चाणक्य भाग -३ कोणत्याही समस्येवर रामबाण उपाय - चाणक्यांची त्रिसूत्री

Submitted by संयोग on 12 June, 2021 - 09:11

आपण माझ्या दोन्ही लेखाला जे प्रतिसाद आणि प्रेम दिलेत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आता आपल्या भेटीसाठी चाणक्य series चा ३रा भाग घेऊन येत आहे, मला खात्री आहे, की हा भागही आपल्याला पहिल्या दोन भागांप्रमाणेच आवडेल.
चाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश - https://www.maayboli.com/node/79173
चाणक्य भाग -2 चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यांची भेट - https://www.maayboli.com/node/79209

तिसर्‍या भागाची सुरुवात.....
ज्याप्रमाणे एक शिष्य चांगल्या गुरुविना अपूर्ण असतो; त्याच प्रमाणे एक गुरुही कायम एका चांगल्या शिष्याविना अपूर्णच असतो. अशीच काहीशी जोडी होती चंद्रगुप्त मौर्याची आणि आचार्य चाणक्यांची. चंद्रगुप्ताच्या पराक्रमाच्या तेजाला आचार्यांच्या मार्गदर्शनाशिवाय एवढी झळाळी आली नसती आणि जर चंद्रगुप्तासारखा पराक्रमी व निष्ठावंत शिष्य लाभला नसता; तर आचार्यांच्या विद्वत्तेलाही तेवढा नावलौकिक मिळाला नसता.

आचार्य चंद्रगुप्ताला एका गुप्त ठिकाणी घेऊन गेले आणि त्याचे प्रशिक्षण सुरू केले; कारण या कार्याचा धनानंदला मागमूसही लागून द्यायचा नव्हता. आचार्यांनी मौर्याला शस्त्र, शास्त्र, राजनीति, कूटनीती, अर्थशास्त्र व गोपनियता या सगळ्यांचे ज्ञान दिले. मौर्यही आचार्यांनी सांगितलेली अगदी प्रत्येक गोष्ट नीट ऐकत होता, समजून घेत होता, ते ज्ञान अवगत करण्यासाठी रात्रंदिवस मेहनतही घेत होता. शेवटी गुरु आणि शिष्य दोघांनाही एकाच ध्येयाने पछाडले होते.

आचार्य चंद्रगुप्ताला शास्त्रांचे ज्ञान देताना केवळ पुस्तकी ज्ञानावर भर देत नसत, ते व्यवहारीक ज्ञानालाही तितकेच महत्व देत. ते मौर्याची तयारी कशी चालू आहे, हे पडताळण्यासाठी वेगवेगळ्या परीक्षा, चाचण्याही घेत असत. मौर्याला त्यात कधी यश मिळत असे, तर कधी अपयश. परंतु तो हिम्मत न हारता आपल्या चुका समजून घेई आणि परत जोमाने कामाला लागे. आचार्यांनी अशीच एकदा मौर्याची परीक्षा घेण्याचे ठरवले.

त्यासाठी ते त्याला घनदाट जंगलात घेऊन गेले. एके ठिकाणी काटेरी हरळीच्या मुळया पडल्या होत्या; तेव्हा आचार्यांनी मौर्याला त्यावरून उघड्या पायांनी चालण्यास सांगितले. मौर्याने त्यावर पाय ठेवल्या ठेवल्याच त्याच्या पायात हरळीचे काटे रुतले, आणि पायातून घळाघळा रक्त वाहू लागले. आचार्यांनी मौर्याला विचारले, "तुझ्या पायांना जखमा करणार्‍या या मुळ्यांचं तु काय करशील?" मौर्य तत्काळ उत्तरला, "मी त्या उपटून काढीन." "पण तुला माहीत आहे का, की या मुळया जमिनीत किती खोलवर आहेत? त्यासाठी तुला किती जमीन खणावी लागेल? आणि समजा जरी तु त्या मुळया उपटल्यास, तरी त्यांचा काही भाग जमिनीखालीच राहील, व काही कालावधीनंतर त्यांना फाटे फुटून ते पुन्हा जमिनीवर येऊन पसरतील आणि पुन्हा एखाद्या वाटसरूच्या पायाला जखमा करतील." आचार्यांचे हे बोलणे ऐकून चंद्रगुप्त दोन गोष्टींचा विचार करु लागला, एकतर आचार्यांच्या प्रश्नाचे उत्तर काय असेल याचा, आणि आपले गुरुदेव कोणत्याही प्रश्नावर एवढा खोलवर विचार कसे काय करु शकतात याचा? अगदी हरळीच्या मुळयाही तेवढ्या खोलवर पोहोचू शकणार नाहीत.

