नादिया मुराद - द लास्ट गर्ल

Submitted by स्वेन on 2 July, 2021 - 05:06

अडॉल्फ हिटलरचं मेईन काम्फ, एपीजे अब्दुल कलाम यांचं विंग्ज ऑफ फायर, नेल्सन मंडेला यांचं लाँग वॉक टू फ्रिडम, राकेश मारिया यांचं लेट मी से इट नाऊ, बराक ओबामा यांचं अ प्रॉमिस्ड लॅंड, देव आनंद यांचं रोमान्सींग विथ लाईफ ही अशी आत्मकथनाची पुस्तकं हातात पडल्यावर आपण वाचायला सुरुवात करतो आणि मग ते पुस्तक वाचून संपवल्याशिवाय खाली ठेववत नाहीं. यात, विषयाची मांडणी काही वेळा स्फोटक असते, उत्सुकता पानागणिक चाळवळी जाते, हाताळलेले जागतिक किंवा देशांतर्गत प्रश्न आणि त्यांची उत्तरे वाचल्यावर आपण अचंभित होतो , पुस्तकात लेखकांनी दिलेल्या मुलाखती वाचल्यानंतर त्यांची प्रगल्भता जाणवायला लागते , लेखकाला भेटलेली माणसे किती आणि कशा प्रकारची होती हे कळून माणसाच्या विविध प्रकारच्या मनोव्यापाराची ओळख होते, आणि या सर्व गोष्टी वाचल्यानंतर आपण अगदी अंतर्मुख होऊन जातो. एका वेगळ्या परिप्रेक्ष्यातून आपण जगाकडे बघायला लागतो आणि आपला दृष्टिकोन बदलून जातो. पूर्वग्रह संपतात आणि नवीन प्रश्न समोर उभे राहतात आणि मस्तक भणाणून सोडतात. त्याच वेळी या पुस्तकातून आपल्या देशासाठी काही सूचना, काही संदेश मिळतात का असा विचार केला तर तशीही उदाहरणे मिळतात आणि मग अशा पुस्तकाचे मूल्य (छापील किंमत नव्हे) आपल्याला कळते. कालांतराने नवी पुस्तके येत राहतात आणि जुन्या पुस्तकावर धूळ साचते. इतिहासाची पुनरावृत्ती नव्या प्रकारे होते आणि धूळ साचलेले पुस्तक कपाटातून बाहेर येते, आणि पुन्हा नव्याने वाचले जाते, वेगळया दृष्टीकोनातून, वेगळ्या परिप्रेक्ष्यातून. हे असेच एक पुस्तक " द लास्ट गर्ल ", इराकच्या नादिया मुराद हिने लिहिलेले आत्मकथन.

इराक देशाचा सर्वे सर्वा सद्दाम हुसेन याला फाशी दिल्यानंतर इराक मध्ये एकूणच अराजकता माजली आणि त्याचा फायदा घेऊन १९९९ साली स्थापन झालेल्या आयएसआयएस
( इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरिया) किंवा आयसिसने २००४ साली अल् कायदा या अतिरेकी संघटनेशी हातमिळवणी केली, आणि अमेरिकन फौजांना हुसकून लावण्यासाठी अमेरिकेला मदत करणाऱ्या इराकी सैन्याविरुद्ध लढाई सुरू केली. इराकमध्ये रोजचे बॉम्ब स्फोट, रक्तपात, जीवित हानी अशा अस्थिर परिस्थितीत इराकी जनता जगू लागली. २०१४ मध्ये आयसिसने इराक मधील मोसुल हे शहर ताब्यात घेतले. सिंजर प्रांतात हल्ला केला आणि हजारो लोकांच्या कत्तली केल्या.

