सत्येन देसाई

Submitted by मिरिंडा on 29 May, 2021 - 08:24

सत्येन देसाई आमच्या कंपनीत गेली पंधरा ते वीस वर्ष होता. असं म्हणतात की कंपनीच्या सुरुवातीच्या काळात सत्येन एक दोन वर्ष तरी सगळी कामं एकटाच सांभाळत असे. (अर्थातच हे आमचा एम. डी. सांगतो. ) त्यामुळे स्वीपर पासून अगदी एम. डी पर्यंत सर्वांचच रुटीन त्याला माहीत होतं. तसच तो कोणतंही काम करायला तयार असे. म्हणून त्याला ऑफिसमध्ये फार भाव होता. जर एखादं काम तुम्हाला जमत नसेल , म्हणजे तुमच्याबरोबर मिटिंग ऍटेंड करणं, बजेट तयार करण , बोर्ड ऑफ डायरेक्टर्सची मिटिंग कंडक्ट करणं इथ पासून ते डांबरट कस्टमर कडून वसूली करणं, चहा नाश्ता आणण्या पर्यंत वगैरे सर्व कामं तो करीत असे. तुम्ही त्याच्यावर सोडा आणि निर्धास्त राहा. सत्येन साधारण चाळीस बेचाळीस वर्षाचा असावा. मुळातच सहा फुटाच्या आसपास उंची , गोरटेला, किंचित टक्कल पडायला सुरुवात झालेले उंच कपाळ असलेला सत्येन चांगलाच ताकतवान होता. साधारणपणे उंच माणसं बारिक असतात आणि चालताना थोडे तरी झुकतात. पण सत्येन मात्र ताठ चालायचा. शरीर कमावलेलं असावं . केस कुरळे , डोळे मात्र लहान आणि लांबट , त्यामुळे तो वस्ताद वाटायचा. तो खुर्चीवर बसला की त्याच्या उंचीमुळे त्याचे पाय टेबलाच्या दोन्ही बाजूनी बाहेर यायचे. त्याची दाढी मात्र कायम वाढलेली असायची . कधी तो ती कोरून यायचा , तर कधी तो तशीच वाढलेली ठेवायचा. पण स्वच्छ दाढी केलेला मी तरी त्याला कधी पाह्यला नाही.

सत्येन कडे विशिष्ट असं काम नव्हतं. जिथे कमी तिथे सत्येन. तो यायचा पण ऑफिस टाईमच्या आधी एक तास आणि जायचा तुम्ही सांगाल तेव्हा. त्यामुळे त्याच्या वागण्यात एक प्रकारची बेदरकारी होती. तो नवीन आलेल्या माणसांकडे तुच्छतेने पाहातो असं अर्थातच मला वाटायचं. प्रीतमलाही तसच वाटायचं. प्रीतम शहा आमचा मॅनेजर. त्यालाही अशीच दहा एक वर्ष झाली होती. त्यामुळे त्याचा अनेक कामात हातखंडा होता. कामाच्य डेड लाईन्स तर तो अचुक पाळित असे. त्याही हसतमुखाने. मी त्याच्याकडून बरच काही शिकलो. मी एम. बी. ए. झालो आणि दोन वर्षांपूर्वी असि. मॅनेजर म्हणून लागलो . माझी केबीन प्रीतम च्या जवळच होती. मी ऑफिस जॉईन केलं आणि पहिल्याच दिवशी सकाळी सकाळी एक माणूस दारावर न वाजवता आत शिरला. मला खरंतर त्याचा रागच आला . पण मी काही बोललो नाही. मग त्यानी स्वत:ची ओळख करून दिली. "मी सत्येन, सत्येन देसाई. " आणि त्याने आपला उजवा हात पुढे केला. मी त्याला बसायला न सांगता आणि न उठता , हात पुढे केला व तुटकपणे मिळवला. माझ्या तुटकपणाची पर्वा न करता तो आगाऊपणाने माझ्या समोरच्या खुर्चीत बसला आणि म्हणाला, " गायकवाड साहेब मी आपल्या सेवेला तत्पर आहे. आपण कोणतंही काम दिलत तरी मी ते करीन. " वास्तवीक तो मनापासून बोलत होता. पण मला त्याचा एकुण अप्रोच आवडला नव्हता. मी जास्त प्रतिक्रिया न देता कामाचे पेपर्स पुढे ओढले. तेवढ्यात फोन वाजला. फोन आय. टी चा होता ( आय. टी. मिरचंदानी आमचा एम. डी. ) "अरे विनायक आला का तू ? . हे बघ तो सत्येन आहे ना त्याचा उपयोग करून घे. " मी येस सर म्हंटलं. मग तो म्हणाला. " हे बघ , ह्या शनिवारी बोर्ड मिटिंग आहे. तू आणि प्रीतम तयारी करा. सत्येन बघेल सगळं. " मी पुन्हा येस सर म्हंटलं. आणि फोन ठेवला. सत्येन उठला आणि जाताजाता म्हणाला, " आय. टी . चा फोन ना ? बोर्ड मिटिंग असेल. काही घावरू नका. मी करीन सगळं. " आणि तो गेला. मला इतका भयंकर राग आला की या माणसाचा आगाऊपणा एम. डी. ला कसा चालतो , असं मला वाटलं.

मग मी प्रीतम ला भेटलो. तो म्हणाला, " तू कशाला अपसेट होतोस? तो ही जवावदारी घेत असेल तर त्याला घेऊ दे. तू दुसरी कामं बघ ना. पण मला ते पटलं नाही. काहीतरी करून दाखवण्याची संधी आली होती आणि ती हा माणूस घेउ पाहत होता. मग प्री तम म्हणाला आपण लंच मध्ये बोलू. आणि ते तेवढ्यावरच राहिलं. लंचमध्ये त्याने मला खूप समजावले. त्याच्या म्हणण्या प्रमाणे मि आपला फायदा करून घ्यावा. तो म्हणाला, " तू त्याला महत्त्व दिलस म्हणून तो काय तुझ्यापेक्षा जास्त पैसे मिळवणार आहे का? त्याला तुझ्या वरची पोस्ट मिळणार आहे का? शेवटी असिस्टंट तो आसिस्टंटच. आय. टी ला मी ओळखतो. आजपर्यंत त्याला मॅनेजर का नाही झाला हा? असतात काही लोक आगाऊ. आणि हो तुह्या जवळ सुपीरियर क्वालिफिकेशन आहे हे लक्षात ठेव. आय. टी तुला जो मान देईल तो त्याला देईल का ? तो दिवस संपला मी थोड्याशा विचलित मनस्थीतितच घरी आलो. घरात शिरल्या शिरल्या सुप्रिया , माझी बायको म्हणाली, " हे काय? आज काही बिनसलय वाटत ? " मी छे छे म्हणून तिला झटकली. तिला माझ्या चेहेऱ्यावरचे तटस्थ भाव दिसले असावेत. बायकांना परमेश्वराने नवऱ्याचा चेहरा वाचण्याची कला उपजतच दिलेली असते कि काय कोण जाणे .

ऑफिसमधल्या बहुतेक पोरी सत्येन वर खूष असायच्या. सत्येन ऑफिसच्या कल्चरल ग्रुपचा हेड होता. मी येण्याच्या आदल्या वर्षीच ग्रुपने नाटकाचा प्रयोग केला होता. आय. टी . पण खूष होता. तो सिंधी असला तरी मराठी बर बोलायचा.मराठी नाटक, चित्रपट त्याला आवडायचे.ठरल्याप्रमाणे शनिवारी बोर्ड मिटिंग झाली. सत्येनला टाळून ,मी आणि प्रीतमनि डेटर्स क्रेडिटर्स लिस्ट व चालू असलेल्या प्रोजेक्टस बद्दल एक टिप्पणी तयार केली होती.सत्येन अधून मधून काही मदत हवी आहे का असं विचारायचा.पण आम्ही दोघांनी त्याचा सहभाग कटाक्षाने टाळला.बरोबर सकाळी नऊ वाजता आय.टी आला.तो यायचा तोच मुळी बोंबलत यायचा.पण त्याची भीती किंवा त्याच्या येण्यामुळे कोणत्याही प्रकारचे टेन्शन येत नसे.मी नवीन असल्याने मला थोडं टेन्शन होतं. आजही तो आला तो रिसेप्शनिस्ट लैला पासून ते अगदी मॅनेजर पर्यंत सगळ्यांची वैयक्तिक चौकशी करीतच आला. बाहेरचं हाय हॅलो झाल्यावर तो कॉंफरन्स रुम मध्ये जाऊन तो बसला.थोड्या वेळानी बाकीचे डायरेक्टर्स ,म्हणजे डिसूझा,थडानी,शेजवलकर आणि सोनी पण आले.

लवकरच मिटिंगला सुरुवात झाली.मी आणि प्रीतम आय.टी.च्या मागे बसलो होतो.अजेंड्याप्रमाणे सगळं नीट चालू होतं. थोडे फार हास्य विनोदही चालू होते. मी उभा राहून प्रत्येक मुद्दा व्यवस्थित स्पष्ट करीत होतो. मी चालू प्रोजेक्टसची प्रोग्रेस व भविष्यातील फायदे विशद केले. बहुतेक डायरेक्टर्स नि माना डोलावल्या. डिसूझाला पण ते पटलं असावं. कारण त्याची प्रतिक्रिया काही नव्हती. तो पटलं नाही तरच तोंड उघडत असे. मग प्रीतम उठला. आणि डेटर्स क्रेडिटर्स लिस्टवर बोलू लागला. कंपनी च्या खरेदी विक्रीचाही स्टॅटिस्टिकल डेटा त्याने विशद केला. मग मात्र डिसूझा मध्येच ओरडला., "अरे वो सब छोडो ,पह्यले किसके पास कंपनीका कितना पैसा बाकी है वो बोलो. और आय. टी ., तूने वसुली का क्या किया ये बता. हमेशा पैसा नही पैसा नही करके बोलता है. और तेरा स्टाफ काम नही करेगा तो क्या फायदा? ये देख. (हातातली डेटर्स लिस्ट आय. टी . पुढे नाचवीत म्हणाला) ये लिस्टमे तीन पार्टीज का बाकी पैसा देख. ये नितीन भाय अँड कंपनी के पास अपना २७ लाख है., जिवाजी ब्रदर्स के पास अपना २३ लाख है, और ये शिवा एंटरप्राइजेस के पास अपना १७ लाख बाकी है. सब मिलके ६७ लाख होता है. साला पावना करोड अपना मार्केटमे अटका हुवा है. और तू बोलता है नया प्रोजेक्ट लेलो. कैसी बात करता है रे तू ? . ‌.. "

आय. टी . चिडलेला दिसला. प्रीतम मध्येच म्हणाला, " आमचे वसुली साठी प्रयत्न चालू आहेत. योग्य त्या नोटिसाही बजावल्या आहेत. " पण आय. टी . ओरडून म्हणाला, " अरे ते तुझा नोटीस बाजूला ठेव रे. पैसे का क्या ? तुमने सत्येन को नही बताया ? तुमने ये सब तैयारी किया , सत्येन का रिपोर्ट किधर है. ? प्री तमनि माझ्याकडे पाहिलं आणि म्हणाला, " पण आय. टी . अरे सत्येन आपला लास्ट रिसॉर्ट आहे. " आय. टी आणखिनच भडकून म्हणाला, " तुम क्या बात कर राहा है. अरे ६७ लॅक्स पिछले छे महिने से बाकी है, बा.. की. समझा ? उसका ब्याज कौन देगा ? ( त्याला बहुतेक, " तेरा बाप "? असं म्हणायचं असावं )

मग काय सगळेच डायरेक्टर्स भडकले. सोनी म्हणाला, ( ते आय. टी. ला चांगलच लागलं ) " अरे आय. टी . तू काय कंपनी चालवते का भेलपुरी का गाडी चालवते. ? सिर्फ तेरे पास शेअर्स जादा है इसलिये तू एम. डी. है. "

मग शेजवलकर मागे कसे राहतील ? ते म्हणाले, " जे जे या वसुलीला जबाबदार आहेत त्यांच्या कडून या पैशांचं व्याज वसूल करावं. "

प्रीतमचा चेहरा पांढरा पडला. थडानी फक्त काही बोलला नाही. त्याचं काम परस्पर होत असावं. मग आय. टी विरुद्ध इतर अशी भडकाभडकी सुरू झाली. आय. टी. च डोकं फिरलं. तो ओरडला. " सत्येन को बुलाव. "

आवाज एवढा मोठा होता की सत्येन्ला बोलवायला शिपायाची गरजच पडली नाही. सत्येन स्वतःच दार ढकलून आत आला. आल्या आल्याच आय. टी . ने त्याच्या अंगावर डेटर्स लिस्ट भिरकावली आणि म्हणाला, " सत्येन तू काय काम करतो रे ? तुला काय मी लडकी लोक बरोबर वार्ता करायचा पगार देते काय ? .तुम लोग चरिया हो गया क्या ? ( तुम्ही वेडे झालात काय ? ) छे छे महिना तुम लोग सोता है क्या ? मेरेको ये पैसा तीन दिनमे वसूल करके मंगताहै. समझा. तु रात्री जा ., दिवसा जा, काय पण कर. नाही तर तू आणि प्रीतमचा मी काय करेल सांगता येत नाय. "

मला जरा बरं वाटलं. पण तो पुढे म्हणाला, " इधर साला एम. बी. ए.लोक एपॉइंट केला तरी काय उपेग नाय. तुम दोनो ( मी नाही प्री तम. ) पैसा लाव नही तो तुम दोनो आऊट. " मग त्याने आजची मिटिंग बरखास्त झाल्याचं जाहीर केलं. आणि पुढील मिटींग पूढच्याच शनिवारी ठेवली. मग सगळेच डायरेक्टर्स भडकून बाहेर पडले. रूमच्या बाहेर चहा नाश्ता तसाच होता.