चंद्रगुप्ताला काय उत्तर द्यावे ते कळेना हे जाणून अखेर आचार्यच म्हणाले, "तु जमीन खणशील, अगदी खोलवर जाऊन मुळयाही उपटून काढशील, पण त्यासाठी तुला वेळ, शक्ती आणि खणण्यासाठी अवाजरं किती लागतील? ह्या सगळ्या गोष्टींची खरंच एवढी गरज आहे का?" चंद्रगुप्ताला आचार्यांचं म्हणणं पटलं होतं, तरीही एक प्रश्न अनुत्तरीतच होता,"मग सांगा गुरुदेव, मुळया पुर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्याला काय करता येईल?" आचार्य म्हणाले, "सोपे आहे, एका वाटीत दही आणि साखर यांचे मिश्रण करायचे आणि ते सर्व मुळावर पसरवायचे." चंद्रगुप्त प्रश्नार्थक मुद्रेने आचार्यांकडे पाहतच राहिला, चंद्रगुप्ताच्या मनातील घालमेल ओळखून आचार्य सांगू लागले, "हे आर्यपुत्रा, कोणतीही समस्या सोडवण्यासाठी कोणता मार्ग उत्तम आहे यासाठी त्रिसूत्री स्मरणात ठेव.

१. मार्ग असा असावा, ज्याने संपूर्ण समस्येचे समूळ निवारण होईल.
२. समस्या केवळ आजच्यापुरती सुटू नये, तर ती भविष्यात पुन्हा कधीही उद्भवणार नाही, याचीही व्यवस्था व्हावी.
3. समस्या निवारण करण्यासाठी जो मार्ग आहे, तो सगळ्यात सोपा असावा, ज्यासाठी कमीतकमी श्रम लागतील, कमीतकमी साधनं आणि संपत्ती लागेल. (या आचार्य चाणक्यांच्या तिसर्‍या सुत्राला आजच्या management च्या concept मध्ये 'ASSET MANAGEMENT' म्हणतात.)

तर दही हा द्रव पदार्थ असल्यामुळे तो मुळामध्ये अगदी आतपर्यंत पोहोचेल. गोड दहयाच्या सुगंधाने मुंग्या, डुंगळे व सर्व कीटक जमा होतील, तेव्हा ते काही फक्त मुळावरचेच दही खाणार नाहीत, तर अगदी मुळयांच्या आतपर्यंत गेलेले आणि अगदी जमिनीतल्या मुळावरचे दहीसुद्धा खाऊ लागतील. दही खाण्यासाठी ते कीटक मुळानां अक्षरशः कुरतडून टाकतील. त्यांचा अशा प्रकारे फडशा पडतील, की त्या पुर्णपणे निर्जीव होतील. त्यामुळे भविष्यात त्यांना कधीही फाटे फूटणार नाहीत. " चंद्रगुप्त त्यावर बोलू लागला की, "मी सांगितलेल्या मार्गापेक्षा आपण सांगितलेल्या मार्गामध्ये वेळ, शक्ति व साधनं कमी खर्च होतील, आणि त्याचा परिणामही दीर्घकाळ राहील.", आचार्य खूष होऊन म्हणाले, "अगदी बरोबर, आर्यपुत्रा, कोणतीही समस्या सोडवताना ही त्रिसूत्री ध्यानात ठेवून मार्ग काढशील, तर तु निवडलेला मार्ग हा सर्वात उत्तमच मार्ग असेल."