नादिया आई आणि भाऊ-बहिणींसोबत इराकच्या उत्तर भागातल्या कोचू गावात राहणारी. ३ ऑगस्ट २०१४ या दिवशी इथल्या याजीदी लोकांवर आयसिसच्या आतंकवाद्यांनी हल्ला चढवला. त्या भागातले अनेक गावकरी जवळच असलेल्या सींजर पर्वताच्या दिशेने पळाले. पण नादिया, तिचे कुटुंब आणि काही गांवकरी आयसिसच्या तावडीत सापडले. ३ ते १५ ऑगस्ट पर्यंत या सगळ्यांना ओलीस ठेवण्यात आलं. याजीदी धर्माचे लोक मुस्लिम नाहीत. या धर्मातली तत्वे पारसी आणि ख्रिश्चन धर्माशी जुळतात. म्हणून आतंकवाद्यांनी गावकऱ्यांना इस्लामचा स्वीकार करण्यासाठी २ दिवसांची मुदत दिली. त्या वेळी गावकऱ्यांना कळलं की इस्लाम नाकारणाऱ्या जवळजवळ तीन हजार लोकांना मारण्यात आलंय आणि साधारण पाच हजार स्त्रिया व मुलांना बंधक बनवून ठेवलंय.

त्यानंतर १५ ऑगस्टला आयसिसचे हजारो आतंकवादी गावात घुसले. गावातल्या शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या मजल्यावर सर्वांना गोळा करण्यात आलं. तिथे स्त्रिया आणि पुरुष असे दोन गट पाडून त्यांच्याकडील सर्व वस्तू काढून घेण्यात आल्या. थोड्या वेळाने त्यांच्या नेत्याने घोषणा करून सांगितलं की ज्यांना इस्लाम स्वीकारायचा आहे ते या खोलीतून बाहेर जाऊ शकतात. नादिया लिहिते, ‘ कोणीही बाहेर गेले नाही. यानंतर पहिल्या मजल्यावरच्या सर्व पुरुषांना एकत्रितपणे बाहेर घेऊन जाण्यात आलं. बाहेर काय घडतंय कळत नव्हतं पण थोड्या वेळानंतर गोळ्या घातल्याचा आवाज येत राहिला. त्या पुरुषांत माझे भाऊ होते. त्या नंतर आम्हाला बाहेरच्या मोठ्या बस मध्ये बसवून दुसऱ्या गांवात नेलं. तिथे उतरल्यानंतर तरुण मुली, लहान मुलं आणि प्रौढ बायका असे तीन गट करण्यात आले. त्यात माझ्या (नादियाच्या) आई सकट प्रौढ बायकांना गोळ्या घालून ठार करण्यात आलं. लहान मुलांचं काय झालं कळलं नाही.

' मग माझ्यावर आणि बाकीच्या मुलींवर रात्रभर अत्याचार करण्यात आला. दुसऱ्या दिवशी ते आम्हाला मोसुलच्या इस्लामिक कोर्टात घेऊन गेले आणि तिथे सगळ्या मुलींचे फोटो घेण्यात आले. या कोर्टात हजारो महिलांचे फोटो लावलेले होते. फोटोखाली त्या महिलाना पकडून आणलेल्या माणसांचा फोन नंबर होता. आयसिसचे आतंकवादी तिथे येऊन मुलींची निवड करायचे. मग मुलींचा योग्य तो भाव लावला जायचा आणि गिऱ्हाईकाला विकण्यात यायचे. घेऊन जाणारा आतंकवादी मुलींना ‘भाडे तत्वावर’ द्यायचा किंवा जवळच्या माणसाला ‘भेट’ म्हणून द्यायचा. मला सुद्धा अशाच प्रकारे विकण्यात आलं.'

नादियाने एके दिवशी खिडकीतून उडी मारली, आणि पळून जाण्याचा प्रयत्नात असताना पकडली गेली. शिक्षा म्हणून तिला चाबकानी फोडण्यात आलं आणि तिच्यावर सहा सुरक्षाकर्मींनी बलात्कार केला. यानंतर जवळ जवळ तीन महिने तिच्यावर सिगारेटचे चटके देण्यापर्यन्त अत्याचार होत राहिला. काहीं मुलींनी अत्याचाराला कंटाळून जीव दिला. एकदा घरी कोणी नसताना ती हिमतीने तिथून निसटली आणि एका मुस्लीम परिवाराच्या दारात पोहोचली. या परिवाराला तिची दया येऊन त्यांनी तिला कुर्दिस्तानच्या सरहद्दीपर्यंत नेऊन सोडलं.

