त्या शॉर्टकटने जायचं नाही कधी..

Submitted by रानभुली on 15 May, 2021 - 20:00

" बाई कसलं भयानक आहे ना हे सगळं "
' हो ना, अगं तू कुठे वाचतेस असलं ?"
' मी तर अजिबात सुद्धा हात लावत नाही "
" अगं , आमच्या यांना फार घाणेरडी सवय आहे असल्या भूताखेताच्या सिरीयल्स बघायची. स्वतः बघतात आणि मुलालाही बसवतात. ते पण बघत बसतं "
" हो ना, आमच्या कडे पण सेमच, आणि माझ्या सिरीयल्सचा काय राग येतो कुणास ठाऊक ? त्यात हे असलं काही नसतं "
" पण हिने सांगितलं नाही, ही कशी काय वाचायला लागली हे सगळं ?"
"ही माझी नाही. बहुतेक सानपांची कथा आहे"
" कोण ते रामानंद सानप ? मला तर त्यांचं नाव वाचून सुद्धा भीती वाटते. पण बहुतेक का म्हणालीस ?"
" अगं. या खूप जुन्या कथा आहेत. माझ्या जन्माच्या किती तरी आधीच्या. माझ्या काकाला आवड आहे अजूनही. तो आम्हाला लहानपणी सांगायचा त्यातलं थोडं थोडं "
" आणि तुम्ही ऐकायचा ?"
" अगं आमचं जुनं घर मोठं आहे खूप. आणि खूप मोठा गोतावळा आहे. गच्चीवर सगळे एकत्र झोपायचो. मग काका भीतीदायक काय काय किस्से सांगायचा. त्या वेळी घाबरून एकमेकांना मिठ्या मारून झोपायला मजा वाटायची "
" आणि सानपांची नसेल तर ?"
" मग प्रभूदेसाईंची असेल. ते पण चमत्कृतीपूर्ण कथा लिहीतात "
" ते विज्ञान कथा लिहीतात ना ? "
" असं काही नाही. चमत्कृतीपूर्ण काल्पनिका. आणि सानपांच्या कथा काय वेगळ्या असतात ?"
" पण त्यांची पण नसेल कथा तर ?"
" त्यातली कल्पना महत्वाची आहे ना ? कि लेखक ? काकाने तेव्हढाच किस्सा सांगितला म्हणून मी तुम्हाला सांगू शकले "
" चला, गप्पा गोड. कामं खोळंबलीत "
" बरं. आमच्याकडेही आता भाजी निवडण्यापासून सगळं राहीलंय "
" येते गं राजश्री ! भयानक होती पण चमत्कारीक सुद्धा "

गप्पाष्टकं संपवून बायका आपापल्या घरट्यात परातल्या. ती एकटी झाली.
अशा तुकड्या तुकड्यातल्या कित्येक कथा तिच्याकडे होत्या. पण त्या कथांचे पालक तिला नक्की माहीत नव्हते. काही कल्पना मात्र मेंदूत कोरल्या गेल्या होत्या. त्या झिरपत झिरपत जरी आल्या असल्या तरी आता कथांचा जो अंश शिल्लक होता तो ही मेंदूचा ताबा घेण्यासारखाच होता. काकाला विचारावं तर आता कुठे आठवतं गं म्हणून हात झटकणार.

कि यानेच आपल्या मनाचं तर नाही ना सांगितलेलं ?
असंच असेल. मोठ्या लेखकांची नावे घेऊन याने बरंच काही खपवलं असणार. नाही तरी गोष्टीवेल्हाळ आहे काका. डोकंही सुपीक चालतं त्याचं.
गावाकडचे ऐकीव किस्से पण स्वतःची भर घालून सांगायचा. लेखकच व्हायचा.
काही असो.
ती कल्पना मात्र तिच्या मेंदूत कायमची वास्तव्याला आली होती.