आय. टी . तेवढा थांवला. त्याने मग मी , प्रीतम आणि सत्येन अशी तिघांची मिटिंग घेतली. आधी कोणीच काही बोललं नाही. मग तोच म्हणाला, " मला वाटतं मी तुमच्या तिघांचा काम सुपरवाईज करावा. सत्येन यु आर बिकमिंग अनरिलाएबल. (सत्येन् ने मान खाली घातली.) मी काय सांगतो ते नीट ऐका. तो शेजवलकर हाय ना , तो हाय मराठी माणस, आय ऍम सॉरी, पण तो तुमच्या कडून ब्याज वसूल करणार , घ्येनात ठेवा. काय वाट्टेल ते करून नितीन भाय चे पैशे मला बुधवारी पाह्यजे. गुरुवारी मी फोन करेल. आणि हेच्या पुढे मी हप्त्यातून एक दिवस इथे येऊन बसणार. तुम्हाला पण फ्री सोडून चालणार नाय. निघा आता. " असं म्हणून तो गेला. सत्येन ने काय ठरवलं होतं कोणास ठाऊक. पण आम्ही दोघांनी मात्र सोमवारी एकत्र बसू न याच्यावर सोल्यूशन शोधण्याच ठरवलं.

सोमवार उजाडला. ऑफिसमध्ये सत्येन आलाच नाही.

सत्येन दुसऱ्या दिवशीही आला नाही. आय. टी. चा फोन दोनदा आला. पण सत्येन नसल्याने तो जास्त काही बोलला नाही. की आम्हालाही विचारलं नाही, की वसुलीचं आम्ही काय करतोय. मी प्रीतमलाही विचारलं पण त्यालाही कोडं होतं की हा माणूस गेला कुठे ? मग त्यानी मला सत्येन बद्दल काही माहिती दिली. त्याला एक मुलगा आणि एक मुलगी होती. त्याला आणखी एक मुलगा होता, जो काही वर्षांपूर्वी कॅन्सरने गेला होता. मला वाईट वाटलं . म्हणजे फक्त हळहळ वाटली. सत्येनची काही कमजोरी आहे का, ती मी शोधू लागलो. पण मला काही सापडेना. प्रीतमनी आणि मी काही कायदेशीर कारवाईची धमकी देणाती पत्र तयार केली. अर्थातच , आय. टी. ची सही आवश्यक होती.

मग अचानक सत्येंबुधवारी आला . तो प्रीतमच्या केबीन मध्ये बसला होता. तो काहीतरी बोलणार इतक्यात आय. टी. चा फोन आला. फोन सत्येननेच घेतला. " अरे सत्येन तु हाय कुठे ? पैशाचा काय जाला ?"

सत्येन खुषीत दिसत होता. तो म्हणाला, " नितिंभाय कडून मी पंधरा लाखाचा चेक आणलाय. आणि उरलेले पैसे तो या महिन्याच्या शेवटी देणार आहे. "

पलिकडून आय. टी. ओरडला, "अरे वा सत्येन क्या बात है यार. तूने तो कमाल कर दिया. , दे प्रीतमला दे. "

प्रीतमच्या हातात चेक होता. त्याला आय. टी. म्हणाला, " देख, सत्येन की करामत. तेला पयलेच सांगितला असता तर पूरा पैसा आला असता. " प्रीतम फक्त" खरं आहे. " म्हणाला.

मग आय. टी म्हणाला , " सत्येन डिझर्व ए पार्टी. तुम्ही लोकनी काय केला? आफ्टर ऑल सत्येन इज सत्येन. चल , जवादे. " प्रीतमच्या डोक्यात तेच घुमू लागले. "सत्येन इज सत्येन. "

सत्येनने आज सगळ्यांना चहा नाश्ता दिला. त्यात मला फारशी खूषी नव्हती. त्याने असं काय केलं आणि तो चेक घेऊन आला. मी कारण शोधण्याचं ठरवलं. अर्थातच, शनिवारची बोर्ड मिटिंग चांगली झाली. डायरेक्टर्स थंड झाले. शेवटी पैसा काहीही करू शकतो. अशी माझी प्रतिक्रिया झाली. प्रीतम फारसा वोलेनासा झाला. लवकरच आय. टी. ने नवीन दोन प्रोजेक्टस घेतले. एक चंडिगढचा आणि एक नैनितालचा. नहेमीप्रमाणे आम्ही सगळेच कामात गुंतलो. रात्री आठला घरी जाणारा मी आता अकरा बारा वाजता घरी जाऊ लागलो. आठ दहा दिवसात काम एकदम वाढलं. साईटला पाठवायचं मटेरियल त्यांची पेमेंटस वगैरे कामं त्वरीत पूर्ण करावी लागत होती. सुप्रियाची घरी कटकट चालू झाली. " बट आय वॉज एंजॉइंग द वर्क. " मध्यंतरी च्या काळात आंम्ही दोघांनी (म्हणजे प्रीतम) लहान लहान कस्टमर्स कडून पैसे वसूल केले. आय. टी खूष होता. पैशाचा ओघ चालू झाला. नितिनभायचे बाकी बारालाख आम्ही विसरून गेलो. ते सर्व बाजूला पडलं .

अशाच एका सोमवारी मला आय. टी. चा फोन आला.तो म्हणाला, " अरे विनायक तुजा काम आता लई वाढला. तुला एक असिस्टंट घे म्हणजे जल्दी जल्दी काम होईल. उमेदवारांच्या मुलाखती घेऊन शेवटी एका मुलीला कामावर ठेवलं. तिचं नाव होतं , " वासंती देवरुखकर. " मी तर मुलाखती पासूनच (मुलाखत मीच घेतली होती) तिच्याकडे आकर्षित झालो. पंचवीस सव्हिस वर्षाची वासंती , रंगानी काळी असली तरी चांगलीच आकर्षक होती. फिगर इतकी "टंच " होती की कोणीही तिच्याकडे दोनदा नक्कीच पाह्यलं असतं. तिचं चालणं सुद्धा फार आकर्षक होतं. ती साडी नेसली तरी अगदी चापून चोपून नेसायची आणि फॅशनेबल कपडे घातले तरी आपलं अंग प्रत्यंग कसं आकर्षक दिसेल याची ती काळजी घ्यायची. मग पाहणाऱ्याचं डोकं निष्कारण गरम व्हायचं . अर्थातच, माझं ही. ती माझ्या डोक्यातून कधीच गेली नाही. कोरल्यासारखे टपटपीत डोळे, अरुंद जिवणी, आणि पक्षांच्या चोची सारखं नाक. गाल चांगलेच फुगलेले असायचे. मी यामुळे खूपच "डिस्टर्ब " व्हायचो. इतका की घरी गेल्या वर मला सुप्रियाच्या जागी तीच दिसायची.

तुम्ही म्हणाल मी तिच्याशी मैत्री वाढवायला पाहिजे होती. लोकांचे बिवाह्बाह्य संबंध काय कमी असतात ? माझ्या डोक्यात असलं काही नव्हतं असं समजू नका. पण तिच्यामुळे मी सुप्रियाची तुलना तिच्याशी करू लागलो. आणि मला सुप्रिया अगदीच काकूबाई आणि नॉन रोमँटिक वाटू लागली. आपण लग्नाला उभे राहिल्यावर आपल्यासमोर साधारण मुलीच का आणतात ? रस्तोरस्ती दिसणाऱ्या सुंदर मुलींचं काय होतं , कोण जाणे. अशा विचारांनी मी विचलीत होऊ लागलो. मी सुप्रियावर विनाकार्ण डाफरायला लागलो. ती घाबरून मला खूष करण्याचा प्रयत्न करू लागली. असो. वासंतीला माझ्याकडे काम करायचं होतं. मी तिला दिवसातून जास्तीत जास्त वेळा कामानिमित्त बोलवीत असे . म्हणजे मला तिला पाहता येईल. असं असून्ही मी तिच्याशी मैत्री साधू शकलो नाही असं वाटतं. एक दिवस सत्येन ने पुन्हा दांडी मारली . एवढ्या कमी दिवसात सत्येंची आणि तिची मैत्री जमल्याचं तिच्याच एका मैत्रिणी कडून मला कळलं. मला केबिनमध्ये बसणं नकोसं वाटायचं. आज ती गुलाबी रंगाचा टॉप आणि जीन घालून आली होती. टॉपपण असा होता की पाहणाऱ्याची नजर अगदी गळ्यातून अलगज आत उतरावी. केस ख्रिश्चन मुलींसारखे मोकळे सोडलेले गोते. हलक्या डाळिंबी रंगाची लिपस्टिक तिने लावली होती. मंद सेंटचा वास दरवळत होता. "शी वॉज लुकिंग मार्व्हलस टुडे". पण मला तसं सांगण्याचं धैर्य झालं नाही. मी तिला कसलतरी "डीक्टेशन " देत होतो.. आणी जेवढं बघता येईल तेवढं बघत होतो.

डिक्टेशन संपलं. मी तिला विचारलं., " वासंती एक विचारू का? "

ती खडबडून जागी झाल्यासारखी वाटली. म्हणाली. " अं ? हो विचारा की. "

मी म्हंटलं. " राग नाही ना येणार ? "

ती मानेनेच नाही म्हणालि. " सत्येन च्या जवळपासच राहतेस का तू ? "

तिला हा प्रश्न अनपेक्षित होता. तिच्या चेहेऱ्यावर संमिश्र प्रतिक्रिया उमटली. आधी नापसंतीच्या आठ्या, मग आश्चर्य आणि शेवटी थोडा तिरस्कार. पण ती भावना दाबून म्हणाली, " नाही. " आणि लगेच केबिनबाहेर पडली .

मला जरा चुकचुक लागली. मी असं डायरेक्ट विचारायला नको होतं. पण लगेच वाटलं तिच्या उत्तरातून तरी सत्येन बद्दलच्या भावना कळतील. तसं काहीच झालं नाही. तिला आवडलं नसावं. आणि मी कोण तिच्या खाजगी बाबतीत नाक खूपसणारा ? असं नापसंती दर्शक उत्तर त्या "नाही" मध्ये असावं. असं मला वाटलं. गंमत म्हणजे प्रश्नही माझेच आणि उत्तरही मीच देत होतो. मी फार निराश झालो.

सत्येन हल्ली दांड्या का मारीत होता, कोण जाणे. महिना संपत आला. नितीन भाईचे बारा लाख अजून आलेले नव्हते. मी त्याला फोन करायचं ठरवलं. हा चान्स आता मला घ्यायचा होता. मग एक दिवस आय. टी. ने आम्हाला तिघांना पार्टी दिली. आम्ही चौघेही चर्चगेटला एका परमीट रूम मध्ये बसलो होतो. आम्ही ड्रिंक्स घेतोच असं समजून आय. टी. ने व्हिस्की मागवली. बरोबर खायला चिकन लॉलिपॉप होतं. पावसाळा असल्याने बरं वाटत होतं.