चंद्रगुप्त हा काही गुरूंची शिकवण ही केवळ शाळेपुरतीच असते, किंवा परीक्षेपुरतीच पाठ करावी आणि नंतर विसरून जावी असं मानणार्‍यांमधला नव्हता. तर गुरूंचा प्रत्येक उपदेश समजून घेऊन त्यावर विचार करून तो खर्‍या जीवनात पदोपदी कसा वापरता येईल याकडे लक्ष देत असे. अगदी अखंड भारताचा सम्राट झाल्यावर देखील त्याने हे उपदेश कायम लक्षात ठेवले आणि मुख्य म्हणजे अमलात आणले, आणि त्याने ते कसे अमलात आणले, हे आपण कथेमध्ये पुढे पाहूच. नाहीतर आपण शाळेमध्ये असताना बर्‍याच गोष्टी शिकतो, अगदी परीक्षेसाठी घोकमपट्टी करून चांगले मार्क्सही मिळवतो, पण एकदा का शाळा सोडली, की सर्व काही विसरून जातो.

अगदी सकाळी लवकर उठून प्रार्थना करावी, व्यायाम करावा या गोष्टीही जवळजवळ सगळ्याच शाळांमध्ये शिकवल्या जातात. अगदी करूनही घेतल्या जातात, पण एकदा का शाळा संपली, की लवकर उठून प्रार्थना करणं, व्यायाम करणं या गोष्टी आपल्यासाठी अक्षरशः अंधश्रद्धा होऊन जातात. मग जेव्हा शारीरिक त्रास आणि मानसिक तणाव निर्माण होऊन आयुष्याची घडी विस्कटते, तेव्हा त्याच गोष्टी सांगण्यासाठी 'खिलाडियों का खिलाडी' अक्षय कुमारला आपल्या 'youtube' वर अवतार घ्यावा लागतो, आणि आपण पण त्याचं कौतुक करत म्हणतो, "अरे व्वा, आपला अक्की सकाळी केवढ्या लवकर उठतो, व्यायाम करतो, त्यामुळेच तो एवढा फिट आहे." जणू काही fitness चे रहस्य आपण त्याच्या तोंडून पहिल्यांदाच ऐकत असतो. त्यातही काही थोर लोक लवकर उठण्यापेक्षा अक्कीचं कौतुक करण्यातच आपल्या आयुष्याचं सार्थक आहे असं मानतात. याशिवाय बरेच जणं तर 'मी उद्या नक्की लवकर उठीन' असं एवढ्या आवेशाने ठरवतात, की त्यांना दुसर्‍या दिवशी सकाळी लवकर उठण्यासाठी काही जोशच राहत नाही. असो.

तर चंद्रगुप्त अखंड भारताचा सम्राट झाल्यावर एकदा ग्रीक साम्राज्याचा सेल्यूकस राजा हा भारतावर चालून आला होता. सेल्यूकस हा सिकंदरचा प्रथम प्रधानमंत्री होता. सिकंदर भारत जिंकण्यासाठी आला होता, परंतु चाणक्यांच्या कूटनीती व चंद्रगुप्ताच्या पराक्रमासमोर सिकंदर अजिबात टिकू शकला नाही. जग जिंकायला निघालेला सिकंदर भारतात मात्र घुसूही शकला नाही. चंद्रगुप्त आणि त्याच्या सैन्याने सिकंदराला सळो की पळो करून सोडले. त्याला अक्षरश: भारतातून हुसकावून लावले होते. सिकंदराच्या मृत्यूनंतर सेल्यूकस हा ग्रीक साम्राज्याचा सम्राट झाला होता. त्याने इराण, मिस्र(आजचे इजिप्त) ह्या देशांचा लढाईमध्ये अक्षरशः पाडाव केला होता, आणि तो आता त्याकाळच्या अखंड भारतावर वीस वर्षांनंतर चाल करून येणार होता. सिकंदर भारतावर चालून आला होता, त्याला आता जवळजवळ वीस वर्षे लोटली होती.