रात्री ती ओरडत उठली तेव्हां तिच्या पतीने तिला थोपटलं.
मुलंही दचकून जागी झाली. ती घामाने थबथबलेली होती. मुलं आधी घाबरली.
मग तिने स्वप्न पडलं सांगितल्यावर दोन्ही मुलं हसायला लागली.
" कुठलं स्वप्न पडलं होतं ?"
" तेच ते"
" मी काय म्हणतो. यावेळी हट्ट नकोस करू. एकदा जाऊन येऊयात ना डॉक्टरांकडे "
" अरे पण "
" हो मला पूर्ण कल्पना आहे तुला काहीही झालं नाहीये. आपण फक्त स्वप्नाचा इलाज करतोय, कारण जाणून घेतोय "
" कारण पण माहीत आहे ना ? ती कथा काकाकडून ऐकलेली "
" तेच डॉक्टरांना सांगायचंय आपल्याला. जर त्यांनी औषधं दिली आणि ते स्वप्नं पडायचं बंद झालं तर ? नकोय का ?"
ती काहीच बोलली नाही. पण तिला पुढे बोलताही आलं नाही.
मानसोपचार तज्ञाकडे जाण्यासारखं आपल्याला काहीही झालेलं नाही असं तिला वाटत होतं. जर हे सोसायटीत माहिती झालं तर बायका पाठीमागे नाही नाही ते बोलतील. नव-यांना या गोष्टी अजिबात कळत नाहीत.
पण असा विचार करून काहीही फायदा नव्हता. त्याची काळजी पण कळत होती.
शेवटी ही ट्रीटमेंट गुप्त ठेवण्यावर तडजोड झाली.

" तरी मी तुला म्हणत होते , मला काहीही झालेलं नाही "
" अगं हो, डॉक्टरांनी सांगितल्याने आता आपला जीव भांड्यात पडला कि नाही ?"
" माझा नाही तुझा. मला तर ती औषधं घेण्याचीही गरज वाटत नाही."
" अगं असं नको करूस. त्याचे साईड इफेक्ट्स नाहीत म्हणाले ना ते ? माझ्यासाठी घे प्लीज "
" तुझ्यासाठीच आले होते डॉक्टरांकडे. तुझ्यासाठी म्हणून काहीही करत असते."
" बरं मग हे अजून एकच "
तिने थोडंसं चिडूनच त्याच्याकडे पाहीलं. पण त्याच्या चेह-यावरची काळजी पाहून राग कुठल्या कुठे पळून गेला.

डॉक्टर अतुल पाटील शेखरला सांगत होते ते शेखरने लक्ष देऊन ऐकलं.
"माझ्या आयुष्यातली चमत्कारीक केस आहे"
" पण स्वप्नं पडणे तर नॉर्मल नाही का डॉक्टर ?"
" हो. तिने स्वप्न सांगितलं. मला ते एकाच वेळी रोचकही वाटलं आणि चमत्कारीक सुद्धा. प्रभूदेसाईंच्या कथांसारखं "
" त्यांचा किंवा सानपांचा प्रभाव असेल ना डॉक्टर ?"
" असूही शकेल. पण राजश्रीला योगनिद्रेत नेलं तेव्हां तिने स्वतःचं नाव तिने एकवीस वेळा वेगवेगळं सांगितलं. मी लिहून ठेवलंय. म्हणूनच तुला थांबवलं. मला सांग या महिला तिच्या किंवा तुझ्या कुणी आहेत का ?"

शेखर ती यादी वाचून बुचकळ्यात पडला. शेवटी एक तिची पणजी आहे हे त्याला आठवलं.
" अरे वा ! बायकोच्या पणजीचं नाव पण लक्षात आहे. लकी आहे राजश्री. असा नवरा मिळाला ते "
" तसं नाही हो. ती पणजी तीन वर्षांपूर्वी वारली तेव्हां आम्ही गेलो होतो तिच्या आजोळी. मीच ते निरोप पाठवले होते फोनवरून. म्हणून लक्षात राहीलं.

डॉक्टर हसले. "बाकीच्या नावांचा पण छडा लावा. पण तिला न सांगता. काय ?"
" काय होईल तिला सांगितलं तर ?"
" तिला काहीच झालेलं नाही. पण एकंदरीतच तिच्या बोलण्यावरून तिला हे सांगितलं तर आपण आजारी आहोत असे तिला वाटू लागेल. ती माझ्याकडे यायला याच असुरक्षिततेच्या भावनेतून नको म्हणत होती. अज्ञानात सुख असतं असं ब-याच महिलांना वाटतं. उगीच डॉक्टरांकडे जाऊन कशाला पाचरीवर पाय मारायचा असं त्यांना वाटतं. त्यामुळे हुषारीने विचारा. "

त्या २१ जणींची नावं ठराविक अंतराने विचारली आणि त्यातल्या कुणीच किंवा एखादी जरी ओळखीची निघाली नाही तर हे प्रकरण आपल्यावर शेकेल याची शेखरला भीती होती. ही सगळी नावं तिला ताबडतोब पाठ होतील आणि मग कुठल्याही क्षणी अमकी तमकी बद्दल का विचारलं होतं, हे नाव कुठून आलं अशी उलटतपासणी होईल हे त्याला आधीच दिसू लागलं.
त्या पेक्षा राजश्रीच्या मोठ्या बहीणींना विश्वासात घ्यावं असं शेखरने ठरवलं. आणि त्याने मृणाली व अस्मिताचे नंबर डायल केले.

