उधाणलेल्या दर्यासारखी

Submitted by पुरंदरे शशांक on 8 June, 2021 - 00:41

उधाणलेल्या दर्यासारखी

उधाणलेल्या दर्यासारखी
घुसळण करीत खालीवर
हेलकावणारे एक होडकं
अलगद ठेवील वाळूवर

चमचमणार्‍या तार्‍यांसारखी
लाखोमैल दूरवर
किरकिरणार्‍या रात्रीतही
पाखर घालील डोळ्यांवर

मस्तमौला वार्‍यासारखी
उधळत जाईल क्षणभर
निळे निरभ्र नीरव काही
मागे ठेवील ओंजळभर

खोल निगूढ डोहावाणी
काजळ लावीत डोळाभर
सावळ काळी एक सावली
पसरत जाईल ह्रदयावर

सरसर सरसर थेंबांसारखी
ओघळत थेट मनभर
लसलसणारी कोवळ पाती
उगवून येतील भुईवर

शब्दजाळे तलम, भरड
गुंगवून गुंतवणार
क्षणात सोडवून फसवे धागे
निघून जाईल वार्‍यावर

...........अशी कविता हवीये मला.

Group content visibility: 
Public - accessible to all site users