चाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश

Submitted by संयोग on 3 June, 2021 - 08:53

चाणक्यांच्या जन्म आणि बालपणाबद्दल अनेक खर्‍या खोट्या पण तितक्याच विलक्षण गोष्टी ऐकिवात आहेत. तमिळनाडूतील शोलियार समाज आणि केरळमधला नायर समाज त्यांना आपआपल्या जमातींतला विद्वान समजतात. चाणक्यांना म्हणे जन्मतःच सगळे दात आले होते; आणि त्यामुळेच एका ज्योतीष्याने त्यांच्या आईला त्यांचे भविष्य असे संगितले होते की ,"ज्या अर्थी तुमच्या पुत्राला जन्मतःच सर्व दात आले आहेत, त्याअर्थी हा मोठेपणी एका अफाट साम्राज्याचा चक्रवर्ती सम्राट होईल." परंतु दक्षिण भारतातल्या रिवाजाप्रमाणे त्याकाळी केवळ क्षत्रियच राजा होऊ शकत असे, त्यामुळे चाणक्याला त्याचे सर्व दात काढून टाकावे लागले.

चाणक्यांच्या वडीलांचं नाव चाणक म्हणून त्यांचे नाव चाणक्य पडलं. चाणक्यांना विष्णुगुप्त किंवा कौटिल्य म्हणूनही ओळखले जाई. नालंदाच्या विश्वविद्यालयात त्यांनी शिक्षक म्हणून काम केले. ते अर्थशास्त्र, राजनीति आणि नीतिशास्त्रामध्ये पारंगत होते. त्यानंतर त्यांची विद्वत्ता आणि शिकवण्यातली कुशलता पाहून त्यांची तक्षशिला विद्यापीठामध्ये मुख्य आचार्य म्हणून नेमणूक झाली.

चाणक्यांचा राजकारणात प्रवेश: चाणक्य जेव्हा तक्षशिला विद्यापीठामध्ये मुख्य आचार्य म्हणून काम करत होते, तेव्हा राजा सिकंदर हा भारताच्या वायव्य सीमेवर येऊन धडकला होता. सिकंदरने पोरस राजाला झेलमच्या(जे आज पंजाबला आहे) लढाईत हरवले होते आणि तो आता भारतावर आक्रमण करण्यास सज्ज झाला होता. त्यावेळी मगध(आजचा बिहार, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, मध्यप्रदेश, ओडिसा, महाराष्ट्र या राज्यांचा काही भाग) देशावर नंद वंशातील अखेरचा राजा धनानंद राज्य करत होता. धनानंद राजा नावाप्रमाणेच धनावर खूप जास्त प्रेम करणारा होता. तो लोकांकडून प्रचंड करवसुली करे. तो भोगविलासात पूर्णपणे बुडाला होता. तो जुगार, मद्यपानामध्ये, परस्त्रिया उपभोगण्यामध्ये आपला बराचसा पैसा आणि वेळ खर्च करे.

त्यावेळी चाणक्य धनानंद राजाला सिकंदरच्या आक्रमणाविषयी जागरूक करण्यासाठी गेले होते. मात्र चाणक्यांचे ऐकून घेणे तर दूरच पण धनानंदने त्यांनांच अपमानित केले. चाणक्यांनी त्याला समजावले की "लोकांनी दिलेला कर हा काही राजाला भोगविलास करता यावा यासाठी नसून तो लोककल्याणासाठी आणि लोकांच्या सेवेसाठी वापरावा आणि हाच खरा राजधर्म आहे." परंतु त्यामुळे राजाचा अहंकार दुखावला गेला आणि त्याने चाणक्यांना अपमानित करून जोरात लाथाडले, चाणक्य जमिनीवर पडले आणि ह्या चकमकीत आचार्य चाणक्यांची बांधलेली शेंडी सुटली, त्यावेळी क्रोध आणि खोट्या अहंकाराने लालबुंद झालेला राजा चाणक्यांना म्हणाला, "हे ब्राम्हणा, यानंतर परत जर तु मला राजधर्म शिकवण्याची हिम्मत केलीस, तर मी तुझी ही सुटलेली शेंडी कापून टाकीन." राजाच्या या वाक्यावर सर्व दरबारी खदाखदा हसायला लागले, त्यावेळी क्रोधाने लालबुंद झालेले चाणक्य जमिनीवरून उठले, आणि ते धनानंद राजावर गरजले "हे अहंकारी राजा, मी आचार्य चाणक्य शपथ घेतो की, ज्याप्रमाणे आज तु मला अवमानित करून जमिनीवर ढकललेस, त्याच प्रमाणे एक दिवस मी तुला तुझ्या राजगादी वरुन जमिनीवर आणेन, तुझा खोटा अहंकार नष्ट करेन आणि त्या दिवशीच मी माझ्या शेंडीची सुटलेली गाठ बांधेन." आणि चाणक्य राजदरबारातून तरातरा निघून गेले. त्यांचे हे रौद्र रूप पाहून राजा आणि उपस्थित दरबारी भयभीत झाली.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चाणक्यांच्या कथेत मी काही बदल केले आहेत. ही माझी मायबोलीवरची पहिलीच कथा आहे, त्यामुळेच मी इयत्ता पाचवीतलीच सोपी कथा माझ्या शब्दात लिहिली आहे. त्यामुळे कृपया आपणा सर्वांनी माझे मनसोक्त कौतुक करावे आणि जिथे जिथे मी कथेला अजून रंजक, मनोरंजक आणि सरस बनवु शकेन, त्या जागा दाखववून मला माझी लेखनातली जागा दाखवून द्यावी ही आग्रहाची विनंती.

त्यामुळे कृपया आपणा सर्वांनी माझे मनसोक्त कौतुक करावे >>>
फारच स्पष्ट अपेक्षा आहेत. आवडलं >> मनिम्याऊ मनःपूर्वक धन्यवाद, आपल्या प्रतिक्रियेबद्दल.

छान..>> मनःपूर्वक धन्यवाद, आपल्या प्रतिक्रियेबद्दल.

तुम्ही तुमच्या शब्दांत छान खुलवली आहे कथा..!!>> मनःपूर्वक धन्यवाद, आपल्या प्रतिक्रियेबद्दल.

त्यामुळे कृपया आपणा सर्वांनी माझे मनसोक्त कौतुक करावे >> आपले हे वाक्यच खुप कौतुकास्पद आहे. >> आपल्यासारखे रसिक वाचक असतील तर माझ्यासारख्या नवोदित लेखकालाही काहीतरी नवीन लिहिण्यास हुरूप येतो. खूप खूप धन्यवाद.