राजश्री त्या तीन रस्त्याला आली होती.
पहिला रस्ता सेटकडून येत होता. समोर घरी जात होता. आणि एक रस्ता फ्लायओव्हरच्या खालून येऊन या रस्त्याला मिळत होता. टू व्हीलर जरी असती तरी ती फ्लायओव्हर वरुनच गेली असती. पण आता चालत या वेळी चढण कशी चढणार ?
खालचा रस्ता धरला तर लवकर पोहोचू. त्याला गल्ल्या पण आहेत. शॉर्टकट आहे.
दोन क्षण ती विचारात पडली. पण शेवटी जवळच्या रस्त्याचा मोह झाला आणि ती खालच्या रस्त्याला लागली.
खाली उतरल्यावर थंड वारं लागलं. नदी वाहत होती जवळून. त्यावरच तर फ्लायओव्हर होता हा.
झपझप पावलं टाकत ती डाव्याकडच्या गल्लीजवळ आली.

आणि तिला आठवलं. रात्री अपरात्री या गल्लीतून जायचं नाही.
हे कसं शक्य आहे ?
ही तर सानपांची कि प्रभूदेसाईंची कथा ना ?
कि स्वप्नं होतं आपलं.
मग आत्ता आपल्याला कुणी सांगितलं या गल्लीतून जायचं नाही म्हणून ?
दिवे अधून मधून संपावर गेले होते. गल्लीतले दिवे चालू होते. पण तिथे विचित्र नारंगी, लाल प्रकाश पसरला होता. धुकं होतं.
असं कसं ? आपल्याला भास होतात. या गल्लीतच धुकं कसं काय ?
बाकी सर्व गल्ल्या आजू बाजूच्या घरांनी तयार झाल्या होत्या. हीच एक गल्ली अशी होती जी बंद दुकानांनी तयार झालेली होती.
मागे फिरूयात का ?
पण आता पुन्हा एव्हढं चालून जायचं. मग फ्लायओव्हर.

तिने मनाचा हिय्या केला.
तिने त्या गल्लीत पाऊल टाकलं आणि तिला विचित्र जाणवू लागलं.
तिथे तीन रस्ते एकत्र येत होते. इथे अजून काहीतरी. काय ?

तिने दुसरे पाऊल पुढे टाकले. आता पावले जवळ जवळ पडत होती. अंतर कापायला कष्ट पडत होते. कितीही झपाझप चाललं तरी अंतर वाढत होतं. कदाचित संपणारच नव्हतं ते,
काळोखाच्या आणि प्रकाशाच्या कल्पनाच इथे परक्या होत होत्या. सगळीकडून मिती आक्रसल्या गेल्या होत्या.
नाही नाही. हे काय भलतंच ?
ही प्रभूदेसाईंची कथा आहे ना ?
पण त्यांना माहीत नाही अशा कित्येक गोष्टी इथे कशा ? आणि ही इथे कशी ?
भीतीचा अंमल तिच्या मनावर दाटत गेला आणि ती किंकाळी फोडत बेशुद्ध झाली.

तेव्हांच शेखर जागा झाला. तिला हलवत होता.
"काय झाले ?"
" स्वप्न पडलं" मुलं हसू लागली.
"औषध नाहीस ना घेतलंस ?"
"मला काही ही झालेलं नाही "
"बरं ठीक. काही दिवस आराम कर "
" नाही मला शूटींग बुडवायचं नाही. "
" अगं पण सगळेच नवीन आहात तुम्ही. कुणाचं काय नुकसान होणार आहे ? मी फोन करतो सर्वांना. तू आराम कर. नंबर दे फक्त "
" शेखर, मला माझा पहिला प्रोजेक्ट पूर्ण करायचाय. तुझ्या काळजीत एक आज्ञा असते. आजवर काळजी करतोस म्हणून केलं नाही काही. पण आता सुरू केलंय तर सोडायचं नाही "
" अगं पण ?"
" मी तुला असं करते का रे ? तू आजारी असताना माझं न ऐकता जातोच कि नाहीस ?"
" अगं पण आपलं घर त्यावर अवलंबून आहे"
" पण मला तू हवा आहेस. या ओझ्याने तुला काही ......... ! विचार सुद्धा करवत नाही. पण तू कधी फिकीर करतोस ? मला मात्र लगेच ऐकावं लागतं तुझं "

