उघडले नरकाचे द्वार

Submitted by Barcelona on 13 June, 2021 - 02:39

उघडले नरकाचे द्वार

सुएझची सुटकामध्ये निसर्गाचा अतर्क्यपणा आणि माणसाचा चक्रमपणा एकत्र आला की कसा गोंधळ उडतो ते आपण पाहिलं. (ते एव्हरगिव्हन जहाज आजही नुकसान भरपाईच्या खटल्यावरून ईजिप्तमध्ये अडकलेले आहे.) आज असाच एक दुसरा गोंधळ बघू.

पृथ्वीवर बाली (इंडोनेशिया) मध्ये स्वर्गाचे द्वार आहे असे मानले जाते. मग पृथ्वीवर नरकाचे द्वार कुठे असेल? भिन्न भिन्न संस्कृतीत नरक या संकल्पनेबद्दल जरी एकमत असले तरी त्याचे दार कुठे आहे याबद्दल एकमत नाही. पृथ्वीवर दहा जागा अशा आहेत ज्यांना नरकाचे द्वार मानले गेले आहे. त्यापैकी एका द्वाराबद्दलची ही माहिती - तुर्कमेनिस्तानातील “दरवाझा”.

तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी. ह्या देशाचा बहुतेक भूभाग कारकूम ह्या वाळवंटाने व्यापलेला आहे. साधारण ६ मिलियन लोकवस्तीचा म्हणजे पुण्याएवढ्या लोकवस्तीचा पण आकारमानाने महाराष्ट्रापेक्षा जरा मोठा देश. हा प्रांत पूर्वी 1925 साली तत्कालीन यु एस एस आर (सोव्हिएट रशिया) मध्ये सामील झाला किंवा सोव्हिएट सैन्याने सामील करून घेतला. पुढे सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यावर तुर्कमेनिस्तान स्वतंत्र देश म्हणून १९९१ मध्ये अस्तित्त्वात आला.

ही शीतयुद्ध काळातील म्हणजे 1971 सालची घटना असावी. असावी ?? मंडळी, पोलादी पडद्याआड घडल्याने ह्या घटनेबद्दल काही कागदपत्रे किंवा खात्रीशीर इतिहास उपलब्ध नाही. मात्र समोर दिसणाऱ्या परिस्थिती वरून शास्त्रज्ञांनी बांधलेला हा अंदाज आहे.

कारकूम वाळवंटात खनिज तेल व वायू याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सोव्हिएट इंजिनियर्सचा एक समूह ‘अक बुगदे’ जिल्ह्यात खनिज तेल उत्खननार्थ आला. त्यांनी ‘ऑइल रिग’ सुरू केली पण जमीन भुसभूशीत निघाली आणि अख्खी रिग जमिनीत धसली. रिग जमिनीच्या पोटात गडप झाली, पण कुणी माणसे मेली नाहीत हा चमत्कारच म्हणायचा. रिग जिथे गडप झाली तिथे अर्ध क्रिकेटचं मैदान मावेल एवढा म्हणजे ७० मीटर गोल खड्डा (crater) तयार झाला.

ऑइल रिग्जचे असे अपघात घडतात, त्यात नवलाईच काही नाही. कारकूम वाळवंटातच असे एक-दोन अपघात घडले आणि नंतर हे खड्डे कधी वाळूने, तर कधी पाण्याने भरून गेले. मात्र इथे एक नवीनच प्रश्न निर्माण झाला होता - खड्डयामुळे एका वायूसाठ्याचे तोंड उघडले. मिथेन हा विषारी वायू बाहेर पडू लागला. अशा पध्द्तीचे ‘लिक’ चालू राहिले आणि आगीच्या ठिणगीचा संपर्क झाला तर स्फोट होऊ शकतात. मनुष्य-प्राणी इ जीवितहानी होऊ शकते. म्हणून ‘फ्लेयरिंग’ करायचे ठरले.