आम्ही ग्लास तोंडाला लावणार तोच आय. टी. म्हणाला, "धिस इज फॉर सत्येन , माय सन" आम्ही चिअर्स केले. मला सत्येनचं अजिबात कौतुक नसलं तरी इलाजही नव्हता. प्रीतम कोरा चेहरा ठेऊन पीत होता. त्याला पाहून आय. टी . म्हणाला, " अरे, कुछ तो बोलो. हम मातम मनाने आये है क्या ? " मग मीच वोलायला सुरुवात केली. सहजच टेंडर भरण्याचा विषय काढला. त्यावर आय. टी. म्हणाला की कोणाला तरी कमीशन द्यायचं आणि टेंडर मिळवायचं हे त्याला पसंत नव्हतं. मग सत्येनने सुचवलं , हा नवीन धंदा आहे आपण करून तर पाहू. त्यावर आय. टी. म्हणाला, "अब तुम लोग बोल राहा है तो भरेंगे टेंडर, बट सत्येन , यु विल बी इंचार्ज ऑफ धिस वर्क. "

मला ते आवडलं नाही. ते काम मला हवं होतं . मग तो पुढे म्हणाला, "लेकी न तुम्हारा काम विनायक सुपर्वाईज करेगा. "

सत्येनने ते मान्य केले. आठ वाजायला आले होते. आत्तापर्यंत तीन चार पेग तरी पोटात गेले होते. आय. टी. ची फालतू बडबड चालू होती . ती इथे लिहिण कठीण आहे. पण अधून मधून तो सारखा बोलायचा की सत्येन त्याचा मुलगा आहे, आणि आम्ही हसायचो. (म्हणजे मी आणि प्रीतम) मग त्याचं लक्ष समोर गेलं . तिथे त्याला नितीन भाई दिसला. त्याने त्याला बोलावलं आणि माझी ओळख करून दिली. "मीट मि. गायकवाड. ए टॅलेंटेड मॅन ऑफ द युनिव्हर्स. "

नितीन भाई पण टाईट होता . तो फक्त ओ. के. म्हणाला आणि एक्सक्यूज म्हणून पळाला. आय. टी त्याला फारसा आवडत नसावा. आमची जेवणं होईपर्यंत अकरा वाजले. आय. टी. चा ड्रायव्हर त्याला घेऊन गेला. गाडीत बसेपर्यंत त्याचं एकच चालू होतं. "सत्येन इज माय सन, बोथ ऑफ यु रिमेंबर. " मग प्रीतमनि मला व्हीटी ला सोडलं आणि तो सत्येन ला सोडून तो घरी गेला असावा.

असेच काही दिवस गेले. एक रविवार पाहून सुप्रिया म्हणाली, "इतके दिवस आपल्याला मुंबईला येऊन झाले. तुम्ही मला चौपाटीलाही घेऊन गेला नाही की मुंबईही दाखवली नाही. मग मी तिला घेऊन दुपारीच मुंबईला गेलो. तिने मनसोक्त शॉपिंग केलं आणि संधाकाळी पावसाची रिपरिप असूनही आम्ही भिजतच दादर चौपाटीला गेलो. संध्याकाळचे सात वाजत होते. पावसाळी काळोखी होती आणि अंधारही पडला होता. समुद्रावरून थंडगार वारा बेमुर्वत वाहत होता. मी तिच्यासाठी गजरा घेतला. तिच्या गळ्यात हात टाकून मी बसण्याची जागा शोधू लागलो. बरीचशी जोडपी आधी पासूनच बसलेली होति. बी. एम‌. सी. च्या मेहेरबानी मुळे अर्धे स्ट्रीट लाईट चालू होते आणि अर्धे बंद होते. जे चालू होते ते इतके मंद होते की अंधारच जास्त वाढला होता. थोडं जास्त दूर गेल्यावर आम्हाला जागा दिसली. तिथे थोडं अंतर सोडून दोन जोडपी बसली होति. त्यांचं प्रेमगुंजन चालू होतं. मी त्यांच्या जवळून जात असता दबक्या आवाजातलं बोलणं ऐकू आलं. "प्लीज नको रे आता सोड ना" त्यावर तो म्हणाला, "अगं, आत्ताच तर आलोय आपण जायची घाई कशाला ? "

पुरुषाचा आवाज ओळखीचा वाटल्याने मी जरा थांवलो. आवाज सत्येनचा असावा. मग त्याच्याबरोबर असलेली स्त्री म्हणाली , "प्लीज पुन्हा कधी तरी येऊ रे. आज नको. आज उशीर झालाय. " हा आवाज नक्कीच वासंतीचा असावा. सुप्रियाला सांगण्याची सोय नव्हती. ति मला सत्येन वरून बोलायची , " तुम्ही स्वतःचं नाव सत्येन देसाई सांगत असणार. कारण तुम्हाला जिकडे तिकडे सत्येनचाच भास होतो. " माझे कान टवकारले गेले. ते दोघेही एक्मेकांना लगटून चालू लागले. अंधारात चेहरे दिसत नव्हते तरी त्यांचं अर्धवट बोलणं ऐकू येत होतं.

सुप्रियाने माझा हात ओढला, म्हणाली, " शी, लोकांकडे काय बघताय? चला ना. " मी अनिच्छेनेच तिच्याकडे वळलो. मला उगाचच वासंती वापरीत असलेल्या सेंटचा वास आला. मी कल्पना करीत होतो की खरच वास आला कोण जाणे. माझं अर्ध लक्ष त्या दोघांकडे होतं. मी उंची वरून आणि चालीवरून ओ ळखलं की ति सत्येनच होता. एका लाईटच्या प्रकाशात वासंतीच्या चेहऱ्याची आउटलाईन दिसली. माझा इंटरेस्ट एकदम नाहीसा झाला. मी यांत्रिकपणे सुप्रियाच्या केसात गजरा माळला. ती मला बिलगली. कितीतरी वेळ ती माझ्या खांद्यावर डोकं ठेऊन होती . माझ्या मनात आलं. बेटा विनायक तुझा पत्ता कट . थंड वारा वाहत होता. वातावरण पावसामुळे मादक झालं होतं. आम्ही दोघे बराच वेळ बसलो होतो. माझ्या कोरड्या उत्तरांचा आणि प्रतिसादांचा सुप्रियाला संशय आला नाही. मग आम्ही घरी परतलो. मला त्या रात्री अर्धवट झोप लागली. मी बराच वेळ त्या दोघांचा विचार करीत राहिलो. दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेलो. सत्येनसहित सर्व स्टाफ वेळेवर हजर होता. वासंती मात्र मला दिसली नाही. मला जरा बरं वाटलं. ती उशिरा आली म्हणजे तिला झापता येईल. मी कामाला सुरुवात केलि. थोड्याच वेळात सत्येन माझया कडे दोन तीन वर्तमान पत्रे घेऊन आला. आम्ही दोघांनी काही टेंडर नोटिसावर चर्चा केली . शेवटी दिल्लीचे ट्रान्सफॉर्मर पुरवण्याचे टेंडर भरण्याचे ठरवले. सर्व कॉस्टिंग वगैरे करून पेपर्स तयार केले. दिल्लीला आमचे एरिया ऑफिसही होते. तिकडे सर्व पेपर्स टाईप वगैरे करून , आय. टी. च्या सह्या घेऊन पाठवण्याची सत्येननी जबाबदारी घेतली. मग मी आय. टी. ला फोन केला. तो म्हणाला की ती तुमची दोघांची जिम्मेदारी आहे, मला काही ही विचारू नका. सत्येन ने सर्व पेपर्स उचलले आणि तो केविनचं दार ढकलून जाऊ लागला. त्याचवेळी नेमकी वासंती आत शिरत होती. ती त्याच्याकडे पाहून गोड हासली . तोही हसत हसत बाहेर गेला. सही करण्यासाठी तिने मस्टर मागितला . केबिनचं दार लागल्यावर मी तिला तो दिला. ती सही करायला वाकली. मी तिचं निरिक्षण करीत होतो. तिनी आज सरबतीकलरचा ड्रेस घातला

होता.केसात त्याच रंगाची फुलं माळली होति. मला खरं तर राग आला होता. पण मी स्वतःवर ताबा ठेवित म्हंटलं, " अगं सव्वा अकरा वाजल्येत. " ती सही करायची थांबून म्हणाली, मला आज डॉक्टरांकडे जावं लागलं".

मी आवाजात उसनी सहानुभूती आणत म्हंटलं, " अगं तब्बेत ठिक नाही तर रजा घ्यायची. "मला तिनं लावलेल्या सेंटचा वास येत होता, मी, तो कालचाच होता की काय या विचारात असताना ती , माझ्या प्रश्नाचं उत्तर न देता केबिनबाहेर पडली देखिल.

मग, असेच काही महिने गेले. सत्येन आणि वासंती जास्तच जवळ येत चालले होते. केबीन बाहेर काय चालतं याची इथंभूत बातमी तिची मैत्रीण प्रतिभा मला देत होती. मध्यंतरीच्या काळात सत्येन आणि वासंती यांनी दोघांनी सलग तीन दिवस दांड्या मारल्या. नंतर कळलं की सत्येन ऑफिस स्टाफचं एक नाटक बसवीत होता. नाटक होतं , "नका सोडून जाऊ रंगमहाल". लेखक नवीन होता असं कळलं. आय. टी . पण त्यांना उत्तेजन देत होता. एक दिवस आय. टी. नि मला सांगितलं की नितीन भाईंना एक नवा प्रॉडक्ट लाँच करायचा आहे, त्याबद्दल मी त्यांना भेटून माहिती द्यावी. मी लगेच तयार झालो. कारण मला सत्येनने त्यांच्याकडून वसुली कशी केली , ते समजून घ्यायचं होतं. मी एका शुक्रवारी सकाळी भेटी ची वेळ ठरवली. सकाळी अकरा वाजता मी त्यांच्या वडाळ्याच्या ऑफिसमध्ये गेलो. त्यांच्या केबीन वर नॉक करून मी आत शिरलो. केबीन कसली तो एक ए. सी . मिनी हॉ लच होता. नितिनभाई स्वतः उठून माझ्या स्वागतासाठी पुढे आले. आम्ही हात मिळवला मी त्यांच्या समोरच्या खुर्चित स्थानापन्न झालो. ते साधारण पन्नास बावन वर्षाचे होते. ते टिपिकल गुजराथी किंवा जैन व्यापारी दिसतात तसेच दिसत होते. पण चेहरा आनंदी होता. उंची बेताचीच. गोरा गुबगुबीत चेहरा. केस थोडे पांढरे झालेले दिसत होते किंवा ते रंग लावीत असतील तर थोडासा रंग उडालेला होता. पांढरा खोचलेला शर्ट, ब्राउन पँट, लाल टाय. डोळे बारिक पण एक प्रकारची मिस्किल झाक असलेले. ओठ थोडे पानानी रंगलेले. एका हाताच्या बोटात हिऱ्याच्या अंगठ्या आणि एका हातात किमती घड्याळ.

आम्ही कामाला सुरुवात केली. त्यांना हवी असलेली टेक्निकल माहिती मी सांगत होतो. ते अधून मधून नोटस काढित होते. ऐकताना ते फार कमी बोलत होते. ते खूष दिसले. मी त्यांना त्या प्रॉडक्टच्या मार्केटिंगची ही माहिती दिलि. तेवढ्यात रिसेप्शनिस्टचा फोन आला की कोणी तरी भेटायला आलेलं आहे. ते म्हणाले, "टेल हिम आय ऍम इन ए मिटिंग. कमसे कम अडदो कल्लक तो लागे छे . जरा चाय नि बिस्किट भेज दो . "

मग ते गोड हासत म्हणाले, "विनायक तू दुसरा कंपनी का खोजते नाय ? तू तो बी . ई ,. मेकॅनिकल छे . "

मी सध्यातरी तसा विचार नसल्याचे सांगितले. मग मी विचारलं, " एक विचारू का ? अरे विचार नि ., परमिशन काय मांगते " तरी पण मी घाबरत विचारलं, " तुम्ही बारा लाख देणार होतात त्याचं काय झालं.? 'मला माहित आहेकी मी त्यासाठी आलो नाही. सत्येन कडे ते काम आहे. एरव्ही पण तुम्ही पंधरा लाख दिलेच असते नाही का ? राग मानू नका. "

ते थोडे गंभीर झाले. म्हणाले, " त्याचा काय आहे विनायक मी कधी बी कोणाला पण दुख देते नाय. पण हे तू ध्यानमा रख, सत्येन है ना एकदम चालू माणस छे. हे पैशासाठी काय पण करेल. तेचा मार्केटमधला रेपुटेशन जाणे छे ना ? जवा दे. पंधरा बिस लाख तो मिनी दिलाच असता. पण तू मला सांग कोणाचा जमाई जर तुझा पाव पकडेल तर तू काय करेल?. " मी नाही समजलो, " मी मध्येच म्हंटलं. त्यावर ते म्हणाले, " सत्येन आय.टी. चा जमाई हाय माह्नित हाय तुला ? और एक बार जमाई होते ना तो साला पर्मनंट जमाईच राहते. त्यानी माझ्या पाव पकडला. वो गिडगिडाया, रोया . म्हणून तर मी पैसा दिला. तुझा तो आय. टी. हाय ना एक नंबर साला कमीना आदमी हाय. " मला बाकी काही नको होतं. सत्येन आय. टी. चा जावई . ही बातमी मला नवीन होती. मला गप्प पाहून ते म्हणाले, " तुला खबर नाय ? अरे, आय. टी. ना डिक्री हती ना रिंकी , एटलो सत्येन ना बायडी हती. तेचा बी मरण जाला. एक लडका बी था. वो भी साला गुजर गया. "

मग चहा बिस्किटं आली. आम्ही ती संपवली. गप्पा मारल्या. मी त्यांना उरलेल्या बारा लाखांबद्दल विचारलं, ते एक दोम दिवसात चेक पाठवून देतो म्हणाले. . "

मी निघालो, माझ्याजवळ फार महत्त्वाची माहिती होती. म्हणजे सत्येन नि दुसरं लग्न केलं असणार, आणि या फार जुन्या गोष्टी असणार. म्हणूनच आय. टी . त्याला सारखा फेवर करतो. "एक बार जमाई पर्मनंट जमाई. " हे मला पटलं.

