..

लग्नानंतर तिने रात और दिन आणि लाजवंती केले बहुतेक. दोन्ही चित्रपटातील गाणी सुंदर होती.
त्याशिवाय सुनील दत्त च्या यादें मधे ती फक्त सावली म्हणून दिसली होती.. हा एकपात्री चित्रपट होता.

छानच लेख. आवडला. संजय दत्त जेव्हा ड्रग्ज च्या सवयीच्या आधीन होत होते तेव्हा त्यांना गोड खूप
खायला लागायचे. तर नर्गिसजी फ्रिज मध्ये कायम गुलाब जाम पेढे आहेत ना ते चेक करत. नसले तर आणायला सांगत. त्यांचे आजारपण जाणॅ व संज यचा सिनेमा रिलीज होणे. हे सर्व तेव्हा स्टार डस्ट मध्ये वाचले आहे. संजय ने पण तसे खूप सहन केले आहे. पहिल्या पत्निचे कॅन्सरने जाणे बाकी जेल वास कोर्ट केसेस. दुसृया पत्नीने सोडून जाणे परत कारावास आता त्याला दोन बारक्यांबरोबर पाहिले की खूप छान वाट्ते. त्याने कारावास भोगून संपवला म्हणू तो जास्त क्रेडिबल वाटतो भाई पेक्षा.

चोरी चोरी सिनेमात अति शय अवखळ मुलगी म्हणून फार गोड काम केले आहे. व दिसल्या आहेत.

छान लिहिलंय. नर्गिसबद्दल इतकं सगळं माहिती नव्हतं. खूप गुणी अभिनेत्री होती ही. राज कपूर मुळातच आवडत नाही, खरं खोटं जे असेल ते, पण आता त्या नावडण्यात आणखी भर पडली.

सुनील दत्तांबद्दलही लिहा. त्यांच्यातला सुसंस्कृतपणा त्यांच्या भुमिकांमधूनसुद्धा दिसतो, त्यामुळे त्यांच्याबद्दलही कुतूहल आहे.

नर्गिस बद्दल इतकी माहिती नव्हती. राज कपूर या माणसाबद्दल मला कधीच आदर वाटला नाही, आज पक्की खात्रीच झाली.
सुनील दत्त आवडत होतेच, त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला.
लेख छान आणि ओघवता आहे. आवडला.

नर्गिसने संजयचा सिनेमा बघितला, हे वचून वाईट वाटले पण त्याचबरोबर बाकीच्या गोष्टी पहाव्या लागल्या नाही हे बरेच झाले. असं म्हणतात की पोरापायी सुनील दत्त इतके कर्जबाजारी झाले होते की मुन्नाभाई मध्ये काम करावं लगलं. खखोदेजा....

संजय दत्त ने बाल कलाकार म्हणून रेश्मा और शेरा मधे काम केले होते आणि तो चित्रपट नर्गिस ने बघितला होता.

बापू,
छान लेख !!
वर बर्याच प्रतिसादांमध्ये लिहिल्या प्रमाणे, मला पण राज कपूर कधीच आवडला नाही, शो-मॅन म्हणुन ते ग्रेट असतील ही, पण लहरी/व्हिमझीकल पणा त्याच्या डोळयात च दिसतो, तर दत्त साहेब नेहमीच आवडले आहेत्...प्रेमळ, सोज्वळ आणि खुप आश्वासक भाव होते त्यांच्या चेहेर्यावर Happy दक्षिणा ने म्हण्ट्लयं ते च मी पण म्हणतो..."सुनील दत्त आवडत होतेच, त्यांच्या बद्दलचा आदर दुणावला..." Happy

पहिल्या वाक्यालाच दाताखाली खडा आल्यासारखा वाटला Happy नूतन, मधुबाला, मीनाकुमारी, वैजयंतीमाला यांची मर्मस्थळे अचूक दाखवली आहेत. त्यातले एकही नर्गिसकडे नव्हते. कॉम्बो तर सोडाच Happy

असे असतानाही ती प्रसिद्धीच्या शिखरावर चढू शकली याचे एकमेव कारण म्हणजे आर.के. ! मदर इंडीया वगळता राजशिवाय तिला उल्लेखनीय यश कधीच मिळाले नाही.

माझ्या माहितीप्रमाणे ती आर.के.चे सगळे निर्मिती व्यवहार सांभाळायची. कपडेपटाची तर ती प्रमुख होती. त्याचमुळे ती जेंव्हा आर.के.मधून बाहेर पडली तेंव्हा बर्‍यापैकी पैसा पदरी बाळगून होती. असे असताना आर.के.ने तिचे शोषण केले हा आरोप अगदीच गैरलागू ठरतो. तुम्ही म्हणता तसे 'भावनीक शोषण' खरे धरले तर तिच्यासारखी सुविद्य आणि जगाचा अनुभव असलेल्या स्त्रीने तसे का होऊ दिले? मला तरी एकच कारण दिसते ते म्हणजे "आर.के.बरोबर राहण्यातच आपले हित आहे हे तिला पक्के ठाऊक होते". मग त्याला शोषण का म्हणावे?

जेवढी तिला आर.के.ची गरज होती तेवढीच आर.के.ला तिची गरज होती. त्याच्या कारकिर्दीचे सरळ दोन कालखंड पडतात - १. नर्गिस बरोबरचा २. नर्गिस शिवायचा. पहिल्या टप्प्यात तो खराखुरा शोमन होता नंतरच्या टप्प्यात मात्र तो काही वेगळेच शो करायला लागला. मी त्या दोघांपैकी कोणाचाच चाहता नाही पण पडद्यावर त्यांच्यात जी केमिस्ट्री होती तिचा प्रचंड चाहता आहे. इतकी सुंदर केमिस्ट्री नंतर फार कमीवेळा दिसली.

आर.के. आणि नर्गिस एकमेकांना पूरक होते. ना कम ना ज्यादा.

सुनिल दत्त आणि नर्गिस एकाच वयाचे होते हे कुठल्या तरी लेखात वाचलं असल्याचं आठवलं. म्हणून विकीवर पाहिलं तर सुनिल दत्त ह्यांची जन्मतारीख 6 June 1929 अशी दिली आहे तर नर्गिस ह्यांची 1 June 1929. अर्थात ह्यात चूक असेल तर माहित नाही.

नर्गिस म्हटलं की मदर इंडिया हा तिच्या अभिनयाचा मापदंड समजला जातो. पण त्याआधी राज कपूर बरोबर 'अनहोनी' चित्रपटात तिने दुहेरी भूमिका अतिशय सुरेख केली आहे. त्यात राज कपूरनेही अतिशय संयत अभिनय केला आहे. राज-नर्गिसच्या चित्रपटांमधे या चित्रपटाचा अभावानेच उल्लेख होतो याचे आश्चर्य वाटते. आग, आह यापेक्षा नक्कीच तो वरच्या दर्जाचा आहे. कदाचित तो ज्यावेळी आला त्यावेळी राज-नर्गिस जोडी अजून प्रसिद्ध झाली नव्हती हे ही कारण असेल.