या अत्याचाराच्या बातम्या जगात पसरू लागल्या. जर्मनीने एक हजार लोकांना आसरा देण्याची घोषणा केली, ज्यात नादिया होती. जर्मनीतील एका संघटनेने तिला संयुक्त राष्ट्रसंघात जाऊन आपली कहाणी सांगण्याचा सल्ला दिला. ही भयानक कहाणी नंतर तिने युनोमधील भाषणात कथन केली. आता ती नरसंहार आणि मानवतेविरूद्धच्या गुन्ह्यांच्या आरोपाखाली इस्लामिक स्टेटला आंतरराष्ट्रीय कोर्टासमोर उभे करण्याचे काम सध्या करीत आहे. इंटरनॅशनल लॉ आणि ह्यूमन राइट्स यात विशेष प्राविण्य असणाऱ्या अमाल क्लूनी ( प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेते जॉर्ज क्लूनी यांची पत्नी) ह्या तिच्या वकील आहेत. नरसंहार आणि मानवी तस्करीपासून वाचलेल्यांच्या पुनर्बांधणीसाठी मदत अशी कामे या दोघी करत आहेत. नादियाची कहाणी ऐकून अमाल क्लूनी यांनी तयार केलेला अहवाल आणि विश्लेषण याची दखल घेउन आयसिसने केलेल्या नरसंहाराचे पुरावे गोळा करण्यासाठी संयुक्त राष्ट्रसंघाने एक तपास संघ गठित केला आहे. आयसिसच्या सदस्यांवर व्यक्तिशः खटले भरण्यात येणार आहेत.

२०१८ साली शांततेच्या नोबेल पुरस्काराची घोषणा झाली त्यात २५ वर्षाच्या नादिया मुराद हिला, लैंगिक अत्याचाराला युद्धादरम्यान हत्यार म्हणून वापरण्याविरुद्ध तिने जो लढा दिला आहे त्याबद्दल नोबेल पुरस्कार जाहीर झाला. ती ' मलाला युसूफझाई' नंतर सर्वात कमी वयाची नोबेल पारितोषिक विजेती आहे.

"द लास्ट गर्ल " हे पुस्तक म्हणजे तिचे आत्मकथन. अंगावर काटा आणणारे, अंतर्मुख करून सोडणारे, पाशवी अत्याचाराची परिसीमा सांगणारे आत्मकथन. २०१६ च्या सुमारास बरेच तरुण भारतातून आणि मुख्यतः मुंबईतून इराकला आयसिसमध्ये सामील व्हायला जात असत. ते कशासाठी जात असावेत याचे उत्तर हे पुस्तक वाचल्यावर मिळते.

रशियन फौजा १९८९ साली अफगाणिस्तानातून परत गेल्यावर मुजाहिदीन आणि तालिबान अत्याचार करायला मोकळे झाले होते. त्यांनी पाकिस्तानच्या आयएसआय आणि जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट या अतिरेकी संघटनेशी संधान बांधले. त्याचा परिणाम काश्मीरमधील पंडीतांवर अत्याचार, बायकांवर बलात्कार करून शरीराचे तुकडे करण्यात झाला. लाखो पंडित विस्थापित झाले, शेकडो मारले गेले. ते रक्त अजूनही भळभळत आहे.

आता २०२१ मध्ये अमेरिकन फौजां अफगाणिस्तानातून परत जात आहेत. तालिबान्याना परत रान मोकळे झाले आहे. पाकिस्तानच्या आयएसआय बरोबर ते आपले संबंध परत वृद्धिंगत करतील? जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हिंसाचार होईल? ही इतिहासाची पुनरावृत्ती असेल? हे तर येणारा काळच ठरवेल.

याच पार्श्वभूमीवर "द लास्ट गर्ल" या पुस्तकाची पाने नव्याने उलटली गेली.