मी आनंदात घरी आलो. सुप्रियाला सांगण्यात अर्थ नव्हता्. ही माहिती प्री तमला कधी सांगेन असं मला झालंहोतं. दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेल्यावर टेंडर मिळाले नसल्याचे कळले. आय. टी. चा फोन आला. तो भडकून म्हणाला, "विनायक, मैने तो तुमको पहलेही बोला था टेंडर का काम मुझे पसंद नही. आज सुबे दिल्ली ऑफिसका फोन आया था. तुम लोगोने किसी पार्टकी किमत २०० के बजाय २००० लिखी है. पूरा कास्टींग बिगाड दिया तुम लोगोने. सत्येन का ठिक है, वो तो टेक्निकल आदमी नही है. लेकीन तुम्हारा क्या ? भेजनेसे पहले तुमने देखा नही ? तुम को मैने सत्येन का काम सुपरवाईज करनेको बोला था ना? ...... अब बात नही करेगा क्या ? (शेवटी तो त्याचा पर्मनंट जावई होता, माझ्या मनात आलं. )........ मी म्हणालो, " आय ऍम सॉरी . "

"ये तो तू कहेगाही. सॉरी बोल दिया, तेरा काम हो गया. आइंदा टेंडरके लफडेमे पडनेका नही, समझे ? " मी येस सर म्हणून वाद थांबवला. मला सत्येंच्या आगाऊपणाचा राग आला. मला न दाखवता पेपर्स त्याने पाठवले होते.पण मी सत्येनला काही बोललो नाही. प्रीतमला सत्येन जावई असल्याचं सांगितलं. तो त्याला माहित आहे असं म्हणाला. त्यावर त्याने मला ऍलर्ट राहायला सांगितलं. या बाबतीत त्याला आय. टी. ने बंगल्यावर बोलावून झाडला होता. हल्ली नाटकाच्या तालमी कॉंफरन्स हॉलमध्ये चालत. कधी कधी त्या तालमी आय. टी. पण पाहात बसायचा. मी सहज म्हणून एकदा डोकावलो. लव सीन चालू होता. डायरेक्शन आमच्याच स्टाफमधला पिं टो करीत होता. तुन्हाला वाटलं असेल , पिंटो आणि मराठी नाटकाचं डायरेक्शन ? पण तो मराठी ख्रिश्चन होता. तसच नाटकाच्या विषयात त्याला चांगलीच गती होती असं म्हणतात. सगळेच म्हणत म्हणून मीही म्हणतोय. लव्ह सीन मध्ये सत्येन वासंतीला मिठित घेऊन संवाद म्हणतो. संवाद संपला तरी त्याने वाजवीपेक्षा जास्त वेळ तिला धरून ठेवल्याने पिंटो चिडला म्हणाला, " अरे यार , सत्येन धिस इज ड्रामा. बिहेव लाइक ऍक्टर ऍंड नॉट लाइक ऑर्डिनरी मॅन. किती वेळ तिला धरून ठेवतोस ? " मला तो सीन सहन होईना . मी निघून गेलो. नाटकाचा प्रयोग शिवाजी मंदिरला झाला. अर्थातच रंगला. आय. टी. नि सत्येन बरोबर वासंतीचंही कौतुक केलं. त्यांना रोख पारितोषिकंही दिली. काही दिवस तरी नाटकाचा हँगओव्हर ऑफिसमध्ये राहिला.

मग अचानक नितीन भाईच्या माणसानी माझ्या कडे बारा लाखाचा चेक आणून दिला. सत्येन चकित झाला. आय. टि. ने अर्थातच मला कॉंप्लिमेंटस दिले. सत्येन ला ते फारसं आवडलं नाही. एक दिवस प्रतिभाने सांगितलं की रस्त्यावर वासंतीशी सत्येनचं भांडण झालं. वासंती बहुतेक रजेवर जाईल असं ती म्हणाली. मी मनात म्हंटलं , मी बरा तिला रजा देईन पण पुढे काही वेगळच होतं. आधी सत्येन आजारी होता म्हणून रजेवर गेला. त्याचा अर्ज आला होता. मला वाटलं, बरी सत्येन ची अडचण नाहीशी झाली. माझ्या हातात आता बरच होतं. मी वासंतीची वाट पाहात होतो. ती उशिरा आली. मी मुद्दामच काही बोललो नाही. आता सहमाही बजेटचं काम चालू झाल्याने आणि नवीन प्रोजेक्ट मुळे कोणालाही मान वर करायला वेळ नव्हता. असं असून सुद्धा वासंती उशिरा येत होती. एक दिवस ती अशीच उशिरा आली. सही करताना मी तिच्याकडे पाहात होतो. तिची चर्या मला उतरलेली दिसली . आज ती साध्या कपड्यात होती. विशेष मेक अप नव्हता. तरी ही ती मला आकर्षक वाटली . चेहऱ्यावर नेहेमीचा उत्साह नव्हता. काही प्रॉब्लेम असल्यास माणसाची मान आपोआप खाली झुकते, असं माझं निरिक्षण होतं. मी तिला एकदम विचारलं, " वासंती गेले काही दिवस तुझ्या ऑफिसला येण्याच्या वेळा तुझ्या स्व्तःच्या झालेल्या दिसतायत. काही अडचण किंवा काही कारण आहे का? तिने मानेनेच नाही म्हंटलं, म्हणून मी पुढे विचारलं, " पैशाची अडचण असेल तर ती आपण दूर करू या ना . " ती पुन्हा मानेनेच नाही म्हणाली आणि माझ्या प्रश्नाचं उत्तर नदेता ति बाहेर गेली. इच्छा असूनही मी तिच्या विरुद्ध काहीही कारवाई करीत नव्हतो. इतर कोणी असतं तर मी त्याला चांगलाच झापला असता. दिवसभर ती यांत्रिकपणे काम करीत होती. नाहीतर तिचा आणि सत्येनचा आवाज मला केबीन मध्ये ऐकू यायचा. दुपारी चार वाजेपर्यंत सगळं काही ठिक होतं. मग एकदम वासंतीला चक्कर आल्याच प्रतिभानं सांगितलं. मी बाहेर आलो. लगेच सगळ्यांनी तिला पाणी मारून शुद्धीवर आणली . तेवढयातल्या तेवढयात कोणीतरी लिंवू सरबत आणून पाजलं. मी डॉक्टरांना बोलवावं असं म्हंटलं. कंपनीचे डॉक्टर राणे खालच्याच मजल्यावर बसत . पण वासंतीने नाही म्हंटलं. त्या दिवशी संध्याकाळी मी तिला टॅक्सीने घरी सोडली. ती प्रभादेवीला एका जुनाट चाळीत राहात होती. टॅक्सी तही ती माझ्याशी काहीही बोलली नाही. कदाचित तिची तब्बेत ठीक नसावी. चाळीजवळ टॅक्सी थांबली. ती पडू नते म्हणून मी तिला हात धरून उतरवली. आणि तिला घेऊन तिच्या तिसऱ्या मजल्यावरच्या खोली जवळ पोचलो. तिचा हात गरम लागत होता. तिला ताप असावा. मी वेल वाजवली. एका म्हाताऱ्या बाईंनी दार उघडलं. दोन खोल्यांची जागा असावी. आत जुनाट लाक्डी कपाट होतं. पलंगावर पांघरूण दिसलं. आजी झोपल्या असाव्यात्‍. जागा अंधारी होती. आजी कमरेत वाकलेल्या होत्या . दातांनी तोंडाची जागा केव्हाच सोडली असावी. त्या विधवा होत्या. मी त्यांना माझी ओळख सांगितली. वासंतीला त्यांच्या ताब्यात दिली. वासंती एकही शब्द बोलली नाही, की आजीही बोलल्या नाहीत. मी आल्याचं त्यांना आवडलेलं नसाव हे स्पष्ट दिसत ह्नोतं. वासंती आत गेली . आणि दरवाजा धाडकन लावला गेला. मी काही पावलं चालत जिन्यापाशी पोचलो. मला आतुन वासंतीचा विव्हळण्याचा आवाज येत होता. आणि आजींचा तारस्वरात आवाज आला, " कार्टे काय करून आलीस. ?......... पूढे ऐकायला मी थांवलो नाही.

मी तसाच घरी गेलो. काय प्रॉब्लेम असावा ? सत्येनशी भांडण झालं कशाबद्दल? पैशा बद्दल ? की आणखी कशा बद्दल ? का सत्येन ने तिचा गैरफायदा घेतला होता? मला तरी हाच विचार पटला. कारण तो करणं सोपही होतं आणि सोइस्करही. कुठुनतरी ते दोघे गंभीर अडचणीत यावेत असं माझ्या मनात घर करून होतं. मला जरा समाधान वाटलं . इतके दिवसांची त्यांची रिलेशन शीप तुटण्याची शक्यता निर्माण झाली होती. आज मात्र मी सुप्रियाशी घरी गेल्यावर बोललो. सत्येन च नाव काढलं की ति नीट बोलत नसे. ती म्हणाली, " अहो तिला चक्कर आली ना ? मग नक्कीच तिला दिवस असणार. " मला खरतर ते शब्द आवडत होते. पण वरकरणी मी म्हणालो. " मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस . सत्येन च वय जास्त आहे आणि त्याला सून आलेली आहे. " त्यावर ती म्हणाली, " राहिलं. मला काय करायचय. ? मी आपला अंदाज सांगितला. जाऊ द्या. तुम्ही उद्या रजा घ्याल का ? मला डॉक्टर कडे जायचय. "

मी म्हणालो, " आता हे आणखीन काय आहे. तुला दिवस आहेत का ? (माझा खंवचटपणा ) " ती लाजत म्हणाली , " काहीतरीच काय? . " मी तिला आपण रविवारी जाउ असं म्हंटलं. त्यावर ती म्हणाली. " हो रविवारी कोणता दवाखाना उघडा मिळणार आहे तुम्हाला? मी आपली शेजारच्या काकूना घेऊन जाईन. " तो दिवस ती माझ्याशी फार बोलली नाही. मला तिच्यापेक्षा वासंती मध्ये इंटरेस्ट जास्त होता. दुसऱ्या दिवशी वासंती आली नाही. मला ते अपेक्षितच होतं. त्याऐवजी तिचा रजेचा अर्ज आला. तिला पंधरा दिवस रजा पाहिजे होती. आता मी काय करून घेणार होतो. सत्येन नाही वासंतीही नाही. दोघांचं नक्की काय चालू होतं. तुम्ही म्हणाल मला दुसरं काही काम नव्हतं का ? पण मी कामात चालढकल करीत नव्हतो. की माझा स्टाफही करीत नव्हता. सुप्रिया माझी "आउटलेट " होती. सगळ्या रागालोभाचा बळी ती ठरत होती. लहान सहान गोष्टींवरून आमची भांडणं होत होती. अर्थातच तिच्या समजूतदारपणा मुळे ती विकोपाला गेली नाहीत. तसा मी शीघ्रकोपी होतो.