फ्लेयरिंग म्हणजे रिग्जने प्रक्रिया करण्याच्या वेगापेक्षा अधिक वायू जेव्हा भूभागातून बाहेर येतो तेव्हा काही भाग वायू फ्लेयरिंगने म्हणजे जाळून नष्ट केला जातो. सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने ही पद्धत विवादास्पद आहे. पण त्या काळी ही पद्धत सर्रास रूढ होती (अजूनही रशियात फ्लेयरिंग केले जाते). सामान्यपणे आठवडाभर फ्लेयरिंग चालू रहाते मग विझते. तेथील अधिकाऱ्यांनी क्रेटर पेटवला.

…. आणि आज गेली पन्नास वर्ष तिथे आग जळत आहे.
1280px-Darvasa_gas_crater_panorama.jpeg
(credit: By Tormod Sandtorv - Flickr: Darvasa gas crater panorama, CC BY-SA 2.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=18209432)

एखाद्या स्टेडीयमच्या मध्यभागी शेकोटी पेटवावी आणि सर्व स्टँड्सना आग लावली तर जसं दृश्य दिसेल तसेच काहीसे हा क्रेटर दिसतो. नरकाचे द्वार असेच असेल कदाचित ..... ह्या क्रेटरला ‘नरकाचे द्वार’ म्हणून नाव पडले. किंवा जवळचे गाव ‘दरवाझा’ आहे त्यावरून असेल. दिवसा ह्या क्रेटरचा विस्तार भयावह आहे तर रात्री ह्यातून निघणारा केशरी प्रकाश त्या वाळवंटाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देतो.

झालेला गोंधळ बघता सर्व कागदपत्रे, पुरावे नष्ट केले असावेत किंवा मूळात कागदोपत्री नोंदीच नसाव्यात. इतकंच काय तर अधिकाऱ्यांनी नव्हे, तर वीज पडल्याने क्रेटर पेटला अशाही आख्यायिका रूढ आहेत. नक्की काय झाले याबद्दल माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.
तुर्कमेनिस्तान स्वतंत्र झाल्यावर ह्या क्रेटरबद्दल पुन्हा एकदा विचार सुरू झाला. क्रेटर मधून मिथेन हा विषारी वायू अजूनही येत असल्याने ही आग विझवणे कठीण आहे असे मत पडले. आता 2010 च्या दशकापासून इथे पर्यटन सुरू करावे अशी टूम निघालेली आहे. तुर्कमेनिस्तानाचा व्हिसा मिळणे सोपे नसावे म्हणून किंवा पर्यटनास पोषक परिस्थिती नाही म्हणून सध्यातरी दरवर्षी सहा-सात हजार एवढे पर्यटक येतात. हा आकडा येत्या काही वर्षात वाढेल अशी अशा आहे.

प्रत्येक आपत्तीत काही संधी किंवा काही चांगले शोधणारी मंडळी असतात. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) आणि अंतरिक्ष जैवशास्त्रज्ञ (astrobiologist) यांना अशा दारूण वातावरणातील (extreme environments) सूक्ष्म जीवांचा अभ्यास करणे गरजेचे वाटले. इतर ग्रहांवर कुठे जीवसृष्टी असेल तर ती कशा प्रकारची असेल ह्याचे अनुमान करण्यासाठी पृथ्वीवरील दारुण वातावरणातील जीवांचा म्हणजे ‘एक्स्ट्रीमोफाईल्स’चा अभ्यास करणे गरजेचे आहे. यलोस्टोन किंवा अंटार्टिका याबरोबर दरवाजा क्रेटर इथेही असा अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.

मात्र ह्या क्रेटरच्या मध्यभागी जाणार कोण? तेथील मातीचे सॅम्पल आणणार कोण??

नॅशनल जिओग्राफिक इथे मदतीला धावून आले. ‘प्रोफेशनल एक्स्प्लोरअर’ म्हणून नाव मिळवलेल्या जॉर्ज कोरोनीस याने मोहीम स्वीकारली. जॉर्जला वादळे, चक्रीवादळे, ज्वालामुखी अशा निसर्ग आपत्तींचा अनुभव होता. टोर्नेडो चेसर म्हणून त्याची ख्याती होती. तो ‘दरवाजा’ मोहिमेस योग्य उमेदवार होता. सुमारे दोन वर्ष मोहिमेची तयारी चालली. क्रेटर मध्ये उतरताना त्याने कशाप्रकारचे अल्युमिनियमचे कपडे घालावेत, कशा प्रकारचे दोर बांधले पाहिजेत ह्यावर खूप चर्चा झाली, प्लॅन तयार झाले. त्याने स्वतः रॅपलिंग इ चे धडे घेतले. एकूणात जय्यत तयारी होती.

