दैवगती

Submitted by मिरिंडा on 10 May, 2021 - 02:43

१९५५/५६ सालची  गोष्ट.  उन्हाळ्याचे दिवस. . तो शेतीच्या कामासाठी मुंबईहून दिवड्यासाठी निघाला.. दिवडा.... साठगांवच्या पुढचं त्याचं गाव. साठगांवहून बसने चार तास लागत. सकाळची एस्टी न मिळाल्याने त्याला रात्र साठगावात काढणं भाग होतं. ते फार मोठं गाव नव्हतं. प्रथमच संध्याकाळच्या एसटीने तो उतरला होता . रात्रीचे दहा वाजत होते.  आता हॉटेल मध्ये राहणं भाग होतं. एस्टी स्टॅंडवरुन तो खांद्यावरची बॅग सांभाळीत हॉटेलच्या शोधात निघाला  होता.  सकाळशिवाय दिवड्याला जाणारी एस्टी नव्हती. हॉटेल मिळालं नाही तर स्टॅंडवरच झोपायचा त्याचा विचार होता....  वडिलोपार्जित घर आणि जेमतेम एकराची शेती असलेला तो . मुंबईत मिल मधे कामाला होता. लागून दोन-तीन वर्षच झाली होती. बायको आणि दोन्ही लहानग्या मुलींना घेऊन तो मुंबईत आला होता. तसं त्याचं बरं चाललं होतं. पगार चौघांना पुरत असे. मुंबईची महागाई तो सहन करीत होता. थोडे पैसे गाठीला जमले होते. पाच-सात वर्षांपूर्वी वडील गेले . लवकरच त्यांच्या मागोमाग आईही गेली होती. वर्ष दीड वर्षापूर्वीच तो भागीला आणि दोन्ही पोरींना घेऊन मुंबईत आला होता. भागी त्याची बायको. त्याची म्हणजे सदाशिवाची. त्यांचं नाव सदाशिव हे सांगायचं राहिलं. भागीरथी बऱ्या अंगलटीची तिशी ओलांडलेली स्त्री होती. ती अजूनही चांगली दिसायची. मोठाले डोळे, नाजुक नाक आणि जिवती, घट्टमुट्ट बांधा, पुष्ट गरगरीत उरोज , मागे झुकलेले मोठाले नितंब, पाहणाऱ्यांच्या डोळ्यात भरत. तशी ती काळगेलीशीच होती. पण तिचं ठाशीव शिसवी शरीर कोणालाही सहज आकर्षून घेई.  निघताना त्याने भागीला जवळ घेतले. तीही त्याला बिलगली. तिचे उष्ण श्वास त्याला जाण्यापासून परावृत्त करण्यापूर्वीच त्याला निघणं भाग होतं.तिला लवकरच येण्याचं आश्वासन देऊन , मुलींकडे लक्ष ठेवायला सांगून तो निघाला होता.  संध्याकाळची साडेपाचची एस्टी त्याने मुंबई सेंट्रल वरून पकडली.