शेखर काही बोलला नाही.
त्याने डॉक्टरांना सरळच विचारलं होतं, "राजश्रीला भयकथा आवडतात हे नॉर्मल आहे का ?"
डॉक्टर म्हणाले "यात अ‍ॅबनॉर्मल काय आहे ? जसे मुलांमधे निरनिराळे स्वभाव असतात तसेच मुलींच्या बाबतीत असते. फक्त त्यांना निरनिराळ्या शक्यता एक्सप्लोअर करून बघता येत नाहीत. साहस करू दिली जात नाही. त्यामागे आपल्या टिपीकल धारणा असतात. कित्येक मुलींना माऊंटेनिअरींगची आवड असते. म्हणजे त्या अ‍ॅबनॉर्मल असतात काय ? काहींना घोडेस्वारीची आवड असते. काहींना अजून काही. पण मुलीच्या जातीला काय करायचं असा विचार सगळेच करतात "

राजश्रीला घोडेस्वारीची आवड होती. शेखरला ठाऊक होतं.
पण लग्नानंतर तिने कधीच आग्रह धरला नाही. त्यानेही कधी विषय काढला नाही. पण तिच्या आईने तिला शपथ घातली होती हे त्याला मागाहून कळलं.

डॉक्टर म्हणाले होते, "ही जी साहसाची एनर्जी असते ती मग अशा माध्यमातून निघते. भय हे साहसच नाही का ? "

राजश्रीच्या पणजीच्या मयतीला दोघे गेले होते तेव्हांचे राजश्रीचे शब्द शेखरला आजीच्या मयतीच्या वेळी आठवत होते. त्याची आजीही खूप प्रेमळ होती. पंचक्रोशीत ती प्रसिद्ध होती. तालुक्याच्या गावी आजोबा रहायला आले असल्याने गावाकडचे, सगे सोयरे सगळे त्यांच्याकडे उतरत. पण आजी कितीही माणसं येऊदेत. जेवण बनवायची. तशी तिची प्रसिद्धी होती.

लोक तिला वैनी म्हणत. आशिर्वाद घेत.
पण जेव्हां ती गेली तेव्हां तिच्या अस्तित्वाचा पुरावाही राहिला नाही. नाव सुद्धा कुठे नाही. ना दाराच्या पाटीवर, ना कुणाच्या नावामागे. सगळी तर पुरूषांचीच नावं.
राजश्री किती अचूक बोलली होती !

ती शूटींग वरून येत होती.
गाडी पंक्चर झाल्याने पायीच निघाली होती. शेखरला किती तरी वेळा मोबाईल वर फोन केले. पण स्विच ऑफ येत होते.
तीन रस्त्यापर्यंत ती आली.
खाली उतरायला लागली तेव्हां तिच्या लक्षात आलं. कट्ट्यावर तीन धटींगण बसले होते. दोन मुलं होऊन सुद्धा ती अजूनही सुंदर दिसत होती. यांची नियत फिरली तर ?
तिला भीती वाटू लागली. ती झपाझप चालू लागली. पाठीमागे पावलांचा आवाज येऊ लागला,
हे स्वप्न आहे का ? कि कथा ?
सानपांची कथा असती तर ते दबा धरून बसलेलं काही तरी समोर आलं असतं. आणि प्रभूदेसाईंच्या कथेत परग्रहावरचा प्राणी असता.

इथे माणसंच होती. पण एकटी बाई आणि पुरूष हा मोठा फरक होता.
एखाद्या सुंदर हरिणीवर झडप घालणा-या वाघाचं चित्रं एका जाहीरातीच्या फलकावर होतं.
ती पळतच निघाली. पाठीमागेही पावलं पळाल्याचा आवाज येत होता.

दिवे अधून मधून संपावर गेले होते.
गल्लीत नारिंगी लाल गुलाबी उजेड पसरला होता. धुके दाटले होते.
मागून पावलाचा आवाज येत होता.

