
उघडले नरकाचे द्वार
सुएझची सुटकामध्ये निसर्गाचा अतर्क्यपणा आणि माणसाचा चक्रमपणा एकत्र आला की कसा गोंधळ उडतो ते आपण पाहिलं. (ते एव्हरगिव्हन जहाज आजही नुकसान भरपाईच्या खटल्यावरून ईजिप्तमध्ये अडकलेले आहे.) आज असाच एक दुसरा गोंधळ बघू.
पृथ्वीवर बाली (इंडोनेशिया) मध्ये स्वर्गाचे द्वार आहे असे मानले जाते. मग पृथ्वीवर नरकाचे द्वार कुठे असेल? भिन्न भिन्न संस्कृतीत नरक या संकल्पनेबद्दल जरी एकमत असले तरी त्याचे दार कुठे आहे याबद्दल एकमत नाही. पृथ्वीवर दहा जागा अशा आहेत ज्यांना नरकाचे द्वार मानले गेले आहे. त्यापैकी एका द्वाराबद्दलची ही माहिती - तुर्कमेनिस्तानातील “दरवाझा”.
तुर्कमेनिस्तान अफगाणिस्तानचा शेजारी. ह्या देशाचा बहुतेक भूभाग कारकूम ह्या वाळवंटाने व्यापलेला आहे. साधारण ६ मिलियन लोकवस्तीचा म्हणजे पुण्याएवढ्या लोकवस्तीचा पण आकारमानाने महाराष्ट्रापेक्षा जरा मोठा देश. हा प्रांत पूर्वी 1925 साली तत्कालीन यु एस एस आर (सोव्हिएट रशिया) मध्ये सामील झाला किंवा सोव्हिएट सैन्याने सामील करून घेतला. पुढे सोव्हिएट रशियाचे विघटन झाल्यावर तुर्कमेनिस्तान स्वतंत्र देश म्हणून १९९१ मध्ये अस्तित्त्वात आला.
ही शीतयुद्ध काळातील म्हणजे 1971 सालची घटना असावी. असावी ?? मंडळी, पोलादी पडद्याआड घडल्याने ह्या घटनेबद्दल काही कागदपत्रे किंवा खात्रीशीर इतिहास उपलब्ध नाही. मात्र समोर दिसणाऱ्या परिस्थिती वरून शास्त्रज्ञांनी बांधलेला हा अंदाज आहे.
कारकूम वाळवंटात खनिज तेल व वायू याचा मुबलक साठा उपलब्ध आहे. सोव्हिएट इंजिनियर्सचा एक समूह ‘अक बुगदे’ जिल्ह्यात खनिज तेल उत्खननार्थ आला. त्यांनी ‘ऑइल रिग’ सुरू केली पण जमीन भुसभूशीत निघाली आणि अख्खी रिग जमिनीत धसली. रिग जमिनीच्या पोटात गडप झाली, पण कुणी माणसे मेली नाहीत हा चमत्कारच म्हणायचा. रिग जिथे गडप झाली तिथे अर्ध क्रिकेटचं मैदान मावेल एवढा म्हणजे ७० मीटर गोल खड्डा (crater) तयार झाला.
ऑइल रिग्जचे असे अपघात घडतात, त्यात नवलाईच काही नाही. कारकूम वाळवंटातच असे एक-दोन अपघात घडले आणि नंतर हे खड्डे कधी वाळूने, तर कधी पाण्याने भरून गेले. मात्र इथे एक नवीनच प्रश्न निर्माण झाला होता - खड्डयामुळे एका वायूसाठ्याचे तोंड उघडले. मिथेन हा विषारी वायू बाहेर पडू लागला. अशा पध्द्तीचे ‘लिक’ चालू राहिले आणि आगीच्या ठिणगीचा संपर्क झाला तर स्फोट होऊ शकतात. मनुष्य-प्राणी इ जीवितहानी होऊ शकते. म्हणून ‘फ्लेयरिंग’ करायचे ठरले.
फ्लेयरिंग म्हणजे रिग्जने प्रक्रिया करण्याच्या वेगापेक्षा अधिक वायू जेव्हा भूभागातून बाहेर येतो तेव्हा काही भाग वायू फ्लेयरिंगने म्हणजे जाळून नष्ट केला जातो. सध्या पर्यावरणाच्या दृष्टीने ही पद्धत विवादास्पद आहे. पण त्या काळी ही पद्धत सर्रास रूढ होती (अजूनही रशियात फ्लेयरिंग केले जाते). सामान्यपणे आठवडाभर फ्लेयरिंग चालू रहाते मग विझते. तेथील अधिकाऱ्यांनी क्रेटर पेटवला.
…. आणि आज गेली पन्नास वर्ष तिथे आग जळत आहे.