            रात्रीची वेळ होती. वारा सुटला होता. साठगांव जंगलाने वेढलेले असल्याने त्या अर्धवट शहरात तसा गारवा होता. बरोबर घेतलेला डबा केव्हाच संपला होता. आता त्याला परत भूक लागली होती. एस्टी स्टॅंडवर खाण्यासारखं फारसं काही नव्हतंच.तशी त्याला या गावाची फारशी माहिती नव्हती. कारण तो पूर्वी कधीच इथे फिरला नव्हता. समोरच एक हॉटेल दिसलं. खरंतर जुन्या वाड्यांची लॉज आणि हॉटेलं केली होती. तशी लोकांचीही चूक नव्हती. असल्या आडगावात अडलेल्या माणसांंशिवाय राहणार तरी कोण होतं. सदाशिव त्या हॉटेलच्या मळकट कळकट ऑफिस मधे शिरला. ऑफिस मधे  एक साधारण कपड्यातला माणूस एका टेबलापलीकडील खुर्चित तंबाखू चोळत बसला होता . तंबाखू ची गोळी तोंडांत खुपशीत तो मिटल्या ओठांनीच म्हणाला, हॅं कॅंय पायजे ? रुम नाही , बोला....." असं बोलल्यावर सदाशिव काय बोलणार ? त्याला खरंतर थोडंफार खाऊन अंथरुणावर पाठ टेकायची होती. काही न बोलता तो मागे वळला. त्याने रस्त्यावरुुनच विचारलं," जवळपास एखादं हॉटेल आहे का ? " आतल्या माणसानी हातानीच" चल चल" असा इशारा केला. ती काय मुंबई थोडीच होती. माणसाची गैरसोय न करण्याचा वसा घेतलेलं ते शहर नव्हतं. अर्धा किलोमीटर अंतर चालल्यावर असंच एक हॉटेल त्याला दिसलं. त्यांचं नाव होतं. "कमल लॉज. " तिथेही तेच उत्तर. पण माणूस बरा होता. त्याने  मात्र दोन तीन हॉटेलांची नावं सांगितली. आता सदाशिवचा चालण्याचा उत्साह संपत आला होता. त्याने घड्याळ पाहिलं. अकरा वाजत होते. एक दोन हॉटेलं पाहून त्याने एस्टी स्टॅंडवर झोपायचं ठरवलं. अशीच दोन हॉटेलं पाहून तिथला नकार पचवीत  त्याला सांगितलेलं हॉटेल लीलावती मधे त्याने चौकशी केली. तिथला मॅनेजर चहा घेत होता. एकूण सदाशिवचा अवतार पाहून त्याला दयाआली असावी. त्याने त्याला चहा ऑफर केला. सदाशिवला जरा उत्साह वाटला. पण त्यानेही रुम नाही म्हंटल्यावर सदाशिव म्हणाला," खरं सांगू का. मी एस्टी  स्टॅंडला परत जाणार होतो. पण तो फार लांब आहे हो. मी असं करतो तिथे लॉबीमधेच झोपतो. सकाळी उठून जाईन. थोडासा चार्ज लावलात तरी चालेल. " मग त्याची अडचण जाणवून तो म्हणाला ," काय आहे ना भाऊ, आमच्याकडे एक रुम आहे. पण गेली पाच वर्षांपासून ती बंद आहे. "
त्याला मधेच तोडीत सदाशिव म्हणाला ," चालेल की राव. "  त्यावर आढेवेढे घेत मॅनेजर म्हणाला, " काय आहे ना तिथे पाच-सात वर्षांपूर्वी खून झाला होता. मग गावात ही बातमी फिरल्याने आमच्या इथे काही दिवस कुणीच राहायला यायला तयार होत नव्हतं. आम्ही तीही रुम काही दिवस भाड्यावर दिली. पण राहणारा रात्री घाबरून पळून जाऊ लागला. मग तिथे भूत असल्याची वदंता गावात पसरली. नंतर मात्र आम्ही ती रुम बंदच ठेवायला लागलो. "