सानप आणि देसाईंच्या कथेत हे नव्हतं. त्या कथाकल्पना होत्या. इथे मिती आक्रसत होती.
पण फक्त स्त्री साठी. ते मागून येणारे पुरूष थेटच येणार आहेत. तिला कल्पना येऊन चुकली होती.

सगळं जग आवळत, आक्रसत इथे एका गल्लीत सामावलं होतं. त्याचबरोबर लांबच्या वस्तू जवल आल्या होत्या. पावलं छोटी पडू लागली. तिचा आकार छोटा झाला. अंतरं सापेक्ष झाली. तिच्या नेहमीच्या उंचीला जे अंतर काही ढांगात कापता येत होतं ते इथे युगायुगांचं वाटत होतं.
कारण नेहमीच्या गल्लीच्या लांबीत संपूर्ण जगाची लांबी सामावली होती. त्या प्रमाणात ती सूक्ष्म होत चालली होती. जस जसं पुढे जावं तस तसं ते आक्रसत होतं.
कदाचित एका बिंदूत सगळं सामावलं जाईल. तिथे अस्तित्व गोठून जाईल.
जगाला कधीच माझे पुरावे मिळणार नाहीत. पणजी गेली तसे.
तिने आजूबाजूला पाहीलं. अनेक मित्यांच्या भिंती होत्या. त्या भिंतींवर अनेक जणी होत्या.
तिची पणजी होती. ती तर मरण पावलीय ना ?

पण खूप जणी होत्या. ज्या जिवंत होत्या. ती सुद्धा होती एका भिंतीवर. एका घोड्यावर होती ती.
वर्षा स्कीईंग करत होती. शयाना बाईक स्टंट्स करत होती. आहना फॅशन मॉडेल झाली होती. ती ओळखूच आली नाही. काकूबाईचा अवतार गेला कुठे तिचा ?
यातलं कोण दु:खी होतं? वर वर तर सगळ्या संसारात सुखीच होत्या की. दिसत तरी होत्या.
पण त्यांच्या आकांक्षांना वेसण घातली गेली होती का ? पंख छाटले गेले होते का ?
पावलं आता अजून पुढे जाऊ शकत नव्हती. आता ती भ्रामक चित्रं जाऊन त्या सगळ्या आ़क्रोश करत होत्या. आकांक्षा, अपेक्षांची मिती आक्रसत चालली होती.
अनोळखी स्रिया देखील फेर धरून नाचू लागल्या. काही तिला पाहून हसत होत्या. तिच्या मूर्खपणाला हसत होत्या.
तिने मागे फिरायचा प्रयत्न केला. पण ते विनासायास मागे येत होते.

त्यांना काहीही झाले नव्हते. त्यांचा अवकाश खुला आणि विस्तीर्ण होता.
मितीत आक्रसलेलं असहाय्य सावज त्यांच्या पुढ्यात होतं. अप्राप्य अशी सुंदर स्त्री ध्यानी मनी नसताना मिळाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावर दिसत होता.
त्यांचं जनावरात रूपांतर होताना तिने पाहीलं आणि तिने किंकाळी फोडली.

तेव्हा आई हलवून तिला जागी करत होती.
" वंदना ऊठ ! संपलं ते सगळं. पोलिसांनी पकडून नेलंय त्यांना तेव्हांच. आता किती दिवस ते स्वप्न बाळगायचं. विसर ते सर्व. बघायला येणार आहेत ना आज तुला. सगळं नीट होईल बघ "
तिने पुन्हा एकदा बघायला येणा-यांना सगळं सांगायचा निश्चय केला. आणि पुन्हा एकदा तिला शपथा घालून गप्प केलं गेलं.
कारण ती आता या जगाच्या दृष्टीने नासली होती. शील हरवल्याने अस्तित्वहीन झाली होती. तिच्या जगण्याला अर्थ उरला नव्हता.
सगळे रस्ते विरून गेले होते.

तिच्या सर्व मिती आक्रसून गेल्या होत्या !

( समाप्त )

( शेवटी नाव चुकलेलं नाही ) Happy

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

खूप छान..
सर्व घटनांची अतिशय छान गुंफण.
पूर्वी सगळ्या शाळांमधे हुशार मुलांची एक 'अ' तुकडी असायची.
उद्देश हा असायचा की त्या तुकडीतल्या गुणी मुलांनी एकमेकांच्या सान्निध्यात इतरांचे वेगळे गुण आणि/अथवा विशेष गुण आत्मसात करुन स्वतःचा अधिक विकास/प्रगती करावी.
ही कथा याचंच एक खूप छान उदाहरण मानता येईल.
Keep it Up.