(credit: By Tormod Sandtorv - Flickr: Darvasa gas crater panorama, CC BY-SA 2.0, https://commons.wikimedia.org/w/index.php?curid=18209432)
एखाद्या स्टेडीयमच्या मध्यभागी शेकोटी पेटवावी आणि सर्व स्टँड्सना आग लावली तर जसं दृश्य दिसेल तसेच काहीसे हा क्रेटर दिसतो. नरकाचे द्वार असेच असेल कदाचित ..... ह्या क्रेटरला ‘नरकाचे द्वार’ म्हणून नाव पडले. किंवा जवळचे गाव ‘दरवाझा’ आहे त्यावरून असेल. दिवसा ह्या क्रेटरचा विस्तार भयावह आहे तर रात्री ह्यातून निघणारा केशरी प्रकाश त्या वाळवंटाला एक वेगळेच सौंदर्य प्राप्त करून देतो.
झालेला गोंधळ बघता सर्व कागदपत्रे, पुरावे नष्ट केले असावेत किंवा मूळात कागदोपत्री नोंदीच नसाव्यात. इतकंच काय तर अधिकाऱ्यांनी नव्हे, तर वीज पडल्याने क्रेटर पेटला अशाही आख्यायिका रूढ आहेत. नक्की काय झाले याबद्दल माहिती सध्या तरी उपलब्ध नाही.
तुर्कमेनिस्तान स्वतंत्र झाल्यावर ह्या क्रेटरबद्दल पुन्हा एकदा विचार सुरू झाला. क्रेटर मधून मिथेन हा विषारी वायू अजूनही येत असल्याने ही आग विझवणे कठीण आहे असे मत पडले. आता 2010 च्या दशकापासून इथे पर्यटन सुरू करावे अशी टूम निघालेली आहे. तुर्कमेनिस्तानाचा व्हिसा मिळणे सोपे नसावे म्हणून किंवा पर्यटनास पोषक परिस्थिती नाही म्हणून सध्यातरी दरवर्षी सहा-सात हजार एवढे पर्यटक येतात. हा आकडा येत्या काही वर्षात वाढेल अशी अशा आहे.
प्रत्येक आपत्तीत काही संधी किंवा काही चांगले शोधणारी मंडळी असतात. अमेरिकेतील सूक्ष्मजीवशास्त्रज्ञ (microbiologist) आणि अंतरिक्ष जैवशास्त्रज्ञ (astrobiologist) यांना अशा दारूण वातावरणातील (extreme environments) सूक्ष्म जीवांचा अभ्यास करणे गरजेचे वाटले. इतर ग्रहांवर कुठे जीवसृष्टी असेल तर ती कशा प्रकारची असेल ह्याचे अनुमान करण्यासाठी पृथ्वीवरील दारुण वातावरणातील जीवांचा म्हणजे ‘एक्स्ट्रीमोफाईल्स’चा अभ्यास करणे गरजेचे आहे. यलोस्टोन किंवा अंटार्टिका याबरोबर दरवाजा क्रेटर इथेही असा अभ्यास व्हावा यासाठी प्रयत्न सुरू झाले.
मात्र ह्या क्रेटरच्या मध्यभागी जाणार कोण? तेथील मातीचे सॅम्पल आणणार कोण??
नॅशनल जिओग्राफिक इथे मदतीला धावून आले. ‘प्रोफेशनल एक्स्प्लोरअर’ म्हणून नाव मिळवलेल्या जॉर्ज कोरोनीस याने मोहीम स्वीकारली. जॉर्जला वादळे, चक्रीवादळे, ज्वालामुखी अशा निसर्ग आपत्तींचा अनुभव होता. टोर्नेडो चेसर म्हणून त्याची ख्याती होती. तो ‘दरवाजा’ मोहिमेस योग्य उमेदवार होता. सुमारे दोन वर्ष मोहिमेची तयारी चालली. क्रेटर मध्ये उतरताना त्याने कशाप्रकारचे अल्युमिनियमचे कपडे घालावेत, कशा प्रकारचे दोर बांधले पाहिजेत ह्यावर खूप चर्चा झाली, प्लॅन तयार झाले. त्याने स्वतः रॅपलिंग इ चे धडे घेतले. एकूणात जय्यत तयारी होती.
त्याला तळाशी फक्त सतरा मिनिटे मिळणार होती.
जॉर्जने १७ मिनिटांचा उत्तम उपयोग केला. क्रेटरचे तळाचे तापमान मोजणे, मातीचे नमुने घेणे इ त्याला नेमून दिलेली कामे त्याने केली. त्या मातीवर पुढे डी एन ए एक्स्ट्रॅक्शन इ चाचण्या करण्यात आल्या. इतक्या दारूण तापमानात विरळ जीवसृष्टी सापडली पण हो, क्रेटरच्या तळाशी जीवसृष्टी सापडली - तीव्र तापमानात जगणारे काही बॅक्टेरिया सापडले. मंगळावर किंवा इतर उष्ण ग्रहांवर सृष्टी कशी असेल ह्याचा थोडातरी सुगावा आपल्याला ह्या इष्टापत्तीमुळे लागला.
