आईचा मुलगा

Submitted by मिरिंडा on 1 June, 2021 - 05:00

सुर्वे अण्णा, एक तिरसट चेहऱ्याचा माणूस होता. त्यांचे बारिक बारिक डोळे , रुंद चेहरा, लहानसं पक्षांच्या चोचीसारखं नाक आणि त्यावर सतत बसलेला राग , कोणालाही त्यांच्या जवळ फिरकू देत नसे. त्यांचा पेहराव म्हणजे पांढरा बुशशर्ट आणि पँट . क्वचित तो बुशशर्ट चौकडीचा असे . ते टीशर्टही घालीत असत. व्यायाम करीत राहिल्याने शरीर मजबूत व पिळदार होते. वय असेल साठ बासष्ट. कोणत्याही हालचाली ते फार लवकर लवकर करीत असत. त्यांना मुळी गलथानपणा , आळशीपणा आवडत नसे. आम्हाला तर ते सांगत , " रानडे तुम्ही साठीमध्ये असे कमरेवर हात ठेवून चालणार. मी पाहा. अजून डबलबार , सिंगल बार करतो. "..... . ते ऑफिसमध्ये असले की खूप मोठ्याने आणि जोरात बोलत. त्यांच्या बोलण्यात फोर्स जाणवायचा. चेष्टा मस्करी पण करीत असत . पण त्यांची चेष्टा केलेली त्यांना सहन होत नसे. मला एक जॉब सुटल्याने दुसरा जॉब हवा होता. कोणाच्यातरी ओळखीने मी अण्णांकडे कामाला लागलो. पहिल्याच दिवशी त्यांनी मला सांगितलं. " हे पाहा रानडे, आमच्याकडे मस्टर नाही. प्रत्येकानी समजून दहा वाजेपर्यंत यायचं . जायचा टाइम नाही. रजा नाहीत. जेवढे दिवस भराल तेवढे पैसे. सुरुवातीला तुम्हाला पाच रुपये तासावर काम करावं लागेल. स्वतःचं जाण्या येण्याचं रेकॉर्ड स्वतःच ठेवायचं . " ..... गरजवंताला अक्कल नसते या न्यायानुसार मी जॉइन झालो. यापेक्षा रस्त्याच्या कामाला असलेल्या मजुराला जास्त पैसे मिळत असतील. मी पस्तिशीचा होतो. माझा नाइलाज होता.

दिवस ठीक चालले होते. अण्णा बाहेरची कामं बघत. दुसरे पार्टनर होते ते कार्यालयीन काम बघायचे. ते आमच्यावर लक्ष ठेवून काम करून घेत. एकदा मला अण्णा म्हणाले, " रानडे, जरा रिकामा सिलींडर घेऊन घरी जायचय आणि भरलेला सिलिंडर घेऊन यायचय. चला खाली. " त्यांनी सिलिंडर स्वतः उचलून खाली नेला. स्कूटरवर बसले आणि मला म्हणाले, " उचला सिलिंडर आणि धरून बसा मागे. " मी उचलायला गेलो . मला उचलता येईन . त्यावर ते म्हणाले, " अगदीच पुचाट आहात हो. बायकोला उचलता का नाही रात्री ? उचला...ऽ...ऽ " मग त्यांनी स्कूटर स्टँडवर लावली मला बसायला सांगितलं आणि स्वतः सिलिंडर उचलून माझ्या मांडीवर दिला. मग तोंडातल्या तोंडात पुटपुटले. " काही उपयोग नाही तुमचा. " घरी पोहोचलो. त्यांचा बंगला होता. त्यांनी अभिमानाने बंगला दाखवला. आणि म्हणाले, "काय आहे ना रानडे , या तुमच्या ठाण्यात आलो तेव्हा माझ्याकडे दहा बाय दहाची रुम होती. पण हार्डवर्क ऑलवेज पेज. आणी मी हा बंगला बांधला. " मी फक्त ऐकत होतो. मी आईवडिलांनि घेतलेल्या आयत्या फ्लॅटमध्ये राहत होतो. माझी छाती दडपणाने आत आत चालली होती .

एकदा अण्णा म्हणाले, " चला रानडे ,आपल्याला सेल्स टॅक्स मध्ये जायचंय . आपली ऍसेसमेंट आहे. फाइली घेऊन आम्ही दोघे निघालो. खाली उतरलो. एक दोन तीन वर्षाचा मुलगा अण्णांच्या स्कूटर वर खेळत होता. सीटवर बसून तो चालवताना हॅण्डल हालवतात तसं हालवीत होता. तोंडाने स्कूटरचा टुर्र र्र र्र ............असा आवाज काढीत होता. तो खेळात रंगला होता. आम्ही जवळ आल्याबरोबर तो थांबला. आमच्याकडे पाहून पुन्हा आवाज काढीत खेळू लागला. अण्णांना आवडलं नाही. त्यांनी तिरसटपणाने त्याला खाली खेचून विचारलं. " काय रे ? कोणाचा मुलगा रे तू ....???? त्या मुलाचे डोळे ओले होत असलेले मला दिसले. तरीही त्याने उत्तर दिले. " आईचा ....!!......" मला त्या मुलाचं कौतुक वाटलं. त्याने स्वतःची ओळख आईचा मुलगा अशी केलेली पाहून अण्णा विरघळतील असे वाटले होते. पण उत्तरादाखल ते म्हणाले, " चल चल नीघ इथून. " आम्ही स्कूटरवरून निघून गेलो . माझ्या डोळ्यापुढून त्या मुलाचा निष्पाप चेहरा आणि त्याने दिलेले उत्तर डोक्यातून जाईना. खरंतर आपण सगळेच आईची मुलं असतो. पण आपण कधी अशी ओळख वापरतो का ? आपली ओळख म्हणजे आईवडिलांनी ठेवलेलं आपलं नाव, आडनाव, गाव ,जात , धर्म , इत्यादी . आपण तीच सांगतो. ज्यातून फक्त जाती धर्माची बंधनं आपण दाखवित असतो. अण्णांना याच्याशी काही करायचे नव्हते. मृदू भावना त्यांच्या लेखी अस्तित्वातच नसाव्यात. एक दिवस ते बोलता बोलता म्हणाले, " रानडे , हा देवबीव मी मानीत नाही. आम्ही लहानपणी खायला मागितलं तर घरात दारिद्र्य फार असल्याने आमच्या कधी कधी थोबाडात मारीत. मग तसंच झोपावं लागायचं . तेव्हा कुठे गेला होता हो देव ? " तुमचं काय म्हणणंआहे ? मी अर्थातच काही बोललो नाही मी गरजू माणूस . त्यांना कशाला नाराज करीन . तुमचं बरोबर आहे एवढंच म्हणालो. अण्णांचं वागणं माझ्या मते अतिव्यवहारी (ओव्हर प्रॅक्टिकल) होतं. ते असे का झाले ते शोधावं लागेल.

अरूण कोर्डे
९००४८०८४८६

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही लोक खरच असतात अशी तिरसिंगराव. सुंभ जळला पण पीळ जात नाही अश्या टाईपची. जोपर्यंत माणसाला दुसर्‍याच्या दु:खाची जाणिव होत नाही तो पर्यंत माझ्याच वाटेला कसे सारे दु:ख आले असे म्हणून हे लोक स्वतःच्या कोषात मग्न रहातात आणी दुसर्‍याची वाट लावतात.

."...... आणि दुसऱ्याची वाट लावतात. " त्यात त्यांना आनंद मिळतो. आपलं म्हणणं बरं बरं आहे. प्रतिसादाबद्दल आभार.