ओ हो!
शेवट जबरदस्त केलात.
प्रभुदेसाई यांची कथा चमत्कृतीपूर्ण असते, हे मात्र खरे.
काही वाक्यरचना खूप भारी केल्यात.
दिवे संपावर जात होते,मिती आक्रस्त होत्या.
अशा वाक्यामुळे कथा प्रभावी झाली आहे.

छान , शेवट अनपेक्षित. शीर्षकाचा सम्बन्ध शेवटी लागला.
काही वाक्यरचना खूप भारी केल्यात.
दिवे संपावर जात होते >> +1

निरु, वैभव देशमुख, मृणाली, वर्णिता आणि प्रभूदेसाई आपले धन्यवाद सर्वांचे.
निरु - __/\__ मी कधीच हुषार नव्हते शाळेत पण Proud
प्रभूदेसाई - कथेत एक प्रथितयश लेखकाचे पात्र म्हणून तुम्ही नाराज होणार नाही या विश्वासातून तुमचे नाव घातले आहे. माझा विश्वास खरा ठरला याबद्दल धन्यवाद.
प्रतिसादातली शेवटची ओळ समजली नाही. लिखाणाला उद्देशून आहे कि अजून वेगळं काही ?

छान

खूप आवडली.
सानपांच्या जवळपास जाणारं काही वाचायला मजा आली. . तुझ्या काळजीत एक आज्ञा असते. >>हे तर उपयुक्त वाक्य ठरणारे माझ्यासाठी Wink Wink Wink

भारी लिहिली आहेस कथा..!!
तुझ्या नेहमीच्या लेखनशैलीत उत्तम खुलवली आहेस....

सॉलीड कथा आहे
मी आधी घाईत वाचली, मला कळली नाही.
म्हणून आज परत वाचली.
इतक्या संकल्पना, सिम्बॉलीझम एका कथेत लीलया गुंतवायला कौशल्य लागतं.
अशीच लिहीत राहा.

ज्यांना समजली त्यांनी explain करा Lol
मा बु दो असेल
पण मला verification साठी explanation हवंय Happy
मी anu, online असाल आणि वेळ असेल तर तुम्ही हे पुण्यकर्म करावं अशी विनंती Proud

प्रभुदेसाईंच्या स्वप्नातील स्वप्न आणि पुन्हा त्यात स्वप्न..... त्याच धर्तीवर भीती मधील भीती मध्ये पुन्हा एक भीती.... मजा येते अश्या कथा वाचताना..... लिखाणाचे सातत्य टिकवणे छान जमतंय प्रभुदेसाई आणि तुम्हाला....

हॉरर कथांची आवड असलेली, त्या जगात रमणारी एक मुलगी.
आणि एका क्षणी खऱ्या आयुष्यात घडलेल्या गॅंगरेप च्या घटनेने तिचं आयुष्य, भावविश्व उध्वस्त झालं.आता कल्पनेतल्या जगात तिचा नवरा, मुलं सगळं आहे.ती यशस्वी अभिनेती आहे.(ही बहुधा गॅंग रेप घटनेआधीची तिची महत्वकांक्षा) या काल्पनिक जगातही पीटीएसडी(ptsd) तिला स्वप्नांच्या रूपाने झपाटून आहे.ती घटना दाबली जाऊन वेगळीच भयकारी स्वप्नं पडतायत.
याच स्वप्नात 'बाई, बाहेरचं जग, जपून राहायला हवं' वगैरे मध्ये आपल्या अतिशय सुंदर रायडिंग, मॉडेलिंग, शिक्षणाच्या इच्छा प्रत्यक्ष आयुष्यात मारलेल्या,चार भिंतीआड कोंडलेल्या सगळ्या बायका काल्पनिक विश्वात या इच्छा यशस्वीपणे पूर्ण करत आहेत.
काल्पनिक विश्वात स्वप्नातून जाग आल्यावर तिच्याकडे चांगलं करियर,प्रेमळ मुलं, प्रेमळ नवरा आहेत.
आणि या सगळ्याआड एक खरं आयुष्य.ज्यात त्या घडलेल्या घटनेचं ओझं बाळगत, स्वतःचा दोष असल्या प्रमाणे लपवत नव्या स्थळाला सामोरं जायचं आहे.