त्याला तळाशी फक्त सतरा मिनिटे मिळणार होती.

जॉर्जने १७ मिनिटांचा उत्तम उपयोग केला. क्रेटरचे तळाचे तापमान मोजणे, मातीचे नमुने घेणे इ त्याला नेमून दिलेली कामे त्याने केली. त्या मातीवर पुढे डी एन ए एक्स्ट्रॅक्शन इ चाचण्या करण्यात आल्या. इतक्या दारूण तापमानात विरळ जीवसृष्टी सापडली पण हो, क्रेटरच्या तळाशी जीवसृष्टी सापडली - तीव्र तापमानात जगणारे काही बॅक्टेरिया सापडले. मंगळावर किंवा इतर उष्ण ग्रहांवर सृष्टी कशी असेल ह्याचा थोडातरी सुगावा आपल्याला ह्या इष्टापत्तीमुळे लागला.

लेखाची सुरुवात कुठून झाली नि कुठे पोहोचलो… असू द्या - दिवानोंकी यह बाते दिवाने जानते है…

संदर्भसूची:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5345951/
https://youtu.be/6ToS4JkiCqU
https://youtu.be/uow3hZ99R9k
https://youtu.be/cWUoAoeJb08
http://www.furiousearth.com/Fires/Darvaza/Darvaza.html
https://www.fodors.com/news/photos/10-eerie-places-that-are-said-to-be-t...
https://www.nationalgeographic.com/adventure/article/140716-door-to-hell...

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

काहीतरी रोचक वाटतंय
सैबेरिया च्या वाळवंटात एक खाण की बोअरवेल खणून सोडून दिल्याचे वाचले होते. ते हेच की वेगळे माहीत नाही.

>> सावकाशीने वाचायला हवा
+१११

सी. नेहमीप्रमाणे फारच अनवट माहिती!
यातून सरासरी किती मिथेन वायू बाहेर पडत असावा?
याने कार्बन डाय ऑक्साईड चे प्रमाण वाढत असणार पण त्यातल्या त्यात चांगली गोष्ट अशी की नुसता मिथेन हवेत लीक होत राहू दिला नाही त्यांनी कारण मिथेन हा कार्बन डाय ऑक्साईड पेक्षा किमान ऐंशी पट अधिक हानिकारक हरितवायू आहे.
माझा प्रश्न असा की एवढी उष्णता बाहेर पडत आहे तर तिचा उपयोग वाफ आणि वाफेपासून उर्जा असा का केला गेला नाही? की वाळवंटात एवढे पाणी आणणे अशक्य आहे?

खूप सॉलिड माहिती आहे.
इतकी वर्षं जळतंय म्हणजे केवढ्या तेलाची, मिथेन ची नासाडी.
आग विझवून हे वापरता आलं नसतं का?

भारीच माहिती आहे!! माणूस आत उतरला म्हणजे कमालच. तिथेही सूक्ष्मजीव सापडले हीसुद्धा कमालच.
एखादा प्रोब सोडता आला नसता का?

खरंच
प्रोब किंवा रोबो सोडायला हवा होता.

पहिल्यांदा ऐकले.

गुगल मॅपवर शोधले. Gate of hell मिळाले पण आग दिसली नाही.

आग गेटच्या बरीच पुढे आढळली. 40°15′10″N 58°26′22″E

कसला रखरखीत देश आहे, राख पसरावी तशी माती, हिरवा रंग नावालाही नाही... कोण पर्यटक फिरकणार तिकडे...