पुस्तकातल्या शेवटच्या परिच्छेदात नादिया म्हणते, " ......मी भाषणात सांगितलं, की प्रत्येक यजिदीची हीच इच्छा आहे
कि आयसिसला वंशहत्येबद्दल शिक्षा व्हायला हवीच. माझ्यावर बलात्कार करणाऱ्या लोकांच्या डोळ्याला डोळा भिडवायचा आहे मला आणि त्यांना कोर्टात उभं केलेलं पाहायचं आहे. बाकी काहीही असलं तरी माझी इच्छा आहे कि कुणाचीही कहाणी माझ्यासारखी असू नये... मीच अशी कहाणी असलेली जगातली शेवटची मुलगी असावे... द लास्ट गर्ल."

......

Group content visibility: 
Use group defaults

पुस्तक परिचय छानच आहे. विषय फार भयानक आहे, पण तुमचा लेख वाचल्यावर पुस्तक मिळवुन वाचण्याची इच्छा आहे. वाचण्याची उत्सुकता हा शब्दप्रयोग या विषयावरच्या पुस्तकाबद्दल करूच शकत नाही. फारच दुर्दैवी विषय आहे.
या पुस्तकाची ओळख करून देण्यासाठी आभारी आहे.

बेकार आहे.
तुम्ही चांगलं लिहीलंय.
नादिया सारखं कोणाबाबतही घडू नये. तिच्याबाबतही घडायला नको होतं. याझिदींवरच्या अत्याचाराबद्दल मागे वाचलं होतं.

गावकऱ्यांना इस्लामचा स्वीकार करण्यासाठी २ दिवसांची मुदत दिली. त्या वेळी गावकऱ्यांना कळलं की इस्लाम नाकारणाऱ्या जवळजवळ तीन हजार लोकांना मारण्यात आलंय आणि साधारण पाच हजार स्त्रिया व मुलांना बंधक बनवून ठेवलंय
>>>मला हे कळत नाहीय, परिणाम काय होतील हे माहीत असूनपण गावकऱ्यांनी असे का केले?
धर्मांध दोन्हीकडचे लोक झाले असे करून...

भयंकर. या आयसिस लोकांना लवकर शिक्षा व्हायला पाहिजे.

नादिया सारखं कोणाबाबतही घडू नये. तिच्याबाबतही घडायला नको होतं. +1

मीच अशी कहाणी असलेली जगातली शेवटची मुलगी असावे... द लास्ट गर्ल. >> हे वाचून काटा आला.

नादीयाबद्दल खुप काही वाचले आहे. त्यामुळे पुस्तक वाचायची हिंमत होणार नाही.

च्र्पस,
धर्माबद्दल काय वाटायला हवे याबद्दल मी काही बोलू शकत नाही कारण हिंदूमध्ये धर्माच्या बाजूने बोलणे गाढवपणा मानला जातो. पण तुटपुंजे हिंदू सोडले तर त्याबाहेरील जगात भाषा, प्रांत, धर्म ह्या ओळखी अभिमानाने सांगितल्या जातात. याझिदींनी प्राण गमावणे श्रेयस्कर मानले, बाकी इस्लाम धर्म स्विकारला असता तरी स्त्रीयांचे जे झाले ते चुकले नसतेच. नादीया लास्ट गर्ल नाहीये, पूर्ण जग एकेश्वरवादी झाले तरी नादीया होतच राहणार हा ईतिहास नसून वर्तमान आहे.