लेखाची सुरुवात कुठून झाली नि कुठे पोहोचलो… असू द्या - दिवानोंकी यह बाते दिवाने जानते है…
संदर्भसूची:
https://www.ncbi.nlm.nih.gov/pmc/articles/PMC5345951/
https://youtu.be/6ToS4JkiCqU
https://youtu.be/uow3hZ99R9k
https://youtu.be/cWUoAoeJb08
http://www.furiousearth.com/Fires/Darvaza/Darvaza.html
https://www.fodors.com/news/photos/10-eerie-places-that-are-said-to-be-t...
https://www.nationalgeographic.com/adventure/article/140716-door-to-hell...
रोचक माहिती. लेख आवडला.
रोचक माहिती. लेख आवडला.
छान आणि माहितीपूर्ण लेख..
छान आणि माहितीपूर्ण लेख..
छान माहिती सी.
छान माहिती सी.
क्रेटरच्या तळाशी जीवसृष्टी
क्रेटरच्या तळाशी जीवसृष्टी सापडली - तीव्र तापमानात जगणारे काही बॅक्टेरिया सापडले.
>> बिचार्यांना माहित पण नाही की आपण नरकात आहोत!
>> बिचार्यांना माहित पण नाही
>> बिचार्यांना माहित पण नाही की आपण नरकात आहोत!
भारी लेख !
भारी लेख !
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
निलिमा
सही आहे!
ऋन्मेष चांगला प्रश्न आणि मानवदादा, छान उत्तर. एक्सट्रीमोफाईल्सचे उपयोग अशी पोस्ट १-२ दिवसात टाकते. थोडे तपशील मला बघावे लागतील. शकुन, मलाही क्रेटरबद्दल कळालं तेव्हा अगदी असंच वाटलं
छान रोचक नेहमीप्रमाणे
छान रोचक
नेहमीप्रमाणे
मला हे माहीत होते. जालावर
मला हे माहीत होते. जालावर कायम येत असते ह्याच्या बद्दल. रेडिट वर वगैरे.
खरे तर हे सर्व नैसर्गिक घटना आहेत. ( विथ लिटिल इन्टरफिएअर् न्स फ्रॉम ह्युमन्स) पण प्रत्येक ठिकाणी त्याला काही तरी धार्मिक पान चिकटवले जाते. नरकाचे द्वार. ख्रिस्ती धर्मातील संकल्पना आपल्याकडे पण असेच एक मिथेन गॅस सतत जळना रे देवस्थान आहे. डोंगर म्हणजे देवाचे रूप हे सर्व पूर्वी ठीक होते माहिती नव्हती संशोधन नव्हते तेव्हा. पण आता तरी अश्या अनुभवांकडे फक्त आणि फक्त शास्त्र भुगोल जिओलॉजी ह्यांच्या दृ ष्टिकोना तून बघितले जावे कधीतरी कोनीतरी. भावनिक धार्मिक संदर्भ बाजूला ठेवून असे मला वाट्ते. वैयक्तिक मत.
धार्मिक भावना दुखवायचा उद्देश नाही.
खुपच रोचक माहिती. तुम्ही
खुपच रोचक माहिती. तुम्ही अजुन असेच लिहित राहा.
>> <<मंगळावर किंवा इतर उष्ण
>> <<मंगळावर किंवा इतर उष्ण ग्रहांवर सृष्टी कशी असेल ह्याचा थोडातरी सुगावा आपल्याला ह्या इष्टापत्तीमुळे लागला.>>>
>> पण मग या माहितीचा आपल्याला म्हणजे मानवजातीला फायदा काय?
खूप चांगला प्रश्न व @मानव यांनी सुद्धा खूप छान विस्तृतपणे उत्तर दिले आहे. यात माझी फक्त थोडीशी भर:
अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत (अर्थात पृथ्वीवरील बहुतांश सजीवांच्या दृष्टीने प्रतिकूल) सूक्ष्मजीवसृष्टी तगून राहिल्याची अजूनही उदाहरणे आहेत. मला आता पट्कन आठवते ते सागराच्या तळाशी जिथे गंधक व अन्य घातक रसायने (पुन्हा: बहुतांश सजीवांच्या दृष्टीने घातक) विपुल प्रमाणात आढळतात तिथे सुद्धा त्या परिस्थितीशी जुळवून तगून राहिलेली सूक्ष्मजीवसृष्टी आढळली. अशा सूक्ष्मजीवसृष्टीचा अभ्यास हा वरती @मानव पृथ्वीकर यांनी दिलेल्या कारणांसाठी उपयोगी येईलच, पण त्या व्यतिरिक्त "प्राणवायूशिवाय पेशी कशा जिवंत राहू शकतात" हे समजण्यासही मोठी मदत होऊ शकेल.