सर्वांना धन्यवाद. मानवदादा, बदल केले आहेत. ब्लॅककॅट व्हिडीयोसाठी धन्यवाद.
तुर्कमेनिस्तान हा विकसिनशील देश आहे (think more like- तू ना जा मेरे बादशाह बुझ्काशी शर्यत!) पण रशियापासून विभाजनानंतर तिथे काय तंत्रज्ञान उपलब्ध आहे याची आजही धड माहिती पब्लिक डोमेन मध्ये नाही. त्यामुळे मिथेन वायूचे वाफेत रूपांतर इ माहिती नाही. कुणाला सापडली तर जरूर लिहा.
प्रोब पाठवायला हवा हे खरं. कदाचित नॅशनल जिओग्राफिकच्या मिशन मध्ये माणूस उतरवणे बसत असेल म्हणूनही तसं केले असेल. इथे माणूस २०१४ मध्ये उतरला. आग १९७१ पासून आहे. Happy कोण पर्यटक फिरकणार बरोबर प्रश्न आहे. हा सहज मुलाबाळांना घेऊन सुट्टीत जाण्याचा प्रदेश नाही. ज्यांना एक्स्ट्रीम अ‍ॅडव्हेंचरची आवड आहे तशाच मंडळींनी जाणे योग्य. ही एक तुर्कमेनिस्तानची लिंक - https://youtu.be/_nSoQt9LAGg मजेदार आहे.

लेखात दिलेला फोटो रात्रीचा आहे , त्यामुळे तो भयानक दिसतो.

पण दिवसाच्या फोटोत दिसते की आग अधून मधून असून मधेमध्ये मोकळी जागा आहे , म्हणून काळजी घेऊन माणूस उतरवणे शक्य झाले असेल
आगीमध्ये ऋतूमानाप्रमाणेही बदल होत असावेत

मस्तच लेख. बरीच मेहनत घेतली आहे. लिंक्स पण बघतो सावकाशीने.

अनु, वाळवंटी भागच आहे हा. पाण्याचे दुर्भिक्ष आहे.
पण मिथेनच्या आगीवर पाणी टाकणे योग्य आहे का ? मिथेन हा अतिशय विषारी वायू आहे. इंधन म्हणूनही वापरता येतो पण अर्धवट ज्वलनाने कार्बन मोनोक्साईड तयार होतो. हा ही घातक वायू आहे. मिथेनच्या ज्वलनाने तापमान वाढत राहते. जगात अशी सतरा ठिकाणे आहेत (जी माहिती आहेत). त्यातली बहुतेक आता थंड झालेली आहेत. ब-याच ठिकाणी पाणी साठून तलाव झाले आहेत. (चुभूदेघे)
https://www.socalgas.com/stay-safe/methane-emissions/methane-and-the-env...

हो खरंच
इतकी मोठी जागा विझवायची तरी कशी?अगदी कार्बन डाय ऑक्सआईड किंवा पावडर टाकायची झाली तरी आणणार कुठून?

आता जरा निवांतपणे वाचला लेख. फारच माहितीपूर्ण व रोचक लिखाण.
जॉर्ज कोरोनीस च्या एक्सपीडीशन विषयी आधी वाचले नव्हते. लेखामधला त्यासंदर्भातला भाग फारच उत्कंठावर्धक व माहितीपूर्ण. २०१४ साली तो त्यात उतरला. त्याची दोन मिनिटाची एक व्हिडिओ क्लिप सुद्धा उपलब्ध आहे:
https://www.youtube.com/watch?v=RDwsPczaBCI

>> पोलादी पडद्याआड घडल्याने ह्या घटनेबद्दल काही कागदपत्रे किंवा खात्रीशीर इतिहास उपलब्ध नाही
हे खूपच खरे व बोलके विधान. त्याकाळात चीन व रशियामध्ये ज्या काही (भयंकर) घटना घडल्या त्या जगासमोर येत नसत. कित्येक घटना १९९० नंतर जगासमोर आल्या. तोवर नक्की काय व कसे घडले याचे पुरावे बहुतांशी नष्ट झालेले होते.

छान रोचक लेख !

या अग्नीकुंडाबद्दल मागे ऐकावे ते नवलच टाईप्स सदरात वाचले होते. म्हणजे जगात अजून कुठे असला प्रकार नसेल तर याच्याबद्दलच वाचले असेल. पण त्यात कोणीतरी उतरून सॅम्पल वगैरे गोळा केले हे अचाट आहे. कधीकधी प्रश्न पडतो अश्या शोधांचे आणि यातून मिळालेल्या नव्या माहितीचे पुढे करतात काय? म्हणजे याचा व्यावहारीक फायदा काय? कोणाला काही आयड्या?