@ साधनाजी, अनुमोदन.
१९९४ साली रवांडा या आफ्रिकेतील छोट्या देशात हुतु आणि तुत्सी नावाच्या दोन जमातीत भीषण हत्याकांड घडून आले. इम्माकुली इलिबगिझा ही तुत्सी जमातीची तरुणी.या हत्याकांडात तिचे दोन भाऊ आईवडील मारले गेले. हुतु जमातीच्या मुरिंझी नावाच्या इसमाने तिला आणि इतर सात महिलांना आपल्या बेडरूममधील चार बाय तीनच्या बाथरूममध्ये लपविले. तिथे त्या सर्व नव्वद दिवस राहिल्या. नव्वद दिवस ते धड बसू शकत नव्हते, झोपू शकत नव्हते,एकमेकांशी मोठया आवाजात बोलू शकत नव्हते. त्या नव्वद दिवसात त्यांनी कपडेही बदलले नाही की आंघोळही केली नाही. मारेकरी अगदी शेजारी.आपले सर्व अनुभव तिने लिहून काढले.अंगावर काटा आणणारी इम्माकुलीची ही सत्यकहाणी. लेफ्ट टू टेल. पुस्तकातल्या सुरुवातीच्या काही ओळी अशा आहेत:...." I heard the killers call my name.
They were on the other side of the wall, and less than an inch of plaster and wood separated us. Their voices were cold, hard, and determined.
“She’s here . . . we know she’s here somewhere. . . . Find her—find Immaculée.”
There were many voices, many killers. I could see them in my mind: my former friends and neighbors, who had always greeted me with love and kindness, moving through the house carrying spears and machetes and calling my name.
“I have killed 399 cockroaches,” said one of the killers. “Immaculée will make 400. It’s a good number to kill.”
I cowered in the corner of our tiny secret bathroom without moving a muscle. Like the seven other women hiding for their lives with me, I held my breath so that the killers wouldn’t hear me breathing.
Their voices clawed at my flesh. I felt as if I were lying on a bed of burning coals, like I’d been set on fire. A sweeping wind of pain engulfed my body; a thousand invisible needles ripped into me. I never dreamed that fear could cause such agonizing physical anguish.
I tried to swallow, but my throat closed up. I had no saliva, and my mouth was drier than sand. I closed my eyes and tried to make myself disappear, but their voices grew louder. I knew that they would show no mercy, and my mind echoed with one thought: If they catch me, they will kill me. If they catch me, they will kill me. If they catch me, they will kill me. . . .
The killers were just outside the door, and I knew that at any second they were going to find me. I wondered what it would feel like when the machete slashed through my skin and cut deep into my bones. I......"

एकेश्वरवाद काय आणि पितृसत्ताक पद्धती काय, स्त्रियांवरचे अत्याचार, मानसिक वा शारीरिक, या ना त्या कारणाने सुरूच आहेत. अजूनही. अगदीं स्वैपाकघरातही स्वैपाक करण्यावरून मानसीक अत्याचार होत आहेत. बहुतेक पुरुष तर साधा चहाचा कप देखील बेसिन पर्यंत आणून ठेवत नाहीत. विसळ णे तर विसराच. The Great Indian Kitchen या चित्रपटाने पितृसत्ताक पद्धती वर चपराक मारली असली तरीही रांधा, वाढा, उष्टी काढा हे आजही लाखो स्त्रियांची सत्य परिस्थिती आहे.

बहुतेक पुरुष तर साधा चहाचा कप देखील बेसिन पर्यंत आणून ठेवत नाहीत. विसळ णे तर विसराच.
>>> कुठे असतात असे पुरुष? इथे रोज स्वयंपाक करून भांडी घासावी लागतात... आसपासच्या मित्र परिवारात देखील हेच चालू आहे..

२०१९ मध्ये ऑस्लोचं नोबेल पीस म्युझियम बघितलं. तिथे त्या वर्षीचे नोबेल शांती पुरस्कारविजेते नादिया मुराद आणि डॉ डेनिस मुक्वेगे यांच्याबद्दलचेच फोटो, माहिती, ऑडिओ टेप्स, इन्स्टॉलेशन्स होती. 'The Body As A Battlefield' हे त्याचं नाव. ते सगळं बघून प्रचंड अस्वस्थ वाटलं होतं. दोघांच्या अ‍ॅक्सेप्टन्स स्पीचचे व्हिडिओ, ऑडिओही होते. नादिया मुरादचा स्पीच देतानाचा शांत (थंड ?) आणि निर्विकार चेहरा आणि आवाज काळीज चिरत जाणारा होता. यूट्यूबवरही ते व्हिडिओज असतीलच, पण तिथे त्या वातावरणात आणि आसपास फोटो, माहितीफलक असताना ते बघणे फार वेगळं होतं.
(आणि मुख्य म्हणजे म्युझियम बघायला आलेले लोक अगदी शांतपणे सगळं बघत होते.)