भारत त्याकाळी एवढा धनवान होता की असं म्हणतात, भारतात सोन्याचा धूर निघे. अशा संपन्न राष्ट्रावर चाल करून अमाप संपत्ति चोरून नेण्याचे त्याचे मनसुबे होते, परंतु ते चंद्रगुप्ताच्या धुर्त युद्धनिती व चाणक्यांच्या कूटनीतीसमोर टिकाव धरू शकले नाहीत, चंद्रगुप्ताने आणि त्याच्या सैन्याने सेल्युकसच्या सैन्याला अक्षरशः सळो की पळो करून सोडले. सेल्यूकस सर्वच मोहिमांवर हरत चालला होता. अखेर त्याला कळून चुकले की आपण चंद्रगुप्ताला शरण जावे, त्याची माफी मागावी, नाहीतर आपल्याला स्वतःच्या जीवालाही मुकावे लागेल. त्यामुळे अखेर जीवाच्या भीतीने तो चंद्रगुप्ताला शरण आला. हाच मौका होता, चंद्रगुप्ताकडे सेल्यूकसकडून प्रचंड दंड आकारण्याचा. चंद्रगुप्त सेल्यूकसला म्हणाला,"काबूल, गांधार, बलुचिस्तान, तुर्कस्तान ही सर्व राज्य तुला सोडून द्यावी लागतील आणि ही राज्य मौर्य साम्राज्यात सामील होतील." याशिवाय लढाईमधील विजयी राष्ट्र तत्कालीन प्रथेप्रमाणे पराजित राष्ट्रांकडून मुद्रेच्या स्वरुपात मोठा दंड वसूल करून घेत. पण चंद्रगुप्ताने मात्र तसं केलं नाही, तो सेल्यूकस राजाला म्हणाला, "मला तुझी मुलगी हेलन सोबत विवाह करायचा आहे." त्यावेळी सेल्यूकसला चंद्रगुप्ताचा प्रस्ताव धुडकावणे शक्यच नव्हते. त्यामुळे त्याने तो मंजूरच केला.

नंतर काही दिवसांनी चंद्रगुप्ताच्या दरबारातील एका मंत्र्याने चंद्रगुप्ताला खासगीत विचारले की, "सेल्यूकसच्या मुलीसोबत आपण लग्न करून आपल्या राष्ट्राचा काय फायदा झाला? त्या ऐवजी आपण जर सेल्यूकसकडून प्रचंड दंड आकारला असतात, तर त्या संपत्तीचा भारताच्या उन्नती व प्रगतीसाठी तरी फायदा झाला असता." चंद्रगुप्त सम्राट असला तरीही त्याने त्याच्या आजूबाजूला कधीही चमचे आणि हुजरे ठेवले नव्हते. चाणक्यांच्या शिकवणुकीप्रमाणे राजाने त्याच्या अवतीभोवती केवळ प्रशंसक ठेवू नयेत, तर निंदकही ठेवावेत, जे त्याला त्याची चूक दाखवून योग्य मार्ग दाखवतील, कारण अखेर निंदकांमुळेच राजाला राज्यातील विरोधकांचाही आवाज कळतो, त्यामुळे तो धनांनंदप्रमाणे स्वतःच्याच भोगविलासात रममाण राहत नाही, कायम जागरूक राहतो.