आता मात्र सदाशिवची अगतिकता शिगेला पोहोचली. तो म्हणाला," असं बघा, ती रुम मला तुम्ही द्याच. आणि काही खायाला भेटलं तर लय ब्येस व्हील. ".....त्यावर मॅनेजर काकुळतीला येऊन म्हणाला, " भाऊ, एका माझं. मी तुमची खायची येवस्ता करतो. पन तेवढी" ती " खोली मागू नका. फुकट पोलिसांचं लफडं होईल. "  पण सदाशिव ऐकायलाच तयार नव्हता. ते पाहून मॅनेजर म्हणाला , " ठीक हाय. पन रिक्स तूमचं. चला जाऊ या. " असं म्हणून चाव्यांचा जुडगा घेऊन मॅनेजर निघाला. दुसऱ्या मजल्यावर एका कडेला असलेल्या रुमकडे ते जाऊ लागले. बाहेर वाऱ्याला उधाण आलं होतं. सदाशिव त्याला म्हणाला," तसं भूतबीत कायबी नसतं गाववाले. मानसाचा भरम हाय त्यो. " उत्तरादाखल मॅनेजर काहीच बोलला नाही. लाकडी उभेच्या उभे रुंद जिने. त्यांच्या उंच पायऱ्या वाडा जुना असल्याचं सांगत होत्या. जिने फारसे स्वच्छ नव्हते. पण सदाशिवचं तिकडे लक्ष नव्हतं. कधी एकदा खोली उघडून आत जाऊन बिछान्यावर पडतो असं त्याला झालं होतं. दुसरा माळा चक्क लाकडी बांधणीचा होता. भिंतीना रंग द्यावा लागतो असं हॉटेल मालकाला स्वप्नातही वाटतं नसावं असं सदाशिवच्या मनात आलं. दोन चार पाली आणि एक दोन उंदीर ही इकडे तिकडे जाताना दिसले. त्यांच्याही बऱ्याच पिढ्या तिथे नांदल्या असाव्यात असं कुणालाही वाटलं असतं. ते एकदाचे त्या रुमजवळ पोहोचले. मॅनेजरने चाव्यांचा जुडगा काढून एकेक चाली तो कुलुपात घालून पाहू लागला. त्याबरोबर कंटाळलेला सदाशिव म्हणाला ," चावी तर तुम्हाला म्हाईत असलंच की. " त्यावर मॅनेजर त्याला न्याहाळत म्हणाला, " काय आहे ना भाऊ गेल्या दोन-तीन वर्षांत रुम लागलीच न्हाई बगा. आनी मी सातवा मॅनेजर आहे. कोनी टिकायला तयार न्हाई. " कोणतीच चावी लागेना म्हंटल्यावर त्याने जिन्याच्या कड्यावरुन खाली वाकत नोकराला हाक मारली, " ए जनार्दन, लेका त्येलाची बाटली घेऊन ये की वाईच. "   पण जनार्दन. का कोण होता तो कशाला लक्ष देतोय . मग खालून एकजण ओरडला ," जनार्दन घरी ग्येला. रोज‌ डबल ड्यूटी करनार नाय म्हनत व्हता. ". मॅनेजरचा पेशन्स संपला होता. तो खेकसला," आरं तू घ्येऊन ये की त्येल. "   त्याने एक जोरदार शिवी हासडली.
मग थोडं थांबून म्हणाला, " बसा हितंच धा मिंटं. ते दोघेही जिन्यावर बसले. सदाशिवला तर आता तिथेच झोप असं म्हंटलं असतं तरी चाललं असतं.
    थोड्याच वेळात खालून धबधब पायऱ्या वाजवीत नोकर येऊ लागला. त्याला दहा मिनिटं लागली. तो आल्याबरोबर मॅनेजर त्याच्यावर राग काढू लागला. " तुमी समदे सारखेच हाय. मायला त्या जन्याच्या, फोद्रिच्याला आजच लवकर जायचं व्हतं न्हाई का ? आं ! बायको रुसून बसली होती काय भडव्याची. " एकाच वाक्यात दोन-तीन शिव्या दिल्यावर त्याला जरा बरं वाटलं. आलेला नोकर वळून जिना उतरुन जाऊ लागला, तशी मॅनेजर करवादून म्हणाला, " थांब की ए ! तुझ्या आयला, ही बाटली कोन घ्येऊन जाईल ?"
" तुमीबी खाली ्येनारच हाय न्हवं ? आना की बाटली". कु्लपात तेल ओतीत आणि चाव्यावर तेल ओतीत मॅनेजर वराडला, " काय रे यांचा बिस्तर तयार नको करायला ? नवीन चादर आनी पांघरुन कोन आननार? " . ..." अवो मंग त्यापायी खाली जायालाच पायजे न्हवं ? " .... " बरं जा चल घेऊन ये,  चादर आनी पांघरुन. " तो पुन्हा कुरकुरत धबधब खाली उतरु लागला. दहा बारा किल्ल्यांनंतर एकदाची किल्ली लागली. आता गंजलेली कडी सरकावयची होती. ती निघेना तेव्हा त्याने सदाशिवला बोलावलं. ". पावनं जोर लावा माज्याबरोबर. मंजी लवकर उगडंल. " दोघांनी जोर लावला. कडी उघडली. आणि दोनतीन वर्षांपासून बसलेलं दार मात्र अलगद उघडलं. आगदी सुध्या माणसासारखं.
(क्र म व: )

Group content visibility: 
Use group defaults