>तुटपुंजे हिंदू सोडले तर त्याबाहेरील जगात भाषा, प्रांत, धर्म ह्या ओळखी अभिमानाने सांगितल्या जातात

कैच्याकै, जगभरातल्या प्रगत देशांमध्ये अधर्मियांचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत चाल्लंय. आणि हे अधर्मिय म्हणजे फक्त नास्तिक नव्हे तर आपली धार्मिक ओळख चारचौघात उघड न करु इच्छिणारे देखिल यात समाविष्ट आहेत. अगदी धर्माच्या आधारावर स्थापन झालेल्या इस्त्रायलमधेही हे प्रमाण वाढतं आहे (२०% च्या आसपास). फक्त मागासलेल्या देशांमध्ये धार्मिक अभिमान आवर्जुन जोपासला जातोय.

>>>२०१९ मध्ये ऑस्लोचं नोबेल पीस म्युझियम बघितलं. तिथे त्या वर्षीचे नोबेल शांती पुरस्कारविजेते नादिया मुराद आणि डॉ डेनिस मुक्वेगे यांच्याबद्दलचेच फोटो, माहिती, ऑडिओ टेप्स, इन्स्टॉलेशन्स होती. 'The Body As A Battlefield' हे त्याचं नाव. ते सगळं बघून प्रचंड अस्वस्थ वाटलं होतं.>>> मला देखील रागापेक्षा उद्विग्न अधिक वाटत होतं. अत्याचाराची परिसीमा आहे. पण ही वृत्ती अनादि कालापासून आहे.. धर्म, वर्ण, पंथ अशा अनेक आवरणा़खाली विशेष्तः विकृत पुरुषांनी महिलांवर अनन्वित अत्याचार केले आहेत... तिच्या भाषणा चे आणि बीबीसी वरील हार्ड टॉकचे युट्युब रेकॉर्डिंग हादरवून सोडते
https://www.youtube.com/watch?v=rD0MBVSCCJw
https://www.youtube.com/watch?v=CqB0cMvGnIk&t=209s
https://www.youtube.com/watch?v=YRbHxsPLmkg&t=1260s
मुळात तिच्या धर्मास मान्यता कधीच मिळाली नाही. इस्लाम मध्ये त्यांना परिवर्तित व्हा नाही तर अन्यायास सामोरे जा अशी धमकी आयसिसने दिली. याच्या पुनरावृत्ती इतर धर्मात देखील आहेत. मी नाव घेत नाही.

बहुतेक पुरुष तर साधा चहाचा कप देखील बेसिन पर्यंत आणून ठेवत नाहीत. विसळ णे तर विसराच.
>>> कुठे असतात असे पुरुष? इथे रोज स्वयंपाक करून भांडी घासावी लागतात... आसपासच्या मित्र परिवारात देखील हेच चालू आहे..>>> सगळीकडे.... जरा डोळसपणे पाहिले / ऐकले की दिसतील.......

>>>मला हे कळत नाहीय, परिणाम काय होतील हे माहीत असूनपण गावकऱ्यांनी असे का केले?
धर्मांध दोन्हीकडचे लोक झाले असे करून...>>> एका बाजूस अन्यायाची अन हेकेखोरपणाची भूमिका होती व म्हणून आयसिसना धर्मांध म्हणावे लागते, दुसरे आपल्या अस्तित्वाची लढाई लढत होते आणि म्हणून ते धर्मांध नाहीत , ते स्वत्व जपण्याचा प्रयत्न करत होते, तुम्ही जर आपला वडिलोपार्जित वारसा वाचवण्याचा प्रयत्न केला तर त्याला धर्मांध म्हणाल की स्वाभिमानी ?