मग काय झालं , कोण जाणे. सत्येन अचानक कामावर येऊ लागला. कामाचं लोड थोडं त्याच्याकडे सरकवलं. पण पूर्वी सारखा तो मोकळा वागत नव्हता. तो थोडा वाकल्या सारखा वाटला. एरवी असा ताठ चालायचा , की तो च जनरल मॅनेजर आहे. कामात त्याचं फारसं लक्ष नव्हतं. मी फक्त त्याचं निरिक्षण करीत होतो. मी प्रतिभाला सत्येन वर नजर ठेवायला सांगितलं. ती स्वतःचं काम सांभाळून हेही काम फार छान करीत असे. सत्येनच्या आजकाल कामात फार चुका होऊ लागल्या. मग मी त्याला एक दिवस त्याला बोलावलं. तो बसला. त्याच्या चेहऱ्यावरचा उत्साह पार मावळला होता. तो काही बोलण्याची मी वाट पाहू लागलो. पण तो काहीच बोलला नाही. मग मीच तोंड फोडलं. " सत्येन हल्ली तब्बेत ठीक नसते का? काल तू जी फाईल पाठवलीस त्यातल्या वर्किंग मध्ये एवढ्या चुका आहेत की ते सगळं मला परत करावं लागलं . कॉंपुटरचा वापर करीत नाही का तू ? " तो काहीही प्रतिक्रिया देत न्व्हता. मला खरं तर त्याला वासंती बद्दल विचारायचं होतं. पण मला धैर्य होईना. तो कसा रिऍक्ट होईल काय माहित. मग मी जरा आवाजात कडकपणा आणून म्हंटलं, ''तुझ्या सारख्या जुन्या माणसाच्या हातून चुका व्हायला नकोत. तू टेंडर मला न दाखवता तसच कसं पाठवलस ? बुशिंगची किंमत तु दोनशे ऐवजी दोन हजार लिहिलीस. त्यामुळे आपलं टेंडर गेलं. आय. टी. नि मला झापला. समजलं ? तरीही तो काहीच बोलत नव्हता. सत्येन मला तुझ्या वैयक्तिक प्रॉब्लेमशी देण घेणं नाही ( कसं नाही ? ) " एवढं झाल्यावर त्याला कंठ फुटला. " सर, गेले काही दिवस माझी मनस्थिती फार वाईट आहे. "

"हो , पण तू जवळ जवळ महिनाभर रजा घेतलीस, "मी मध्येच बोललो. त्यावर तो काही ही बोलला नाही. मग मीच पुढे म्हणालो, " मि. सत्येन आयदर यू कॉन्सेंट्रेट ऑर प्रोसिड ऑन फर्दर लीव्ह . (खरं तर मला म्हणायच होतं की ऑर यू रिझाइन. पण तो आय. टी. चा पर्मनंट जावई होता. ). " तो काहीही न बोलता आणि माझी परवानगी नघेता उठून गेला. मी सत्येन शी बोलणं सोडलं.

प्रतिभाच्या रिपोर्ट प्रमाणे सत्येन पूर्वीसारखा स्वतःहून काम करीत नाही, असं समजलं. तसच तो बऱ्याच वेळा विचारात गढून बसतो. दोन दिवसांनंतर वासंती आली. मला आश्चर्य वाटलं. मी तिला पंधरा दिवस ती येणार नसल्याचं म्हंटलं. पण ती मानेनेच नकार देत निघून गेली. मी बाकीच्या स्टाफला कामाकरिता पिळून घेत होतो. कोणीही तक्रार करीत नव्हते. दोन चार दिवस असेच गेले. सत्येन आता नियमित येत होता. मी त्याच्याकडे मुद्दामच दुर्लक्ष करीत होतो. प्रतिभा मार्फत त्याला काम देत होतो आणि तोही तिच्या मार्फत ते माझ्याकडे पाठवू लागला. मग एक दिवस तो माझ्याकडे आला , म्हणाला, " सर, ही कोका ऍंड कंपनीची कॉंफिडेन्शियल फाईल आहे. कोर्ट मॅटर आहे फाईल तुमच्या सेफमध्येच ठेवा. तारीख असली की मागून घेईन." मी जागरुक झालो.फाईल घरी नेऊन वाचण्याचं ठरवलं. पण जमत नव्हतं. ती सेफ मध्येच पडून होती. एक दिवस मी ती बाहेर काढली. वाचतांना लक्षात आलं की त्या कंपनीकडे काही लाख बाकी होते. पण तिचा मालक परगंदा झालेला होता. नुकताच त्याला पोलिसांनी पकडला होता.

आम्ही आमचे क्लेम कोर्टाकडे सादर केले होते. दर तारखेला जावं लागायचं. फाईलची पहिली दहा पंधरा पानं वाचली. मग बुकमार्क केलेली पानं वाचावीत अस्ं वाटलं. मी सुरुवात केली. एका ठिकाणच्या दोन पानांमध्ये एक कागद खुणेसाठी घडी घालून ठेवलेला आढळला. मी ती दोन्ही पानं वाचली. पण त्यात मार्क करण्यासारखं मला काही वाटलं नाही. म्हणून मी सहज कागद उघडून पाहिला. तर ती वासंतीने सत्येनला लिहिलेली चिठ्ठी निघाली. मी ती दोन तीन वेळा वाचली. त्यावर दोन दिवसापूर्वीची तारीखही होती. त्यात लिहिलं होतं, " सत्येन कधी भेटणार आहेस ? मी तुझी नेहेमीच्या जागी वाट पाहणार आहे. तू मला का टाळतोस?. लवकर भेट, लवकर भेट, लवकर भेट..... कुठे भेटशील ते कळव. आजी फार संतापलेली आहे. घरी येऊ नकोस.धिस इज अर्जंट. " यावरून दिसत होतं की ती अगदी डेस्परेट झाली होती. माझा इंटरेस्ट वाढला . खरं तर मी हा विचार केलाच नाही त्याच्या जागी मी असतो तर काय केलं असतं. मी तिचा फायदा घेतलाच असता की नाही ? जरी ती माझ्यात गुंतली असती , तरी मी पण सत्येन प्रमाणे तिच्याशी लग्न करू शकलो नसतो. सत्येनला तर मुलगा आणि सून आलेली होती आणि जावई येणार होता.

आयुष्याच्या अशा वळणावर तो या भलत्याच मोहाला बळी पडला होता. कदाचित त्यामुळेच तो डिस्टर्ब झाला होता. वासंतीचा स्वभाव नक्की काय होता याचा मलाही अंदाज येत नव्हता. असं असून ही मी तिचा विचार का करीत होतो. ? तिला आणि सत्येनला मी सोडून द्यायला हवं होतं . पण माझ्या मनाच्या कोपऱ्यात वासंती पक्की बसली होती. तिला कोण काढणार? माझी अवस्था एखाद्या शिकाऱ्या सारखी झाली होती. सावज समोर दिसत होतं. हे सगळे विचार माझ्या सैतानी मनाने लगेचच धुडकावून लावले. कारण पुढचा मनस्ताप मला भोगायचा होता.

मी या प्रकरणात एवढा वाहवत गेलो की , प्रतिभाच्या नजर ठेवण्यालाही मर्यादा होत्या हे माझ्या लक्षात आलं.ती ते दोघे ऑफिसच्या बाहेर काय करतात हे सांगू शकत नव्हती. मी एक डिटेक्टीव्ह हायर करण्याचं ठरवलं . मी वेळी च हात झटकून बाजूला व्हायला हवं होतं. पण तसं केलं नाही. मी एका डिटेक्टिव्ह कंपनी ला फोन केला. त्याच नाव "सृजनशील".

हे काय नाव ? असं विचारल्यावर तो म्हणाला , की त्याचं खरं नाव समीर रघुनाथ बिडवे. या धंद्यात खरं नाव वापरून चालत नसल्याने त्याने "सृजनशील" हे नाव घेतलं होतं.

त्याला मी घरी बसूनच सत्येन आणि वासंती बद्दल माहिती दिली. त्याचे घरचे पत्ते, आजपर्यंतची त्यांची वागणूक , आणि मला अपेक्षित असलेली माहिती. तो मला दर दिवसा आड फोन वरून पूर्ण माहिती देणार होता. तसेच त्याचे आठवड्याचे रिपोर्ट ही तो लेखी पाठवणार होता. मला जरा बरं वाटलं. ती तारीख होती , २७ जुन. तुम्ही म्हणाल आत्तापर्यंत कोणत्याच प्रसंगाला मी तारखेचं महत्त्व ठेवलं नाही. आता आम्हाला कशाला तारखा सांगता ? पण पुढे असं काही घडलं की मला तारखा लक्षात ठेवाव्या लागल्या. काळ जोपर्यंत आपल्या बाजूने असतो तोपर्यंत त्याचं महत्त्व वाटत नाही. एकदा का तो फिरला की आपल्याला तो जाणवू लागतो. मग काही वेळेला सेकंद आणि मिनिटं पण जाणवतात. असो. सृजनशील ला मी दोन हजार रुपये आगाऊ दिले. सगळं काही डिटेक्टिव्ह कादंबरी सारखं घडू लागलं.

२७ जूनचा रविवार मी थंडपणाने घालवला. २८ म्हणजे , सोमवारी मी ऑफिसला गेलो. वासंती आली तरी ती बेताचं काम करायची आणि निघून जायची. दोन दिवस असेच गेले. मी सृजनशीलला दिलेल्या दोन हजार रुपयांना मुळं फुटू लागली. आय. टी. प्रीतम आणि मी ३० जूनला एका मीटिंग मध्ये होतो. एक दोन डायरेक्टर्स ही होते. अचानक चर्चेत माझ्या मोबाईल मुळे व्यत्यय आला. आय. टी. ला ते आवडलं नाही. त्याने प्रश्नार्थक मुद्रेने पाहिलं. तो फोन सृजनशीलचा होता. मी एक्सक्यूज म्हणून , माझ्या केबीन मध्ये आलो. तो बोलत होता. "बिनायक सर, मी त्याला मध्येच तोडत म्हंटलं, " फोन वर माझं नाव घ्यायचं नाही. " तो म्हणाला, " सॉरी सर, पण ते दोघे काल संध्याकाळी ७.१५ ला चौपाटीवर बसले होते. माझा माणूस म्हणाला वासंती वाईल्ड झाली होती. तुम्हाला त्यांचे डायलॉग सांगतो.

ती म्हणाली, " हलकटा , फसवलस मला तू. दिवस गेले आणि आता ऍबॉर्ट करायला सांगतोस ? मजा करताना नाही विचार केलास , आपल्याला जावई येणार आहे, घरात सून आहे. मग ती रडत म्हणाली, " सत्येन अरे माझ्या आयुष्यातला तू पहिला पुरुष आहेस रे. मी तुला सर्वस्व दिलं. आणि तुला त्याची किंमत नाही ? तो दबक्या आवाजात म्हणाला, " वासंती , अगं , अजूनही मी प्रेम करतो तुझ्यावर. पण आजुबाजूची परिस्थिती लक्षात घे. मूल आपल्याला परवडेल का ? तुझी आजी काय म्हणेल ? मैत्रिणी काय म्हणतील ? "

मग ती त्वेषाने म्हणाली, " प्रेम करतोस ना माझ्यावर, मग समाजाला का घाबरतोस ? तुला काय वाटलं रे ? तु मजा करशील आणि मी तुला असाच सोडीन ? " तरीही तो म्हणाला, " लग्न तर करू शकत नाही ना ? तुला सगळं माहित असून ही तू फसलीस. आंधळी झाली होतिस तू. मी तुला फसवलं नाही. ". त्यावर ती म्हणाली, " नसेल. पण छातीठोकपणाने म्हण की हे मूल माझं आहे आणि वाढव की त्याला. डरपोक कुठला. काही नाही रे, तुम्ही विवाहित पुरुष असेच असता. तुम्हाला फक्त एक रिलॅक्सेशन पाहिजे असतं. आणि म्हणून तुम्ही बायकांचा वापर करता. तुमची सगळी वफादारी लग्नाच्या बायको बरोबर असते. तिला विटलेल्या तुम्हाला एकदम तिच्या प्रेमाचा पुळका येतो काय? मीच मूर्ख , म्हणून तुझ्या वर भाळले. " असं म्हंटल्यावर सत्येनने तिला एक कानफटात मारली आणि म्हणाला, " परिस्थितिचं गांभिर्य लक्षात घे वासंती. भानावर ये. " ......ती तरातरा निघाली आणि टॅक्सी पकडून घरी गेली सर. सत्येन तिला हाका मारित होता. मग घरी गेला.