चंद्रगुप्ताशिवाय कोणताही राजा असता, आणि त्याच्या मंत्र्याने असा प्रश्न विचारला असता, तर त्या राजाने मागचापुढचा कसलाही विचार न करता एका क्षणात त्या मंत्र्याचे मस्तक धडावेगळे केले असते. पण चंद्रगुप्त या प्रश्नावर हसला व म्हणाला, "हे श्रेष्ठ मंत्री, माझे गुरु आचार्य चाणक्यांनी मला कोणतीही समस्या सोडवण्यासाठी एक कानमंत्र दिला आहे, की समस्या अशा प्रकारे सोडव, की समस्या केवळ नष्टच होणार नाही तर ती परत उद्भवणारसुद्धा नाही. मी जर सेल्यूकसकडे भरपूर दंड मागितला असता, तर त्याने मला तो दिला पण असता. पण त्यानंतर उद्या तो आपल्या भारतावर चालून येणार नाही, याचा काही भरवसा असता का? त्यामुळेच मी हेलनशी विवाह केला. आता सेल्यूकस आपल्या मुलीच्या देशावर आक्रमण करून स्वतःच्याच प्रिय मुलीचे प्राण धोक्यात घालणार नाही. याशिवाय मी त्याच्यासोबत एक करारही केला आहे, की जर उद्या हेलनला पुत्र झाला, तर त्याचे मूळ विदेशी असल्यामुळे तो कधीही माझा उत्तराधिकारी होऊ शकणार नाही. याशिवाय भारताच्या राजकारणामध्ये कोणतेही पद किंवा कोणतीही भूमिका त्याला घेता येणार नाही, ज्यामुळे तो कोणत्याही प्रकारचे बंड करु शकणार नाही. त्यामुळे भविष्यातही भारताला आतून किंवा बाहेरुन ग्रीक साम्राज्याकडून कसलाही धोका निर्माण होणार नाही."
हे चंद्रगुप्ताचं उत्तर ऐकून तो मंत्री आतून खजील झाला, त्याला आपल्या सम्राटाच्या दूरदृष्टीचे कौतुक वाटले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आपण माझ्या दोन्ही लेखाला जे प्रतिसाद आणि प्रेम दिलेत, त्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद. आता आपल्या भेटीसाठी चाणक्य series चा ३रा भाग घेऊन येत आहे, मला खात्री आहे, की हा भागही आपल्याला पहिल्या दोन भागांप्रमाणेच आवडेल.
चाणक्य भाग -1 चाणक्यांचा जन्म आणि राजकारणात प्रवेश - https://www.maayboli.com/node/79173
चाणक्य भाग -2 चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्यांची भेट - https://www.maayboli.com/node/79209

याशिवाय मी त्याच्यासोबत एक करारही केला आहे, की जर उद्या हेलनला पुत्र झाला, तर तो कधीही माझा उत्तराधिकारी होऊ शकणार नाही, त्यामुळे भविष्यातही भारतावर कोणतेही संकट येणार नाही."
>>हे काय लॉजिक आहे? म्हणजे बाहेरून नाही यातूनच बंड होउदे का...

भविष्यातही भारतावर कोणतेही संकट येणार नाही."
>>हे काय लॉजिक आहे? >> हा प्रश्न मलाही पडला.
बाकी छान लिहिले आहे.

च्रप्स, आपण माझी कथा खूपच मन लावून आणि बारकाईने वाचून काढलीत, आणि त्यातील चूक दाखवलीत. आपली प्रतिक्रिया लक्षात घेऊन मी माझ्या कथेत काही बदल केले आहेत.
हेलनचा पुत्र आता आतूनही बंड करू शकणार नाही. त्यामुळे कथेप्रमाणे भविष्यात भारताला ग्रीक साम्राज्याकडून आतून आणि बाहेरून दोन्हीकडूनही धोका असणार नाही.
आपण माझी कथा इतक्या बारकाईने वाचून मला प्रतिक्रिया दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आशा करतो, मी केलेले बदल आपल्या पसंतीस उतरतील.

वीरु, आपल्याला दोन्ही भागांप्रमाणे तिसरा भागही आवडला, हे वाचून छान वाटले.

आणि आपण चूक दाखवून कौतुकही केलेत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
आशा करतो, मी केलेले बदल आपल्या पसंतीस उतरतील.

रूपाली विशे - पाटील, आपल्याला दोन्ही भागांप्रमाणे तिसरा भागही आवडला, हे वाचून छान वाटले.

प्रतिसादाबद्दल मनापासून धन्यवाद.