सध्या, मनुष्य व इतर जीवांमध्ये प्राणवायूच्या अभावामुळे पेशी नक्की का मरतात याचे नीट उत्तर माहिती नाही (Please correct me if I am wrong here). जे माहिती झालेय ते अजूनही अत्यंत क्लिष्ट रुपात व संशोधन अवस्थेत आहे (काही वर्षांपूर्वी यावर काही रिसर्च पेपर नेटवर वाचल्याचे आठवते. अजूनही असतील).
या व अशा सूक्ष्मजीवांचा अभ्यास झाला तर आपल्या पेशीसुद्धा प्राणवायूशिवाय कशा 'जिवंत' ठेवता येतील याचे तंत्र अवगत होऊ शकते. जर का ते शक्य झाले तर मनुष्यप्राणी व इतर सजीवांसाठी फार मोठ्या शक्यतांचे दालन खुले होईल. आपण अंतराळात, पाण्यात व कुठेही जीवंत राहू शकू.
अर्थात, "काही किटाणूंचा अभ्यास करून लगेच ज्ञान आले, लस बनवली आणि ती टोचून घेऊन नाकतोंड दाबून जगणे शक्य झाले", इतके हे सोपे नसले तरी त्या दिशेने काही पावले पुढे मात्र नक्कीच पडतील.
छान रोचक लेख. काही माहिती
छान रोचक लेख. काही माहिती नव्हते . तू नळी वर जाऊन काही व्हिडिओज पण पाहिले.
मानवजी, छान माहिती
मानवजी, छान माहिती
अतुलदा, प्राणवायूशिवाय जगणे, भारी. फक्त मग बिचार्याला कोणी प्राणवायू नाही बोलणार
@ सीमंतिनी, एक्सट्रीमोफाईल्सचे उपयोग अशी पोस्ट १-२ दिवसात टाका, वाट पाहतोय. पण त्यात सर्वात पहिले या शब्दाचा अर्थही सांगा
https://www.npr.org/2022/01
https://www.npr.org/2022/01/08/1071565479/turkmenistan-gates-of-hell-fire
धन्यवाद त्रिशंकू. खरचं आग
धन्यवाद त्रिशंकू. खरचं आग विझवली तर नैसर्गिक संसाधने वाचतील! या प्रयत्नांना यश मिळू दे.
अतुल सरांनी एक्स्ट्रीमोफाईल्सची चांगली माहिती लिहीली आहे. माझे २ आणे- एक्स्ट्रीमोफाईल्स म्हणजे एक्स्ट्रीमो= टोकाचे (हवामान) फाईल्स= आवडणारे जीव. हे एक्स्ट्रीमोफाईल्स अतिउष्ण, अतिशीत किंवा फार अॅसिडीक अशा हवामानात तग धरतात. एरवीचे किटाणूनाशनाचे उपाय यांच्यावर चालणार नाहीत. अर्थात ते टोकाच्या हवामानातच तग धरत असल्याने किटाणूनाशनाची गरजही नाही. मात्र अॅस्ट्रो-बायोलॉजीतील रिसर्च इंट्रेस्ट वाढल्याने हे जीव इतर ग्रहांवरून पृथ्वीवर आले का किंवा हे जीव अवकाशात इतरत्र जगतील का याबद्दल संशोधन चालू आहे. (उदा: टार्डीग्रेड अवकाशात टिकू शकतात.)
सुंदर लेख....
सुंदर लेख....
आज लोकसत्तामध्ये बातमी आहे..
आज लोकसत्तामध्ये बातमी आहे...हे दार बंद करण्याचे आदेश तुर्कमेनिस्तानचे राष्ट्रपती गुरबांगुली बर्दीमुहामेदोव यांनी दिले
... बघुयात काय होतंय....
https://www.loksatta.com/photos/trending-gallery/2755566/darvaza-gas-cra...
अगदीच रच्याकने, केवळ
अगदीच रच्याकने, केवळ टार्डीग्रेड वाचलं म्हणून... टार्ड्रिग्रेडला क्वांटम एंटँगल करुन ((नीअर) अॅब्सोल्युट झिरो -२७३ डि. से. + हाय प्रेशर ) परत नेहेमीच्या तापमानाला आणल्यावरही त्याच्या हालचाली पूर्वपदावर आल्या असे संशोधन केलेला अर्ली पेपर हल्लीच वाचला. अजुन हे पीअर रिव्हूड नाही, त्यावर अनेक मतमतांतरे आहेत. पण वाचण्यात कोणाला इंटरेस्ट असेल तर.
Pages