"

माझा माणूस त्यांच्या घरावर लक्ष ठेवून आहे. , हाऊ डू यू लाइक इट सर ? " मी मध्येच म्हणालो, "लाइक इट म्हणायला तो काय पदार्थ आहे ? " तो म्हणाला,"तसं नाही सर, पण माझं काम कसं वाटलं तुम्हाला ? " मी काम ठिक आहे म्हणालो. मग त्याला दुपारी एक ते दोन च्या दरम्यान किंवा रात्री आठ नंतर फोन करायला सांगितलं. मी मिटिंग सोडून आल्याचं सांगितल्यावर तो सॉरी म्हणाला. मग मी पुन्हा कॉंफरन्स हॉलमध्ये गेलो. आय. टि. थोडा नाराज झाला. पण मी त्याला मिसेसचा फोन असल्याचं सांगितलं.

सत्येन आणि वासंती दोघेही ऑफिसमध्ये येत होते. आजकाल वासंती मौन पाळीत होती , असं मला प्रतिभाकडून कळलं. असेच दोन दिवस गेले. ऑफिसमध्ये काही ही घडत नव्हतं. २ जुलैला शुक्रवार होता. एक प्रकारचे कुंद वातावरण होते. धड नवीन काही करावसं वाटत नव्हतं, धड आहे ते काम पूर्ण करावसं वाटत नव्हतं. तरी ही कामं वेळेवर होत होती. याचाच अर्थ माझी मनस्थिती चांगली नव्हती. घरातही यांत्रिकपणे वागणं चालू होतं. सुप्रिया पण शांत होती . मला सस्पेंडेड वाटत होतं. उत्साह नाही आळसही नाही. शुक्रवारी रात्री डिटे. सृजनशीलचा फोन आला. मी जेवत होतो . सुप्रियाने तो घेतला. तिला स्क्रीनवरचं नाव विचित्र वाटलं असणार, म्हणून माझ्याकडे देत ती म्हणाली, "आत्ताच आलात , पण जेऊनही देत नाहीत. " माझा आवाज ऐकून सृजनशील म्हणाला "सर, एक भयंकर बातमी आहे. वासंतीला कसलातरी झटका आलाय. आणि तिला डॉक्टर कर्वेंच्या हॉस्पीटल मध्ये दाखल केलेले आहे. माझ्या माणसाने वॉर्डबॉय कडून माहिती काढली आहे. वासंतीला मेंदुचा काहीतरी त्रास असल्याने लवकरात लवकर ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला आहे. तिला सध्या दोन दोन प्रतिमा दिसतात. पुढचा फोन लवकरच करीन. "

घास माझ्या तोंडात फिरायला लागला. सुप्रियाचं माझ्याकडे लक्ष असावं. ती वैतागून म्हणाली, " काय माणसं आहेत, जेऊन सुद्धा देत नाहीत. सकाळपासून बारा तास काम करूनही कंपनीचं समाधान होत नाही का? ती खीर तरी संपवा. " म्हणजे सुप्रियाला कोण बोलतय हे कळलं नव्हतं. मी कसतरी जेवण संपवून , साधे कपडे घालून बाहेर पडलो. तिला माहित होतं की मी सिगारेट ओढायला चाललोय. हा माझा रोजचा शिरस्ता होता. आणि आजतर मला विचार करणं भाग होतं. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. सिगारेटचे दोन दम मारून मला जरा बरं वाटलं. हॉस्पिटलचं नाव माहित असूनही मी वासंतीला भेटू शकत नव्हतो. मला हे कसं कळलं , असं तिला वाटलं असत. आणि आजींचीही मला भीती होतीच. वासंतीच्या डोक्यावर परिणाम झाला की काय ? प्रेग्नंट असताना इतकं गंभीर ऑपरेशन कस काय करणार . मी सृजनशीलला फोन लावला. तो उत्साहाने म्हणाला, " बोला सर, माझा माणूस आज हॉस्पिटलवर नजर ठेवून राहणार आहे. आपल्याला उद्या रिपोर्ट करतो सर. " मी म्हंटलं, " सकाळी लवकर फोन केलात तरी चालेल. ऑपरेशन असलं तरी तिच्या प्रेग्नन्सीचं काय याची माहिती काढा. " " यस सर,नक्कीच सर. " फोन बंद झाला. मी घरी गेलो. तीन जुलै , शनिवार होता. मी साडेआठलाच ऑफिसला गेलो.मला लवकर आलेला पाहून वॉचमनही जरा बावचळला. माझ्या अपेक्षेप्रमाणे नऊ वाजताच सृजनशीलचा फोन आला. तो म्हणाला, " सर आपल्या म्हणण्याप्रमाणे चौकशी केली. सर, आधी तिचं ऍबॉर्शन करणार आहेत , मग ऑपरेशन होईल.बहुतेक तीस जुलैला. " मी म्हंटलं, "सत्येन ची खबर काढा. " त्याने फोन ठेवला. मी विचार केला , ऍबॉर्शन झालं तर सत्येन यातून सुटेल. पण सत्येन सुटू नये अशी माझी मनोमन इच्छा होती. चार पाच वाजेपर्यंत तरी सृजनशीलचा ( फार जड नाव आहे.) फोन आला नाही.अपेक्षेप्रमाणे आज वासंती आलीच नाही तिचा मेडिकल सर्टिफिकेट जोडलेला अर्ज मात्र कोणी तरी प्रतिभा जवळ आणून दिला. पण तो थांबलाच नाही. त्यामुळे जास्त काही माहिती मिळाली नाही. आज सत्येनही नव्हता. तो नक्कीच हॉस्पिटलमध्ये गेला असणार. मला पुन्हा पुन्हा तिच्या आजीला जाऊन भेटावसं वाटत होतं. यावर मी सुप्रियाचा सल्ला घेण्याचं ठरवलं. संध्याकाळी सात वाजता सृजनशीलचा फोन आला. बराचसा स्टाफ गेल्याने मी मोकळेपणाने बोलू शकलो. तो म्हणाला, " सर, सत्येन साहेब वासंतीच्या घरी गेले होते. पण दाराला कुलुप असल्याने , शेजारी चौकशी करून ते हॉस्पिटलमध्ये गेले. तिथे त्यांना आजींनी वासंतीला भेटू दिलं नाही , सर. ते वासंतील भेटू शकले नाहीत हे नक्की . माझा माणूस त्यांच्या घरावर नजर ठेऊन आहे. " मग मी थोडा विचार करून म्हंटलं, " सृजनशील , तुमची सर्व्हिस आजपासून बंद करा. " तो म्हणाला, " काय झालं सर ? माझं काम पसंत आलं नाही का ? " मी म्हंटलं, " नाही तसं नाही. पण मला सध्या तरी आवश्यकता नाही. लागेल तेव्हा सांगीन. तुमचा रिपोर्ट मात्र उद्या पाठवा आणि बाकी पैसे घेऊन जा. "

मग तो म्हणाला, " सर हि केस चांगलीच इंटरेस्टिंग आहे. आपण पुढची माहिती काढावी असं मला वाटतं. " मी जरा वैतागून च म्हंटलं. " मी सागितलं ना तुम्हाला, उद्यापासून तुमची सर्व्हिस मला नको आहे. "

" ओ. के सर, काही लागलं तर लगेच कळवा सर. मी आपल्या सेवेला हजर आहे. " तो अजिजीने म्हणाला. ती तारीख होती ५ जुलै.

दुसऱ्या दिवशी त्याचा माणूस आला त्याने रिपोर्टस दिले. मी त्याला आणखी पाचशे रुपये दिले. मग मी विचार केला की प्रतिभालाच वासंतीच्या घरी पाठवू. तेवढ्यात आय. टी. चा फोन आला. तो म्हणाला, " अरे विनायक, सत्येन बोल राहा था की वासंती का ऑपरेशन होनेवाला है. तु जरा जा के देख, या तो किसी को भेज पैसे की जरुरत है कया. तेरा काम तो ठीक चल राहा है, लेकीन रिलेशन नाम की भी कोई चीज होती है. दो तीन दिनमे मुझे रिपोर्ट कर. ". मला हे सगळं माहित होतं पण तसं कसं म्हणणार ?. असो मी प्रतिभाला जायला सांगितलं आणि घर आतून नीट बघून येण्यासही, म्हणजे मला तिच्या आर्थिक परिस्थितीची कल्पना आली असती. मंगळवारी मी अधीरपणे प्रतिभाची वाट बघत होतो. ती आली आणि वासंतीच्या घरी पैशाची चणचण असल्याचे म्हणाली. वासंतीने बोरिवलीत एक फ्लॅटही घेतलाय. आणि त्याचे हप्तेही येत्या महिन्यापासून चालू होणार आहेत. तिला एक भाऊ आहे तो शाळेत जातो. बहुतेक नववी दहावीत असावा. तो तर सत्येन च्या नावाने शिव्या देत असतो. ऑपरेशनला दोन लाख तरी खर्च येईल. असं दिसतय. मी डॉक्टरांनाही भेटले. डॉ. च्या मते तिला या सगळ्या टेन्शन मुळे त्रास झाला असावा. तसच सत्येन कडून तिला आधाराची अपेक्षा होती. पण सत्येन अगदीच विचित्र वागला. आय. टी. च्या कानावर हे घातल्या वर तो ऑपरेशनच खर्च आपण देऊ असं म्हणाला. मला कळत नव्हतं सत्येन अशी बघ्याची भूमिका का घेत होता. तो ऑफिसला यायचा , पण बोलायचा नाही. मूड असला तर ठीक काम करायचा. त्याला नोकरी जाण्याची भीती नव्हती. शेवटी तो" पर्मनंट जमाई" होता.

असेच सात आठ दिवस गेले. सृजनशीलला काढल्या पासून मला सत्येनची किंवा वासंतीची बातमी लागेना. मध्ये एकदा प्रतिभा जाऊन आल्यामुळे कळलं की ऍबोर्शन झालेलं आहे आणि ऑपरेशन ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात करणार आहेत. मला आता बघायचं होतं की सत्येन केव्हा दांडी मारतो. थोड्याच दिवसात आय. टी. कडून दोन लाखाचा चेक आला. तो घेऊन मी प्रतिभाला पाठवलं. मी गेलो आणि आजींना नाही आवडलं, तर उगाच एकांगी वाद तरी कशाला , कारण मी बोलणारच नव्हतो. प्रतिभाकडून कळलं की सत्येन आजींच्या गैरहजेरीत वासंतीला भेटून गेला. पण काय बोलणं झालं काही कळलं नाही. आजी फार काळजीत असाव्यात. पण चेक दिल्यामुळे त्यांना जरा बरं वाटलं. त्यामुळे प्रतिभाचा पुन्हा पुन्हा जाण्याचा मार्ग सुकर झाला. वासंतीची तब्बेत आता सुधारत होती. सत्येन अजूनही दगडासारखा बसायचा. काम सांगितल्याशिवाय करित नसे. तेही मूड असेल तर. कधी कधी तो रात्री दहा वाजेपर्यंत बसायचा . मग मी त्याला जायला सांगायचो. पण माझ्याकडे लक्ष न देता तो घरी जायचा. कदाचित माझ्या ऍपॉइंटमेंट मुळे त्याच्या मक्तेदारीत भागिदारी निर्माण झाली असावी आणि माझी त्याला दिली जाणारी कोरडी वागणूक जबाबदार असावी, असं मला आता वाटतं. त्याच्याही डोक्यावर परिणाम झाला असावा. मी हळूहळू सृजनशील त्याचे रिपोर्टस , फोन वगैरे सगळं विसरू लागलो. आता नक्की होतं की वासंती माझ्याकडे येणार नव्हती तशी ती सत्येन कडेही जाणार नव्हती . यथावकाश ऑगस्टच्या पाच तारखेला वासंतीचं ऑपरेशन झालं. ते यशस्वी झालं. सगळ्या खबरा प्रतिभाकडून येत होत्या.