म्हणजे वर लेखात एक दिले आहे
<<मंगळावर किंवा इतर उष्ण ग्रहांवर सृष्टी कशी असेल ह्याचा थोडातरी सुगावा आपल्याला ह्या इष्टापत्तीमुळे लागला.>>>
पण मग या माहितीचा आपल्याला म्हणजे मानवजातीला फायदा काय?

पण मग या माहितीचा आपल्याला म्हणजे मानवजातीला फायदा काय? >> मानवजातीला नवे धागे काढता येतात. एवढा मोठा फायदा तुझ्या लक्षात येऊ नये!

विनोदाचा भाग वगळता, मी यातील तज्ज्ञ नाही तरी हौसे खातर सामान्य माणसाच्या दृष्टीकोनातून उत्तर द्यायचा प्रयत्न करतो.:
आपण अत्यंत चौकस आणि धाडसी आहोत. लोक माऊंट एव्हरेस्टवर का चढतात? वरवर ते फक्त एक धाडस वाटेल पण त्यातून अशा जागी कसे चढावे, तिथला हवेचा दाब किती असतो, तपमान किती असते, तेथील हवेत ऑक्सिजनचे प्रमाण किती असते, या सगळ्यावर मात कशी करावी इत्यादि गोष्टी आपण शिकतो ज्याचा आपल्याला उपयोग होतो.

विश्व कसे निर्माण झाले आणि जीव कसे निर्माण झाले हे प्रश्न माणसाला आदिम काळापासून भेडसावत आहेत. त्यातील अजून एक प्रश्न म्हणजे जीवसृष्टी असणारा आपला ग्रह विश्वातील एकमेव ग्रह आहे की अजून कुठे जीव असतील? असतील तर कसे असतील? किती प्रगत असतील? आपले मित्र असतील की शत्रू? इत्यादि त्यातील उपप्रश्न.
मग इतर ग्रहावर पृथ्वी सारखे, त्याच्या जवळपास जाणारे वातावरण आहे का? नसल्यास आपल्यापेक्षा बरेच वेगळे वातावरण असलेल्या ग्रहावरही जीव असू शकतील का? इत्यादि.

आपल्याला आता जगण्यास पृथ्वी कमी पडत असण्याचा प्रश्न भेडसावत आहे आणि पर्यावरण वाचवा मोहीम आपण सुरू केलीय. ही परिस्थिती मानव निर्मित आहे. पण उद्या अजून काही वेगळं झालं आणि यापेक्षा भयानक परिस्थिती दिसू लागली तर आपल्याला वास्तव्य करायला दुसरा कुठला ग्रह आहे का जिथे आपण जीवसृष्टी नसली तरीही सुरू करता येईल. सुरू करायला अनेक शतके लागतील, तेव्हा आतापासून संशोधन सुरू करायला हवे.
पुढे आपला सूर्य विझण्या पूर्वी राक्षसी तारा बनू लागेल तेव्हा आपल्याला पृथ्वीवर राहता येणार नाही, कुठे जायचं?

किंवा हीच परिस्थिती दुसरा एखादा ग्रह जिथे जीवसृष्टी आहे तिथे उद्ववु शकते, तिथले आपल्या सारखे/आपल्या पेक्षा जास्त प्रगत जीव दुसऱ्या जीवसृष्टी असणाऱ्या ग्रहाच्या शोधात असतील, ते एक दिवस पृथ्वीवर येऊन थडकतील. ते आपल्याला नष्ट करून पृथ्वीवर ताबा मिळवू शकतील. तेव्हा आपणच आधी शोध घेऊन अशी परिस्थिती आली तर त्याचा सामना करायला तयार असावे.

यातील इतरत्र कोठे जीव आहेत का, कसे असतील इत्यादि संशोधनास Astrobiology ही एक शाखा आहे जीचा उल्लेख लेखात आहे. इतर ग्रहावरील उच्च तपमानात जीव असतील तर कसे असतील याचा त्यातून अभ्यास होऊ शकेल. अथवा पृथ्वीवरच ती करोडो वर्षांपूर्वी तिचे तपमान तेवढे जास्त असताना जीव निर्माण झाले असतील का, ते कसे असतात वगैरे.

Pages