(एक समांतर सिम्बॉलिझम संकेतस्थळ लेखनाचाही आहे.बाहेरच्या जगातल्या घडामोडी, आयुष्य सोडून जग एक कुंपणात, एका संकेतस्थळाच्या वाचकवर्गात कोंडलं गेलंय.हा अर्थ बहुतेक फक्त मला वाटला असावा.)

यातला कोणताच अर्थ बरोबर नसेल तर मला एक वाईट स्वप्न समजून विसरून जा Happy

हॅट्स ऑफ अनु,
लेखक किंवा लेखिकेच्या मनात काय आहे या पेक्षा आपल्याला काय वाटतं हेच महत्वाचं असतं. लेखकाने दडवलेल्या गोष्टी प्रतिमांमधून मांडलेल्या असतात. प्रत्येक जण कथा-कविता वाचताना आपली सृष्टी उभी करत असतो. ती आपल्या अनुभूतीतून निर्माण होते. मला दोन्हीही अर्थ खूप आवडले. दुसरा अनपेक्षितपणे नवं डायमेन्शन देणारा अर्थ आहे. हा कंगोरा किती सशक्त आहे हे लक्षात आलं. यावर पण सक्षम लेखक कथा लिहू शकतो. खरेच अभिनंदन मनापासून.

mi_anu
सहृदय रसग्रहण. जितकी गोष्ट आवडली तितकीच आपली पोस्ट.
पण त्या क्रिकेट कोमेंटेटर सारखे नको व्हायला.
"रोहितला आधी लॉंग लेगला बॉल तटवायचा होंता. पण त्यांने हलाकेच थर्ड मनला काढला."
मला एवढेच म्हणायाचे आहे कि जर लेखक एका क्लिकच्या अंतरावर आहे तर त्यालाच आपण रिक़्वेस्ट करुया.
बर्याच वेळा टीकाकार सुद्धा कथेला/कवितेला वेगळ्याच पातळीवर घेऊन जातात्त. तशीच हि आपली पोस्ट आहे.

ओह
व्हेरी सॉरी.
यापुढे लेखकाच्या परवानगी शिवाय असं काही लिहिणार नाही.
रानभूली, sorry, did not mean to steal your thunder.

Sorry कशासाठी? छान वाटले. प्रत्येकाला ही कथा त्यांच्या नजरेतून कशी दिसली हे जाणून घ्यायची उत्सुकता आहे. Happy

mi_anu
तुम्ही ओफेंड झालेले दिसता आहात. लेखकाच्या परवानगीची कधीच गरज नसते.
<<<<लेखक किंवा लेखिकेच्या मनात काय आहे या पेक्षा आपल्याला काय वाटतं हेच महत्वाचं असतं>>>>>>
जगातल्या अजरामर कवितांचे, कथांचे , पेंटीन्ग्स अनेकांनी रसग्रहण केलेले आहे. ती मी पुन्हा पुन्हा वाचतो.
असे काही असेल तर आपला पास

शेवटी एकदा
"The Road Not Taken" is a narrative poem by Robert Frost,
According to Lawrance Thompson, Frost's biographer, as Frost was once about to read the poem, he commented to his audience, "You have to be careful of that one; it's a tricky poem—very tricky," perhaps intending to suggest the poem's ironic possibilities.

प्रभूदेसाई,
मी ऑफेण्ड झाले नाही.मुळात तुमचा मुद्दा बरोबर आहे.की जे वाचणार आहेत त्यांनी ते कोऱ्या पाटीने वाचून स्वतःचे अर्थ काढावे आणि शेवटी काही दिवसांनी लेखकाने मूळ अर्थ सांगावा.जर अर्थ/स्पॉयलर लिहिले तर पुढच्या वाचकांना एक दिशा सूचित केल्या सारखे होते.
इथे किल्लीने काय समजले विचारल्या वर मी 'आपल्याला नक्की काय समजले, की फक्त समजल्या सारखे वाटले' असे विचार करायला लागून जे समजले ते लिहिले.
इथे सुदैवाने लेखिकेला इंटरप्रिटेशन लिहिलेले चालत असल्याने ते तसेच ठेवले, नाहीतर अजूनही एडिट करू शकते.

Pages