मी हे सगळं विसरायच ठरवलं. गणपती होऊन गेले. मी सोलापूरला जाणार होतो. पण जमलं नाही् . हळूहळू दसरा आला . बोनस डिक्लेअर झाला. स्टाफ आणि अर्थातच मी पण आनंदात होतो. सत्येन परत नॉर्मल झाला. फक्त वासंतीची गैरहजेरी जाणवत होती . पाठीत वाकलेला सत्येन परत ताठ चालू लागला. पण त्यात पूर्वीचा ताठा नव्हता. वासंतीला होणाऱ्या मुलाचं ओझं त्याच्या डोक्यावरून उतरलं होतं. ऑफिस व्यवस्थित चालू होतं. मी सृजनशीलचे सगळे रिपोर्ट घरी नेले. इथे ते कोणालाही सापडायला नकोत. म्हणजे सापडण्यासाठी प्रयत्न होणार हे माझ्या लक्षात आलं नाही. म्हणजे कोणितरी माझा खण तपासणार असेल. माणूस जेव्हा भविष्यकाळाच्या तरतुदी करतो तेव्हा त्याने जरा विचारच करावा. पुढील घटनांच्या संदर्भांची मनाला कल्पना असावी. म्हणूनच नकळत असल्या गोष्टी माणूस करत असावा. असो. केवळ एक काळजी घेणं , म्हणून मी हे केलं असं तव्हा तरी डोक्यात होतं. मध्येच एकदा सुप्रियाचा फोन आला . ती मला लगेच घरी यायला सांगत होती. तिला माहित होतं. की मला कामावरून घरी बोलावलेलं आवडत नाही. तिने काय ते फोन वर सांगण्यास नकार दिला. म्हणून मी साडेपाच वाजताच घरी गेलो. (नाही तर नऊ वाजेपर्यंत मी बसत असे. ) मी घरी गेलो आणि बॅग ठेवण्याच्या आतच ती गळ्यात पडली. म्हणाली, "ओळखा पाहू. मी का बोलावलं असेल ? " मला फारसं आवडलं नाही. मी फक्त खांदे उडवले. मला कोडी घातलेली आवडत नसत. तिने आज विशेष मेक अप केला होता. ती म्हणाली, " आज आपण बाहेत जेवायला जाऊ. " मी चिडून म्हंटलं. "हे सांगण्यासाठी मला लवकर बोलावलस ? " .... ती म्हणाली, " अहो गुड न्यूज आहे. " मी म्हंटलं , कसली ? " ति म्हणाली, " अहो तुम्ही बाबा होणार आहात ". मी मग विचार केला, " बाबा ? " तिची अपेक्षा , मी तिच्याइतकाच उत्तेजित होईन. मग ति चिडून म्हणाली, " चला तुम्हाला कशाचचं नाविन् नाही. " माझ्या आवाजात उत्साह आणित म्हंटलं, " काहीतरिच काय? सुप्रिया , धिस इज रियली ए गुड न्यूज. लेट अस सेलिब्रेट. खरच जाऊ आपण जेवायला बाहेर. तिचं समाधान झालं. आम्ही रात्री एका मोठ्या हॉटेल मध्ये जेवायला गेलो. रात्र फारच छान गेली . बाप होण्याचं फिलींग एवढं आनंददायी असेल याची मला कल्पना नव्हती. असणारच कशी ? लग्नानंतरच या गोष्टी अनुभवण्याची पद्धत आहे, त्यापूर्वी हे सुख कसं लाभणार ?

असो ऑक्टोबरच्या वीस तारखेला वासंती कामावर रुजू झाली. मी तिला माझ्या समोर बसवली आणि म्हंटलं. " वासंती तब्बेतीची काळजी घे. फार ताण घेऊन काहीही करू नकोस. आवश्यक असेल तर रजा वाढव . " मला जरा कीव आली. नाही म्हंटलं तरी माझ्या सदिच्छांचं (? ) फळ तिला अप्रत्यक्षपणे मिळालं होतं. ती थोडावेळ बसली . म्नला वाटतं तिला काहीतरी बोलायच असावं. पण ती म्हणाली, " मी फार आभारी आहे. (अगदीच फॉर्मल) कंपनीने पैशाची मदत केली . म्हणून हे शक्य झालं. खरच फार बरं वाटलं. " आणि ती उठली. मला कसतरीच वाटलं. मी काही पैसे दिलेले नव्हते. आणि तिच्या बद्दलच्या माझ्या भावनाही फार पवित्र होत्या अस नाही. तिने मला कधीच प्रतिसाद दिला नाही. हे माझ्या मनात पक्क बसलं होतं. ऑफिस मध्ये सत्येनची बडबड चालू झाली. पण वासंतीचा आवाज बंद होता. मला का वाटलं कोण जाणे, पण अजूनतरी हे प्रकरण संपलं नसावं, किंबहुना ते संपू नये अशी माझी इच्छा होती. मी , नंतर सृजनशीलला फोन केला , " मला तुमची सर्व्हिस पाहिजे. " तो तयारच होता. त्याच्याकडेही नवीन केस नसावी. मग मी त्याला सत्येन आणि वासंती यांच्यावर नजर ठेवायला सांगितलं. फक्त मला लेखी रिपोर्ट नको होते. त्याचा माणुस दुपारी चारच्या सुमारास आला आणि पैसे घेऊन गेला..

सृजनशील कडून तशी मला काही खास माहिती मिळत नव्हती. जवळ जवळ एक आठवडा झाला. मला त्याला आता ठेवण्याची घाई केल्या सारखं वाटू लागलं. त्याच्याकडून सध्या एवढच कळलं होतं की सत्येन जरी बाहेर वासंतीशी बोलण्याचा प्रयत्न करीत होता तरी ती मात्र त्याच्याशी वोलत नव्हती. तिच्या मनात नक्की काय होतं ते कळत नव्हतं. सृजनशीलने मात्र सत्येन ची न सांगताच घरची सर्व माहिती काढली होती. त्याच्या घरी दिवसा त्याची फक्त बायको असते. त्याचा मुलगा आणि सून दोघेही एकाच मल्टिनॅशनल कंपनीत कामाला होते. दोघांचं लव्ह मॅरेज होतं. मुली चं लग्न एका चार्टर्ड अकौंटंटशी ठरलं होतं. लग्न केव्हातरी फेब्रुवारी महिन्यात होईल. सध्या मात्र त्यांच्या घरात अधून मधून सत्येन आणि त्याची बायको यांच्यत भांडणं होतात. कारण कळू शकलं नाही. दिवस असेच मंद चालले होते. तसं वातावरण बरं होतं. सुप्रिया खूष होती. आमच्या पण डॉक्टरांकडे नियमित फेऱ्या होऊ लागल्या. मला वाटलं ही कथा इथेच थांबते की काय? पण सत्येन ला केलेल्या कर्माची किंमत द्यायलाच हवी. निदान माझी तरी तशी इच्छा होती.

आणि एका रात्री अकरा वाजता मला सृजनशीलचा फोन आला. सुप्रिया नुकतीच झोपली होती. मी बाल्कनीत जाऊन बोलू लागलो. "सर एक महत्त्वाची बातमी आहे. आजींनी पुष्कळ समजाऊन सांगितलं तरिही वासंती दोन मोठ्या बॅगा भरून रात्रीच सत्येनच्या घरी राहायला गेली. सर मी आता दोन माणसं कामाला लावलेली आहेत. एक वासंतीच्या घरावर आणि दुसरा सत्येनच्या घरावर नजर ठेऊन आहे. सत्येनच्या घरावरचा माणूस म्हणाला, की सत्येनने वासंतीला धक्का बुक्की करून घालवण्याचा प्रयत्न केला. सर त्यांचं काय बोलणं झालं ते सांगू का ? तुम्हाला बोअर तर होत नाही ना? " मी म्हंटलं. " नाही नाही, इट इज इंपॉर्टंट. " " सर, वासंती सत्येनच्या घरी राहणार आहे म्हंटल्यावर , सत्येन आणि त्याच्या बायको मध्ये भांडण चालू झालं. सत्येन म्हणाला , अगं वासंती वेडीबिडी झालिस का काय? इथे राहणं कसं शक्य आहे. ? . व्हॉट नॉनसेन्स ?. वासंती म्हणाली, ते मला काही माहित नाही. हा विचार तू पुर्वी करायचा होतास. तू , पोलिसांना बोलावलस तर त्यांना तुला सगळं सांगावं लागेल. त्यावर सत्येनची बायको म्हणाली,तुम्हाला काही लाज लज्जा वगैरे नाही का ? तुमच्या या अशा वागण्या मुळे सुषमाचं (त्याच्या मुलीचं नाव) लग्न मोडलं नाही म्हणजे मिळवलं. इतके दिवस आम्ही हे सगळं ऐकून होतो. पण या थराला गोष्टी जातील असं वाटलं नाही. आणि काय ग भवाने तू इथे कशी राहणार ? . वासंती म्हणाली, तो तुमचा प्रश्न आहे. माझ्या दृष्टीने हेच सोल्यूशन आहे. सत्येननी मला सांभाळायलाच हवं. तुमच्या नवऱ्या मुळे माझ्या डोक्यावर परिणाम झाला. यांनी माझ्या मुलचा जीव घेतलाय. त्यावर बायको म्हणाली, अगं निर्लज्ज मुली तुला काही शरम वगैरे वाटत नाही का ? . मग वासंती त्वेषाने म्हणाली, तुमच्या नवऱ्याने कोणती शरम बाळगली ,? हे सर्व करताना . ती सत्येनच्या बायकोला धक्का मारून आत शिरली सर. घरात सत्येनचा मुलगा आणि सूनही उभे होते. नंतर दरवाजा लागला सर.

दुसऱ्या दिवशी वासंती ऑफिसला आली. ती थोडी रिलॅक्स वाटली. तात्पुरता का होईना तिचा विजय झालाहोता. सत्येन मात्र दोन तीन दिवस कामावर आला नाही. मला वासंतीचं कौतुक वाटलं. धडा शिकवण्याचा हा मार्ग नवीन होता पण एकदम बरोबर . बरं झालं आपण या भानगडीत अडकलो नाही . माझे विचार एकदम साधारण पातळी वर आले. सुप्रियावर भलताच परिणाम झाला असता. आता कसं दूर राहून सत्येनची तडफड बघता येत होती. काठाजवळ पोहोणं सोपं होतं. सत्येन मध्ये पोहोत होता. सत्येनच्या घरात रोज भांडणं होत होती असं कळलं. दिवाळी पण झाली. बोनस मिळाला. असेच एक दीड महिना गेला. डिसेंबरची थंडी चालू झाली. मुंबईत कसली आली थंडी ? असो. सृजनशील अधून मधून फोन वरून रिपोर्ट देत होता. तसं उत्साह वर्धक काहीही नव्हतं. त्याचाही इंटरेस्ट गेला होता. मी त्याला डिसकंटिन्यू करण्याचं ठरवल् . मला आता वासंतीचं काय चालू आहे किंवा सत्येन काय करतोय याची खबर नको होती. माझ्या दृष्टीने कथा संपली होती. सत्येनची तब्बेत मात्र चांगलीच हडकली होती. तो बारीक झाला होता.

तो सोळा डिसेंबरचा रविवार होता. मी आरामात झोपून उठलो. हातात चहाचा कप घेऊन सुप्रियाशी मी गप्पा मारी त होतो. पेपर येऊन पडला होता. मी अंघोळीला जाण्यासाठी बाथरुम मध्ये शिरलो. तेवढ्यात सुपियाने मला मोठ्याने हाक मारली. म्हणालि, " अहो, हे बघा काय. " मी वळलो. विचारलं , " काय आहे ? " मला जरा भीती वाटली. तिला तीन महिने झाले होते. हिला काही झालं की काय ? माझ्या समोर पेपर धरीत ति म्हणाली , " तुमचा तो सत्येन, त्याला पोलिसांनी अटक केली आहे. , घ्या . वाचा. " मी पेपरावरून नजर फिरवली. पहिल्याच पानावर बातमी होती . ........ "प्रेयसीचा खून करणारा , विवाहित प्रियकर अटकेत." पोलिस तपास चालू आहे. माहिती अगदी तपशीलवार दिली होती. त्यात म्हंटलं होतं. ... ‌सत्येन देसाई यांच्याकडे जबरदस्तीने राहायला आलेल्या त्यांच्या प्रेयसीचा , वासंती देवरुखकरचा , त्यांनी गळा दाबून खून केला आहे. वासंतीला त्यांच्या पासून दिवस गेले होते व त्तिचे ऑपरेशनही झाल्याचे म्हंटले होते. डॉक्टर कर्व्यांचाही त्यात उल्लेख होता. आमच्या कंपनीचाही त्यात उल्लेख होता. सृजनशीलचा फोन आला नाही. तो हुषार होता. आता तो माझ्याशी संबंध ठेवणार नाही. मग लक्षात आलं की बरं झालं की त्याचे रिपोर्ट मी घरी आणले ते. पण वासंतीने सत्येनला लिहिलेली चिठ्ठी मात्र माझ्या टेबलाच्या खणात होती. ती मी नष्ट केली नव्हती किंवा घरीही आणली नव्हती. उद्या जर पोलिस कंपनीत चौकशी साठी आले आणि माझ्या खणात त्यांना ति चिठ्ठी सापडली तर ते मला या प्रकरणात गोवू शकतील. माझ्याजवळ ती चिठ्ठी कशी आली याच्ं स्पष्टिकरण नव्हतं असं नाही. पण ते पटायला हवं . मी ती चिठ्ठी लगेच ऑफिसमधून आणण्याचं ठरवलं. मी कशी बशी अंघोळ उरकली. सुप्रियाने मला जाताना मला विचारलं , पण मी तिला काहिबाही सांगून वेळ मारून नेली.

