फडफडत राहतो

Submitted by किमयागार on 8 June, 2021 - 02:58

काळ वाऱ्यासवे कुजबुजत राहतो
हा निखारा कसा धगधगत राहतो ?

सत्य बोलायची सोय नाही जगी
आतल्या आत मी घुसमटत राहतो

रोज काहीतरी स्वप्न पडते नवे
मी नव्याने पुन्हा धडपडत राहतो

सारखी बदलते नियतिची चाल अन्
मी तिच्या मागुनी भरकटत राहतो

क्षणभरी ती जरा दूर गेली तरी
जीव माझा खुळा तळमळत राहतो

मी न डोळ्यातला मेघ होतो तिच्या
मी तिच्या अंतरी गडगडत राहतो

पुस्तका सारखे चाळते ती मला
मी पुढे जन्मभर फडफडत राहतो

----©मयुरेश परांजपे(किमयागार)----

Group content visibility: 
Use group defaults