मी घाईगर्दीने ऑफिसच्या गेटजवळ आलो. खालीच सिक्युरिटी वाला भैया मला पाहून म्हणाला " अरे साव , आप भी ? " माझ्या मनात आलं , म्हणजे दुसरंकोणी आलं होतं की काय ? तोच पुढे म्हणाला, " आधा घंटा पहले ही प्रीतम साब, बडा साब (म्हणजे आय. टी. ) और पुलीस ऊपर गयी है. " माझी पंचाईत झाली. गेलो तर पोलिस भेटणार, नाही गेलो तर वॉचमन मी येऊन गेल्याचं सांगणार. मी तसाच पुढे निघालो. वॉचमन म्हणाला , "साब , सिर्फ कोनेका लिफ्ट चालू है बाई सब बंद रखा है. तळ मजल्यावर सगळीकडे अंधार होता. मी लिफ्ट जवळ जाऊन बटन दाबलं. ती खाली यायला लागली. आतून पोलीस , प्रीतम आणि आय. टी . भेटला तर ? मला या विचाराने किंचितसा घाम येऊ लागला. मी पटकन जिथे अंधार होता तिथे जाऊन उभा राहिलो. लिफ्ट खाली येऊन थांवली. माझा अंदाज खरा ठरला. माझी छाती धडधडत होती. सत्येन सुद्धा एवढा घाबरला नसावा. हा विचार काहीतरीच होता. लिफ्टमधून ते तिघेही खरच बाहेर पडले. आय. टी. चा आवाज येत होता. " अरे जयराज साब मैने आपको कहा ना हमारे ऑफिस स्टाफका इस मॅटरसे कोई संबंध नही है. ...... " त्याच्यावर तो जयराज का कोण होता तो काही वोलत होता ..... पण ते ऐकायला मी थांवलो नाही. पटकन लिफ्ट मध्ये शिरलो. आणि पाचव्या मजल्यावरच्या माझ्या ऑफिसमध्ये शिरलो. माझ्या केबीन मधल्या टेबलाच्या खणातले कागद वर खाली करून पाहिले. पण चिठ्ठी काही मिळाली नाही. ती नक्कीच त्यांना मिळाली असली पाहिजे. माझ्या छातीत परत धडधडू लागलं. मी पटकन ऑफिसमधून लिफ्टने खाली आलो. वॉचमन म्हणाला, " साब उन्होने आपके बारेमे मेरेको पूछ नही , इसलिये मैने बताया नही. आपका काम हो गया क्या ? " मी हो म्हंटले. " मेरा मोबाईल भूल से रह गया था , वो लेने के लिये मैआया था. " त्यावर तो म्हणाला, " अरे आप एक फोन कर देते तो हम लेके कल आपको दे देते. इसके वास्ते आप इतने दुरसे आये. " मग तो ऑफिस बंद करण्यास निघून गेला.

दुसऱ्या दिवशी मी ऑफिसमध्ये गेलो. पोलिसांच्या बाबतीत माझा अंदाज चुकला होता. मला वाटलं नाही की पोलीस माझ्या आधीच ऑफिसमध्ये सर्च घ्यायला अले असतील. तसच आत्ताही झालं. मी इकडची तिकडची कामं पाहतोय न पाहतोय तोच माझ्या केबीन वर थाप पडली. मी शक्यतोवर आवाजत मार्दव आणून म्हंटले, " येस, प्ली ज कम इन. " अस्ं म्हंटल्यावर एक मध्यम वयाचे , पन्नाशीला आलेले , पोलिसी बांध्याचे गृहस्थ आत शिरले. त्यांना मी वसायची खूण केली. बरोबर एक हवालदारही होता. त्याला त्यांनी बाहेर थांबण्याची खूण केली . मला जरा भीती वाटली. तो गेल्यावर ते म्हणाले, " तुम्ही मि. गायकवाड , नाही का ? ,(मी हो म्हंटले) मी इन्स्पे. जयराज. "तुम्ही पेपर वाचलाच असेल. मला जरा वासंती आणि सत्येन यांचे संबंध कसे होते आणि त्यांची तुम्हाला असलेली माहिती , सांगाल तर बरं होईल. तशी सत्येननं कबुली दिलेली आहेच. पण काय आहे की लूज एंड नीट गुंफावे लागतातच नाही का ? " मग मी त्यांना मला सोईची असलेली सर्व माहिती दिली. त्यावर ते म्हणाले, " मि. गायकवाड, ते सगळं ठीक आहे. पण तुमचा जर काही संबंध नाही तर तुमच्या खणात ही वासंतीनं सत्येनला लिहिलेली चिठ्ठी काय करीत होती ? कालच आम्ही ती तुमच्या खणातून ताब्यात घेतली आहे. पंचनामा पाहायचाय ? " मी मानेनेच नाही म्हंटलं. मग ते म्हणाले," मि. गायकवाड , हे नक्की काय आहे ? तुमच्या मार्फ़त वासंती सत्येनला चिठ्ठ्या पाठवीत होती असं दिसतय. " ते माझ्या चेहऱ्याचं निरिक्षण करीत होते. माझा श्वास थांबला. छाती धडधडू लागली. मी श्वासावर कंट्रोल आणित म्हंटलं. "ही चिठ्ठी मला कोका आणि कं. च्या फाईल मध्ये बुकमार्क म्हणून सापडली. ती फाईल मला सत्येनने आणून दिली . माझा याच्याशी काहीही संबंध नाही. तो एक केवळ योगायोग होता. तुम्हाला पाहिजे असेल तर फाईल दाखवतो. " ..... त्यावर ते म्हणाले "नको कालच आम्ही ती पाहिली आहे. मि. गायकवाड , अप्रत्यक्षपणे का होईना तुम्हीसत्येनला मदत करीत होतात, असं मी का म्हणू नये ? " मला हा प्रश्न अनपेक्षित होता. मी म्हंटलं , " पण माझ्या खणात अशा अनेक चिठ्ठ्या सापडायला हव्यात., नाही का ? " ते म्हणाले, " हे माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही. मी तुम्हाला प्रकरणात लिंक करू शकतो. आणि हो अशा अनेक चिठ्ठ्या तुम्ही आधीच नष्ट केल्या असतीलही , नाही का ? " आता आश्चर्य चकित होण्याची माझी पाळी होती. मी काही बोलणार तेवढ्यात , माझी केवीन उघडून आय. टी. आत आला.

खुर्ची वर बसत तो म्हणाला, " अरे जयराज साब , आपको मैने बोला ना हमारे स्टाफ का इसमे कोई संबंध नही है. इनके खिलाफ और कोई एविडन्स मिला ? मेरा मतलब है कोई ठोस सबूत ? " ते म्हणाले, " मैने आपको एक पॉसिबिलिटी का सुझाव दिया. , मग माझ्या कडे वळून म्हणाले, " मि. गायकवाड , तुमचा याच्याशी संबंध नसेलही. पण शक्यतेच काय ? " मग आय. टी. थोडा भडकून म्हणाला, " अरे क्या बात करताहै जयराज साब ? हम लोगोने तो वासंतीको पैसा देकर मदद ही की है. " मी पण मग म्हणालो, " तेच तर. ". मग ते ठिक आहे म्हणाले पण मी साक्षिदार म्हणून या केसमध्ये लागेन , तेव्हा मी विचारल्या शिवाय सध्या तरी कुठे जाउ नये..

पुढे रितसर केस चालली. मला इन्स्पे. जयराजनि कधीही बोलावलं नाही. एकदा मात्र ते मध्ये आले आणि माझं स्टेटमेंट घेऊन गेले. असच वर्ष गेलं. सुप्रियाला मुलगा झाला. ती माहेरी होती. म्हणजे सोलापूरला. माझ्या मागे तिने दुसरी नोकरी शोधण्याचा लकडा लावला होता. पण आता ही नोकरी सोडायची म्हणजे निष्कारण संशयाला खत पाणी घातल्यासारखं झाअलं असतं. मी प्रयत्नात होतोच. मला चार पाच वेळा तरी कोर्टात जावं लागलं. सत्येन ला तारखेला आणित असत. तो आता पुरता वाकला होता. त्याचे डोळे अगदी खोल गेलेले होते. पोलिसांनी आपला खाक्या दाखवला होता असं त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होतं. पण मला वासंतीच्या खुनच्या रात्री नक्की काय झालं होतं ते कळलं नाही. मग यथावकाश माझी साक्ष झाली. सत्येनच्या जबानी वरून कळलं(जी पोलिसांच्या फाईल मध्ये होती )की ज्या रात्री खून झाला त्या रात्री वासंतीचं आणि सत्येन च झोपण्यावरून भांडण झालं. तिची इच्छा होती की त्याने स्वतंत्र खोलीत त्यांचा संसार मांडावा. सत्येन ला ते सहन झालं नाही आणि त्याने तिचा गळा दाबला. सत्येन च्या सुटकेसाठी आय. टी. धडपडत होता. त्याने वासंतीने त्याला मारायला उत्तेजित केलं असं सिद्ध करून दाखवलं.ते कोर्टालाही पटलं असावं. आय. टी. च्या धडपडी मुळे सत्येनला जन्म ठेप झाली. मला दुसती नोकरीही मिळाली. तिही सोलापुरला. माझे आणि सुप्रियाचे आई वडीलही तिथेच होते. मी नवीन ठिकाणी जाण्या आधी आय. टी. ला भेटलो. पण त्याला मी सोडणार हे पटेचना. तो म्हणाला, " यार विनायक , तुम छोडना चाहते हो ? उधर प्रितम भी ऐसा ही कुछ सोच राहा है. " मी प्रीतमला मुद्दामच भेटलो नाही. आय. टी. ने मला जास्त पगार शिवाय जनरल मॅनेजरचं पद देण्याच आश्वासन दिलं. पण माझा आता इंटरेस्ट संपला होता. तरीही मी सहा महिने काढले. आय. टी. च्या धडपडी मुळे केसचा निकाल लवकर लागला. जावयाने भलतेच रंग उधळले, पण सासऱ्याने मात्र त्याला वाचवण्यात जरादेखील कसूर केली नाही.

मी सोलापूरला निघून गेलो. आता मात्र वासंती आणि सत्येन यांना मी माझ्या मनातून कायमचे हद्द पार केले. गेलं वर्ष दीड वर्षाचं टेन्शन नाहिसं झालं. मला हळू हळू हलकं वाटू लागलं. स्वच्छ ऊन पडलं होतं. मी गाडी सुटल्यावर मुंबई नामक महानगरीला कायमचा " टाटा " केला. (सं पू र्ण )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

प्रभुदेसाई साहेब,
आपलं म्हणणं बरोबर आहे. एकदा वाटलं होतं दोन भागात टाकावी. पण नंतर विचार केला एकाच भागात टाकली तर वाचण्यात सातत्य राहील. असो. प्रतिसादाबद्दल आभार.

कथा आवडली. एकाच दमात वाचून काढली.

जरा शेवट नॉर्मलच झालाय. वाटलं होते की डीटेक्टीव्ह मुळे विनायक पण गोत्यात येईल की काय.

प्रभुदेसाई साहेब >>>>
साला मैं तो साहब बन गया जैसा गोरा कोई लनढन का, हा!
प्रभुदेसाई
एवढे पुरेसे आहे.

मलादेखील आवडली कथा... एकदम रियलिस्टिक वाटली... आणि एकत्र संपूर्ण टाकली ते छान केलेत, भाग टाकले की कॉन्टिनुत्ती राहत नाही...

च्रप्स
मी सुध्दा ही कथा एका दमात वाचली.( मध्ये एकदा विश्रांति घेऊन) कथा आहेच तशी. भाग भागवल्याकथा मी पण वाचत नाही. म्हणजे शक्यतो टाळतो. मला इतकेच म्हणायचे आहे की एकाच वेळी दोन भाग टाकले असतेतर?
असे पहा नाटकात किंवा पिक्चर मध्ये इंटरवल असतात की नाही. त्याप्रमाणे.
पुनश्च एकवार कथा अप्रतिम लिहिली आहे.